मी मूळचा शक्यताविज्ञानाचा (Statistics) विद्यार्थी. त्यामुळे आमच्या मते निष्कर्षाआधी त्याला आवश्यक डेटा महत्वाचा. आणि त्याहून महत्वाचा असतो त्याचा प्रदूषणविरहित स्रोत नि त्याचा अभ्यासविषयाशी असलेला संबंध.
’भारतात आधी पूल बनवावेत की पुतळा?’ याची कल-चाचणी अमेरिकेत घेऊन उपयोग नाही (तिथले मूठभर भारतीय उत्साहाने पुतळ्याच्या बाजूने मतदान करतील म्हणा.) तो भारतात करायला हवा. तसेच भारताने आणखी मिराज विकत घ्यावीत की F-16 याची कल-चाचणी केवळ संरक्षण तज्ज्ञांमध्येच व्हायला हवी, लॉलिपॉप अथवा आईसफ्रूट चोखत बसलेला खंडूही मतदान करु शकतो अशा एखाद्या इन्टरनेट पोर्टलवर करुन उपयोगाची नाही. (करोडो प्रकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगांचीही आपल्याला बरोब्बर माहिती आहे असा माज भारतीय माध्यमांना असतो म्हणा. पण ते सोडा.)
त्यामुळे भारताने बालाकोट मध्ये केलेल्या हल्ल्याच्या प्रत्यक्ष नुकसान आणि त्या नंतर राजकीय वा डावपेचात्मक परिणामांची माहिती १. त्या निर्णयाशी संबंधित व्यक्तींकडून आलेली २. भारत-पाक या दोन देशांशिवाय अन्य ठिकाणी असलेल्या त्रयस्थ माध्यमांतून- आणि ती ही एकाहून अधिक ठिकाणी - स्वतंत्र स्रोतामार्फत - प्रसिद्ध झालेली असावी असे किमान दोन निकष होते. आज दोन दिवसांनंतरचे चित्र कसे दिसते. (नवी माहिती येईल तसे हे बदलूनही घ्यायला हवे हे ही नोंदवून ठेवतो.)
भारतीय राजकीय नेतृत्व आणि संरक्षण क्षेत्रांकडून जी अधिकृत माहिती दिली गेली त्यात ’जैश-ए-महंमद’चे तळ उध्वस्त केले आणि त्यांची भरपूर हानी झाली’ एवढीच माहिती आहे. बळींच्या संख्येचा त्यात कुठेही उल्लेख नाही वा नुकसानीचा कोणताही तपशील नाही. त्रयस्थ आंतरराष्ट्रीय माध्यमांतूनही कुठे याबाबत माहिती नाही. ३०० बळी वगैरे शोध हा फक्त भारतीय माध्यमांचा आहे.
आता ते म्हणू शकतील, की ही माहिती या हल्ल्याशी संबंधितांनीच आम्हाला ’ऑफ द रेकॉर्ड’ दिली आहे. पण मग डेविल्स अड्वोकेट बनून उलट दिशेने ’मी या बावळट माध्यमांना तोंडघशी पाडण्यासाठी मुद्दाम खोटी माहिती पुरवली’ असे मलाही एखाद्या संबंधित अधिकार्याच्या कारकुनाने सांगितले आहे', असा दावा एखादा करु शकतो. Your word against mine! काहीच सिद्ध होत नाही. तेव्हा केवळ अधिकृत पातळीवरील माहिती गृहित धरता येते आणि त्यात नुकसानीच कोणताही नेमका तपशील नाही!
कालपासून ’इम्रान यांनी याचना केली’, ’इम्रान/पाक यांचे लोटांगण’ अशा सनसनाटी पण स्वत:चा मूर्खपणाच जाहीर करणार्या बातम्या अनेक मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून दिसू लागल्या होत्या. यांना माध्यमांत कुणी बसवले असा प्रश्न पडलेला आहे मला.
एकतर वर्षानुवर्षे भारत आपण आक्रमक नव्हे, केवळ आपले संरक्षण करत आहोत असा दावा करत आलेला आहे. त्याचा फायदा म्हणून आंतरराष्ट्रीय जनमत भारताच्या बाजूने - कदाचित नाईलाजाने - राहते. अगदी परवाच्या हल्ल्यातही भारताने ’हा गैर-लष्करी हल्ला होता नि केवळ 'जैश-ए-महंमद'ची ठाणी उध्वस्त करण्यापुरता होता (थोडक्यात पाकिस्तान विरोधात नव्हता)’ अशी भूमिका घेतली आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी ’यात विशेष काही नाही’ असे भासवत हा काही दोन देशांमधल्या युद्धाचा मुद्दा नाही असेच संकेत दिले होते. त्यामुळेच कदाचित, त्यांनी आपले अन्य कार्यक्रम रद्द न करता पार पाडले. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदनच करायला हवे.
या उलट आपला मूर्ख मोदी-लाचार मीडीया मात्र ’मोदी कसे रात्रभर जागले’, ’त्यांनी स्वत: ऑर्डर दिली’ वगैरे हेडलाईन्स देत त्यांना पुन्हा पुन्हा ओढून आणत होते. त्यात आपल्या धन्याने दिलेले संकेत ध्यानात न घेता नेमके उलट करतो आहोत याचे भान त्यांना नव्हते. (येडियुरप्पासारखा सत्तालोलुप तर त्याहीपुढे गेला.)
नेमका याच गोष्टीचा फायदा इम्रान यांनी उचलला आहे असे दिसते आहे. त्यांनी अशाही परिस्थितीत चर्चेचे केलेले आवाहन, अभिनंदन यांचा आपल्याला चांगली वर्तणूक मिळते आहे याचा जाहीर केलेला वीडिओ यातून आता ’आपण शांततेचे प्रयत्न करत आहोत नि भारतीय आक्रमक आहेत’ असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. थोडक्यात वर्षानुवर्षे ज्या भूमिका दोन देशांनी घेतल्या होत्या, त्याच्या नेमके उलट चित्र रंगवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याला आपली माध्यमे आपल्या युद्धखोर रिपोर्टिंगने आणि ’इम्रान लाचार झाले’ वगैरे अडाणी मूल्यमापनाने मदतच करत आहेत.
एकुणात हा स्ट्राईक भरपूर नुकसान करुन युद्धाला आमंत्रण देण्यापेक्षा, आपली कारवाई पाकिस्तान विरोधात नव्हे तर केवळ त्यांच्या हद्दीतील दहशतवादी संघटनांना धाक बसवण्यासाठी आहे हे दर्शवण्यासाठी होता. आम्ही मनात आणू तर तुम्हाला इथे बसून नष्ट करु शकतो हा त्यांना इशारा देतानाच, पाकिस्तानने त्यांना आवर घालावा, अन्यथा आमच्यात इतकी क्षमता आहे की तुमच्या एफ-१६ना न जुमानता तुमच्या नाकावर टिच्चून आम्ही हवे ते करु शकतो इतका सज्जड इशारा देण्यासाठी होता. त्याची तीव्रता केवळ इशारा देण्याइतकीच ठेवली होती. यातून हा पाकिस्तान-विरोधात नाही हे ही ठसवले होते, इतकी काटेकोर भूमिका तयार करताना भाजप/संघ मंडळींची नेहमीची युद्धखोरी आड येऊ दिली नाही, यासाठी मोदींचे आभारच मानले पाहिजेत. (त्याउलट ते निवडणुकीतील यशासाठी युद्ध करतील असा आचरट तर्क देणारेही दिसले. ही वैचारिक दिवाळखोरी काही केवळ भक्तांची मक्तेदारी नाही हे दिसले.)
पण या सार्यावर दोन निवस नंगा नाच करत भारतीय माध्यमांनी भारताची युद्धखोर, युद्धास सज्ज अशी भूमिका निर्माण करुण पूर्ण पाणी फिरवले. असल्या बेजबाबदार माध्यमांच्या नि ’घरबसल्या युध्दखोर’ भक्तांच्या आततायीपणामुळे स्ट्राईक्सच्या निर्णय आणि अंमलबजावणीशी संबंधित असलेल्यांच्या सारा शहाणपणा मातीत गेला आहे. नेता देश घडवत नसतो, सामान्य माणसे घडवत असतात. आणि सामान्य माणसे जोवर खुजी आहेत, संकुचित मानसिकतेची आहेत तोवर नेता काही साध्य करु शकत नसतो.
परकीय माध्यमांनी हल्ल्याच्या ठिकाणी इतकी हानी झाली असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे म्हटले आहे. ते खोटारडे आहेत नि भारतावर ’जळतात’ वगैरे शाळकरी समज आपण करुन घेऊ या. पण ज्या नव्या सरकारच्या मुत्सद्देगिरीने थेट अमेरिकेचे सरकार नमते, इम्रान लाचार वगैरे होतो त्या ’पावरबाज’ नेत्याने आंतरराष्ट्रीय माध्यमे अशी प्रेषित-द्रोही कशी काय राहू दिली बुवा?
समजा आपली माध्यमे म्हणतात तशी ३५० माणसे मारली. परदेशी सोडाच, आपल्याही माध्यमांनी सॅटेलाईट इमेजेस, फोटो वा अन्य मार्गाने त्याची कोणतीही सिद्धता दिलेली नाही. तसे का करत नाहीत ही मंडळी? एकाच वेळी सार्यांची तोंडे बंद होतील. भारताचे आयआरएस उपग्रह ५ बाय ५ मीटरपर्यंत अचूक इमेज घेऊ शकतात. अमेरिकेसह अनेक देश आपल्या उपग्रहांच्या इमेजेस वापरतो (माझी माहिती किमान दहा वर्षे जुनी आहे. आता अॅक्युरसी अधिक वाढली असेल.) आणि त्यांना दिवस आहे की रात्र याने फरक पडत नसतो. असे असताना ३५० माणसे मारल्याच्या सोडा हल्ल्याचे नुकसान दाखवणार्या कोणत्याही इमेजेस - आपल्या देशाने वा अन्य देशाने - प्रसृत केलेल्या नाहीत.
सरकार-पक्षाच्या ’आयटी सेल’ला न झालेल्या विकासाच्याही इमेजेस बनवता येतात, सिंगापूरच्या प्रगतीला गुजरातची म्हणून खपवण्याची आयडिया लढवता येते. आपल्या माध्यमांनी त्यांनाच याचा ठेका द्यायचा ना. ज्या अर्थी त्यांनी असे काहीही केलेले नाही, त्याअर्थी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने तसे न करण्याच्या सूचना त्यांना दिल्या असणार. यातून खुद्द सरकारला या हल्ल्याची व्याप्ती फुगवून सांगण्यात रस नाही हे सिद्धच होते. आणि माध्यमांनी ग्राफिक्सचा वापर करुन अशा इमेजेस बनवल्याच, तर या दिशाभूल करणार्या माहितीमध्ये नकळत लष्करालाही अडचणीत आणणार आहेत हे विसरता कामा नये.
शिवाय या दाव्याला पाकिस्तानी लष्कराने साफ खोडून काढलेले दिसते. त्यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या प्रतिनिधींना घटनास्थळाची सफर करुन आणली. तिथे या मृत्युतांडवाचा मागमूस दिसत नाही. म्हणजे हल्ला झाल्यापासून दिवस उजाडेतो (वाटते उजाडल्यावरच फोटो काढता येतात असे बालकांनाच वाटू शकते.) पाकिस्तानने तो सारा परिसर एकही मृतदेह सापडू नये इतका साफ केला? पाकिस्तानचे लष्करी सहाय्यक दल भलतेच कार्यक्षम दिसते! आणि इतकी माणसे मेली, तर त्यांच्या कुटुंबियांचे काय झाले असेल? आंतरराष्ट्रीय माध्यमांना त्यांच्यापैकी एकही सापडू नये. बरे ते सगळे अकार्यक्षम आहेत, निदान आपल्या रिपब्लिक टीवी, झी टीवीने तरी त्यांच्या शोध घेऊन कोण कुठे ते आम्हाला सांगू नये?
पुन्हा मूळ मुद्दा अधोरेखित करतो. या स्ट्राईकचा उद्देश नि व्याप्ती ही आपली मारक-क्षमता सिद्ध करणे एवढीच होती. तो डावपेचांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक भाग होता. लष्कराच्या प्रतिनिधीनेही ’उद्दिष्ट सफल झाले; इतकी मोघम प्रतिक्रिया दिली होती. सुषमा स्वराज, एस. एस. अहलुवालिया या मंत्र्यांच्या प्रतिक्रियाही त्याला पूरकच होत्या.
अशा वेळी या हल्ल्याचे यशापयश किती माणसे मारली यावरुन मोजणारे बिनडोक आहेत इतकेच. आपण आधी बेताल दावे करायचे आणि लष्करी नि मुलकी अधिकार्यांना पुरावे देण्याच्या मागणीला सामोरे जाण्याच्या खिंडीत अडकवायचे हे स्वत:ला देशभक्त समजणार्या देशद्रोह्यांचेच पाप आहे.
त्यातही माध्यमे हातात असलेल्या मद्यधुंद मर्कटांच्या लीला तर अगाधच होत्या. भस्मासुर जसा आपल्या निर्मात्याच्याच डोक्यावर हात ठेवू बघू लागला तसे आता मोदीप्रेमी माध्यमांचे झाले आहे. मोदींना काय म्हणायचे आहे हे तेच ठरवू लागले आहेत. उलट मोदींना त्याच्या सुसंगत भूमिका घ्यावी लागते की काय, असे मला वाटू लागले आहे. थोडक्यात ज्या टोळक्याच्या जिवावर मोदी सत्ता-स्वार झाले ते टोळकेच आता खोगीर टाकून मोदी-स्वारी करण्याचा प्रयत्न करत आहेत. भस्मासुराच्याही डोक्यावर हात ठेवू पाहणारा भस्मासुर त्याने स्वत:च जन्माला घातला आहे.
- oOo -
संबंधित लेखन: बेगिन, बालाकोट, बुश आणि अंधारातील अधेली