Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

न्याय, निवाडा आणि घरबसले न्यायाधीश

  • फार पूर्वी लहानपणी पं. महादेवशास्त्री जोशींनी लिहिलेल्या एका व्यक्तिचित्रात (पुस्तकाचे नाव बहुधा ’मणिदीप’ होते. चु. भू. द्या घ्या) काश्मीरचा राजा मातृगुप्त याच्या न्यायबुद्धीची एक लहानशी गोष्ट वाचनात आली होती. कुण्या एका व्यापार्‍याची शंभर सुवर्णमुद्रा असलेली पिशवी विहीरीत पडते. त्याचा शोक ऐकून एक साहसिक ’ती बाहेर काढून दिली तर मला काय द्याल?’ अशी विचारणा करतो. त्यावर व्यापारी म्हणतो, ’आता तसेही माझ्याहातून ते धन गेल्यात जमा आहे. बाहेर काढल्यावर तुम्हाला आवडेल ते मला द्या.’ म्हणतो. तो साहसिक ती पिशवी बाहेर काढून त्यातील एक सुवर्णमुद्रा व्यापार्‍याच्या हाती टेकवतो. व्यापारी अर्थातच संतापतो, राजाकडे दाद मागतो.’

    JusticeByTheBook

    वरकरणी परिस्थितीचे प्रेक्षक आणि अर्थातच खुद्द साहसिकाला ’व्यापार्‍याने म्हटल्यानुसारच आपण वागलो, त्यात गैर काय’ असे वाटत असते. परंतु राजा मात्र नव्याण्णव नाणी व्यापार्‍याला देण्याचा आदेश देतो. कारण राजाचा निवाडा हा त्या दोघांमध्ये झालेल्या मौखिक करारावर अवलंबून होता. शंभर नाण्यांचे साहसिकाने नव्याण्णव आणि एक मुद्रा असे दोन भाग केले. नव्याण्णव मुद्रांचा भाग त्याला अर्थातच ’आवडला’ असल्याने तुम्हाला आवडेल ते ’मला’ द्या या नियमानुसार तो भाग व्यापार्‍याला देणे अपेक्षित होते. राजानेही तोच निवाडा दिला साहसिकासह सर्वांना तो पटलाही.

    आता ’हा उलट दिशेने साहसिकावर अन्याय नाही का?’ असा प्रश्न पडू शकतो आणि तो वाजवी आहे. माझ्या मते व्यापार्‍याच्या म्हणण्याचा ध्वन्यर्थ लक्षात घेतला तर तो तसा आहेही. तसे पाहता सर्वस्व गमावलेल्या व्यापार्‍याने एक सुवर्णमुद्राही ’beggar cannot be chooser'या न्यायाने स्वीकारावी असे वाटणे साहजिक आहे. साहसिकाला ’तुम्हाला आवडेल ते मला द्या’ म्हणतो तेव्हा तो खरेतर ’तुमची मर्जी होईल तितके मला द्या’ असे सांगत निर्णय साहसिकाच्या संपूर्ण स्वाधीन केल्याची कबुलीच देत असतो. अर्थात यात साहसिक अगदीच स्वार्थी विचार करणार नाही अशी अध्याहृत अपेक्षा असणारच. एकच सुवर्णमुद्रा मिळण्याने ही त्याची अपेक्षा पुरी झालेली नाही. साहसिकाने आपल्याला फसवल्याची त्याची भावना झाली. त्याच्या बोलण्याचा ध्वन्यर्थ ध्यानात घेतला तर साहसिकाने अगदी काहीही दिले नसते तरी त्याची मनाची तयारी असायला हवी होती. परंतु त्याची ती शरणागत मनोऽवस्था ती पिशवी विहिरीत असताना, बव्हंशी अप्राप्य असताना होती. साहसिकाने ती पिशवी बाहेर काढल्यावर ती तेवढी शरणागत राहिली नाही. कारण आता अप्राप्य ते प्राप्त झाले आहे.

    साहसिकाच्या बाजूने विचार केला तर तांत्रिकदृष्ट्या त्याला व्यापार्‍याला किती मुद्रा द्याव्यात याचा अधिकार व्यापार्‍याने दिला असल्याने त्याने कमीतकमी वाटा दिला तरी ते अयोग्य नाही. पण दुसर्‍या बाजूने पाहिले तर शब्दाचा फायदा घेत त्या धनाचा मूळ मालक असलेल्या व्यापार्‍याचे जवळजवळ सर्वच धन हिरावून घेणे हे एक माणूस म्हणून त्याच्याबाबत प्रतिकूल मत निर्माण करणारे आहे.

    पण हे दोनही केवळ ’दृष्टिकोन’ आहेत, सापेक्ष आहेत. निवाडा करण्यास बसलेल्याने निवाडा हा केवळ वस्तुनिष्ठ घटकांच्या नि घटनांच्या आधारेच करायचा असतो. आणि इथे पिशवी विहिरीत पडणे, ती साहसिकाने काढून देणे या दोन घटना आणि त्या दरम्यानचा त्यांचा मौखिक करार या तीनच घटकांचा विचार करावा लागतो. आणि राजाने तसाच तो केला.

    न्यायव्यवस्था ही निवाडा करत असते. तो न्यायाच्या अधिकाधिक जवळ राहावा यासाठी त्या न्यायाला बळ देणारे जास्तीतजास्त तपशील न्यायासनासमोर सादर करणे आवश्यक असते. समोर येते त्याहून अधिक काही गृहित धरणे न्यायासनाकडून अपेक्षित नाही. तिथे अर्थार्जनासाठी देहविक्रय करणार्‍या स्त्रीवर बलात्कार झाला तर तो ही बलात्कारच मानला जायला हवा. ’त्यात काय, ती इतक्या लोकांसोबत शय्यासोबत करते. त्यात आणखी एकाने तिचा भोग घेतला तर कांगावा कशाला एवढा?’ असा विचार न्यायासनाने करायचा नसतो. कारण गुन्हा अतिक्रमाचा असतो, जबरदस्तीचा असतो हे ध्यानात ठेवावे लागतो. थोडक्यात न्यायासनासमोर आलेली घटना ही देहभोगाची नव्हे तर मर्यादाअतिक्रमाची आहे हे ध्यानात घेऊन तिचा निवाडा करायचा असतो.

    सध्या केवळ माध्यमांच्या हाकाटीला खरी मानत एखाद्या व्यक्तीला आरोपी तर सोडाच, थेट गुन्हेगार मानून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करणारे, किंवा त्यांना गोळ्या घातल्या की पोलिसांवर शाब्दिक पुष्पवृष्टी करणारे ’घरबसले न्यायाधीश’ पाहिले, की या मंडळींना न्यायाची तर सोडाच, निवाड्याचीही समज नाही हा ’माझा समज’ दृढ होत जातो.

    - oOo -


संबंधित लेखन

२ टिप्पण्या:

  1. आपले म्हणणे तर्कशुद्ध आहे.बहुसंख्य लोकांमध्ये इतक्या तर्कबुध्दीचा अभाव दिसतो.

    उत्तर द्याहटवा