शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

व्यवस्थांची वर्तुळे

आपल्या देशात 'धर्म मोठा की देश? ' हा मिलियन डॉलर नव्हे, बिलियन-ट्रिलियन डॉलर प्रश्न आहे. समाजातील काही गट हा प्रश्न आपल्या विरोधकांना वारंवार विचारत असतात कारण तो त्यांना अडचणीचा असतो, निरुत्तर करणारा असा यांचा समज असतो. पण जे हा प्रश्न विचारतात त्यांना स्वतःलाही अनेकदा याच प्रश्नाला सामोरे जावे लागते. अशा अडचणीच्या वेळी ते हमखास 'त्यांनी तसे मान्य केले तर आम्ही मान्य करू' असे म्हणत आपली शेपूट सोडवून घेताना दिसतात. पण याचाच एक अर्थ असा की आपल्या नि 'त्यांच्या' कृतीत गुणात्मकदृष्ट्या काहीही फरक नाही याची कबुलीच देत असतात!

दोनही बाजूंनी एकमेकांच्या आड लपण्याचा कितीही प्रयत्न केला तरी काहीवेळा श्रद्धा, काहीवेळा कुटुंब, काहीवेळा भौगोलिकदृष्ट्या जोडलेल्या (देश माझा, देशातील नागरिक माझे, इतर देशाच्या नागरिकांपेक्षा अधिक जवळचे; हाच नियम देशांतर्गत राज्यांच्या बाबत लावला जाऊ शकतो आणि भाषिक गटांबद्दलही!) गटांना प्राधान्य दिले जाते हे वास्तव नाकारता येत नाहीच. आणि यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही.

मुळात 'धर्मापेक्षा देशाचा कायदा मोठा' हे नक्की कुणी ठरवले? बहुमताने ठरवले की फतव्याने? बहुमताने ठरवले असेल तर ते माझ्या देशात केव्हा घेतले गेले? की सार्‍याच देशांबाबत हे खरे आहे, थोडक्यात हे वैश्विक सत्य आहे काय? बरं समजा असा काही वस्तुनिष्ठ अभ्यास झालेला नाही पण हा अध्याहृत असा सार्वकालिक, सर्वसमावेशक नियम असेल, तर असे बंधन माझ्यावर घालणार्‍या व्यवस्थेने 'अधिकार-कर्तव्याच्या माध्यमांतून माझ्यावर नियंत्रण ठेवणार्‍या अन्य व्यवस्थांचे अधिकार कमी आहेत' हे त्यांच्या संमतीशिवाय एकतर्फीच कसे काय जाहीर केले? आणि समजा असे एकतर्फी जाहीर करणे अन्य व्यवस्थांनी अमान्य केले आणि त्यांनीही तसेच - उदा. 'देशापेक्षा धर्म श्रेष्ठ' हेच बरोबर आहे - जाहीर केले आणि मी त्यानुसारच वर्तन केले पाहिजे असे बंधन माझ्यावर घातले तर एकाच वेळी दोन्ही व्यवस्थांचा सभासद असणार्‍या मी यापैकी नक्की कुठल्या व्यवस्थेचे म्हणणे मान्य करायचे?

SytemIntersection

मी या भूमीवर जन्माला आलो तेव्हाच मी १. माझे कुटुंब, २. माझी जात/पंथ ३. माझा धर्म, ४. माझा निवास वा अन्य परिसर ५. माझा देश इ. इ. अनेक व्यवस्थांचा भाग म्हणून उभा असतो. इतकेच नव्हे तर जसजसा वयाने वाढत जातो तसतसे आणखी काही व्यवस्थांचा भाग होत जातो. (या पलिकडे 'नैतिकता', 'संस्कृती' यांसारख्या धूसर सीमारेषा असलेल्या काही व्यवस्था माझ्यावर प्रभाव पाडत असतातच.) लोकशाही ही अशी एक व्यवस्था आहे जी कोणत्याही जमिनीच्या तुकड्याशी निगडित नाही, तसाच धर्मही. राजकीय न्यायव्यवस्था ही बहुधा भौगोलिकदृष्ट्य सलगता अथवा देश किंवा राष्ट्र या संकल्पनेशी बांधील व्यवस्था असते.

एका जमिनीच्या तुकड्यावर या व्यवस्था एकाचवेळी नांदत असतात. त्यांच्या वर्तुळाचे परस्परांना छेद जात सामायिक प्रभावक्षेत्रे निर्माण होत असतात. दोन किंवा त्याहुन अधिक व्यवस्थांच्या सामायिक अवकाशात असणार्‍या व्यक्तिंना त्या सर्व वर्तुळांचे नीतिनियम पाळावे लागतात. प्रत्येक व्यवस्था आपापले नीतिनियम घेऊन उभी आहे. त्या त्या व्यवस्थेने मला अधिकार आणि कर्तव्ये नेमून दिली आहेत. आता या विविध व्यवस्थांचे प्रभावक्षेत्र सामायिक असल्याने त्यांच्या अधिकार-प्राधान्यांचा छेद जाणार आहे. आणि म्हणूनच त्या त्या कर्तव्यांना पार पाडत असताना जेव्हा दोन व्यवस्थांना अपेक्षित कृती वा कर्तव्ये परस्परविरोधी असतात तेव्हा मला त्यापैकी एकच निवडताना अन्य व्यवस्थांच्या नीतिनियमांचे उल्लंघन करावे लागतेच.

अमक्या अभिनेत्याने वा उद्योगपतीने बेफाम गाडी चालवून अपघात केलेल्या आपल्या मुलाला वा मुलीला कसे वाचवले याबद्दलचे गॉसिप बरेचदा चर्चिले जाते. त्या प्रसंगी ती व्यक्ती कौटुंबिक हित की सार्वजनिक हित यात कौटुंबिक हिताला - त्या व्यवस्थेला - प्राधान्य देत असते. हाच प्रश्न त्या अभिनेत्याऐवजी 'धर्मापेक्षा देश मोठा'चा उद्घोष करणार्‍या एखाद्या माणसासमोर त्याच्याच मुला/मुलीसंदर्भात उभा ठाकला, तर त्याची कृती काय असेल याचा विचार करुन पहायला हरकत नसावी. जाहीरपणे काहीही म्हणत असला तरी त्याची प्रत्यक्ष कृती मुलाला वाचवण्याचीच असणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मग अशावेळी 'देशाचा कायदा सर्वांत श्रेष्ठ' वगैरे सोयीस्करपणे विसरावे लागते.

एकाच वेळी एकाहुन अधिक व्यवस्थांच्या प्रभावक्षेत्रात असलेल्या व्यक्तींबाबत निर्माण होणारी प्राधान्याची समस्या जशी असते तशीच या व्यवस्थांच्या थेट वर्चस्व-संघर्षाचीही. संसदीय लोकशाही ही या देशाने स्वीकारलेली व्यवस्था आहे आणि तिला केवळ छेद देणारीच नव्हे तर उलथून टाकू पाहणारी नक्षलवाद्यांची पर्यायी 'व्यवस्था' आपण मान्य करत नाही! भौगोलिक, राजकीय लोकशाहीचे कायदे नाकारणारा आणि हिंसाचाराला सत्ता राबवण्याचे वैध हत्यार मानणारा नक्षलवाद हा त्या कारणासाठी 'राष्ट्रद्रोही' असला तरी त्यांनाही त्यांची अशी 'व्यवस्था' रुजवायची आहे. अनेकदा धार्मिक व्यवस्थादेखील लोकशाहीचे वा राजकीय व्यवस्थेचे नियम नाकारते नि संघर्ष करते. आपल्या धर्मग्रंथात अमुक गुन्ह्याची हत्या करणे वैध आहे असे धार्मिक संघटनांचे ठेकेदार बिनदिक्कत जाहीर करतात नि अप्रत्यक्षपणे देशाचा कायदा दुय्यम असल्याचेच सूचित करत असतात.

'धर्मापेक्षा देश मोठा' या मुद्द्याला जोडूनच एक विधान हटकून वाचायला मिळते, "आपण भारतीय नागरिकत्वाचे फायदे घेत असल्यास 'धर्मापेक्षा देश मोठा'मान्य करायलाच हवे, नाहीतर नागरिकत्व सोडून द्यावे (अर्थः बहुधा देशांतर करावे असा असावा)." याच न्यायाने उद्या धर्मसंस्थेनेही फतवा काढला 'धर्मगटात असल्याचे फायदे घेता ना, मग आता 'देशापेक्षा धर्म मोठा' मानलेच पाहिजे. नाहीतर धर्मांतर करा' किंवा कुटुंबप्रमुख असलेल्या माझ्या वडिलांनी तंबी दिली की 'लहानपणापासून कुटुंबात असल्याचे फायदे उपटलेस ना आता देशापेक्षा बापाला मोठे मानले पाहिजेस. नाहीतर चालता हो माझ्या घरातून' किंवा हिंदी सिनेमात म्हणतात तसे 'तू मला मेलास नि मी तुला मेलो' तर आफतच व्हायची की. माझ्या कुटुंबाचा, समाजाचा, धर्माचा, मित्रपरिवाराचा भाग म्हणूनही काही फायदे, काही अधिकार मिळवत असतोच की.

आपल्या देशाने निवडलेली संसदीय लोकशाही ही केवळ आपली निवड आहे इतकेच. शेवटी व्यवस्था कोणती हवी वा जिथे एकाहुन अधिक व्यवस्था असतात तिथे प्राधान्य कुठल्या व्यवस्थेला द्यावे हा आपला निर्णय असतो. आता 'आपला' म्हणजे कुणाचा; सत्ताधार्‍यांचा, विरोधकांचा, सर्वसामान्य माणसाचा, दंडव्यवस्थेचा अभ्यास करून न्यायव्यवस्थेमधे निवाडा करण्याचे हक्क मिळवणार्‍यांचा की आणखी कुणाचा? पुन्हा ही सारी वेगवेगळी माणसे आहेत, आणि त्यांचा प्रत्येकाचा आपापला निर्णय असतोच. तो एकच असेल याची मुळीच खात्री देता येत नाही. आणि दोन भिन्न व्यक्ती परस्परविरोधी किंवा विसंगत प्राधान्यक्रम ठरवतात तेव्हा त्यांना मतभेदाला, क्वचित संघर्षाला सामोरे जावे लागते. विशिष्ट परिस्थितीत एखाद्याने एका व्यवस्थेला अनुकूल निर्णय घेतला याचा अर्थ त्याने बाकीच्या सार्‍या व्यवस्था नाकारल्या वा दुय्यम ठरवल्या असा होत नसतो. तरीदेखील तसा ग्रह करून घेऊन संघर्ष उभे राहतात, मग तो 'देश की धर्म' असो की 'कुटुंब की देशाचा कायदा' असा असो.

व्यवस्थांची ही वर्तुळे अर्थातच समकेंद्री नसतात किंवा समान त्रिज्येचीही! खरंतर ही वर्तुळेही नसतात. परिघावरचे काही बिंदू हे केंद्रापासून अधिक दूर असू शकतात! किंवा असं म्हणू या की वर्तुळांपेक्षाही ही व्यवस्थांची 'वेटोळी' अधिक आहेत. ती परस्परांत इतकी गुंतली आहेत की त्यांना परस्परांपासून वेगळे काढून तपासणे जवळजवळ अशक्यच आहे. त्यांच्यात श्रेष्ठ-कनिष्ठतेची निश्चित उतरंड दाखवता येत नाही. आणि त्या त्या प्रसंगी संबंधित व्यक्तीच त्यांच्या प्राधान्याचे निर्णय घेणार असेल तर यात प्रचंड सापेक्षता तर आहेच पण त्यांचे निर्णय कालातीत नसण्याने अधिकच गोंधळाची परिस्थितीही उद्भवू शकते. या पेचप्रसंगातून सुटका करून घेण्यासाठी सोपा उपाय म्हणून 'धर्मापेक्षा देश श्रेष्ठ' अशा उद्घोषणा करत वास्तवात मात्र परिस्थितीनुसार प्राधान्यक्रम बदलत बहुतेक लोक जगताना दिसतात. पण या दांभिकपणातूनही वर उल्लेख केलेले दोन दोष नाहीसे होत नाहीतच.

तेव्हा कदाचित या सर्व व्यवस्थांची उतरंड निश्चित करण्यापेक्षा जेव्हा जेव्हा व्यवस्थांच्या हितसंबंधांचा असा छेद जाईल तेव्हा संबंधित व्यक्तींना निर्णय घेण्यास मदत करतील असे वस्तुनिष्ठ निकष आगाऊच ठरवून देणे कदाचित अधिक सयुक्तिक ठरू शकेल. यातून निवड करत गेल्याने ती व्यक्ती त्यातील कोणत्याही एका व्यवस्थेला धार्जिणी असण्याची गरज वा शक्यता उरणार नाही, तसा आरोप तिच्यावर करता येणार नाही. त्याचबरोबर यात नव्या व्यवस्थांना सामावून घेण्याची आणि जुन्या काही वगळण्याची प्रक्रियादेखील - कदाचित - सोपी होऊन जाईल. यातून होणारा दुसरा फायदा असा की खरोखरच त्यातील एखादी व्यवस्था दुसरीपेक्षा बहुतेक वेळा श्रेष्ठ असेलच तर वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे तिची निवड वारंवार होत राहील नि अन्य दुय्यम व्यवस्था साहजिकच मागे पडत जाईल, तिच्याविरोधात कोणताही नकारात्मक विद्रोह करण्याची आवश्यकताच उरणार नाही.

-oOo-

(पूर्वप्रकाशितः 'पुरोगामी जनगर्जना' डिसेंबर २०१५)


हे वाचले का?

गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

आभासी विश्व आणि हिंसा

ज्याने कुणी इंटरनेटला Virtual World (याचा 'आभासी विश्व' असा अतिशय वाईट अनुवाद केला जातो) असा शब्द प्रथम वापरला त्याच्या कल्पनाशक्तीला दाद द्यायला हवी. ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस उगवलेल्या 'वर्ल्ड वाईड वेब' या संकल्पनेतून केवळ एकाच भूभागावरचे नव्हे तर जगभरात पसरलेले संगणक परस्परांना जोडण्याची सोय झाली. त्यातून कल्पनांचा विस्फोट झाला आणि माणसाचे जग त्याने उलटे पालटे करून टाकले.

या इंटरनेटने एका बाजूने माणसाला आजवर कधीही सापडले नव्हते असे प्रचंड व्याप्ती असलेले 'माध्यम' दिले तर दुसरीकडे थेट एक मानवनिर्मित, कृत्रिम असे 'विश्व'च निर्माण केले. आज माणसाच्या जगातील माहितीशी निगडित बहुसंख्य जबाबदार्‍या हे माध्यम जग लीलया पेलून धरते आहे, तर हे नवे विश्व माणसाच्या अद्याप विकसितही न झालेल्या पैलूंना नवी क्षितीजे प्रदान करते आहे.

या नव्या माध्यमाने अनेक नव्या शक्यतांचे एक दालन उघडून दिले आहे. एकाच वेळी दोनही व्यक्तींना दोन टोकाला उपस्थित असण्याचे टेलिफोनचे बंधन मोडीत काढत 'ईमेल'ने asynchronous किंवा भिन्न स्थलकालातील व्यक्तींना संवादाचे माध्यम उपलब्ध करून दिले; लिखित संवादाचे माध्यम असलेल्या पत्रव्यवहारातील माध्यमाने - पत्रानेच - प्रवास बंधन नाहीसे करत 'चॅट'ने संगणकाच्या माध्यमातून संवादाची थेट नि synchronous सोय करून दिली. 'डेटाबेस'च्या संकल्पनेने प्रचंड माहिती साठवून ठेवण्याची आणि त्याच्या सहजपणे प्रती करण्याची झालेली सोय इंटरनेटच्या माध्यमातून जुनी क्षितीजे सहज पार करून गेली. बँकेचे व्यवहार, खरेदी-विक्री, बातम्या व माहिती, ज्ञान, पुस्तके, संगीत, चित्रपट, अन्य दृक्-श्राव्य कला यांना इंटरनेटने आपल्या कवेत घेतले... पाहता पाहता आपल्या गरजांपासून करमणुकीपर्यंत सारे काही आता इंटरनेटच्या ताब्यात गेले. ही प्रगती माणसाच्या उत्क्रांतीइतकीच उत्कंठावर्धक, पण त्याहून कैकपट वेगाने घडलेली. १९८९ मधे प्रथम इंटरनेटची संकल्पना मांडली गेली आणि आज जेमतेम पंचवीस वर्षातच हे माणसाच्या जगण्याचा अविभाज्य होऊन बसले आहे.

एका बाजूने माध्यम म्हणून असे विकसित होत असतानाच इंटरनेटवर एक नवे विश्व आकाराला येऊ लागले होते. वास्तवातील एखाद्या व्यक्तीची या नव्या जगातील 'ईमेल' ही पहिली ओळख किंवा प्रतिनिधी. आभासी विश्वातले ते अस्तित्वच. त्या जगातला संवाद होणार तो एका ईमेल अड्रेसचा दुसर्‍या ईमेल अड्रेसशी, माणसाचा माणसाशी नव्हे. कारण त्या जगात माणसे नाहीतच. स्वतःचे दोन किंवा त्याहून अधिक ईमेल अड्रेस निर्माण करणे किंवा एकच ईमेल अड्रेस एकाहुन अधिक व्यक्तींनी वापरणेही शक्य आहे. त्यामुळे या नव्या जगातील 'व्यक्तीं'चा वास्तव जगातील व्यक्तींशी एकास एक संबंध नाही.

पण हा चेहराविहीन संवाद, देहबोलीच्या अभावामुळे परिणामकारक होईना. शिवाय दोन व्यक्ती - किंवा खरंतर ईमेल अड्रेसेस - आपले म्हणणे, मुद्दे वेगवेगळ्या वेळेला मांडत असल्याने यात कालापव्ययदेखील होतो. त्यामुळे जरी व्यावसायिक पातळीवरच्या देवाणघेवाणीसाठी ते उपयुक्त ठरले तरी भावनिक संवादांसाठी ते पुरेसे ठरेना. मग 'चॅट'चा पर्याय देऊन इंटरनेटच्या जगात एकाच वेळी दोन बाजूने संवाद साधण्याची सोय केली गेली. यथावकाश वीडिओ चॅटचा पर्याय उपलब्ध होऊन देहबोलीसह संवादाची शक्यता वास्तवात आली. हजारो किमी दूरवर असलेल्या दोन व्यक्ती आता जणू समोरासमोर बसून बोलत असल्याइतक्या सहज संवाद साधू लागल्या.

पण असे असले तरी माणूस म्हणजे काही फक्त संवादाचे अस्तित्व नव्हे. अन्य प्राणिमात्रांपासून माणूस वेगळा आहे तो त्याने विकसित केलेल्या निर्मिती कौशल्यामुळे. मग या नव्या जगात माणसांना निर्मितीची आस लागली. विविध गेम्सच्या स्वरूपात संगणकावर तो आपली हौस भागवून घेत होता ती त्याने इंटरनेटच्या माध्यमातही आणली. 'फार्मविल' सारखे खेळ तुम्हाला आभासी जगात शेतीसारखे 'खेळ' देऊ लागले. 'रायजिंग सिटीज्' सारखा खेळ तुम्हाला तुमची शहरे निर्माण करण्याची संधी देऊ लागली. या खेळांची साधने, त्यावर परिणाम करणारे घटक, वास्तव जगासारखाच 'व्यक्तीं'मधे तिथेही होणारा वस्तू आणि चलनाचा विनिमय इ. गोष्टी हळूहळू विकसित होत जणू विश्वामित्राची प्रतिसृष्टीच तिथे निर्माण झाली.

'अवतार' चित्रपटातील पांगळा जेक वेगळ्या सृष्टीत नवे नाव, नवे शरीर, नवे अस्तित्व घेऊन उभा राहतो. तथाकथित वास्तव जगात व्हीलचेअरच्या सहाय्याने खुरडत जगणारा तो 'पँडोरा'च्या विश्वात थेट आकाशभ्रमण करतो. त्याच धर्तीवर फेसबुक, ट्विटर वगैरे सोशल मीडियाच्या माध्यमांतून आपल्याला हवी तशी ओळख निर्माण करणे शक्य झाले आहे.

"अचानक ही दोन विश्वे वेगळी झाली, संगणकांचे जाळे 'स्वतंत्र' झाले आणि त्यांनी माणसांशी संबंध तोडून टाकले तर..." ही विज्ञानकथांमधे मधे येणारी कल्पना जर वास्तवात उतरली तर आपले वास्तव जग चक्क गतिरूद्ध होऊन बसेल. इतके आपले तथाकथित वास्तव आता या आभासी जगावर अवलंबून आहे.

संगणक माणसाविरुद्ध बंड करतील ही जरी कविकल्पना असली, तरी माणसे माणसाविरुद्ध बंड करत आलेली आहेत. त्यासाठी त्यांनी सतत नवनवी हत्यारे, युद्धासाठी नवनवी भूमी शोधली आहे. फसवणूक, चोरी, हल्ला, हत्या, लढाया, युद्ध या वास्तव जगातल्या गुन्ह्यांना आभासी जगाचे नवे परिमाण दिले आहे. अर्थात माणसे थेट इथवर पोचलेली नाहीत. ईमेल पासून सुरू झालेला प्रवास सोशल माध्यमांतून व्यक्तिमत्त्व तयार करण्यापर्यंत वास्तवाची नक्कल करण्यापर्यंत पोचला आहे, तसाच आभासी जगातल्या माणसांच्या संघर्षाचा इतिहासही टप्प्याटप्प्यानेच पुढे सरकला आहे.

माणसाने अंतराळात झेप घेतली आणि ज्ञानाचे नवे क्षितीज माणसाने पादाक्रांत केले. पण याच प्रगतीच्या ठेकेदारांनाच ताबडतोब त्या ज्ञानाचा विध्वंसासाठी, इतरांवर सत्ता गाजवण्यासाठी उपयोग करता येईल याचा शोध लागला आणि 'स्टार वॉर्स' या कल्पनेचा जन्म झाला. (आपल्या सुदैवाने काही काळाने शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर आणि त्यावर होणार्‍या खर्चाच्या अव्यवहार्यतेमुळे ही नृशंस कल्पना प्रत्यक्षात उतरू शकली नाही.) इंटरनेटच्या जगातही हिंसा नवनव्या रूपात सामोरी येताना दिसते.

व्हायरस हा प्रकार संगणकाचे, नेटवर्कचे नुकसान करणारा पहिला धोका. सुरुवातीच्या काळातील असे व्हायरस हे फक्त वैयक्तिक संगणकांत साठवलेली माहिती पुसून टाकणे, त्याचे काम करण्याचे तंत्र बिघडवणे असे केवळ खोडसाळ म्हणता येतील अशी कामे करत. परंतु इंटरनेटच्या शोधानंतर त्या संगणकांवरची माहिती चोरून नेण्याचे तंत्र विकसित केले गेले. इंटरनेटच्या माध्यमातून त्यावरची माहिती आपल्या संगणकाकडे वळवणे शक्य झाले होते. यातून त्या व्यक्तीच्या संगणकाबद्दलची माहिती चोरून नेणे शक्य होऊ लागले.

ते जग आभासी म्हटले तरी त्याची आपल्या वास्तवाशीही सांगड घातली गेली आहे. तेथील पडझड या वास्तव जगातही परिणाम घडवून आणते. ईमेलच्या माध्यमातून दुसरेच कुणी - बँक अथवा गुंतवणूक सल्लागाराचे अधिकृत प्रतिनिधी- असल्याचे भासवून माहिती चोरून त्याआधारे लुटले जाऊ लागले. आता निव्वळ संगणकाबाबत नव्हे तर त्या संगणकाच्या मालकाची वैयक्तिक माहितीदेखील चलाखीने चोरली जाऊ लागली, इतकेच नव्हे तर तिचा वापर करून प्रत्यक्ष आर्थिक नुकसान करणे शक्य झाले. पण अजूनही अशा प्रकारच्या कामात आपल्या हल्ल्याचा बळी जाणारी व्यक्ती कुठली हे हल्ला करणार्‍याला आधीच ठाऊक नसते. काहीसे मासे पकडणार्‍या जाळ्यासारखे काम ते करत असतात. जाळ्यात सापडेल तो मासा आपला! आणि म्हणूनच या प्रकाराला 'फिशिंग' म्हटले जाऊ लागले. चॅटचे माध्यम लहान मुलांना फसवून आपल्या विकृत लैंगिक खेळात ओढण्यासाठी वापरले जाते. स्त्रियांना, पुरुषांना पोर्नोग्रफीसारख्या व्यवसायात ओढले जाऊ लागले.

व्हायरस तयार करणार्‍याला थेट असा कोणताही फायदा होत नसे. पण आता अशा 'फिशिंग'च्या माध्यमातून आर्थिक फायदाही करून घेता येऊ लागला. यात आभासी जगातील, त्या पातळीवर हिंसा असली तरी दुश्मनी, वैयक्तिक हेवेदावे वा वैर नाही किंवा विशिष्ट व्यक्तीला वा समुदायाला लक्ष्य करणारा एखादा पूर्वनियोजित हेतूही नाही. या 'फिशिंग' प्रकारच्या हल्ल्यात हेतू निव्वळ स्वार्थी आहे, तो साधण्यासाठी इतर कुणाचे(ही) नुकसान झाले तरी त्याबद्दल तो हल्लेखोर बेफिकीर असतो इतकेच.

InternetViolence

सोशल मीडियाचे अवाढव्य माध्यम तर अनेक शक्यतांचे आगरच. हे जग आभासी असल्याचा फायदा उठवून वास्तवातील कुणी व्यक्ती असल्याची बतावणी करत स्वार्थ साधणे अथवा त्याच्या/तिच्या स्वार्थाला धक्का पोहोचवणे हे तर नित्याचेच. पण केवळ वैयक्तिक लाभालाभापलिकडे विशिष्ट अजेंडा घेऊन तो विविध प्रकारे राबवलाही जातो. आपल्याहून वेगळे मत असलेल्या, किंवा ज्याचे अस्तित्व आपल्याला खुपते अशा व्यक्ती, विचार वा गटावर हल्ले करणे, किंवा सरळ सरळ दोन विरुद्ध राजकीय पक्षांचे समर्थक विविध परस्परांशी भिडणे अशा प्रकारांतून झुंडशाहीदेखील इथे अवतरली आहे.

इंटरनेटच्या 'आदिम काळात' जसे एकच व्यक्ती अनेक ईमेल अड्रेसचा वापर करू शके तसे आता सोशल मीडियातून एकच व्यक्ती अनेक 'प्रोफाईल' उभे करू शकते. यातून आभासी जगातल्या युद्धासाठी मोठे सैन्य अनायासे उभे करता येते. त्यामुळे एखाद दोन व्यक्तीदेखील जनमताच्या पाठिंब्याचा वा विरोधाचा आभास निर्माण करू शकतात, त्यायोगे पाठिंबा वा विरोध या दोन्ही कळपात नसलेल्या कुंपणावरच्या व्यक्तींना या 'तथाकथित बहुमता'कडे झुकवण्यासाठी बुद्धिभेद करू शकतात.

नुकतेच डी पी मंडल या पुरोगामी लेखकाचे फेसबुक अकाउंट त्यांची मते न पटणार्‍या व्यक्तींच्या आभासी झुंडीने घातक किंवा आक्षेपार्ह म्हणून रिपोर्ट करून ब्लॉक करण्यास भाग पाडले. तांत्रिकदृष्ट्या हा कायदेशीर मार्ग होता पण अशीच मुस्कटदाबी प्रसिद्ध पत्रकार रविश कुमार यांच्याबाबत करताना सरळसरळ 'हॅकिंग' (संगणकीय घुसखोरी) हा बेकायदेशीर मार्ग अवलंबण्यात आला. या मार्गाने घुसखोरांनी त्यांना न पटणारी मते मांडणारा रविश यांचा 'कस्बा' हा ब्लॉग बंद पाडला.

वेबसाईट्स, ब्लॉग्स, सर्वर्स यावर हल्ले करून ते बंद पाडणे, संवेदनशील माहिती चोरणे ('पेंटगॉन'च्या सर्वरमधे झालेली घुसखोरी, 'गुगल'ची अकाउंट हॅक होणे, विकीलीक्स), परदेशाच्या वा व्यावसायिक शत्रूच्या वेबसाईट ऐन मोक्याच्या क्षणी बंद पाडणे अशा अनेक मार्गांनी आभासी जगातील हिंसेची वाटचाल होताना दिसते आहे.

८ जुलै २०१५ रोजी एकाच दिवशी अमेरिकेतील न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज, वॉल स्ट्रीट जर्नल या त्यांच्या भांडवलशाही व्यवस्थेचे आधारस्तंभ मानल्या गेलेल्या व्यवस्थांच्या आणि युनायटेड एअरलाईन्स या जगातील सर्वाधिक ठिकाणी सेवा पुरवणार्‍या विमानसेवेच्या नेटवर्कमधे एकाच वेळी 'बिघाड' निर्माण झाला. या बिघाडामुळे स्टॉक एक्स्चेंज'चे काम तब्बल चार तास थांबवावे लागले होते. अधिकृत पातळीवर जरी हे सारे 'तांत्रिक बिघाड' असल्याचे जाहीर करण्यात आले असले, तरी या तिघांचे अर्थव्यवस्थेतले स्थान पाहता हा नियोजनपूर्वक नि जाणीवपूर्वक केलेला बिघाड होता याबाबत सायबर विश्वातील आणि जागतिक अर्थतज्ज्ञांना शंकाच नाही.

या पलिकडे जाऊन आता या युद्धांना दोन देशातील युद्धांचे स्वरूपही हळूहळू येऊ लागले आहे. अजून अधिकृतरित्या समोर आलेले नसले तरी युद्धासाठी उभ्या केलेल्या सैन्याप्रमाणेच शत्रूच्या नेटवर्कमधे घुसून संवेदनशील माहिती चोरणे (वास्तवातील हेरगिरीच्या धर्तीवर), त्याचे काम बंद पाडणे वा त्यात बाधा निर्माण करणे यासाठी 'सायबर आर्मीज' काम करत आहेत.

मागच्या वर्षी जून महिन्यात 'सोनी पिक्चर्स एन्टरटेनमेंट'ने आपल्या 'The Interview' या नव्या चित्रपटाचे ऑफिशल ट्रेलर रिलीज केले. उ. कोरियाच्या अध्यक्षांच्या हत्येवर आधारित चित्रपट असल्याने आणि एकच गदारोळ उसळला. उ. कोरियाचे लष्करी शासन खवळले. केवळ निषेधाने काही होत नाही, चित्रपटावर बंदी घालण्याच्या आपल्या मागणीला अमेरिकन सरकार भीक घालत नाही म्हटल्यावर अनधिकृत पातळीवर त्यांचे सायबर सैनिक कामाला लागले. चित्रपटाचे निर्माते नि वितरक असलेल्या सोनी एंटरटेनमेंट्च्या सर्वरमधे नि वेबसाईट्सवर घुसून त्यांनी त्यांचे बरेच नुकसान केले आणि धोक्याचे इशारे देणारे संदेश त्यांच्या वेबसाईटवर नोंदवून ठेवले.

वास्तव जगात सावधपणे व्यक्त होणारी व्यक्ती इथे - विशेषतः सोशल मीडियामधून - अतिशय आक्रमकपणे व्यक्त होताना दिसते. समोरासमोर झालेल्या वादांत आपल्या शारीरिक, मानसिक दुबळेपणाने बोटचेपी भूमिका घेणारी व्यक्ती इथे प्रतिकार केवळ शाब्दिकच असल्याने त्याची फारशी फिकीर न करता मनातील सारी हिंसा बिनधोकपणे ओतताना दिसते. या बिनधोकपणाला अनेक कारणे आहेत.

एक म्हणजे सायबरविश्वातील गुन्ह्याबाबत कायदे कदाचित अजून पुरेसे विकसित झालेले नाहीत, दुसरे म्हणजे असलेच तरी त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेली पुरेशी व्यापक आणि सजग यंत्रणा नाही, जी आहे त्यातील व्यक्तींमधे त्या कायद्यांविषयी पुरेशी जागरुकता नाही किंवा संभ्रम आहेत, तिसरे म्हणजे गुन्हेगार आणि ज्याच्या संदर्भात गुन्हा घडला ते जगभरात कुठेही असू शकत असल्याने कायद्याच्या अधिकारक्षेत्राबाबत असलेला गोंधळ गुन्हेगाराला कायद्याच्या कचाट्यात आणण्याची शक्यता खूपच धूसर करत जातो.

जशी वास्तव जगात महायुद्धे दूर गेली आहेत असे म्हणतात तसेच इथे असे सर्वंकष युद्ध होण्याची शक्यता कमी आहे. पण उलट 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' आहे. कारण संवेदनशील, महत्त्वाची माहिती असलेले संगणक अहोरात्र चालू असतात, इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचणे शक्य असते. जगाच्या दुसर्‍या टोकाला बसलेला कुणी हॅकर केव्हाही त्यावर हल्ला करून नुकसान घडवू शकतो. यासाठी त्यांच्या सुरक्षिततेची यंत्रणाही सतत जागरूक आणि अद्ययावत असावी लागते. हे एकप्रकारे निरंतर चालणारे युद्धच आहे. इथे युद्ध असते ते केवळ बुद्धीचे, हानी होते तीही शारीरिक नव्हे तर माहिती स्वरूपात आणि त्याचा परिणाम म्हणून आर्थिक वा सुरक्षिततेच्या प्रश्नांच्या स्वरूपात.

या जगात सानथोर सार्‍यांनाच आपापली युद्धे लढवता येतात, आपले प्रतिस्पर्धी निवडता येतात, आपले युद्धमैदान निश्चित करता येते. यातून माणसाच्या मनातील हिंसेचा निचरा होतो की तिचा सराव होतो हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे.

माणूस कल्याणासाठी लावलेल्या शोधांतही विध्वंसाची बीजे शोधत असतो, जिज्ञासेतून झालेल्या ज्ञानाचा वापर ज्ञानाच्या दुसर्‍या शाखेला उध्वस्त करण्यासाठी करत असतो. हिंसेची ही प्रेरणा 'प्रगत' म्हणवणार्‍या माणसांत अप्रगत जनावरांपेक्षाही अधिक तीव्र झालेली दिसून येते. कदाचित याचे कारण माणसाकडे अन्न, मादी आणि अधिकारक्षेत्र या संघर्षाच्या तीन मूलभूत मुद्द्यांपलिकडेही गमावण्याजोगे बरेच काही निर्माण झाले आहे. निर्मितीच्या नव्या शक्यतांबरोबरच विध्वंसाच्या नव्या शक्यताही जन्म घेत असतात. किंबहुना निर्मितीचे हत्यारच अनेकदा विध्वंसाचे हत्यारही होऊन बसते; डोंगर फोडून माणसासाठी नवा रस्ता बनवण्यासाठी निर्माण केलेले सुरुंग माणसांच्या निर्मितीला आणि खुद्द माणसांनाही नष्ट करण्यास वापरले जातात तसे.

- oOo -

(पूर्वप्रकाशित: 'पुरोगामी जनगर्जना' दिवाळी २०१५)


हे वाचले का?

मंगळवार, १ डिसेंबर, २०१५

काजळवाट

Aadeush

विषयसंगती ध्यानात घेऊन ही पोस्ट ’वेचित चाललो...’ या ब्लॉगवर हलवली आहे. ती इथे’वाचता येईल.

- oOo -


हे वाचले का?