Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

रविवार, १८ मे, २०२५

बाबेलचा दुसरा मनोरा

  • फार फार... फार्फारच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा वर्षाला वर्षही म्हणत नसावेत. तेव्हाची भाषाच वेगळी होती. पृथ्वीवर मोजकीच मनुष्यजात वावरत होती. सारे गुण्यागोविंदाने राहात होते, एकच भाषा बोलत होते. ही जमात अर्थातच भूस्थिर, नागर नव्हती. अन्नापाठी फिरत फिरत ते आजच्या इराकमधील भूभागात पोहोचले. खाणं, जुगणं नि क्वचित यांच्यासाठी लढणं या पलिकडचा विचार करणार्‍या त्यांच्यातील काही सुज्ञांनी नुकताच विटेची यशस्वी चाचणी घेतली होती. तिचा वापर करुन आपण पक्क्या गुहा बांधू शकतो असा त्यांचा दावा होता.

    BabelTower
    The Tower of Babel.

    पण त्यांचा नेता महत्त्वाकांक्षी होता. त्याला केवळ घर बांधायची नव्हती, त्याला महासत्तेची द्वाही फिरवायची होती. त्याने केवळ जमिनीवरची नव्हे तर एकावर एक अशी चळत स्वरूपात घरे बांधून एक मनोरासदृश शहरच बांधून काढण्याची योजना आखली. हा मनोरा थेट देवलोकापर्यंत चढवत नेऊन त्यांनाही आव्हान देण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली.

    एक भाषा बोलणारे, एकदिलाने राहणारे असल्याने सारा समाज त्याच्या पाठीशी उभा राहिला. परस्पर सहकार्याने हे काम वेगाने होऊ लागले. देवलोकात याहवेह या देवाचे धाबे दणाणले. हे असेच चालू राहिले तर आपल्या खुर्चीलाच आव्हान मिळेल असे त्याच्या ध्यानात आले. थोडा विचार केल्यावर ‘त्यांची एकी भेदली तर आपण सुरक्षित राहू शकतो’ हे त्याने ताडले.

    मग त्याने त्यांच्या भाषा भिन्न केल्या, जेणेकरुन एकाचे म्हणणे दुसर्‍याला समजणे अवघड, दुरापास्त होऊ लागले. त्यांच्यात विसंवाद निर्माण झाला. त्या विसंवादातून संघर्ष निर्माण झाले. त्या संघर्षांमुळे हाती घेतलेल्या त्या कामामध्ये वारंवार खीळ बसू लागली. अखेर त्या संघर्षांची तीव्रता इतकी वाढली की ते काम बंद होऊन माणसांचा समाज विसंवाद नि संघर्ष यांतच गतिरुद्ध होऊन राहिला.

    समाज दुभंगत गेला, त्याचे अनेक तुकडे झाले. प्रत्येक तुकड्याची दुसर्‍या तुकड्याशी भू-स्वामित्वाच्या अधिकारासाठी युद्धे होऊ लागली. पृथ्वीवर अखंड पसरलेल्या जमिनीवर काल्पनिक रेषा ओढून माणसांचे समाज तुकड्या तुकड्यांत विभागले गेले. माणसांच्या लहान लहान समाजांची राज्ये, धर्म, देश वगैरे तुकडे परस्परांशी सतत संघर्षरत राहू लागले. याहवेह निश्चिंत होऊन गेला.

    बायबलमधील या अपुर्‍या राहून गेलेल्या मनोर्‍याला, शहराला पुढे नागर मानवाच्या भाषेत ‘बाबेलचा मनोरा’ म्हटले जाऊ लागले.


    काही हजार वर्षे गेली...

    या समाजातही काही माणसे पुन्हा शहाणी होऊ लागली. देशांना विभागणार्‍या रेघा काल्पनिक आहेत, दोन्हींकडे हातापायांची प्रत्येकी एक जोडी नि मेंदू असलेले एक मस्तक असणारी माणसेच राहातात, त्यांच्या भाषा वेगळ्या असल्या तरी संवाद होऊ शकतो, असे त्यांच्या ध्यानात आले. परस्पर-सहकार्याचा पहिला टप्पा व्यापाराने सुरु झाला असला तरी जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था यांचा अंगीकार करत माणसांची आर्थिक घोडदौड सुरु झाली. ‘जे माझ्याकडे नाही, ते तुझ्याकडून येऊ दे; जे तुझ्याकडे नाही, ते माझ्याकडून घेऊन जा’ म्हणत देशांच्या सीमारेषा पुसट केल्या जाऊ लागल्या. खाणं, जुगण्याच्या मूलभूत गरजा भागवणे सहज शक्य झाले नि माणसाला बुद्धीचा वापर करण्यास उसंत मिळू लागली.

    हजारो वर्षांपूर्वीच्या त्या रचनात्मक विचार करणार्‍या पूर्वजांना स्मरून काही सुज्ञांनी विटेप्रमाणेच ‘इंटरनेट’चा शोध लावला. माहितीच्या प्रवासाला आता देशांच्या सीमांचे बंधन उरले नाही. त्या सीमांचे अस्तित्व केवळ राजकीय पातळीवरच शिल्लक राहिले. या इंटरनेटच्या आधारे परस्पर-सहकार्याने मोठे मनोरे उभे करता येऊ शकतील, याची चाणाक्ष माणसांना जाणीव झाली. त्यांचे त्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले.

    हे सारे पाहाता सर्वधर्मीय देवांचे धाबे दणाणले. माणसे असे सहकार्याने जगू लागली, त्यांचे हितसंबंध परस्परांमध्ये इतके गुंतले, की संघर्ष करणे परवडेनासे झाले; उलट सहकार्याचे नवनवे मनोरे उभे राहू लागले, तर आपल्या सर्वांचे स्थान धोक्यात येणार हे त्यांच्या ध्यानात आले. आपले स्थान धोक्यात येणार म्हणजे पृथ्वीवरील आपल्या हस्तकांचेही, हे ध्यानात आल्यावर त्यांनी त्या हस्तकांना धोक्याची जाणीव करुन दिली. हे हस्तक जोमाने फूट पाडण्याच्या कामाला लागले.

    दुसरीकडे देवांनी देशोदेशी उथळ नेत्यांना सत्ताधारी केले, त्यांच्यामध्ये सम्राटपदाची लालसा उत्पन्न केली. ‘माय डॅडी स्ट्रॉन्गेस्ट’ ही बालक-मनोवृत्ती वाढल्या वयाच्या सर्वसामान्यांमध्ये रुजवली. यातून मनुष्यसमाजांत अस्मिता नि असूया या दोन्हींचा प्रादुर्भाव होईल, परिणामत: देशांदेशांत तसंच समाजा-समाजांत संघर्ष उभे राहतील नि मानवातील होऊ घातलेली एकी विरुन जाईल असा त्यांचा होरा होता.

    पण तेवढे पुरेसे ठरेना. मानवी सहकार्याचा वारू काही थांबेना. अखेर सर्वधर्मीय देवांनीही आपसातले वर्चस्व-संघर्ष तात्पुरते बाजूला ठेवून सहकार्याची गरज मान्य केली. दंगलीनंतर सर्वधर्मीय बैठक बोलावून शांतता कमिटी निर्माण केली जाते त्या धर्तीवर सर्वधर्मीय देवांची एक समिती नेमून सद्य परिस्थितीवर उपाय शोधण्याची विनंती करण्यात आली. या समितीने पृथ्वीवर काही महिने व्यतीत केले नि परत येऊन आपली श्वेतपत्रिका सर्वधर्मीय देव-संसदेसमोर सादर केली.

    त्यात असे म्हटले होते की ‘गरजांची सुलभ-पूर्ती, त्यातून आलेला सुखवस्तूपणा यामुळे मनुष्यजात शिथिल झाली आहे. संघर्ष करण्यास त्याच्याकडे सबळ कारण उरलेले नाही. त्याच्यातील प्राणितत्त्व त्याच्याशी निगडित हिंसेचे विरेचन होण्यास वाट उरलेली नाही. तिला वाट करुन दिल्यास मानवाची सौहार्दाची, सहकार्याची कंड जिरेल नि तो पुन्हा संघर्षाच्या वाटे चालू लागेल.’

    सर्वधर्मीय देव-संसदेमध्ये उपायांवर बरेच मंथन झाले. अखेर एका उपायावर सहमती झाली, त्याला ‘ऑपरेशन बाबेल’ असे नाव देण्यात आले. देवांनी इंटरनेट वापरकर्त्या मेंदूंना प्रेरणा देऊन आपली योजना कार्यान्वित करवली...

    ...‘सोशल मीडिया’ची निर्मिती झाली आणि देव निर्धास्त झाले.

    - oOo -

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: