शनिवार, २१ मे, २०२२

तांत्रिक आप्पा

आप्पा भिंगार्डे एक सत्शील, पापभीरू माणूस. त्यांची बाबा आडवळणीनाथांवर नितांत श्रद्धा. देवघरात बाबांची मानसमूर्ती होती. तिची सकाळ-संध्याकाळ षोडशोपचारे पूजा होत असे. वर्षांतून दोनदा घरी बाबांचा सत्संग असे.

आप्पा भिंगार्डे पिढीजात कारकून. त्यामुळे ऑफिसमधून आणलेल्या स्टेशनरीवर दररोज शंभर वेळा बाबांचा जप लिहिला जात असे. पुढे ऑफिस स्टेशनरीच्या अपहाराबद्दल मेमो मिळाले, सस्पेंड झाले, पण त्यांनी आपला नेम सोडला नाही.

मागच्या चाळीतील बाबूने सायक्लोस्टाईल का काहीतरी मशीन आणले. त्यावर खते, दस्त यांच्या प्रती काढून देण्याचा व्यवसाय सुरू केला. आप्पांनी ही संधी साधली आणि बाबांच्या एकपानी चरित्राच्या प्रती काढून नाक्यावर उभे राहून येणार्‍या-जाणार्‍याला वाटून ते आपली सेवा बाबांच्या चरणी रुजू करु लागले.

सामान्यांच्या पत्रसंवादाच्या सोयीसाठी सरकारने पाच पैशांत पोस्टकार्ड द्यायला सुरुवात केली. आप्पांनी नवे माध्यम तात्काळ आत्मसात केले. बाबांचा उपदेश मूढ जनांना देऊन त्यांना शहाणे करण्यासाठी दरमहा पन्नास पोस्टकार्डे पाठवू लागले.

आप्पांच्या मुलाने एकदा हिंदी हीरोचा स्टीकर कुठूनतरी - बहुधा मित्राचा ढापून - आणला. आप्पांनी कुतूहलाने तो प्रकार पाहिला. मग शाळेजवळ स्टीकर विकायला बसलेल्या धोंडूकडून स्टीकर तयार करुन देणार्‍या कारखान्याचा पत्ता मिळवला. आर्थिक स्थितीचा विचार करता जास्त स्टीकर बनवणे नि वाटणे परवडणारे नव्हते. कमी स्टीकर्स छापले तर महाग पडत होते. साधकबाधक विचार करुन त्यांनी अखेर पन्नास स्टीकर्सवर भागवले.

पहिला स्टीकर देव्हार्‍यात नि दुसरा दाराच्या चौकटीच्या वर गणेशपट्टीवर लागला. मुलाच्या सायकलवर लावलेला स्टीकर ’शाळेत चोरीला गेला’ असे मुलगा सांगत आला. बाबांचा स्टीकर कुणाला तरी चोरावासा वाटला म्हणून आप्पा खुश झाले, त्यांनी दुसरा स्टीकर तिथे लावला. पण स्टीकर वारंवार ’चोरीला जाऊ लागले’ नि आप्पांनी तो क्रम बंद केला.

BabaOutOfScreen

आप्पा मध्यमवयाला ओलांडून ज्येष्ठतेकडे झुकू लागले. मुलगा हाताशी आला. त्याने रोजगार सुरु करताच प्रथम एक संगणक विकत घेतला. आप्पांचे कुतूहल जागृत झाले नि त्यांनी त्याचे तंत्रही हळूहळू शिकून घेतले. डेस्कटॉप इमेज आणि स्क्रीनसेव्हर मध्ये बाबा विराजमान झाले. तसे या इमेज अधूनमधून गायब होत. ’संगणक हा प्रकार नवीन आहे. अधूनमधून त्याच्याकडून चुका होतात.’ असं मुलगा सांगे. मान डोलावून आप्पा बाबांची पुन:प्रतिष्ठापना करत. मग इंटरनेट आले नि आप्पांना ईमेल या प्रकाराचा शोध लागला. ते खुश झाले नि मुलाला म्हणाले, ’हे चांगले झाले. पत्रके छापण्याचा खर्च वाचला.’

आता मोबाईलचा जमाना आहे. आप्पांच्या मोबाईलवर बाबांची स्क्रीन इमेज आहे; रिंग ट्यून आणि कॉलर ट्यून म्हणून बाबांची आरती आहे. बाबांचे ज्ञानामृत घोट घोट पाजणारे, बाबांच्या मठाने तयार केलेले अ‍ॅप आहे. रोख सुटे पैसे घेऊन वीजबिलभरणाकेंद्राच्या समोरील रांगेत उभे असताना मोबाईलच्या स्पीकरवर अ‍ॅपवर ’आजचे प्रवचन’ लावून रांगेतील इतर लोकांना ते बाबांनी दिलेले ज्ञानकण लाभ फुकट वाटताना दिसतात.

माणसाच्या तांत्रिक प्रगतीचा प्रत्येक टप्पा आप्पांनी असा लीलया आत्मसात केला आहे. पस्तीस वर्षे एकाच ऑफिसमधून, एकाच पदावर काम करुन आप्पा निवृत्त झाले. त्यांच्या निरोपसमारंभात त्यांच्या पाठोपाठ निवृत्त होऊ घातलेल्या एका सहकार्‍याने त्यांना ’तांत्रिक आप्पा’ अशी पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता.

आप्पा आता थकले आहेत. पण निजधामाला जाण्यापूर्वी चंद्रावर बाबांचा पुतळा उभारण्याची त्यांची महत्वाकांक्षा आहे. ते कधी शक्य होईल हे त्यांना इलॉन मस्कला विचारून घ्यायचे आहे. कुणाकडे त्याचा संपर्क क्र. असेल तर आप्पांना कळवा प्लीज.

- oOo -

१. हे पात्र नि पुलंच्या ’असा मी असामी’ यातील एक पात्र यांचे नाव एकच असले तरी हे ते नव्हेत.


हे वाचले का?

मंगळवार, १७ मे, २०२२

उंदीर-श्रद्धा आणि इलेक्ट्रॉन-श्रद्धा

आपल्या घरातील एक बटण दाबले की दिवा प्रकाशित होतो किंवा पंखा सुरु होतो असा आपला अनुभव असतो. वारंवार अनुभवल्यानंतर कार्य-कारणभाव स्पष्ट होतो. आता त्यामागचे विज्ञान सांगितले तर इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रिसिटी, वगैरे बाबी येतील. पण श्रद्धावान मंडळी म्हणतील, ‘तुम्ही म्हणता देव दिसत नाही तसेच हा तुमचा इलेक्ट्रॉन, ती वीज तरी कुठे दिसते? न पाहता त्यांचे अस्तित्व कसे मान्य करतोस?’

हा मुद्दा बरोबर आहे. पण मी इलेक्ट्रॉनचे अस्तित्व मान्य करणे वा न करणे याचा माझ्या जगण्याशी थेट संबंध नसतो. पृथ्वी सपाट आहे असे म्हणणारे लोक भूगोलाच्या एका तुकड्यावर जगतच असतात. कारण ती सपाट आहे की दीर्घगोल याचा त्यांच्या जगण्याशी थेट संबंध येत नाही. त्याच धर्तीवर माझा इलेक्ट्रॉनशी कधी समोरासमोर सामना न होताही माझे जगणे त्या आधारे सिद्ध केलेल्या अनुभवावर बेतलेले असते. त्या सार्‍या वीज, वीज-निर्मिती व वितरण व्यवस्थेचा शोध लावणारे मला सांगत असतील, ‘हे सारे पदार्थविज्ञानातील अमुक भागावर अवलंबून आहे.’ तर मी म्हणेन ‘ओके बाबा. तू म्हणशील तसं.’

जोवर त्यांच्या मी त्या दाव्यावर विश्वास ठेवतो आहे, तोवरच माझ्या घरात दिवे लागतील अशी काही त्यांच्या व्यवस्थेची अट नाही. त्यामुळे मी त्यांच्या दाव्यावर विश्वास न ठेवताही त्याचे व्यावहारिक उपयोग करू शकतोच. मी इलेक्ट्रॉन नामे कणाच्या अस्तित्वाच्या आधारे माझ्या आयुष्याचे निर्णय करत नसतो, त्याच्या व्यावहारिक अंगाचा वापर करत असतो जो माझ्या अनुभवसिद्ध असतो. वारंवारतेच्या नियमाने कार्य-कारणसंबंध सिद्ध झालेला असतो.

MouseWithALamp

उद्या एखाद्याने मला सांगितले, की ‘अरे इलेक्ट्रॉन वगैरे काही नसते, तुमच्या बोर्डमध्ये प्रत्येक बटनामागे एक उंदीर बसलेला असतो. तू बटन दाबलेस, की एक छोटी टाचणी त्याला हलकेच टोचली जाते. मग तो उठतो नि विजेच्या पट्ट्यांमधून/नळ्यांमधून (जिथे तुमच्या वायर्स आहेत असे हे विज्ञानवाले तुम्हाला खोटे सांगतात) तुझ्या ट्यूबपर्यंत जातो आणि तिथेच ठेवलेल्या पिटुकल्या काडेपेटीतून एक काडी ओढून तिथला तेलाचा दिवा पेटवून देतो...’ तुम्ही विचाराल ‘हॅ: तिथे दिवा कसा असेल, तेल कोण घालेल?’ तो सांगेल, ‘अहो रात्री तुम्ही झोपलात की हे सारे उंदीर बोर्डमधून बाहेर येतात आणि वीज(?) कंपनीने गुप्तपणे ठेवलेल्या तेलाच्या बुधल्यांतून तेल आणून सगळे दिवे साफ करुन त्यात भरुन ठेवतात.’

अशाच प्रकारचे दावे करत एक तर्कसंगती तो तुम्हाला देऊ शकतो जी (कल्पनाविस्तार म्हणू. पण-) एक शक्यता म्हणून तुम्हाला ती मान्य करावी लागते. मग तुम्ही याच्या व्यवहार्यतेचा विचार करता, मग अनुभवाच्या, मग वारंवारतेच्या... आणि पडताळणीच्या अखेरीस ही शक्यता असंभाव्य म्हणून सोडून देता.

उलट इलेक्ट्रॉन वगैरेच्या संकल्पनेच्या आधारे अशीच एक शक्यता तुमच्यासमोर ठेवलेली असते. जिचा अनुभवाच्या नि निरीक्षणाच्या आधारे पाठपुरावा केला असता ती अधिक संभाव्य आहे असे तुम्हाला दिसते. पण संभाव्य म्हणजे वास्तव नव्हे!

वास्तव हा शब्द आपण एकुणच सैलपणे वापरतो. वास्तव म्हणताना त्या वास्तवाची सारी अनुषंगे आपल्या अनुभवाचा भाग असायला हवीत. प्रत्येक अनुषंगांच्या आकलनातूनच आपले वास्तव सिद्ध होत असते. इथे एक ग्राहक म्हणून, वापरकर्ता म्हणून इलेक्ट्रॉन हा माझ्या अनुभवाचा भाग नाही, त्यामुळे तो माझ्या वास्तवाचा भागही नाही. परंतु तरीही अनुभव-साखळीच्या आधारे मी त्याला सर्वाधिक संभाव्य शक्यता म्हणून नोंदवत असतो. निरीक्षणे ही नेहमीच मूळ कारणाच्या परिणामस्वरूप असतात, ती स्वत:च कारणे नसतात. त्यामुळे त्या दोहोंना जोडणारा तर्काचा संबंध आधी सिद्ध केलेला असावा लागतो.

उंदीर दिवे पेटवतात असे समजणारा आणि इलेक्ट्रॉनमुळे दिवे प्रकाशमान होतात असे समजणारा, दोघेही बटण दाबून दिवा वा पंखा लावतात नि त्यांचा वापर करुन घेतात. दोघांच्या जगण्याच्या बाजू सारख्याच राहतात. फरक इतकाच की उंदीर-श्रद्धावाले नि इलेक्ट्रॉन-श्रद्धावाले फौजा बांधून एकमेकांचे खून करत ‘खरे विज्ञान’ लिहिण्याचा आटापिटा करत नाहीत.

आणि हो, आणखी एक फरक. इलेक्ट्रॉनवाल्यांना त्यांच्या त्या दाव्याच्या आधारे केवळ विजेचेच नव्हे तर इतर अनेक अनुभवांचे विश्लेषण करणे शक्य होते. उलट ‘उंदीर-श्रद्धा’वाल्यांना कार्य-कारण संबंध सिद्ध तर करता येतच नाही, पण अनुभव-वारंवारतेच्या निकषावरही ते वारंवार नापास होत राहतात. त्यामुळे त्या संकल्पनेच्या आधारे अन्य कुठला कृती-परिणाम संबंध सिद्ध होणे शक्यतेच्या टप्प्यावरही पोचत नाही.

जेव्हा ते त्यांच्या ‘उंदीर-श्रद्धे’चा संबंध अनुभवांशी ‘वारंवार’(!) जोडून दाखवतील तेव्हा मी माझ्या इलेक्ट्रॉन-श्रद्धेप्रमाणेच ‘उंदीर-श्रद्धे’ला नाही तरी त्याच्यावर आधारित कृती-परिणाम संबंधांना मान्य करुन माझ्या जगण्यात त्याचा वापर करुन घेईन.

पण जर ‘तुम्ही बटणच नीट दाबले नाही.’,‘दारे घट्ट बंद करुन झोपल्यामुळे उंदरांना तेल आणायला रात्री बाहेर जाता आले नाही. तेव्हा दोष तुमचाच आहे.’ वगैरे तर्क देऊन अनुभवातील खोट भरून काढणे सुरू झाले, तर ‘हा कृती-परिणाम संबंध बर्‍याच अटींवर सिद्ध होतो नि इतर अनेक घटकांचा त्यावर परिणाम होतो आहे’ हे सिद्ध होते. म्हणजे दिवा पेटणे हा बटण दाबणे या एकाच कृतीचा परिणाम नाही असे दिसून येते, आणि त्याचा व्यावहारिक वापर मला दुरापास्त होत जातो. त्यामुळे जगण्याचा आधार म्हणून स्वीकारण्यासाठी मला त्याहून अधिक व्यावहारिक वारंवारता असणार्‍या कृती-परिणामांच्या जोडीच्या शोधात जावे लागते.

थोडक्यात इलेक्ट्रॉन-श्रद्धेला अनुभवाची जोड मिळून ती माझ्यासारख्या सामान्याच्या दृष्टीने शक्यतेमधून संभाव्यतेच्या परिघात येते, तर उंदीर-श्रद्धेला तर्कसंगती म्हणून शक्यतेच्या पातळीवरच सोडून द्यावे लागते. एखादी शक्यता तपशीलवार, तर्कसंगत मांडली म्हणून ती संभाव्य होत नाही, वास्तव ठरणे तर दूरची गोष्ट आहे. श्रद्धेलाही तर्कसंगती असतेच, फक्त ती पडताळायोग्य नसते.

- oOo -

हे वाचले का?

रविवार, १५ मे, २०२२

लेखक याचक आणि राजा वाचक ?

(बरेच दिवस लिहून ठेवलेले काही मुद्दे आज मित्रवर्य प्रकाश घाटपांडे यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे एकदाचे पार लागले.)

आकलनाची, उकल करण्याची खाज हा माझा जुना आजार. त्यातच गणित नि शक्यताविज्ञान (Statistics) या विषयांत झालेले शिक्षण यांमुळे जगण्यातले प्रत्येक गणित सोडवण्याचा आटापिटा वाढीसच लागला. मग कालानुरूप आपल्या विचारांत, आकलनात, विश्लेषण पद्धतीमध्ये बदल होतो का, कसा होतो नि का होतो... हे जास्तीचे प्रश्न वाढत्या वयाबरोबर सोबत आले.

अनुभवसिद्धता हा शक्यताविज्ञानाचा गाभा, त्यातून निर्माण होणारी माहिती व डेटा, त्याचे मूल्यमापन आणि निष्कर्ष ही आकलनपद्धती मी स्वीकारलेली. काही काळानंतर त्याच समस्येला, गणिताला सामोरे जातात उत्तर वेगळे येते का, का वेगळे येते याचा वेध घेणे भलतेच रोमांचक असते, असे लक्षात आल्यावर त्या त्या वेळचे आकलन, विचारव्यूह नोंदवून ठेवण्यास सुरुवात केली. भविष्यात याच्याकडे परतून आल्यावर जणू अन्य कुण्या लेखकाचे लेखन म्हणून पाहणे शक्य होते, आणि त्यातून आपणच आपले मूल्यमापन करु शकतो हा मोठा फायदा. ही नोंद सुरक्षित राहावी आणि केव्हाही उपलब्ध असावी या दृष्टीने ब्लॉग सुरू करुन या नोंदी तिथे साठवून ठेवू लागलो. (त्या सार्‍या प्रवासालाही ’माझी ब्लॉगयात्रा’ या सहा भागांच्या मालिकेत नोंदवून ठेवले आहे.)

चार वाक्ये लिहिली की आपल्याला अंतिम सत्य सापडले असा भ्रम प्रत्येक पहिलटकर लेखकाला होतो. मग ते जगाला द्यावे अशी कंडही निर्माण होते. त्यानुसार ते इतरांबरोबर शेअरही करू लागलो. शेअर करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर अगदी अपरिहार्यच आहे. व्हॉट्स-अ‍ॅप आणि फेसबुक हे सोयीचे. तिथे ब्लॉगवरील लिंक शेअर करु लागलो. या शेअरिंग दरम्यान काही मजेशीर अनुभव आले आणि त्यातून काही नवे प्रश्नही या जिज्ञासानंदासमोर दत्त म्हणून उभे राहिले. या लेखात त्याबद्दल थोडा उहापोह करतो आहे.

सामान्यपणे लेख लिहून झाला, नि तो ब्लॉग वा अन्य ऑनलाईन माध्यमांत प्रसिद्ध झाला, की त्याची लिंक मी फेसबुकवर शेअर करत असे. आणि जेव्हा तिथे सक्रीय नव्हतो तेव्हा लेखाच्या विषयानुसार जास्तीत जास्त आठ-दहा मित्रांना व्हॉट्स-अ‍ॅपवर पाठवत असे.

EReading
https://www.ameshighweb.com/ येथून साभार.

अशाच एका मित्राने एक दिवस सल्ला दिला, ’अरे तू लिंक देऊ नको. त्याने फार लोकांपर्यंत पोचत नाही लेखन. लोक लिंक उघडून पाहात नाहीत. सारा लेखच इथे फेसबुकवर पेस्ट कर. अधिक पोचतो.’ माझ्या गणिती डोक्याला ही अंधश्रद्धा पटेना. तशी ती आहे हे मी माझ्यापुरते पडताळा घेऊन सिद्धही केले. त्यांच्यात काहीही अन्योन्य संबंध नाही. अनेकदा फेसबुकर ढीगभर लाईक्स पण ब्लॉगवर चौथा हिस्सासुद्धा वाचने नाहीत असे घडले. तसेच आठ-दहा लाईक्स पण ब्लॉगवाचने तीस-चाळीस असाही प्रकार घडत आलेला आहे.

शिवाय मोठा लेख फेसबुकवर पोस्ट केला, तर मोजका मजकूर दिसून पुढे See more... ची लिंक दिसते. जी क्लिक करावी लागतेच. मग ती क्लिक करायला तुमचा माऊस परवानगी देतो, पण ब्लॉग-लिंकला नाही असे असते का?

एका भेटीत दुसरा एक मित्र म्हणाला, ’तुझे लेखन असे जाताजाता वाचण्याजोगे नाही. ते निवांत वाचण्यासाठी मी ठेवून दिले आहे.’ आज पंधरा वर्षांनंतरही त्याला तो निवांतपणा मिळालेला नाही! (न मिळो बापडा.)

आणखी एका मित्राने सल्ला दिला (फेसबुकवर सल्लागार मंडळाची कमतरता भासत नाही.) की ’हल्ली लोकांचे वाचन कमी झाले आहे. त्यांना व्हिडिओ पाहायला आवडते. यू-ट्यूब चॅनेल सुरू कर नि तुझ्या लेखनाचे छोटे व्हिडिओ तिथे टाक. तुझे लेखन अधिक लोकांपर्यंत पोचेल.’

मी स्वत: जागरुक आयटीवाला असल्याने मी हसून सोडून दिले. एकतर माझे लेखन हे शब्दप्रधान, विचारप्रधान असल्याने त्याला दृश्य बाजू नाही. आणि यू-ट्यूब व्हिडिओ म्हणजे केवळ कॅमेर्‍यासमोर बसून आपले लेखन वाचणे नव्हे, याचे भान मला होते. पुन्हा असे व्हिडिओ टाकण्यासाठी आवश्यक जागा मिळवण्यासाठी यू-ट्यूबचे प्रीमियम सबस्क्रिप्शन घेणे गरजेचे होते. माझे लेखन आणि एकुण कंटेंट पाहता हिट्सच्या आधारे मिळणारे यू-ट्यूब उत्पन्न नगण्यच नव्हे, तर शून्यच असणार होते. अशा वेळी खिशातून पैसे घालून हा कारभार करणे म्हणजे ’चार आण्याची कोंबडी नि बारा आण्यांचा मसाला’ असा प्रकारच होणार होता. साहजिकच मी त्या नादी लागलो नाही.

असे असले तरी पुढे 'वेचित चाललो...’ वर मी स्वत:चे नाही पण चित्रपट, मालिका, चलच्चित्रे यांच्यातील एखादा तुकडा शेअर करुन त्या अनुषंगाने माझे भाष्य लिहिण्याची शैली वापरायला सुरुवात केली.

इथेच मला फेसबुक-पोस्ट ऐवजी स्वत:चा ब्लॉग वापरण्याचा फायदाही अधोरेखित करायचा आहे. फेसबुक-पोस्टमध्ये मला अन्य मीडिया समाविष्ट करता येत नाही. फोटो जोडला तरी तो मजकुराच्या खाली जातो. मजकुर-सुसंगत अशी (एकाहुन अधिक) फोटो, चित्र वा व्हिडिओची मांडणी मला ब्लॉगपोस्टमध्ये करता येते. फेसबुक त्याबाबत गलथान आहे.

तिसरे एक मित्रवर्य म्हणाले, ’हे असे व्हिडिओ पाहणे म्हणजे डोळ्याला त्रास होतो. त्याऐवजी तू स्टोरीटेलसारखे ऑडिओबुक तयार कर. किंवा पॉडकास्ट चालू कर. मी काय करतो, एकीकडे क्रिकेटची मॅच पाहताना साऊंड म्यूट करुन दुसरीकडे पॉडकास्ट किंवा ऑडिओबुक ऐकत असतो. तसेही समोर स्क्रीनवर स्कोअर दिसत असताना कमेंटरीची गरज काय. एकाच वेळी दोन्ही होते.’ थोर माणूस!

सार्‍या अनुभवांवरुन माझ्या पीएच.डी. थीसिसमध्ये ग्राफ टाकावेत म्हणजे तो आकर्षक होईल असा फुकट सल्ला देणारा एमबीए गडी आठवतो. बिचार्‍याला गणित, सैद्धांतिक शक्यताविज्ञान आणि त्याच्या कस्टमर प्रेजेंटेशन पीपीटी मधील फरक माहित नव्हता, हा त्याचा दोष नाही. तसंच कोणते लेखन शब्दप्रधान, कोणते आशयप्रधान आणि कोणते दृश्य वा श्राव्य माध्यमांना अनुकूल याचा विचार न करता ही मंडळी बेफाट सल्ले देत असतात.

थोडक्यात माझे लेखन त्यांना हवे त्या फॉर्ममध्ये, हवे त्या माध्यमामध्ये रूपांतरित करण्याचा सल्ला मला मिळत गेला. गोळाबेरीज ही की ’मला तुझे लेखन वाचायची फार्फार इच्छा आहे रे, पण मी नं, यू नो, इतका सोऽ बिज्जी असतो की समोर आले तेवढेच वाचले जाते.’ दरम्यान ही माणसे फेसबुकवर राजकारणावरची भंकस, तरुण तर सोडाच अगदी मध्यमवयीन स्त्रियांच्या फोटोवर व्यक्त होत ’चर्चा’ करताना दिसत होती.तेव्हा ते बिज्जी वगैरे नसावेत, किंवा त्याच गोष्टींत बिजी आहे असे त्यांना म्हणायचे असावे.

पहिली गोष्ट म्हणजे मी लिहितो ते इतरांनी वाचावे अशी माझी इच्छा नक्कीच असते. पण त्यासाठी मी कुणाला आग्रह करणार नाही. त्याला राजकारणावरची भंकस (जी मी ही करतो), स्त्रियांच्या फोटोंवर साधकबाधक चर्चा करणे (जी करता यावी अशी माझीही फार्फार इच्छा असते, अजून तरी जमत नाही. जमेल कधी ना कधी.) माझ्या लेखनापेक्षा महत्वाचे वाटत असेल- नव्हे माझे लेखनच त्याने वाचण्याच्या लायकीचे वाटत नसेल तरी त्याबद्दल माझी तक्रार नाही. प्रत्येकाची रुची भिन्न असते. 'माझी उच्च नि इतरांची दुय्यम' अशी उद्दाम भूमिका माझी नाही. पण ’मला तुझे लेखन वाचायची इतकी जोराची इच्छा आहे पण तू मला हवे तशा स्वरूपात ते देत नाहीस, म्हणून मला ते वाचता येत नाही.’ हा कांगावा कशाला? माझे लेखन वाचच असा आग्रह मी आजतागायत कुणाकडे धरलेला नाही, एवढेच कशाला ’वाचलेस का?’ हा प्रश्नही संदर्भाशिवाय विचारलेला नाही. मग माझ्या लेखनातील आपली रुची मला पटवून देण्याचा आटापिटा का बाबा/बाई?

या सगळ्या सल्ल्यांमध्ये, अनुभवांमध्ये एक सूर मला सतत जाणवतो तो म्हणजे ’लेखक हा उत्पादक आहे, लेखन हे त्याचे उत्पादन आहे नि त्यानेच ते खपवायला हवे. आम्ही ग्राहक आहोत, राजे आहोत, उत्पादकाने आमच्या नाकदुर्‍या काढल्या पाहिजेत. आमचा अटेन्शन स्पॅन लक्षात घेऊन छोटे लिहिले पाहिजे, व्हिडिओ दिले पाहिजेत, क्लिक करायला न लावता आख्खा लेख समोर दिसला पाहिजे, ऑडिओ करुन दिले पाहिजे...’ नुसती लिंक दिली, तर ’मी लिंक दिली आहे तुम्हाला गरज असेल तर वाचा नाहीतर फुटा’ असा लेखकाचा आविर्भाव असल्याचा गैरसमज वाचकांचा होतो म्हणे. वाचकाच्या वरच्या सार्‍या अपेक्षा पाहता लेखकापेक्षा वाचकाचाच माज कैकपट अधिक आहे असे माझे मत झाले.

माझे लेखन म्हणजे उत्पादन आहे, नि मला ते विकण्यासाठी वाचकांचा मूड सांभाळायला हवा, त्यांच्या दारी जायला हवे ही लाचार वृत्ती मला साफ अमान्य आहे. उलट दिशेने मी काहीतरी कष्ट करुन लिहिले आहे, ते वाचण्याने वाचकालाही काही मिळणार आहे हे ही मी विचारात घेतो. ते फुकट मिळत असेल तर त्याने/तिने किमान एक लिंक क्लिक करण्याचे कष्ट घ्यावेत ही अपेक्षा अनाठायी आहे असे मला वाटत नाही. माझे लेखन वाचकाच्या उपकाराधीन आहे ही ओशाळवाणी वृत्ती माझी नाही.

मी ’गरजेनुसार खरेदी’ या जुनाट मानसिकतेचा माणूस आहे. भांडवलशाहीतील ’गरज निर्माण करण्याच्या’ पद्धतीचा मी समर्थक नाही. ग्राहकाच्या दारात उदबत्तीचे पुडे घेऊन ’घ्या हो घ्या, चारावर एक फ्री देतोय.’ म्हणून गरज नसलेल्यासमोर लाचार उभे राहणे मला मान्य नाही.

एखाद्या मित्राला माझे लेखन वाचण्याची गरज वाटत नसेल, त्याला वाचनाची आवडच नसेल. किंवा माझ्या सार्‍या विषयांत त्याला/तिला रुची असावी असेही नाही. अशावेळी केवळ मैत्रीखातर त्याने/तिने सगळेच वाचावे, तशी भीड त्याला/तिला पडावी हे ही मला योग्य वाटत नाही. आणि म्हणून व्हॉट्स-अ‍ॅपवर वा तत्सम वैय्यक्तिक संवाद-माध्यमांवर लिंका पाठवून मी शक्यतो कुणाला भीड घालत नाही. विशिष्ट विषयांत रस असलेल्या, आमच्या काही चर्चेचा संदर्भ असलेल्या लेखनापुरतीच माझी शिफारस असते.

छापील पुस्तकांबाबत वा वृत्तपत्रीय लेखनांबाबतही परिस्थिती वेगळी नाही.

बहुतेक लेखक वृत्तपत्रातील आपल्या लेखाच्या लिंकसोबतच संपूर्ण लेख फेसबुकवर पेस्ट करतात. खरेतर हे वृत्तपत्राच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. त्यांच्या साईटला मिळणारा टीआरपी यातून लेखकच काढून घेतो आहे. आता तर वृत्तपत्राच्या वाचकांपर्यंत पोचलाय ना बाबा तुझा लेख. मग या ऑनलाईन वाचकांच्या इतक्या नाकदुर्‍या काढायची गरज काय?

पुस्तकांचेही पाहिले तर एक बैठकीला दोन-तीन पेग उडवून हजारभर रुपयांचा चुना सहज करणारे किंवा आयफोनच हवा म्हणून गरजेहून काही हजार सहज उडवणारे पुस्तक घेताना मात्र तीनशेच्या वर खर्च करताना कां कूं करत असतात. मान्य करा मित्रांनो, की वाचन तुमच्या प्राधान्यक्रमात तळाला आहे. उगा वाचकपण मिरवण्याचा आटापिटा का करता?

माझे उत्पादन हे माझ्या उदरभरणाचे साधन नसल्याने ग्राहकाने त्याच्या गरजेनुसार (नसेल तर माझाही आग्रह नाहीच) माझ्या दुकानी (पक्षी: ब्लॉगवर) येऊन घेऊन जावे ही अपेक्षा अस्थानी नाही. 'फुकटही हवे नि होम डिलिव्हरीही', हा उद्दामपणा मी का चालवून घेऊ? आता यांचा पुढचा आग्रह म्हणजे 'तुमचे लेखन वाचण्याबद्दल मलाच पैसे द्या' असा असू शकतो. तेवढाच टप्पा शिल्लक आहे. मी ते ही करावे काय?

’लेखक याचक आणि राजा वाचक’ अशी परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार करता माध्यमांची विपुलता, त्यांची मजकुराची खायखाय आणि जोडीला स्वनामधन्य लेखकांची वाचकांकडून लाईक मिळवण्यासाठी घायकुतीला येण्याची प्रवृत्ती हे दोन दोष मला दिसले. छापील कागदावर आपले नाव यावे किंवा डिजिटल माध्यमांत कुठेतरी आपला लेख- फुकट का होईना, छापला यात कृतकृत्यता मानणारे न्यूनगंडी लेखक (लेखन उत्तम असेलही) यांनी ही परिस्थिती निर्माण केली आहे.

वाचकाची दादच लेखकाला लेखक म्हणून प्रस्थापित करत असते हे जसे खरे, तसेच मुळात लेखक सर्जनशील आहे, तो निर्माता आहे हे वाचकानेही विसरु नये. वाचकाला आपल्या रुचीनुसारच वाचण्याचा अधिकार आहे. त्याने तो नक्की वापरावा. समोर पुरे लेखन आले ’म्हणून’ ते वाचण्यात वेळ दवडू नये. आपल्या आवडीनिवडीनुसार लेखन निवडून तेच वाचावे. ’नेटवर्किंग’च्या आवश्यकतेवर डोळा ठेवून, जे उमजले नाही, पटले नाही, आवडले नाही अशा लेखनालाही नावाजण्याचा अप्रामाणिकपणा करु नये. लेखकानेही आपल्या विषयाशी संबंधित नसलेल्या वाचकांचे नाक दाबून (टॅग वगैरे करुन, व्हॉट्स-अ‍ॅपवर पाठवून) आपले लेखन त्याच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करू नये. समाजमाध्यमी लेखक नि वाचक या दोघांच्याही दृष्टीने तेच योग्य ठरेल.

- oOo -


हे वाचले का?

मंगळवार, ३ मे, २०२२

मांजराचे काय, माणसाचे काय

आपण लहान असताना सोडाच, पण मोठे झाल्यावरही एखादे मांजर दिसले तर त्याला उचलून घ्यावे त्याच्या मखमली शरीरावरुन हळूच हात फिरवून पाहावा असं वाटत नसणारे विरळाच.

शिवाय कुत्र्यापेक्षा मांजर आणखी एका दृष्टीने बरे. कुत्रे बिचारे जीव लावून बसते. त्याचा माणूस-मित्र त्याच्याकडे लक्ष देईना झाला तर उदास होऊन बसते, खाणे दिले नाही तर उपाशी राहते. याउलट तुम्ही भाव दिला नाहीत तर मांजर ’गेलास उडत’ म्हणून चालते होते. घरचे खाणे मिळाले नाही तर बाहेर जाऊन होटेलमधून किंवा स्विग्गीवरून एखादा उंदीर, एखादा पक्षी मागवून आपले पोट भरते. माणूस-मित्राची इच्छा म्हणून भुके राहण्याचा वेडगळपणा वगैरे करत नाही. त्यामुळे त्याला पालक-मित्रालाही त्याबाबत फार टेन्शन घेण्याची गरज नसते

IAmTheGod

कालच आमचा एक मित्र सांगत होता (बहुधा हिचिन्सचे वाक्य) की ’कुत्र्याला तुम्ही खाऊ घातलेत, निवारा दिला, त्याची/तिची काळजी घेतलीत की ते तुम्हाला - म्हणजे माणसाला - देव समजू लागते. (’व्हाईट फॅंग’ या कादंबरीमध्ये त्यातील लांडग्याच्या पिलाची मनोभूमिका विशद करताना जॅक लंडनने नेमका हाच विचार मांडला आहे.) पण मांजराबाबत तुम्ही हेच सारे केलेत, तर ते स्वत:ला तुमचा देव समजू लागते.’

लहानपणी मी दमेकरी असल्याने केसाळ प्राण्यांपासून दूर राहणे सक्तीचे होते. शिवाय दहा बाय आठच्या खोलीत माणसांनाच जेमतेम जागा होती, तिथे मांजर कुठे पाळणार. पुढे शिक्षण-रोजगार वगैरेच्या धबडग्यात त्या 'आणखी एका जिवाला आपल्यावर अवलंबून कशाला ठेवावं' या विचाराने मांजर पाळण्याच्या फंदात वगैरे पडलो नाही. रोजगाराच्या सापळ्यातून फार लवकर सुटका करुन घेतल्यावर त्याबाबत पुन्हा विचार करु लागलो होतो. पण अलिकडचे काही अनुभव पाहिले नि ती हौस फिटली.

दोन-अडीच वर्षांपूर्वी आमच्या सोसायटीमध्ये एक मांजर दिसू लागली. लॉकडाऊनमुळे घरी बसलेल्या बच्चे कंपनीला एक विरंगुळा झाला. तिच्याशी खेळणे, दूध वगैरे देणे सुरु झाले. त्यातच तिला दोन पिले झाली. मुले आणखी खुश झाली. आता खिडकीबाहेरील ग्रिलमध्ये त्यांच्यासाठी बिछाना वगैरे करुन पिलांना राहायला घर मिळाले. त्या दोन्ही बोक्यांचे नामकरण वगैरे झाले... आणि मांजरी स्वत:ला देव मानू लागली...! आणि जीवसृष्टीच्या निर्मितीचे आपले काम निष्ठेने करु लागली !

बाईंनी पुढची वीण दिली ती थेट पाच पिल्लांची, ती ही एकाच्या घरातच. तिला पाच पिलांना पोसेल इतके दूध हवे म्हणून तो बिचारा तिला चिकन वगैरे आणून खाऊ घालू लागला. तिचा माणूस-मित्र चिकनची वा खाण्याची पिशवी घेऊन बाहेरून आला, की पार्किंगमध्ये कुठेतरी पिलांसोबत बसलेली ही बया तुरुतुरु त्याच्या पुढे पुढे चालत त्याच्याआधी त्याच्या घरात प्रवेश करु लागली.

आता आपण सोसायटीचीच नव्हे तर त्यातील प्रत्येक घराचीच आपण देवता आहोत असे तिला वाटू लागले असावे. त्यामुळे तो एकटाच नव्हे तर सोसायटीमधील कुणीही पिशवी घेऊन आलेले दिसले की हाच कार्यक्रम होऊ लागला. इतकेच नव्हे तर दिवसभर कुठेही उंडारत असली, तरी खाण्याच्या वेळी न चुकता त्याच्या दारी जाऊन जोरदार आवाजात खाण्याची मागणी करते. पोट भरले की बाई परत गाव कोळपायला बाहेर.

सहा महिन्याच्या अंतराने सात पिले म्हटल्यावर सोसायटीत थोडी खळबळ झाली खरी. पण आसपास पोरासोरांना पत्ता लागल्याने कुणी कुणी घेऊन गेल्याने पिले ’दिल्या घरी’ सुखी झाली असे समजून सगळे निवांत झाले.

पण बाईंना उसंत नव्हती. पुन्हा सहा महिन्याच्या आत दोन पिले. पाठोपाठ आणखी पाच पिले घेऊन एका घरात ठिय्या दिला. त्यांनीही नाईलाजाने ती पिले ठेवून घेतली, अजून पोसत आहेत. पुढची वीण चारची. थोडक्यात सोसायटीच्या या मालकीणबाई आतापावेतो अठरा पिलांचे मातृत्व मिरवून आहेत... पुढच्या पिढीची तयारी झाली आहे! इतकेच नव्हे तर ही माऊली आजी होण्याच्याही मार्गावर आहे.

या बाईंचा नवरोबाही इतका निष्ठावान आहे, की तो रोज सकाळी सातच्या सुमारास एक फेरी मारून आपला हा घरोबा ठाकठीक आहे ना याचा आढावा घेऊन जातो. लॉकडाऊनमुळे तो ही बेरोजगार असल्याने फारच क्रियाशील झाला असावा नि दोन वर्षांत अठरा पोरांचा बाप होऊन बसला असावा. 

एखादे दिवशी त्याच्या भेटीला उशीर झाला, तर बाईसाहेब जातीने पलिकडच्या बिल्डिंगमध्ये जाऊन त्याला घेऊन येतात. कुंपणावरुन चालणारी माऊ नि तिच्या मागे मान खाली घालून येणारे ’जावईबापू’ हे दृश्य मी अनेकदा पाहिले आहे. ’मुडद्या इतका पोरवडा जन्माला घातलास, त्यांच्या पोटात दोन घास कसे घालायचे याची अक्कल नाही ती नाही; निदान त्यांना दिवसातून एकदा बापाचे तोंड तरी दिसू दे.’ असा दम देऊन त्याला घेऊन आल्यासारखा त्याचा चेहरा पडलेला असे.

पुढच्या पिढीच्या मागे आणखी दोन बोके फेर्‍या मारू लागले आहेत. माडगूळकरांच्या ’सत्तांतर’चा पुढचा भाग इथे लिहिला जाईल अशी शक्यता बरीच आहे.

’अति झालं नि हसू आलं’ ही म्हण सार्थ व्हावी असा हा अनुभव. सोसायटीमध्ये सतत बारकी मांजरे फिरत असतात. बरे ती माणसांना इतकी निर्ढावली आहेत की कुणी आले की दचकून बाजूला सरकण्याच्या फंदात पडत नाहीत, आपणच त्यांच्यावर पाय पडू नये याची काळजी घ्यायची. शिवाय पिले बारकी असली की त्यांना घाण करण्याची समज नसते. त्यामुळे रात्री ज्याच्या दारासमोर ताणून देणार तिथेच घाण करुन मोकळे. सकाळी दार उघडताच डोके भणभणून टाकणारा विष्ठेचा वास. ती साफ करणे हे एक जास्तीचे काम.

मी दोन तीन वेळा सर्वांना विनंती केली की ज्यांना पाळायची असतील त्यांनी ती आपल्या घरात पाळा, त्यांच्यासाठी सॅंडबॉक्स ठेवा, भाटी असेल तर ऑपरेशन करुन आणा... पण ते ही नको. मग सोसायटी खर्चाने हे करुन घेऊ म्हटले तर ते ही नको.

एक शहाणे तर त्याहून पुढचे. म्हणे ’ती मांजर उंदीर मारते त्यामुळे गाडीच्या वायरी कुरतडणारे उंदीर अनायासे मरतात.’ तोटा एवढाच की ते उंदीर, मारलेले कबूतर ती कुणाच्याही दाराशी आ्णून ताव मारते, पोरांना देते. ती एक जास्तीची घाण. पण ते साफ करायला घरच्या स्त्रिया आहेत ना. मग हे वीर गाडीची वायर कुरतडणार्‍या उंदराचे निर्दालन करणार्‍या मांजरीचे पाठीराखे होतात यात नवल काय. पण मग त्या मांजराचे ऑपरेशन करुन आण म्हटले की ’मी कुठे पाळले आहे त्याला’ म्हणून हात वर करायला मोकळे. फायद्याचे खासगीकरण आणि तोट्याचे सार्वत्रिकीकरण ही क्रॉनि-कॅपिटॅलिस्ट मेंटॅलिटी माणसाने वैय्यक्तिक आयुष्यातही पुरेपूर अंगीकारल्याचे हे उदाहरण आहे.

मांजराने कुठेही विष्ठा-विसर्जन करण्यात माणसाचाही मोठा दोष आहे, त्याबद्दलही बोलले पाहिजे. 'सर्व काही स्वत:च्या सोयीने असायला हवे' हा माणसाचा अट्टाहास इतका वाढला आहे, की बहुतेक सोसायट्यांमध्ये इमारतीच्या आसपासची जागा ही फरशा टाकून, कोबा करुन वा इंटरलॉकिंग ब्लॉक टाकून तिचे सपाटीकरण केलेले असते. माणसाची मातीशी नाळ इतकी तुटली आहे, की सोसायट्या एक कणभर मातीचे ढेकूळ उघडे न ठेवता सगळीकडे काँक्रीट ओतून ठेवतात. शहरांचे तपमान वाढत जाण्यामागे या प्रचंड तापणार्‍या आणि रात्री लवकर थंड न होणार्‍या काँक्रीटचा मोठा वाटा आहे.

आठ-दहा वर्षांपूर्वी कामानिमित्ताने सिअ‍ॅटल या मायक्रोसॉफ्टच्या शहरी धावती भेट झाली. मायक्रोसॉफ्टच्या ज्या ऑफिसमध्ये माझे काम होते, ते माझ्या राहण्याच्या जागेपासून अगदी दहा मिनिटे चालत जाण्याच्या अंतरावर होते. रहदारीही नगण्य असल्याने मी पहिल्या दिवशी रमतगमत निघालो. एके ठिकाणी रस्ता जवळजवळ काटकोनात वळला होता, तिथे वळलो आणि असे दिसले की मी एका पुलावर आहे आणि खालून त्यांचा फ्री-वे (आपल्याकडे ज्याला हायवे म्हणतात तो) जात होता. डावीकडे सहा नि उजवीकडे सहा मार्गिका असलेला अवाढव्य रस्ता. एवढी विशाल रुंदी असलेल्या काँक्रीटचा पट्टा, पार दूरवर गेलेला होता. दोन्ही बाजूला, मध्ये कुठेच एक हिरवे पान नव्हते (एरवी सिअ‍ॅटल डोंगरउतारावरचे शहर असूनही शहरात बर्‍यापैकी झाडोरा आहे.) तो भगभगीत पांढरा पट्टा पाहून मी प्रचंड दचकलो होतो. अमेरिकन मंडळींची ऑफिसेसही अशीच भकास भिंतींची, कामाशिवाय कोणताही अन्य रंग चढू न देणारी नीरस अशी असतात हे पुढे दिसून आले. (माणसाला भौतिक प्रगतीची खायखाय सुटली की त्याचे सौंदर्यभान, कलाजाणिवा, नि सामाजिक भान नाहीसे होते याचे अमेरिका हे ढळढळीत उदाहरण आहे. किंबहुना म्हणून तिथे सोशल मीडियासारख्या कृत्रिम गोष्टीचा शोध लागला असावा.)

आपणही त्यांची री ओढू लागलो आहोत. आता सर्व शहरी घरे तर आरसीसी स्ट्रक्चरची असतातच, पण रस्तेही काँक्रीट ओतून निर्मम बनवून ठेवले आहेत. लहान लहान बोळसुद्धा काँक्रीटचे केले आहेत. त्यामुळे पाणी मुरण्याच्या जागा नाहीशा झाल्या आहेत. बहुतेक ठिकाणी ड्रेनेज डक्ट्स नाहीत. गल्लीबोळातून पाणी वाहात येते ते मुख्य रस्त्यावर आणि तिथे त्याचा प्रचंड लोंढा होतो, त्यातून बराच जड कचराही जमिनीपासून उचलला जावा इतका रेटा तयार होतो. हा कचरा वाहात जाऊन कुठेतरी अडथळ्यापाशी त्याचे बंधारे तयार होतात नि माणसाची वस्ती जलमय होऊन जाते. गेल्या चार पाच वर्षांतला हा नियमित येणारा अनुभव.

याचा ताप मांजरांनाही होतो. पिले मोठी झाली आणि विष्ठा-विसर्जनप्रक्रियेची त्यांची मूळ जाणीव जागी झाल्यावरही खड्डा करण्यास मातीची जमीनच शिल्लक नसल्याने ही मंडळी इथे तिथे घाण करुन ठेवतात. त्यांचाही नाइलाज असतो. माणसाने निसर्गाला आपल्या सोयीने पार बदलून टाकला आहे. मांजरांसारख्या विपरीत परिस्थितीतही तग धरून राहण्याचे कौशल्य असलेल्या प्राण्यानेही माणसाच्या या हपापलेपणापुढे हात... आय मिन पंजे टेकले आहेत

पुलंच्या ’पाळीव प्राणी’मध्ये त्यांनी अशाच वेगाने त्यांच्या घरात वाढलेल्या मार्जारसंख्येबद्दल लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, "... मांजरही घर सोडिनात; मग आम्हीच सोडलं." आमच्यावरही तीच वेळ येऊ नये अशी त्या ईजिप्तमधल्या फॅरोंच्या मार्जारदेवीच्या चरणी प्रार्थना आहे.

- oOo -


हे वाचले का?

सोमवार, २ मे, २०२२

प्रकाश नावाची प्रत्येक व्यक्ती वैज्ञानिक असते

मी महाविद्यालयात शिकत असताना एका मित्राने एक गंमतशीर सिद्धांत मांडून त्याची सिद्धताही दिली होती. ही गंमत महाविद्यालयीन प्रवृत्तीला अनुसरुनच होती. परंतु काळ जातो तसे आपली दृष्टी नि विचार व्यापक होत जातात आणि ’साध्याही विषयात आशय मोठा किती आढळे’ असा अनुभव येतो. या सिद्धांताबाबतही मला असाच काहीसा अनुभव आला.
---

त्याचा सिद्धांत असा होता: प्रकाश नावाची प्रत्येक व्यक्ती वैज्ञानिक असते.

PrakashStartsEarly
www.thealternativedaily.com येथून साभार.

त्याची सिद्धता त्याने अशी दिली होती: प्रकाश म्हणजे पक्या, पक्या म्हणजे क्याप, क्याप म्हणजे टोपी, टोपी म्हणजे पीटो, पीटो म्हणजे मारा, मारा म्हणजे रामा, रामा म्हणजे देव, देव म्हणजे वदे, वदे म्हणजे बोले, बोले म्हणजे लेबो... आणि लेबो हा एक वैज्ञानिक होता म्हणून प्रकाश नावाची व्यक्ती वैज्ञानिक असते.

(सिद्धता पूर्ण).
---

आपल्या आसपास प्रकाश नावाचा एखादा कारकूनच काय पण श्रमजीवीही सहज दाखवता येतो. त्या अपवादाने सर्वसमावेशक विधान असलेला सिद्धांत बाधित होऊन जातो. त्यामुळे ही सिद्धताच काय, पण सिद्धांतही साफ चुकीचा आहे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. या दोहोंमध्ये कोणताही अन्योन्य संबंध नाही !

पण सिद्धता चुकली तरी सिद्धांत बरोबर असू शकतो हे आपल्याला ठाऊक आहेच. (परीक्षेत 'सिद्धांत सिद्ध करा' असा प्रश्न असतो आणि आपली सिद्धता चुकीची ठरुन शून्य गुण मिळतात हा बहुतेकांच्या अनुभवाचा भाग आहे. :) ) पण सिद्धता बरोबर असूनही सिद्धांत चुकीचा असू शकतो हे मात्र चटकन पचनी पडणे अवघड आहे. पण ते ही शक्य आहे याचे हे थोडे विवेचन.

वरील सिद्धतेकडे पाहिले तर ती एक संगती मांडून दाखवते. त्या संगतीमध्ये काही गृहितके आहेत. ती जर खरी असतील तर सिद्धताही खरी ठरेल... म्हणजे ती सुसंगत, तार्किक मांडणी ठरेल.

यात कशा-कशाचा वापर केला आहे ते पाहू.

१. यात बोलीभाषेतील संक्षिप्त नाम आणि मूळ नामाचे एकरुपत्व गृहित आहे. म्हणजे प्रकाश = पक्या आणि कॅप = क्याप.

२. कॅप म्हणजे टोपी म्हणताना दोन भाषा-इंग्रजी आणि मराठी- यांचा परस्परसंबंध वापरला आहे. तसेच पीटो म्हणजे मारा म्हणताना हिंदी-मराठी यांचा.

३. गणितात एक क्रम-विरागी प्रक्रिया (commutative relation) असते. म्हणजे पाहा, चार अधिक तीन जसे सात होतात तसेच तीन अधिक चारही. यात बेरीज ही क्रम-विरागी प्रक्रिया आहे. तसेच एखाद्या लिपीमध्ये असले तर...? म्हणजे पाहा. शब्दातील अक्षरांचा क्रम बदलला (सर्वात सोपे म्हणजे उलट केला) तरी नव्या शब्दालाही मूळ शब्दाचा अर्थ शिल्लक राहात असेल, तर त्या लिपीलाच क्रम-विरागी लिपी म्हणता येईल. वरच्या तर्कात तिसरे गृहितक आहे ते क्रम-विरागी लिपीचे. म्हणून पक्या म्हणजे क्याप, टोपी म्हणजे पीटो, मारा म्हणजे रामा, देव म्हणजे वदे, बोले म्हणजे लेबो असे म्हणता येते.

क्रम-विरागी लिपी ही माझ्या मते एक बहारदार कल्पना आहे. पण क्रम-विरागी लिपी म्हणजे इंग्रजीतील Palindrome नव्हे! इंग्रजीमध्ये उलट वा सुलट दोन्ही बाजूने वाचले असता सारखाच असणार्‍या शब्द, आकडा, वाक्य, संज्ञा यांना पॅलिण्ड्रोम (Palindrome) म्हटले जाते. ते अर्थाचे नव्हे तर अक्षर/अंकांच्या क्रमवारीचे वैशिष्ट्य आहे.

४. रामा म्हणजे देव असे म्हणताना आपण विशिष्टाकडून सामान्याकडे सरकतो आहोत. देव हा एक समूह आहे आणि रामा- राम हा त्या समूहाचा सदस्य आहे. त्यामुळे इथे व्यावहारिकदृष्ट्या एकसाचीकरणाचे तत्त्व आपण गृहित धरतो आहोत. राम या विशिष्ट व्यक्तीचे आणि देव नावाच्या समूहातील इतर कुणाचेही गुणात्मक अभिन्नत्व आपण गृहित धरत आहोत.

५. पाचवा मुद्दा म्हणजे लेबो नावाचा एक वैज्ञानिक अस्तित्वात आहे/होता ही निव्वळ माहिती आपण सत्य/वास्तव म्हणून गृहित धरत आहोत. (पडताळणी केली की ती गृहितकातून वास्तवाकडे जाईल.)

६. लेबो या नावाची एक व्यक्ती वैज्ञानिक होती म्हणजे त्या नावाची- अथवा त्या नावापर्यंत संगती लावता येणारी- प्रत्येक व्यक्ती ही वैज्ञानिक असेल. (हे गृहितक खरे तर ज्याची सिद्धता करण्याचा प्रयत्न करत आहोत तेच विधान आहे, फक्त प्रकाश ऐवजी इथे लेबो आहे इतकेच. म्हणजे मूळ विधान हे अन्योन्य व्याघाताचे उदाहरण ठरते आहे.) हे क्र. ४ या गृहितकाच्या पठडीतलेच आहे. पुन्हा आपण विशिष्ट व्यक्तीकडून सामान्याकडे सरकतो आहोत नि ती व्यक्ती त्या गटाची प्रातिनिधिक आहे असे गृहित धरतो आहोत.

७. प्रकाश नावाची व्यक्ती = वैज्ञानिक हे भाषिक संगतीने सिद्ध होते म्हणून ते वास्तवही असले पाहिजे. (हे गृहितक वापरून जगातले सगळॆ काही इकडूनच बाहेर गेले म्हणणारी मंडळी थैमान घालत असतात हे आपण नेहमीच पाहात असतो.)

यातले काही मुद्दे वास्तवाशी मेळ बसणारे नाहीत हे आपल्याला ठाऊक आहे. पण समजा कुठेतरी खरे ठरत असतील तर... ?

असली अतार्किक गृहितके वापरून आपण अनेक सिद्धता मांडत असतो की. अमुक जातीचे लोक अधिक हुशार असतात, तमुक जातीचे लोक अधिक शूर असतात; अमक्या गावचे लोक अधिक तिखट खातात, ढमक्या गावची मिसळ जग्गात भारी, खमक्या गावचा बनपाव वर्ल्ड-फेमस आहे... वगैरे बाष्कळ गृहितके (कोणतीही वस्तुनिष्ठ माहिती वा डेटा गोळा न करता) पकडून त्याआधारे निघणारे निष्कर्ष आपण खरे मानून जगतोच.

मग घटकाभर मानू या, की वरच्या उदाहरणातील गृहितके एखाद्या भूभाग-समाज-लिपी वगैरेच्या युतीमध्ये खरी आहेत. मग जीवसृष्टीच्या त्या तुकड्यातील प्रत्येक प्रकाश हा वैज्ञानिक आहे हे विधान सिद्ध होऊन जाईल. त्याला एक तर्कसंगत सिद्धता मिळेल.

पण तरीही त्या ठिकाणच्या वास्तवात त्या समाजात कुण्या प्रकाश नावाच्या मुलाचे कार्यक्षेत्र भिन्न असू शकेलच. कारण मनुष्याला जन्मत:च त्याचे नातेवाईक नाव देऊन टाकतात. पुरेसे वय वाढल्यावर, बौद्धिक-शारीरिक कौशल्ये आत्मसात केल्यावर, अंगभूत क्षमता विकसित केल्यावर मगच आणि उपलब्ध संधीनुसार त्याचे कार्यक्षेत्र निश्चित होते. आणि निव्वळ नाव प्रकाश आहे म्हणून त्याला वैज्ञानिकाचे कार्यक्षेत्र लाभेलच असे नाही.

आता आपल्या सोयीचे नियम असलेल्या जगाची कल्पना करतोच आहोत, तर आणखी एक पाऊल पुढे टाकू. असं समजू, की नाव देणे हे आई-वडिलांचे नव्हे तर कुठल्याशा प्रक्रियेने (उदा. रॅंडम निवड) ठरते. आणि एकदा ठरले की त्याला अनुसरून त्याचे जगण्याचा पुढचा धागाही निश्चित होऊन जातो. म्हणजे त्या समाजात प्रकाश नाव असलेल्यांना पुढे वैज्ञानिक म्हणून काम करायचे आहे असे गृहित धरून लहानपणापासून तेच शिक्षण देऊन तयार केले जाईल. त्याच्या त्या क्षेत्रातील कल, कौशल्य, क्षमता नि बुद्धी याचा विचार न करता त्याच्यावर ते लादले जात असेल. हे अगदीच अतर्क्य नाही... भारतातील जात-व्यवस्था वेगळे काय करत असते? ते नावाऐवजी जातीनुसार त्याचा रोजगारक्षेत्र निश्चित करत असतेच की. म्हणजे १ ते ६ मुद्दे ज्या समाजात लागू आहेत आणि जन्मलेल्या प्रत्येक मुलाला त्याच्या नावानुसार कार्यक्षेत्र नेमूनच दिले जाते अशा समाजात सर्वात वर दिलेला सिद्धांत खरा ठरतो.

’सिद्धांत खरा किंवा खोटा असणे त्याच्या व्याप्तीवर अवलंबून असते, तो सर्व ठिकाणी सारखाच खरा, खोटा वा लागू असत नाही’ याचे हे उत्तम उदाहरण.

अतिशय तर्कसंगत सिद्धता असूनही व्यावहारिक निरीक्षणे ही सिद्धांताच्या विरोधात जातात. असे का घडते...?

कारण एक महत्वाचा मुद्दा आपण सारेच विसरत असतो. तर्कसंगतीने सिद्ध होते ती असते फक्त शक्यता (possiblity), वास्तव नव्हे ! तिला संभाव्यतेच्या (probability) पातळीवर आणण्यासाठी वास्तवातील निरीक्षणांचा आधार घ्यावा लागतो. इथे शक्यताविज्ञानाचा (Statistics) आधार घ्यावा लागतो. प्रत्यक्ष निरीक्षणांच्या आधारे या शक्यतेचे मूल्यमापन करावे लागते. आणि मग त्या मूल्यमापनाच्या आधारे निष्कर्षापर्यंत पोचावे लागते.

गणितामध्ये - विशेषत: अंकगणितामध्ये - सर्व नैसर्गिक संख्यांच्या संदर्भात एखादा सिद्धांत सिद्ध करायचा झाल्यास प्रथम एका नैसर्गिक संख्येसाठी (n) तो सिद्ध झाला आहे असे गृहित धरून त्याच्या पुढील संख्येसाठी (n+1) तो सिद्ध केला जातो. म्हणजे जर-तरच्या भाषेत सांगायचे तर तो ’जर तो अमुक संख्येसाठी खरा असेल तर तो अमुक अधिक एक या संख्येसाठी सिद्ध असतो’ हा निष्कर्ष सिद्ध झाला. आता सर्व संख्यांसाठी तो सिद्ध करण्यासाठी कोणत्याही एका नैसर्गिक संख्येसाठी स्वतंत्रपणे सिद्ध केला की साखळी नियमाने तो सर्व संख्यांसाठी सिद्ध होऊन जातो. या सिद्धतेच्या प्रक्रियेला क्रम-आवर्तन पद्धती (mathematical induction) असे म्हटले जाते.

व्यवहारात बहुसंख्य माणसे यातील पहिला जर-तरचा भाग साफ विसरून जातात, नि एका व्यक्ती वा घटकाबाबत सिद्ध झालेले सर्व गटाला लागू करुन टाकण्याची घाई करत असतात. उदा. गण्या डोक्याने कमी आहे म्हणून त्याच्या जातीचे सगळेच डोक्याने कमी आहेत, काही लाख लोकसंख्येच्या शहरातील एका होटेलमधील कुठलासा पदार्थ आपल्याला बेहद्द आवडला, की तोच नव्हे तर त्या गावचा (म्हणजे तेथील सर्व होटेलमधील) तो पदार्थ जगात भारी, किंवा अमुक औषध वा उपचारपद्धती मला (त्यातही अमुक आजाराबाबत) लागू पडली, म्हणजे ती सर्व पर्यायी उपचारपद्धतींपेक्षा निर्विवाद श्रेष्ठ आहे... असले बाष्कळ निवाडे आपण देतो की नाही? ते या जर-तरच्या पूर्वार्धाला विसरुनच. किंबहुना हा पूर्वार्धच तर्कसंगती सिद्ध करण्यासाठी आणि निष्कर्षाच्या व्याप्तीला निश्चित करण्यासाठी योजलेला असतो.

हे ’जर-तर’चे विधान वा निष्कर्ष हा वरील तर्कसंगतीवर आधारित सिद्धतेसारखा आहे, तर एका सुट्या नैसर्गिक संख्येसाठी तो स्वतंत्रपणे सिद्ध करणे हा वास्तवाचा, माहितीचा व डेटाचा सांधा आहे. ते दोन्ही जुळले तरच सिद्धांत निष्कर्षात रूपांतरित होतो.

पण वरील सहा गृहितकांमधील एखादे मोडले, बाधित झाले, तर ही साखळी तुटेल आणि सिद्धता निरूपयोगी होऊन जाईल. पण याचा अर्थ मूळ सिद्धांत ’चुकीचा’ आहे असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. कारण प्रकाश आणि वैज्ञानिक असण्यामधील ही केवळ एक संगती आहे. कदाचित अन्य काही गृहितक, वास्तव निरीक्षणांच्या एखाद्या दुसर्‍या- पर्यायी संगतीच्या आधारे तोच सिद्धांत सिद्ध करताही येईल.

या पर्यायी संगतीचे उत्तम उदाहरण अलिकडे ब्रॉडचर्च या मालिकेत पाहायला मिळाले. पुराव्यांच्या एकाच साखळीच्या आधारे दोन पर्यायी शक्यता सरकारपक्षातर्फे आणि बचावपक्षातर्फे मांडल्या जातात. ज्युरींना त्यातील अधिक विश्वासार्ह जी वाटते त्याआधारे निवाडा केला जात असतो.

तेव्हा तूर्त ’सिद्धांत अद्याप सिद्ध झालेला नाही’ एवढाच निष्कर्ष काढून थांबावे लागेल, ’सिद्धांत चुकीचा आहे’ हा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल.

जोवर तो सिद्धांत सिद्ध झालेला नाही तोवर तो निष्कर्ष म्हणून वापरता येणार नाही, तसेच तो खोटा आहे हे निर्णायकरित्या सिद्ध झाल्याखेरीज तो खोडूनही टाकता येणार नाही. आणि ही अनिर्णित अवस्था आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असूनही बहुतेकांना अडचणीची वाटते. त्यामुळे एक बाजू स्वीकारण्याचा आटापिटा करताना बहुसंख्येसारख्या सर्वस्वी गैरलागू पद्धतींचा वापर करुन -आपल्या सोयीचा- निवाडा करून टाकण्याचा मार्ग बहुतेकांनी अनुसरलेला असतो.

- oOo -


हे वाचले का?