(कविवर्य शंकर रामाणी यांची क्षमा मागून) टीव्ही लागले रे, टीव्ही लागले कुणाच्या घरातिल टीव्ही लागले रवीची प्रभा मंद अंधूकताना याने लावले रे, त्याने लावले! दिसा कष्टुनि जे जाहले श्रमी जन सारे अखेरीस सैलावले इथे कावलो मी, सर्व गलग्यामुळे मनी प्रार्थना, वीज घालवाच रे सुरू बातम्या या कुणाच्या घरी कुणी हास्यजत्रेत हो दंगले संत्रस्त मम मनाच्या तळीचे शिवीसूक्त हे ओठातुनि ओघळे - सतत त्रस्तमी (ऊर्फ मंदार काळे) - oOo -
( मित्रवर्य उत्पल व. बा. यांच्या सहकार्याने...) इथे पत्रकारितेची पडली शवे त्यावरी नफ्याची गगनचुंबी घरे स्क्रीन जयाचा बुद्धी शोषून घेतो त्या इडियटाचे पिसे लागले रे टीव्ही लागले रे...टीव्ही लागले... - oOo -
दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी       गेले... ते दिन गेले       दशांशचिन्हांकित कविता आणि प्रमेय-प्रत्यंतर       लेखकजिज्ञासायोग       आद्य मराठी-सारस्वतांचा निघंटु       छोटीशीच आहे फौज आपुली       आज धारानृत्य चाले...       वेचताना...: जिज्ञासामूर्ती       जिज्ञासामूर्ती       न स्त्री स्वातंत्र्यमर्हती      
बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०
टीव्ही लागले रे, टीव्ही लागले
सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०
मी कवी होणारच!
तो म्हणाला, मी कवी होणारच! मग त्याने कवी होण्याचे प्लॅनिंग केले मार्केट रिसर्च एजन्सीला गाठले, काव्य-बाजाराचा कानोसा घेऊन खपाऊ विषयांवर अॅन्युअल रिपोर्ट बनवून देण्याचे काँट्रॅक्ट दिले सर्वात प्रथम सौंदर्यवादाचा अंगरखा त्याने लपेटून घेतला गारवा, पारवा, मारवाच्या जुड्या बांधून जय्यत तयार ठेवल्या हिरव्या माडांच्या एका बनात वळणावळणाच्या लाल वाटेवर प्राजक्तापासून सायलीपर्यंत, बहाव्यापासून पिंपळापर्यंत सारे समोर राहतील अशा एका घरात मुक्काम हलवला सुलभ मराठी व्याकरणाचे एक स्वस्त पुस्तक आणले मग शब्दांचे मात्रांशी, मात्रांचे आकड्यांशी गणित ठाकून ठोकून जुळवत कविता लिहायला लागला यथावकाश शंभरेक कविता अगदी नेटाने खरडून झाल्या फेसबुकवर शे-सव्वाशे लाईक जमा करू लागल्या एका प्रसिद्ध कवींशी केलेली सलगी एकदाची फळली, आणि कवीने एका काव्यमंचावरुन आपली पहिली कविता म्हटली इतके होताच संग्रहाचे वारे कवीच्या मनात वाहू लागले प्रकाशकाच्या नि ग्राहकाच्या शोधात त्याचे जोडे झिजू लागले संभाव्य ग्राहक नव-कवींशी कवी सलगी करु लागला सुमार कवितांना ’प्रतिभे’चे हार अगदी नित्यनेमाने चढवू लागला. चोख दाम घेऊन पुस्तक छापणार्या एका प्रकाशकाने कवीला स्वत:हून संपर्क केला कवीला स्वर्ग दोन बोटे उरला ’येत आहे, येत आहे’ पुस्तकाची फेसबुकवर जाहिरात उमटली ’वा: वा: किती प्रतिभावंत तू’ प्रतिसादांची माळ खाली लागली पुस्तक एकदाचे हाती आले आपल्या संग्रहाचा एक ग्राहक फिक्स करण्यासाठी ’शेजारी’ कवींनी हातोहात विकत घेतले. नवा एम-आर रिपोर्ट आला सौंदर्यवादाची सद्दी संपून बटबटीत वास्तववादाची बोली वाढल्याचा कल आला. वृत्तांचा जमाना संपल्याच्या खुणाही समीक्षी दिसू लागल्या सौंदर्यवादाचा सदरा उतरवला आणि कवी छंदातून मुक्त झाला वास्तववादाच्या जर्द पिंका 'मुक्तच्छंदातल्या कविता' म्हणून हातोहात खपवू लागला, ’कित्ती धाडसी लेखन’च्या चिठ्या जमा करु लागला. पुन्हा नव्या संग्रहाचे वारे आता कवीच्या मनी वाहू लागले ग्राहकांसाठी आपली स्ट्रॅटेजी बदलणे त्याला भाग पडले जमवलेला कवी-ग्राहकांचा गट आता त्याला जुनाट वाटू लागला ’ओल्ड जेनेरेशनवाले हे’ म्हणत कवी आता नव्या कवितेच्या भिडूंशी सलगी करु लागला लवकरच नवा रिपोर्ट येईल इथून पुढे जमाना कदाचित अनुवादित कवितांचा येईल. सुलभ मराठी व्याकरणासोबत हिंदी, उर्दू, इंग्रजी व्याकरण कवी पुन्हा घोकू लागेल. पुन्हा ठोकठोक करत करत रोखठोक कविता लिहू लागेल आणि नव्या ग्राहकांच्या शोधात कवितेचा विक्रेता फिरु लागेल. - रमताराम
- oOo -
बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०
माजी मुख्यमंत्र्याचे खुर्चीस प्रेमपत्र
(कविवर्य अनिल यांची क्षमा मागून) थकले गं डोळे माझे वाट तुझी पाहता वाट तुझी पाहता गं रात्रंदिन जागता सुकला गं कंठ माझा आरोपां आळविता आरोपां आळविता गं ध्यान तुझे करिता सरले गं मित्र माझे मजला तू त्यागता मजला तू त्यागता गं अन् त्याची* हो जाया शिणला गं जीव माझा तुजविण राहता तुजविण राहता गं तू नच भेटता - स्वप्निल (ऊर्फ मंदार काळे)
- oOo -
* सांगा पाहू तो कोण?
एका एरॅटिक*-नेटग्रस्ताची कैफियत
(कविवर्य आरती प्रभू यांची क्षमा मागून) ते येते आणिक जाते येताना काही बिट्स१ आणते अन् जाताना टाटा करते येणे-जाणे, डालो२ होणे असते असे जे न कधी पुरे होते येताना कधी मध्ये थांबते तर जाताना एरर देते न कळे काही उगीच काही आकळत मज काही नाही कारणावाचून उगीच का हे असे अडते? येतानाची कसली रीत, बाईट्स३ ऐवजी देई ते बिट जाताना कधी हळूच जाई येण्यासाठीच फिरुन जाई प्रकट होते, विरुन जाते, जे टवळे - चालूदे प्रभू (ऊर्फ मंदार काळे)
- oOo -
१. बिट्स (Bits) हे संगणकामध्ये साठवणुकीचे असलेले एकक.
२. आभासीविश्वातील ’शॉर्टहॅंड मराठी’मध्ये ’डाऊनलोड’साठी
वापरला जाणारा शब्द
३. संगणकाच्या साठवणुकीचे एकक. १ बाईट (Byte) = ८ बिट्स (Bits)
---
* हा शब्द एरॅटिक (Erratic) आहे, एरॉटिक (Erotic) नाही. एरर (Error) म्हणजे अद्याप कारण न उमगलेली चूक. त्यापासून एरॅटिक म्हणजे सतत चुका करणारे असा अर्थ आहे. एरॉटिक मनांसाठी हा खुलासा. :)
शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०
कर्तव्यच्युत पेस्टकंट्रोलयोध्याप्रत...
(कविवर्य वा. रा. कांत यांची क्षमा मागून) झुरळांची माळ पळे, अजुनि मम घरात भेट आपुली स्मरशी काय तू मनात ? पेरिता फडताळी तू थेंब त्या द्रवाचे कोण्या छिद्रात असे कोण बैसलेले हलकट ते झुरळ लपे छान सुशेगात त्या वेळी, ओट्यावर, आणि तयाखाली स्वर्णिमाच* जणू पसरे, भर दिवसा काली फिरत असे, टिच्चून ते, माझिया घरात हातांसह स्प्रेगनने तुवा लढताना हर्बलाचे करडे कळे, मळुनि लावताना मिशीधारी झुरळ तुज, खिजविते खलात** तू गेलास, सोडुनि ती माळ, काय झाले, सरपटणे ते तयांचे, अजुनि उरे मागे स्मरते ती, पलटण का, कधि तुझ्या मनात? - चिं. ता. क्रांत (ऊर्फ मंदार काळे)
- oOo -
* स्वर्णिम अर्थात सोनेरी रंगाचे झुरळ
** खल आणि बत्ता जोडीतील
रविवार, ६ सप्टेंबर, २०२०
जग जागल्यांचे १२ - कम्युनिस्टांच्या देशात व्लादिमिरचा अनोखा लढा
ग्रीनहाऊस माफियांचा कर्दनकाळ: गाय पीअर्स << मागील भाग
---
'Let us defend our laws from being encroached upon by the authorities' - Vladimir Bukovskii.
साठच्या दशकाच्या सुरुवातीस मॉस्को विद्यापीठात ’कॉस्मोनॉल’ या कम्युनिस्ट पक्षाच्या युवा शाखेवर टीका करणारे टिपण प्रसिद्ध झाले. त्यात ही नैतिक आणि आध्यात्मिक दिशा हरवलेली, मरु घातलेली संघटना असल्याचे म्हटले होते. या संघटनेमध्ये पुन्हा चैतन्य प्रदान करायचे असेल तर त्यात लोकशाही रुजवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केलेले होते. हे टिपण सोव्हिएत गुप्तहेर संघटना केजीबीच्या दप्तरी दाखल झाले. या टिपणाच्या लेखकाची, एकोणीस वर्षीय ’व्लादिमिर ब्युकोव्स्की’ याची कसून चौकशी करुन त्याला विद्यापीठातून निलंबित करण्यात आले.
बाह्यशिक्षण घेत असताना प्रसिद्ध रशियन गणितज्ञ अलेक्सांद्र येस्निन-वोल्पिनशी त्याचा परिचय झाला. त्यांच्या विचारांचा त्याच्यावर मोठा प्रभाव पडला. रक्तरंजित क्रांती वगैरे आकर्षक कल्पनांचे भूत त्याच्या शिरावरुन उतरले आणि कायदेशीर चौकटीतच व्यवस्थेला आव्हान देण्याचा मार्ग त्याने स्वीकारला. १९६३ साली युगोस्लाव्ह विचारवंत मिलोवान जिलास याचे कम्युनिझमची परखड चिकित्सा करणारे प्रसिद्ध पुस्तक ’द न्यू क्लास’ची प्रत बाळगल्याबद्दल व्लादिमिरला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान झालेल्या वैद्यकीय चाचणीमध्ये त्याला ’बुद्धिभ्रंशा’चा रुग्ण ठरवून त्याची रवानगी मानसोपचार केंद्रात करण्यात आली. आरोपी मनोरुग्ण असल्याने त्याला बचावाचा अधिकार नाकारत त्याच्या अनुपस्थितीत खटला चालवून त्याला दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.
स्टालिनच्या काळात राजकीय कार्यकर्त्यांवर झालेल्या अत्याचारांमुळे सोव्हिएत युनियनची बरीच बदनामी झाली होती. त्यामुळे ब्रेझनेव्ह यांच्या काळात अप्रत्यक्ष मार्ग अनुसरण्यास सुरुवात झाली. राजकीय कैद्यांवरील आरोपांसाठी न्यायालयीन प्रक्रिया चालवणे वेळा व्यवस्थेला अडचणीचे ठरे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्यांची भूमिका मांडण्याची संधी त्यांना मिळत असल्याने, ही भूमिका सर्वसामान्यांपर्यंत सहज पोचत असे. यामुळे त्यांना मानसिक दृष्ट्या अक्षम ठरवण्याचा मार्ग सोव्हिएत व्यवस्था अवलंबत होती. कारण असा रुग्ण पुरेसा सक्षम होईतो न्यायालयीन प्रक्रिया चालू करण्यात अर्थ नाही असे तिथली न्यायव्यवस्था मानत असे. त्याचा फायदा घेऊन असे राजकीय कैदी हवा तितका काळ डांबून ठेवले जात. सोव्हिएत मानसोपचारतज्ञ आंद्रे स्नेझ्नेवस्की याने यासाठी एक काटेकोर व्यवस्थाच निर्माण केली होती.
या व्यवस्थेमध्ये अनेक राजकीय कैद्यांना बुद्धिभ्रंशाचे, अति-नकारात्मक विचाराचे, सामाजिक जीवनास अक्षम ठरवले जाई. हे रुग्ण असल्याने तुरुंगाऐवजी ’विशेष मानसोपचार केंद्रां’मध्ये ठेवले जाऊ लागले. आता हे कैदी नसल्याने त्यांना त्यासंदर्भात व्यवस्थेने दिलेले अधिकारही संपुष्टात येत असत. मनोरुग्ण असल्याने सर्वसामान्यांसाठी धोकादायक आहेत असे जाहीर करुन त्यांना कुणालाही भेटण्याची मनाई होती. मानसोपचार केंद्राचे संचालक, आरोग्याधिकारी हे केजीबीच्या मुठीत असल्याने या रुग्णांची संपूर्ण मुस्कटदाबी करणॆ व्यवस्थेला शक्य होत असे. त्यांना खरोखरीच्या मनोरुग्णांसोबत- विशेषत: त्यातील हिंसक रुग्णांसोबत, ठेवले जात असते. यातून त्यांचे मनोबल खच्ची करुन त्यांचा बुद्धिभेद करण्याचा किंवा त्यांना खरोखरच मानसिकदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जाई. व्लादिमिरला या व्यवस्थेचा पहिला अनुभव त्याच्या या दोन वर्षांच्या शिक्षेदरम्यानच आला आणि त्याने तिला चव्हाट्यावर आणण्याचे ठरवले.
या व्यवस्थेला विरोध करण्याबरोबरच तिच्याशी सामना करण्याचे उपाय शोधणेही आवश्यक असल्याचे व्लादिमिरच्या ध्यानात आले. मानसिक छळाचा सामना मानसिक बळानेच करता येईल हे त्याने ओळखले. त्यादृष्टीने त्याने आणि सिम्योन ग्लझमन या ’रुग्णा’ने मिळून राजकीय कैद्यांसाठी मानसिक आरोग्याचे धडे देणारी माहिती-पुस्तिकाच तयार केली. त्यातील तंत्रांच्या आधारे त्याने पुढील तुरुंगवासांच्या काळात या मानसिक हल्ल्यांना समर्थपणे तोंड दिले. काही वर्षांनी या पुस्तिकेवर आधारित ’To Build A Castle' या शीर्षकाचे एक पुस्तकच त्याने प्रसिद्ध केले.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली आंद्रे सिन्यावस्की आणि युली डॅनियल या लेखकांना झालेल्या अटकेच्या विरोधात मास्कोच्या पुश्किन चौकात निदर्शने आयोजित करण्यात आली. या दरम्यान वोल्पिन यांनी लिहिलेले ’सामाजिक आवाहन’ प्रसिद्ध करण्यात आले. यात सरकारला सोव्हिएत कायद्याला अनुसरुन न्यायव्यवस्थेमार्फत आणि माध्यमांच्या नजरेसमोर या लेखकांवरील खटला चालवण्याची मागणी करण्यात आली. ५ डिसेंबर १९६७ रोजी झालेली ही निदर्शने ’न्यायिक सुधारणांच्या’ दिशेने टाकलेले पहिले पाऊल ठरले. याला ’ग्लासनोस्त’ मेळावा म्हणून ओळखले जाऊ लागले. ही निदर्शने बेकायदेशीर असल्याचे जाहीर करुन त्याला अटक करण्यात आली.
तुरुंगात असतानाच जमा केलेल्या माहितीच्या आधारे केलेल्या सुमारे १५० पानांचे एक संकलन त्याने गुप्तपणॆ देशाबाहेर पाठवले. त्यासोबत पाश्चात्त्य मानसोपचारतज्ञांच्या नावे एक पत्रही जोडले होते. त्यात या कागदपत्रांमध्ये असलेल्या सहा सहा राजकीय कैद्यांच्या केसेसबाबत त्यांचे मत जाहीर करण्याची विनंती केली होती. सुमारे चाळीस तज्ज्ञांच्या समितीने याची पडताळणी करुन त्यातील तिघे मानसिकदृष्ट्या संपूर्ण सक्षम असून उरलेल्या तिघांनाही तात्कालिक तणावांपलिकडे गंभीर आजार नसल्याचा निर्वाळा दिला. याच सुमारास ब्रिटिश पत्रकार विल्यम कोल याने व्लादिमिर याची या विषयावर एक मुलाखत घेतली. पुढे ती अमेरिकेमधील CBS चॅनेलवरुन प्रसारित करण्यात आली. ही कागदपत्रे आणि निष्कर्ष फ्रेंच मानवाधिकार समितीतर्फे जाहीर करण्यात आले. व्लादिमिरचे पत्रही लंडनचे प्रसिद्ध वृत्तपत्र ’द टाईम्स’ आणि ब्रिटिश मानसोपचार तज्ञांच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले. या सार्याचा सुगावा लागताच २९ मार्च १९७१ रोजी व्लादिमिरला तिसर्यांना अटक करण्यात आली.
या अटकेनंतर सर्व सोव्हिएत माध्यमांनी व्लादिमिरविरोधात कांगावा सुरु केला. ’प्रावदा’ या सरकारी वृत्तपत्राने तो गुंड प्रवृत्तीचा, कारस्थानी आणि सोव्हिएत-द्रोही असल्याचे जाहीर केले. पण अन्य राजकीय कैद्यांप्रमाणॆ सैबेरिया अथवा तत्सम छळछावण्यांमध्ये सहजपणॆ ’विरुन’ जावा इतका व्लादिमिर सामान्य कैदी नव्हता. पाश्चात्त्य माध्यमे आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी व्लादिमिरच्या सुटकेची मागणी लावून धरली होती. सुमारे पाच वर्षे सोव्हिएत सरकारने त्याला दाद दिली नाही. अखेर १९७६ मध्ये चिलीच्या कम्युनिस्ट पक्षाचा नेता लुईस कोर्वालेन याच्या सुटकेच्या बदल्यात व्लादिमिरची सुटका करण्यास सोव्हिएत सरकारने मान्यता दिली.
त्यानंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या व्लादिमिरने मानवाधिकारासाठीचा आपला लढा चालूच ठेवला होता. केवळ कम्युनिस्ट रशियाच नव्हे तर पाश्चात्यांच्या धोरणांबद्दलही तो आवाज उठवत राहिला. युरपियन युनियनच्या संकल्पनेमधील शोषणाच्या शक्यतांवरही त्याने विस्ताराने लिहिले आहे. ’सोव्हिएत रशियाच्या पतनाने प्रश्न सुटत नाही, ती व्यवस्थाच बदलण्याची गरज आहे. अन्यथा केजीबीच्या आशीर्वादाने एकाधिकारशाहीच सत्तारुढ होईल’ अशी भीती त्याने १९९४ साली व्यक्त केली होती’. व्लादिमिर पुतीन या केजीबीच्या माजी अधिकार्यानेच ती वास्तवात उतरवलेली आपण पाहिली.
-oOo-
(पूर्वप्रसिद्धी: दैनिक दिव्य मराठी, ६ सप्टेंबर २०२०)