-
क्रिकेटमध्ये पंच हा प्राणी तेवढाच लोकप्रिय आहे जेवढे निवडणूक प्रक्रियेमध्ये ईव्हीएम !
प्रातिनिधिक स्थिरचित्र. https://www.sportskeeda.com/ येथून साभार.आपण जिंकलो, तर ‘पंचाची कामगिरी नि:पक्ष होती’ असा गौरव करायचा किंवा ‘ते ही शेवटी माणूसच आहेत’ अशी मखलाशी करायची. जर हरलो, तर त्यांचा वापर हुकमी बळी म्हणून खापर फोडण्यास (म्हणजे हिंदुत्ववाद्यांसाठी मुस्लिम, पुरोगाम्यांसाठी मध्यमवर्ग वगैरे वगैरे) त्यांचा वापर करायचा हे ठरलेले असते.
त्यातच DRS म्हणजे Digital Review System (त्यालाही मागास भारतीय मानसिकतेच्या बीसीसीआयने बराच काळ ‘बिनचूक नाही’ या बिनडोक तर्कास पुढे करुन रोखून धरले होते.) आल्यापासून पंच हे अधिकच दडपणाखाली काम करु लागले आहेत.
त्यांना एखादा निर्णय मिलिसेकंदात घ्यायचा असतो, तर एसी केबिनमध्ये बसून डीआरएसचा निर्णय देणारा तिसरा पंच विविध कोनातून मिळणारे चित्रण, स्टंप माईक, रीअल टाईम सिन्क्रनायजेशन, अल्ट्रा-एज वगैरे संगणकीय तांत्रिक करामतींच्या साहाय्याने आरामात निर्णय घेत असतो. (तिथे बिचार्या राष्ट्रपती नि राज्यपालाला घालून दिली तरी कालमर्यादा घालून देणारे कुठले सुप्रीम कोर्टही नसते.)
त्यामुळे मैदानावरील पंचाचा निर्णय तंत्राने फिरवणे हे अधून मधून घडत असते. खरंतर यात ‘माथा आळ लागे’ असं काही नसतं. त्यांच्या चुकलेल्या निर्णयांचं प्रमाण – माझ्यासारख्या संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्याच्या मते– एकुण निर्णय-संख्येशी तुलना करता नगण्यच असते. पण आपापल्या घरात टीव्हीसमोर बसून आपल्या अकलेच्या पातळीशी सर्वस्वी विसंगत असे उद्दाम निवाडे देणारे प्रेक्षक त्याबद्दल त्यांच्या नावे खडे फोडत असतात.
कसोटीकडून क्रिकेटची गाडी झटपट क्रिकेटच्या हायवेवर शिरली आणि पंचांचे काम अधिक जिकीरीचे होऊ लागले. कारण हे झटपट क्रिकेट ‘आम्हाला काय बुवा, सस्त्यात मजा पाहिजे’(१) म्हणणार्या प्रेक्षकांसाठी रोमांचक करणारे नियम येऊ लागले.
लेग स्टंपच्या गुंजभर जरी बाहेर टप्पा पडला तरी वाईड देणे, खांद्यावरुन जाणारा जास्तीत जास्त एक बाउन्सरच चालवून घेणे, कंबरेच्या वरून जाणारा बिनटप्पी ( फुलटॉस) चेंडू नो-बॉल ठरवणे, ३० यार्डांच्या वर्तुळात वेगवेगळ्या टप्प्यात क्षेत्ररक्षकांची वेगवेगळी संख्या राखणे, ठराविक वेळेत षटके पुरे करणे... असे अनेक नवनवे नियम समाविष्ट होत गेले.
या सार्यांचे भान राखून पंच म्हणून काम करणे किती जिकीरीचे असेल? त्यामुळे या पंचांबद्दल मला खेळाडूंपेक्षा अधिक सहानुभूती आहे.
आज याची आठवण झाली कारण आयपीएलमध्ये पाहिलेला एक प्रसंग.
प्रातिनिधिक स्थिरचित्र.लखनौ विरुद्ध गुजरात या सामन्यात गुजरातच्या कागिसो रबाडाने एक चेंडू फुलटॉस टाकला. लखनौच्या मार्करमने तो तडकावण्याचा प्रयत्न केला, पण तो चकला. चेंडू साधारणपणे त्याचे कोपर नि खांदे यांच्या मध्याजवळून गेला. कंबरेपेक्षा हा बराच वरुन गेला असे दिसत होते. परंतु पंचांनी तरीही नो-बॉल दिला नाही.
फलंदाजी करणारे दोघे तर आश्चर्यचकित झालेच, पण धावतं समालोचन करणारेहि बुचकळ्यात पडले. अखेर फलंदाजांनी तिसर्या पंचांकडे दाद मागितली. आता डीआरसचा प्रवेश झाला.
तिसर्या पंचांना प्रथम स्लो-मोशन रिप्ले दाखवण्यात आला. त्यात आधी पाहिल्याप्रमाणे चेंडू कंबर ते खांदा यांच्या साधारण मध्यावरुन जाताना दिसला. आता नो-बॉल दिला जाणार नि मैदानावरील पंच खोटे ठरणार हे बहुतेकांच्या मनात ठरुन गेले. पण... एक टप्पा बाकी होता.
नियम असा आहे की “फलंदाज ‘संपूर्ण उभा असलेल्या स्थितीमध्ये’ त्याच्या कंबरेची जी उंची असेल, तिच्या वरुन चेंडू फुलटॉस जायला हवा.”
हे समजण्याजोगे आहे, कारण एखादा खेळाडू स्वीप अथवा पुल सारखे डावीकडे मारले जाणारे फटके मारताना अनेकदा खाली बसून वा बरेच खाली झुकून खेळतो. आता चेंडू फुलटॉस येतोसा दिसले, की सोपा उपाय म्हणजे फलंदाज खाली बसेल नि नो-बॉल ठरवून घेईल. फायदा हा, की त्यानंतरचा चेंडू ही फ्रि-हिट असते, त्यावर फलंदाज बाद होऊ शकत नाही (अपवाद धावबाद होण्याचा). त्यामुळे असा ‘फिक्स्ड रेफरन्स’ आवश्यक ठरला.
आज घेतेल्या रिव्ह्यूमध्ये असे दिसले, की पूर्ण उभ्या खेळाडूची जमिनीपासून कंबरेपर्यंत उंची १.१३ मीटर्स होती तर चेंडू १.११ मीटर्स उंचीवरुन त्याच्या शेजारुन गेला होता. मैदानावरील पंच अचूक ठरले होते. चेंडू नो-बॉल नव्हता.
प्रत्येक खेळाडूची उंची सारखी नसते हे उघड आहे. तेव्हा हा अदमास सध्या समोर खेळणार्या खेळाडूच्या उंचीनुसार घ्यायचा आहे. वाईडसारखा एका निश्चित रुंदीनुसार (आणि आखलेल्या निळ्या पट्ट्याचा संदर्भ घेऊन) नव्हे. हे ध्यानात घेता जेमतेम दोन से.मी.चा फरक केवळ नजरेने अदमास घेऊन आकलन करणार्या त्या पंचाबद्दल मला प्रचंड आदर वाटला.
पण हे झाले कसे? कंबर ते खांदा यांच्या मधून जाणारा चेंडू स्थिर मोजमापात कंबरेखालून कसा गेला?
आता स्लो-मोशन रिप्ले पुन्हा पाहता असे दिसले की खेळाडू बॅट फिरवत असताना गुडघ्यात किंचित वाकला होता, तसंच मागेही झुकला होता. या दोन बदलांमुळे जमिनीपासूनचे कंबरेचे अंतर कमी झाले होते. हे दोनही बदल ध्यानात घेतल्याखेरीज पंचांना चेंडूची उंची मर्यादेत होती असा निवाडा करणे शक्य नव्हते.
पूर्ण वेगाने चेंडू गेला तेवढ्या वेळात हे तपशील खुद्द पंच वगळता इतरांना जाणवलेही नव्हते, चेंडू उघड नो-बॉल आहे असे सर्वांनीच गृहित धरले होते.
चेंडू टाकणारा गोलंदाज अंदाजे १२५-१३५ कि.मी. प्रति तास या वेगाने गोलंदाजी करत होता हे ध्यानात घेता खेळपट्टीचे सुमारे वीस मीटर्स पार करायला त्याला जेमतेम अर्धा सेकंदाचा वेळ मिळत असतो(२). एवढ्या वेळात हे सारे तपशील टिपून त्याला अनुसरून असा बिनचूक निर्णय घेतल्याबद्दल पंच के. एन. अनंतपद्मनाभन यांना कडक सॅल्यूट करुन टाकला.
- oOo -
टीपा:
(१). मध्यमवर्गभूषण, स्वयंघोषितश्रेष्ठनवसाहित्यनिषूदन पुल्देसपांडेंच्या ‘वार्यावरची वरात’ मधील तपकिरीच्या विक्रेत्याचे उद्गार. [↑]
(२). या वेळेचाही काही भाग पूर्वी गोलंदाजाच्या पायाकडे लक्ष देण्यात खर्च करुन, गुड-ओल्ड क्रीझ नो-बॉलचा निवाडा करुन मग समोर पाहावे लागे. आता हा निवाडा थेट तिसर्या पंचाकडे दॆऊन टाकल्याने तो वेळ वाचतो. [↑]
Vechit Marquee
‘वेचित चाललो...’ वर :   
उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी      
गुरुवार, २२ मे, २०२५
क्रिकेटमधील उपेक्षितास दाद
संबंधित लेखन
क्रिकेट
प्रासंगिक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा