Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शनिवार, २५ एप्रिल, २०२६

‘नारबाची वाडी’ , ‘माय ओल्ड लेडी’ आणि हयातहक्काची संकल्पना

  • दहा-बारा वर्षांपूर्वी ‘नारबाची वाडी’ नावाचा एक मराठी चित्रपट प्रकाशित झाला होता. ‘लोभाहाती माती’ या बाळबोध संस्काराचे हलकेफुलके चित्रपटीय रूप असलेल्या या चित्रपटाची कथा अगदी सरळसोट. एक लहान नातू सोडून कुणीही नसलेल्या नारबा नावाच्या कुण्या एकाची देखणी वाडी पाहून लोभावलेला जमीनदार(खोत) ती बळकावण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्या हयातीमध्ये त्याची ती इच्छा फलद्रूप होत नाही. मग काही वर्षांनी त्याचा मुलगा आपल्या वडिलांची इच्छा पुरी करण्यासाठी नारबाच्या मागे लागतो.

    नारबा एव्हाना आणखी वयस्कर झाला आहे. ‘आपल्याला जगण्यात काही रस उरलेला नाही. लवकरच वरचे बोलावणे येईल.’ असे तो सतत बोलत असतो. हे ऐकून या धाकल्या जमीनदाराच्या तोंडाला पाणी सुटते. झाडावरुन पिकले फळ टपकन पडावे तसा हा पिकला म्हातारा पडेल, तेव्हा त्याची वाडीही तशीच अलगदपणे आपल्या हाती पडावी यासाठी तो एक युक्ती काढतो. ‘नारबाच्या उरलेल्या आयुष्यात तो दरमहा ठराविक रक्कम देईल नि त्या बदल्यात नारबाच्या पश्चात त्याची वाडी जमीनदाराची होईल’ असा प्रस्ताव देतो. नारबाचे आरोग्य पाहाता तो लवकरच दिवंगत होईल नि वाडी आपली होईल यात त्याला शंका नसते. ‘आता दिवस उरलेत तरी किती’ ची टेप वाजवत नारबा त्याला होकार देतो.

    पण प्रत्यक्षात नारबाच्या आयुष्याची दोरी चांगलीच बळकट निघते. दर महिन्याला जमीनदाराकडून पैसे नेताना तो निर्वाणीचं बोलत राहातो, पण पुढच्या महिन्यात पुन्हा हजर होत राहातो. दरम्यान जमीनदाराची आर्थिक घडीच बिघडते नि हा करार पाळणे त्याला दुरापास्त होत जाते. अखेर त्याच्यावर ‘तुझी वाडी राहू दे, मला या करारातून मोकळे कर’ अशी काकुळतीची विनंती नारबाकडे करण्याची वेळ येते. अधेमध्ये तर्कसंगतीचे रूळ सोडून धावणारी नि संभाव्यतेचे लाल सिग्नल झुगारणारी चित्रपटाची गाडी अखेर अपेक्षित संदेशापर्यंत पोहोचते.

    करमणूकप्रधान, बोधकथा सांगणार्‍या या चित्रपटाने निवृत्तीपश्चात उत्पन्नाचा एक मार्ग माझ्या डोक्यात घुसवला होता. ‘जिवंत असेतो मालकी तुझी, नंतर माझी’ ही संकल्पना मला रोचक वाटली होती. ज्याला वारस नाही, अथवा वारसांची चिंता करण्याची गरज उरलेली नाही अशा व्यक्तीला आपल्या माघारी आपली मालमत्ताही विरुन जावी अशी तजवीज त्यातून होते आहे. यातील जमीनदाराच्या चुका ध्यानात घेतल्या नि दुरुस्त केल्या तर यातून एक फायदेशीर नि कायदेशीर पर्याय निर्माण होऊ शकतो असा माझा तर्क होता.

    या व्यवहारामध्ये तीन ढोबळ चुका कुणालाही - निदान पश्चातबुद्धीने - दिसतील : १ जी मालमत्ता विकत घ्यायची तिचे मूल्यमापन केले गेले नाही, जेणेकरुन खरेदी-किंमत म्हणून एकुण किती रक्कम द्यावी याचा विचार केला नाही. २. ज्याच्या मृत्युपश्चात ही मालमत्ता आपली होणार त्याच्या जीविताचा संभाव्य काळ किती याची तपासणीही केली गेली नाही.

    या खेरीज माझ्या मते तिसरी चूक ही, की या मालमत्तेसाठी आपण जेवढी रक्कम देणे अपेक्षित आहे त्याची तरतूद स्वतंत्रपणे करुन ठेवण्याची काळजी जमीनदाराने घेतलेली नाही. तुम्ही-आम्ही जेव्हा कर्ज घेतो, त्याचे हप्ते भरतो तेव्हाही असा विचार करत नसल्याने हा मुद्दा काहींच्या नजरेतून निसटला असण्याची शक्यता आहे. सामान्यपणे तेवढ्या किंमतीची एखादी स्थावर-जंगम मालमत्ता वा या गृहकर्जाच्या इतक्या रकमेचा परतावा देणारी एखादी विमा योजना घेऊन ठेवणे असे पर्याय वापरले जात असतात. हे जर केले नाही तर हप्ते भरण्याचे काम म्हणजे इंग्रजीत running from pillar to post म्हणजे कायम धावाधावीचे काम होऊन बसते.

    ‘नारबाची वाडी’ नंतर दोन ते तीन वर्षांनी ‘माय ओल्ड लेडी’ (२०१४) हा आणखी एक चित्रपट पाहण्यात आला. याचे कथाबीज तंतोतंत ‘नारबाची वाडी’चेच आहे. पण चित्रपटाचा विस्तार, मांडणी, पटकथा ही अधिकाधिक पाश्चात्य होत जाते. एका बीजापोटी जन्मलेल्या या दोन चित्रपटकथांची तुलना होतकरु चित्रपट अभ्यासकांनी करुन पाहायला हरकत नाही. (आणि हो, यात मुख्य भूमिका हॅरी पॉटर चित्रपट-मालिकेत प्रोफेसर मॅक्गोनगाल ची भूमिका करणार्‍या मॅगी स्मिथ हिने केली आहे. या लेखनप्रपंचातून निदान एवढी तरी interesting माहिती फोलपटमसालाप्रेमींच्या पदरी पडावी म्हणून...)

    यातील मथायस/जिम हा न्यूयॉर्कर, एकदम मुरलेला अमेरिकन. त्याच्या वडिलांच्या मृत्युनंतर त्यांचा पॅरिसमधील त्यांचे एक घर त्याच्या वाट्याला वारसाने आले आहे असे त्याला सांगण्यात येते. त्याची विल्हेवाट लावायला म्हणून तो पॅरिसमध्ये येतो. तिथे आल्यावर त्याला असे समजते, की हे घर त्याच्या वडिलांनी ‘हयातहक्का’ने विकत घेतलेले आहे. म्हणजे ते जिच्या मालकीचे होते तिला ठराविक काळ मासिक हप्त्याने पैसे द्यायचे आहेत. त्यानंतरही तिची उरलेली हयात ते घर तिच्या मालकीचे राहाणार असते. जोवर ती स्त्री तिथे राहाते आहे तोवर त्यावर तिचीच मालकी असणार नि त्या दरम्यान त्या मालमत्तेचा वापर कोणत्याही प्रकारे - अगदी आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठीही- करण्यास तिला मुभा आहे. फक्त तिला ते विकण्याची वा वारसाहक्काने मालकी हस्तांतरित करण्याची परवानगी मात्र नाही. तिचे सारे हक्क हे तिच्या हयातीपुरतेच आहेत. तिच्या मृत्यूनंतरच ते त्यांच्या वा त्यांच्या वारसांच्या (म्हणजे मथायस/जिमच्या) मालकीचे होणार असते.

    या प्रकारच्या हस्तांतरणाला फ्रान्समध्ये Viager म्हणजे Life Estate असे म्हटले जाते. यात त्या मालमत्तेचे मूल्यांकन करुन तिची किंमत निश्चित केली जाते. ती चुकती करण्यासाठी काही कालावधी निश्चित करुन त्या आधारे मासिक हप्ता (annuity) निश्चित केला जातो. आता विकत घेणार्‍याने निश्चित केलेला काळ दरमहा तेवढे पैसे मालकाला देत जायचे आहे. हे एक प्रकारे गृह-कर्जाचे हप्ते भरत राहाण्यासारखेच आहे. फक्त इथे हप्ते संपले नि मूळ मालक अद्यापही हयात असेल तर ताबा त्याच्याकडेच राहातो, मालमत्ता विकत घेणार्‍याच्या ताब्यात येत नाही! तसेच विकत घेणारा वा विकणारा या दोहोंपैकी एक पुरे हप्ते देण्यापूर्वीच निवर्तला तर काय करावे याचाही विचार नियमावलीमध्ये समाविष्ट केलेला आहे.

    गंमत अशी की व्यवहार करणार्‍या या दोघांशिवाय तिसर्‍याचेच आयुष्य मोजमापासारखे वापरण्याची सोयही त्यात आहे. म्हणजे ‘अ’ ही व्यक्ती आपली मालमत्ता ‘ब’ या व्यक्तिला हयातहक्काने विकते, पण हप्त्यांचे नि मालकीचे गणित हे ‘क’ या तिसर्‍याच व्यक्तिच्या जीवनाशी जोडलेले असते. याचा फायदा हा, की जुना मालक आपला ‘हयातहक्का’चा करार तिसर्‍यालाच विकून एकरकमी पैसे घेऊनही मोकळा होऊ शकतो. आता या तिसर्‍याला मूळ मालकाचे हक्क नि बंधने लागू होतात. म्हणजे तो ही मूळ मालकाचे आयुष्य (स्वत:चे नव्हे!) असेपर्यंतच त्या मालमत्तेचा हक्कदार राहातो. आता ती विकत घेतलेल्याकडून येणारे मासिक हप्ते त्याच्याकडे येत राहातात. यातून होते असे की ज्याला एकरकमी पैसा हवा आहे अशी व्यक्ती, ज्याला एकरकमी पैशातून मासिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करायचा आहे अशा व्यक्तीशी आपल्या हक्कांची देवाणघेवाण करू शकते. थोडक्यात हा पुरा करारच ‘हस्तांतरणीय’ गुंतवणूक म्हणून पाहाता येतो.

    मालमत्तेचे मासिक उत्पन्नात रूपांतर करण्याची ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी नियमित उत्पन्नाचा स्रोत ठरू शकते. एकीकडे म्हणजे मालमत्ता विक्रीतून मिळणारे मासिक उत्पन्न एक स्थैर्य देते. त्याखेरीज दुसरीकडे मालमत्तेचा ताबा नि त्यातून मिळणार्‍या उत्पन्नावरचा हक्क अधिक उत्पन्न मिळवणास मोकळीकही ठेवत असतो.

    पण ही व्यवस्था विश्वासार्ह नि सुरळितपणे चालण्यासाठी विकत घेणारा नियमित पैसे देत राहील याची शाश्वती हवी. तेवढी त्याची आर्थिक कुवत हवी. अन्यथा पैसेही येत नाहीत नि करारात अडकल्याने मालमत्तेचा इतर कुणाशी व्यवहारही करता येत नाही अशा तिढ्यामध्ये मालक अडकू शकतो. विकत घेणारी जर व्यक्ती नसेल, भरपूर पैसे बाळगणारी आर्थिक संस्था असेल, तर हा व्यवहार तडीस जाण्याची शक्यता बरीच अधिक असते. मागील शतकात साधारण १९६०च्या सुमारास अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनांमध्ये बँका नि आर्थिक गुंतवणूकदार कंपन्यांनी हा पर्याय देऊ केला नि त्याला Reverse Mortgage Loan असे नाव दिले.

    Loan म्हणजे कर्जाचे अनेक प्रकार आहेत. बहुतेक प्रकारांमध्ये कर्ज देणारी संस्था की कर्जदाराकडून सोने, मालमत्ता, रोखे अशा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तारण घेत असते. त्यातील सर्वाधिक वापरात आहे तो गृह-तारण कर्ज. बँक तुमचे घर हे तारण (Mortgage) म्हणून ठेवून घेते नि त्या बदल्यामध्ये तुम्हाला काही एक रक्कम कर्जाऊ देते. तुम्ही घेतलेले कर्ज फेडले की हे तारण रद्द होते नि तुमचे घर पुन्हा तुमच्या मालकीचे होते. पण जर तुम्ही परतफेड करु शकला नाहीत, तर बँक हे घर विकून आपले येणे वसूल करत असते.

    गणिती दृष्टीने पाहिले तर Reverse Mortgage Loan असे पाहाता येते: समजा घर तारण ठेवून कर्ज काढतानाच मी ‘ते फेडणार नाही’ हे ठरवून ते घेतले तर... मला परतफेडीची चिंता करावी लागणार नाही. मग बँकेकडून आलेला पैसा मला हवा तसा वापरता येईल. पण कर्ज फेडले नाही म्हणजे बँक तुमची मालमत्ता ताब्यात घेणार हे ओघाने आलेच.

    आता मी तारण म्हणून ठेवलेले घर राहाते घरही असेल, तर मोठाच धोका उत्पन्न होतो. ‘पैसे वापरून संपले आहेत नि घरही गेले तर राहाणार कुठे?’ हा प्रश्न शिल्लक उरतो आहे. यावर उपाय म्हणून ‘बँकेने घर ताब्यात घ्यावे पण काही काळानंतर, म्हणजे माझ्या हयातीअखेर’ असा प्रस्ताव मी देऊ करतो. तसा हक्क मला देऊ करताना, या अधिकच्या काळातील संभाव्य उत्पन्नाचे जे नुकसान होते, त्याची भरपाई बँका मला देय असलेली रक्कम कमी करुन करणार हे उघड आहे.(पण हा काळ किती असेल नि म्हणून बँकेचे नेमके नुकसान किती याचे पूर्व-भाकित मी अथवा बँक कुणीही करु शकत नाही. इथे Longevity risk या संकल्पनेचा प्रवेश होतो)

    तेच घर मी खुल्या बाजारात विकले तर मला सर्वाधिक पैसे देऊ करणार्‍याला (बँकेच्या मूल्यांकनाहून बहुधा अधिक) ते विकता येते. पण आलेल्या पैशाचे नियोजन करण्याची जबाबदारी माझ्यावर पडते. त्याऐवजी मी तेच घर तारण ठेवून बँकेकडून कर्ज घेतले, तर बँकेच्या गणितानुसार तिचे बाजारमूल्य आणि म्हणून माझ्या कर्जाची पात्रता त्याहून कमी भरते. पण ते कर्ज फेडून घर परत घेण्याचा हक्क माझ्या हाती राहातो. आणि या तिसर्‍या पर्यायामध्ये केवळ परत विकत घेण्याचा हक्क नव्हे, तर घराचा ताबाही माझ्या हाती राहातो. पण त्या बदल्यात त्याचे मूल्य आणखी कमी होते. (गुंतवणुकीच्या क्षेत्रात असा trade-off नेहमीच्य ध्यानात घ्यावा लागतो. निव्वळ भरपूर उत्पन्न/परतावा किंवा निव्वळ सुरक्षित गुंतवणूक असे काही नसते याचे भान राहायला हवे.)

    १५० कोटींच्या या खंडप्राय देशात अगदी मोजक्या लोकांना निवृत्तीनंतर नियमितपणे मिळणारा निवृत्तीवेतन (pension) नामक विशेषाधिकार उपलब्ध असतो. इतर सर्वांना आपल्या कार्यक्षम, कमावत्या आयुष्यातच निवृत्तीनंतरच्या खर्चांसाठी धनाची तरतूद करुन ठेवावी लागते. आता कळीचा मुद्दा हा, की या उतरत्या काळासाठी किती धन राखून ठेवावे? याचे गणित बहुसंख्य मंडळी एकतर करतच नाहीत; जे करतात त्यांना बाह्य कारणाने वाढणारी महागाई, उतरते आरोग्य नि त्यावरील वाढता खर्च इत्यादी बदलत्या गोष्टींना संख्यात्मक मोजमापामध्ये रूपांतरित करुन आवश्यक नियमित उत्पन्नाचा अंदाज करणे अवघड जात असते.

    रोजगारातून मिळालेला विशेषाधिकार म्हणून तहहयात मिळणारे निवृत्तीवेतन निश्चित झालेले असते, त्यांना या अनिश्चिततेपासून काही प्रमाणात सुटका मिळालेली असते. त्यांच्याकडे पाहून इतरांनाही ‘पेन्शन’ या शब्दाने ऊब वाटत असल्याने, ते ही खासगी आर्थिक गुंतवणूक संस्थांमार्फत ‘पेन्शन’ हे नाव मिरवणार्‍या, पण वास्तवात तुम्ही गुंतवलेल्या पैशांवरील व्याजच तुम्हाला हप्त्याने देत राहाणार्‍या योजनांमध्ये गुंतवून हुश्श: करतात. त्यातही असली योजना एखाद्या सरकारी बँक किंवा एलआयसीसारखी संस्था असेल, तर ‘खुद्द जगन्नियंत्या परमेश्वराच्या हातीच आपले भविष्य’ सोपवल्याच्या अंधविश्वासाने आपला पैसा ते या संस्थांच्या हवाली करतात.

    फारच थोडे लोक आपले निवृत्तीनंतरचे जीवन कसे असेल, वा असावे, याचा एक ढोबळ आराखडा मांडतात. त्यासाठी आवश्यक पैसा किती असावा, तेवढा निर्माण करण्यासाठी/साठवण्यासाठी आतापासून किती नि कुठे बचत करावी, धनवृद्धीचा अपेक्षित वेग राखण्यासाठी लागणार्‍या गुंतवणुकीच्या योजना निवडताना आपण कितपत धोका पत्करू शकतो, वगैरे विचार करतात.

    तहहयात निवृत्तीवेतनवाले असोत, खासगी गुंतवणुकीमार्फत मासिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणारे असोत की खर्च-गुंतवणूक संबंधांचा आगाऊच विचार करुन आपल्या भविष्यवेधी गुंतवणुकीची आखणी करणारे असोत; कणेकर गुरुजींच्या भाषेत ‘हर्षद मेहताच्या या भारत देशात’ दोन (खरेतर तीन) गुंतवणुकींवर जनतेची अपार श्रद्धा आहे. यातील पहिली आहे स्थावर मालमत्ता (घर/जमीन) आणि दुसरे आहे ते सोने. कोणत्याही ठोस नि नेमक्या गणिताशिवाय, कुठल्याही गुंतवणुकीमध्ये अपरिहार्यपणे अस्तित्वात असलेल्या धोक्यांच्या अस्तित्वाला संपूर्ण नाकारुन ‘सुरक्षित’ गुंतवणूक म्हणून या दोहोंची निवड होते. (तिसरी असते ती धडाधड विमा (insurance) पॉलिसी - विशेषत: एलआयसीच्या... ‘सेफ, यू नो’ - घेत सुटणे.)

    यातील स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक नियमितपणे लक्ष देऊन सांभाळली तर उत्पन्नाचा स्रोत निर्माण करु शकते. पण पंचाईत अशी की ही गुंतवणूक बहुधा मोठ्या रकमेची मागणी करते. आज पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांतून सर्वसाधारण घरांच्या किंमती ३०-४० लाखांपासून ३-४ कोटींच्या घरात पोहोचलेल्या आहेत. तीस लाखाचे घर विकत घेऊ इच्छिणार्‍या सर्वसामान्य नागरिकाला गृहकर्जाच्या माध्यमातून सुमारे ४५-५० लाख फेडावे लागतात. जोवर हे घर राहाते आहे तोवर हे पैसे अडकून पडतात.

    त्या मालमत्तेचा बाजारभाव जरी वाढत असला, तरी जोवर त्याची विक्री होत नाही (किंवा कर्जाच्या आधारे monetization होत नाही ) तोवर ते धन केवळ संकल्पना-स्वरूपच असते. (आणि ते कमी होण्याची संभाव्यताही बरीच कमी असली तरी शून्य नसते.) शिवाय मालमत्तेचे भाव जसे वाढतात, तसे इतर उपभोग्य नि गरजेच्या वस्तूंचे भावही वाढत असतात. म्हणजे बाजारभाव म्हणजे निव्वळ मूल्य वाढले तरी सापेक्ष मूल्य नेहमीच वाढेल असे नाही. शिवाय एवढी मोठी रक्कम स्थावर मालमत्तेमध्ये अडकून पडली की दैनंदिन खर्चासाठी ती उपलब्ध राहात नाही. ज्यांच्याकडे त्यात गुंतलेल्या पैशांखेरीज इतर गुंतवणूक फारशी नाही अशांसाठी निवृत्तीनंतर आर्थिक चणचण उभी राहू शकते.

    कार्यक्षम, मिळकतक्षम वयात साठवलेले पैसे मर्यादित (finite) असल्याने आयुष्यभर पुरतील का ही विवंचनाही असते. कारण ‘किती पैसा हवा?’ या प्रश्नाला जोडूनच ‘किती काळ मिळायला हवा?’ या दुसर्‍या - कदाचित अप्रिय - प्रश्नाचा सामनाही करावा लागतो. ‘पैसे संपले पण आयुष्य उरले तर ते कशाच्या आधारे कंठावे?’ असा यक्षप्रश्न आजच्या निसर्गद्वेष्ट्या जगात आऽ वासून उभा राहात असतो. मनुष्येतर सजीव हे एकतर संग्राहक (gatherer) असतात वा शिकारी (hunter). ते आपले अन्न थेट निसर्गातून घेत असतात. त्याबद्दल त्यांना कुठलीही परतफेड करावी लागत नाही. माणूस हा असा एकच प्राणी आहे ज्याला त्याचे अन्न समोर दिसत असले, तरी ज्याच्या हाती पैसा नसेल त्याचा भूकबळी पडू शकतो. स्वत:च पायी बांधून घेतलेले ‘चलन’ नामक साखळदंड माणसाला असे परावलंबी करुन ठेवत असतात.

    दीर्घायुष्य माणसाला कितीही हवेहवेसे वाटत असले, तरी ते जगत असताना गरजा असतात आणि त्या भागवण्यासाठी पैसा लागतो. या दीर्घायुष्याला पुरेल इतका पैसा साठवणे आवश्यक असते. आयुष्याची दोरी जितकी लांबते तितकी ही गरज वाढती असते. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या उत्पन्नाची तरतूद करताना हे काळाचे परिमाणही ध्यानात घ्यावे लागते. पुरेसा पैसा गाठीला बांधू न शकलेल्यांना दीर्घायुष्य हे वरदान न वाटता शाप वाटण्याचीच शक्यता अधिक असते. (शिफारस: अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास )

    असं म्हणता येईल की सोपा उपाय म्हणजे ही मिळकत विकून त्यातून मिळालेल्या रकमेच्या आधारे नियमित उत्पन्नाची सोय करुन निवृत्त जीवनाला आर्थिक आधार द्यावा. पण त्यात तिढा आहे. वर म्हटले तसे, घर विकले तर राहाणार कुठे? त्या पिकल्या वयात सतत ‘या भाड्याच्या घरांतून त्या घरात’ असे करत हिंडणे फारच अवघड असते. मग ‘घरही राहावे नि पैसेही मिळावेत असा Best of both पर्याय आहे का?’ असा प्रश्न वार्धक्याच्या दिशेने चालू लागलेल्यांच्या मनात उमटतो. या Reverse Mortgage Loan ने याचे उत्तर ‘होय’ असे दिले आहे.

    ‘नारबाच्या वाडी’मध्ये मूळ कथाबीजाचा विस्तार फारसा केलेला नाही. नारबा आपल्या जाण्याबाबत वेगवेगळ्या शब्दांत पुन्हा पुन्हा बोलण्यापलिकडे फारसे काही घडत नाही. ‘माय ओल्ड लेडी’मध्ये मात्र बिचारा मथायस/जिम एकीकडे मातिल्डाला ‘हयातहक्का’चे मासिक हप्ते देणे लागतो, तर दुसरीकडे पॅरिसमध्ये राहाण्याची सोय म्हणून त्याच घरात राहाण्याचे घरभाडेही तिलाच देतो आहे. एवढे पुरेसे नाही म्हणून तिथेच इंग्रजीचे वर्ग चालवत मातिल्डा आणखी उत्पन्नही मिळवते आहे. निवृत्तीपश्चात अशा ‘दोनों– नाही, तीनों उंगलियाँ घी में’ असतील तर तो उत्तरार्धही सुखाने सरेल.

    ‘नारबाची वाडी’, ‘माय ओल्ड लेडी’ या दोहोंचाही पूर्वसुरी म्हणावा असा एक बंगाली चित्रपट आहे ‘बंछरामेर बागान’ अर्थात बंछरामची वाडी. ‘नारबाची वाडी’ हा त्याचा रिमेक आहे असा उल्लेख विकीवर दिसतो. १९८० मध्ये आलेला हा चित्रपटही पुन्हा ‘शजनो बागान’ या बंगाली नाटकाचा अवतार आहे. हे नाटक सत्तरीच्या दशकात आले होते, आणि अमेरिकेमध्ये Reverse Mortgage Loan ही संकल्पना साठीच्या दशकात आली. या संकल्पनेबाबत भारतीय अर्थव्यवस्था जरी एकविसाव्या शतकापर्यंत झोपली असली, तरी कलेच्या क्षेत्राने तिची लगेचच दखल घेतली होती याची नोंद घ्यायला हवी.

    - oOo-

    अधिक माहितीसाठी:

    https://www.nhb.org.in/RML/aboutrml.php

    https://en.wikipedia.org/wiki/Life_estate
    https://en.wikipedia.org/wiki/Life_annuity
    https://en.wikipedia.org/wiki/Longevity_insurance

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: