रविवार, २४ जुलै, २०२२

साहित्याचे वांझ(?) अंडे

क्रिकेटमध्ये फलंदाजाचा दर्जा ठरवण्यासाठी त्याने आजवर केलेल्या धावांची सरासरी पाहिली जाते, तसे लेखनाच्या दर्जा किती हे ठरवण्यासाठी फेसबुकवर लाईक्सची. त्याबाबतीत माझी कामगिरी म्हणजे कधी ज्याच्या बॅटला बॉल लागला की सत्यनारायण घालावा लागतो अशा महंमद सिराज किंवा जसप्रीत बुमराहच्या दर्जाची. कधीतरी सहज म्हणून खालील परिच्छेदाची फेसबुक पोस्ट केली आणि माझ्या पोस्टना सरासरीने मिळतात त्याच्या दुप्पटीहून अधिक लाईक्स तिने मिळवले. वरील दोघांपैकी एकाने एखाद्या सामन्यात अर्धशतक करुन जावे नि पॅव्हलियनमध्ये जाऊन ’हे कसं काय बुवा झालं’ म्हणून स्वत:च विचारात पडावे तसे माझे झाले.

माझी कविता समजण्यासाठी तुम्हाला माझ्या नेणिवेच्या आत डोकावून पहावे लागेल. कविता अशी हमरस्त्याने येऊन भेटत नाही, तिला आडवळणांचे हिरवे स्पर्श लागतात. अर्थांतरन्यासाच्या जाळीतून सरपटणार्‍या अर्थ-सर्पांच्या समोर, करुणामयी गायीचे डोळे जसे शांतवतात तशी कविता भेटायला हवी. प्राक्तनातील अवतरणांचे भारे वाहात असताना त्यात गुंतून न पडता, केवळ भारवाही या भूमिकेशी तादात्म्य राखत एखाद्या गोसावड्याप्रमाणे दिशांतापार जाता यायला हवे. एखादी कविता श्वत्थात्म्याच्या शिरी असलेल्या शिरोमण्याप्रमाणे वेदना देत असेल, तर फादर सर्जियसच्या आवेगाने ती छिलून काढली पाहिजे. एखाद्या मृत शेणकिड्याच्या अवशिष्ट राहिलेल्या कंकालाप्रमाणे तळहाती घेऊन जोजवली पाहिजे. त्यातून अर्थांचे किरण बाहेर पडणार नाहीत हे ठाऊक असूनही, एखाद्या पर्णहीन वृक्षाला फूल दत्तक दिल्याप्रमाणे अन्य कुण्या, कवितेची जाणीव वठलेल्या रसिकाला आंदण दिली पाहिजे. कुण्या आफ्रिकन कवयित्रीच्या स्वप्नी येणार्‍या त्या हिरव्या पोर्कुपाईनला स्मरून दारच्या इमानी कुत्र्यासाठी चार ओळींचे दान देता आले पाहिजे...

त्यानंतर असेच कधीतरी ’ब्रह्मांडाचे वांझ अंडे’ या शीर्षकाची एक कविता खरडून फेसबुक वॉलवर फेकून दिली. तिला नुसते लाईक्सच नव्हे तर काही प्रथितयश कवी, संपादक, समीक्षक यांची दादही मिळाली. मी या प्रकारचे वारंवार लिहिले पाहिजे असा सल्लाही मला एका समीक्षक/संपादकाकडून मिळाला.

पोस्ट केलेला परिच्छेद आणि ही कविताही माझ्या स्वत:च्या मते संपूर्णपणे भंपक आहे! किंबहुना तोच माझा उद्देशही होता. कोणत्या दृष्टिकोनाशिवाय, भाष्याशिवाय, प्रतिमासृष्टीशिवाय, वास्तवाच्या प्रेरणेशिवाय मांडलेली ओळींची उतरंड कविता म्हणून खपवले जाण्याचा अनुभव तर नित्याचाच होता. पण एखाद्या शाळकरी मुलाने लिहिलेल्या निबंधात लिहिल्यासारखा एक परिच्छेदच एकदा कविता म्हणून खपवलेला पाहिला. त्यावेळी आलेल्या वैतागातून अक्षरश: जे शब्द सुचतील ते पुढच्या ओळीत फेकत, मागचा पुढचा काहीही विचार न करता, कसेही वाक्य पुरे करत ती कविता(?) मी लिहिली होती.

त्यावर आलेले प्रतिसाद नि लाईक्स पाहून स्वत:च्या साहित्यिक समजाबाबतचा माझा न्यूनगंड आणखी बळावला. ज्यात कवीने(?) स्वत:च कोणता आशय ओतलेला नाही त्यात या स्तुतिभास्करांना काय सापडले असावे? दिलखेचक शब्द? अगम्यता (तेच मूल्य?)? ’मला माझ्याच या कवितेचा अर्थ लावून हवा आहे. देईल का कुणी?’ असा प्रश्न मी केला असता या समस्त स्तुतिभास्करांनी गप्प बसणेच पसंत केले.

पहिला परिच्छेद हा साधारण ग्रेस किंवा जीए यांनी लिहिल्यासारखा आभास होत असावा. त्यातून त्यांच्या चाहत्यांना हे लेखन ’आपल्यापैकी’ वाटलं असावं असा माझा संशय आहे. त्यातून त्यांनी केलेली लाईक-खैरात पाहून ’मति गुंग जाहल्या पाहुनि आपल्या लायका’(१) अशी माझी गत झाली.

MonkeysWrite
https://fewfleetingmoments.files.wordpress.com/ येथून साभार.

या अनुभवावरुन दशकभरापूर्वी पाहिलेल्या ’साराभाई व्हर्सेस साराभाई’ या विनोदी मालिकेमधील एक एपिसोड आठवला. इंद्रवदन साराभाई हा पत्नी मायाच्या नाटकाचा फज्जा उडवण्यासाठी तिच्यासाठी लिहून आलेला नाटकाचा मसुदा पळवतो. त्यानंतर एक माळी, प्लमर आणि म्युनिसिपालिटीतील एक शिपाई यांना एका जागी बसवून त्यांना सुचेल ते लिहून घेतो. ती वाक्ये नाटकातील पात्रांच्या तोंडी घुसवून नवा मसुदा बनवतो नि मायासाठी ठेवून देतो. एका समीक्षकासमोर त्या पहिल्या मसुद्याचे वाचन होणार असते.

ते जेव्हा सुरु होते तेव्हा प्रेक्षकांच्या दृष्टीने धमाल घडते. पण माया आपले सारे कौशल्य वापरून त्या निरर्थकाला अर्थ देण्याचा प्रयत्न करते. त्यातच समीक्षक आधीच (सकारात्मक) पूर्वग्रह घेऊन आलेला असल्याने, किंवा तो ही भंपकच असल्याने, किंवा ’तू माझी भलामण कर मी तुझी करतो’ या गटबाजीच्या तत्त्वाला अनुसरून तो त्या लेखनाची तारीफ करतो. थोडक्यात मायाचा पोपट करायला गेलेल्या इंद्रवदनचा स्वत:चाच पोपट होतो... माझे ब्रह्मांडाचे अंडे माझ्याच डोक्यावर फुटून झाला तसा!

मध्यंतरी अशाच एका अगम्यताप्रेमी स्वघोषित कवीशी थोडी चर्चा झाली होती. तो अर्थातच 'जुन्या सुगम कवितेने साहित्याचा कचरा केला आहे. (पुलंनी गद्य साहित्याचा केला तसा... म्हणे.)’ वगैरे टेप नेहमी वाजवणारा. त्याला म्हटलं, "तुझी कविता काही वेगळे सांगते, जिचा आस्वाद कसा घ्यावा हे अनेकांना समजत नाही. हरकत नाही. तू जुनी काव्यदृष्टी खोडून नवी काव्यदृष्टी रुजवण्याच्या दृष्टीने आम्हां जुनाट कवितेच्या रसिकांचे बौद्धिक घे. शिकवणी घे."

त्यावर पहिली प्रतिक्रिया होती, "मी बरेच ठिकाणी लिहिले आहे. ते वाच."
मी म्हटलं, "बाबा रे, एकतर ते सामान्यांना उपलब्ध नाही. आणि जे आहे ते तुझ्या कवितेहून अगम्य आहे. कविता सुगम नसली तरी चालेल, शिकवणी तर सुगम हवी."
तो म्हणे, "मी कवी आहे मास्तर नाही. आपली अभिरुची आपणच विकसित करायला हवी. त्यासाठी स्वत:च अभ्यास करायला हवा."
मी म्हटलं, ’बाबा रे, मी थोडाफार केलाय. कदाचित हा माझा गैरसमज आहे अशी शक्यताही आहे. पण तरी नाही समजली बुवा तुझी कविता. आता मी काय करायला हवे?"
"बरोबर आहे. मुळात प्रामाणिक प्रयत्नच करायचे नाहीत, वाकड्यातच शिरायचं. नवं काही नको. त्याच त्या झाडा-फुलांच्या फालतू कविता वाचायच्या, मिरवायच्या आहेत तुम्हाला." असे फणकारुन त्याने विषय संपवला.

गंमत अशी, की तो जेव्हा मागच्या साहित्यिक पिढीबाबत खडेफोड कार्यक्रम करत असतो, तेव्हा ’मागच्या पिढीचे लेखन नाकारताना तूही प्रामाणिक प्रयत्न केला नाहीस.’ असा आरोप करुन मी ही त्याला खोडून टाकू शकतो. जवळजवळ प्रत्येक तर्काला प्रतिबिंब-स्वरूप विरोधी तर्क देता येईलच. तेव्हा तर्ककर्कशता सोडून आस्वादाचा विचार का करु नये?

आमच्या वरील चर्चेतील स्वयंघोषित कविच्या म्हणण्याचा गोषवारा असा निघतो की, ’तुमची अभिरुची बकवास आहे! का, तर आम्ही म्हणतो म्हणून. आमचे लेखन वा आम्हाला आवडणारे लेखन ग्रेट आहे... पुन्हा, आम्ही म्हणतो म्हणून! ते कसे ते विचारु नका. आम्ही सांगितले तरी समजावे इतकी तुमची कुवत नाही. नाहीतर स्वत: अभ्यास करा. नाही समजले तरी आम्ही म्हणतो म्हणून त्याला श्रेष्ठ म्हणा. नाहीतर आम्ही तुम्हाला ओल्ड जेनेरेशनवाले, टुकार अभिरुचीचे म्हणणार.’ हाच अनुभव मला गद्य लेखन करणार्‍यांबाबत, चित्रपटादी दृश्य कलांबाबतही आला.

तेव्हा पासून ’छान किती दिसते फुलपाखरू’ किंवा ’देवा तुझे किती सुंदर आकाश’ ही माझी सर्वात आवडती कविता आहे असे बेधडकपणे सांगू लागलो. अमर चित्र कथांमधील चित्रे ही जग्गात भारी आहेत, 'खोटे कधी बोलू नये, चोरी कधी करु नये’ वगैरे सांगणार्‍या बोधकथा माझ्या दृष्टीने जगातील सर्वश्रेष्ठ कथा आहेत' असे स्वत:च सांगू लागलो. हो, म्हणजे अशा उन्नतनासिका मंडळींनी आपल्याला खोक्यात (compartment) बसवण्याआधी आपणच त्यात जाऊन बसून त्यांचा पोपट केलेला चांगला. तसेही नसलेल्या उच्च अभिरुचीचा आव आणणार्‍यांपेक्षा आपल्या सामान्य अभिरुचीशी प्रामाणिक असणारे माझ्या मते अधिक चांगले म्हणता येतील.

विना कारणे मी बोलेन । बोली विरूपाचे रूप दावीन ॥
अगम्य वा अर्थहीन । श्रेष्ठता मोठी ॥(२)

असे म्हणणारे 'विरुपाक्ष' लेखक विरूपतेला कला आणि विध्वंसकतेला काव्य म्हणून खपवण्याचा आटापिटा करत असतात. शब्दांचा अस्ताव्यस्त भडिमार करून वाचकाला हतबुद्ध करून सोडणारे स्फुटच कविता म्हणून खपवू पाहणारे अनेक जण त्याच्या आशयाबाबत बोलायला नाखूष असतात हे ओघाने आलेच. अनाकलनीयता, दुर्बोधता हे श्रेष्ठ ठरू पाहणार्‍या कलेचे, साहित्याचे अपरिहार्य आयाम अथवा पैलू झाले आहेत. 'त्यांची तीव्रता जितकी अधिक, तितकी कला अधिक श्रेष्ठ' असे काहीसे प्रस्थापित होते आहे. ’ब्रह्मांडाचे वांझ अंडे’बाबत नेमके हेच झाले आहे.

कलेचा आविष्कार जितक्या कमी लोकांना उमगेल तितका तो श्रेष्ठ असे काहीसे प्रस्थापित होताना दिसते. बरं मग या ’मूठभरांनी, मूठभरांसाठी, मूठभर घडवलेले साहित्य वा कला’ यांना सामान्यांमध्ये स्थान नाही याबद्दल आगपाखड या स्वयंघोषित श्रेष्ठींनी का करावी? सर्वसामान्यांचे याबाबत प्रबोधन करा म्हटले तर ’ती आमची जबाबदारी नाही’ म्हणायचे कारण आम्ही साहित्यिक/कलाकार आहोत, (वरच्या संवादात म्हटले तसे) मास्तर थोडीच आहोत?

मग नाईलाजाने सर्वसामान्य जनता आपल्यासमोर जे आहे, त्यात आपल्या आकलनाच्या मर्यादेत मिळणारा आनंद मानू लागली, त्याचा आस्वाद घेऊ लागली, की 'साहित्य/कलांचे अवमूल्यन होते आहे' म्हणून ओरडायलाही आम्हीच तयार. थोडक्यात ’तुम्ही गाढव आहात’ असे म्हणणार्‍या या स्वयंघोषित शहाण्यांसमोर ’हो आम्ही गाढव आहात नि तुम्ही देवतुल्य आहात.’ अशी शरणागती बहुसंख्येने द्यावी अशी यांची अपेक्षा आहे का?

बरं समजा ती ही दिली. तरी त्यातून यांच्या स्वयंघोषित श्रेष्ठ साहित्याचा, कलेचा प्रचार-प्रसार कसा होणार आहे? की डोक्यावर देव्हारा घेऊन त्यात टाक मिरवावा तसे यांचे लेखन सामान्यांनी मिरवावे अशी यांची अपेक्षा आहे? ’गजलेला दोनच गोष्टी मारक असतात; अनभिज्ञाची दाद आणि जाणकाराचे मौन’ अशा अर्थाचा एक शेर आहे. तो यांना माहित नसावा का? की फेसबुक लाईकच्या पातळीवरची अनभिज्ञाची दाद यांना पुरेशी वाटते?

की त्यांच्या मते श्रेष्ठ असलेल्या साहित्य-कला यांचा प्रचार-प्रसार हा यांचा उद्देशच नाही, केवळ ’जे श्रेष्ठ आहे ते फक्त मला नि माझ्यासारख्या मोजक्यांनाच ठाऊक आहे.’ असे सर्टिफिकेटच त्यांच्या मते अज्ञ जनांकडून त्यांना हवे आहे? ’ते जर अज्ञ आहेत तर त्यांची अभिरुची आपण दुर्लक्षित ठेवली तरी पुरेसे आहे’ असे यांना का वाटत नसावे?

’जीएंचे लेखन म्हणजे मोठ्यांचा चांदोबा’, ’लंपनवरचे साने गुरुजी टाईप लेखन’ वगैरे शेरेबाजी करुन आपल्या दृष्टीने महत्त्वाचे साहित्य सामान्यांमध्ये पोचवण्यापेक्षा ’मी लै भारी’ हा उद्दाम अहंकारच दिसत नाही का? आणि अशा अहंकारी लेखनाला फक्त त्यांच्या भाटांची किंवा त्यांच्यासारख्या उन्नतनासिका स्वयंघोषित रसिकांचीच दाद मिळणार आहे. त्यातून त्यांचा वैताग, वैफल्य जाहीर होण्यापलिकडे काहीच बदल होणार नाही हे यांना समजत नसावे का?

यांच्यापैकी एखादा म्हणेल की, "’ब्रह्मांडाचे अंडे’मध्ये तुझ्याही नकळत तू काहीतरी आशयघन लिहिले असेल, तुला समजले नसेल पण त्यांना दिसले असेल." चला हे ही मान्य करु. समजा अशा यांत्रिक पद्धतीने लिहिलेल्या कविता कविता-रसिकांना नि जाणकारांच्या पसंतीस उतरल्या, मी त्यांचा काव्यसंग्रह मी काढला नि त्याला कुठ्ल्याशा साहित्यसभेचा वा ग्रंथालयाचा पुरस्कार जाहीर झाला. आता मला असा प्रश्न असा पडला आहे, की हा पुरस्कार मी स्वीकारावा का?

ज्या अर्थनिर्णयनाच्या, रसास्वादाच्या आधारे त्याची निवड झाली तो मला स्वत:ला अपेक्षित नव्हताच. या कवितेत तर मला निरर्थकताच अपेक्षित होती. म्हणजे पुरस्कार-परीक्षकाच्या मनातील कविता, तिचे परिशीलन ही माझी निर्मितीच नाही मुळी. मग जी माझी निर्मिती नाही, तिचा कर्ता म्हणून मी तो सन्मान स्वीकारणे कितपत नैतिक आहे?

जिथे खुद्द कवीनेच कोणत्याही अभिव्यक्तीशिवाय, भाष्याशिवाय शब्दांची चळत लावली आहे, तिथे इतरांना त्यात कोणती अभिव्यक्ती दिसते? आणि सापेक्षतेचा मुद्दा विचारात घेतला तर मग ’रसिकाला दिसते तेच कवीला अभिप्रेत असावे असे नाही’ हे मान्य करावे लागेल. आणि तसे असेल तर रसिकाला ती कविता आवडली याचे श्रेय कवीला का मिळावे? जे त्याने निर्माणच केले नाही, जे कदाचित रसिकानेच निर्माण केले, त्याचे श्रेय त्या रसिकाकडेच राहायला हवे. थोडक्यात कवीने जी कविता दिली तिची भूमिका साधारणपणे एखादा पदार्थ रांधण्याच्या कच्च्या मालाची आहे. त्यांच्या सहाय्याने कोणता पदार्थ बनवावा हे ज्याचे-त्याचे स्वातंत्र्य आहे असे म्हणू या. मग ज्याने तो बनवला त्यालाच तो गट्ट करु द्यावा की.

त्याचप्रमाणे कवीची अभिव्यक्ती आणि परीक्षकाची अभिरूची नि आकलन यात फरक असेल, तर तो पुरस्कार तो कवीला का द्यावा? ’कर्ता-करविता तो आहे. त्याने लिहून घेतले. मी तो हमाल भारवाही’ असे कृतक-विनयाने म्हणणारे त्याबद्दल मिळालेला साहित्यिक पुरस्कार मात्र स्वीकारतात तेव्हा तेव्हा मला हा प्रश्न पडतो. या लेखक वा कविच्या हातून निर्हेतुकपणे आशयसंपन्न कविता लिहिली गेली असेल, तर तो तिचा कर्ता म्हणावा का? त्याचप्रमाणे एखाद्याला तुफान आवडली नि दुसर्‍याला कचरा वाटली तर मूळ कवितेचा दर्जा काय म्हणायचा? तो ठरवण्याचे निकष कुठले?

जेव्हा वास्तववादी शैलीपलिकडे सर्व प्रकारच्या चित्रशैलींना सरसकट ’मॉडर्न आर्ट’ म्हटले जात असे, त्या काळात तिची टिंगल करणारे लोक ’कुत्री-मांजरी रंगात बुडवून कॅनव्हासवर नाचवली आहेत’ असे म्हणत असत. एखाद्याने खरोखरच तसे केले नि ते चित्र नावाजले गेले, तर त्याबद्दल कलेच्या क्षेत्रात तथाकथित चित्रकाराला मान मिळावा की त्याच्या मांजरीला? (इथे आयनेस्कोच्या ’र्‍हिनसोरस’मधला तत्त्वज्ञ ’मांजर निरर्थक फटकारे मारते, काळे निरर्थक लिहितात, म्हणून काळे मांजर आहेत.’(३) असा निष्कर्ष काढेल अशी भीती मला वाटते.)

याबाबत की काही कविंना छेडले होते. पण एकुणात असे दिसते की त्यांच्या स्वत:च्या कवितेबद्दल, लेखनाबद्दल बोलते करण्याचा प्रयत्न केला होता. ’लेखकाने स्वत:च स्वत:च्या कलाकृतीबद्दल बोलायचे नसते.’ असे म्हणून ही मंडळी आपली शेपूट सोडवून घेताना दिसतात.

मग मला अनेकदा संशय येतो, की त्यांची कलाकृतीदेखील ’ब्रह्मांडाचे वांझ अंडे’ सारखी यांत्रिक करामत असू शकते. जी लयीने, वा केवळ तांत्रिक करामतीमुळे अथवा भाषिक सौंदर्याने लोकांना भावलेली असेल. कदाचित त्यातील अगम्यता, शाब्दिक फुलोरा, खुर्चीवर बसल्या-बसल्या केलेला जळजळीत विद्रोह, थेट लैंगिक उल्लेख यांनी दिपून जाऊनही वाचक ’आपल्याला कळत नाही, पण काहीतरी भारी आहे.’ म्हणत त्याला दाद देत असतील. अशी छद्म-रसिक मंडळी त्याबद्दल प्रश्न करणार्‍यावर ’तुम्हाला कविता समजत नाही, समज कमी आहे तुमची’ म्हणून डाफरून झटकून टाकतात किंवा तुच्छतेने ’तुम्ही आपल्या पानाफुलांच्या कविता वाचा’ म्हणून टिंगल करताना दिसतात.

यावर एका लेखकाने खासगीत असे सांगितले की ’लेखकाचा हेतू नि एखाद्या वाचकाला दिसलेला अर्थ वा हेतू जुळला नाही’ तर असा वाचक गमावण्याचा धोका असतो. पण माझ्या मते लेखक नि अनेक वाचक यांच्या सामूहिक रसास्वादातून त्या साहित्यकृतीमधून एकाहून अधिक पर्यायी शब्दचित्रे, अर्थपात्रे तयार झाली तर ते चांगलेच नाही का? मला उलट अशी विविध प्रतिबिंबे दाखवणारी कलाकृती आवडेलच.

’मलेना’ नावाचा एक इतालियन चित्रपट आहे. तो युद्धाच्या पार्श्वभूमीवरील सामाजिक अध:पाताचे चित्रण करणारा चित्रपट म्हणून पाहता कसा दिसतो, त्या परिस्थितीमध्ये वावरणार्‍या एका स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून पाहिला तर तो कसा दिसतो, आणि पौगंडावस्थेत नुकतेच पदार्पण केलेल्या, लैंगिक आकर्षण व जाणीव नुकतीच जागी झालेल्या मुलाला केंद्रस्थानी ठेवून पाहिला, वा त्याच्या नजरेतून पाहिला तर तो कसा दिसतो हे पाहणे अनुभवणे आनंददायक होते. हा चित्रपट मी स्वत: तीन वेळा पाहिला. तरुण वयात एकदा नि मध्यमवयीन झाल्यावर दोनवेळा. प्रत्येक वेळी माझे वय नि त्यावेळची मानसिकता वा परिस्थिती यानुसार मला यातील एक केंद्र अधिक ठळक, तर इतर दोन धूसर दिसली आणि त्यातून चित्रपटाचा वेगवेगळा अन्वयार्थ लागत गेला.

अशाच प्रकारे विविध पापुद्रे वा अनुषंगे असणारी साहित्यकृती विविध रसिक व जाणकाराला वेगळा अनुभव देतील. हे लेखक, रसिक नि जाणकार अशा तिघांनीही समजून घ्यायला काय हरकत आहे? आपल्याच कलाकृतीबद्दल बोलताना लेखक त्याच्या दृष्टिकोनातून, हेतूच्या आधारे बोलत असतो हे गृहित धरले तर विसंगतीचा दोष निर्माण होणार नाही. पण त्यासाठी ’मी मांजर नाचवतो नि चित्र काढतो. शंभर लोक त्यातून शंभर अर्थ काढू देत. पण त्या सर्व आशय-शक्यतांचा स्वामी मलाच मानले पाहिजे’ हा हट्ट चित्रकाराने, कविने, लेखकाने सोडायला हवा.

पुन्हा पुरस्काराकडे (आणि मांजरांकडे) यायचे तर प्रश्न हा की लेखक/कवीच्या हेतूचा भाग नसलेल्या अर्थाच्या, रसपरिपोषाच्या आधारे जर ती कलाकृती नावाजली गेली, तर ते लेखक/कवीचे श्रेय मानावे का? कुणी म्हणेल एखाद्या लहान मुलाने रंगाचे निर्हेतुक फराटे मारले नि त्यात तुला मांजर दिसली, तर निदान फटकारे मारल्याचे श्रेय देशील की नाही? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर होय असे आहे. फक्त महत्त्वाचा मुद्दा असा, की मी त्याला रंगांचे फटकारे मारल्याचे श्रेय देईन, मांजराचे चित्र काढल्याचे नव्हे! माझ्या मते तो रंगकाम करणारा आहे, चित्रकार नव्हे. त्याच्या अभिव्यक्तीचे चित्राशी, शब्दांच्या क्षेत्रात अर्थाशी एकरुपत्व असेल तेव्हाच मी त्याला चित्रकार वा साहित्यिक/कवी म्हणेन.

असं म्हणतात की 'अनंत संख्येने माकडे जमवून त्यांना टाईपरायटर (आता संगणकाचा कळफलक) दिले, तर त्यांच्या निर्हेतुक कळफलक बडवण्यातूनही कधीतरी शेक्स्पिअरचे एखादे सुनीत लिहिले जाईल अशी शक्यता असते.' (तिची संभाव्यता शून्य नसते.) पण ती माकडे त्याच्या आशयाचे स्वामी म्हणता येतील का? असा माझा प्रश्न आहे.

- oOo -

(१) मूळ ओळ: ’श्रुति धन्य जाहल्या श्रवुनि अपुली वार्ता’ ही कुसुमाग्रजांच्या ’वेडात मराठे वीर दौडले सात’ या कवितेमधील.

(२) मूळ ओवी:

तेणे कारणे मी बोलेन । बोली अरूपाचे रूप दाविन ।
अतींद्रिय परी भोगवीन । इंद्रियाकरवी ॥ (ज्ञानेश्वरी: ३६/६)

(३) मूळ विधान: ’सगळी मांजरे मरतात, सॉक्रेटिस मेला आहे, म्हणजे सॉक्रेटिस मांजर आहे.’


संबंधित लेखन

1 टिप्पणी:

  1. अत्यंत मूलभूत प्रश्न करणारे सैद्धांतिक लेखन आहे हे. पण या जवळ जाणारे काही लिहिणारा विश्लेषक मराठीत नाही. असल्यास माझ्या वाचनात नाही.

    उत्कृष्ट कलाकृती ही आधी सर्वांना समजायला हवी आणि नंतर तिने आशयघनतेचे स्तरावर स्तर उलगडायला हवेत, हे सांगणारा समीक्षक महाराष्ट्रात जन्मलाच नाही. गवता ऐसें उगवले, ते दुर्बोधतेचे पाईक आणि जन्मले ते काल्पनिक श्रेष्ठत्व!

    उत्तर द्याहटवा