रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६

... कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे

  • ताई,

    तुम्ही धरण बांधायला काढलं. म्हटला आमचं गाव बुडणार. मग आमचं घरदार, जमिनी बुडवल्या नि एका गावच्या पाच पन्नास लोकांना अनोळखी उंबर्‍यांच्या पाच-पन्नास गावांत विखरून टाकलेत. तुटपुंज्या मोबदल्यासाठी आणि सुपीक जमिनीच्या बदल्यात मिळणारा वांझ जमिनीचा तुकडा पदरी पाडून घेण्यासाठी आयुष्यभराची वणवण पाठी लावली. धरणाच्या पाठीमागच्या टेकाडावार फार्म हाऊस बांधून काढणारे नक्की कुठून उगवले, आम्हाला कळलंही नाही.

    आम्ही विचारलं, ‘असं का?’
    तुम्ही म्हणालातः देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.


    Sacrifice

    दादा,

    तुम्ही गावात कारखाना काढू म्हटला. पुन्हा आमच्या जमिनी घेतल्यात. म्हटलात आमच्या पोराबाळांना नोकरी देऊ. कास्तगारी करून स्वाभिमानाने जगणारी आमची पोरं, हातात दंडुका घेऊन दारात टाकलेल्या खुर्चीवर बसून येणार्‍या जाणार्‍या कोटाला सलाम ठोकू लागली. कारखान्यात चाकरी करून फटफट्या उडवणार्‍या नि ऐटीत मोबाईल मिरवणारी पोरं मात्र बाहेरून आली.

    आम्ही विचारलं, ‘असं का?’
    तुम्ही म्हणालातः देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.


    अण्णा,

    कधीतरी डाळीचं उत्पादन कमी झालं. पण नेमकं आमच्याकडे मायंदाळ डाळ झाली. वधारलेले भाव पाहून, कधी नव्हे ते चार पैशांची आस वाढू लागली. पण तेवढ्यात शहरांतून महागाईची बोंब उठली. लगेच तुम्ही डाळ आयात करून भाव पाडलेत. जास्तीच्या पैशावर पाहिलेली सारी स्वप्ने मातीत घातलीत.

    आम्ही विचारलं, ‘असं का?’
    तुम्ही म्हणालातः देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.


    भाई,

    चुकूनमाकून धरण पावलं नि जमीनीला ओल आली. वांझ जमीन सोडून शहरात मजुरी करायला गेलेली पोरं परतुन आली, चार पिकं काढू लागली. पण आमच्या पैशावर सहकाराचे ठेकेदार आणि व्यापारी बोलेरो नि स्कोडा उडवू लागली. हे असं कसं झालं हे आम्हाला समजलंच नाही.

    आम्ही विचारलं, ‘असं का?’
    तुम्ही म्हणालातः देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.


    रावसाहेब,

    तुम्ही म्हणालात देशांत खूप काळा पैसा आहे, नोटा रद्द करून सारा बाहेर काढतो. आमचे नुकसान झाले तरी चालेल, पण श्रीमंताना धडा शिकवा असे ‘सवत तरी रंडकी होऊ दे’ समाधान आम्ही मानू लागलो. पण तुम्ही आमच्या पतपेढ्या, सहकारी बँका, जिल्हा/ग्रामीण बँकांना पैसे न देता आमचीच कोंडी केलीत. दातावर मारायला पैसा नसलेल्यांना तुम्ही ‘व्हॉट्सअ‍ॅप वापरता तसे कॅशलेस व्यवहार करा’ म्हणालात. पण साहेब, सगळं इंग्रजीत असलेल्या त्या तुमच्या अ‍ॅपवर आम्ही कसे व्यवहार करणार?’ असा प्रश्न विचारावासा वाटला होता. पण आमचे वडील म्हणाले, ‘ते मग इंग्रजी शिका’ म्हणतील.

    आम्ही विचारलं, ‘असं का?’
    तुम्ही म्हणालातः देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.


    मोठे साहेब,

    सगळ्या जुन्या नोटा तुम्ही कचर्‍यात टाकल्यात, बाजारात गिर्‍हाईक नावाचं चिटपाखरू दिसेनासं झालं. आमच्या भावांचा वीस लाख किलो टोमॅटोचा चिखल झाला, कांदा तीस पैसे किलोनेही कुणी घेईना.

    आम्ही विचारलं, ‘असं का?’
    तुमचे स्मार्टफोनी शिलेदार म्हणाले: देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.


    मला आता एकच सांगा, सैन्यात जीव द्यायला जाणारे आम्ही, शेतीवरून विस्थापित झालेले आम्ही, तुम्हाला नोटा बदलायच्या म्हणून भिकेला लागणारे आम्ही, टोमॅटोच्या चिखलात रुतणारे आम्ही. आम्हाला सतत ‘प्रगतीसाठी, विकासासाठी कुणीतरी त्याग करायला हवा’ म्हणून शहाणपण शिकवणारे तुमचे स्मार्टफोनी, ट्विटरी, फेसबुकी मित्रमैत्रिणी देशासाठी नक्की कुठला त्याग करताहेत, करणार आहेत, नि कधी?

    - oOo -


हे वाचले का?

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

कास्त्रो

  • (क्यूबाचा हुकूमशहा फिडेल कास्त्रो याचे काल निधन झाले, त्या निमित्ताने मनात उमटलेले विचार)

    FidelCastro

    ‘कल्याणकारी हुकूमशहा’ (benevolent dictator) अशी एक संज्ञा अधूनमधून कानावर पडत असते. उच्च-मध्यमवर्गीय आणि नव-मध्यमवर्गीयांना ती आकर्षक वाटते. लोकशाही म्हणजे भोंगळ, हुकूमशाही कशी ‘रिझल्ट ओरिएंटेड’ असते वगैरे दावे एरवी निर्णयप्रक्रियेवर फारसा प्रभाव राखू न शकणारे करत असतात. असा ‘बायपास’ आपल्याला हवे ते घडवेल, अशी त्यांना आशा असते.

    परंतु याचा अर्थ योग्य काय नि अयोग्य काय याबाबत ते फारसे चिकित्सक असतात असे समजायचे कारण नाही. आपण सोडून अन्य गटांचे फाजील लाड या लोकशाहीमुळे होत आहेत, गुणवत्तेला किंमत राहिलेली नाही इ. तक्रारी ते वारंवार करत असतात. आणि याचे खापर बहुमताच्या लोकशाहीवर ते फोडत असतात

    पण कल्याणकारी हुकूमशहा म्हणतात त्याची गुणवैशिष्ट्ये काय, तो कसा ओळखावा, त्याचे मूल्यमापन कसे करावे याबाबत फार विचार करण्याची तसदी ते घेत नाहीत. अध्यात्मिक जीवनात जसा एक छानसा बुवा-बाबा-देव शोधून ‘तो सारे बरे करील’ यावर विश्वास ठेवून त्याच्या मांडीवर डोके ठेवून ते झोपी जातात, तशीच काहीशी त्यांची भावना या कल्याणकारी हुकूमशहाबाबत असते.

    मी स्वतः लोकशाहीवर विश्वास असलेला असल्याने, अशा कल्याणकारी म्हटल्या जाणार्‍या हुकूमशहाची सत्ता यावी असे मला मुळीच वाटत नाही. परंतु एका व्यक्तीचे मत आणि वास्तव यात तफावत ही असणारच. मग समजा आलाच एखादा हुकूमशहा, नि ‘आपण कल्याणकाही हुकूमशाही राबवणार’ असे म्हणू लागला तर त्याचे मूल्यमापन कसे करावे? त्याचा दावा सत्य आहे, की मूळ सत्तालोलुपतेला दिलेले अवगुंठन आहे हे कसे तपासावे? याचा विचार करून ठेवणे अपरिहार्य ठरते.

    अर्थात अशी मूल्यमापनाची चौकट तयार करणे सोपे नाही. तेव्हा निदान सुरुवात म्हणून जगभरात झालेले हुकूमशहा आणि त्यांची कामे यातून काही दखलपात्र, कल्याणकारी असे काही सापडते का हे पहायला हरकत नाही. (शिवाय ‘हुकूमशाही नि एकाधिकारशाही यात आपण भेद मानतो का, मानावा का?’ हा एक प्रश्न इथे उपस्थित होतो.) याचा शोध घेताना क्यूबाचा अध्यक्ष फिडेल कास्त्रो याने राबवलेल्या आरोग्य क्षेत्रातील सुधारणांबाबत माझा वाचना आले होते. त्यावर ‘पुरोगामी जनगर्जना’साठी मी लेख लिहिला होता.

    कल्याणकारी म्हणवणार्‍या हुकूमशहांचे मूल्यमापन करताना कास्त्रोची या क्षेत्रातील कामगिरी विचारात घ्यायला हवी.

    - oOo -


हे वाचले का?

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६

मराठी साहित्यातले नेहरु

  • राजकारण असो की साहित्यकारण, आपल्या नि आपल्या गटाची प्रगती व्हायची असेल त्याला एकसंघ ठेवायचा असेल, तर दुर्योधनाने जसा सतत पांडवांचा बागुलबुवा उभा करून आपल्या शंभरांची एकजूट राखली, तसे एक बाह्य शत्रू, एक बाह्य विरोधक सतत जिवंत ठेवावा लागतो. ही शत्रूलक्ष्यी मांडणी आदिम माणूस जेव्हा टोळ्या करून राहात होता तेव्हापासून रक्तात भिनलेली आहे. माणसाला जसजशा प्रगतीच्या वाटा सापडत गेल्या तसतशी ही गरजही बदलत गेली असली, तरी पुरी नष्ट झालेली नाही.

    सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय असो की धार्मिक; कोणत्याच क्षेत्रात, कुण्याही मोठ्या झालेल्या व्यक्तीला अथवा संघटनेला समाजाची जमीन राब घातल्यासारखी स्वच्छ नि बीजरोपणायोग्य अशी आयती मिळालेली नाही. जुन्या, प्रस्थापित व्यक्तींच्या आणि विचारव्यूहांच्या मर्यादा दाखवून देत असतानाच त्यांचे ऋण मनमोकळेपणे आणि डोळसपणे मान्य करून (हे महत्त्वाचे !) पुढे जाणे आवश्यक असते.

    पण आपले स्थान निर्माण करू इच्छिणारे आणि तरीही आपल्या पूर्वसुरींचा साकल्याने नि साक्षेपाने विचार करून मूल्यमापन करण्याची कुवत असणारे, आता जवळजवळ अस्तंगत झाले आहेत. तुम्ही एखाद्या नेत्याचे, लेखकाचे, विचारवंताचे नाव उच्चारताच समोरचा/ची एकदम तलवार तरी उभारतो, झेंडा तरी उभारतो किंवा एक कुत्सित हसू तरी फेकतो. या तीनच्या पलिकडच्या शक्यता आता जवळजवळ दिसून येत नाहीतच.

    ‘आम्हाला समजलेले सत्यच काय ते वैश्विक’ हा गंड केवळ धार्मिकांची मिरासदारी आहे असे मुळीच नाही, ‘आम्हाला रुचते तेच श्रेष्ठ साहित्य’ (आकलनाबाबत मी काहीही बोललेलो नाही याची कृपया नोंद घ्यावी) हा गंड घेऊन जगणार्‍या प्रसिद्ध नि अप्रसिद्ध अशा दोन्ही प्रकारच्या साहित्यिकांची वारुळे जागोजागी दिसतात. आपली नावड आणि लेखनाचे सर्वंकष सामान्यत्व या दोन वेगळ्या गोष्टी आहेत याचे भान भल्या-भल्या 'मराठी सारस्वताच्या सेवकां'ना नसते.

    अगदी वस्तुनिष्ठ साहित्यिक मूल्यमापन म्हटले तरी ते निकषांच्या अधीन असते हे विसरता कामा नये. ‘मराठी साहित्य हे निकस आहे, कारण त्यात वैश्विक भान नाही.’ असे कुण्या समीक्षकाचे वाक्य फेसबुकवर पोस्ट म्हणून कुणी लिहिले होते. मुळात हे भलतेच सबगोलंकार वाक्य आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ पुरेसे पुरावे नि तर्क दिल्याखेरीज त्याचा अर्थही स्पष्ट होणे अवघड आहे. पण ते असो. यावर ‘वैश्विक भान असणे ही श्रेष्ठ लेखनासाठी किमान पात्रता आहे का?’ असा प्रश्न मला पडला होता.

    गंमत म्हणजे हे वाक्य फेकणारे बहुधा वंचित साहित्य हे वैश्विक असल्याचा समज बाळगून असतात. ‘जगभराचे वंचित एकाच प्रकारचे असतात. त्यांच्या समस्या, त्यांचे जगणे एकाच मुशीतले असते’ असा भाबडा समज असणार्‍या राजकीय व्यूहाची पोथी मिरवणार्‍यांचे सोडून द्या. त्यांना संघटन ही अपरिहार्यता असल्याने काही व्यावहारिक तडतोडी कराव्या लागतात. परंतु साहित्यिकांनीही अशा एकसाचीकरणाची, किंवा एक प्रकारच्या ‘साहित्यिक एकेश्वरवादा’ची पुंगी वाजवावी हे अनाकलनीय आहे.

    नेहरूंनी सामाजिक पातळीवर जगण्याचे बहुपर्यायी आयाम, बहुसांस्कृतिकवाद मान्य केले. ते शहाणपण ‘आमचा रथ सर्वसामान्यांपेक्षा वेळा आहे, तो जमिनीपासून चार अंगुळे वर चालतो’ असा समज करून घेत स्वतःला समाजाचे सांस्कृतिक, वैचारिक नेते मानत स्वतःसाठी सर्वंकष(!) अभिव्यक्ति-स्वातंत्र्याची अपेक्षा ठेवणार्‍या साहित्यिकांनी मात्र केलेला दिसत नाही.

    आम्ही समाजाचे नेते या गंडाची दुसरी बाजू म्हणजे ‘सर्वसामान्यांना जे रुचते, उमजते ते सामान्य’ हा उफराटा तर्क नि गंड. आपला गट अबाधित राखण्यासाठी जसा एक बाह्य शत्रू लागतो, तसेच आपल्या गटाअंतर्गत आपले तथाकथित उच्च स्थान वगैरे निर्माण करण्यासाठी ‘बहुसंख्येपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत’ हे सतत सिद्ध करण्याचा प्रयत्न करणेही. श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी फार कष्ट करावे लागतात, नि त्यासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता आपल्या अंगी असेलच असेही नाही. आता यावर दोन सोपे उपाय आहेत.

    पहिला म्हणजे बहुसंख्येला ‘तुम्ही मूर्ख आहात, तुम्हाला काही कळत नाही’ हे सतत सांगत राहणे. यासाठी एखादा लेख, एखादा लेखक, एखादे पुस्तक, एखादा गायक, एखादा चित्रपट लोकप्रिय होऊ लागला, की ताबडतोब तो कसा ‘सामान्यच नव्हे, तर वाईट आहे’ हे सर्वसामान्यांना सांगायला सुरुवात करणे. आपली समज काहीही असो, बहुसंख्येकडे ती नाही हे सतत सांगत राहावे.

    दुसरा सोपा उपाय म्हणजे अन्य श्रेष्ठ ठरलेल्या किंवा मानल्या जाणार्‍यांचे श्रेय हिरावून घेण्याचा प्रयत्न करणे. अमुक एक माणूस चूक आहे असे सिद्ध करून दिले, की त्याच्या रिकाम्या केलेल्या देव्हार्‍यात सामान्य अज्ञ जन आपल्यालाच जागा देतील, हा इतिहासाचा विचार करता परिणामकारक उपाय त्याहून सोपा असतो. कर्तृत्वापेक्षा निंदा केव्हाही सोपी असते. तिला निर्मितीची अपरिहार्यता नसते, मूर्तिभंजनाच कौशल्य जमले की पुरते.

    साठ-पासष्ट वर्षे घडवलेला देश,  पुरेसा कलकलाट करता आला की ‘कचर्‍यात गेल्याचे’ अल्पावधीत सिद्ध करता येते, नेहरुंचा वारसा नाकारता येतो. त्यांनीच निर्माण केलेल्या सुस्थिर देशातील व्यवस्थेवर आयता कब्जा करताना, त्यांनी देश कचर्‍यात नेला हे निलाजरे दावेही करता येतात. नेहरूंच्या डोक्यावर पाय दिल्याखेरीज नव्या नेत्यांना आपले स्थान निर्माण करताच येत नाही, तितका आत्मविश्वास त्यांच्या मनात कधी निर्माणच होत नाही, हे उघड आहे.

    PLAndNehru

    मराठी साहित्यात सध्या हाच ‘मान’ पुलंचा आहे. आज ‘पुलंनी वाचकांची अभिरुची बिघडवली.’ हे परवलीचे वाक्य म्हटल्याखेरीज नव्या साहित्यिक वारकर्‍यांच्या दिंडीत प्रवेशच मिळत नाही. त्यांच्या डोक्यावर पाय दिल्याखेरीज साहित्यिक क्षेत्रात आपल्याला मान मिळणार नाही, असा काहीसा समज नवलेखकांचा होताना दिसतो आहे.

    सामाजिक जाणीवेचे लेखन, किंवा अगम्य घाटाचे लेखन, किंवा कुण्या फलाण्या परदेशी लेखकाचे लेखन व्याख्येनुसारच श्रेष्ठ, आणि ‘मध्यमवर्गीय जाणिवां’चे लेखन व्याख्येनुसारच कमअस्सल, असे एकतर्फी निकाल देत लोक पुढे जाताना दिसतात.

    जसे वाचक खांडेकर, फडके, अत्रे, पुलं या मार्गाने पुढे येताना, आता अनेक वाटांनी विखुरले, तसे वाचकांची अभिरुची विस्तारली. त्यांच्यासमोर अनेक पर्याय निर्माण झाले. आपल्या इच्छेनुसार, कुवतीनुसार, आवडीनुसार निवड करताना, अन्य पर्यायांना मुळातच कमअस्सल ठरवण्याची गरज नाही, याचे भान मात्र अजून लेखकांना आलेले नाही, तिथे वाचकांना कुठून येणार.

    खांडेकरांच्या कादंबर्‍यांतून दिसणारा - नाक वरुन चालणार्‍यांना बेगडी वाटणारा - देशप्रेमी, त्यागी वगैरे स्वरूपाचा नायक फडकेंच्या कादंबर्‍यांतून रोमँटिक वगैरे झाला. देशात जन्माला आलेली नोकरशाही, औद्योगिकरणाने झालेले नागरीकरण, त्यातून एकाच वेळी निर्माण झालेले मध्यमवर्गीय आणि कामगार समाज; या दोन्हींना सामावून घेणारी शहरे, त्यातून उभे राहणारे जगणे, यातील अनेक पैलूंचा पुलंसारख्या माणसाने बहुधा नर्मविनोदी शैलीत वेध घेतला. कधी टोपी उडवली, कधी वैगुण्यावर बोट ठेवले, कधी त्यातील वरवरच्या संघर्षातही मुळी घट्ट असलेल्या नात्यांची वीण उलगडून दाखवली.

    साहित्य, संगीत, कला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बोरकरांपासून आरती प्रभूंपर्यंत, वसंतखाँपासून मन्सूरअण्णांपर्यंत अनेक ‘उत्तम गुणांची मंडळी’ जोडत गेलेला हा माणूस पुढच्या अनेक पिढांतील संभाव्य गुणवत्तेलाही हात देत गेला.

    प्रत्येक व्यक्तीच्या आकलनाचे एक वर्तुळ असते. तसेच त्यांचेही होते. पण ‘ते वर्तुळ दुय्यम नि आमचे हे वर्तुळ श्रेष्ठ’ हे विधान पुराव्याशिवाय केले, तर अदखलपात्र असते. केवळ ‘त्यांचा झेंडा तपकिरी रंगाचा नि आमचा चॉकलेटी रंगाचा म्हणून आम्ही श्रेष्ठ’ हे विधान जितके हास्यास्पद तितकेच. कारण आधी चॉकलेटी रंग श्रेष्ठ का याची मीमांसा द्यावी लागते, त्यासाठी निकष द्यावे लागतात, आणि सर्वात महत्त्वाचे मुळातच त्याला श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरवता येईल अशा पक्षपाती निकषांना कटाक्षाने दूर ठेवावे लागते.

    अर्थात ‘डोक्यावर पाय देऊन’ वर चढण्याची इच्छा असणार्‍यांना एवढे कष्ट घ्यायचे नसतात. ‘पासष्ट वर्षात देश कचर्‍यात गेला’ किंवा ‘पुलंनी मराठी वाचकाची अभिरुची बिघडवली.’ ही विधाने बिनदिक्कतपणे करून पुढे जायचे असते.

    - oOo -


हे वाचले का?

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०१६

‘विकसित’ भारतातील वाघ

  • नव्या बातम्या ‘विकसनशील’ नव्हे विकसित भारतातल्या...

    TigerFood
    हे meme कायप्पामार्फत मिळाले असल्याने याचा चतुर कर्ता मात्र ठाऊक नाही.

    १. वाघांच्या एकादशीच्या उपासासाठी साबुदाणा आणि शेंगदाणे यांच्यासाठी टेंडर मागवण्यात येत आहे. विहित नमुन्यात अर्ज पाठवावेत.

    २. ‘करवा चौथ’च्या वेळी चाळण्या उपलब्ध करून न दिल्याबद्दल समस्त वाघिणींनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले, आणि सायंकाळी पंचगव्य सेवनाने सोडले.

    ३. कालच्या काकडीच्या कोशिंबीरीत खडे होते म्हणून वाघांनी जेवण आणून देणार्‍या मदतनीसाला चारही बाजूंनी घेरुन कोपर्‍यात घेतले आणि..... दहा उठाबशा काढायला लावूनच सोडले.

    ४. आठवड्याचा मेन्यू ठरवण्याचा लोकशाही हक्क वाघांना मिळाल्यापासून त्यांच्यात रोज भांडणे होताना दिसू लागली आहेत. काल ‘तांदळाची भाकरी की ज्वारीची’ यावर दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. वाद नको म्हणून मीटिंगच्या अध्यक्षस्थानी असलेल्या वाघाने आपल्या अधिकारात ‘बाजरीची’ असा निर्णय दिल्यावर, दोन्ही गटांनी एकत्र होत त्याला बडवून काढले.

    एका देशीवादी वाघाने ‘जाऊ द्या, भांडू नका. नाचणीची भाकर पौष्टिक असते. तीच घ्या’ अशी समन्वयवादी (शब्द ‘समन्वयवादी' असा आहे, ‘समाजवादी’ नव्हे, नीट वाचणे!) भूमिका घेताच ‘अध्यक्ष वाघाच्या विरोधात सतत भूमिका घेणे सोडा’ असे म्हणत अध्यक्षासकट सारे उरलेले वाघ त्याच्या अंगावर धावून गेले आणि ‘याला सिंहांच्या पिंजर्‍यातच सोडले पाहिजे’ असा आग्रह धरू लागले.

    ५. सिंहांनी तुरडाळीच्या आमटीसाठी हट्ट धरला म्हणून तिथल्या केटररने त्यांना ‘डाळ ठेवलीये तुझ्या बापाने, गुमान ताकाबरोबर भात खा.’ असा दम दिला.

    ६. ‘हे निलाजरे वाघ बेशरमपणे झाडपाल्याची भाजी ऊर्फ पालेभाजी खातात, याने आमच्या धार्मिक भावना दुखावतात’ असा आरोप सिंहानी करायला सुरुवात केली. हे पालेभाजी खाणे रात्री गुपचुप होत असल्याने सिंहांनी आळीपाळीने रात्रीचा पहारा सुरु केला.

    ७. ‘वाघ आणि सिंहाच्या शाकाहारी असण्याने आमची संख्या अमर्याद वाढते, त्यामुळे पिंजर्‍यात खूप गर्दी होते या साठी आम्हाला ‘इच्छामरणा’चा कायदा लागू करा’ या मागणीसाठी काळवीटांच्या पदच्युत नेत्याने आमरण उपोषण सुरू केले आहे. तर ‘यापेक्षा कळपाच्या नेत्याची नसबंदी करा’ या मागणीसाठी काळवीट माद्यांनी मोर्चा उघडला आहे. (‘हा उंडगा फुकटचा गिळतोय आणि xxxx’ एक पुनरुत्पादन-बाद ज्येष्ठ नागरिक पदास पोहोचलेली मादी हातात बोंडुक घेतलेल्या चॅनेल-प्रतिनिधीला सांगत होती.)

    ८. पिंजर्‍यातल्या वाघांना पाहण्यासाठी रोज गर्दी करणार्‍या गायी, म्हशी आणि त्यांचे पाडे-रेडे यांच्या गर्दीमुळे आपली दुपारची झोप मोडत असल्याने, दुपारी १ ते ४ या वेळात प्राणिसंग्रहालय बंद ठेवावे– अगदी गोवंशीयांनाही प्रवेश देऊ नये, अशी मागणी महाराष्ट्रातील पुणे नावाच्या गावाहून नुकतीच बदली होऊन आलेल्या बिबट्याने, प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनाकडे केली आहे.

    ९. ‘सेल्फी विद लायन’ ही नवी क्रेज गोवंशीयांमधे भलतीच लोकप्रिय झालेली आहे. त्यासाठी अतिरिक्त बोनस म्हणून दर रविवारी ‘भगर/वरई आणि शेंगदाण्याची आमटी’ असा जादाचा मेन्यू द्यावा अशी मागणी ‘मार्जारकुल सेने’च्या अध्यक्षांनी केली आहे.

    १०. टोमॅटोचा लाल रंग पाहून रक्ताची, शिकारीची– आणि कम्युनिस्टांची– आठवण होत असल्याने, जेवणातून तो बाद करावा अशी मागणी गुजरातमधून आलेल्या सिंहानी केली आहे. त्यावर पंजाबी डिशेसचे फॅन असलेल्या वाघांनी याला आक्षेप घेत ‘त्यापेक्षा या हलकटांच्या जेवणातून ते उंधियु वगैरे बाद करा आधी, लेकाचे त्यांच्या पिंजर्‍यात बसून आचवतात तर त्या वासाने इथे आम्हाला गुदमरायला होते’ अशी मागणी केली आहे.

    - आमच्या वार्ताहराकडून.

    (बातमी: छत्तीसगडमध्ये वाघांसाठी ‘बीफ’ खरेदी करण्याचे टेंडर हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे रद्द)


हे वाचले का?