डार्विनची थिअरी सिद्ध झालेली नाही... आणि म्हणून आमचे ’वेदवाक्य’च बरोबर आहे असे सत्यपालसिंग म्हणतात.
एखादा कम्युनिस्ट हातभर लेख लिहून समाजवाद्यांचे पसाभर दोष दाखवतो... आणि म्हणून आमची मार्क्सची पोथी स्वीकारा म्हणतो.
एखादा वाचाळ नेता प्रतिस्पर्धी पक्षाचे खरे खोटे दोष सातत्याने उगाळत बसतो... आणि मी असा नाही म्हणून मला निवडा म्हणतो.
एखादा सरकारपुरस्कृत व्यवसाय करणारा प्रतिस्पर्धी उत्पादनांत ’हानिकारक केमिकल’ आहेत असे सांगत बसतो... आणि म्हणून आमची उत्पादने खरेदी करा म्हणतो.
एखादा धर्माभिमानी ज्या धर्मावर दांत धरुन असतो त्या धर्मातील खर्या खोट्या दोषांची सतत उजळणी करत बसतो... आणि म्हणून आमचा धर्म श्रेष्ठ आहे म्हणतो.
एखादा जात्याभिमानी अन्य जातींच्या स्वार्थीपणाचे, लायकीहून अधिक मिळवत असल्याच्या तक्रारी करत बसतो... आणि म्हणून आता आमच्या जातीला प्राधान्य मिळण्याची गरज आहे असे प्रतिपादन करतो.
एखादा पांडू अमुक गाव अख्खेच्या अख्खे मूर्ख आहे, ओवररेटेड आहे... म्हणून आमचे गाव लै भारी आहे अशा फुशारक्या मारतो.
---
माझ्या दृष्टीने हे सारेच दावे चुकीचे आहेत. याच्यामागे एकतर अडाणीपणा दिसतो, दांभिकपणा दिसतो किंवा स्वार्थ!
समोरचा चूक ठरल्याने आपली बाजू आपोआप बरोबर ठरते ही मखलाशी साफ चुकीची आहे !!!
जे तिला बळी पडतात ते एकतर भोळे आहेत किंवा मूर्ख.
---
सत्यपालसिंहांनी उत्पत्तीची वेदप्रणित गोष्ट सांगायला हवी, ती योग्य कशी याबाबत विवेचन करायला हवे.
समाजवादाचे जे दोष कम्युनिस्टाने सांगितले ते कम्युनिझम किंवा कम्युनिस्टांत कसे नाहीत हे कम्युनिस्टाने सांगायला हवे, किंवा एकुणातच कम्युनिजम ही योग्य व्यवस्था आहे याचे विवेचन द्यायला हवे.
वाचाळ नेत्याने मागचे लोक ज्या चुका करत होते त्या आपण कशा टाळणार आहोत याचा रीतसर प्रस्ताव सर्वांसमोर ठेवायला हवा. मी काहीतरी करतो आहे नि ते योग्यच आहे, पण तुम्ही मूढ असल्याने तुम्हाला कळत नाही हा दंभभाव सोडायला हवा.
सरकारपुरस्कृत व्यावसायिकाने आपली उत्पादने गुणवत्तापूर्ण का व कशी हे स्वतंत्रपणे सिद्ध करायला हवे.
धर्माभिमानी माणसाने आपला धर्म श्रेष्ठ कसा याबाबत मांडणी केली पाहिजे.
जात्याभिमानी माणसाने आपल्या जातीला प्राधान्य मिळायला हवे या मागणीच्या पुष्टर्थ वस्तुनिष्ठ पुरावा सादर करायला हवा.
पांडूने आपल्या गावातील प्राचीन, अर्वाचीन किंवा जड अथवा सांस्कृतिक अशा अभिमानास्पद, अनुकरणीय गोष्टीं वा चालीरीतींबद्दल बोलून त्याचे महत्त्व वा त्याच्या श्रेष्ठत्वाचा दावा करायला हवा.
---
आणि मुळात जर हे जमत असेल, तर मग विरोधक, पर्याय यांच्याबाबत नकारात्मक बोलायची गरजच पडत नाही. चांगले नि वाईट यांच्यात निवड करायची असेल तर चांगल्याचा गुण सांगून भागते. वाईट आणि अति-वाईट यांच्यात निवड करायची असेल तरच समोरचा अधिक वाईट हे सिद्ध करायची वेळ येते. थोडक्यात अशी नकारात्मक प्रचारपद्धती वापरणारा आपण केवळ ’अमक्यापेक्षा कमी वाईट’ आहोत हेच सिद्ध करु पाहतो... आपणही वाईट पर्यायच देतो आहोत हे त्याला मनात कुठेतरी मान्यच असते.
पण एकुणच वरील उदाहरणे पाहता जर नकारात्मक प्रचारच तुम्हाला आवश्यक वाटत असेल आणि परिणामकारक ठरत असेल, तर एकुण समाजच नकारात्मक प्रवृत्तीचा आहे. जिथे निर्मितीपेक्षा भंजनाचा विचार अधिक प्रबळ असतो तो समाज कसला डोंबलाचा महासत्ता होणार?
जिथे आपल्या आयुष्यावर थेट परिणाम घडवणार्या घटकांपेक्षा चित्रपटाच्या नट-नट्यांचे खासगी आयुष्य अधिक चर्चिले जाते, त्या समाजात प्रगतीच्या वाटा कोण शोधणार? स्वत:च्या आयुष्यातील चुकांपेक्षा इतरांच्या चुकांचा पाढा अधिक उत्साहाने वाचणारे आपल्या चुका सुधारुन पुढे कसे सरकणार?
जगण्यातील सर्व काही परकीय शोधांवर, कल्पनांवर आधारित असूनही कुठल्या मसण्या ग्रंथात ते आधीच लिहून ठेवले आहे या काही खोटारड्यांनी पसरवलेल्या भ्रामक कल्पनेला स्वीकारुन आळशीपणे निलाजरे, परपुष्ट जगणार्यांना इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याचा दावा करण्याचा काय अधिकार? आणि केलाच तर तर तसे करणार्याचा मूर्खपणाच जाहीर होतो असे समजण्यास काही आक्षेप का असावा?
आणि हे असे आसपास दिसून येत असताना ’भारत माझा देश आहे, पण सारेच भारतीय माझे बांधव नाहीत!’ असे म्हणण्याचा अधिकार मला का नसावा? गिधाडांसारखे इतरांचे लचके तोडूनच ज्यांना जगता येते अशांना नाकारण्याचा अधिकार मी का बजावू नये? (वरीलपैकी प्रत्येक उदाहरणातील व्यक्ती, उक्तीने नसली तरी वर्तनाने हेच दर्शवून देत असते.)
वरीलपैकी प्रत्येक व्यक्ती/समाज समोर बोट दाखवून ’तो तसा आहे असे म्हणून मी असा आहे.’ ही पळवाट सांगतो तेव्हा तो आपले खुजेपण, स्वार्थी वृत्ती, मनातील द्वेष नि हिंसेचे अस्तित्व अप्रत्यक्षपणे मान्यच करतो- नव्हे मी ती सोडणार नाही असे म्हणतो हे मी का मानू नये? आणि असे आहे तर त्याच्याशी संवाद थांबवण्याचा माझा हक्क का बजावू नये?
तूर्त विराम...
- (भारतातील केवळ मूठभरांचाच बांधव म्हणवणारा)
-oOo -