बुधवार, १० नोव्हेंबर, २०१०

‘राजनीती’चे महाभारत

मंडळी काल आम्ही ‘राजनीती’ नामे चित्रपट पाहिला– सहज टीवीवर दिसला म्हणून पाहिला. अगदी शेवटपर्यंत पहावे असे त्यात काय होते, ते काही समजले नाही. एरवी १०-१५ मिनिटात पुढील चित्रपटाची इस्टुरी ९५% अचूकतेसह (संख्याशास्त्री ना आम्ही, ५% सोडावे लागतात) सांगून टीवी बंद करणारे आम्ही, या चित्रपटात काय होते की शेवटपर्यंत चिकाटीने पाहिले.

कदाचित एरवी ‘पहावी’ लागणारी भिकार गाणी नव्हती म्हणून, कि दर दहा मिनिटांनी होणारा पंधरा मिनिटांचा ‘छोटासा’ ब्रेक न घेता अर्धा तास सलग चित्रपट पाहता आला म्हणून, की त्यात ती कत्रिना का कोण होती – जी सुंदर आहे, म्हणे – म्हणून, की त्या रणवीर– चुकलो ‘रणबीर’ म्हणायला हवं नाही का– चा एकही चित्रपट पूर्वी पाहिला नसल्याने ‘He deserves a chance' असाही एक सुप्त हेतू असावा. तर कारण काहीही असो, आम्ही तो चित्रपट टिच्चून बसून पाहिला एवढं खरं...

...आसं व्हय, पायला. बरं मंग...? आता हितं काय त्येचं...? का आता परत बैलाच्या कासर्‍यावानी बयाजवार इस्टुरी सांगून बोर करायचा इचार हाय?

TheBeginning

सांगतो ना. तर विषय असा आहे साधारण (नाय हो सम्दी इस्टुरी नाय सांगत, थोडक्यात सांगतो ज्येंनी पायला नसंल त्येंच्यासाटी). आटपाट नगरात राष्ट्रवादी पार्टी नावाचा एक – प्रादेशिक – राजकीय पक्ष आहे. त्याचे अध्यक्ष असलेले भानुप्रताप नुकतेच अर्धांगवायूने अंथरूणाला खिळले आहेत. यांचे एक चिरंजीव आहेत वीरेंद्रप्रताप (मनोज वाजपेयी). ते वडिलांच्या अनुपस्थितीत – अर्थातच – स्वत:ला त्यांचे वारस समजत असल्याने पार्टीची धुरा आता आपल्याकडे यावी असे त्यांना वाटते. पण अध्यक्ष ही धुरा सोपवतात आपल्या धाकट्या भावाकडे, चंद्रप्रतापकडे.

या धाकल्या पातीचे दोन पुत्र आहेत, पृथ्वीप्रताप (अर्जुन रामपाल) आणि समरप्रताप (रणबीर कपूर). आता मूळ अध्यक्षांनी ‘कार्यकारी अध्यक्ष’ केलेल्या चंद्रप्रतापनाच पार्टीचा मुख्य चेहरा म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न पृथ्वी करतो, यात वीरेंद्रप्रतापला पद्धतशीरपणे बाजूला सारले जाते. या सर्व आणि इथून पुढेही या सर्व कामात पृथ्वी-समर यांचा मामा (नाना पाटेकर) आपल्या भाच्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे.

दुसरीकडे दलित वस्तीमधे राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे, परंतु तिथे स्थानिकांना उमेदवारीची मागणी करत आता सूरज (अजय देवगण) च्या रूपाने एक बंडखोर उभा राहिला आहे. त्याच्या पाठीशी युवा पिढी असल्याचे पाहून मामा धूर्तपणे जे त्याच्या पूर्णपणे मुठीत आहेत अशा सूरजच्या वडिलांनाच राष्ट्रवादीची उमेदवारी देऊ करतो. अर्थातच सूरजला त्या विरूध्द काही बोलता येत नाही. पण तो दुखावला जातो. हे पाहून ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या नात्याने वीरेंद्रप्रताप आपल्या अधिकारात त्याला पार्टीच्या पॉलिटब्यूरोत सामावून घेतो; एवढेच नव्हे तर त्याला मागासवर्गीय सेलचे अध्यक्षपदही देतो. आता सुरू होते ते शह-काटशहाचे राजकारण.

यात प्रथम चंद्रप्रतापांची हत्त्या होते. यात सूरजवर संशय घेतला जातो. वीरेंद्रप्रतापचा उजवा हात झालेला सूरज त्याच्या बरोबर अध्यक्षांना भेटून पृथ्वीला पार्टीतून निलंबित करायला भाग पाडतो. वडिलांच्या मृत्यूने नि भावाच्या हकालपट्टीने चिडलेला समर आता सारी सूत्रे आपल्या हातात घेतो. इथून पुढे राजकारणाच्या नि हिंसेच्या सारीपाटावर समर विरूद्ध सूरज असा डाव रंगतो.

अर्थात हा हिंदी चित्रपट असल्याने प्रेमपात्र हवेच. पण इथे मात्र जरा परिस्थिती नेहमीपेक्षा वेगळी आहे बर्का. ‘आऽऽऽणि ते सुखाने नांदू लागले’ वगैरे प्रकार नाही. आपल्या कत्रिनाची समरवर ‘बचपन की प्रीत’ असते. पण तो फारिन रिटर्नड असल्याने आधीच एका गोर्‍या पोरीच्या प्रेमात असतो. पण तरीही, पृथ्वीप्रताप नि वीरेंद्रप्रताप यांच्या लढ्यात पृथ्वीच्या नव्या पार्टीला पैसा उभा करून देण्यासाठी, तो बक्कळ पैका असलेल्या तिच्या बापाकडे कत्रिनाला मागणी घालतो.

आता तिचा बाप पण लै बेरकी. आम्रिकेत राहणार्‍या समरचा सासरा होऊन त्याला काय फायदा? त्या ऐवजी नव्या उगवत्या पक्षाचा नेता असलेल्या पृथ्वीलाच तो जावई म्हणून पसंती देतो. सुटका झाल्याच्या भावनेने म्हणा किंवा पैसा हवाच या अपरिहार्यतेने म्हणा, समर नि त्याचे कुटुंबिय देखील याला मान्यता देतात. यानंतरच्या राजकीय लढाईत पृथ्वी आणि समरची गोरी प्रेयसी (जिने ‘मैं तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हूँ’ हे जगप्रसिद्ध वाक्य – अर्थात इंग्रजीत – त्याला आधीच ऐकवलेले असते) बळी पडते.

आता सहनशक्ती संपलेला मामा पिस्तुल घेऊन सूरजला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या घरात शिरतो. तो बाहेर पडतो तो एका गुपिताचा उलगडा होऊन. सूरज हा समरच्या आईचाच कुंवारपणीचा पुत्र असतो. त्याने स्वत:च त्या पुत्राला आईपासून दूर केलेले असते. परत येऊन आपल्या बहिणीला तो ही गोष्ट सांगतो. पुढचा संघर्ष थांबवावा म्हणून ती सूरजकडे जाते (तिचा भाऊच तिला तिकडे घेऊन जातो) त्याला वस्तुस्थिती सांगते नि आपल्या घरी येण्याचे आवाहन करते. पण तो सांगतो, ‘माझ्या निष्ठा फक्त वीरेंद्रप्रतापशी आहेत त्या तशाच राहतील.’

आता आमच्या टक्कुर्‍यात प्रकाश पडला. अहो हे आपले ओळखीचे आहे की. कर्ण नि कुंतीचा संवाद आठवतो का? तिथे तू माझा पुत्र आहेस, आपल्या घरी ये असे आवाहन करणार्‍या कुंतीला माझ्या निष्ठा दुर्योधनाशीच राहतील असे बजावणारा कर्ण आठवला. मग सगळे बयाजवार समजले. पण ही कुंती त्या ‘पृथा’ कुंतीच्या अगदी विपरीत, अगदी आपल्या मुलांचीच मुलगी शोभावी इतकी लहानखुरी आहे.

KrishnaOrKauns

आता कर्ण/कुंतीची भेट घडवणारा मामारूपी कृष्ण आहे इथे. तो शकुनिमामा नाही, इथे कारण तो गांधारीऐवजी कुंतीचा भाऊ आहे. बघा ना पृथ्वी-समरच्या सगळ्या राजकीय लढाईत पडद्याआडचा सूत्रधार तोच तर आहे, कृष्णच तो!

कत्रिनाचा बाप हा जणू आपल्या जावयाला युद्धाची रसद/सैन्य पुरवणार्‍या द्रुपदासारखा, इथे तो पार्टीला आवश्यक तो पैसा पुरवतो आहे इतकेच. अरेच्या मजा आहे की.

चला आता एकदम उगमाकडे जाऊ या. सुरवात कुठे आहे पहा. मूळची गादी – म्हणजे अध्यक्षपद – एकाची, पण तो – आंधळ्या धृतराष्ट्राप्रमाणे – पांगळा झाल्याने नि त्याच्या धाकट्या भावाकडे – चंद्रप्रताप = पंडु – येते. त्याच्या आधारे त्याची मुले त्या गादीवर हक्क सांगू लागतात. अर्थात मूळ अध्यक्षाचा मुलगा त्यांना आपल्या राज्यातून – पक्षातून – हाकलून लावतो. ते पुढे द्रुपदाच्या (कत्रिनाचा बा) मदतीने स्वत:चे इंद्रप्रस्थ – जनशक्ती मोर्चा नावाचा पक्ष – स्थापन करतात. दुर्योधन ऊर्फ वीरेंद्रप्रताप सूतपुत्र – आपलं हे दलितनेता – कर्ण ऊर्फ सूरज याला अंगदेशचा राजा – मागासवर्गीय सेलचा अध्यक्ष – करतो. सत्तेच्या सारीपाटावर या हस्तिनापूर (राष्ट्रवादी) नि इंद्रप्रस्थ (जनशक्ती) च्या नेत्यांचा संघर्ष सुरू होतो.

आता कलियुगात धनुक्श-बाणाचे युद्ध वगैरे काही नाही, मग बंदुका घेऊन मार्‍यामार्‍या होतात. (इलेक्शन वगैरे आहेच, पण त्याला कथेत काही फारसे महत्त्वही नाही. सारी राजनीती बंदुकीच्या नि कटकारस्थानांच्या आधारे चालू आहे.) इथे समर युक्तिने वीरेंद्रला एका बंद पडलेल्या फॅक्टरीत यायला भाग पाडतो. निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने चिडलेला वीरेंद्र एकटाच तिकडे जायला निघतो. हे समजताच सूरज त्याला फोन करून त्याने सांगतो की तो ही तिकडे येतोय नि तो तिथे पोचेपर्यंत वीरेंद्रने गाडीतून – जी बुलेटप्रूफ आहे– बाहेर पडू नये असा इशारा देतो. गांधारीने आपल्या नजरेने अजेय बनवलेला पण लज्जारक्षणापुरते घेतलेल्या पर्णवस्त्राने मांडी कमकुवत राहिलेला दुर्योधन आठवला का? आता पुढचा प्रसंग त्या संदर्भात पहा बघू, जमतंय का?

सूरज तिथे पोचतो, हुशारीने समरच्या पाठीमागे पोचतो. समरचे लक्षच नाही. पण तरीही सूरज समरवर गोळी झाडू शकत नाही. बिचारा कर्ण! आपल्या भावावर कसा गोळी झाडणार, नाही का? यानंतरच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या वीरेंद्रला उचलून नेऊ पाहणार्‍या सूरजला समर नि मामा गाठतात. ‘मला वीरेनला हॉस्पिटलमधे नेऊ दे, मग तू म्हणशील तिथे येईन (तुझी गोळी झेलायला)’ सूरज त्याला सांगतो. इथे ‘रथचक्र उद्धरू दे’ म्हणणार कर्ण डोळ्यासमोर येतो का? आता मामा समरला प्रवचन देतात. आपल्या सुदैवाने पूर्ण गीता –आणि तो तुझा भाऊ आहे हे सत्य – न सांगता फक्त पूर्ण सत्ता मिळवणे हे ध्येय वगैरे थोडक्यात कृष्णनीती सांगतात. इकडे वीरेंद्रची मान कलंडते नि तिकडे समर सूरजला गोळी घालून संपवतो.

थांबा थांबा, इथे संपत नाही. पुढे समर पांगळ्या भानुप्रतापना व्हील-चेअरवरून आणताना दिसतो (आणि ‘मी हे मुद्दाम केलं नाही हे तुम्हाला ठाऊक आहे ना?’ असे बिनडोक समर्थनही देतो.). शेवटी कृष्णाने घडवून आणलेली पांडवांची नि अंध धृतराष्ट्राची भेट आठवली का? पण इथला धृतराष्ट्र आंधळा नसून पांगळा असल्याने त्यांने खंजीर लपवून ठेवून भीमाला ठार मारण्याचा प्रयत्न करणे वगैरे सीन टाकता आलेला नाही इथे. चित्रपटाच्या बाकी घटनांशी आमचे देणे-घेणे नाही. आम्ही फक्त ‘राजनीती’तील महाभारत सांगू म्हटले होते ते सांगितले.

तर असे हे ‘कलयुग का महाभारत’. आता याला वाङ्मयचौर्य वगैरे म्हणू शकत नाही आपण. याचे पहिले कारण म्हणजे हिंदी चित्रपटाबाबत हे वेगळे सांगायची गरज नसते हे आणि ‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं’ हे आपल्याला आधीच ठाऊक आहे हे दुसरे!

- oOo -


हे वाचले का?

शनिवार, १४ ऑगस्ट, २०१०

नरोटीची उपासना

पु.ग.सहस्रबुद्धे यांनी ‘नरोटीची उपासना’(१) हा लेख लिहिला, त्याला आज पन्नासहून अधिक वर्षे लोटली आहेत. पन्नास वर्षे झाली त्या वर्षी एका प्रथितयश वृत्तपत्राने तो पुनर्मुद्रित केला होता. आज श्रावण महिन्याच्या निमित्ताने त्याची आठवण झाली.

हा पु.गं.चा लेख नाही, त्याचा आजच्या काळात वेध घेणारा म्हणून शकू कदाचित. प्रथमच एक गोष्ट स्पष्ट करतो (फारसा उपयोग नसतो हे ठाऊक असूनही) ती म्हणजे पु. गं.चा लेख किंवा हा लेख आपल्या परंपरांचे/ प्रवृत्तीचे प्रचलित विचारांच्या/सश्रद्धतेच्या मर्यादेतच विचार करतो आहे. इथे अश्रद्धतेचा विचार येणार नाही. (प्रतिवादाच्या सोयीसाठी प्रथम तसा शिक्का मारणे सोपे असते, पण लेखाची व्याप्ती ती नाही.)

---

नरोटी म्हणजे करवंटी, नारळाच्या आतील जीवनदायी पाण्याचे, खोबर्‍याचे रक्षण करणारे भक्कम वेष्टण. श्रद्धा आणि परंपरांच्या भाषेत सांगायचे, तर खोबरं नि पाणी हे मूलतत्त्व नि नरोटी म्हणजे त्याभोवती उभे राहिलेली व्यावहारिक कर्मकांडे वा उपचार. आपल्या लेखात पु.गं.नी त्याचा विचार साररूपाने मांडला आहे तो असा.

कोणत्याही समाजाची धारणा व्यवस्थित व्हावी, त्याचा योगक्षेम नीट चालावा, त्याची उन्नती व्हावी, यासाठी त्यातील धुरीणांनी वेळोवेळी काही तत्त्वे मनाशी निश्चित करून त्याअन्वये काही नियम, काही शासने सांगितलेली असतात. त्या नीतिनियम व व्यावहारिक नियमांच्या मागची जी तत्त्वे, त्यांचा जो मूळ हेतू– त्याकडे लक्ष ठेवून जोपर्यंत समाज त्यांचे पालन करीत असतो तोपर्यंत ती फलदायी होतात. समाजाच्या धारणपोषणास, रक्षणास, अभ्युदयास त्यांचे साह्य होते.

EmptyCoconutShell

कालांतराने स्वार्थामुळे, मोहामुळे, अज्ञानामुळे, आळसामुळे, श्रद्धाशून्यतेमुळे त्या मूळतत्त्वांचा विसर पडून समाज केवळ त्या जडस्वरूपाचा उपासक बनतो. तो त्याची चौकट, त्याचा सांगाडा, त्याचे बाह्यरूप तेवढे जाणतो. अंतरीचे तत्त्व, त्याचा आत्मा तो जाणत नाही. नारळाची नरोटीच फक्त त्याला दिसते. आतले खोबरे कोणी नेले, ते नासले, तरी त्याच्या ध्यानातच येत नाही. तो फक्त नरोटीची उपासना करीत राहतो. पण त्याची श्रद्धा मात्र असते की आपण श्रीफळाचीच उपासना करीत आहोत. समाजाचा अध:पात येथूनच सुरू होतो.

या मूलत्त्वाचे निरूपण त्यांनी काही ऐतिहासिक काही तात्कालिक उदाहरणांच्या आधारे केले होते. आजच्या काळाचा विचार करता परिस्थिती फार बदलली आहे का असा विचार मनात येतो. रोजच्या जगण्यातले तुमचे-माझे काही अनुभव आहेत ज्यावरून असे वाटते की आजही परिस्थिती काही वेगळी नाही. कदाचित उद्याचीही काही वेगळी नसेल.

आज नागपंचमी आहे, नागपूजेचा दिवस. हा सण खरेतर शेतकर्‍यांचा. वावरातील धान्याची नासाडी करणार्‍या उंदरांवर जगणारा नाग हा एक प्रकारे शेतकर्‍याचा उपकारकर्ताच असतो. परंतु हा उपकारकर्ता मवाळ वृत्तीचा नाही. खुद्द तो शेतकरी वा त्याचे कुटुंबिय त्याच्या जगण्याआड आले, तर त्यांनाही डसण्यास कमी करणार नाही. यास्तव, एका बाजूने त्याच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे नि दुसर्‍या बाजूने वावरातले सहजीवन सुखदायी व्हावे म्हणून त्याला अन्न देऊन स्नेह जोडणे असा दुहेरी हेतू यात असावा.

आता मुद्दा असा आहे की मुळात हा वावराशी निगडित सण आहे. मग ज्यांनी जन्मात कधी वावराचे तोंड पाहिले नाही अशा पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरातील फ्लॅट्-संस्कृतीमधे वाढलेल्या नि कदाचित (त्यातील काही) गांडूळ दिसले तरी चप्पल घेऊन मारायला धावणार्‍या स्त्रिया, नागपंचमीचे व्रत करतात हा विरोधाभास नाही का?

बराच काळ गारुडी नाग दाराशी घेऊन येत नि या तथाकथित सश्रध्द स्त्रिया त्या नागाची पूजा करून पुण्य कमावत. यात अनेक नाग मृत्युमुखी पडतात हे लक्षात आल्यावर पुण्यातील एका प्राणिमित्र संघटनेने दाराशी आलेल्या नागाची पूजा न करता सर्पोद्यानात जाऊन करा अथवा प्रतिमेची पूजा करा असे सांगताच त्यांच्यावर ‘संस्कृती विरोधक’ असल्याचा शिक्का मारला गेला (आमच्यासारखाच).

एका विद्वान साहित्यिकाने लेख लिहून ‘दाराशी नाग येणे नि तो पहायला मिळणे हा आमच्या मुलांचा सांस्कृतिक हक्क आहे’ असा दावा केला होता. आता नागपूजा हा सांस्कृतिक हक्क हे मान्य, पण त्यापाठोपाठ ‘दाराशी येण्याचा हक्क’ हे त्याचे पिलू कुठून आले? जसे गणोशोत्सवाबरोबर कर्णकटू स्पीकर लावण्याचा हक्क हा देखील संस्कृतीचा भाग होतो तसेच बहुधा.

अशीच गोष्ट निर्माल्याची. आपल्याकडे देवाच्या अंगावरून काढलेले निर्माल्य नदीत सोडण्याचा प्रघात आहे. यामागे अतिशय सुंदर नि संवेदनशील कारण आहे. पण संस्कॄतीच्या नावाखाली त्याचे पालन करणार्‍या किती जणांना ते ठाऊक आहे? विचारा स्वतःला हा प्रश्न.

कारण असे आहे की आपण आपल्या उपासनेसाठी निसर्गातून त्याच्या चैतन्याचा अंश ती फुले काढून आणतो. जे आपले नाही ते आपण निसर्गाकडून घेतो. ते पुन्हा निसर्गालाचा परत करावे हा हेतू असतो. मग नदीतच का, तर वाहते पाणी हा चैतन्याचा सर्वात मोठा स्रोत आहे. सुकलेल्या फुलांना - ज्यांचे चैतन्य आपण हिरावून घेतले होते - पुन्हा एकवार चैतन्याच्या सहवासात सोडावे, संकेतार्थाने त्यांचे चैतन्य त्यांना पुन्हा मिळवून द्यावे हा.

आजच्या आपल्या नद्यांची अवस्था काय आहे. पुण्यातील मुठा नदी हे सार्‍या शहराचे मैलापाणी पोटात घेऊन गटार झाले आहे. दोन-तीन धरणांमुळे ‘वाहते पाणी’ हा मुद्दा पूर्णपणे निकाली निघालाय. अशा पाण्यात निर्माल्याचे विसर्जन करणे हे त्याचे अवमूल्यन नाही का? आमच्या मातोश्रींना अनेकदा हा मुद्दा सांगण्यात आला. परंतु तो नाकारून आमच्या माघारी निर्माल्य नदीतच विसर्जन केले जाते. माझी खात्री आहे बहुतेकांकडे हीच स्थिती असणार आहे.

आता याची दुसरी बाजू पाहूया. काही वेळा आपण कर्मकांडात बदल करतो. पण त्यात हेतू मूल्यमापनाचा/ सुधारणेचा असतो की स्वार्थाचा/सोयीचा? श्रावणात एका शुक्रवारी सवाष्ण जेवायला बोलावण्याची पद्धत आहे. आता बहुतेक नोकरदार स्त्रिया रविवारी बोलावतात, कारण एरवी सुटी नसते.

आता सवाष्ण बोलावण्याचे हेतू काय असतील हे मला माहित नाही. पण माझ्यापुरता एक अर्थ मी लावला आहे तो सांगतो. श्रावण हा महिना असा आहे की हा बहुधा दुष्काळी महिना. मागच्या वर्षीचे धान्य संपत आलेले नि यावर्षीची कापणी व्हायला वेळ असते. अशा वेळी घरची स्त्री अन्नधान्य पुरवून वापरत असते. बहुधा घरच्या धन्याला नि पोरांना अधिक देऊन ती अर्धपोटी राहत असेल. अशा वेळी निदान एक दिवस तिला चांगले जेवण मिळावे हा एक हेतू असावा. बहुधा अशा गरजू स्त्रीला बोलावण्याचा मूळ प्रघात असावा. त्या फळत्या-फुलत्या घरात एक दिवस एक माणूस सहज खपून जाते. त्यामुळे फार काही खर्च वाढत नाही हा ही एक फायदा.

आज काय स्थिती आहे? जिला सवाष्ण म्हणून बोलावण्यात येते ती गरजू असते का? एक धक्कादायक प्रकार– निदान त्यावेळी मला तसा वाटला– पाहण्यात आला.

वारः शनिवार, स्थळः अभिषेक वेज, मेहेंदळे गॅरेज समोर.

आम्ही एका मित्राची वाढदिवसाची पार्टी काढायला गेलो होतो. शेजारी दोन टेबलवर एकुण आठ स्त्रिया बसल्या होत्या. मधे चांदीचे ताम्हण आणि निरांजन. प्रकार काय आहे समजून घेण्यासाठी जरा कान देऊन ऐकले तर धक्काच बसला. ते सवाष्ण भोजन होते. ‘अ’ ने ‘ब’ला, ‘ब’ ने ‘क’ला असे करत ‘ट’ ने ‘अ’ला दिलेले. एकच ताम्हण नि निरांजनात भागते. है का आव्वाज? त्यातच एक बया तिच्या अफाट हिंदीत (हिंदी का कुणास ठाऊक) दुसर्‍या अफाट स्त्रीला म्हणत होती ‘मैं तो उसको (एखाद्या अनुपस्थित महिलेबद्दल असावे) बोली की तुम दोनोही आजाव, मेहुण करके.’ मला फेफरं यायचं बाकी होतं.

दसर्‍याला आपट्याची पाने सोने म्हणून वाटायची पद्धत आहे. ‘मोठी असतात नि तजेलदार दिसतात’ म्हणून त्या झाडाच्या सजातीय असलेल्या कांचनवृक्षाची पाने हल्ली सर्रास वाटली जातात. श्रावणात जीवतीच्या पुजेसाठी प्रत्यक्ष लेकुरवाळ्या स्त्रीला न बोलावता तिच्या चित्राची पूजा केली जाते. तीच गोष्ट वटपौर्णिमेची. काही चतुर लोकांनी अशा आळशांच्या सोयीसाठी श्रावण महिन्यातील सार्‍या सणांचे एक पानाचे टेम्प्लेटच तयार केले आहे. ते देव्हार्‍यात चिकटवायचे की झाले काम. अशी अनेक उदाहरणे आहेत.

तात्पर्य. आपल्या सोयीनुसार आवडीनुसार परंपरेत आम्ही बदल करू, त्यासाठी मूळ हेतूला बाधा येते का हे आम्ही पाहणार नाही. अर्थातच हे आम्ही गुपचूप करू, गाजावाजा करणार नाही. आणि आम्ही संस्कृती जाणतो त्यामुळे आम्हाला तो हक्कच आहे. आम्ही मूळ हेतूला हरताळ फासतो आहोत हे सांगणार्‍याला आम्ही संस्कृती विरोधक ठरवू, त्यांचा निषेध करू, त्यांच्या तोंडाला काळे फासू. आम्ही म्हणू ती परंपरा, आम्ही सांगू ती संस्कृती, आमच्या हेतूबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणालाच नाही.

अखेरीस नरोटीला चिकटून राहण्याचा अट्टाहास कुठल्या थराला जातो याचे उदाहरण म्हणून एक श्लोक देतोय.

वरं हि मातृगमनं, वरं गोमांसभक्षणम्
ब्रह्महत्त्या, सुरापानं, एकादश्या न भोजनम्

परंपरेने घृणास्पद मानली गेलेली सगळी पापे केली तरी चालतील पण एकादशीला भोजन केलेले चालणार नाही. हे लाक्षणिक अर्थाने घ्यायचे असते हे मला ठाऊक आहे. पण मुळातच ही तुलना इतकी घृणास्पद आहे, की ही जर संस्कृती असेल तर आम्ही सुखे संस्कृती-विरोधक म्हणवून घेऊ. खोबरे सडून गेले, तर उपासनेसाठी नवे श्रीफल आणू– मग ते भले जुने नसेना– पण नरोटीची उपासना कधीही करणार नाही.

- oOo -

(१). हा लेख ‘माझे चिंतन’ या कॉन्टिनेन्टल प्रकाशन यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.


हे वाचले का?

शुक्रवार, १४ मे, २०१०

होते कुरूप वेडे (कथा)

(Italo Calvino यांच्या The Black Sheep या कथेचा स्वैर अनुवाद.)

कोण्या एका गावी सगळेच चोर होते.

प्रत्येकजण रात्री आपली पिशवी आणि काजळी धरलेले कंदिल घेऊन बाहेर पडत आणि एखाद्या शेजाऱ्याचे घर लुटून पहाटे जेंव्हा आपल्या घरी परतून येत तेंव्हा आपलेही घर लुटले गेलेले त्यांना आढळून येई.

या व्यवस्थेत कुणाचेच नुकसान होत नसे वा कुणाचा फायदा. पहिला दुसऱ्याच्या घरी चोरी करे, तर दुसरा तिसऱ्याच्या. अशा तऱ्हेने चालू रहात पुन्हा अखेरचा पहिल्याच्या घरी चोरी करून साखळी पूर्ण करी. गावातील व्यापारही सर्वस्वी फसवण्याच्या कलेवर अवलंबून होता. विक्रेते आणि ग्राहक दोघेही तिचा यथाशक्ती वापर करीत. येथील नगरपालिका ही एक गुंडांचा अड्डाच होती. तिचे शासक आपल्या नागरिकांना छळण्याचे आपले एकमेव काम मोठ्या निष्ठेने करीत असत. तर नागरिकही आपल्या परीने त्याना ठकवण्याचे काम करीत असत. अशा तऱ्हेने सर्वजण गुण्यागोविंदाने रहात होते.

कुठून कोण जाणे, पण एके दिवशी त्या गावात एक प्रामाणिक माणूस राहण्यास आला.

TheBlackSheep

रात्री आपली पिशवी आणि कंदिल घेऊन लुटण्यास बाहेर पडण्याऐवजी तो घरीच धूम्रपान करीत पुस्तक वाचत बसला. काही चोर त्याचे घर लुटण्यास आले आणि घरात दिवा चालू असलेला पाहून हात हलवित परतले.

असे काही दिवस गेले. अखेर गावची काही ‘प्रतिष्ठित’ मंडळी त्या प्रामाणिक माणसाला भेटायला गेली. त्यांनी त्याला तेथील सर्व परिस्थिती नीट समजावून सांगितली. त्याला जर इतरांना लुटण्याची इच्छा नसेल, तर किमान त्याने घरी राहून इतरांच्या लुटण्याच्या आड येऊ नये असे सुचवले. त्या प्रामाणिक माणसाकडे या तर्काला काही उत्तरच नव्हते.

त्या दिवशी पासून त्यानेही इतरांप्रमाणेच रात्री बाहेर पडून पहाटे घरी परत येण्याचा क्रम सुरू केला. फक्त त्याने इतर कोणालाही कधी लुटले नाही. रात्री तो आपल्या घराजवळच्या नदीवरील पुलावर जाऊन बसे आणि चांदण्यात नदीचे पात्र न्याहाळत राही. पहाटे जेंव्हा तो घरी परते, तेंव्हा आपले घर लुटले गेल्याचे त्याला आढळून येई.

जेमतेम एकाच आठवड्यात तो प्रामाणिक माणूस पूर्ण निष्कांचन झाला. त्याच्याकडे खायला एक दाणाही शिल्लक नव्हता आणि त्याचे घर पूर्ण रिकामे होते. अर्थातच त्याबद्दल तो कोणालाही दोष देऊ शकत नव्हता कारण ही परिस्थिती त्यानेच ओढवून घेतली होती. परंतु यामुळे गावात एक वेगळीच समस्या निर्माण झाली...

तो प्रामाणिक माणूस इतर कोणाचेही घर न लुटता स्वतःचे घर मात्र लुटू देत होता. त्यामुळे दररोज पहाटे गावात एक माणूस असा असे, की जो इतर कोणाचे घर लुटून घरी परते तेंव्हा आपले घर लुटले गेलेले नाही असे त्याला दिसून येई. हे घर खरेतर त्या प्रामाणिक माणसाने लुटणे अपेक्षित होते. आपले हे ‘काम’ त्याने केलेले नसे.

अशा तऱ्हेने ज्यांचे घर लुटले जात नव्हते ते इतरांपेक्षा अधिक श्रीमंत झाले. आता इतरांपेक्षा अधिक पैसा जमा झाल्याने त्यांना इतरांचे घर लुटण्यासाठी जाण्याची गरज वाटेनाशी झाली. तसेच दुसर्‍या बाजूला जे लोक त्या प्रामाणिक माणसाचे घर लुटण्यास येत, त्यांना तिथे काहीच न मिळाल्याने हात हलवत परतावे लागे. त्यामुळे अशा व्यक्तींची संपत्ती घसरणीस लागून ते गरीब झाले.

दरम्यान जे अधिक श्रीमंत झाले होते त्यापैकी काहीना रात्री पुलावर फिरायला जाणे हे प्रतिष्ठेचे वाटू लागले. त्यांनीही मग रात्री पुलावर जाऊन चांदण्यात नदीचा प्रवाह न्याहाळत बसायला सुरवात केली. यामुळे तर गोंधळात अधिकच भर पडली. पुलावर जाऊन बसणाऱ्यांची घरे वारंवार लुटली गेल्यामुळे आणखी काही लोक श्रीमंत झाले; तसेच उरलेले श्रीमंत अधिक श्रीमंत झाले. याचा परिणाम असा झाला की आणखी काही लोक गरीब झाले.

पण अजूनही ते सर्व चोर होते आणि एकमेकाना लुटत होते.

आता आणखी श्रीमंत झालेल्यांनाही पुलावर फिरायला जावेसे वाटू लागले. पण अनुभवातून त्यांच्या हे लक्षात आले की जर आपण तसे केले तर आपणही गरीब होऊ. त्यावर त्यांनी एक तोडगा शोधून काढला. आधीच गरीब झालेल्या काही जणांना त्यांनी आपल्यासाठी लुटण्यास पाठवायला सुरवात केली. त्यासाठी त्या गरीबांना त्यांनी वेतन, भत्ता इ. देऊ केले. आता ते निश्चिंतपणे पुलावर फिरायला जाऊ लागले. यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत झाले आणि गरीब अधिक गरीब.

पण अजूनही ते सर्व चोरच होते आणि एकमेकाना लुटत होते.

असेच काही दिवस गेल्यानंतर काही श्रीमंत इतके श्रीमंत झाले की त्यांना स्वतः लुटायला जाण्याची वा इतरांना त्यासाठी पाठवण्याची गरजच उरली नाही. पण जर त्यांनी इतरांना लुटणे थांबवले, तर ते स्वतः गरीब होण्याचा धोका होता. कारण ते इतरांना लुटणार नसले ती इतर लोक त्यांना लुटणारच होते.

हे टाळण्यासाठी त्यांनी एक नामी उपाय शोधून काढला. काही अगदी गरीब लोकाना शोधून काढून त्यानी आपल्या घराची निगराणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. याची परिणती पोलिस यंत्रणा निर्माण करण्यात आणि तुरुंग बांधण्यात झाली.

अशा तऱ्हेने तो प्रामाणिक माणूस त्या गावात आल्यानंतर काही वर्षातच लोक लुटण्याचे वा लुटले जाण्याचे नाव काढेनासे झाले. आता ते फक्त श्रीमंती आणि गरीबीबद्दल बोलत.

पण अजूनही ते सर्व चोरच होते !

त्या प्रामाणिक माणसाचे प्राण मात्र उपासमारीने पूर्वीच लुटून नेले होते.

- oOo -


हे वाचले का?

बुधवार, ५ मे, २०१०

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ५

<< मागील भाग

काही काळापूर्वी सत्यजित रे यांच्या चित्रपटांची एक दोन परिच्छेदात ओळख करून देणारे अमृत गंगर यांनी लिहिलेले एक लहानसे पुस्तक (प्रकाशक लोकवाङ्मय गृह) वाचले होते. त्यांनी हा चित्रपट ‘भारतातील अंधश्रद्धेवर आसूड ओढणारा होता’ असे म्हटले आहे. तसेच तो प्रकाशित झाला तेव्हा अनेक धार्मिक संघटनांनी त्याविरुद्ध गदारोळ केला अशी माहिती दिली आहे. आता डावे नि उजवे यांचे ज्यावर एकमत झाले आहे त्याबाबतच मी मतभेद व्यक्त करू इच्छितो. मला वाटते इथे आपले टिपिकल भारतीय मन विचार करते आहे. आपल्याला जसे ‘असावे असे वाटते’ तसे ‘आहे’ असा आपला समज असतो. वरवर न पाहता, थोडे वस्तुनिष्ठ होऊन बारकाईने पाहणे आपल्याला जमत नाही. चटकन एक शिक्का मारला की आपण ‘वा’ म्हणायला किंवा दगड मारायला मोकळे होतो.

मुळात ही शोकांतिका ही व्यक्ती-समष्टीची लढाई आहे, माणसे निमित्तमात्र आहेत, मूळ कारण आहे ती परिस्थिती नि या सार्‍याची पार्श्वभूमी असलेला नि तुमच्या आमच्या आयुष्यावर अदृष्य बंधने घालणारा समाज. इथे कुणाला नियतिवाद दिसू शकेल. पण इथे मुख्य शोकांतिका आहे ती आहे ती दयाचे माणूस म्हणून जगण्याचे हक्क हिरावून घेतले जातात ही. ज्या काळात हा चित्रपट केला त्या काळाच्या संदर्भात – नि अन्य काही संदर्भ अधिक ठळक व्हावेत म्हणून – देवत्वाचे संदर्भ आले आहेत. अन्यथा हीच कथा एखाद्या अन्य पार्श्वभूमीवर अन्य समाजिक स्थितीतही दाखविता आली असती.

चित्रपटातील हिरो/हिरोईन, खेळाडू यांच्या स्वातंत्र्यावर त्यांच्या प्रसिद्धीचाच दबाव येतो. कल्पना करा अमिताभ बच्चन, किंवा सचिन तेंडुलकर निवांत चौपाटीवर बसून भेळ खाऊ शकेल? हरवलेले स्वातंत्र्य ही त्या यशाची मोजलेली किंमत असते. हीच प्रसिद्धी कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठी किंमत मोजायला लावते. ‘आँधी’ आठवतो का? राजकारणात शिखरावर पोचलेली, पण त्यामुळे विलक्षण प्रेम करणार्‍या– पण ध्येयहीन– पतीपासून नि मुलीपासून दुरावलेली आरती ही दयाचीच एक प्रतिमा म्हणता येईल.

आणखी एक चित्रपट होता (नाव विसरलो) ज्यात चित्रपटाची नायिका ही साध्यासुध्या घरातून आलेली, आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर चित्रपटात मोठे नाव कमावते, पण तिला अगदी लहानपणापासून साथ देणार्‍या प्रेमिकापासून दुरावत जाते. चित्रपटाचे नाव आठवत नाही. याचा एक रीमेक पण आला होता ‘सितारा’(१९८०) नावाने. ज्यात नायिका जरीन वहाब होती नि मिथुन चक्रवर्ती प्रेमिकाच्या भूमिकेत होता.

अमाप प्रसिद्धी मिळालेल्या ‘गाईड’ (१९६५) मधील ‘रोझी’ची (वहिदा रहमान) वाटचाल थोडीशी अशाच मार्गाने होणारी (पण तिथे देवला जरा काळ्या रंगात रंगवून तिला झुकते माप दिले आहे). या चित्रपटाबाबत आणखी एक उल्लेखनीय साम्य हे की शेवटी राजू गाईड (देव आनंद) हा ही ‘देवी’मधील दयामयीच्या भागधेयाला सामोरा जातो, आपल्यातील देवत्वाच्या अंशाला आवाहन करत मनुष्यत्वाचे विसर्जन करतो.

पण या अन्य नायिका नि देवीतील दया यांच्यात एक अतिशय महत्त्वाचा फरक आहे. या सर्व नायिकांनी आपले आयुष्य– ते यश, ती प्रसिद्धी स्वतः जाणीवपूर्वक नि हेतुतः निवडलली आहे. तो त्यांच्या ध्येयाचा भाग आहे. परंतु दयाचे तसे नाही. हे देवत्त्व तिच्यावर लादले गेले आहे. ते नाकारण्याचे स्वातंत्र्य तिला नाही, किंवा खरंतर असे म्हणता येईल की त्या स्वातंत्र्याची जाणीव तिला नाही. भोवतालची परिस्थितीही अशी आहे की ते स्वातंत्र्य जाणवले तरी त्याचा वापर ती करू शकणार नाही.

इथे आणखी एका अजोड कलाकृतीचे स्मरण होणे अपरिहार्य आहे. जी. एं. ची एक अप्रतिम कथा आहे ‘स्वामी’ नावाची. या कथेशी ‘देवी’ची तुलना करण्याचा, त्यातील मूळ तत्त्वातील कमालीचे साम्य अधोरेखित करण्याचा मोह आवरत नाही.

या कथेत एका श्रांत वाटसरूला अन्न/निवास यांची लालूच दाखवून एक मठात नेले जाते. त्याची सर्वप्रकारे सेवा करून अखेर विश्रांतीसाठी एका लहानशा खोलीत नेले जाते. तो जेव्हा जागा होतो, तेव्हा त्याच्या लक्षात येते की तो आता त्या लहानशा खोलीत बंदिवान झाला आहे. खोली किती तर जेमतेम आडवा होता येईल इतकी, उंची किती तर जेमतेम तो बसू शकेल इतकी. बाजूला तेवढीच लहान खोली जी न्हाणीघर म्हणून वापरायची. अन्नाचे ताट आत सरकवण्यासाठी एक दाराला एक लहानशी फट नि छतामधे हवा येण्याइतके लहानसे छिद्र, तेही इतके उंच गेलेले की त्याचा शेवट खालून दिसणे दुरापास्तच.

बराच आरडाओरडा केल्यानंतर त्याला सांगण्यात येते की आता तो आता त्या मठाचा महंत आहे आणि उरलेले आयुष्य त्याला तिथेच काढायचे आहे. त्याच्यासाठी उंची वस्त्रे नि सुग्रास अन्न सदैव तयार असेल, पण ते त्याला त्याच्या खोलीतच मिळेल. त्याच्या मृत्युनंतर त्याचे कलेवरच तेथून बाहेर येईल नि अशाच एखाद्या वाटसराची त्याच्याजागी वर्णी लागेल.

ही एक विलक्षण रिपल्सिव (समर्पक मराठी प्रतिशब्द सुचला नाही, क्षमस्व) कथा आहे. वाचताना छातीवर विलक्षण दडपण आल्यासारखे वाटले पण वाचणे थांबवू शकलो नाही. (आमच्या एका मित्राचे वडील कार्यक्रमानिमित्ताने गावोगाव हिंडत असतात. ते म्हणाले ही कथा वाचल्यावर आता आडगावी एस्टी स्टँडवर थांबण्याची आता भीती वाटते.) पण त्याचे सार देवीशी बरेचसे मिळतेजुळते आहे. महंत बनणे म्हणजे एका अर्थी लौकिक जीवनाचा त्याग करून, जगण्याचे इतर सारे पैलू नाकारून एका छोट्या खोलीत बंदिस्त होणेच तर असते. एकदा तिथे गेलात की परतीची वाट बंद असते, तसा प्रयत्न केलेल्यांचे काय होते ते तसा प्रयत्न केलेल्या आईबापांचे छत्र गमावलेल्या त्या चार(!) पोरक्या पोरांना विचारा.

‘सबकुछ  पु.ल.’ अशी जाहिरात केला गेलेला ‘गुळाचा गणपती’(१९५३) आठवतो का? त्याची कथा ही ‘देवी’मधील मूळ कथाबीजाची एक भ्रष्ट आवृत्ती म्हणावी लागेल. नायकाला गरीब बिचारा दाखवून, त्याला बुवा बनविणार्‍यांना खलपुरूष दाखवून, नायकाला प्रेमपात्र देऊन (एखाद्या चांगल्या गाजलेल्या परदेशी वा देशी पण स्थानिक भाषेतील चित्रपटांवरून हिंदी चित्रपट बनविताना जे जे करतात ते ते सर्व करून) अंती सत्याचा विजय वगैरे भाबड्या नि गल्लाभरू शेवटाकडे नेला आहे.

अशी सामान्यपणे समजायला सोपे म्हणून जी मांडणी आपण अपेक्षित ठेवतो तशी सुष्ट/दुष्टाची लढाई ‘देवी’मध्ये नाही. तसे इथे कोणीच सुष्ट वा दुष्ट नाही नि तशा काळ्या पांढर्‍याच्या तथाकथित लढाईतून येणारा बटबटीतपणा/भडकपणा सुद्धा नाही. ‘देवी’ मधे कोणीही खलनायक नाही; अगदी ही शोकांतिका ज्यांच्या एका स्वप्नातून परिणत झाली ते कालिबाबूही नव्हेत. कारण त्यांचे स्वप्न खरेच आहे, आवई नाही; भक्तीही खरीखुरीच आहे, बनाव नाही. त्यांचा खरोखरच असा विश्वास आहे, की दया ही कालिमाता आहे. यात तिच्या देवत्त्वाचा गवगवा असला तरी त्यांनी तिचा– ‘गुळाचा गणपती’मध्ये मांडला तसा– बाजार मांडलेला नाही. उलट या देवीच्या उपासनेची संधी इतरांनाही मिळावी असाच त्यांचा हेतू आहे.

उमाप्रसाद नास्तिक/बुद्धिवादी आहे, पण त्यानेही कुठे या टोकाच्या श्रद्धेला प्रत्यक्ष विरोध केलेला नाही. तो फक्त दयाला त्यातून सोडवू पाहतो, ते तिचे मूळचे माणूस म्हणून असलेले जगणे तिला परत मिळावे म्हणून. श्रद्धेबद्दल वा अंधश्रद्धेबद्दल कोणतेही भाष्य तो करीत नाही. त्याचे बुद्धिवादी असणे हे फक्त कालिबाबूंच्या वाक्यातूनच तुमच्या-आमच्या पर्यंत पोचते आहे. एखाद्या उथळ दिग्दर्शकाने लगेच इथे आस्तिक/नास्तिक, बाप/मुलगा असा संघर्ष कदाचित उभा केला असता. दयाला आपल्याबरोबर नेण्याचा उमाप्रसादचा डाव हाणून पाडण्यासाठी कालिबाबूंनी दयाच्या देवी असण्याची हाकाटी पिटण्याचा नि त्यायोगे तिला हवेलीतच ठेवून घेण्याचा डाव केल्याचेही दाखवले असते.

पण इथेच सत्यजित रे इतरांहून वेगळे आहेत. त्यांना काय म्हणायचे आहे ते त्यांना नेमके ठाऊक आहे. त्याहून वेगळा किंवा दुय्यम असा एखादा पैलू चुकून सुद्धा डोईजड होऊ नये म्हणून ते अतिशय काळजीपूर्वक पटकथा लिहिताहेत. त्याबाबतचे आणखी काही मुद्दे पुढील भागात.

(अपूर्ण)


हे वाचले का?

शुक्रवार, ३० एप्रिल, २०१०

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ४

<< मागील भाग

आणखी काही दिवस गेले आहेत. आता छोटू आजारी आहे. पण त्याच्या आईने हे कालिबाबूंना किंवा छोटूच्या वडिलांपासून लपवून ठेवले आहे. त्यांना समजले तर पुढे काय होईल हे तिला स्वच्छ दिसते आहे. त्यांच्यापासून लपवून तिने वैद्याला बोलावले आहे. आल्याआल्या तो विचारतो, ‘घरात साक्षात देवी असताना मला बोलावण्याचे काय कारण?’ बोलता बोलता तो हे ही सांगून टाकतो, की देवीने त्याचे दीर्घकाळ त्रास देणारे दुखणे बरे केले आहे. तरीही तिच्या विनंतीवरून तो छोटूला तपासतो आणि औषधे पाठवून देण्याचे मान्य करतो. अर्थात या पेक्षा छोटूला देवीच्या पायावर घालणे अधिक चांगले हे सांगायलाही विसरत नाही.

वैद्यबुवा बाहेर पडत असतानाच छोटूचे वडील तिथे येतात आणि छोटूला आजारी पाहून कालिबाबूंना सांगायला धावतच बाहेर जातात. छोटूच्या आईला ज्याची भीती वाटत होती तेच घडते. बेशुद्धीतच ‘काकी-माँ' च्या नावाचा धोशा लावलेल्या छोटूला कालिबाबू आणि तरपदा देवीच्या पायावर घालण्यासाठी घेऊन जातात. अनेक दिवसांनी भेटलेल्या छोटूला पाहून दया आनंदते. त्याची आई तिला सांगते, ‘जोपर्यंत तू त्याला मांडीवरून खाली ठेवत नाहीस तोवर त्याला मी घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा तू लवकर त्याला खाली ठेव.’

इथे दयाच्या मनातील माणूसपण उसळून वर येते. ती स्वार्थी होते. बर्‍याच काळानंतर मिळालेला छोटूचा सहवास तिला सहजासहजी सोडायचा नाहीये. तिची अनिच्छा छोटूच्या आईला समजते. इथे हताश होऊन ती विचारते, ‘तू खरंच देवी आहेस का? खरंच तू माझ्या मुलाला बरं करू शकतेस का? कृपा करून माझ्या मुलाला बरं कर.’ आतापर्यंत दयाचे देवीपण मान्य न करणारी ती पुत्रवियोगाच्या धास्तीने विकल होऊन दयाकडेच त्याच्या आयुष्याची भीक मागते आहे. अखेर दया ‘आजची रात्र छोटूला माझ्याकडे राहू दे, उद्या सकाळीच मी तुला तुझा मुलगा परत देईन’ असे आश्वासन छोटूच्या आईला देते.

दुसर्‍या दिवशी छोटूच्या आजाराची बातमी ऐकून कलकत्त्यावरून धावत आलेल्या उमाप्रसादला कळते ती छोटूच्या मृत्युची बातमी. देवीच्या गाभार्‍यासमोर बसलेल्या शोकमग्न वडिलांना उमाप्रसाद छोटूच्या मृत्युबद्दल जबाबदार धरतो आहे. पण कालिबाबूंची श्रद्धा अढळ आहे. ‘माझ्याकडून देवीच्या सेवेत काहीतरी चूक झाली असेल, एरवी इतक्या सर्वांवर अनुग्रह करणारी देवी माझा छोटू का हिरावून घेईल?’ असा त्यांचा प्रश्न आहे. ‘मीच कुठेतरी कमी पडलो म्हणून देवीने मला यश दिले नाही, मला शिक्षा केली’ असे त्यांचे म्हणणे आहे. उमाप्रसाद त्यांना म्हणतो, या सगळ्या प्रकारातून तुम्ही काय मिळवले मला माहित नाही. पण तुम्ही दयाचे सर्वस्व हिरावून घेतले आहे.

इथे झाल्या घटनेबद्दल स्वत:ला दोष देणारे कालिबाबू हे सर्वसाधारण सश्रद्ध मनाचे प्रातिनिधिक रूप आहे. आधी संभ्रम आणि भीतीमधून स्वतःमधल्या देवत्वावर विश्वास ठेवणारी दया आणि आपल्या श्रद्धेला छेद देणारा पुरावा नाकारून स्वतःकडे दोष घेणारे कालिबाबू, श्रद्धेच्या व्यावहारिक जगातील प्रवासाची सर्वात सुसंगत कारणमीमांसा अधोरेखित करतात.

तिथून उमाप्रसाद आपल्या जावेचे सांत्वन करायला गेला आहे. त्याच्याकडे एक तिरस्कारयुक्त कटाक्ष टाकून ती एकच वाक्य बोलते, ‘त्या चेटकीणीनं माझं मूल खाल्लं’. इथे दयाने छोटूला सांगितलेल्या विचित्र गोष्टीचा संदर्भ जुळून येतो.

यानंतर उमाप्रसाद दयाला भेटायला तिच्या खोलीकडे धावतो. त्याची अपेक्षा असावी– आणि आपलीही– की एवढा लळा असलेल्या छोटूच्या मृत्यूने तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असेल. त्या क्षणी तिला नवर्‍याच्या आधाराची अतिशय आवश्यकता असेल. पण दाराशी थबकलेल्या उमाप्रसादला दिसते ती संपूर्ण शृंगार केलेली दया. विविध दागदागिने, हातभर बांगड्या आणि भरजरी शालू ल्यायलेली ती.

इथे आठवते चित्रपटाच्या सुरवातीच्या प्रसंगातील देवीची मिरवणूक. विसर्जनासाठी नेले जात असणारी देवीची सालंकृत मूर्ती. बुचकळ्यात पडलेला उमाप्रसाद तिला विचारतो, हे सगळे काय आहे. ती म्हणते ‘मला जायचं आहे’. तो पुन्हा पुन्हा विचारत राहतो की ‘कुठे जायचे आहे’, ती उत्तर न देता पुन्हा पुन्हा ‘जायचं आहे’ असंच म्हणत राहते. आता पडद्यावर क्षितिजापर्यंत पसरलेला फुलांचा ताटवा दिसतो आणि क्षितिजावर धुक्याची चादर. डाव्या बाजूकडून खालच्या कोपर्‍यातून दया धावत येते आणि त्या ताटव्यातून धावत जात धुक्यात विलीन होते. या पार्श्वभूमीवर उमाप्रसादचा प्रश्न प्रतिध्वनित होत राहतो ‘पण कुठे?’... ‘पण कुठे?’

या प्रसंगात जाणीवपूर्वक प्रतीकाचा वापर आहे असे दिसते. छोटूच्या मृत्यूने दयाला तिच्यापुरते तिच्या देवत्वाबद्दलचे उत्तर सापडले असावे. आपल्या मनुष्यपणाचा पुरेसा पुरावा तिला मिळाला असावा. परंतु हे असूनही ज्यांना देवीच्या कृपेने काही चांगले झाल्याचा, दु:ख निवारण झाल्याचा अनुभव आला त्यांच्या दृष्टीने ती देवी आहेच. ‘माझ्याकडून काही आगळीक घडली म्हणून माझा नातू मला दुरावला’ असे म्हणणार्‍या कालिबाबूंच्या दृष्टीने ती अजूनही देवी आहेच. तिचे देवी असणे वा नसणे हे केवळ तिच्या निर्णयावर अवलंबून नाही (तसेही ते तिच्या निर्णयावर अवलंबून नव्हतेच). त्यामुळे या आहे/नाही च्या संभ्रमात दयाचा मृत्यू हा अवतारकल्पनेचा मृत्यू नाहीच. मग तिच्यामधे असलेल्या संभाव्य देवीच्या अंशाचे काय. तो अंश जिथून आला त्या क्षितिजाच्या पार असलेल्या तिच्या मूळ स्थानी परत जाणे हाच संयुक्तिक शेवट होऊ शकतो. अखेरच्या प्रसंगाचा मला लागलेला अर्थ हा असा आहे.

आता पुन्हा पडद्यावर येतो तो सुरवातीला पाहिलेला मुखवटा, अनलंकृत. देवत्वाचा सारा साजशृंगार उतरून गेलेला, निव्वळ पुतळा म्हणून शिल्लक राहिलेला. इथे चित्रपट संपतो.

नमनाला अनेक घडे तेल खर्ची घातले आहे. पुढील भागात या अनुभवाला मी ‘अस्वस्थ करणारा अनुभव’ का म्हटले आहे याचे विवेचन थोडक्यात मांडण्याचा विचार आहे.

---

श्रेयनामावली:
चित्रपट: देवी
कथा: प्रभातकुमार मुखर्जी
पटकथा आणि दिग्दर्शनः सत्यजित रे
संगीतः उस्ताद अली अकबर खान.

कलाकारः
दयामयी: शर्मिला टागोर
कालिबाबू: छबि बिस्वास
उमाप्रसादः सौमित्र चॅटर्जी
ताराप्रसादः पूर्णेंदू मुखर्जी
हरसुंदरी: करुणा बॅनर्जी
छोटू: अर्पण चौधुरी

  << पुढील भाग


हे वाचले का?

गुरुवार, २९ एप्रिल, २०१०

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - ३

<< मागील भाग

हा प्रकार थांबवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणून उमाप्रसादने दयाला आपल्याबरोबर कलकत्त्याला नेण्याचा निर्णय घेतला आहे. कालिबाबूंच्या उपस्थितीत जाणे शक्य नसल्याने उत्तररात्री निघण्याचे ठरवून त्यासाठी त्याने बोटीची सोयही करून ठेवली आहे. पतीबरोबर जायला मिळणार या आनंदात दयाच्या चेहर्‍यावर स्मित उमटते. रात्री ते दोघे घाईघाईने नदीकिनार्‍याकडे येत असता ती अचानक थांबते.

त्याला कळत नाही की ती का थांबली आहे. तो तिला घाईने पाऊल उचलायला सांगतो आहे. पण ती स्तब्धच. अचानक नजर उचलून ती म्हणते ‘पण माझ्यात जर खरंच देवीचा अंश असेल तर... तर मग माझ्या असे निघून जाण्याने माझे निहित कार्य मी टाळल्यासारखे होईल. त्यामुळे तुमच्यावर, आपल्या घरावर देवीचा कोप होईल.’ तो परोपरीने समजावू पाहतोय, पण ती म्हणते, ‘तो मुलगा केवळ तीर्थाने बरा कसा झाला हे खरेच ना?’

खरेतर तिला आपण देवीचा अवतार असण्याबद्दल किंवा आपल्यामधे देवीचा अंश असण्याबद्दल अजूनही खात्री नाही. परंतु आता तिच्या मनात संभ्रम आहे, की कदाचित तसे असूही शकेल. आणि भीतीही आहे की जर तसे असेल तर देवीने नेमून दिलेल्या कामात कुचराई केली म्हणून देवीचा कोप होऊ शकेल. अखेर संभ्रम आणि भीतीचा विजय होतो. उमाप्रसाद तिला घेऊन घरी परततो.

श्रद्धेचा उगम– आणि प्रसार – हा असा संभ्रम आणि भीतीपोटीसुद्धा होऊ शकतो.

आणखी एक सकाळ होते. ज्याचा मुलगा देवीने बरा केला होता तो नेहमीप्रमाणे हवेलीच्या पायरीवर बसून देवीस्तवन गातो आहे. भक्तांची गर्दी वाढू लागलीय. हवेलीसमोर भक्तांची रांग दिसते. कॅमेरा त्या रांगेचा वेध घेत पुढे सरकतो नि दाखवू लागतो समोरच्या माळावरून पुढे सरकणारी भक्तांची रांग, दूरपर्यंत गेलेली. रांगेत दिसते एक जराजर्जर वृद्धा, काठीचा आधार घेत कष्टाने एकएक पाऊल टाकत देवीच्या दर्शनाला जाणारी, तिच्या मागे आहे एक माता आपल्या मुडदुशी पोराला देवीच्या पायावर घालण्यासाठी घेऊन चाललेली, त्यांच्या मागे अशाच हीन-दीन भक्तांचा जमाव, देवीच्या स्पर्शाने आपले दुरित हरावे अशी इच्छा घेऊन आलेला. एकुणच देवीच्या पंचक्रोशीत पसरलेल्या कीर्तीची व्याप्ती दाखविणारा.

घराबाहेर देवीची कीर्ती अशी वाढत असताना इकडे घरातही बरेच बदल घडून आले आहेत. आता दया तिच्या उपासनेच्या कालावधीव्यतिरिक्त बहुतेक वेळ तिच्या तळमजल्यावरील खोलीत आराम करताना दिसते. एकदा अशीच ती आपल्या खोलीत पलंगावर पडून आराम करते आहे. बाहेर छोटू चेंडू खेळतो आहे. त्याचे खिदळणे दयाला ऐकू येते आहे. ‘ती देवीचा अवतार आहे’ हे जाहीर झाल्यापासून तिला छोटूसाठी वेळ देणे अवघड झाले आहे. बाहेर एकटे खेळत असतानाही तो खिदळतो आहे. त्यावरून तिच्याशिवाय जगणे त्याच्या अंगवळणी पडले असावे असे दिसते. तिच्या मुद्रेवर खिन्नता दाटून येते.

खेळता खेळता छोटूचा चेंडू तिच्या खोलीत येतो, चेंडूमागे धावत आलेला छोटू दाराशी थबकतो. कदाचित काकी-माँच्या खोलीत जायला त्याला मनाई असावी. पलंगावर पडलेली ती त्याला पाहून हसते. मानेनेच इशारा करून त्याला आत बोलावते. क्षणभर विचार करून छोटू धावत आत येतो आणि चेंडू उचलून धावत निघूनही जातो. तिला जाणवते की आयुष्यातील कोवळीक जपणारा हा लहानसा तुकडा देखील तिच्याकडून हिरावून घेतला गेला आहे. ते तुटलेपण जाणवून ती पुन्हा खिन्न होऊन पुन्हा भिंतीकडे मान वळवते. समोर दिसतो ‘देवी’च्या गळ्यातून काढून ठेवलेला फुलांचा हार, तिच्या आयुष्यातील ओलाव्याप्रमाणेच आता सुकून गेलेला.

आता तिला आठवतो तिच्या लग्नाचा प्रसंग, अधोवदन उभ्या असलेल्या तिला बोलते करण्याचा तिच्या नवर्‍याचा प्रयत्न, तिला आठवते शर्टचे बटण अडकल्याचा बहाणा करून तिला मिठीत घेण्याची धडपड. हे सारे सारे आता तिला परके होऊन गेलेले. ती खंतावते, अश्रू ढाळते. मग त्याची पत्रे काढून त्याच्या आधारे तो भूतकाळ पुन्हा जगू पाहते. त्या भूतकाळाचा आणखी एक तुकडा सांधून घेण्यासाठी जेव्हा ती तिच्या लाडक्या पोपटाकडे जाते, त्याच्याशी पूर्वीप्रमाणे संवाद साधू पाहते, तेव्हा पूर्वीप्रमाणे खाण्याबद्दल हट्ट करण्याऐवजी तो ही तिला ‘माँ– माँ’ अशी हाक मारत रहातो. पुन्हा एकवार तिच्या चेहर्‍यावर वेदना उमटते. मग ती ही हळूहळू त्याच्यापासून दूर निघून जाते.

(क्रमशः)

    << पुढील भाग


हे वाचले का?

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - २

<< मागील भाग

कालिबाबू आत्यंतिक श्रद्धाळू आहेत. गेली चाळीस-एक वर्षे ते देवीची आराधना करताहेत. ‘तिच्याच कृपेने घराची भरभराट झाली आहे’ अशी त्यांची श्रद्धा आहे. या पारलौकिक श्रद्धेबरोबरच त्यांची आपल्या धाकट्या सुनेवरही श्रद्धा आहे. या घराचे सगळे चांगले होते ते तिच्या पायगुणाने किंवा खरेतर हातगुणाने. त्यामुळे कदाचित अर्धजागृत अवस्थेत त्यांच्या अबोध मनाने या दोन्ही प्रतिमा त्यांना एकामागोमाग दाखविल्या असाव्यात. पण आत्यंतिक श्रद्धेपोटी कालिबाबू यातून भलताच अर्थ काढतात. त्यांना वाटते की देवीनेच त्यांना दृष्टांत दिला आहे आणि ह्या देवीनेच आपल्या सुनेच्या रुपात अवतार घेतला आहेत. स्वप्नात जे पाहिले त्याने भारावलेले कालीबाबू उठून ‘माँ’ ‘माँ’ अशा हाका मारत तिच्या खोलीकडे धावतात. भर रात्री त्यांच्या हाका ऐकून बाहेर आलेल्या दयामयीच्या पायावर डोके ठेवतात. ती हतबुद्ध.

त्यांच्या हा ऐकून बाहेर आलेल्या त्यांच्या थोरल्या मुलाला– तरपदाला या प्रकाराचा अर्थच लागत नाही. तेव्हा त्या कालिबाबू आपल्या दृष्टांताबद्दल सांगतात नि तिच्या पायावर डोके ठेवायला सांगतात. क्षणभर भांबावलेला तो निमूटपणे तिच्या पायावर डोके ठेवतो. पलिकडे आपल्या खोलीच्या दारात उभी असलेली त्याची पत्नी झाल्या प्रकाराने स्तंभित आणि क्षुब्ध झालेली. इथे सुरवात होते दयामयीच्या नव्या आय़ुष्याची, माणूसपण नाकारून देवत्वाची झूल पांघरून जगण्य़ाची.

इथे जाता जाता तरपदाबद्दल सांगितले पाहिजे. कालिबाबूंच्या थोरल्या मुलाला स्वतंत्र अस्तित्वच नाही. तो पोटापाण्याचा वा हौसेचा कोणता व्यवसाय करतो याबद्दल चित्रपटात काहीच उल्लेख नाही. बहुधा वडिलांची जमीनदारी सांभाळणे हेच त्याचे काम असावे. तसेच धाकट्या सुनेने सासर्‍याची मर्जी संपादन केल्याने त्याच्या पत्नीकरवी काही स्थान निर्माण होण्याची शक्यताही मावळलेली. अशा स्थितीत वडिलांच्या पैशावर जगत असल्याने त्यांच्या म्हणण्यापुढे मान तुकविण्याशिवाय पर्यायच नाही. दयाच्या पायावर डोके ठेवल्याने संतप्त झालेल्या पत्नीला तो सांगतो. की हे घर त्यांचे, जमीनदारी त्यांची, पैसा त्यांचा असल्याने मर्जी चालणार ती त्यांची. त्याविरुद्ध जाण्याचे धाडस माझ्यात नाही.

आता सासरा आपल्य सुनेचे देवीपण जाहीर करतो. तिची पूजाअर्चा/आरती, अनुष्ठाने वगैरे सुरू होतात. आता रोजच तिचे ‘भक्त’ जमू लागतात. सकाळ संध्याकाळ देवीचे दर्शन, पूजाअर्चा, पाद्यपूजा इ. चालू होते. सततच्या दगदगीने तिने थकून जाऊ नये म्हणून तिच्या पहिल्या मजल्यावरील खोलीऐवजी तळमजल्यावरील एक खोली तिला देण्यात येते. एकंदरित रागरंग पाहून दयाची जाऊ उमाप्रसादला पत्र टाकून बोलावून घेते.

यानंतरचा प्रसंग अतिशय महत्वाचा. दयाच्या घरी दररोज पहाटे एक भिकारी येऊन देवीस्तुती गात असतो. या भिकार्‍याचा चार-पाच वर्षांचा मुलगा आठवडाभर आजारी आहे. किरकोळ उपचार करून झाले आहे. हताश होऊन तो ‘देवी’च्या पायाशी येतो. कालिबाबू प्रथम त्याच्या मुलाची नाडी पाहतात नि सगळे काही ठीक होईल असा विश्वास देतात. (हा प्रसंग काही सुचविणार असावा, कदाचित कालिबाबूंना वैद्यक व्यवसायाचे ज्ञान असावे असे आधी वाटले. पण पुढील चित्रपट पाहता तसे नसावे.) त्या मुलाला देवीच्या पायावर घालून देवीचे तीर्थ (दूध, फुले इ. नी पादप्रक्षालन केल्यानंतर जमा झालेले पाणी) थेंब थेंब त्या मुलाच्या तोंडात घालायला सांगतात. इकडे जावेचे पत्र मिळाल्याने तातडीने निघालेला उमाप्रसाद हवेलीच्या दाराशी येऊन पोचलाय. त्याला समोर दिसते ती त्याची पत्नी, पुष्पमालांनी सजविलेली, पायाशी बसलेले तिचे भक्त आणि तिच्या समोर जमिनीवर निजवलेला तो मुलगा. हे दृष्य पाहून तो थिजून जातो. दाराशी चाहूल लागल्याने ती नजर तिकडे वळवते. त्याला पाहून तिचा चेहरा उजळतो आणि दुसर्‍याच क्षणी डोळ्यात अश्रू.

पुढचे मिनिटभर दोघे नजरेनेच बोलतात. इथे दोघांकडून अप्रतिम मुद्राभिनयाचे दर्शन घडते. प्रथम त्याच्या चेहर्‍यावर दिसते ते प्रश्नचिन्ह, हे सगळे काय चालले आहे असा शंकित भाव, चेहर्‍यावरचे– त्याला पाहून आलेले स्मित मावळून त्याची नजर टाळू पाहणारी ती. तिच्या या वागण्याने बुचकळ्यात पडलेला तो, दुसर्‍याच क्षणी त्याच्या नजरेला नजर देऊन मूक याचना करणारी आणि आपली हताशा दर्शविणारी ती. पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यात फुललेला तो अंगार आणि या सगळ्या प्रकाराची चीड. हा संपूर्ण प्रसंग जेमतेम एक मिनिटभराचा, पण मनावर खोल कोरला जाणारा.

संतापलेला उमाप्रसाद तातडीने आपल्या वडिलांकडे जातो आणि त्यांच्याशी वाद घालू पाहतो. ‘केवळ स्वप्न हा दयाच्या देवीपणाचा पुरावा कसा?’ आणि ‘गेले तीन वर्षे मी जे संसारसुख भोगले ते काय खोटे, तिच्या माणूसपणाची मला पटलेली साक्ष काय खोटी?’ असा प्रश्न विचारतो. वडील परंपरेचा, दार्शनिकतेचा आधार घेतात, ‘मी खोटे का बोलेन?’ असा भावनिक प्रश्नही करतात. यांचा असा वाद चालू असतानाच तिकडे तो आजारी मुलगा शुद्धीवर येतो. देवीच्या नावाच्या जयजयकार होतो. अशा स्थितीत वाद पुढे चालू ठेवणे उमाप्रसादला शक्यच होत नाही.

इकडे एरवी या सगळ्या प्रकाराबद्दल केवळ कंटाळ्याची भावना असणार्‍या दयाच्या चेहर्‍यावर प्रथमच साशंक भाव येतो.

(क्रमशः)

    << पुढील भाग


हे वाचले का?

देवी: एक अस्वस्थ करणारा अनुभव - १

मागील शनिवारी NFAI च्या फिल्म क्लबमधे सत्यजित रेंचा ‘देवी’ पाहिला. रेंचा तुलनेने कमी प्रसिद्धी मिळालेला हा चित्रपट, कोणाला ठाऊक असेलच तर तो त्यात प्रमुख भूमिका केलेल्या शर्मिला टागोरमुळे. एरवी पाथेर पांचाली, चारुलता, अभिजान वगैरेंच्या तुलनेत तसा बाजूला पडलेला. एखादा युरोपियन चित्रपट पाह्यला मिळेल अशी आशा असताना अचानक आपल्या मातीतील हा चित्रपट पहायला मिळाला आणि त्या अनुभवातून सुन्न होऊन बाहेर आलो. किती तरी वेळ त्यातून बाहेरच येता येईना. अंधश्रद्धा, बुवाबाजी इ. विषयांवरील अनेक भडक चित्रपट पाहण्यात आले आहेत. पण आत्यंतिक श्रद्धेतून झालेले स्त्रीचे दैवतीकरण आणि त्यातून ओढवलेला तिचा अंत हा अतिशय चटका लावून जाणारा अनुभव होता.

---

चित्रपटाच्या सुरवातीलाच एक प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा अनलंकृत पुतळा दिसतो. प्रथम त्याचे रेखीव डोळे अधोरेखित केले जातात, मग त्याच्या भालप्रदेशावर उमटतो एक बाण. हळूहळू देवीचे रूप साकार होऊ लागते. मग दिसते संपूर्ण देवी, सालंकृत सजवलेली अशी. आता कॅमेरा हळूहळू मागे येतो आणि आजूबाजूचे दृष्य दिसते. एका विशाल हवेलीमध्ये अनेक लोक जमले आहेत, दुर्गापूजा चालू आहे. उच्चरवाने सर्व लोक देवीची आरती म्हणताहेत. या सर्व गर्दीच्या सर्वात पुढे नम्रपणे हात जोडून उभे आहेत त्या हवेलीचे मालक, चंडीपूरचे जमीनदार– कालिकिंकर राय. आरतीचा सूर टिपेला पोहोचला आहे आणि इकडे मातेला बळी देण्यासाठी सज्ज असलेला डोंब आपले खड्ग उंचावतो आणि वेगाने खाली आणतो. तेवढ्यात बाहेर शोभेचे दारूकाम चालू होते. आकाशात नळे-चंद्रज्योती फुटताहेत आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर ‘काका’ अशी हा ऐकू येते.

आता पडद्यावर दिसतो उमाप्रसाद – कालिबाबूंचा धाकटा मुलगा. त्याच्या खांद्यावर बसलेला आहे तो खोका (म्हणजे छोटू), हा त्याच्या मोठ्या भावाचा– तरपदा याचा मुलगा. आपल्या पुतण्याला फटाक्यांची आरास दाखवायला उमाप्रसाद घेऊन आला आहे, सोबत आहे त्याची पत्नी, दयामयी (शर्मिला टागोर). रोषणाई पहात असताना उमाप्रसाद हळूच दयाकडे एक कटाक्ष टाकतो, ती ही सलज्ज हसून त्याला प्रतिसाद देते. या एका कटाक्षातून त्यांचे परस्परांबद्दलचे प्रेम रेबाबू दाखवून देतात. कॅमेरा पुन्हा फिरतो. आता देवीचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दुर्गेच्या जयजयकार करीत सर्व मूर्ती एकएक करून विसर्जित केल्या जात आहेत. सुमारे पाच मिनिटाचा हा पहिला प्रसंग पुढे घडणार्‍या कथावस्तूचा आधार स्पष्ट करून ठेवतो.

यानंतर दिसतात उमाप्रसाद आणि दयामयी. दुर्गापूजेला सुटीवर आलेला उमाप्रसाद आता परत निघालेला आहे. स्वत:च्या कलकत्त्याचा पत्ता लिहिलेल्या लिफाफ्यांचा एक गट्ठाच तो तिच्या हवाली करतोय आणि रोज पत्र पाठवण्याबद्दल बजावतोय. ती अर्थातच रुसलेली. अनेक कारणे पुढे करते आहे. ती विचारते, ‘जर लिहिण्यासारखे काही घडलेच नसेल तर काय लिहू?’ तो म्हणतो मग तसेच – म्हणजे विशेष घडले नाही – असे लिहून कळव. पण पुढे जेव्हा लिहिण्याइतके महत्त्वाचे काही घडते, तेव्हा तिला आपल्या जावेकडून ते कळविण्याची व्यवस्था करावी लागते.

उमाप्रसाद हा कालिबाबूंचा धाकटा मुलगा, कलकत्त्याला राहून शिक्षण घेत असलेला, कालिबाबूंच्या भाषेत नास्तिक– पण खरेतर बुद्धिवादी म्हणावा असा. इंग्रजी शिकून उच्चशिक्षणासाठी परदेशात जाण्याची उमेद बाळगणार्‍या तत्कालिन भद्रसमाजातील तरुणांचा प्रतिनिधी. दयामयी त्याला विचारते, ‘इंग्रजी शिक्षण घ्यायचे, का तर चाकरी मिळवायची म्हणून आणि चाकरी मिळवायची ती पैसे मिळवायचे म्हणून. पण तुमच्या वडिलांकडे तर भरपूर पैसे आहेत, मग तुम्हाला हे इंग्रजी शिक्षण कशाला?’ ही बंगाली समाजातील साधीसुधी मुलगी. वयात येताच लग्न होऊन कालिबाबूंच्या घरात आलेली. बाहेरील जगाचा वारासुद्धा तिला लागलेला नाही. इतके स्थिरस्थावर असलेले घर सोडून विलायतेस जाण्याचे नवर्‍याचे स्वप्न तिला समजू शकत नाही. तो तिला ‘तू माझ्याबरोबर येशील का?’ असे विचारतो, तेव्हा ती कोणत्याही भारतीय स्त्रीप्रमाणे ताबडतोब उत्तर देते ‘तुम्ही न्याल तिकडे मी येईन’. पण दुसर्‍याच क्षणी ती विचारते, ‘पण मग तुमच्या वडिलांचे काय होईल? ते माझ्याशिवाय कसे राहू शकतील? आणि ते विलायतेस जायला परवानगी देतील? आणि छोटूसुद्धा माझ्याशिवाय कसा राहील?’

या दोन प्रश्नातच तिचे घरातील स्थान काय आहे ते स्पष्ट होते. तिचा सासरा घरात तिच्यावर पूर्ण अवलंबून आहे. तो तिला खूप मान देतो. काही काळापूर्वी विकलांग अवस्थेत पडलेला असतानाच पत्निवियोगाचे दु:ख पदरी आल्याने आत्महत्येचा विचार करणार्‍या कालिबाबूंना या नव्या सुनेने सावरले. त्यांची मनोभावे सेवाशुश्रुषा केली. त्यांचे आरोग्य तर सुधारलेच पण कर्त्या स्त्रीविना पोरके झालेले घरही तिने तोलून धरले आहे. कालिबाबू तिला ‘माँ’ अशी हाक मारतात नि स्वत:चा उल्लेख ‘तिचे म्हातारे मूल’ असा करतात.

अगदी घरातल्या पोपटानेसुद्धा डाळ-दाणे खावे तर या छोट्या बहूच्या हातूनच. तिच्या मोठ्या जावेचा मुलगा छोटू (बंगाली घरात बहुधा बडे, मंजे–मंझले आणि खोका म्हणजे मोठा, मधला आणि छोटा अशी हाक मारण्याची नावे असतात. पण इथे घरातला सर्वात लहान म्हणून खोका) याचाही तिला लळा आहे, तो इतका की कधीकधी त्याच्या आईलाही याचा हेवा वाटावा. छोटू इतका बेरकी की, आईने धपाटा घालून झोपवले नि आई कामाला बाहेर पडली की उशी उचलून याने सरळ ‘काकी-माँ’ कडे पळ काढावा. मग सासर्‍याच्या औषधपाण्याची काळजी घेऊन परतलेल्या काकी-माँकडे गोष्ट सांगण्याचा हट्ट धरावा.

मग ती विचारते, की ‘कोणती गोष्ट सांगू?’ तो सांगतो, ‘ती मुलांचे मांस खाणार्‍या चेटकीणीची सांग.’ ती गोष्ट सांगू लागते. इथे हवेलीचा दिवस संपतो.

इथे मी चरकलो, हे काय आहे. ही असली बीभत्स/क्रूर कथानकाची गोष्ट ती का सांगते आहे त्याला? त्याला त्यातील फँटसी आवडत असेल कदाचित, पण नेहमीच्या पर्‍यांच्या, जादूच्या गोष्टी सांगायच्या सोडून तिने अशी गोष्ट का सांगावी? त्याहून पुढचा प्रश्न म्हणजे रे-बाबूंनी ही अशी गोष्ट का निवडली असेल? चित्रपट संपता संपता मला या गोष्टीचा उलगडा झाला. या कथेचा सांधा पुढे जोडून घेतल्यासारखा वाटला. अर्थात इथे या प्रतीकात्मतेच्या मोहात रे बाबूंनी पडायला नको होते असे वाटून गेले.

असाच एक दिवस संपवून कालिबाबू झोपायला जातात. झोप नीटशी येत नाही, जरा चाळवलेलीच. अशा अर्धनिद्रित अवस्थेत त्यांना एक स्वप्न पडते. स्वप्नात त्यांना दिसते देवी, म्हणजे खरेतर तिचे डोळे आणि तिच्या भालप्रदेशावरील तो बाण. हळूहळू ते डोळे सजीव होऊ लागतात, डोळ्यांची सीमारेषा पुसट होत जाते आणि दिसतात ते दयामयीचे डोळे. नंतर बाण नाहीसा होऊन दिसते तिचे सौभाग्यलेणे. हळूहळू तिचा पूर्ण चेहरा दृष्यमान होतो. कालिबाबू दचकून जागे होतात.

या स्वप्नाआधारे चित्रपट एक निर्णायक वळण घेतो, किंवा इथेच खर्‍या अर्थाने चालू होतो म्हटले तरी चालेल.

(क्रमशः)

    << पुढील भाग


हे वाचले का?

शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०

विठ्ठलाच्या स्त्रिया

(एका संस्थळावरील चर्चेत विठोबाच्या पत्नींबद्दल थोडी चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने हा विषय समोर आला.)

विठोबा-रखुमाईचा गजर करणार्‍या महाराष्ट्रदेशी विठोबाच्या स्त्रिया हा विषय कदाचित आश्चर्यकारक वाटेल. पण लोकपरंपरेला तो तसा मुळीच नाही. आपल्या लाडक्या विठोबाचे नाव या ना त्या प्रकारे अनेक जणींशी जोडले गेले आहे. त्यात (म्हणजे नंतर त्याच्यावर आरोपित केलेल्या विष्णूची... म्हणून त्याचा अवतार घोषित केलेल्या कृष्णाची... या बादरायण संगतीने) त्याची राणी रुक्मिणी तर आहेच, पण अभिजात परंपरेबाहेर त्याच्या पदुबाई उर्फ पद्मावती, तुळशीबाई या अन्य पत्नी तर आहेतच, पण जनी सारखी साधीसुधी स्त्री सुद्धा आहे. इरावती कर्वेंसारखी एखादी विदुषी त्याला बॉयफ्रेंड म्हणून त्याच्याशी आधुनिक नातेही जोडू पाहते. यामुळे या विठोबाच्या स्त्रिया हा हा विषय दुर्गा भागवत, इरावती कर्वे आणि अरुणा ढेरे या तीन विदुषींच्या लिखाणाआधारे इथे मांडला आहे. (बरेचसे त्यांचे लिखाण जसेच्या तसे उद्धृत केले आहे, माझा सहभाग संपादक म्हणून.)

VithobaStatue

एका कथेनुसार विठोबा हा माळशिरसचा राजा, खंडोबाचा (ज्याच्या पुन्हा दोन बायका आहेत म्हाळसा नी बानू) मांडलिक. त्याची बायको पदुबाई (म्हणजे पद्मावती). एकदा विठोबाच्या एका भक्ताचा आदरसत्कार तिने जाणूनबुजून केला नाही असा गैरसमज झाल्याने विठोबाने तिला शाप दिला (तो शाप फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे, पण विषयांतर नको म्हणून सोडून देऊ) त्यामुळे ती भ्रमिष्ट झाली आणि मरण पावली. इथे एक विचित्र संदर्भ आहे. विठोबाने कोणालाही तिच्या मृतदेहाला स्पर्श करू दिला नाही आणि घारी गिधाडांकरवी त्याची विल्हेवाट लावली. नंतर पावसाला बोलावून तिची हाडे समुद्रात वाहविली. पण ज्या भक्तासाठी हे घडले, त्या भक्ताने थोर तप केले आणि समुद्राकडून ती हाडे परत मिळविली. ती पद्माळ्यात विसर्जित केली. अर्थात नंतर विठोबाला पश्चात्ताप झाला.  तो ही भ्रमिष्टावस्थेत फिरत असताना पंढरपूरच्या पद्माळ्यात त्याला एक सुंदर कमळ दिसलं. ते खुडताच त्यातून पदुबाई साकार उभी राहिली. अर्थात विठोबाने ‘तिच्याशी संसार करणार नाही’ अशी आण घेतली असल्याने तिला स्वतंत्र मंदिरात संसार थाटावा लागला.

तसा विठोबा हा मूळचा दक्षिणेकडिल, पण तो पंढरपुरात राहिला तो पुंडलिकामुळे असे संतपरंपरा सांगते. परंतु धनगर म्हणतात तो आला पदुबाईमुळे. किंबहुना पदुबाई ही मूळची राणी नि रुक्मिणी ही तिची छाया (किंवा पदुबाई हीच पुनर्जात रूपात रूक्मिणी) अशीही त्यांच्यात समजूत आहे. लोकधारणा आणि अभिजात संकल्पनेची सांगड घालण्याचा हा प्रयत्न असू शकेल. किंवा अवैदिक विठोबाचे वैदिकीकरण होताना हा बदल झाला असेल.

अशीच कथा तुळशीची. ही कथा कुणबी परंपरेतील. एका दरिद्री ब्राह्मणाची काळी मुलगी; ‘तिला वर मिळणार नाही’ असे भविष्य होते म्हणून बापाने तिला वाऱ्यावर सोडले. विठोबाने तिला आश्रय दिला. पण रुक्मिणीने मत्सरग्रस्त होऊन काही कारस्थान केले म्हणून ती जमिनीत गडप झाली. परंतु ती गडप होत असताना विठोबाने तिला केस धरून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, तर एक सावळे झाड वर आले. विठोबाच्या हातात मंजिऱ्या होत्या. मानवी तुळशीला दिलेले लग्नाचे वचन त्या झाडाशी लग्न करून विठोबाने पुरे केले. (जे आता त्याच्यावर विष्णू-अवताराचे आरोपण झाल्यावर तुळशीच्या लग्नाच्या कर्मकांडामध्ये रूपांतरित केले गेले. भर म्हणजे तुलसीविवाहामध्ये तुळशीचे लग्न लागते ते कृष्णाशी— विष्णूच्या अवताराशी, विष्णूशीही नव्हे.)

हा देव तसा अन्य गृहस्थधर्माला जागणारा आहे. तो कधीकधी भक्तांकडे चहापाण्यालाही जातो. मग त्याचा पाहुणचार केला जातो. मग रुक्मिणीला साडी-चोळी मिळते, तर सत्यभामेला चोळीसाठी दोरव्याचे कापड. पण विट्ठलाला काय द्यायचे?

रुख्माईला साडी-चोळी, सत्यभामेला दोरवा ।
विठ्ठल देवराया, तुळशीबाईचा गारवा ॥

तुळशीबाईशी त्याचे– विवाहबाह्य का असेना– असलेले नाजूक नाते भक्तांनाही माहित आहे. म्हणून ते देवाची तुळसाबाईशी गाठ घालून देतात.

अरूणा ढेरेंच्या ‘ओव्यांमधली रुक्मिणी’ या लेखात तर त्यांनी विठोबाच्या अन्य स्त्रियांमुळे रुसलेल्या रुक्मिणीच्या काही ओव्याच उद्धृत केल्या आहेत. त्यातील एक दोन इथे देतो. इथे विठोबा हा कृष्णाचा अवतार असल्याचा संदर्भ अधिक ठळक होतो. इथे रुक्मिणी नाराज आहे ते विठोबाच्या राधेशी असलेल्या संबंधांबद्दल. त्याबद्दल आयाबाया दळताना म्हणतात:

राणी रुक्मिणी परीस राधिकेला रूप भारी
सावळा पांडुरंग नित उभा तिच्या दारी

अर्थात रुक्मिणी यामुळे त्या द्वारकेच्या राण्यावर रुसली आहे.

थोरली रुकमिण जशी नागीन तापली ।
देवाच्या मांडिवर तिने राहीला* देखली ॥

(* राधेला)

इथे रुक्मिणी ही गृहकृत्यदक्ष गृहिणी आहे. ती घरची नेहेमीची कामे तर करतेच, पण विठोबाच्या भक्तांसाठी बुक्का दळून ठेवते, त्यांच्या भक्तांची, नातेवाईकांची उस्तवारही करते.

द्रौपदीने दिले घोडे पांडुरंगाहाती ।
नणंदेच्या नात्यानं रखुमाय पाय धुती ॥

असं असलं तरी विठोबा तिचा एकटीचा नाही. त्यामुळे ती विचारते:

इट्ठलाच्या पाया रखुमाई लोणी लावी ।
देवाला इचारती, ‘जनी तुमाला कोण व्हवी’ ॥

ही जनी– जनाबाई विट्ठलाची लाडकी आहे. म्हणून असं म्हटले आहे:

रखुमाईच्या पलंगाला गाद्या गिरद्या बख्खळ ।
देवाला आवडती जनाबाईची वाकळ ॥

क्वचित कधी थोडी अधिक धीट होऊन रखुमाई पुसते:

रुक्मिण पुशिते, देव व्हते कुठं राती ।
शेल्याला डाग पडे, तुळशीची काळी माती ॥

रुक्मिण पुशिते, कुठं व्हते सारा वेळ ।
शेल्याला लागलं कुण्या नारीचं काजळ? ॥

पण विठोबा चतुर आहे, हरप्रयत्नाने सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुक्मिणीला तो काहीच उत्तर देत नाही. इथे अरुणाबाईंनी रुक्मिणीविषयी एक अतिशय हृद्य वाक्य लिहिले आहे. त्या म्हणतात रुक्मिणीला सर्व काही कळले होते पण ‘कळण्यानं दु:ख मिळतं, परिस्थिती बदलंत नाही हे ही तिला कळलं होतं’. अतिशय चटका लावणारं हे मूल्यमापन सर्व भारतीय स्त्रियांचे प्रातिनिधिक म्हणता येईल.

साऱ्या संतपरंपरेने मात्र विठोबाचा राजेपणा मोडला आणि त्याला आपल्यात ओढला. तो ही त्यांच्या प्रेमाने बांधला गेला. अनेक मार्गाने त्याने सर्वांच्या सुखदु:खात त्यांची सोबत केली. एखादी बाई दळिताकांडिता त्याला विचारत राहिली:

जिवाचं सुखदुक तुला सांगते विट्ठला।
माज्या पंढरीच्या हरी, कधी भेटशील एकला ॥

आणि तो तिला भेटत राहिला, वास्तपुस्त करीत राहिला. म्हणून तर आपण त्याने रुक्मिणीवर केलेल्या अन्यायाची आठवण विसरू शकतो.

जनीशी विठ्ठलाचे सर्वात जवळचे नाते आहे.

माय गेली बाप मेला
आता सांभाळी विट्ठला
मी तुझे गा लेकरू
नको मजसी अव्हेरू

अशी विनवणी करणाऱ्या जनीला या दासीला त्याने सर्वस्वाने आपले म्हटले आहे. इतर कोणासाठी नाही, पण जनीसाठी विठोबा राबला आहे. जनीने झाडलोट केली की याने केर भरावा, दूर टाकावा; तिने साळी कांडायला काढल्या की याने उखळ साफ करून कांडपाला हातभार लावावा– कोंडा पाखडावा, पाणी भरावे अशी सगळी कामे विठोबाने तिच्यासाठी केली आहेत.

पण असे बापाचे नाते सांभाळणाऱ्या विठोबाला जनी कधी “अरे विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या” असेही म्हटले आहे. क्वचित ती त्या पोरट्याला आपल्या म्हातारीची काठी असेही म्हटले आहे.

पंढरीचा विठुराया, जसा पोरगा पोटीचा
मज आधार काठीचा, म्हातारीला
विठुराया पाठीवरी, हात फिरवे मायेने
पुसे लेकाच्या परीने, बये फार भागलीस?

तर याउलट तिच्या संबंधाने रखुमाईने विठोबाची शंकाही घेतली आहे. तर जनीनेच आणखी एक पाऊल पुढे टाकून ‘डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी’ असे म्हणत विठोबासाठी वेसवापणही स्वीकारले आहे. जनीचे विठोबाशी असे गुंतागुंतीचे नाते आहे. ते समजण्यासाठी ढेरेबाईंचा ‘डोईचा पदर... ’ (पुस्तकः कवितेच्या शोधात) हा लेख मुळातून वाचायला हवा.

- oOo -

संदर्भः

पैस- दुर्गा भागवत
ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी: पृ. २३-२४
स्त्री आणि संस्कृती - अरुणा ढेरे
आठवणीतले अंगण - अरुणा ढेरे
कवितेच्या शोधात - अरुणा ढेरे
गंगाजल - इरावती कर्वे.


हे वाचले का?

रविवार, १८ एप्रिल, २०१०

नागर-गप्पा

तुम्हाला बिल गेट्सने पैसे दिले का?

दचकलात का? अहो पण दचकायला काय झालं? एक-दोन वर्षापूर्वी मी तुम्हाला एक ढकलपत्र नव्हते का धाडले, ज्यात आपला (हो निदान पैसे देतोय तर आपला म्हणायला काय हरकत आहे) बिल त्याचे पैसे वाटून टाकणार आहे असे म्हटले होते? मला नाही मिळाले अजून म्हणून म्हटलं इतर कोणा कोणाला मिळालेत ते विचारावे.

असो. थट्टेचा भाग बाजूला ठेवू या. पण माझी खात्री आहे हे ढकलपत्र प्रत्येक इ-मेल-पत्ताधारी व्यक्तीला किमान एकदा (पॉइंट टू बी नोटेड. मला किमान पाच जणांकडून आले... काय पण शेजार आहे नाही! ) तरी मिळालेच असणार. आणि कदाचित 'I know the truth, but just in case... ' असे म्हणत पुढे ढकललेही असेल, हो ना? माझ्या एका केरळी गणितविभाग-प्रमुख (म्हणजे मराठीत HOD हो) मित्राने प्रथम पाठवले. आणि त्याच्या 'cc' मध्ये जवळजवळ सव्वाशे नावे होती (हाय का आवाज? ). अर्थातच माझेही समाजसेवी पत्र (जे मी प्रत्येक खोट्या ढकलपत्राच्या ‘प्रेषिता’ला पाठवतो) ते त्यांना पाठवून त्यांना “धन्यवाद” दिले. माझ्या एका सहकारी कन्येनेही 'just in case... ' म्हणत हेच पत्र पाठवले.

CommBankHoax

असेच एक ढकलपत्र आले. त्यात एका विद्यार्थ्याचा ऑस्ट्रेलियातील तथाकथित ‘भयानक’ अनुभव कथन केला होता (किडनी रॅकेटचा संदर्भ) आणि ऑस्ट्रेलियात जाणाऱ्यांनी सावध असावे असा सल्ला दिला होता. आणखी एकामध्ये एका प्रथितयश हॉस्पिटलचा संदर्भ देऊन (अगदी त्यांच्या संकेतस्थळाचा पत्ता, दूरध्वनी क्र. विभागप्रमुखांची नावे वगैरे) आणि खाली प्रेषक म्हणून डीनचे नाव होते. आणि प्रत्येक इ-पत्त्यामागे श्री. रतन टाटा रूग्णालयाला २००० रू (चु. भू. द्या घ्या) देणार आहेत असे लिहिले होते. (हो त्यांचा बिल देतो तर आमचे टाटा का मागे राहतील?)

९/११ च्या नंतर ‘दैनिक सकाळ’ मध्ये आलेले छायाचित्र आठवते का? धडकणार्‍या विमानाचे अगदी दोन मिनिट आधीचे ‘योगायोगाने’ मिळालेले? ते चित्र नंतर फोटोशॉपची किमया होती हे लक्षात आल्यानंतर सकाळने माफी मागितली होती. हे चित्रही ढकलपत्र म्हणून दोन-तीन दिवस वेगाने फिरत होते.

अशी अनेक ढकलपत्रे पाठविली जातात. बहुतेक पत्रातून तुमच्या भावनेला आवाहन करून (गणपतीचे पत्र २१ जणाना पाठवा; हो मला विपत्र म्हणून आले होते), घाबरवून (ऑस्ट्रेलियातील अनुभव), वा तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन करून (खालील समाजसेवेचे उदाहरण पहा) पुढे ढकलण्याचे आवाहन केले जाते. बहुतेक वेळा खर्च पडत नाही म्हणून आपणही ‘ढकला’ चे बटण दाबून मोकळे होतो. यामुळे सर्व ढकलणाऱ्या मंडळींच्या इ-पत्त्याची साखळीच जालावर फिरू लागते. अर्थात यात मूळ प्रेषकाचा फायदा काय हा प्रश्न माझ्यासाठी तरी अनुत्तरितच आहे. अशा प्रकारात प्रत्यक्ष नुकसान होत नसले तरी, अनावश्यक जाहिरातींचा मारा होणे, जालावरील विपत्रांचे अनावश्यक ये-जा वाढणे असे अप्रत्यक्ष दुष्परिणाम होतातच.

यातील काही कथा प्रत्यक्ष नुकसान करणार्‍याही असतात. काही काळापूर्वी मला एक विरोप आला होता. त्यात वेगवेगळ्या देशात दर-माणशी खाण्याचे प्रमाण फोटोंच्या सहाय्याने दाखवले होते. त्यात भारतातील प्रमाण किती कमी आहे, आणि आपण अन्न वाचवावे वा वाया घालवू नये असे आवाहन होते. शेवटी एका सामाजिक संस्थेचे नाव देऊन त्यांचा दूरध्वनी क्रमांकही दिला होता. आपण पार्टी वगैरे दिल्यानंतर उरलेले अन्न वाया न घालवता या संस्थेला द्यावे (त्यांचे स्वयंसेवक येऊन घेऊन जातील असे आश्वासन दिले होते). ही संस्था अनाथ मुलांसाठी काम करते आणि हे अन्न त्या मुलांना मिळू शकेल जेणेकरून त्यांना चांगले अन्न मिळेल असा समाजसेवी सूर होता.

एखादी समाजसेवी संस्था असे ढोल वाजवून अन्न जमा करेल हे मला शंकास्पद वाटले, म्हणून मी गुगलून पाहिले. अशी संस्था खरेच अस्तित्वात होती व (अन्यत्र आलेल्या परिचयानुसार) चांगले कामही करीत होती. दिलेला दूरध्वनी क्रमांक देखील बरोबर होता. परंतु त्यांनी आपण असे अन्न जमा करत असल्याचा स्पष्ट इन्कार केला होता (त्यांच्या संकेतस्थळावर तसेच अन्य काही फोरम्सवर). म्हणजे ही ढकलपत्रातील माहिती उघडपणे खोटी होती. मग प्रश्न असा होता की, ‘मुळात अशी मेल पाठवणाऱ्याचा उद्देश काय असावा?’ 

अचानक मला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे तो दूरध्वनी क्रमांक ‘टोल-फ्री’ होता. म्हणजे प्रत्येक येणाऱ्या कॉलचे बिल हे संस्थेकडून भरले जात होते. अशा मेल मुळे अनेक जण फोन करीत असल्याने संस्थेचे फोन-बिल विनाकारण वाढत जात असणार. संस्थेवर राग असणाऱ्या एखाद्या विघ्नसंतोषी माणसाने हे काम केले होते का? कुणास ठाऊक.

सामान्यपणे अशा पत्रांना नागर-गप्पा (Urban Legends) (गाव-गप्पा वरून हे भाषांतर सुचले) जाल-अफवा असे म्हटले जाते. काही संकेतस्थळे अशा नागर-गप्पांचा पाठपुरावा करतात. यात अर्बन लेजंडस (http://urbanlegends.about.com) व स्कॅमबस्टर्स (http://www.scambusters.com) या दोन स्थळांचा समावेश होतो. आपल्या ‘आवडत्या’ (favorites) संकेतस्थळांच्या यादीत यांचा समावेश असलेला चांगला.

सामान्यपणे अशा पत्रांच्या प्रेषकाला मी वरील दोन दुवे पाठवतो आणि काही ठोकताळे ज्यांच्या आधारे आलेल्या ढकलपत्राची शहानिशा करता येईल आणि तुमच्या मित्रांचे इ-पत्ते अनोळखी व्यक्तींच्या हाती पडण्याचे तुम्हाला टाळता येईल.

अ. ‘सदर पत्रातील विषय/दावा विश्वासार्ह वाटतो का?’ याचा विचार आधी करावा. केवळ आपल्या दृष्टिकोनाला, स्वार्थाला धार्जिणे आहे म्हणून उतावीळपणे पुढे ढकलण्याची घाई करू नये. (पण ‘ज्याची त्याची बुद्धी आणि ज्याची त्याची जाणीव’ आहेच. उदा. ‘बिल गेटस त्याचे पैसे वाटणार आहे’ हे खरे समजणाऱ्यांबद्दल काय बोलावे. )

ब. ‘सदर ढकलपत्र नाही ढकलले तर कुणाचे काही नुकसान होणार आहे का?’ ते पाहावे. नसेल तर न ढकलणे योग्य.

क. ढकलपत्रात उल्लेख केलेल्या संस्था, व्यक्ती अथवा मूळ प्रेषक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सहभागाची खात्री करून घ्यावी.

ड. वरील दोन दुव्यांवर जाऊन सदर ढकलपत्राचा पाठपुरावा झालेला आहे का पाहणे.

ई. काही वेळा (उदा. स्थानिक संदर्भ, वरील अन्न जमा करण्याचे) या दुव्यांवर असा पाठपुरावा केला नसेल तर गुगलून पाहणे.

फ. जर यापैकी सर्व मार्गाने हे विपत्र बनावट असल्याचा पुरावा मिळाला नाही आणि पत्रातील मजकूर पुढे पाठविण्यालायक असेल तर :

१. पत्रातील सर्व इ-पत्ते काढून टाकावेत.
२. ज्यांना पाठवायचे आहे त्यांचे इ-पत्ते 'bcc' मध्ये टाकावेत.
३. कोणालाही त्यांच्या कार्यालयीन इ-पत्त्यावर ढकलपत्रे पाठवू नये.

वरील दोन दुवे तसेच (http://mashable.com/2009/07/15/internet-hoaxes/) येथे काही नागर-गप्पांचा उहापोह केलेला आहे. गंमत म्हणून कधीतरी वाचून पहा. त्यातील - वाकुड्या का होईना - कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटेल.

- oOo -


हे वाचले का?