Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

मंगळवार, १३ जानेवारी, २०२६

आली माझ्या घरी ही...

  • ...संक्रांत!

    का? नेहमी दिवाळी आली म्हणूनच गाणं म्हणावं की काय? की गोड बोलायला सांगणारी अलिकडे आवडेनाशी झाली आहे ज्वलज्जहाल, कडवट हिंदूंना? पण गंमत अशी, की यावेळी खुद्द संक्रांतच गोड बोलेना झाली होती. सांगतो ना काय झालं ते.


    “तुमची नाटकं फार झाली...” संक्रांत आज फारच वैतागली होती. दाते पंचांगवाले काका तिला पुढच्या वर्षीच्या एन्ट्रीचे डीटेल्स समजावून सांगत होते, पण ती त्यांचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हती.

    “जेव्हा पाहावं तेव्हा हे ‘आग्नेयेकडून येते आहे नि नैऋत्येकडे जाते आहे. जाताना पश्चिमेकडे पाहाते आहे.’ वगैरे फालतूपणा बास आता. साधंसोपं ‘पश्चिमेकडून येते आहे नि दक्षिणेकडे जाते आहे’ असं का नाही?

    “आणि ते मेंढ्यावर आरूढ झाली आहे न्‌ बैलावर आरूढ झाली आहे काय; एकजात गाढवं आहेत सारी. जरा चांगलं कन्फर्टेबल वाहन द्या. घाणेरडा वास मारणारं नको.

    “आणि हो, ‘दक्षिणेकडेच पाहाते आहे’ असंच ठेवा. ड्राईव्ह करताना लक्ष समोर नको? शिवाय ‘इकडे जाताना तिकडे पाहून’ पाहून गळपट्टा लावायची वेळ आली मला.

    “नाहीतर असं करा ना, हे इकडे जाते आहे नि तिकडे पाहाते आहे वगैरे जबाबदारी वाहनावरच सोपवून द्या. मी फक्त त्यावर बसून येईन. नाहीतर पुढच्या वर्षी येणं कॅन्सल.”

    शेवटची धमकी ऐकून दाते घाबरले, त्यांनी सर्व पंचांगकर्त्यांची मीटिंग बोलावून हे त्यांच्या कानावर घातले. (‘मुळात तिला पुढची असाईनमेंट सांगण्यास एवढी घाई करायला कुणी सांगितलं होतं? जेव्हा पाहावं तेव्हा यांचं ‘मी पयला’ असतं.’ साळगांवकर कुरकुरत होते.) ही आफत टाळण्यासाठी संक्रांतीच्या अटी मान्य - ट्रम्पच्या टॅरिफ अटी मोदींनी मान्य केल्या तशा - कराव्यात असे सर्वानुमते ठरले.

    अपेक्षित गुणवैशिष्ट्यांसह सुसज्ज असे वाहन तिच्यासाठी शोधण्यासाठी वा निर्माण करण्यासाठी होराभूषणांचे एक शिष्टमंडळ थेट नारायण मूर्तींना भेटण्यास पोहोचले. ‘प्रत्येक कामगाराकडून सत्तर नव्हे, नव्वद तास काम करुन घ्या; पण लवकरात लवकर सोल्युशन द्या, पुढच्या वेळी भारतरत्नसाठी तुमचा योग भक्कम आहे’ हे सर्व भविष्यवेत्त्यांनी त्यांना पटवून दिले.

    मूर्ती गालातल्या गालात हसले. म्हणाले, “भद्र जनहो, तुम्ही काही काळजी करु नका. माझ्याकडे एक डिझाईन आधीच तयार आहे. टेस्लाकडून पूर्वी आम्हाला एक प्रोजेक्ट मिळाला होता कार डिझाईनचा–”

    “अहो पण तुम्ही आयटीवाले, हे डिझाईनचं काम तुमच्याकडे–” एक होराभूषण मध्येच बोलले.

    “अहो, जगातलं कुठलं काम आम्ही करत नाही? मागे आमच्याकडे एका बँकेचं प्रोजेक्ट होतं, तर आमच्या अकाउंट मॅनेजरने त्यांच्या गळ्यात पडून मलेशियातील त्यांच्या दहा ब्रँचेसचं हाउसकीपिंगचं काम मिळवलं होतं. आता बोला. एका कडून घ्यायचं नि दुसर्‍याकडे मार्जिनवर द्यायचं... सोपा धंदा आहे हो. तुम्हाला जमणार नाही पण.”

    “हां, तर सांगत काय होतो? ते डिझाईन आमच्या पोरांनी तयार केले, क्लाएंटकडे पाठवले. तर ‘हे तर संक्रांतीचं वाहन म्हणून शोभेल’ असं म्हणून फिस्कारत त्या एलन मस्कोबाने रिजेक्ट केलं होतं. खुद्द मस्कने सर्टिफाय केले आहे म्हटल्यावर दुसरे डिझाईन हवेच कशाला, नै का गं सुधा?” शेजारी मटार सोलत बसलेल्या सुधाताईंनी मान डोलावली. त्यामुळे त्यांच्या केसातील गजर्‍याचा वास होराभूषण मंडळींच्या नाकात शिरला नि एक-दोघं जोरदार शिंकले.

    अखेर नव्वद तासांच्या कित्येक आठवड्यांनंतर ‘एक सुसज्ज असे वाहन तयार झाले असून त्याच्या चाचण्या चालू आहेत’ असे मूर्तीकाका अक्षराला सांगत असताना ऋषीने ऐकले. त्याने कुणाला तरी सांगताना कुणी तरी ऐकले नि आमच्यापर्यंत पोहोचवले.

    पण त्याबाबत अधिक काही चौकशी करण्याआधीच अचानक ‘संक्रांतीच्या नव्या वाहानाचे डिझाईन झाले लीक’ या सुप्रसिद्ध हेडलाईन खाली ‘बावळट टाईम्स’ ऊर्फ बाटाने आपल्या वेबसाईटवर एक फोटो प्रसिद्ध केला. तो आम्ही इथे तुमच्यासाठी आणला आहे. आतील बाजू दिसत नसली, तरी याच स्टिअरिंग ऊर्फ सुकाणूचक्र, एरवी आरसा असतो त्या कोपर्‍यात बसवले आहे असे समजते. अधिक माहितीसाठी बाटाच्या संस्थळावर जा.

    -oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: