-
‘गाणार्याला आधी गाणारं एक मन असावं लागतं, तरच गाणं संभवतं’ असं पुलंनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे एखादा काका/आजोबा किंवा मावशी/ताई (मी आजी म्हटलेले नाही, प्लीज नोट) मध्ये आपल्याप्रमाणे मूलपण दिसत असेल, तर बहुधा मुलांना परकाही आपला वाटत असावा.परक्याकडे मूल सहजपणे जाणं हे त्या परक्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलचे एक महत्त्वाचे स्टेटमेंट आहे असे मला वाटते.
त्याबाबत मी सुदैवी आहे. बच्चे कंपनीचे नि माझे छान जमत असे. एखाद्या पिल्लाला ‘चल ये’ म्हटले नि ते माझ्याकडे आले नाही असे क्वचितच घडत असे. बहुधा माझ्यातही त्यांना त्यांचे प्रतिबिंब दिसत असावे. ‘असे’ आता म्हणावे लागते, कारण आता मी बराचसा एकांतवादी झाल्याने मोठ्यांचाच फारसा संपर्क येत नाही, नि त्यामुळे मुलांचाही.
मध्यंतरी काही काळ मी मॉर्निंग वॉकला बाहेर पडे, तेव्हा नेमके एक पिलू आई/मम्मा किंवा बाबा/पप्पा यांच्या खांद्यावर बसून आपल्या दादाला शाळेच्या बसमध्ये बसवून देण्यासाठी आलेले दिसे. जाताजाता मुद्दाम मान तिरकी करुन त्याच्याकडे बघून अभिवादन केले, शिटी वाजवली, की बोळकंभर हसून प्रतिसाद देई. मग आपला दिवस मस्त चालू होई. त्या पिलाचं नाव मला माहित नाही, ती मुलगी आहे की मुलगा हे ही मला माहित नाही.
पण ‘आयुष्य ही एक सतत गुंडाळली जात असलेली चटई असून, तिच्या या कोपर्यापासून त्या कोपर्यापर्यंत पळापळ करत तिला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करणे हेच आपले जीवितकार्य आहे’ हे मी आता नाईलाजाने मान्य केले आहे. त्याला अनुसरून आमचा मॉर्निंग वॉक मध्येच बंद पडला; मग वेळा बदलल्या आणि आमची ‘भेट’ बंद झाली.
आता आमची गाडी पुन्हा रुळावर आली असली, तरी (बहुधा) पिल्लूच्या दादूची शाळा बंद असल्याने आमचा हा मित्र/मैत्रिण आम्हाला भेटत नाही. पण त्याऐवजी दुसरीकडे आजोबांबरोबर ढकलगाडीतून येणारा मित्र भेटला आहे. गाडी पुढे गेली की ‘मी इकडे चाललोय नि हा दादा/ काका/ आजोबा/ पणजोबा/ खापरपणजोबा भलतीकडे का चाललाय?’ असा प्रश्नार्थक भाव घेऊन मागे वळून पाहात असतो.
तुम्ही बळेच एखाद्या मुलाचे गाल वा कान ओढलेत म्हणून मुले तुम्हाला आपले म्हणतीलच असे नाही. त्याच्या चेहर्यावर नापसंती लगेच उमटेल. तुमची तार आधी जुळली, तरच तुमचं हे फालतू लाडात येणं ते पिलू चालवून घेईल. तुमच्यामध्ये मूलपण असेल, नि त्याची लाज वाटत नसेल, तर आयुष्यात एकांगीपणा, द्वेष आदि गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाचा ताबा घेण्याची शक्यता कमी असते.
पण बालमित्र असलेला मी ही आता ‘या बालां’शी दुरूनच बोलतो; याला कारण झाले दोन मित्र(?). फेसबुकवर फोटो लाईक करण्याबद्दल बोलणे चालू असताना, मुलांची माझे पहिल्यापासून गट्टी होत असल्याने मी फक्त त्यांचे फोटो लाईक करतो, कारण ‘मला लहान मुले आवडतात’ असे मी बोलून गेलो. या माझ्या विधानावर ते दोघे ज्या पद्धतीने फिदीफिदी हसले, त्यावरुन त्यांनी काय अर्थ लावला हे माझ्या ध्यानात आले नि मी दचकलो.
आता कुठेही लहान मूल दिसले की माझा हात पुढे होत नाही. कारण त्या मुलामध्ये नि माझ्यामध्ये आता त्या हिडिस हास्याची भिंत उभी राहिली आहे. ‘मुलांचे आई-वडीलही यांच्यासारखाच विचार करतील का?’ या भीतीने मी निमूट त्याच्याकडे दुर्लक्ष करुन पुढे जातो. जिथे तिथे ‘आदिम लैंगिकता’ शोधत स्वत:च्या वखवखीला बंडखोरीचे सर्टिफिकेट मागणारे लोक, इतरांच्या आयुष्यातले छोटे-छोटे निर्भेळ आनंद कसे हिरावून घेतात, याचे हे उत्तम उदाहरण. ही प्रगती असेल, तर मी मागासलेलाच बरा.
या मित्रांकडे पाहाताना असे ध्यानात येते की आता हे अपवाद उरलेले नाहीत. या खंडप्राय देशात बालकांच्या शोषणाच्या, त्यांच्यावरील अत्याचाराच्या बातम्या नित्य वाचायला मिळतात. त्यातून नागर आई-वडील आपल्या मुलांना अपरिचितांशी तर सोडाच, नातेवाईकांशीही फार जवळीक साधू देत नाहीत.
वास्तविक एकुण समाजात अशा विकृतवीरांचे प्रमाण किती असेल? पण परिणामाचा विचार करत तेवढा धोका पत्करण्याची तयारी कुणाची नसते; जे परिस्थितीचा विचार करता वाजवी देखील आहे. विचार करुन पाहा:
तुम्हाला मोदक (वा तुमच्या आवडीचा जो पदार्थ आहे तो गृहित धरा) प्रचंड आवडतात. म्हणून ताट भरून मोदक तुमच्यासमोर ठेवले आहेत नि ‘हवे तेवढे खा, संपले तर आणखी आहेत’ असे खुले आमंत्रण तुम्हाला आहे. अर्थातच तुम्ही त्यावर तुटून पडाल.
आता थोडा बदल आहे. तुम्हाला खारे मंगळवार (बहुधा) हा उपवासाचा प्रकार माहित असेल. यात ताटामध्ये एक मोदक साखरेऐवजी मिठाचे सारण घालून केलेला असतो. मोदक खाता-खाता तो दाताखाली आला की जेवण थांबवायचे; मग तो पहिला असो वा शेवटचा. (Randomization चा कर्मकांडात पाहिलेला हा पहिलाच उपयोग.)
आता आणखी थोडा बदल आहे. खार्या सारणाऐवजी झुरळांना/उंदरांना मारण्याचे औषध सारणात वापरलेला एक मोदक त्यात आहे. आता तुम्हाला आदल्या दिवसापासून कडक उपवासावर ठेवले असले तरी तुम्ही त्या ताटाला स्पर्श करणार नाही. वास्तविक तो मोदक एकच आहे, त्यातील ते विष माणसासाठी प्राणघातकही नाही.
तरीही तुम्ही त्या ‘विषाची परीक्षा’ घेत नाही.
बदलापूर प्रकरणातले असोत की पुण्याच्या नामांकित शाळेतील असोत किंवा - विनोदासाठी का होईना पण - तेच सामान्य वर्तन गृहित धरणारे आमचे मित्र असोत, हे असे विषारी मोदक ताट-भरल्या मोदकांची महती शून्य करुन टाकत असतात. यातून होते असे, की माणसाच्या आयुष्यातील एक साधासुधा आनंद आणि मुलाला लहानपणापासून कुटुंबापलिकडे नाती जोडण्याची संधी नाकारली जाते. त्यातून मूल अधिकाधिक एकारलेल्या प्रवृत्तीचे होते. त्यात नागर जगातील ‘एक कुटुंब, एक मूल’ व्यवस्थेत त्याचा एककल्लीपणाही वाढीस लागतो. पुढे वय वाढल्यावर त्याला एखाद्या संघटनेची टोळी सापडली, तर नेमक्या नको त्या सामाजिक धारेला लागून नकारात्मक, दूषित असे प्रवाहपतित आयुष्य जगू लागते.
दुसरीकडे याचा परिणाम असा होतो की मोठ्यांच्या पदरी हा निरागस आनंद पडायचा, तर व्यक्तीला स्वत:चे मूल जन्माला घालावे लागते. ते ही पहिली दोन-तीन वर्षे झाली की सुटे होते. मग पुढची वाट पाहायची ती नातवंडांची. मधल्या काळात माणूस इतर विखारी आनंदांच्या(?) आहारी केव्हा जातो समजतही नाही. आणि त्याची पडछाया मुलांसोबतच्या नात्यांवरही पडत जाते.
एक स्त्रीवादी भूमिका अशी, की मला माझे मूल हवे असेल तर त्यासाठी- कदाचित- माझे आयुष्य त्रासदायक करणारा नवरा नावाचा प्राणी मी का गळ्यात बांधून घेऊ? मला ज्याची आवश्यकता वा आस नाही, अशा नवरा-बायकोच्या नात्याची अनावश्यक जबाबदारी मी का स्वीकारु? सुश्मिता सेनसारख्या स्त्रिया जोडीदाराची निवड होईतो आपले वात्सल्य थांबवून न ठेवता दत्तक घेण्याचा मार्ग स्वीकारतात. पण हे अपवाद. इतर सर्व स्त्री-पुरुषांना वात्सल्यपूर्तीसाठी जैविक मूल जन्माला घालणे हाच समाजमान्य मार्ग वाटतो.
काही वेळा निरागसतेची ही आसक्ती अभिव्यक्त होताना तिची वाट चुकते. स्त्री-पुरुष संबंधांचे जे होते, तेच काही वेळा इथेही होत असावे. ज्या नात्यात मोकळेपणा नसतो, तिथे संधी मिळेल तेव्हा ओरबाडण्याची प्रवृत्ती बळावते. विविध प्रकारच्या नात्यांची अभिव्यक्ती वेग-वेगळ्या प्रकारे व्हावी लागते ही मानवी समज गाडली जाऊन, जनावरांची मोजक्या नि आक्रमक अभिव्यक्तींची प्रेरणा बळावते. त्यातून अत्याचाराच्या प्रसंगांत वाढ होते. निकोप नाती हा आपल्या संस्काराचा भाग उरलेली नाहीत. रांगत्या, धावत्या मुलांसोबत जोडता येतील अशी नातीही त्याला अपवाद नाहीत...
या लेखनासोबत लावण्यासाठी अनुरूप असे फोटो शोधत होतो, तर गुगलने राहुल गांधींचा हा सुरेख फोटो दाखवला. पुढे दंगलग्रस्त मणिपूरमधील तसंच त्यापूर्वीच्या ‘भारत जोडे’ यात्रेदरम्यान मुलांसोबत काढलेले असे काही प्रांजळ (candid) फोटो पाहण्यात आले... ‘त्यांना तो आपलासा वाटतो’ हे पाहून असूयेने ग्रस्त असलेल्या आमच्या मित्रांसारख्याच अनेकांनी, काहींनी त्यांच्या गट-बांधिलकीतून आलेल्या कुसंस्कारी प्रचार-प्रेरणेतून, त्याबद्दल अश्लाघ्य शेरेबाजीही केलेली पाहायला मिळाली.
या फोटोंमधून दिसणारी या माणसाची सहजता मला भावली. अपरिचित मुले ज्याच्याशी सहज हास्यविनोद करु शकतात, एखादी परकी स्त्री संकोचाला दूर करुन ज्याच्या मिठीत सहज विसावू शकते, तिथे माणूसपणाचा आढळ नक्की असतो. द्वेष नि वासनेने खदखदत असलेल्या समाजात हे माणूसपण दुर्मीळ म्हणावे लागेल.
लोकशाहीमध्ये माणसांचा प्रतिनिधी हा माणूस असायला हवा, तो माणसांना आपला वाटायला हवा. एखाद्या दगडाचा देव करुन लोटांगण घालण्याने मानसिक पातळीवर तात्कालिक ताणमुक्ती मिळत असेल, पण त्यातून समस्येचे निराकरण होत नाही. त्यासाठी समस्येला भिडावे लागते. ‘महिनोन् महिने तिच्याकडे दुर्लक्ष करुन ती आपोआप सुटेल’ अशी अपेक्षा करणारे नेतृत्व आणि विलासमग्न राजेशाही यांत फार फरक नसतोच.
देवत्व (त्राता) नि नेतृत्व यात फरक समजून घेण्याची कुवत बहुसंख्येला असत नाही. या दोहोंमध्ये त्यांची नेहमीच गल्लत होत असते. त्राता अथवा देव हा देव्हार्यात असतो आणि नेता तुमच्यासोबत. तुमच्या समस्या, गरजा या देवाला सांगाव्या लागतात, गार्हाणे मांडावे लागते, नवस वा नैवेद्यरूपी लाच द्यावी लागते, ‘तो जे करेल ते भल्यासाठीच’ अशी एकतर्फी श्रद्धा ठेवावी लागते. त्यातूनही आपल्या अपेक्षा/गरजांची पूर्ती झाली नाही, तर ‘आपणच कुठेतरी कमी पडलो’ अशी आत्मश्लाघाही करुन घ्यावी लागते आणि त्याचे देवत्व आपणच अक्षुण्ण ठेवावे लागते.
नेता तुमच्यासोबत असायला हवा, तुमच्या गरजांची, वेदनांची विचारपूस त्याने स्वत: करायला हवी. त्याच्या परिमार्जनाची उपाययोजना हे त्याने आपले कर्तव्य मानायला हवे. मुला-बाळांचा, स्त्रियांचा नेत्यावर विश्वास असेल, तर त्याचे नेतृत्व जनतेमध्ये रुजले म्हणता येईल. त्याच्या कार्याच्या मूल्यमापनाची मुभा त्याचे नेतृत्व मान्य करणार्यांना असायला हवी. त्याच्या अपयशाबद्दल त्याला जाब विचारण्याचा हक्कही त्यांना असायला हवा. ‘मी करतो ते सारेच योग्य आहे, तुमच्या हिताचे आहे, असे मानून जगायला शिका’ हा उद्दामपणा नेत्याची नव्हे, तर राजाची, हुकूमशहाची प्रवृत्ती आहे.
सैनिक, सेनापतींच्या त्यागावर (आणि शत्रूपक्षांतील अनेक घरभेद्यांच्या बळावर) नेतृत्व सिद्ध करणार्यापेक्षा सैनिकांसोबत उभे राहणारा, लढणारा अधिक लायक नेता असतो. त्यात नेत्याला पराभवाची, घावांची भीती असते. पण त्यांसकट त्याचे नेतृत्व उभे राहायला हवे. पुढचे यश इतर अनेक घटकांवर अवलंबून असते. त्याचा कस पुढे लागतोच.
पुलंच्या ‘सुंदर मी होणार’मध्ये एक प्रसंग आहे. देश स्वतंत्र झाला आहे. सर्व लहानमोठी संस्थाने विलीन झाली आहेत. संस्थानिक ‘लोकशाही प्रक्रियेने निवडून आलेला नंदनवाडीचा प्रतिनिधी कोण तर एका सामान्य मोतद्दाराचा मुलगा’ असं अत्यंत उद्वेगाने सांगतो आहे. त्यावर व्हीलचेअरवर खिळून असलेली त्याची मुलगी कल्पनेनेच त्या निवडून आलेल्या नेत्याच्या विजयी मिरवणुकीचे, त्याच्या झालेल्या कौतुकाचे वर्णन करते.त्याचे वास्तवाशी असलेले कमालीचे साधर्म्य पाहून वडील अचंबित होतात. ते विचारतात, ‘हे तुला कसं दिसलं? तू कधी गेली होतीस वाड्याबाहेर?’ त्यावर कधी नव्हे ते ती थोड्या तीव्र स्वरात उत्तर देते, ‘वाड्याबाहेर कशाला जायला हवं? स्वतंत्र नंदनवाडीचा पहिला प्रतिनिधी, त्याचं कौतुक होणार नाही तर काय गावाबाहेर महारोग्यासारखं राहिलेल्या महाराजांचं आणि राजपुत्र-राजकन्यांचं?’ (१)
गावाबाहेर घर बांधून राहिलेल्या महाराजाच्या पोशाखी अहंकाराशी तुलना करता, राहुल गांधीच्या या फोटोंमधून त्यांची लोकांप्रती सहज दिसून येणारी बांधिलकी पाहून मला तो नेता म्हणून अधिक भावतो आहे. अर्थात अज्ञ-सुज्ञ सार्यांना एकाच तराजूत तोलणार्या लोकशाहीमध्ये त्याचे नेतृत्व प्रस्थापित होईल न होईल— त्याला इतर अनेक अन्य पैलू तसेच अनुषंगे असतात— प्रस्थापित झालेच तर नेता म्हणून त्यांची कामगिरी कशी होईल, याबद्दल पोपट-भाकिते मी करत बसत नाही. त्याच्यातला हा माणूस मला भावला आहे आणि तेवढ्यापुरता तरी त्याला कुर्निसात करताना मी हात आखडता घेणार नाही.
- oOo -
(१).‘महारोग्यासारखं’ या उपमेमध्ये थोडी गफलत आहे. महारोग्यांना समाजाने नाकारलेले असते, तर इथे उलट संस्थानिक इतर समाजाला महारोग्यांसारखे दूर ठेवतात. [↑]
Vechit Marquee
‘वेचित चाललो...’ वर :   
उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी      
शुक्रवार, २३ मे, २०२५
सुजन गवसला जो
संबंधित लेखन
अनुभव
नेता
बालके
भाष्य
समाज
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा