शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

फेक-फेसबुक, फसवणूक आणि गुंतवणूक

गेल्या दोन वर्षांत भांडवल-बाजाराने दिलेला जोरदार परतावा पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलेले आहे. एरवी ‘शेअर बाजार म्हणजे सट्टेबाजी’ असे टोकाचे मत घेऊन जगणार्‍यांचे कुतूहलही जागे झाले आहे... साधारण पंधरा वर्षांपूर्वीच्या ‘बुल-रन’च्या वेळी निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा दिसू लागली आहे. तेव्हा जसे घडले त्याच धर्तीवर या लालसा असलेल्या अडाण्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी पाहून शिकार्‍यांची (scamsters) भूछत्रेही वेगाने उगवू लागली आहेत.

याचे प्रतिबिंब सध्या फेसबुक, ट्विटरसारख्या समाज(?)-माध्यमांवर दिसू लागले आहे. फेसबुकवरील फीडमध्ये तर सध्या फक्त शेअर-टिप्स देणार्‍या विविध तथाकथित पोर्टल्सच्या जाहिरातीच दिसत आहेत. बहुतेक सार्‍या फसव्या (scam/fraud) . इमेजमध्ये एखाद्या प्रसिद्ध ‘इकनॉमिक टाईम्स’सारखे अर्थपत्र वा गुंतवणूक-माध्यम व्यावसायिकाचे नाव दिसते, पण लिंक भलतीकडेच नेते असा प्रकार होतो आहे. ९०% जाहिराती अशाच आहेत.

अदानी१

काही महिन्यांपूर्वी ही जाहिरात फेसबुकने फीडमध्ये दाखवली होती! विशेष म्हणजे त्यात ज्या वेबसाईटचा उल्लेख आहे त्या नावाची वेबसाईट अस्तित्वातच नाही!  लिंकवर क्लिक केले असता भलतीच वेबसाईट ओपन होई, जी ट्रॅकर वा रिडायरेक्ट स्वरूपाची आहे. 

एखाद्या देशात वा भूभागामध्ये बंदी असलेल्या वेबसाईट्सकडे नेण्याचा छुपा मार्ग म्हणून हे ट्रॅकर काम करतात. पण हाच पर्याय वापरून फसवणूक करणारे तुम्हाला आपल्या जाळ्यात ओढत असतात.

अड्रेसमध्ये ट्रॅक हा शब्द दिसताक्षणीच मी ती बंद केली. मग मी ब्राउजरमध्ये थेट नाव टाईप केले, तरी सापडले नाही. अलिकडे www लावून पाहिले, तर मुलांच्या पुस्तकांची एक साईट ओपन झाली.

आणखी रोचक बाब ही, की ही जाहिरात देणारे Charly Bell Officiel हे पेज स्वतंत्रपणे शोधले, तर ते कुण्या गायिकेचे आहे असे दिसते. तिने अदानीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची जाहिरात करण्याचे काहीच कारण दिसत नाही. तिला अदानी हे नावही माहित नसावे. तेव्हा हे अकाऊंट प्रेषित असलेली जाहिरात फेसबुकने कशी दाखवली हे गौडबंगाल आहे.

यात एकतर कुणी Charly Bell Officiel हे अकाउंट हॅक करुन वापरले असावे, किंवा बहुतेक सेलेब्रिटी करतात तसे पैसे घेऊन गायिकेनेच ते वापरायला दिले असावे, किंवा नावात Officiel असले तरी हे अकाउंट कुण्या भलत्याच्य व्यक्तीने काढलेले बनावट अकाऊंट असावे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जाहिरातीचे पैसे मिळतात म्हटल्यावर, अकाउंट बनावट नाही ना याची खातरजमा करून न घेता मिळतील ते पैसे पदरात पाडून घ्यावेत या धोरणाने फेसबुक ही जाहिरात दाखवून मोकळे झाले असावे.

मुळात ‘अदानी एंटरप्रायजेस’सह प्रमुख अदानी कंपन्यांचे बहुसंख्य शेअर हे केवळ प्रवर्तकांसह विविध संस्थात्मक गुंतवणूकदारांकडे आहेत (१). सर्वसामान्य गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी ते फारसे उपलब्धच नाहीत. अगदी म्युचुअल फंडांनीही त्यात कणभर गुंतवणूक केलेली नाही, इतक्या कमी संख्येने ते उपलब्ध आहेत (किंवा त्यांच्या किंमतीचे वास्तव तेथे बसलेल्या गुंतवणूक-तज्ज्ञांना ठाऊक आहे.) मग या जाहिराती का दिल्या असाव्यात? उत्तर सोपं आहे. हेतू अदानीची काळवंडली बाजार-पत उजळण्याचा आहे!

तो का? तर त्यांचे अगदी मोजके असे जे शेअर बाजारात उपलब्ध आहेत, त्यांना खरेदी करण्यास झुंबड उडावी, लोकांनी अधिकाधिक पैसा त्यांच्यासाठी देऊ करावा, जेणेकरून त्यांच्या किंमती वेगाने वाढाव्यात. तसे झाले तर खुद्द अदानींसह इतर संस्थात्मक मंडळींकडे असलेल्या शेअर्सचे नक्त-मूल्य भरपूर वाढेल. फेसबुकपूर्वी याच हेतूने एका प्रथितयश मराठी वृत्तपत्राच्या पोर्टलने अक्षरश: दिवसाआड अदानीच्या शेअर्सनी कशी फीनिक्स पक्ष्यासारखी राखेतून झेप घेतली आहे हे ठसवणार्‍या बातम्यांची(?) झड लावली होती. अजूनही आपले हे काम ते इमानेइतबारे करत असते. अशा वाढलेल्या शेअर्सच्या मूल्यांच्या आधारे अदानींना मोठ्या संपत्तीचा आभास निर्माण करता येऊन त्याबदली बँकांकडून मोठी कर्जे उभारता येतील.

हिंडनबर्गने अदानींवर मूळ मूल्यांच्या कैकपट अधिक मत्ता दाखवल्याचा आरोप केलेलाच आहे. तो अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानींच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य नव्वद टक्क्यांपर्यंत घसरले होते. त्यामुळे अदानींच्या शेअर-मालमत्तेमध्ये वेगाने घसरण झाली. त्यातून अदानींनी कर्ज घेतलेल्या बँकांना दिलेल्या तारणाचे बाजार-मूल्य घटले आणि बँकांनी त्यांना अधिक तारणाची वा परतफेडीची मागणी करायला सुरुवात केली. त्यामुळे ‘मागणी वाढवा नि संपत्ती फुगवा’ या हेतूने हे कारभार चालू आहेत.

तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य ग्राहकाच्या साध्या-सुध्या पोस्टवर फेसबुक कम्युनिटी स्टँडर्डचा बडगा उगारत असते. इथे चक्क खोट्या जाहिराती पैसे घेऊन लोकांपर्यंत पोहोचवते आहे. याच स्वरूपाच्या या आणखी दोन जाहिराती पाहा. या दुसर्‍या जाहिरातीचे प्रेषित असणारे अकाउंट संपूर्ण रिकामे आहे. तिसरे प्रोफाईलही अदानींशी वा आर्थिक विषयाशी काहीही संबंध नसणारे आहे.

एकीमध्ये ‘इंडियन्स ओन्ली’ म्हणत राष्ट्रभावनेला साद घातली आहे. २०१४ पासून हे चाळे आपण पाहात आलो आहोतच. अदानीच्या ऑस्ट्रेलियन सीईओने हिंडेनबर्ग अहवालावर प्रतिक्रिया देताना पाठीमागे भारताचा तिरंगा लावून पत्रकार परिषद घेतलेली आपण आधीच पाहिली आहे.

अदानी२
अदानी३

कुठल्याशा टुकार टाईल्सची जाहिरात, ‘देश की मिट्टी से बनी टाईल’ अशी केली जाते. तिच्या अगदी अलिकडच्या जाहिरातीमध्ये हातात बंदुका घेतलेले सैनिक दिसतात ते पाऊल पुढे टाकतात नि चित्र बदलून टाईल्सच्या भिंतीआडून ही टॅगलाईन उच्चारत हिंदी हीरो अवतरत असतो. जणू यांच्या टाईल्स म्हणजे देशाच्या सीमेवर लढणारे सैनिकच.

एरवी हागल्या-पादल्याला देशाची अस्मिता, आपले सैनिक वगैरे कढ काढणारे नि कलाकारांच्या विरोधात कांगावा, थयथयाट करणारे माध्यमवीर उद्योगधंद्यांच्या असल्या चाळ्यांसमोर मात्र मूग गिळून बसतात. वरून ऑर्डरच तशी असावी. देशाचा पंतप्रधान एका पेमेंट अ‍ॅपसाठी ‘मॉडेलिंग’ करतो आणि ‘व्यापारी सीमेवरच्या सैनिकाहून जास्त रिस्क घेत असतो’ म्हणतो तेव्हा त्यांच्या पित्त्यांनाही ते प्राधान्यक्रम निमूटपणे स्वीकारावे लागतात. निर्बुद्ध, शरणागत वृत्ती हा भक्तीचा स्थायीभावच असतो.

एकुणात फसवणुकीचा झगा केवळ फेसबुकने नव्हे तर राज्यकर्त्यांनी, उद्योगव्यवसायांनी पुरेपूर अंगिकारला आहे.

या सार्‍या अ‍ॅड्स मी ‘misrepresentation’ म्हणून रिपोर्ट केल्या होत्या. त्यातील एक-दोन काढून टाकल्याचा संदेश मला फेसबुकने दिला होता. बाकी बहुसंख्य जाहिरातींमध्ये आक्षेपार्ह काहीही न आढळल्याचा निकाल दिला होता.

फेसबुक हे धंदेवाईक माध्यम असल्याने ते यांना आळा घालतील याची सुतराम शक्यता नाही. मुळात ते तुम्हाला रिपोर्ट करताना काही तपशील देण्याची संधीच देत नाहीत, जेणेकरून आक्षेप नेमकेपणे नोंदवता यावेत. तपासणी बहुधा संगणकीय असल्याने फारच ढोबळ असणार, तोच त्यांचा हेतूही असणार. त्यांना यातून उत्तम पैसा मिळत असल्याने ही चाळणी बहुतेक रिपोर्ट फेटाळेल अशाच दृष्टीने तिची रचना होत असणार. म्हणूनच अशा जाहिराती या वेगाने येत राहतात.

पण अशा जाहिराती केवळ उद्योगपतींच्या वा राजकीय नेत्यांच्या छबी उजळून घेण्यासाठीच असतात असे नाही. याचा उलट उपयोगही केला जाऊ शकतो.

नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीची करण थापर यांनी घेतलेली मोदींची ती प्रसिद्ध मुलाखत लोकांच्या स्मरणात चांगली ठसलेली आहे. २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या नरसंहाराबाबत थेट प्रश्न विचारून त्यांनी मोदींना अडचणीत आणले होते.

आज माध्यमांना सर्वस्वी अंकित करून हवी तशी छबी घडवल्यानंतरही, मोदींना आणि मोदी समर्थकांना त्या मुलाखतीमधून मोदींनी घेतलेली माघार बोचत असते. विरोधकही पुन्हा-पुन्हा तेवढाच भाग प्रसिद्ध करून त्यावर मीठ चोळत असतात. तेव्हा याबाबत काहीतरी केले पाहिजे असे मोदींच्या प्रचारविभागाला वाटले असावे.

आता ही जाहिरात पाहा. शीर्षक असे चतुराईने दिले आहे की जणू त्या मुलाखतीबाबत करण थापर आता नाक घासून माफी मागत आहेत की काय अशी शंका यावी. बातमीला बीबीसीची लिंक आहे अशी बतावणीही केलेली आहे. पण प्रत्यक्षात त्यावर क्लिक केले असता भलतीच साईट ओपन होते. वरचा साईट अड्रेस भलताच पण ते पेज मात्र बीबीसीचे असल्याप्रमाणे रचना करण्यात आली आहे.

KaranThaparHoax
KaranThaparHoaxFakeNews

एक शक्यता म्हणजे ही साईट अग्रेगेटर(२) असेल म्हणून मी लेखाचे ते शीर्षक टाकून गुगल केले असता, बीबीसीवरच नव्हे, तर अन्यत्रही असा कोणताही लेख सापडला नाही. त्या बातमीमध्ये उल्लेख असलेली थापर यांनी घेतलेली Pujitha Devaraju यांची मुलाखतही शोधून सापडली नाही.

असल्या जाहिराती प्रसिद्ध करणारी बहुतेक अकाऊंट्स ही अगदी नुकतीच काढलेली दिसतात. अनेक अकाउंट पाश्चात्त्य कलाकार, खेळाडू यांच्या नावे काढलेली दिसतात. त्यांचे एखाद-दोन फोटोही अपलोड केलेले असतात. त्यापलिकडे त्या अकाउंटमध्ये काहीही नसते. ‘ही मंडळी भारतीय शेअर्स का रेकेमेंड करत आहेत?’ असा सोपा प्रश्न डोक्यात यायला हवा. विशेषत: अदानीचे शेअर्स रेकेमेंड करणारी मंडळी हटकून अशी निघतात. मी अशी अकाउंट नि जाहिराती न चुकता फसवी (scam/misrepresentation/fraud) म्हणून रिपोर्ट करत असतो.

आत्मस्तुती, परनिंदा या पलिकडे जाऊन अशा जाहिरातींतून फुकट पैसे देण्याच्या आदिम आमिषाचा वापरही केला जातो आहे. आता अशा अनेक जाहिराती दाखवून फेसबुक पैसे मिळवते आहे.

या चतुर फसवणूकदाराने आपला खुंटा हलवून कसा बळकट केला आहे पाहा. या जाहिरातीमध्ये क्लिक करण्यासाठी कमळ हे सत्ताधारी पक्षाचे निवडणूक-चिन्ह अगदी रंगसंगतीसह वापरले आहे. पाहणारा सत्ताधारी पक्षाचा सहानुभूतीदार असेल, तर त्याच्याही नकळत, नेणिवेतून तो यावर ‘मोदीकी गॅरंटी’ पाहणार आहे. हा प्रकार फ्रॉड असला तरी सरकारपक्षातील मंडळी या फुकटच्या जाहिरातीकडे काणाडोळा करण्याची शक्यता अधिक. दुसरीकडे ही जाहिरात देणारे प्रेषित अकाउंट पुन्हा ‘टाटा’ या भारतीयांच्या विश्वासार्ह ब्रँडच्या नावे तयार केले आहे. एकुणात जाळ्यात आमिष भलतेच आकर्षक लावले आहे. गंमत म्हणजे त्यात उल्लेख असलेल्या PhonePe या पेमेंट अ‍ॅपचा याच्याशी काही संबंध नाही (वर थापर यांच्याबाबत आहे, तसे त्यांच्या एखाद्या स्पर्धकाचा/विरोधकाचा असावा का?)

ClickKamaLAndWinMoney
ClickKamalAdProfile

लेखाच्या सुरुवातीला भांडवली बाजाराच्या जोरदार परताव्याचा उल्लेख केला आहे. त्याचा आधार घेऊन लोकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू आहेच, तो यशस्वी होतानाही दिसतो आहे. फेसबुककरांमध्येही अनेक मंडळींना अचानक शेअर गुंतवणूक करावी असे वाटू लागलेले दिसते आहे. त्यांना अचाट सल्ले देणारे स्वयंघोषित तज्ज्ञही उपटले आहेत. म्हणजे या जाहिरातींचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. अशा वेळी त्यांना वास्तवाचे भान करून देणे आवश्यक आहे.

२००३ ते २००५ पर्यंत वेगाने वर गेलेला बाजार २००६ ते २००९ वेगाने घसरून त्या खालच्या स्तरावर रेंगाळला होता. पण पहिल्या दोन वर्षातील परताव्याचे आकडे दाखवत LIC ने (त्यांच्या पावलावर पाऊल टाकून इतर खासगी कंपन्यांनी) ULIP (Unit Linked Insurance Policy) विकून आपले उखळ पांढरे करून घेतले होते. एरवी भांडवली-बाजारात पैसे गुंतवण्यास घाबरणारे एलआयसीवर डोळे मिटून भरवसा ठेवत भरपूर परताव्याच्या आमिष दाखवणार्‍या मोठमोठ्या प्रीमियमच्या पॉलिसी घेऊन मोकळे झाले होते.

सुदैवाने (हो सुदैवानेच!) बाजाराची घसरण सुरू झाली नि ULIP चे वास्तव यांना लवकर समजले. अन्यथा ज्यांना खर्‍या अर्थाने विमा म्हणता येईल (‘विमा ही गुंतवणूक आहे’ हा भ्रामक प्रचार करून LIC ने भारतीय गुंतवणूकदारांना भलत्याच मार्गावर नेलेले आहे.)  अशा स्वस्त ‘टर्म पॉलिसी’ज ऐवजी स्वफायद्याच्या, अधिक प्रीमियमच्या ‘मनी-बॅक’ पॉलिसीज गळ्यात मारणारी LIC (३), त्याहून महागडा ULIP हा नवा पायंडा पाडण्यास करण्यास साहाय्यभूत ठरली असती.

या ULIP मध्ये आणखी धोके होते. एकतर पहिल्या तीन वर्षांत तुम्ही गुंतवलेल्या पैशांपैकी सुमारे अकरा ते तेरा टक्के रक्कम ते आधीच गुंतवणूक-खर्च म्हणून कापून घेत असत. शिवाय ‘आपण इन्शुरन्स विकतो, गुंतवणूक कंपनी नाही (ग्राहकांकडे मात्र नेमकी उलट भूमिका मांडली जाते) तेव्हा आम्हाला बाजार-नियंत्रकाचे (सेबी: Securities Exchange Board of India) नियंत्रण नसावे’(४) अशी मखलाशी करून त्यांनी लवादाकडून त्यावर मोहोरही उमटवून घेतली होती. म्हणजे म्युचुअल फंडांमध्ये असलेली पारदर्शकता यांच्या गुंतवणुकीबाबत बंधनकारक नव्हती. इतरही अनेक नुकसानकारक मुद्दे होते.

बाजाराच्या तत्कालीन कामगिरीच्या आधारे LIC एजंट ग्राहकांना वार्षिक २५% परतावा मिळण्याची लालूच दाखवत होते. एवढा दीर्घकालीन परतावा गुंतवणूक-तज्ज्ञांची फौज बाळगणार्‍या म्युचुअल फंड कंपन्याही क्वचित काही फंडांमध्ये देऊ शकल्या आहेत. एरवी हा फायदा केवळ तात्कालिक असतो नि सरासरीच्या नियमाने हे प्रमाण नंतर कमी होते.

माझ्या मते ही चक्क फसवणूक होती. माझ्या परिचितांपैकी काही जण याला बळी पडले. ‘एवढा परतावा मिळू शकत नाही, हे तात्कालिक आहे’ हा माझा सल्ला न ऐकता ‘एजंट काय खोटं सांगेल’ या अडाणी गृहितकाखाली त्यांनी आपला पाय खोलात घातला होता.

‘सध्या शेअर मार्केट भरपूर फायदा देते आहे म्हणून आता तिथे जावे’ हे उशीराचे शहाणपण आहे. जसे ‘घसरले म्हणून बाहेर पडावे’ हा घायकुतेपणा चुकीचा तसेच ‘फायदा दिसतो म्हणून आत शिरणे’ हा उतावीळपणाही.

अचानक जाहिराती दिसू लागल्या, बाजार सकारात्मक दिशा दाखवतो आहे म्हणून आपले गुंतवणूक-धोरण बदलणे चुकीचे आहे. भांडवली बाजाराशी निगडित पर्यायांमध्ये गुंतवणूक करून पैसे मिळवणे ही तात्कालिक नव्हे, नियमित करण्याची गोष्ट आहे. त्यासाठी नियोजन महत्त्वाचे असते, धोक्याची जाणीव आणि त्यावर स्वार होण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याची प्रवृत्तीही. जाहिराती तर सोडाच, पण इतर परिचितांनी दिलेल्या सल्ल्यानुसार डोळे झाकून गुंतवणूक करणारेही - माझ्या मते - गाढव असतात. तुमचा एजंटही ‘त्याला फायद्याचा गुंतवणूक सल्ला देत असतो, तुमच्या फायद्याचा नव्हे’ हे विसरायचे नसते.

दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ.

- oOo -

(१). ‘त्यात खरेच पैसे आहेत की नाही, की मुळातच अदानींचे मूठभर पैसे फिरवून फिरवून पुन्हा पुन्हा भारतात आल्याचे दाखवले आहे?’ वगैरे प्रश्न हिंडनबर्ग अहवालानंतर विचारले जाऊ लागले आहेत.

(२). अग्रेगेटर म्हणजे एकप्रकारे `वेबसाईट्सचे वृत्तपत्र’ म्हणावे लागेल. विविध वेबसाईट्स– विशेषत: बातमीदार – वरील उल्लेखनीय मजकूर एकत्र करुन एकप्रकारे त्याचे संकलन इथे उपलब्ध करून दिलेले असते, जणू एक अनुक्रमणिका तयार केलेली असते.

(३). खासगी कंपन्यावर आगपाखड करण्यास जागा मोकळी सोडली आहे. त्यासाठीच फक्त LIC चे नाव घेतले आहे. ‘त्यांना सांगा की, तिकडे बघा की’ वाल्या आणि ‘एफडीप्रामाण्यवादी भारतीयांसाठी हा फुलटॉस आहे.

(४). इन्शुरन्स विक्रेत्या कंपनीवर इर्डाचे– Insurance Regulatory and Development Authority– नियंत्रण असते.


हे वाचले का?

रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

दूध देणारे ईव्हीएम आणि बेकन खाणारा मित्र

आज सकाळी फिरुन येताना एक परिचित काका भेटले. हे काका वयानं नसले तरी मनाने अजूनही ‘सालं ब्रिटिशांचं राज्य बरं होतं. आपल्या लोकांच्या पाठीवर हंटरच हवा.’च्या वयाचे. काकांच्या हातात दांडी असलेली स्टीलची बरणी होती.

माझं ‘राम राम’ त्यांचा ‘जय श्रीराम’ झाल्यावर मी औपचारिकपणे विचारलं, “फिरायला का?” “नाही...” काका छाती एक से.मी. पुढे काढून म्हणाले– जणू ‘सकाळी फिरायला जाणे हे मेकॉलेच्या शिक्षणातून आलेले खूळ आहे’ हे वाक्य न बोलता माझ्या तोंडावर फेकत आहेत. “... दूध आणायला आलो होतो.” हातातील बरणी उंचावत ते म्हणाले.

“काय काका, पिशव्यांमध्ये घरपोच दूध येत असताना हा आटापिटा कशाला?” मी कळ काढली नि काका ‘हर हर महादेव...’ म्हणत माझ्यावर तुटून पडले. संतापाच्या भरात ‘जऽऽऽऽऽऽय श्रीऽराऽऽऽम.’ ही नवी रणघोषणा असल्याचा फतवा ते विसरले.

AngryKaKa
https://onlineresize.club/ येथून साभार.

पाश्चरायजेशनने दुधातील सकस तत्त्वे कशी जातात, पाश्चात्त्यांचे हे खूळ आपण स्वीकारल्याने भारतीय तरूण कसे शारीरिकदृष्ट्या दुर्बल होत चालले आहेत वगैरे नेहमीचे दळलेले मुद्दे तर होतेच. पण एक मुद्दा मात्र विशेष लक्षवेधी होता. काका म्हणाले, ‘पिशव्यांमध्ये भेसळयुक्त दूध मिळते.’

मी जन्मजात अडाणी असल्याने म्हणालो, “काका, पिशव्यांमधील दुधातही भेसळ होऊ शकते हे मला मान्य आहे. पण खुल्या चरवीमध्ये दुधात भेसळ करणे अधिक सोपे नाही का? 

“शिवाय तुमचा स्थानिक डेअरीवाला असल्याने भेसळ सापडली म्हणून त्याचा फार गवगवा होऊन बदनामी झाल्याने धंद्याचे नुकसान होण्याची शक्यता नगण्य. फारतर तो जागा नि नाव बदलून थोड्या अंतरावर किंवा दुसर्‍या उपनगरात वा पेठेत नवी डेअरी सुरू करेल. जम बसायला थोडा काळ जाईल इतकेच. दूध जीवनावश्यक असल्याने– आणि तुमच्यासारख्यांच्या हाती व्हॉट्स-अ‍ॅप असल्याने– गाडी पुन्हा रुळावर येईलच. 

“पिशव्यांतून मोठ्या प्रमाणावर दूध वितरण करणार्‍या मोठ्या दूधसंघ वा डेअरीज्‌चे तसे नसते.  त्यांना आपल्या ब्रँडची काळजी घ्यावी लागते.”

“तुमच्यासारखे देशद्रोही लोक प्रत्येक पाश्चात्त्य कल्पनेचे असे समर्थन करतात म्हणून देश मागे पडला होता.” काका संतापाने फुलले होते. “द. जपानमधील बुर्किना फासो(१) शहरात पिशवीतील दुधावर बंदी आहे तर तिथे सर्व तरूण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत. साठीच्या स्त्रियाही जिम्नॅस्टिक करतात (‘...आणि सत्तरीचे म्हातारे त्यांना न्याहाळत बसतात.’ - मी... अर्थात मनात) घरटी एक माणूस सैन्यात आहे...” (‘स्थानिक डेअरीचे दूध पिणारा काकांचा मुलगा सैन्यात जायचे सोडून अमेरिकेत का गेला?’ हा प्रश्न मी विचारू का नको या संभ्रमात पडलो.) “... आणि म्हणून जपान हा जग्गात भारी देश आहे.” काकांचे बोलणे एकदाचे संपले.

शेवटी ‘ ... म्हणून तो मला फारफार आवडतो’ एवढे म्हणाले असते तर काकांचा हा निबंध इयत्ता चौथीच्या मराठीच्या पेपरसाठी क्वालिफाय झाला असता. ‘दुधाच्या पिशव्यांत भेसळ होऊ शकते म्हणून खुल्या चरवीतले दूध घ्या’ म्हणणारे काका आणि ‘ईव्हीएम हॅक होऊ शकते म्हणून मतपत्रिकेवर निवडणुका घ्या’ म्हणणारे काका यांच्यातील फरक मला दिसेनासा झाला.

मग मला या दोन्ही काकांच्या नावे बोटेमोड करणारा नि टेट्रापॅकमधील दूध आणि बेकन अशी न्याहरी... नव्हे ब्रेकफास्ट करणारा मित्र आठवला. ‘निवडणुकाच घेऊच नका. आम्हीच सार्‍यांचे तारणहार आहोत, सबब थेट आम्हालाच सत्ता द्या’ म्हणत नेहमीप्रमाणे तिसरी भूमिका मांडेल नि वर मलाच ‘कुंपणावरचा कावळा’ म्हणेल याची मला खात्री आहे. 😀

- oOo -

(१) काकांनी इथे कुठलेसे अगम्य नाव घेतले होते. ते शहर/गाव/खेडे खरेच जपानमध्ये आहे का, मला माहित नव्हते. काकांनाही असण्याची शक्यता शून्य. हा सारा माल-मसाला काकांनी व्हॉट्‌सअ‍ॅपवरून मिळवला असणार. मला बुर्किना फासो हे एका देशाचे नाव काय लक्षात राहते. मी तेच इथे दडपून दिले आहे.


हे वाचले का?

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

‘व्हायरल’च्या नावचा मलिदा ऊर्फ प्रस्थापितांची फुकटेगिरी

फेसबुकवर मी काही दिवसांपूर्वी अरुणा ढेरे यांनी दिलेल्या लोककथेच्या आधारे एक पोस्ट लिहिली होती. त्या कथेमध्ये युद्धोत्तर अयोध्येमध्ये सीतेची नणंद तिला फसवून रावणाच्या अंगठ्याचे चित्र काढून घेते. मग त्याला जोडून पुरा रावण आरेखून त्याच्या आधारे रामाच्या मनात सीतेविषयी किल्मिष निर्माण करुन तिचा त्याग करण्यास उद्युक्त करते. या कथेच्या आधारे मी सर्वसामान्यांच्या ‘पराचा कावळा’ करण्याच्या वृत्तीबाबत नि एकुणात इतिहास हे स्वार्थ-साधक हत्यार म्हणून वापरण्याबाबत टिपण्णी करताना अखेरीस देवत्व संकल्पनेच्या उत्क्रांतीबाबत भाष्य केले होते.

आज कोकणातील एका स्नेह्यांकडून कौतुकाने माझा लेख वाचल्याचा मेसेज मिळाला. मी बुचकळ्यात पडलो. मी कुठलाच लेख कुणाला पाठवला नव्हता. मग त्यांनी दिलेल्या तपशीलावरून मी त्या वृत्तपत्राचा ई-अंक डाउनलोड केला नि अवाक्‌ झालो. त्यात चक्क माझा हा ‘लेख’ छापला होता. अरुणाताईंच्या फोटोखाली माझे नाव अशी करामतही करून दाखवली आहे. (ती लेखनाची इमोजी किती जणांना समजली असेल?)

KrushivalArticle

हे अर्थातच मला न विचारता, कल्पना न देता छापलेले आहे. वाईट म्हणजे सोबत जोडलेले पुस्तकाचे कव्हर चुकीच्या पुस्तकाचे आहे. मी उल्लेख केलेली लोककथा ही ‘लोक आणि अभिजात’ मधील आहे. शीर्षकही लेखनाच्या हेतूशी सर्वस्वी विसंगत दिले आहे. कहर म्हणजे सोबत अरुणाताईंचा फोटोही छापून दिला आहे. एकुणात आविर्भाव असा की यांनी हा लेख कमिशन केला असावा किंवा मी त्यांना पाठवला असावा. फक्त शेवटी हळूच ‘साभार’चे शेपूट जोडून आपले शेपूट सोडवून घेतले आहे.

काही वर्षांपूर्वी कोकणातीलच एका प्रथितयश दैनिकाच्या दिवाळी अंकात माझ्या ब्लॉगवरचा लेख असाच परस्पर छापलेला मला आढळला होता.

काही दिवसांपूर्वी फेसबुकवरच मी राहुल गांधींच्या फोटोंवर भाष्य करणारी एक पोस्ट लिहिली होती. ती एका प्रसिद्ध नियतकालिकाने उचलून छापून टाकली, ‘व्हायरल’ या साळसूद स्तंभाखाली. एवढेच नव्हे तर त्याच्या संपादकांनी ते पान मला पाठवले. त्यांना बहुधा माझ्याकडून धन्यवाद मिळावेत अशी अपेक्षा असावी. चूक त्यांची नाही, कागदावर नाव दिसले की कृतकृत्य होणारे इतके लोक आसपास असताना तोच प्रघात पडला तर नवल नाही.

परंतु धन्यवाद देणे तर सोडाच, मी उलट नाराजी व्यक्त केल्यावर त्यांनी सारवासारव करत मानधन देण्याची तयारी दर्शवली. माझा मुद्दा त्यांच्या ध्यानातच येत नव्हता, बहुतेक लेखकांनाही येत नाही. मुद्दा मानधनाचा नाही (खरे तर तो ही आहे, पण माझ्यासारख्याच्या बाबत तो फार दुय्यम आहे.) तर लेखकाचे त्या लेखनाचे जनकत्व मानण्याचा आहे. स्वत: संपादक असूनही त्यांना लेखन-स्वामित्वाची जाण नसावी हे मला खटकले होते.

फेसबुक पोस्ट हे बहुतेक वेळा फारसे गंभीर लेखन नसते हे मला मान्य आहे. परंतु कसेही असले तरी एखाद्याने आपली थोडी बुद्धी, माहिती, दृष्टिकोन, विचार, अभ्यास, क्वचित व्यासंगही खर्ची घालून काहीतरी लिहिलेले असते. ते त्याचे अपत्य असते. ते परस्पर उचलून नेताना आपण त्याला मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करत आहोत हे यांच्या गावी नसते.

व्हॉट्स-अ‍ॅप फॉरवर्ड्स म्हणून जाणारे लेखन मी समजू शकतो. तिथे फॉरवर्ड करणार्‍यांचा आर्थिक लाभ नसतो, क्वचित अजेंडा असतो. परंतु जी मंडळी वृत्तपत्र, नियतकालिक हे व्यावसायिक माध्यम चालवतात, त्यावर आर्थिक लाभ घेतात, त्यांनी लेखकांना असे गृहित धरणॆ अजिबात समर्थनीय नाही असे मी मानतो. दुर्दैवाने आपले लेखन कुणीतरी उचलले एवढ्यानेच धन्य होणारे लेखकु वारेमाप वाढल्याने, आपले काही चुकते असे या उचलेगिरी करणार्‍यांना जाणवतच नाही. त्यामुळे हल्ली मला या लेखक म्हणवणार्‍यांच्या लाचारीची चीड येते.

मी फेसबुकवर काही लिहिले तर ती माझी माध्यम-निवड आहे. अन्य माध्यमातून लिहिणे वा न लिहिणे हे ही माझ्याच निर्णयाने व्हायला हवे. तो माझा अधिकार आहे. सुचलेले मुद्दे ललित-निबंधाच्या माध्यमातून मांडावेत, लेखाच्या माध्यमांतून मांडावेत, कवितेच्या माध्यमांतून की कथेच्या हे लेखक ठरवतो तेव्हा त्यामागे काही एक आडाखा असतो. दुसरे माध्यम वा घाट निवडले नाहीत याचाच अर्थ त्यांच्यामार्फत आपले लेखन अपेक्षित ते पोहोचवू शकत नाहीत, किंवा त्याची परिणामकारकता पुरेशी असणार नाही असा त्याचा निर्णय असतो. चित्रकलेच्या क्षेत्रातही अभिव्यक्तीसाठी रंगाचे माध्यम कोणते निवडावे हे चित्रकार निवडत असतो. लहर लागली म्हणून जलरंग, लहर लागली म्हणून तैलरंग वा लहर लागली म्हणून पेस्टल्स असे नसते. त्या त्या माध्यमांतून आपण अधिक नेमके व्यक्त होऊ शकतो असा त्याचा आडाखा असतो.

हेच लेखनाबाबतही खरे आहे. माझ्या स्वत:च्या निर्णयाने मी बरेच लेखन मी फक्त ब्लॉगवर करतो, ते फेसबुकसारख्या समाज-माध्यमांत नेत नाही, पोर्टलसारख्या डिजिटल माध्यमांत नेत नाही की छापायलाही पाठवत नाही. तो माझा निर्णय असतो. त्यात परस्पर बदल करण्याचा अधिकार इतर कुणाला नसतो. मग परस्पर असा माध्यम-बदल करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? एखाद्या विशिष्ट माध्यमांत माझे लेखन नेण्यास माझा साफच विरोध असू शकतो ही शक्यताही आहे. अशा वेळी त्यांनी ते परस्पर छापणे हे सरळसरळ माझ्या नकाराधिकाराचे उल्लंघन आहे.

अनेकदा असे असते की फेसबुक-पोस्ट ही लेखकाच्या मनातील बीजच तेवढे असते. त्यावर आधारित विस्तृत लेखनाचा आराखडा त्याच्या मनात अथवा हातात असू शकतो. फेसबुक-पोस्ट ही मुद्द्याचा थोडक्यात वा मर्यादित विस्तार असलेली असते. मूळ मुद्द्याला अनुलक्षून काही नवा मुद्दा वा दृष्टिकोन कुणाला सापडतो का, किंवा त्या विषयाकडे पाहण्याचे वाचकाचे दृष्टिकोन आणि कोण-कोणते फाटे फोडणे शक्य आहे याचा अदमास घेण्याच्या दृष्टीने केलेली असते. त्यात लेखकाचा पुरा दृष्टिकोन आलेला नसतो. अशा वेळी ती प्रसिद्ध करून मोकळे होणे म्हणजे लेखकाच्या अर्धवट विचारांची जाहिरात करणे ठरू शकते. यातून लेखकाचा दृष्टिकोन उथळ वा अपुरा आहे असा आरोप त्याच्यावर होऊ शकतो.

याशिवाय विविध माध्यमांसाठी लिहिताना घाटाची, मांडणीची, भाषेची, संदर्भ देण्या/न देण्याची, सोबत डेटा/चित्रे/फोटो वगैरेची निवड वेगवेगळी असू शकते. जर तुम्हाला हा मजकूर हवा असेल तर तुमच्या माध्यमासाठी असे काही बदल त्यात आवश्यक असू शकतात. उदाहरणार्थ फेसबुकवर लिहिताना त्याच्या स्तंभस्वरूप मांडणीचा विचार करता लहान परिच्छेद करावे लागतात. तिथे मी तीन ते चार वाक्यांचे परिच्छेद करतो. तेच ब्लॉगवर लिहिताना थोडे मोठे– पण तरीही पुस्तकाच्या तुलनेत लहान परिच्छेद करावे लागतात. तिथे सहा ते आठ वाक्यांचे परिच्छेद करतो. फेसबुकवर लेखनाला अनुरूप इमेजेस जोडण्याचा पर्याय नसतो, कारण तिथे त्या मजकुराच्या खाली जातात आणि वाईट म्हणजे मजकुराहून कैकपट अधिक जागा व्यापतात. त्याने पोस्टचे केंद्रच (focus) बदलून जाते. याउलट ब्लॉगवर मजकूर, इमेज तसंच व्हिडिओ मांडणीचे अधिक स्वातंत्र्य घेता येते. (वेचित चाललो... वर याचा मी पुरेपूर वापर करून घेत असतो.)

ब्लॉग वा अन्य डिजिटल माध्यमांमध्ये मुद्रित माध्यमात उपलब्धच नसलेला व्हिडिओ जोडण्याचा महत्त्वाचा पर्याय उपलब्ध असतो. असा व्हिडिओ लेखकाच्या हेतूशी सुसंगत अशी काही भर वाचक/प्रेक्षकाच्या आकलनात घालत असतो. आता हाच लेख मुद्रित माध्यमात न्यायचा झाला तर तो व्हिडिओ वगळला गेल्याने तुटलेली साखळी शाब्दिक मजकुराची भर घालून सांधून घ्यावी लागते.

याच धर्तीवर मुद्रित माध्यमेच असलेल्या वृत्तपत्र, नियतकालिक आणि पुस्तक यांच्यासाठी मांडणीचा वेगवेगळा विचार करावा लागतो. उचलला मजकूर नि दिला पेस्ट करून असे नसते. तसे केल्याने नव्या माध्यमामध्ये ते लेखन अनुरुपता गमावून बसत असते. संपादक म्हणवणार्‍यांना ही समज नसावी हे अनाकलनीय आहे. त्यापेक्षा संपादकाने लेखकाशी संपर्क केला तर लेखक स्वत: या दृष्टीने विचार करून माध्यमानुरूप मजकूर देऊ शकतो.

एकुणातच छापण्याला अनावश्यक प्रतिष्ठा आहे असे माझे ठाम मत आहे. पण तो मुद्दा फार व्यापक आहे म्हणून सोडून देतो. पण त्याने होते काय की तेथे बसलेल्यांना अकारण एक श्रेष्ठत्वाचा गंड निर्माण होतो. डिजिटल– त्यातही सोशल मीडियात लिहिणारे दुय्यम असतात नि त्यांचे लेखन उचलून आपण त्यांच्यावर उपकारच करत आहोत अशा आविर्भावात ते वागतात असा अनुभव आहे. एका प्रथितयश वृत्तपत्राच्या पुरवणी-संपादकाने ब्लॉग लेखनाची दखल घेण्याची बतावणी करत टोपणनावाने त्यांची टिंगलटवाळी करण्याचा उद्योग केला होता. माझ्यासह अनेक ब्लॉगलेखकांनी त्याला जशास तसे उत्तर दिल्यानंतर तो प्रकार लवकरच गुंडाळला गेला.

जोडीला दोन-चार लेख, एखादे पुस्तक छापून धन्य झालेली मंडळीही ‘ह्यॅ: ब्लॉग काही सीरियस लेखन नाही’ सारख्या पिंका टाकून या महाभागांना बळ पुरवत असतात.

व्हायरल झालेल्या वा सोशल मीडियातून मजकुराची उचल करणे हा म्हणूनच मला कोडगेपणा वाटतो. एकीकडे तुम्ही त्या माध्यमांना नाके मुरडता, ते गंभीर माध्यम नाही म्हणता आणि दुसरीकडे ‘व्हायरल’ या पळवाटेखाली तेथील मजकुराची उचलेगिरीही करता. हा दांभिकपणाही आहे.

या मंडळींना एक चांगली पळवाट कायम उपलब्ध असते. ते म्हणतात, ‘आम्हाला हे व्हॉट्स-अ‍ॅपवरून मिळाले’ किंवा फेसबुक, इन्स्टाग्राम वगैरेवर कुणीतरी शेअर केले होते तेथून मिळते. आम्ही मूळचा कर्ता कोण कसे शोधणार?’ हे व्हिडिओंबाबत काही प्रमाणात समर्थनीय आहे. परंतु लेखनाबाबत मला साफ अमान्य आहे. शब्दाधारितच नव्हे तर इमेज वापरून केलेला गुगल-शोधही अत्यंत कार्यक्षम आहे असा माझा अनुभव आहे. तो मूळ लेखका/कर्त्यापर्यंत सहज पोचवू शकतो. मिळालेले मीम, चित्र वा व्हॉट्स-अ‍ॅप फॉरवर्डचा कर्ता मी अनेकदा शोधून काढला आहे. माझ्या दोनही ब्लॉगवर वापरलेल्या बहुतेक इमेजेसबाबत मी हे आवर्जून करत आलो आहे. हे अजिबात अवघड नाही.

इथे तर वर दिलेल्या दोन उदाहरणामधील एक संपादक हे मला व्यक्तिश: ओळखणारे आहेत, त्यांच्याकडे माझा फोन नं. आहे नि ते फेसबुक मित्रयादीतही आहेत. छापल्यानंतर कौतुकाने फोटो पाठवण्याऐवजी त्याच माध्यमातून आधी संपर्क करून अनुमती घेण्याची गरज त्यांना वाटली नाही. आज संगणकक्रांतीच्या कृपेने शून्य पैशांत फोन करणे शक्य झाले असतानाही मूळ लेखकाची अनुमती घेण्यास एक फोन करण्यास त्रास होतो? फुकटात मजकूर तर मिळतो आहे, निदान लेखकाचा पाच पैसे लायकीचा मान तरी त्याला द्यावा असे का वाटत नसावे?

‘मुद्रित नाम पाहता मम, तेणे धन्य जाहलो गे माये’ म्हणणार्‍या लेखकुंनी आपली पत इतकी खालावली आहे. लेखक हा नगण्य, क्षुद्र, ढेकूण आहे. त्याला आपण उपकृत करत आहोत अशा आविर्भावात वावरणार्‍या या प्रस्थापित माध्यम-ठेकेदारांसमोर घालीन लोटांगण केल्याचे हे परिणाम आहे.

छापण्यासाठी घायकुतीला आलेले लेखक(?) हे वाचूनही सुधारतील अशी सुतराम शक्यता नाही. तरीही...

- oOo-


हे वाचले का?