-
प्राचीन काळी मी संगणक-क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही स्वयंसिद्ध (stand-alone)(१) स्वरूपाची प्रणाली (software) सॉफ्टवेअर तयार करत असू. तिचा आराखडा आमचाच नि तयार करणारे आम्हीच. त्यात काय काय असावे, कसे असावे हे निश्चित करणारा पहिला planning टप्पा असे. त्यानंतर त्याचा डोलारा (skeleton) तयार केले जाई. मग प्रत्यक्ष कार्य करणारे विभाग एक-एक करुन भरले जात.
आता याचा पुढचा महत्त्वाचा टप्पा सुरु होई. यात त्याची प्राथमिक वैधता-चाचणी (testing) आणि/किंवा QA अर्थात गुणवत्ता-तपासणी केली जाई. त्यानंतर यात सापडलेल्या ढोबळ चुका दुरुस्त करुन ही प्रणाली अधिक भक्कम केली जाई. यात अपेक्षित निकाल मिळतो आहे ना हे तपासण्याबरोबरच अनपेक्षित निकाल येत नाही ना या दिशेनेही चाचणीचे टप्पे पार पडत. ते पार पडल्यानंतर हे कंपनीच्या बाहेरील काही तज्ज्ञांना Beta-tester म्हणून नेमून त्यांच्याकडे सुपूर्द केले जाई. रुढ चौकटीमध्ये काम करणार्या कंपनीतील कामगारांच्या नजरेस न पडणार्या चुका या टप्प्यात सापडतील अशी अपेक्षा असे.
या बाह्य तज्ज्ञांचे तपासणी काम चालू असताना कंपनीमध्ये या प्रणालीला विक्रीयोग्य (commodity) म्हणून विकसित करण्याचे काम चालू होई. यात या प्रणालीकडे ग्राहकाच्या भूमिकेतून पाहून काही अडचणी येतात का याची चाचपणी सुरु होई. आधी याचे संभाव्य ग्राहक कोण, ते या प्रणालीचा वापर प्रामुख्याने कशासाठी नि कुठल्या संगणकावर करतील, त्यांची ते संगणक वापरण्याची शैली कुठली असावी, त्याआधारे आपल्या प्रणाली वापरताना ते कुठे अडतील, वगैरे बाबी ध्यानात घेतल्या जात. (याचा एक लहानसा टप्पा (user trials) आराखडा पातळीवरही घेतला जात असे.)
या चाचणीचे कारण म्हणजे जे माझ्या संगणकावर मिळते तेच ग्राहकाकडे मिळेल, याची शंभर टक्के खात्री देता येत नसे... अनेक बाबतीत आजही देता येत नाही.
प्रत्येक संगणकाला माणसाप्रमाणेच स्वतंत्र अस्तित्व असते. माणसाला जसे दोन हात, दोन पाय, एक डोके, त्यावर दोन डोळे, दोन कान, एक नाक, एक तोंड आदी मूलभूत शारीर वैशिष्ट्ये समान असली तरी शारीरिक उंची, कांती (रंग), जाडी, वजन, केसांची ठेवण, नाकाची ठेवण, डोळ्यांच्या बाहुलीचा रंग... अशा काही बाबींमध्ये फरक असतो. मूलभूत शारीर वैशिष्ट्यांचा गट हा मनुष्यप्राण्यांच्या गटात बसवण्यास म.सा.वि. असला तरी ही बाकीची वैशिष्ट्ये एका व्यक्तिला दुसरीपासून वेगळे दाखवू शकतात.
याच प्रमाणे कोणत्याही संगणकासाठी (मोबाईल क्षणभर बाजूला ठेवू) एक स्क्रीन, एक मायक्रोप्रोसेसर, RAM, हार्ड-डिस्क वा तत्सम स्टोरेज डिव्हाईस, माऊस नि की-बोर्ड ही जड अनुषंगे तसंच ऑपरेटिंग सिस्टमसारखे प्रणाली अनुषंग इतके किमान आवश्यक असते. पण त्या पलिकडे दोन संगणकांमध्ये बरेच फरकही असतात.
संगणकावर– ऑपरेटिंग सिस्टम कोणती आहे यावर टेम्पररी फाईल्स कुठे असतील ते ठरत असते. सिस्टमचा फॉण्ट साईझ (लार्ज, स्मॉल, कस्टम) काय आहे त्यानुसार स्क्रीनवर दिसणारे चित्र सुबक दिसते की विरुप हे ठरते. लोकाल (Locale) वेगवेगळा असेल, तर अंक दाखवण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. उदाहरणार्थ काही देशांत स्वल्पविराम हे चिन्हच दशांशचिन्ह म्हणून वापरले जाते. विविध देशांमध्ये भाषा वेगळी, त्यांची लिपी डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे लिहिली जाऊ शकते. तारखा लिहिण्याचे प्रत्येक देशाची तर्हा निराळी. इंटरनेटचा संबंध येणार असेल तर ब्राउजर, त्यातील डिफॉल्ट फॉण्ट आणि एनकोडिंग असे अक्षरश: अनेक फरक असतात.
तुमचे सॉफ्टवेअर यातील एक प्रकार गृहित धरुन काम करत असेल तर त्यातून अपेक्षित output मिळण्याची शक्यता सापेक्ष होऊन जाते. आणि ग्राहक हा केवळ ग्राहक असल्याने त्याला या बिघाडाचे वा बदलाचे कारण समजत नसते. ‘अपेक्षित आउटपुट हवे असेल तर आम्ही सांगतो तशा configuration चे मशीन घ्या’ असे सांगता येत नसते(२). तुमच्या एका प्रणालीसाठी संगणकाचे configurations आणि/ किंवा settings बदलले तर तो/ती वापरत असलेल्या इतर प्रणालींना धक्का लागू शकतो.
त्यांच्याकडे जे आहे त्यावर आपले सॉफ्टवेअर चालणे आवश्यक असते. कारण एकतर पैसे ते देणार असतात. त्याचे काम चालले नाही, तर नुकसान आपले होणार असते. हे टाळण्यासाठी, अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी संभाव्य ग्राहकांच्या संभाव्य संगणकांमधील बहुसंख्य प्रकारांचे नि आपल्या प्रणालीचे जमावे लागते. ही खातरजमा करण्याचे काम या शेवटच्या टप्प्यात करावे लागते.
---
कट टू:
फेसबुकवर अनेक मंडळी थोड्या अधिक लांबीच्या पोस्ट करतात. काही वेळा चांगले मुद्दे लिहिलेले असतात. पण तरीही पुरे वाचताना प्रचंड जाच होतो. कारण ही मंडळी लिहिण्यामध्ये व्याकरणाचे नियमच नव्हे, तर ड्राफ्टिंगच्या सुसूत्रतेची पार ऐशीतैशी करतात.
यात सर्वाधिक दिसून येणार प्रकार म्हणजे अर्धवट तुटलेली वाक्ये; याचे मुख्य कारण ही मंडळी आपल्या स्क्रीनच्या सोयीने ड्राफ्टिंग करतात. ही बव्हंशी मोबाईलवरून लिहिणारी असावीत असा माझा तर्क आहे. लॅपटॉपच्या मोठ्या स्क्रीनवर, मोठ्या स्क्रीनच्या मोबाईलवर, एखाद्याच्या मोबाईलवर फॉण्ट मोठा ठेवल्यामुळे... हा प्रकार विचित्र रांगोळी घालणारा दिसतो. पुढे वाचण्याची - निदान माझी - इच्छा मरुन जाते. वाक्यांच्या अधेमध्ये एन्टर मारल्यामुळे विचित्र स्वरूपाचे शब्दांचे समूह समोर दिसतात. ‘हां, याने/हिने इथे एन्टर मारलेले दिसते, म्हणजे वाक्य इथे पुरे होत नाही’ हे तर्काने जाणून घ्यावे लागते. बरं एन्टर का मारले? तर या व्यक्तिच्या स्क्रीनची रुंदी संपली असते, म्हणून हे चिरंजीव एन्टर मारून नव्या ओळीत जातात.
त्या पलिकडे वाक्ये व्याकरणदृष्ट्या देखील कशीही तुटलेली दिसतात. अनेकांची ती पुरीही झालेली नसतात. कर्तरी प्रयोग, कर्मणि प्रयोग वगैरेंची ऐशीतैशी झालेली असते. क्रियापद एका प्रकारचे नि क्रियाविशेषण दुसर्याच असा प्रकार वारंवार होतो. वाक्यांची गाडी सुरु झाली आहे म्हणजे कुठेतरी पोहोचायला हवी म्हणून सरपटत कुठेतरी पोहोचते इतकेच. एकत्रितरित्या त्या वाक्याचा अर्थ लावताना घाम फुटतो.
इंटरनेटच्या जगात ‘वापरली तर माथा आळ लागे’ असा समज असलेली विरामचिन्हे तर बव्हंशी गायबच असतातच. (अनेक प्रथितयश इंग्रजी वृत्तपत्रांच्या साईट्सवर विरामचिन्हे जवळजवळ नसतातच. अगदीच नाइलाज झाला तर वापरली जातात. एरवी वाचकाने डोके खाजवून ते वाक्य कसे वाचावे ते ठरवावे.) केलाच तर मन मानेल तसा, ‘केला न केला काय फरक पडतो?’ अशा मोकाट ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्या’च्या बाण्याने केलेला असतो.
असाच काहीसा अनुभव एका भेट आलेल्या पुस्तकाबाबत झाला होता. विरामचिन्हे पुरी गायब नि परिच्छेद यादृच्छया केलेले; क्वचित पुरे पान नि पुढचे पान असा ऐसपैस परिच्छेद पसरलेला... कंटेंट चांगला असून पुढे वाचणे अवघड होत गेले होते.
बर्याच ब्लॉगलेखकांबाबतही हाच अनुभव येतो. एकाच पोस्टमध्ये वेगवेगळे फॉण्ट, वाक्ये नैसर्गिकरित्या पुरी होऊ न देता एन्टर मारून मोडतोड केलेली असे प्रकार घडताना दिसतात.
या सार्या लेखकांबाबत मला नेहमी असा प्रश्न पडतो की ‘बाबांनो, तुम्ही जर इतरांसाठी म्हणून काही लिहित आहात, तर त्यांना ते कसे दिसते हे किमान एकदा उघडून पाहाल का?’ वर संगणक-प्रणालींबाबत आहे तेच तुमच्या लेखनाबाबतही असते. अगदी फेसबुकही सगळ्यांसाठी सारखे असले, तरी प्रत्येकाचा संगणक, मोबाईल टॅब वेगळा असू शकतो. ते ही एकाच कंपनी, मॉडेल, (गुगल नि अॅपलकृपेने) ऑपरेटिंग सिस्टम तीच असेल तरी फॉण्ट साईझ कमी जास्त असू शकतो, मोबाईलच्या स्क्रीनची रुंदी कमी-जास्त असू शकते. एखाद्याकडे ७ इंची तर एखाद्याकडे ९ इंची स्क्रीन असलेला मोबाईल असतो. ज्याच्याकडे आयफोन आहे त्यावर ब्राउजर सफारी असतो, त्याचा फॉण्ट वेगळा असतो. त्याच्यामुळे स्क्रीनवर एका ओळीत किती शब्द बसतील त्यांची संख्या वेगळी असते.
बाबांनो, तुम्ही एन्टर मारून ‘इथे ही ओळ संपवून वाक्यही पुरे करा’ असा आदेश दिलात तरी त्या बिचार्या ब्राउजरला त्याच्या फॉण्टनुसार नि स्क्रीनच्या रुंदीनुसारच जावे लागते. एखाद्या वाक्यात तुम्ही कमी शब्द दिलेत म्हणून तो आकार वाढवणार नाही की जास्त बसवण्यासाठी तेवढ्या वाक्यात अक्षरांचा आकार कमी करणार नाही. तो तुमची ती आज्ञा त्याच्या आधीच नेमून दिलेल्या नियमांखेरीज अधिक वा जास्तीची म्हणून घेतो आणि ‘त्यांच्यासह’ तिचे पालन करतो. म्हणून तुकड्या तुकड्यांची वाक्ये दिसू लागतात.
यात बरीच मंडळी मला ‘आपले लेखन इतरांपर्यंत पोहोचवावे लागते. तू असे कर, तू तसे कर’ असा सल्ला देणारीही आहेत. मग त्यांना हा प्रकार आपले लेखन अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्यास अडथळा ठरतो हे का समजत नसावे? की आता बाजू बदलून ‘माझे ग्रेट लेखन लोक त्या अडथळ्यांना पार करुनही वाचतील’ अशी भूमिका घेणार आहेत?
यात सर्वाधिक समस्या ब्लॉग्सची आहे असा माझा अनुभव आहे. बहुतेक मराठी ब्लॉग्स अत्यंत वाईट पद्धतीने मांडलेले दिसतात. अगदी प्रथितयश लेखकांच्या ब्लॉगवर एकाच लेखात एकाहुन अधिक फॉण्ट्स, इमेजेस आणि मजकूर यांचा मेळ न बसणे, वरची मुख्य समस्या असलेली तुटकी वाक्ये, कुठेही फेकून दिलेल्या इमेजेस असा प्रकार दिसतो. मग मांडणीचा विचार नि वाचकाच्या भूमिकेत जाऊन त्याला काय सोयीचे नि सुलभ पडेल याचा विचार तर दूरच राहिला.
यात बहुतेक मंडळी ‘कागदावरचे श्रेष्ठ’ मानणारी असतात नि ब्लॉग हा केवळ बॅकअप म्हणून वापरतात. त्यामुळे त्याकडे फारसे लक्ष द्यावे असे त्यांना वाटत नसते. छापून आलेल्या लेखाची पिचकारी इथेही मारली की त्यांचे काम संपते. पोस्ट करून झाली की ती पोस्ट ते पुन्हा उघडूनही पाहात नसावेत इतक्या ढोबळ चुका त्यात असतात.
मी स्वत: माझा ब्लॉग लॅपटॉप, मोबाईल, टॅब्लेट यावर चेक करुनच त्यांचा लेआउट फायनल करत असतो. कोणतीही वेबसाईट या तीनही प्रकारात वेगवेगळी दिसू शकते. यावर एक आळशी उपाय म्हणून मोबाईल लेआउटच डेस्कटॉपवाल्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न काही जण करतात. (यात एक दोन बँकाही आहेत) पण हे मोबाईल ले-आउट डेस्कटॉपवर बहुधा भयाण दिसतात, विशेषत: फॉण्टसच्या बाबतीत. ‘आता शब्दांचा जमाना संपला, सगळं काही व्हिडिओमधून यावं’ असा जो अपसमज पसरला आहे त्याचप्रमाणे आता ‘मोबाईलधारकांचीच सोय पाहावी, डेस्कटॉप/लॅपटॉप नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत’ असाही समज पसरला असावा.
यातील एका प्रकारातही ब्राउजरनुसार फरक पडू शकतो. मी चारही प्रमुख ब्राउजरवर तपासतो. अर्थात ही तपासणी काही प्रत्येक पोस्टसाठी करावी लागते असे नाही. केवळ डिझाईन करताना करणे पुरते. ते करत असतानाच पोस्ट करताना काय काळजी घ्यावी, कशा पोस्ट कराव्यात हे समजून जाते. मग प्रत्येक पोस्ट करताना तेवढी काळजी घेतली की पुरते. (याच ब्लॉगवर ब्लॉगयात्रा या मालिकेमध्ये यावर एक भाग लिहिलेला आहे.)
जे ब्लॉगबाबत आहे तेच फेसबुक पोस्टलाही लागू पडते. मुद्द्याधारित परिच्छेद करता येत नसतील तर एक साधारण थंब-रुल वापरता येईल. अंदाजे चार ते सहा वाक्यांचा एक परिच्छेद करावा. वाक्यांशेवटी एन्टर मारू नये, सलग ही चार-सहा वाक्ये लिहावीत. मोबाईल, टॅब, लॅपटॉप आदी सर्वांचे स्क्रीन ती व्यवस्थित दाखवतात, स्क्रीनच्या बाहेर जात नाहीत याची काळजी ब्राउजर घेत असतो.
विविध माध्यमांसाठी या लेखन-नियमांत फरक पडतो. मध्यंतरी मी एका परस्पर उचल्या संपादकावर वैतागून एक तपशीलवार लेख लिहून हे फरक कसे पडतात हे लिहिले होते. दीर्घकाळ पत्रकारितेमध्ये राहिलेल्यांनाही हे का समजत नाही हे कोडे आहे मला. (संपादकांनी चिडून मला अनफ्रेंड करुन टाकले. 🙂 )
अशा किचकट लेखनशैलीत लिहिलेल्या पोस्ट वाचक तक्रार न वैतागता वाचतात. यात आपण आपली अधिकची ऊर्जा खर्च करत आहोत, दुय्यम दर्जाच्या ड्राफ्टिंगला रुढ करत आहोत याचे त्यांना भान नसते. आज शुद्धलेखनाची, प्रमाणभाषेची टिंगल करता करता आपण विरामचिन्हांशी, शब्दांच्या नेमकेपणाशीही वैर घेतले आहे ते असेच. याचा तोटा असा होतो की हे रुढ होऊन बसते.
आळशांच्या बहुमताच्या लोकशाहीचा एक तोटा मला मोबाईलवरील मराठी की-बोर्डमध्ये पाहायला मिळतो. तिथेही ‘व्हिडिओच्चं हवेत’ प्रमाणे ‘इन्टेलिसन्सच्चं पाहिजे’ म्हणणार्या गाढवांमुळे, ज्यात मला दहाही बोटांनी टाईप करता येते, माउसला हात लावण्याची गरज नसते, (याचा फायदा म्हणजे टायपिंगचा वेग बराच जास्त राहातो,) असे WYSWYG प्रकारचे (उदा. डेस्कटॉपवर गमभन किंवा बरहा) की-बोर्ड अस्तंगत झाले. इन्टेलिसन्सप्रेमी दोन अक्षरांनंतर आलेल्या ड्रॉप-डाउनमध्ये ‘ढूंढो ढूंढो रे साजना, मुझे चाहिए वो शब्द’ करत बसतात नि अपेक्षित सापड्ला की माऊस उचलून टुचुक करत बसतात. यात बराच वेळ जातो.
अगदी गुगलनेही सुरेख चालणारा गुगल इंडिक की-बोर्ड रद्द करुन जी-बोर्ड नावाचा बकवास प्रकार आणला आहे. ‘आपल्याला सगळ्यातलं सगळं कळतं’ असं समजणार्या एम्बीएधारकाप्रमाणॆ या कीबोर्डला आपले शब्द करेक्टं माहित असल्याचा भ्रम असतो. आणि बहुतेक वेळा आपल्याला अपेक्षित तो शब्दच त्याच्याकडे नसतो. मग तुकड्यातुकड्याने कसाबसा लिहावा लागतो.
त्याचे नियमही भयाण आहेत. सामान्यपणे ग्राहकाने दिलेली व्यंजने बदलू नयेत असा संकेत असायला हवा. पण बहुतेक इन्टेलिसन्स वापरणे कळफलक हा नियम धुडकावून लावतात. ते केवळ वारंवारतेचे नियम वापरतात. समजा मी ‘कला’ हा शब्द हवा म्हणून kala असे लिहिले की हे ‘कटा’ असा पहिला पर्याय देतात. कारण Kala पेक्षा Kata या अक्षरक्रमाचा वापर अधिक होत असतो. अरे बाळा, कळफलकावर l आणि t ही अक्षरे परस्परांपासून बरीच दूर आहेत. तेव्हा मी ‘चुकून’ t ऐवजी l लिहिले असे समजायचे कारण नाही. (एकुणातच ग्राहकाच्या चुका गृहित धरण्याचा हा प्रकार संतापजनक आहे.) Kala साठी त्याने ‘कल’, ‘कळ’,‘कला’, ‘कळा’, ‘काळ’, ‘काल’, ‘काला’, ‘काळा’ आदी पर्याय देणे आवश्यक आहे. यात व्यंजने राखून केवळ स्वरांच्या शक्यतांशी खेळ आहे. हे अधिक सयुक्तिक आहे. असो.
या गोंधळात भर असते ती लोकशाहीवादी(?), प्रमाणभाषाविरोधक मंडळींची. त्यांच्या चुकीच्या शब्दांना वारंवारतेमुळे प्राधान्य मिळते नि या ‘मठ्ठ इन्टेलिसन्स’चा राडा होऊन जातो.
ब्लॉग, फेसबुकसारखी लोकशाही माध्यमे सोडा, प्रथितयश मराठी वृत्तपत्रांच्या पोर्टल्सची स्थितीही ड्राफ्टिंगच्या बाजूने अतिशय भयाण आहे. पण त्याचे कुणालाच काही वाटत नाही. एकुणात राजकारणात असो की सोशल मीडियावर, लोकशाहीबाबत माझा भ्रमनिरास होत चालला आहे.
‘बहुमताचे ते योग्य’ म्हटले की गुणवत्ता आहेत तिथे स्थिर होऊन जाते. प्रगतीच्याच काय, सुधारणेच्या वाटाही बंद होऊन जातात. कारण या दोहोंनाही बहुमताच्या टप्प्याला मागे सोडून पुढे जाण्यासाठी वाव आवश्यक असतो. तिथे हे बहुमताचे लादणे गतिरुद्ध करणारेच नव्हे तर प्रतिगामीही ठरत जाते.
- oOo -
(१). हा प्रकार आता बव्हंशी रद्दबातल होतो आहे.[↑]
(२). हल्ली बँकेच्या वेबसाईट निर्लज्जपणॆ एखाद्या ‘विशिष्ट ब्राउजर वरच चालेल’ अशी शिफारस करतात, तेव्हा माझ्यातला QA वाला त्यांच्या नावे बिब्बे उगाळू लागतो.[↑]
---
संबंधित लेखन: ‘व्हायरल’च्या नावचा मलिदा ऊर्फ प्रस्थापितांची फुकटेगिरी
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५
आळशांच्या बहुमता...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा