'ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये' अशी आपल्याकडे एक म्हण आहे. तरीही माणसं आपला इतिहास धुंडाळतात, हजारो वर्षांपूर्वीच्या कुण्या श्रेष्ठ व्यक्तीशी आपले नाते जोडून त्याला आपल्या वर्तमानातल्या अस्तित्वाचा आधार बनवू पाहतात. अनेक वर्षांच्या परंपरा असलेला समाज यात आपल्या अस्मितांची स्थानेही शोधत असतो. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तीन 'बिब्लिकल' धर्मांचे आणि त्यांच्या असंख्य पंथोपपंथांचे श्रद्धास्थान असलेल्या 'जेरुसलेम' नगरीला या सार्या परंपरांमधे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
एकाच नगरीचे अस्तित्व आणि महत्त्व इतका दीर्घकाळ टिकून राहिल्याचे दुसरे उदाहरण इतिहासात नाही. त्यामुळे जेरुसलेमचा इतिहास हा श्रद्धाळूंच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा तितकाच अभ्यासकांच्या दृष्टीनेही. पण जिथे श्रद्धांचा प्रश्न असतो तिथे त्या अभ्यासात वस्तुनिष्ठता येणे बव्हंशी अवघड दिसते. त्यातच जिथे संघर्ष असतो तिथे परस्परविरोधी दावे असतात अशा परिस्थितीत अभ्यासकाचे कार्य अतिशय अवघड होऊन बसते. जेरुसलेम ही नगरी तीन धर्मांचे नि अनेक पंथांचे श्रद्धास्थान असल्याने आणि त्यावरील वर्चस्वासाठी असंख्य लढाया झाल्या, अगणित माणसांचे बळी गेले, साधनसंपत्तीचा प्रचंड प्रमाणावर विध्वंस झाल्याने दुसर्या बाजूने तो संवेदनशीलही होऊन बसतो.
'जेरुसलेम: एक चरित्रकथा' ही साम्राज्यांची, सम्राटांची, राजांची त्यांच्या वंशावळीची जंत्री नाही, तो जेरुसलेम या नगरीचा शोध आहे. सुमारे दोन हजार वर्षांचा हा इतिहास सायमन माँटफिअरी याने कालानुक्रमे मांडला आहे. याचा परिणाम म्हणून काही व्यक्ती, राज्यांचे, सत्तास्थानांचे (उदा. रोममधील पोपची गादी) उल्लेख अचानक उगवल्यासारखे दिसतात पण ते जेव्हा जेरुसलेमशी संबंधित होतात तेव्हाच येतात आणि संदर्भासाठी त्यांची पार्श्वभूमी माफक तळटीपांच्या स्वरूपात येते. सायमनने आपला हा दृष्टीकोन संपूर्ण पुस्तकात काटेकोरपणे जपला आहे.
जेरुसलेम नगरीचा इतिहास हा प्रथम बायबलमधे ग्रथित केलेला आहे. त्यामुळे तिच्या अभ्यासात बायबल हा एक आधार म्हणून वापरले जाणे अपरिहार्य आहे. पण बायबल ज्यातून सिद्ध झाले असे सुरुवातीचे ग्रंथ ढोबळपणे दोन गटांनी लिहिले असे मानले जाते. पहिले 'एल' या कननाईट देवाचे उपासक होते तर दुसरा गट हा याहवेह (यहोवा) या इस्रायली देवाचा उपासक. या दोन गटांनी सांगितलेल्या कहाण्यांमधे अनेक बाबतीत तपशीलात फरक पडत होते. त्यात येणारे विसंगत तपशील, कालानुरूप होत गेलेले - हेतुतः वा अनवधानाने केलेले - बदल यामुळे अभ्यासकाने बायबल सर्वस्वी विश्वासार्ह इतिहास सांगते असे मानून चालत नाही. जेरुसलेमच्या इतिहासाचा वेध घेताना बायबलची चिकित्सा नि अभ्यास अपरिहार्य ठरतो.
जेरुसलेम आपल्याला ठाऊक झाले ते इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षात कळीचा मुद्दा झाले तेव्हा. या नगरीला साडेतीन हजार वर्षांचा ज्ञात इतिहास आहे. ही नगरी कोणत्याची साम्राज्याची राजधानी कधीच नव्हती. किंबहुना जेरुसलेमचे राज्य हे कधी ईजिप्तचे फॅरो, असीरियन राजे, बॅबिलोनियन सम्राट, रोमन, बायझंटाईन सम्राट, पर्शियन, ऑटोमन, माम्लुक, कैरोचे शिया खलिफा, मक्केचे सुनी खलिफा, इस्माईली, सूफी राजे यांच्या अधिपत्याखाली होते. या पलिकडे यावर आर्मेनियन, जॉर्जियन, मंगोल, तार्तार, सीरियन, सुदानी वंशाच्या राजांचे राज्यही अल्पकाळ होते. क्रूसेडच्या काळात इंग्लिश, नॉर्मन, फ्रेंच, स्पॅनिश या उत्तर युरोपियन वंशाच्या लोकांनीही इथे काही काळ सत्ता राबवली. शासन बदलताना बहुतेक वेळा जेरुसलेम उध्वस्त झाले, मोडले, रसातळाला गेले, पुन्हा उभे राहिले, नव्या विध्वंसाला सामोरे गेले. अगणित माणसांची आणि घोड्यांची थडगी या भूमीने वागवली, उध्वस्त होताना पाहिली, स्त्रियांवर अत्याचार होताना पाहिले. भावाने भावाला, आईने मुलीला, बापाने मुलाला दगा देताना पाहिले. जनावरालाही कधी दिली गेली नसेल अशी वागणूक माणसाने माणसाला दिलेली अनुभवली... आणि हे सारे कशासाठी तर माझा 'शांततेचा धर्म खरा की तुझा' या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. हा वर वरचा निस्वार्थ हेतू खरवडून काढला तर प्रत्येक शासकाच्या, प्रेषिताच्या मनात दिसते ती सत्ताकांक्षा. बहुसंख्या निर्माण करणे किंवा सत्ता हाती घेऊन तिच्या बळानेच कोण खरे कोण खोटे हे ठरवण्याचा मापदंड जेरुसलेमच्या भूमीत हजारो मैल खोलवर रुतून बसलेला दिसतो.
पण निव्वळ या राजकीय आणि हिंसक इतिहासापलिकडे ज्या तीन धर्मांचे श्रद्धास्थान म्हणून या नगरीकडे पाहताना इतिहासाची मांडणी त्या अंगानेही व्हायला हवी. पण कालानुक्रमे इतिहास मांडताना यातील बरेचसे तपशील दुर्लक्षिले जाण्याची शक्यता असते. मूळचे सॉलोमनचे मंदिर, होली सेपलकार चर्च, मागाहुन आलेल्या मुस्लिमांची अल्-अक्सा मशीद यांचा इतिहासही या निमित्ताने सायमनने बर्याच तपशीलाने मांडला आहे. परंतु राजकीय इतिहासाच्या तपशीलांमधे तो कसाबसा अंग चोरून उभा आहे असे भासते. त्यातही त्यांची उभारणी, विध्वंस आणि फेरउभारणी या चक्रातून जाणे हे एकुण नगरीच्या आणि श्रद्धास्थानांचे भागधेय दर्शवते. ही श्रद्धास्थाने, त्यांच्या अनुषंगाने उभी राहिलेली आर्थिक नि राजकीय ताकद यांची पुरेशी मांडणी झाली असली, तरी पर्यटन हा मुख्य उत्पन्नाचा स्रोत असलेल्या या नगरीच्या अन्य उदीम व्यापाराबाबत वा तिथे राहणार्या लोकांच्या जीवनशैलीबद्दल फारसे लिहिले गेलेले दिसत नाही.
दुसर्या शतकातील जेरुसलेमबाबत लिहिताना सायमन म्हणतो 'ज्यू लोकांना ग्रीकांबद्दल आदर नि तिरस्कार दोन्ही होते. जितांची जेत्यांबद्दल किंवा शोषितांची शोषकांबद्दल असते तशी काहीशी भावना त्यांची होती. एकीकडे ग्रीक हे व्यभिचारी, चारित्र्यहीन आणि अनावश्यक आधुनिकतेकडे झुकलेले आहे असा आक्षेप असूनही जेरुसलेमवासीयांनी त्यांची दिमाखदार, चैनी जीवनशैली स्वीकारलेली होती. असा एखादा अपवाद वगळता 'नगरीचे चरित्र' म्हणताना अपेक्षित असलेले सामान्य जेरुसलेमवासीयांचे जीवन बव्हंशी दुर्लक्षित राहिलेले दिसते.
धर्मसंस्था आणि श्रद्धा म्हटले की त्यांचे अपरिवर्तनीय, श्रेष्ठ आणि कालातीत असल्याचे गृहितक सर्वसाधारणपणे दिसते. धर्मश्रद्धेच्या जोडीला वंशश्रेष्ठतेचीही जोड अनेकदा दिली गेलेली दिसते. आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व ठसवण्यासाठी वापरले गेलेले निरनिराळे मार्ग, त्यासाठी प्रसंगी विधिनिषेध न बाळगता अनैतिक मार्गांचा केलेला वापर, इतिहासातील तपशीलात आणि जमिनीवर उभ्या असलेल्या स्मारकांत फेरफार करून श्रेय लाटण्याचे केलेले प्रयत्न, वर्चस्वासाठी एकाच धर्माअंतर्गत पंथाच्या लोकांनी परस्परांवर केलेले अत्याचार, सर्वस्वी नवे निर्माण करण्याची खात्री नसेल तेव्हा जुन्या श्रेष्ठींचे आपणच वारस असल्याचे सिद्ध करण्यासाठी केलेल्या लटपटी चे असंख्य तपशील आणि आपल्या अनेक गृहितकांना सुरुंग लावणारे आधार सायमनने मांडले आहेत. एकुण धर्मसंस्थेच्या वाटचालीचा अभ्यास करणार्यांनाही यातून बरेच काही नवे सापडू शकेल.
पवित्र मानले जाणारे जेरुसलेम अक्षरशः अगणित मानवांचे थडगे आहे तसेच ते माणसाने माणसांवर ठेवलेल्या विश्वासाचे, बंधुभावाच्या प्रवृत्तीचेही. शांततेच्या धर्माची प्रस्थापना करण्यासाठी हजारो लोकांचे गळे कापणार्या तलवारींचे उरुस इथे भरले. रक्तपिपासून, नृशंस लोकांचे खंजीर इथे तळपले, स्वार्थलोलुप धर्माधिकार्यांनी माया जमवली, कटकारस्थाने केली, स्वार्थासाठी सम्राटांचे लांगुलचालन केले आणि प्रसंग येताच त्यांना दगाही दिला. प्राकृतिक भूकंपानेही ही नगरी अनेकदा हादरली, उध्वस्त झाली. संपूर्ण मानवी इतिहासाचे दर्शन या एका भूमीच्या इतिहासात आपल्याला घडते आहे. इथे न घडलेल्या अशा सर्वस्वी वेगळ्या स्वरूपाच्या घटना अन्य इतिहासात क्वचितच सापडतील इतका हा इतिहास शक्यतांच्या दृष्टीने परिपूर्ण म्हणावा लागेल.
सुमारे साडेसातशे पृष्ठे असलेल्या आणि अनेक टीपा असलेल्या या पुस्तकाचा अनुवाद करणे हे प्रचंड कष्टाचे नि चिकाटीचे काम म्हणावे लागेल. मु़ळात अशा संशोधनात्मक स्वरूपाच्या पुस्तकाचा अनुवाद अंगांनी काटेकोरपणे पहावा लागतो. त्यातच अनेक भाषा, अनेक प्रांत, नावे यांचे असंख्य संदर्भ असले की अगदी नावांच्या उच्चारापासून सार्याच गोष्टींची बारकाईने पडताळणी करावी लागते. इथे हा अनुवाद थोडा कमी पडतो असे वाटते. (उदा. मूळ उच्चार 'वि', wi सारखा असलेल्या Oui या फ्रेंच शब्दाचा उच्चार 'ओई' असा लिहिणे). तसेच नावांमधे कधी ण, न, म सारख्या पारसवर्णांचा तर कधी अनुस्वारांचा वापर केल्याने वाचनाला किंचित खीळ बसते. पण एकुण कामाचा दीर्घ आवाका आणि विषयाचे स्वरूप पाहता हा अनुवाद अतिशय वाचनीय ठेवण्यात अनुवादिका यशस्वी झाल्या आहेत असे म्हणावे लागेल.
- oOo -
(पूर्वप्रकाशितः मीमराठीLive रविवार २१ जून २०१५.)
---
संबंधित लेखन:
१. विनोद दोशी नाट्य महोत्सव - २: मै हूँ युसुफ और ये है मेरा भाई
२. जग जागल्यांचे ०९ - मोर्देशाय वानुनू: एक चिरंतन संघर्ष एका शापित नगरीची कहाणी
३. बेगिन, बालाकोट, बुश आणि अंधारातील अधेली