(बातमी: 5.4-magnitude quake hits South Shetland Islands )
---
मोदींच्या भाषणांमुळेच हे झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
मोदींनी ‘आम्ही भारतातून हाकललेली काँग्रेसची गेल्या सत्तर वर्षांतील पापे तिकडे जमिनीतून बाहेर येत असल्यामुळे’ भूकंप झाल्याचा प्रतिटोला दिला.
‘तेथील एका नागरिकाने मोदींवर टीका केल्यामुळे ईश्वरानेच त्यांना शिक्षा दिली’ असे रविशंकरप्रसाद भक्तिभावाने ट्विट करते झाले.
आपल्या पक्षाचा एकमेव सदस्य असलेल्या कम्युनिस्टाने ‘समाजवाद्यांनी संघाशी केलेल्या छुप्या युतीचे तिथे गाडलेले पुरावे बाहेर येण्यास यातून मदत होईल’ अशी आशा व्यक्त केली.
कन्हैयाकुमारने ‘भूकंप से आजादी’ अशी नवी घोषणा दिली.
पुण्यातील दक्षिण-पूर्व समाजवादी गटाने कलेक्टर कचेरीसमोर पंधरा मिनिटे घोषणा देऊन अंटार्क्टिकामधील अमेरिकन हस्तक्षेपाचा निषेध करत ‘चालते व्हा’ असा आदेश दिला.
फडणवीसांनी याचा जाब विचारणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहा अशी गळ घालणारे पत्र राज्यपालांना लिहिले.
प्रवीण दरेकरांनी ही घटना टाळता न येणे हा ठाकरे सरकारचा पराभव असल्याची टीका करत घंटानाद आंदोलन केले.
राणेंच्या चिरंजीवांनी दैनंदिन पत्रकारपरिषद दीड मिनिटाऐवजी तब्बल पावणेदोन मिनिटांची घेऊन ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा हा पुरावाच असल्याचे जाहीर केले.
‘मी स्वत: त्या बेटावर लवकरच जाऊन पाहणी करेन नि शक्य ती सर्व मदत महाराष्ट्र सरकार देईल’ असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
शरद पवारांच्या शेटलँड बेटाच्या दौर्याचे नियोजन सुरु झाले आहे. ‘तिथे पाऊस पडतो की कृत्रिमरित्या पाडावा लागेल’ याची चौकशी हवामानखात्याकडे करण्यात आली. पण त्यांचे सर्व्हर डाऊन असल्याने ‘सोमवारी चौकशी करा’ असा निरोप मिळाला आहे.
‘द. शेटलँड बेट हे मूळ भारताचाच भाग होते आणि तिथली मूळ भाषा मराठी होती हे नावावरुनच सिद्ध होते.’ असे ‘हिंदू सारा एक’वाल्या मिशीकाकांनी जाहीर केले.
’त्या बेटावरील नागरिक अल्लाहच्या मूळ शिकवणीपासून दूर गेल्यामुळे अल्लाहने त्यांना शिक्षा दिली’ असे मौलवी रमताराम यांनी शुक्रवारच्या नमाजानंतर जाहीर केले.
‘द. शेटलँड तो सिर्फ झॉंकी है, मक्का-मदिना बाकी है’ ही घोषणा गायवाडीतील ज्वलज्जहाल हिंदू चिंटू चोरडिया यांनी आपल्या शालेय मित्रांकडून घोटून घ्यायला सुरुवात केली आहे.
‘तेथील हिंदूंची संख्या फार कमी झाल्यामुळेच हा प्रसंग ओढवल्याचे’ बजावून सांगत, ‘प्रत्येक हिंदूने आपले एक मूल तिकडे पाठवावे’ असे आवाहन ब्लॉगरपीठाचे शंकराचार्य रमताराम यांनी केले आहे.
पायघोळ कपडेवाले काही जण तातडीने “प्रभूला शरण जा, तो अशा संकटांपासून तुम्हाला मुक्त करेल” म्हणत प्रभूचे मार्केटिंग करण्यास सरसावले आहेत.
ट्रम्पकाकांनी ‘अमेरिका फर्स्ट’ ही घोषणा देत शेटलँड बेटांवर लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचे जाहीर केले.
चीनने ते बेट चीनचा भूभाग असल्याचे जाहीर करुन तिथे अवैधरित्या प्रवेश करू पाहणार्या अन्य देशांशी राजनैतिक संबंध तोडण्याची धमकी दिली आहे.
ते बेट हे क्रायमियाचा भाग होता याचा पुरावा शोधण्यात, नसल्यास निर्माण करण्यात पुतीनकाका गर्क आहेत.
‘साला तो पुण्याचा परांजप्या तिकडं राहायला गेल्यामुळे हे घडलंय’ अशी एक परखड प्रतिक्रिया व्हॉट्स-अॅप ग्रुपमध्ये फिरते आहे.
फेसबुकवरील विद्रोही ग्रुप्समधून ‘हे ब्राह्मणी व्यवस्थेचे पाप आहे’ अशी गर्जना होऊ लागली आहे.
‘पुणे-नागपूर-पुणे’ नावाच्या फेसबुक ग्रुपमध्ये ‘आरक्षणवाले तिकडे पाठवले असतील म्हणून यांना भूकंपप्रवणतेची शक्यता आधी वर्तवता आली नाही. द्या अजून आरक्षण या साल्यांना.’ अशी टिप्पणी झाली आहे.
‘भूकंप हे नाव पुल्लिंगी असणे हा पुरुषप्रधान संस्कृतीचा कावा आहे. शंकराचा अपवाद वगळला तर सर्व आक्रमक, विनाशक देवता या स्त्रिया आहेत हे जाणीवपूर्वक दडवले जात आहे.’ असा आरोप बटरफ्लायलॅंड विमेन्स असोसिएशनच्या क्रांतिप्रभादेवी यानी केला आहे.
यावर पुरोगामी वर्तुळाने आयोजित केलेल्या एका व्याख्यानमालेनंतर झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये ‘हे सारे मध्यमवर्गाचे पाप’ या निष्कर्षावर पुन्हा एकवार शिक्कामोर्तब झाले आहे.
‘जिस भूमीपे गौमूत्र का अभिसिंचन नहीं, वह अपवित्र भूमी ऐसे संकटोंने घिरी रहेगीही।’ असं पतंजलीआजोबांनी जाहीर करत गोमूत्राचे टँकर-शिप लवकरच तिकडे रवाना करु असे आश्वासनही दिले आहे.
...
.
.
.
‘अहो तेथील भूस्तररचना आणि पर्यावरण...’ एवढेच बोलू शकलेल्या भूगर्भशास्त्रज्ञाची हाडेही कुणाला सापडलेली नाहीत.
- oOo -