<< मागील भाग
आणखी काही दिवस गेले आहेत. आता छोटू आजारी आहे. पण त्याच्या आईने हे कालिबाबूंना किंवा छोटूच्या वडिलांपासून लपवून ठेवले आहे. त्यांना समजले तर पुढे काय होईल हे तिला स्वच्छ दिसते आहे. त्यांच्यापासून लपवून तिने वैद्याला बोलावले आहे. आल्याआल्या तो विचारतो, ‘घरात साक्षात देवी असताना मला बोलावण्याचे काय कारण?’ बोलता बोलता तो हे ही सांगून टाकतो, की देवीने त्याचे दीर्घकाळ त्रास देणारे दुखणे बरे केले आहे. तरीही तिच्या विनंतीवरून तो छोटूला तपासतो आणि औषधे पाठवून देण्याचे मान्य करतो. अर्थात या पेक्षा छोटूला देवीच्या पायावर घालणे अधिक चांगले हे सांगायलाही विसरत नाही.
वैद्यबुवा बाहेर पडत असतानाच छोटूचे वडील तिथे येतात आणि छोटूला आजारी पाहून कालिबाबूंना सांगायला धावतच बाहेर जातात. छोटूच्या आईला ज्याची भीती वाटत होती तेच घडते. बेशुद्धीतच ‘काकी-माँ' च्या नावाचा धोशा लावलेल्या छोटूला कालिबाबू आणि तरपदा देवीच्या पायावर घालण्यासाठी घेऊन जातात. अनेक दिवसांनी भेटलेल्या छोटूला पाहून दया आनंदते. त्याची आई तिला सांगते, ‘जोपर्यंत तू त्याला मांडीवरून खाली ठेवत नाहीस तोवर त्याला मी घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा तू लवकर त्याला खाली ठेव.’
इथे दयाच्या मनातील माणूसपण उसळून वर येते. ती स्वार्थी होते. बर्याच काळानंतर मिळालेला छोटूचा सहवास तिला सहजासहजी सोडायचा नाहीये. तिची अनिच्छा छोटूच्या आईला समजते. इथे हताश होऊन ती विचारते, ‘तू खरंच देवी आहेस का? खरंच तू माझ्या मुलाला बरं करू शकतेस का? कृपा करून माझ्या मुलाला बरं कर.’ आतापर्यंत दयाचे देवीपण मान्य न करणारी ती पुत्रवियोगाच्या धास्तीने विकल होऊन दयाकडेच त्याच्या आयुष्याची भीक मागते आहे. अखेर दया ‘आजची रात्र छोटूला माझ्याकडे राहू दे, उद्या सकाळीच मी तुला तुझा मुलगा परत देईन’ असे आश्वासन छोटूच्या आईला देते.
दुसर्या दिवशी छोटूच्या आजाराची बातमी ऐकून कलकत्त्यावरून धावत आलेल्या उमाप्रसादला कळते ती छोटूच्या मृत्युची बातमी. देवीच्या गाभार्यासमोर बसलेल्या शोकमग्न वडिलांना उमाप्रसाद छोटूच्या मृत्युबद्दल जबाबदार धरतो आहे. पण कालिबाबूंची श्रद्धा अढळ आहे. ‘माझ्याकडून देवीच्या सेवेत काहीतरी चूक झाली असेल, एरवी इतक्या सर्वांवर अनुग्रह करणारी देवी माझा छोटू का हिरावून घेईल?’ असा त्यांचा प्रश्न आहे. ‘मीच कुठेतरी कमी पडलो म्हणून देवीने मला यश दिले नाही, मला शिक्षा केली’ असे त्यांचे म्हणणे आहे. उमाप्रसाद त्यांना म्हणतो, या सगळ्या प्रकारातून तुम्ही काय मिळवले मला माहित नाही. पण तुम्ही दयाचे सर्वस्व हिरावून घेतले आहे.
इथे झाल्या घटनेबद्दल स्वत:ला दोष देणारे कालिबाबू हे सर्वसाधारण सश्रद्ध मनाचे प्रातिनिधिक रूप आहे. आधी संभ्रम आणि भीतीमधून स्वतःमधल्या देवत्वावर विश्वास ठेवणारी दया आणि आपल्या श्रद्धेला छेद देणारा पुरावा नाकारून स्वतःकडे दोष घेणारे कालिबाबू, श्रद्धेच्या व्यावहारिक जगातील प्रवासाची सर्वात सुसंगत कारणमीमांसा अधोरेखित करतात.
तिथून उमाप्रसाद आपल्या जावेचे सांत्वन करायला गेला आहे. त्याच्याकडे एक तिरस्कारयुक्त कटाक्ष टाकून ती एकच वाक्य बोलते, ‘त्या चेटकीणीनं माझं मूल खाल्लं’. इथे दयाने छोटूला सांगितलेल्या विचित्र गोष्टीचा संदर्भ जुळून येतो.
यानंतर उमाप्रसाद दयाला भेटायला तिच्या खोलीकडे धावतो. त्याची अपेक्षा असावी– आणि आपलीही– की एवढा लळा असलेल्या छोटूच्या मृत्यूने तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असेल. त्या क्षणी तिला नवर्याच्या आधाराची अतिशय आवश्यकता असेल. पण दाराशी थबकलेल्या उमाप्रसादला दिसते ती संपूर्ण शृंगार केलेली दया. विविध दागदागिने, हातभर बांगड्या आणि भरजरी शालू ल्यायलेली ती.
इथे आठवते चित्रपटाच्या सुरवातीच्या प्रसंगातील देवीची मिरवणूक. विसर्जनासाठी नेले जात असणारी देवीची सालंकृत मूर्ती. बुचकळ्यात पडलेला उमाप्रसाद तिला विचारतो, हे सगळे काय आहे. ती म्हणते ‘मला जायचं आहे’. तो पुन्हा पुन्हा विचारत राहतो की ‘कुठे जायचे आहे’, ती उत्तर न देता पुन्हा पुन्हा ‘जायचं आहे’ असंच म्हणत राहते. आता पडद्यावर क्षितिजापर्यंत पसरलेला फुलांचा ताटवा दिसतो आणि क्षितिजावर धुक्याची चादर. डाव्या बाजूकडून खालच्या कोपर्यातून दया धावत येते आणि त्या ताटव्यातून धावत जात धुक्यात विलीन होते. या पार्श्वभूमीवर उमाप्रसादचा प्रश्न प्रतिध्वनित होत राहतो ‘पण कुठे?’... ‘पण कुठे?’
या प्रसंगात जाणीवपूर्वक प्रतीकाचा वापर आहे असे दिसते. छोटूच्या मृत्यूने दयाला तिच्यापुरते तिच्या देवत्वाबद्दलचे उत्तर सापडले असावे. आपल्या मनुष्यपणाचा पुरेसा पुरावा तिला मिळाला असावा. परंतु हे असूनही ज्यांना देवीच्या कृपेने काही चांगले झाल्याचा, दु:ख निवारण झाल्याचा अनुभव आला त्यांच्या दृष्टीने ती देवी आहेच. ‘माझ्याकडून काही आगळीक घडली म्हणून माझा नातू मला दुरावला’ असे म्हणणार्या कालिबाबूंच्या दृष्टीने ती अजूनही देवी आहेच. तिचे देवी असणे वा नसणे हे केवळ तिच्या निर्णयावर अवलंबून नाही (तसेही ते तिच्या निर्णयावर अवलंबून नव्हतेच). त्यामुळे या आहे/नाही च्या संभ्रमात दयाचा मृत्यू हा अवतारकल्पनेचा मृत्यू नाहीच. मग तिच्यामधे असलेल्या संभाव्य देवीच्या अंशाचे काय. तो अंश जिथून आला त्या क्षितिजाच्या पार असलेल्या तिच्या मूळ स्थानी परत जाणे हाच संयुक्तिक शेवट होऊ शकतो. अखेरच्या प्रसंगाचा मला लागलेला अर्थ हा असा आहे.
आता पुन्हा पडद्यावर येतो तो सुरवातीला पाहिलेला मुखवटा, अनलंकृत. देवत्वाचा सारा साजशृंगार उतरून गेलेला, निव्वळ पुतळा म्हणून शिल्लक राहिलेला. इथे चित्रपट संपतो.
नमनाला अनेक घडे तेल खर्ची घातले आहे. पुढील भागात या अनुभवाला मी ‘अस्वस्थ करणारा अनुभव’ का म्हटले आहे याचे विवेचन थोडक्यात मांडण्याचा विचार आहे.
---
श्रेयनामावली:
चित्रपट: देवी
कथा: प्रभातकुमार मुखर्जी
पटकथा आणि दिग्दर्शनः सत्यजित रे
संगीतः उस्ताद अली अकबर खान.
कलाकारः
दयामयी: शर्मिला टागोर
कालिबाबू: छबि बिस्वास
उमाप्रसादः सौमित्र चॅटर्जी
ताराप्रसादः पूर्णेंदू मुखर्जी
हरसुंदरी: करुणा बॅनर्जी
छोटू: अर्पण चौधुरी
<< पुढील भाग