Vechit Marquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

गुरुवार, २१ मे, २०२६

पास्ता आणि झुरळ

  • मुल्ला नसरुद्दिनचा म्हणून एक किस्सा सांगितला जातो— हे सारे किस्से ‘अपौरुषेय’ असल्याने त्यात सतत भर पडत असते. त्यातले काही सीमोल्लंघन करुन इतर देशांत तेनालीरामचे, बीरबलाचे, इसापचे... म्हणून प्रसिद्ध होतात. त्यांचे काही इकडे आयात केले जातात आणि ‘आपलेच मूळचे’ यावर फावल्या वेळात भांडायला मूर्ख जमातींना मुद्दे मिळून जातात— ते जाऊ दे.

    किस्सा असा की एकदा मुल्लाने लोकांची फिरकी घ्यायचे ठरवले. ‘आज मशिदीमध्ये अन्नदान होणार आहे नि कुणीही घरात चूल न पेटवता जेवणासाठी तिकडे जायचे आहे’ असे त्याने पसरवून दिले. लोक– विशेषत: स्त्रिया, खुश झाले. चला आज गोडधोड खायला मिळणार म्हणून सुखावले. ठरली वेळ झाली नि सगळॆ लोक ठेवणीतले कपडे घालून मशिदीकडे धावू लागले. पाचच मिनिटांत वसती ओस पडली.

    दोन-तीन मिनिटांत मुल्लाही ठेवणीतले कपडे घालून पिशवीत ताट-वाटी घेऊन निघाला. वाटेत त्याचा एक मित्र भेटला. ‘कुठे निघालास?’ त्याने विचारले. ‘मशिदीत’ मुल्लाने उत्तर दिले. याला मुल्लाचा चावटपणा ठाऊक होता, त्यामुळे त्याला आश्चर्य वाटले. ‘अरे पण तूच ही अफवा पसरवलीस ना?’ त्याने विचारले. ‘अरे पण ज्या अर्थी इतके लोक मशिदीकडे चालले आहेत, म्हणजे कदाचित खरोखरच अन्नदान असेलही. जाऊन पाहायला काय हरकत आहे?’

    बहुसंख्या एखाद्या बाबतीत विश्वास ठेवते आणि ती खरी, सत्य, वास्तव असण्याचा कोणताही पुरावा नसला तरी लोक तिला घट्ट कवटाळून बसतात कारण अनेकदा ती तशी असावी म्हणजे आपले प्रश्न, समस्या, अडचणी सुटतील असं त्यांना वाटत असतं. आसपासची परिस्थिती बिघडू लागली. एकाहुन एक समस्या चालून येऊ लागल्या की मनुष्यजात उतावीळपणे अशा हव्याहव्याशा अफवेच्या मागे लागतात. त्यातून नवे त्राते, नवे प्रेषित, नवे पंथ, नवे धर्म उभे राहातात. यातले बरेचसे फसवे, खोटे आहेत हे स्वच्छ दिसत असूनही मुल्लाच्या अफवेसारखे लोक त्यांच्या मागे जात असतात.

    या सार्‍याला वैतागलेल्या बॉब हेन्डरसन नामक अमेरिकन फिजिसिस्टने ‘पास्ताफारिअन’ नामक धर्माची स्थापना केली. यासाठी प्रासंगिक कारण होते कॅन्सास राज्याच्या शिक्षण विभागाने मानवी उत्क्रांतीसोबतच ‘इन्टलिजन्ट डिझाईन’ (पूर्वाश्रमीचे ‘क्रिएशन सायन्स’) शिकवण्याची शिफारस केली. बायबलमधल्या कथा नि किस्से एकत्र करुन त्याला तथाकथित विज्ञान म्हणून शिकवण्याचे हे चाळे अमेरिकेत वर्षानुवर्षे होत आहेत. (आपल्याकडेही गद्रे नामक एका लेखकाने देव या शब्दाऐवजी महात्मा फुले यांनी वापरलेला ‘निर्मीक’ हा शब्द वापरून याचीच एक आवृत्ती माथी मारण्याची चलाखी केली. त्याबद्दल फुलेंच्या नावचा राज्य सरकारचा पुरस्कारही मिळवला. फुलेंच्या शिकवणुकीच्या सर्वस्वी विपरीत मांडणीला त्यांच्या नावचा पुरस्कार मिळणे हे गंमतीशीर होते.) बॉबचा मुद्दा असा होता की जर बायबलवर आधारित विश्वोत्पत्ती नि सजीव-सृष्टीच्या प्रगतीची कथा शिकवणार असू तर इतर धर्मांतील कथा का नकोत? माझ्या ‘पास्ताफारिन’ धर्माने सांगितलेली कथा का नको?

    त्याचा मुद्दा बिनचूक होता. फक्त बिचारा हे विसरला होता की प्रत्येक धर्माच्या व्यक्तींना आपलाच धर्म खरा, त्याने सांगितलेल्या गोष्टी हे वास्तव आणि इतर धर्म, पंथ हे खोटे, सैतानाचे अपत्य असे वाटत असते. अन्य धर्मियांच्या अस्तित्वानेच त्यांचा जीव घाबरा होत असतो. ‘एकं ही सत्‌, अन्य सर्व मिथ्या’ असा त्याचा बाणा असतो. धार्मिक पगडा असलेली मने असहिष्णू असतात, त्यांत पर्यायी मतांचे अस्तित्व राहूच शकत नाही. पण तरीही बॉबने आपल्या धर्माची मूलतत्त्वे, विश्वनिर्मितीची कल्पना मांडली आणि तिला ‘इन्टलिजन्ट डिझाईन’ ला पर्यायी म्हणून शिकवावे अशी मागणी करणारे पत्र कॅन्सासच्या शिक्षण विभागाला पाठवले.

    या धर्माच्या नावातच ‘पास्ता’ हा इटालियन पदार्थ आहे. पण एकुणात हे नाव कसे आले? ‘रास्ताफारिअन’ नावाचा एक पंथ आधीच अस्तित्वात आहे. या पंथाचे अनुयायी असे मानतात की, इथिओपियाचा माजी सम्राट Ras Tafari Makonnen हा येशू ख्रिस्ताचा अवतार होता आणि आपण सारे त्याचे अनुयायी आहोत. या Ras Tafari वरुन त्याच्या अनुयायांना रास्ताफारिअन म्हटले गेले. Jah म्हणजे देवाचे अस्तित्व हे तुम्हा-आम्हां सर्वांत आहे असे हे मानतात. ज्यू धर्मीयांसाठी जसे Zion अर्थात पवित्र राज्य वा स्वर्गाचे राज्य जसे जेरुसलेम मानले आहे तसे संपूर्ण आफ्रिका यांच्यासाठी Zion आहे. हा एक प्रकारे Pan-Africaism चा अवतार आहे.

    या Rastafarian वरून बॉबने आपल्या धर्माचे नाव Pastafarian असे निश्चित केले. या धर्माचा देव हा डोळ्याच्या जागी meatballs असणारा , ज्याचे शरीर हे ‘स्पागेती’ (एक प्रकारचे नूडल्स) या इतालियन पदार्थाने बनलेले आहे. या धर्माच्या श्रद्धेनुसार हा विश्वनिर्माता देव आहे. बॉबचे म्हणणे असे होते की ‘बायबलमधील कुणीही न पाहिलेल्या अध्याहृत देवाने हे जग निर्माण केले हे जर विज्ञानाचा भाग आपण मानणार असू, तर या ‘फ्लाईंग स्पागेती मॉन्स्टर’ने विश्वनिर्मिती केली हा आमचा समजही वैज्ञानिक मानायला हवा, इन्टलिजन्ट डिझाइनप्रमाणेच शिकवायला हवा.’ आपल्या ‘चर्च ऑफ स्पागेती मॉन्स्टर’तर्फे ही मागणी करणारे पत्र त्याने कॅन्सासच्या शिक्षण विभागाला पाठवले.

    बॉबचा मुद्दा वाजवी आहे. एखादा धर्म अधिक काळ प्रचलित आहे म्हणून त्याचे दावे सत्य नि नवथरांचे चूक असा निवाडा निदान विज्ञानाच्या परिघात तरी करता येणार नाही. दोन्हींलाही तर्क, पडताळणी, निरीक्षण, निष्कर्ष या वैज्ञानिक चरकातून न्यावे लागेल. त्यातून जो निवाडा हाती लागेल हे मान्य करायला हवे. पण धार्मिकता ही असहिष्णू असते, भित्री असते. ती पर्यायांचे खंडन करण्यापेक्षा भंजन करणे, विध्वंस करणे अधिक पसंत करते. शिक्षणविभाग बॉबच्या पत्राची पत्रास ठेवणार नव्हता हे उघड होते. बॉबचा उद्देश या निमित्ताने विचारांचा, विद्रोहाचा धुरळा उडवून देणे हा होता.

    पण गंमत अशी झाली की ‘मैं भी पास्ताफारिअन’ म्हणून घोषणा करणार्‍यांकडे पाहून अनेकांना हा खरेच नवा धर्म निर्माण झाला आहे असे वाटले. काहींनी हा खेळ खेळता खेळता खरोखरच स्पागेती मॉन्स्टरच्या चर्चची उभारणी केली. खुद्द बॉबनेच नव्या धर्माचे गॉस्पेलही लिहिले. नवा बुवाबाबा आला की त्याच्या मागे धावणारे अनेक न्यूनगंड बाळगणारे लोक आपल्याकडे असतात, तसेच अमेरिकेतही असतात. ते नव्या धर्माकडे आकर्षित झाले. अल्प प्रमाणात का होईना या धर्माला खरोखरच अस्तित्व मिळाले. त्यांना पाहून ‘आला असेल त्यांना अनुभव’ म्हणत आधी गंमत म्हणून स्वत:ला पास्ताफारिअन म्हणवणारे मुल्ला नसरुद्दिनप्रमाणे हळूहळू ते खरेही मानू लागले असतील.

    माणसाने मानसिक आधारासाठी देव नावाची संकल्पना आपणच निर्माण केली आणि नंतर तिच्या इतका आहारी गेला की ती मानवी संस्कृतीला आधारभूत होण्याऐवजी मोठ्या संघर्षांचे, हिंसेचे नि विध्वंसाचे कारण होऊ लागली आहे. तिच्याभोवती व्यावसायिक स्वार्थांचे प्रचंड इमले उभे राहिले आहेत. सावकारी करणार्‍यांचे टेबल उधळून देणार्‍या प्रेषिताचे अनुयायी टोलेजंग सोनेरी प्रासादात राहून त्याच्या धर्माची ठेकेदारी करू लागले आहेत.

    गंमत म्हणजे हे आज आठवलं ते ‘कॉकरोच जनता पार्टी’ या पक्षाच्या स्थापनेमुळे. भारतीय न्यायव्यवस्थेची लक्तरे दाखवणारे विधान आपल्या मुख्य न्यायाधीशांनी केले. बेरोजगारांना, विरोध करणार्‍यांना त्यांनी झुरळाची उपमा दिली. याला उपहासाने उत्तर देण्यासाठी अभिजित दीपके या तरुणाने हा तथाकथित राजकीय पक्ष काढला. दोनच दिवसांत याची लोकप्रियता प्रचंड वाढली. इतकी की काही जणांनी याचे व्यापक लोकचळवळीत रूपांतर करावे, निवडणुका लढवाव्यात वगैरे दिवास्वप्ने पाहायला सुरुवात केली आहे.

    भारतीय माणसाला असे जादूची कांडी फिरवून बदल होतील अशी स्वप्ने पाहायला आवडते. चिकाटी, दीर्घोद्योगीपणा आपल्या रक्तात नि वारशामध्ये नाही. काही वर्षांपूर्वी कुणी एक गांधी टोपी घालून उपोषणाला बसला तर समाजातील मोठ्या गटाला अवघे राष्ट्र मंतरलेले भासू लागले. आता देश उन्नतीची शिखरेच्या शिखरे पादाक्रांत करणार अशी स्वप्ने पडू लागली. त्यातून जे फलित आले ते आपल्यासमोर आहेच. त्यातूनच हे असे ‘जनता आपले काय वाकडे करणार आहे’ या उन्मादी माजामध्ये बेमुर्वतपणे शेरेबाजी करणारे तुमच्या आमच्या डोक्यावर बसले.

    नंतर कुणीतरी ‘इससे आज़ादी, उससे आज़ादी’ म्हणून जोरदार घोषणा दिल्या नि वठलेल्या झाडांना पालवी फुटल्यासारखे अनेकांना त्याच्या त्राता दिसू लागला. दोन निवडणुकांत दारूण पराभव होऊन हा त्राता व्यासपीठावरून घसरून समोरच्या अनेक ओळींतील एक खुर्ची होऊन बसला. कुणाला काळात मागे जाऊन पुन्हा एकवार मार्क्सचा जीर्णोद्धार करावासा वाटतो आहे. आणखीही काही उदाहरणे देता येतील. मागच्या चुकांतून आपण शिकत नाही हेच खरे.

    प्रासंगिकतेला बदल समजण्याची चूक करायची नसते, त्यात क्रांती शोधणारे तर अव्वल वाणाचे गाढव असतात. कुणी नसरुद्दिन सांगतो म्हणून चुली थंड ठेवून आयत्या जेवणाची आशाळभूत वाट पाहायची नसते. पास्ता, मीटबॉल्स हे खाण्याचे पदार्थ आहेत याचे भान राखायचे असते, त्यात देवत्व शोधण्याचा मूर्खपणा करायचा नसतो, आणि मुख्य म्हणजे ज्यात झुरळ पडलं आहे असा पास्ता खाण्यालायक नसतो हे मान्य करुन तो फेकून द्यायचा असतो.

    -oOo-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: