मंगळवार, १६ जुलै, २०१९

सुरेख सामन्याचे विध्वंसक कवित्व

क्रिकेटचा अंतिम सामना पार पडला आणि त्याचे कवित्व अजून चालू आहे. क्रिकेट जणू जबरदस्तीने यांच्या खिशातून पैसे काढून नेते अशा आविर्भावात आणि सरकार क्रिकेटला पैसे देत या अडाणी समजात बुडलेले ’गावंढे’ असोत की क्रिकेटचे अट्टल फॅन असोत, चर्चा थांबवायचे नाव घेत नाहीत.

BenDives

मग ते धर्मसेना कसा चुकला, टोफेल म्हणतात तसे सहा ऐवजी पाच धावा दिल्या असत्या तर काय झाले असते, स्टोक्सने चेंडू ढकलून चीटिंग केले का? सर्वाधिक बिचारा कोण, केन की बेन? इतर खेळाडू शँपेन उधळत असताना आपली बाटली घेऊन हळूच सटकलेल्या जोफ्रा आर्चरने ती एकट्याने गट्टम केली की कुणाला प्रेजेंट दिली? इऑन (की ऑयन) मॉर्गनने ’अल्ला आमच्या बाजूला होता’ म्हटले म्हणून त्याला इथे बसून देशद्रोही ठरवता येईल का? चौकारांच्या संख्येऐवजी षटकारांची, बळींची, वाचवलेल्या धावांची, सोडलेल्या झेलांची संख्या किंवा हेल्मेटशिवाय बॅटिंग केलेला किंवा राखीव खेळाडू मैदानावर असलेला वेळ ... यापैकी कोणते पर्यायी निकष वापरावेत यावर गल्लीतल्या गण्यापासून दिल्लीतल्या काण्यापर्यंत सारे बोल बोल बोलत आहेत.

इतका थरारक सामना झाला, त्यातील टर्निंग पॉईंट्स, खेळाडूंची कामगिरी, विशेषत: थकून आडवा पडायच्या बेतात असलेल्या स्टोक्सने सुपर ओवर मध्ये जिवाच्या आकांताने पळून पुरी केलेली तिसरी धाव, एका दिशेने झुकलेला असताना एखाद्या गोलंदाजाने बळी मिळवून किंवा फलंदाजाने षटकार मारून आपल्या बाजूला पारडे झुकवताना दाखवलेले कौशल्य वा जिद्द... दुर्दैव हे की याबद्दल फारसे कुणी लिहिलेले दिसत नाही.

ताजमहालामध्ये केलेल्या छिद्राचे कौतुक सांगणारी जमात आपली; प्रथितयश कलाकाराच्या कलेपेक्षा त्याचे व्यसन, किंवा प्रथितयश नटीच्या अभिनयापेक्षा तिचे वैयक्तिक - विशेषत: लैंगिक - जीवन किंवा प्रसिद्ध गायिकेच्या गायिकेपेक्षा कोणत्या गाण्यात तिचा उर्दू किंवा संस्कृत उच्चार कसा चुकलाय हे ती भाषा स्वत:ला अजिबात येत नसता ठामपणॆ सांगणारे आपण. एकतर चारित्र्यहननादि नकारात्मक बाबी किंवा फुटकळ, सुमार विनोदांना चघळत आयुष्य ढकलत नेणारे. पुलंच्या 'वार्‍यावरची वरात’ मधला तपकिरीचा विक्रेता म्हणतो तसे ’आम्हाला काय, सस्त्यात मजा पाहिजे.’ म्हणत जगणारे...

एका सुरेख अनुभवाची माती कशी करावी याचे क्लासेस फेसबुकच्या भिंती-भिंतीवर मोफत चालू असतात याची जाणीव पुन्हा एकवार ठळक झाली.

- oOo -

संबंधित लेखन:

क्रिकेट हा पक्षपाती खेळ आहे काय?
डकवर्थ-लुईस नियमावली आणि वृत्त-माध्यमे
बा कपिल देवा
क्रिकेट आणि टीकाकार


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा