आमच्यावेळी असं नव्हतं... नाना म्हणाले नातवाला चौथीत नव्वद टक्केच मिळाले ’फार लाडावून ठेवलाय आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले नातवाला पाचवीत अठ्ठ्याण्णव टक्के मिळाले ’अभ्यासाच्या अतिरेकात मूल चिणेल आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले शाळेतल्या गॅदरिंगमध्ये नातीच्या नाचाचा कार्यक्रम झाला ’अभ्यास सोडून नसते धंदे, आमच्यावेळी असं नव्हतं...' नाना म्हणाले नातीला चौथीत स्कॉलरशिप मिळाली. ’पुस्तकी किडे झालेत सगळे, आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले मागच्या वर्षी पाऊस दोन दिवस उशीरा आला... ’हल्ली सदा दुष्काळच असतो आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले यावर्षी पाऊस दीड दिवस आधी आला ’सारे ग्लोबल वॉर्मिंगचे पाप आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले एक वर्षी पूर आला, लोक उध्वस्त झाले ’हल्ली नियोजनच नसते आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले एक वर्षी अवर्षण आले, लोक घायकुतीला आले ’कृत्रिम पाऊस पाडा की, आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले पीक जळून गेले शेतकरी उध्वस्त झाला, ’शेतकर्याकडे दुर्लक्ष होते आहे आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले पीक महामूर आले, भाव पडले, सरकारने हमी भाव दिला ’शेतकरी माजलेत साले, आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले वैतागली पुढची पिढी म्हणाली, तुम्हीच आता घर चालवा. ’सर्वांच्या हितासाठीच मी, आमच्यावेळी असंच होतं...’ खुशीत येऊन नाना म्हणाले ... आणि घरात पुन्हा नानांचे राज्य आले! - रमताराम
- oOo -
दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी       गेले... ते दिन गेले       दशांशचिन्हांकित कविता आणि प्रमेय-प्रत्यंतर       लेखकजिज्ञासायोग       आद्य मराठी-सारस्वतांचा निघंटु       छोटीशीच आहे फौज आपुली       आज धारानृत्य चाले...       वेचताना...: जिज्ञासामूर्ती       जिज्ञासामूर्ती       न स्त्री स्वातंत्र्यमर्हती      
मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०
... नाना म्हणाले
गुरुवार, १० डिसेंबर, २०२०
दोन स्टँप
कुरियरच्या जमान्यात लोक स्टँपला विसरलेत म्हणे. पूर्वी, प्रेमपत्र असो की वसुलीची नोटीस स्टँप लावायचा की पोस्टखाते निर्लिप्तपणे पत्र इच्छितस्थळी पोचवायचे. म्हणे, आता दोन नवे स्टँप आलेत यांना पैसेही द्यावे लागत नाहीत काहीही खपवायचे असले की या दोनपैकी एक चिकटवा नि समाज तुम्हाला हवे ते निमूटपणे शिरोधार्य मानतो या दोन स्टँपची छपाई थेट केंद्रीय पातळीवर होते ज्यांना हवे त्यांना ते फुकट मिळतात, अट एकच... ते न वापरणार्यांना सतत दूषणे द्यायची दूषणे देणॆ हे आवडीचे काम जनता अतिशय आनंदाने करते स्टँप लावलेली रिकामी पाकीटे नि पॅकेट्स संपत्ती म्हणून मिरवते आणि स्टँप न लावलेले कितीही उपयुक्त असले तरी बाणेदारपणे फेकून देते... रिकाम्यापोटी पाठवण्याजोगे काहीच नसलेले लोकही रिकामी पाकीटे नि बॉक्सेसना भक्तिभावाने हे स्टँप लावून परिचितांना पाठवत असतात. त्यांचा रक्तगट म्हणे दुर्मिळ आहे ’अस्मिता’ म्हणतात म्हणे त्याला आणि ते दोन स्टँप्स ’आत्मनिर्भर’ आणि ’राष्ट्रहित’ या नावाने ओळखले जातात. -oOo-
शनिवार, ५ डिसेंबर, २०२०
वाचाळ तू मैत्रिणी
(रमताराम यांच्या संकल्पित ’गीतमारायण’मधी एक गीत.)
एका अभिनेत्रीला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आणि ती अभिनेत्री अचानक खूप बोलू लागली, सांगू लागली.
एका चित्रपटदरम्यान झालेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झालेल्या अफेअरची चर्चा तिने माध्यमांत रंगवली. संतप्त झालेल्या अभिनेत्याने तिच्याशी कोणताही संबंध असल्याचे नाकारले. बर्याच धुरळ्यानंतर तो वाद शांत झाला. मग अभिनेत्रीने राजकारणातील व्यक्तिंसह बॉलिवूडमधील अनेक सहकार्यांना लक्ष्य केले. बरीच उलथापालथ झाली. त्या अभिनेत्याबाबतच्या वादाचे पडसादही अधूनमधून वर येऊ लागले. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या पार्टीमध्ये अचानक हे दोघे समोरासमोर आले. तिला पाहताच तो अभिनेता संतापाने थरथरु लागला आणि गाऊ लागला...
(काव्यप्रभू गदिमा यांची क्षमा मागून) झाशीवाली(१) नव्हेस कन्या, नव्हेस अंबामाय उसनवारीची कंठी मिरविसी रुंडमाळ की काय प्याद्यासी(२) या म्हणेल राज्ञी, बॉलिवुडी का कुणी? वाचाळ तू मैत्रिणी बदनामीचे अस्त्र उपसले, मुळी न धरलीस चाड तुला पाहता लावून घेतो, मम सदनाचे कवाड नकोच दर्शन अंशमात्रही, मज हे कैदाशिणी वाचाळ तू मैत्रिणी कशांस पंगा घेतलास तू, पाय आणि खोलात उर्मिलेस(३) त्या दूषण देता, कां नच झडले हात? कित्येकांसी वैर घेतले, ट्विटरावरती, जनीं वाचाळ तू मैत्रिणी राणी(४) असुनि झालीस प्यादे, घरटे तुटले आज पाठीवरचा हात दगा दे, उतरुन गेला माज समर्थनासी परी धावले, झुंडीच्यासह कुणी वाचाळ तू मैत्रिणी तुला पाहता प्रदीप्त होते, मम शब्दांची धार होईल शोभा पुन्हा म्हणुनि करत नाही मी वार उभी न राही पळभर येथें, काळें कर जा झणी वाचाळ तू मैत्रिणी मरुस्थलासम तव बुद्धीचे भान होई वैराण कशास भांडुन तंडुन केले जन हे तू हैराण ताळतंत्र हे पुरे सोडले, तुवा गतसाजणी वाचाळ तू मैत्रिणी भगिनी(५)सह शब्दांनी केले तूच वार अनेक दुखावले जे तव शब्दांनी, दुरावले जे लोक कुठल्या वचने तव सुहृदांची करशील समजावणी? वाचाळ तू मैत्रिणी चला राऊता(६), द्या सेनेला(७) एक आपुल्या हाक नटीसंगती सुसज्ज असतील ट्विटर-ट्रोल हे लाख तव पोस्टींच्या सवे असू दे ’सामना’ची(८) पुरवणी वाचाळ तू मैत्रिणी जमेल तेथे, जमेल तैसी करु काव्य-पैदास हाच एकला ध्यास आणखी, हीच एकली आस शब्दप्रभूचे काव्य विडंबी, कुंपणावरचा मुनी(९) वाचाळ तू मैत्रिणी - काव्यभुभू रमताराम
- oOo -
१. झाशीच्या राणीवरील चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. २. सत्तेच्या सारीपाटातील प्यादे. ३. उर्मिला मातोंडकर. ४. झाशीच्या राणीची भूमिका. ५. तिने उठवलेल्या वादांमध्ये बहिणीनेही उडी घेतली. ६. संजय राऊत. ७. शिवसेना. ८. शिवसेनेचे मुखपत्र. ९. बाबा रमताराम, म्हणजे खुद्द आम्हीच.