रविवार, १० जून, २०१२

पराभूत थोरवीच्या शोधात

कालच पं. विजय कोपरकरांनी या तथाकथित आयडॉल वगैरे स्पर्धांबाबत एक मार्मिक प्रश्न विचारला होता. हे सगळे महागायक वगैरे लोक दुसर्‍याचे गाणे चोख कॉपी करतात, पण स्वतःची काही भर ते घालू शकतात? एका वैतागलेल्या संगीतकारांने त्यांना सागितले होते की एका महानायक वगैरे ठरलेल्या गायकाकडून अतिशय साध्या चालीचे गाणे बसवून घेताना त्यांना घाम फुटला होता. त्या संगीतकाराची टिपण्णी अतिशय मार्मिक होती. ते म्हणाले 'जर हे गाणं बाबूंजींनी आधीच गाऊन ठेवलं असतं ना तर हा महाभाग लगेच उचलून गायला असता.'  महागायक झालेल्या या महाभागांचे पुढे काय होते? कदाचित तेच होते जे बहुतेक सार्‍या शालांत परिक्षेत बोर्डात आलेल्यांचे होते. जी गत गायकांची तीच गायनप्रेमींची. गाण समजून-उमजून ऐकायला वेळ कोणाला आहे? आम्ही पैसे देतो, तुम्ही गा, आम्ही वा, जै हो. अनेक तथाकथित गायनप्रेमी मंडळी केवळ रोटरी किंवा तत्सम संस्थांच्या इवेंट मॅनेजमेंटमधून आयोजित केलेल्या कार्यक्रमालाच - तिकिट पाचेकशे पासून तीन हजारपर्यंत फक्त - हजेरी लावतात. आमच्या गरवारेमधे वट्ट पन्नास रुपये तिकिटात अगदी पं. भीमसेनजी, पं जसराज, पं. उल्हास कशाळकरांपर्यंत दिग्गज गाऊन जातात. "पण ते पन्नास रुपयांचे गाणे होऽ. तिथे हे गायक मनापासून गात नैत कै. ते काय शीरीयस गाणं थोडंच आहे?" पैसे अधिक द्यावे लागतात तेच चांगले असते असा उलटा प्रवास आता चालू झाला आहे.

गाण्याचे सोडा असा उलट प्रवास सार्‍याच क्षेत्रात सुरू झालेला दिसतो. परवाच एका चर्चेत अमीरखान ला 'सत्यमेव जयते' च्या प्रत्येक भागासाठी तीन कोट रुपये मिळतात या आक्षेपाला 'इतर कोणी का केली नाही त्याच्यासारखी समाजसेवा, तुम्ही करा मग तुम्हालाही देतील.' असे उत्तर मिळाले नि निर्वाणपदास पोहोचलो. बाबा आमटे, शिवाजीराव पटवर्धन (सुटले बिचारे), अभय बंग, राजेंद्रसिंह वगैरे मंडळींना आता चित्रपटात जायला हरकत नसावी. आजच्या केवळ पैसा एके पैसाच्या नि सांस्कृतिकदृष्ट्या खुरटलेल्या जमान्यात जगणारे आपल्या जाणीवाच खुरटलेल्या आहेत नि त्या विस्तारायला पैसे जमा करण्याच्या कामातून फुरसत नाही हे वास्तव उघड्या डोळ्याने स्वीकारत नाही. स्वतःसाठी विशिष्ट सांस्कृतिक, वैचारिक पातळी हवी यासाठी त्या पातळीलाच खेचून खाली आणण्याचे धंदे सुरू झाले आहेत. थोडक्यात हिमालयाची व्याख्या बदलून पैशाला पासरी असलेल्या टेकड्यांना हिमालय म्हणून सर्टिफाय करायचे नि ती पादाक्रांत करून आपण तेनसिंग नोर्गे किंवा एडमंड हिलरी असल्याचा समज करून घ्यायचा असे काहीसे घडते आहे. जगातील प्रत्येक गोष्ट 'मोनटाईज' करता येते, विकत घेता येते असा ठाम समज असलेली संस्कृती आज रुजते आहे. आपणही आर्थिक सुबत्ता हे एकमेव उद्दिष्ट ठेवून उरलेल्या सार्‍या घटकांची अवनती नजरेआड करतो आहोत.

या सार्‍या गदारोळात अस्सलता अशी कुठे नाहीच का? असे नसावे बहुधा. अमीरखान आपला थोर समाजसेवक असतो त्या जमान्यातही बाबा आमटेंची तिसरी पिढी त्यांचे कार्य करीत असतेच. नवे समाजसेवक पुढे येतच असतात. फक्त अपरिहार्यपणे त्यांचा व्यवस्थेशी संघर्ष होतो नि आपल्याला भरपूर पैसे देणारी व्यवस्था, तिचे समर्थन आपण करायलाच हवे या भूमिकेतून मग हे समाजसेवक प्रथम 'समाजवादी', मग 'कम्युनिस्ट' नि अखेर 'प्रगतीविरोधी' ठरवून बाहेर फेकले जातात. मग त्यांची जागा भरून काढायला रंगमंचावर अमीरखान अवतीर्ण होतो. त्याच्या त्या एपिसोडस् वर चर्चा करून लोकांना आपल्यालाही सामाजिक भान आहे बरं का असे पटवून घ्यायला नि 'अहो रूपम् अहो ध्वनिम्' न्यायाने इतरांना पटवून द्यायला सोपे जाते. ते एकदा झाले की मनातला अपराधगंड बराचसा कमी होतो नि आपण मॅक्डीमधे नवा कुठला बर्गर आलाय ते तपासायला जाऊ शकतो. लौकिकार्थाने पराभूत झालेले ते समाजसेवक, आपापल्या कलेशी बांधिलकी जपणारे कलाकार, विचारवंत, अडगळीत बसून का होईन आपले स्वीकृत कार्य निष्ठेने करत असतातच. गरज असते ती त्यांचा शोध घेण्याची. पण यांना सेलेब्रिटी मूल्य नसते आणि तसेही ज्या दिव्याच्या प्रकाशात आपले सांस्कृतिक, वैचारिक दारिद्र्य उघडे पडते तो दिवा आपणहून कोण घरात आणेल, नाही का?

ज्येष्ठ राजकीय नाटककार गो.पु. देशपांडे याच्या 'उद्ध्वस्त धर्मशाळा' या नाटकाला त्यांनी लिहिलेली (१९७४ मध्ये!) प्रस्तावना अतिशय उद्बोधक ठरावी. यातील काही भाग संकलित -नाटकांचे, तत्त्वज्ञानाचे संदर्भ वेगळे करून -  करून इथे ठेवतो आहे.

____________________________________________________________________________
 - 'उद्ध्वस्त धर्मशाळा' ले. गो. पु. देशपांडे, प्रस्तावनेतून

आपल्या सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक नेतृत्वाचा विचार करू जाता एक गोष्ट ठळकपणे जाणवते. या सगळ्या क्षेत्रात नेतृत्व फार लहान माणसांकडे आहे. त्यात पर्वतप्राय महत्तेचा माणूस कुणी दिसत नाही. आहेत त्या लहानलहान टेकड्या. त्यात पुन्हा घोटाळा असा आहे की, ह्या टेकड्यांनाही आपण हिमालय असल्याची स्वप्ने पडताना दिसतात. जुन्या काळातील डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड पद्धतीचे राजकारण मोठ्या प्रमाणावर खेळणार्‍या धुरंधरांना आपण स्वतः लोकमान्य आहोत असे वाटत असावे! पाचपन्नास गीते लिहिणार्‍यांना स्वतःला महाकवी म्हणून घेणे आवडते. चारसहा शब्द जुळवणार्‍यांना ज्ञानदेवांसारखे आपले कवित्व आहे असे वाटते. दोन संवाद लिहिणार्‍यांना आपण शेक्सपीयर किंवा बेकेट (रुचिप्रमाणे) आहोत असा सुखद भास होत असावा. एखाददुसर्‍या जिल्ह्यात थोडी संघटना बांधणार्‍यांना ह्या साठ कोटींच्या देशात आपण क्रांती घडवून आणित आहोत अशी स्वप्ने पडू लागतात. चार गावात चळवळ चालवणारांना या देशाचा जगन्नाथाचा रथ आपल्यामुळे पुढे चालला आहे असा भ्रम आहे. पंधराशे ओळींचा राजकीय लेख लिहिणारांना आपण प्रबोधनाचे उद्गाते आहोत - शक्य तर अखिल भारतीय - असा भास होतो आहे. सारांश, मोठेपणाच्या टेकड्या जागोजागी उभ्या राहिलेल्या आहेत....

त्याचा परिणाम म्हणजे विचाराचे दारिद्र्य. घोषणा नि धोपटशब्द (क्लिशे) ह्यात मराठी इतकी अडकून कधी पडली नव्हती. शब्द जड गोळे झाले आहेत. निव्वळ अर्थशून्य पाषाण. ते फक्त मोठ्यांच्या तोंडातून परिचित लयीत, परिचित लकबीत बाहेर पडत आहेत. असे वाटते की टाळ्यासुद्धा सवयीनेच परिचित लयीत, परिचित लकबीत वाजवल्या जात आहेत. आपमतलबी तत्त्वज्ञ हौतात्म्याचे पवाडे गात आहेत. स्वतःची तितकीच फसवणूक करून घेणारा एखादा कवि 'छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली. यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही' असे म्हणत न लाभलेल्या आनंदाचे उत्सव मांडित आहे.

अर्थात मोठेपण नाहीच असा याचा अर्थ नव्हे. परंतु ते बरेचसे (काही अपवाद वगळता) पराभूत मोठेपण आहे. कुठे चमक दिसलीच, कुठे खिळवून टाकणारा विचार दिसला, कुठे दूरवर कोपर्‍यात मुळे रुजलेली चळवळ दिसलीच  तर ती बहुधा या पराभूतांमुळे आहे. ही मंडळी नवीन भविष्य निर्मू शकत नाहीत. परंतु आज ना उद्या नवीन भविष्य येईल एवढा आशावाद ही मंडळी जागा ठेवून आहेत. आजच्या यशस्वी लेखकांपेक्षा, राजकारणधुरंधरांपेक्षा, सामजिक प्रबोधनाच्या मिरासदारांपेक्षा बरेच मोठे ह्या मंडळींनी अनुभवलेले आहे. पराभूत असूनही, दुर्लक्षित असूनही.

या पराभूतांच्या जयजयकार करण्याचा माझा मनसुबा नाही. शेवटी पराभव हा पराभवच असतो. त्या पराभवाला अगदी तर्कसंगत स्पष्ट कारणे असतात. पराभवांपाठी-मागे व्यक्तींची व त्या व्यक्ती ज्या सामाजिक शक्तींचे प्रातिनिधित्व करतात त्या शक्तींची कमजोरी असतेच. ती कमजोरी नाकारून जयजयकार करणे ही पुन्हा फसवणूकच. कारण अगदी साधे आहे. कमजोरांचे जयजयकार होत नसतात, होऊ नयेत. त्याने फक्त हळवेपणा येतो, दुसरे काही नाही! फक्त या प्रासादशिखरस्थ कावळ्यांच्या गर्दीत काही गरूड होते-आहेत ह्याचे भान ठेवावे.

हॅना आरंट यांनी 'मेन इन डार्क टाईम्स' या पुस्तकात अशी कल्पना मांडली आहे की 'सामाजिक किंवा सांस्कृतिक जीवनात (असे वैचारिक ) झाकोळ मधून मधून येत असतात. या झाकोळाचे एक वैशिष्ट्य असे की नेत्र दिपवून टाकणारे मोठेपण कुठेच दिसत नाही. किंबहुना मोठ्यांचे क्षुद्रत्व फार चीड आणणारे असते. पण त्याचवेळी ह्या मोठेपणाच्या भाऊगर्दीत सरळसरळ सामना हरलेली काही पराभूत माणसे ठळकपणे दिसू लागतात. त्यांचे दुर्दैव असे असते मी जरा थांबून पहात रहावे असे त्यांचे मोठेपण असते खरे, परंतु यशाच्या कल्पना बदलून टाकण्याची ताकद त्यांच्यात नसते. अवतीभवतीच्या कावळ्यांच्या गर्दीत हे उदास गरुड जबरा मोह घालतात ह्या शंका नाही.

ह्या झाकोळातली ही माणसे सारखी कुठल्या ना कुठल्या तरी कक्षेच्या शोधात असतात. बरेच वेळा अखेरपर्यंत त्यांना कक्षाच सापडत नाही. मौज अशी की त्यांना कक्षा सापडत नाही हे खरे पाहता त्यांच्या समाजाचेच अपयश असते. 'मिडिऑक्रिटिज्'चा ही एक जमाना असतो. त्या जमान्यात तीव्र संवेदनशीलता आणि द्रष्टेपणा यांचा बहुधा पराभव होत असतो. हे मी त्या पराभूतांचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणत नाही. ते होणे कदाचित अटळच असते. फक्त ह्या गरुडांच्या प्रकाशात बाकीच्या मिडिऑक्रिटिज् स्वच्छ नि स्पष्ट दिसायला लागतात हे महत्त्वाचे. 'खाली झेपावणे' हा दृष्टान्त ही मंडळी त्यांच्या आयुष्यात काही थोर परिवर्तन घडवून आणू शकली नाहीत हे समजावून देण्यापुरता उपयुक्त आहे. तथापि ज्या टकड्या हिमालयाचा दिमाख मिरवित असतात त्या टेकड्यांच्या तुलनेने हे 'खाली झेपावणे' तरीही आकाशगंगेच्या काठावरच असते. नंतर आलेल्या यशस्वी द्रष्ट्यांनी ह्या मधल्या पराभूतांची योग्य ती कदर करायची असते.

दरम्यान आपल्या हाती फक्त शोध घेण्याचे काम उरते. तूर्त अवतीभवतीच्या थोरांमधे जनमान्य अशा टेकड्या कोणत्या आणि द्रष्टेपणाचा परिसस्पर्श झालेले पराभूत आत्मे कोणते हा शोध, हा प्रश्न महत्वाचा आहे, तो पुनः पुन्हा विचारला गेला पाहिजे.

३ टिप्पण्या:

 1. धोपट मार्ग सोडू नको हा मूलमंत्र ह्या तथाकथित गायकांनी अनुसरला आहे.
  वहिवाटीची वाट धरण्यापेक्षा एखादी आडवळणाची वाट धरणे ह्याच्या प्रकृत्तीला झेपत नाही.
  श्रेया घोशाल ,कुणाल गांजावाला असे अपवाद वगळता बाकी सर्व आनंद आहे.
  मात्र आमीर खान विषयी मत जरासे खटकले.
  कार्यक्रमाच्या सुरवातीला तो ह्या संकल्पमागील उदिष्ट स्पष्ट करतो.
  मुळात जगात सर्वत्र कलाकार जे जनतेचे मनोरंजन करतात त्यांना समाजाची सेवा करणाऱ्या समाजसेवाकांपेक्षा झुकते माप मिळते. ह्या मागील कारण एकच कि कलाकार हा जनतेचे अभिप्राय , प्रेम , ह्याचा भुकेला असतो तर समाजसेवक हा निरपेक्ष असतो.
  मात्र आमीर खान ने ह्या शो मधून जे सार सांगितले आहे तेच सिंधीताई ह्यांना फार आधी उमजले. त्यांच्या एका मुलाखतीत त्या म्हणतात. " लोकांसमोर आपले दुखाचे प्रदर्शन केल्याशिवास लोक त्यास दाद देत नाहीत. त्यांनी सुरेश भटांच्या गझला असो किंवा त्यांच्या मुलाखतीतून त्यांच्या संघर्षाचे प्रभावी वर्णन असो व त्यातून त्यांच्यावर निघालेला सिनेमा असो ह्यामुळेच त्या घरोघरी पोहोचल्या.
  अनेक राजकीय पक्षाची कृपादृष्टी त्यांच्या संस्थेवर पडली.
  आज नाना पाटेकर ने आमटे ह्यांच्यावर असाच सिनेमा ( प्रहार सारखा ) काढला.
  तर ती त्याच्या शेत्रातील त्यांच्या कार्याने आमटे ह्यांच्या कार्याची दखल गावोगावी महाराष्ट्रातील प्रत्येक घरांपर्यंत पोहोचेल.
  कारण अजूनही भारतात जनतेच्या मनोरंजनचे मोठा व छोटा पडदा हेच प्रमुख माध्यम आहे.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. आपल्या एकंदर प्रतिक्रियेचा असा अर्थ निघतो की चांगला काम करायला काही हरकत नाही पण जरा प्रसिद्धी कडे पण लक्ष दिले पाहिजे. खरतर हेच भयानक आहे !!! पण ह्याचा व्यत्यास "जो चांगला प्रसिद्ध आहे तोच चांगला काम करत असला पाहिजे." जास्त भयानक आहे.आज सभोताली बघितले की हीच परिस्थिती दिसेल. माझ्या मते मंदारचा रोख ह्याच्यावर आहे. मलातरी हेच समान सूत्र जाणवते. sms जास्त मिळाले की महागायक आणि महा-नायक (आमीर) म्हणतो ते आणि तेच सत्य अशी सोपी मांडणी केली की आम्ही सुटलो. त्यातून त्यांनी पैसे मिळवले तर निव्वळ योगायोग. इतका सहज आणि सोपा मार्ग आम्ही निवडतो, व्यथा ही आहे. आमीर आणि महागायक हे निमित मात्र.
   प्रत्यकाने आपली स्वतःची चौकट आखून घेतली आहे आणि तो त्याच दृष्टीकोनातून सगळीकडे बघत असतो. ह्यात चुकीच काहीच नाही पण आजकाल ह्या चौकटीतून न दिसणाऱ्या जगाचं अस्तित्वच आम्ही नाकारतो तेंव्हा गोची होते.
   त्या चौकटीत जो मोठा दिसेल तो मोठा, जितका मोठा दिसेल तितकाच मोठा हे आपल्या लघुमतीचा आणि लघुदृष्टी चा दोष नाही का वाटत तुम्हाला. आता तुमचंच उदाहरण घ्याना, सिंधूताई चित्रपट किंवा त्यांच्या मुलाखती पहिल्या तेंवा सिंधूताई मोठ्या असल्याचा तुम्हाला जाणवलं त्याच्या आधीही त्या मोठ्याच होत्या हे तुमच्या गावीही नाही. आणि तुम्ही आपले समाज-सेवेचं आणि माध्यमायोगे मिळणाऱ्या प्रसिद्धीचे नवीन model सहज fit केलत आणि इतरांनीही ते अमलात आणावं म्हणून सल्ला देता आहात. मला वाटत मंदारची प्रस्तावना आणि गो. पुंचा उतारा आपल्या (सगळ्यांच्या) ह्याच प्रवृत्ती नेमकं बोट ठेवतो. आपण आखलेल्या चौकटी बाहेर सुद्धा काहीतरी असू शकते ही शक्यता जरी आपण लक्षात घेतली तरी खूप काही तरी फरक पडेल.

   हटवा
 2. निनाद, प्रसिद्धीबाबतचा मुद्दा वास्तव आहेच नि माध्यम म्हणून अमीरखानचे स्वागत आहेच. त्याला समाजसेवा करायची असेल तर चित्रपट अभिनेता म्हणून तो डिस्क्वालिफाय होत नाहीच. पण असा एखादा कार्यक्रम सादर करणे ही in itself समाजसेवा नव्हे... किंवा असे म्हणू की दुय्यम समाजसेवा आहे, प्रत्यक्ष कार्य नव्हे. शिवाय तो पैसे घेऊन नि दिल्या स्क्रिप्टनुसार हे कार्यक्रम करत असेल तर यात त्याचे श्रेय ते काय? शिवाय लेखाचा मुद्दा हाच आहे की दुय्यमतेला अस्सलतेचे लेबल लावून आज खुरटी माणसे स्वतःला वर उचलण्याऐवजी निकषांनाच आपल्या पातळीवर आणून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे म्हणजे देवाच्या नावाचे भूत उभे करायचे नि त्या नावावर आपले हार-फुलांचे दुकान चालवण्यासारखे आहे.

  उत्तर द्याहटवा