कॅथरीन बोल्कोव्हॅक << मागील भाग
---
दहा वर्षांचा असताना त्याला पहिला संगणक मिळाला. इंटरनेटवर भ्रमंती चालू असताना कुणीतरी धमकी देऊन त्याचा संगणक बंद पाडला. तो हादरला. पण ’जर समोरचा हे करु शकत असेल, तर मी ही करु शकतो’ या जिद्दीने कामाला लागला. इतर कुणाचा अधिकार असलेले, मालकीचे असलेले संगणक अथवा संगणक-प्रणाली यांच्यात परस्पर बदल करणे याला संगणकाच्या भाषेत ’हॅक’ करणे म्हटले जाते. टीन-एजर असतानाच तो वेगवेगळी सॉफ्टवेअर, गेम्स ’हॅक’ करुन आपल्याला हवे तसे बदल करु लागला.
असे असले तरी सुरुवातीला त्याने इतर कुणाच्या संगणकाला धक्का लावलेला नव्हता. वयाच्या विशीत पोचल्यावर त्याने गंमत म्हणून हा प्रयोग करायचे ठरवले. तरुणाई आणि सोशल मीडिया हे नाते तेव्हा मूळ धरु लागले होते. आजच्या फेसबुक’सारख्या ’मायस्पेस’ ही साईट तेव्हा लोकप्रिय होती. तिच्या मांडणीमध्ये त्याला सापडलेल्या एका चुकीच्या आधारे त्याने त्यांच्या प्रणालीत बदल करुन मायस्पेसच्या अनेक वापरकर्ते आपोआप आपल्याशी मित्र म्हणून जोडले जातील अशी तरतूद केली. एक जण त्याच्याशी जोडला गेला, आणि त्याने याचे पान उघडले की त्याचे मित्रही याच्याशी आपोआप जोडले जात. वीस तासांतच त्याची मित्रसंख्या दहा लाखांचा आकडा ओलांडून गेली!
आता मात्र तो हादरला. पुढे एका मुलाखतीत त्याने म्हटले, ’मी इतका हादरलो होतो की पुष्पगुच्छ आणि मिठाई घेऊन मायस्पेसच्या ऑफिसात जावे, नि ही सारी गंमत पोटात घ्यावी अशी विनंती त्यांना करावी असा विचार बराच वेळ मनात घोळत होता.’ पण ही ’गंमत’ निस्तरण्यासाठी ’मायस्पेस’ला काही तास आपली सेवा बंद करावी लागली. या उपद्व्यापाबद्दल काही महिन्यांत अमेरिकेच्या इलेक्ट्रॉनिक टास्क फोर्सने त्याच्यावर खटला दाखल केला... सॅमी कामकार वयाच्या विशीतच ’पेट्रियट अॅक्ट’ खाली सरकारदरबारी सायबर गुन्हेगार म्हणून नोंदवला गेला.
सुदैवाने अमेरिकेत गुन्हा कबूल करणार्यांसाठी असलेली पर्यायी शिक्षेची तरतूद त्याच्या मदतीला आली. कुणाचे नुकसान करण्याचा हेतू नसल्याने वीस हजार डॉलर दंड आणि सुमारे सातशे तासांची सक्तीची समाजसेवा यावर सॅमीची सुटका झाली. पण त्यासोबतच त्याला तीन वर्षे संगणक वापरण्यास संपूर्ण बंदी घालण्यात आली! या संगणक-मुक्त काळात, आपल्या दोन अनुभवांतून त्याला आपल्या जगण्याचा हेतू गवसला. ’मायस्पेस’प्रमाणेच इतर प्रसिद्ध कंपन्यांच्या विविध संगणकीय प्रणाली, त्यावर आधारित प्रत्यक्ष सेवांमध्ये असलेल्या अशा त्रुटी, लबाडी उघडकीस आणून त्या दुरुस्त करण्यास भाग पाडणे हेच आपले काम असे त्याने ठरवले.
तीन वर्षांची संगणक-बंदी संपल्यावर सॅमीने प्रथम VISA, MasterCard आणि EuroPay या क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या क्रेडिट कार्डांमध्ये असलेल्या त्रुटींमुळे त्यावरील माहिती सहजपणे चोरता येते याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्या माहितीच्या आधारे बनावट क्रेडिट कार्ड बनवून ग्राहकाची फसवणूक करणे सहज शक्य आहे हे त्याने निदर्शनास आणले. पुढे आणखी काही वर्षांनी वाय-फाय तंत्राच्या आधारे दुरुनच क्रेडिट कार्डावरील माहिती वाचता येते हे दाखवून दिले. यामुळे बहुतेक क्रेडिट कार्ड कंपन्यांनी आता मॅग्नेटिक पट्टी ऐवजी आता मायक्रोचिप आणि सोबत मोबाईल-ओटीपी असे एकाहुन अधिक सुरक्षा-स्तर असलेली कार्ड्स आणि सेवा पुरवण्यास सुरुवात केली आहे.
तुमच्या मोबाईलवरची माहिती हे अतिशय मौल्यवान चलन आहे आणि या कंपन्या ते अनेक प्रकारे वापरतात असे सांगितले, तर बहुतेक सारेच बुचकळ्यात पडतात. गुगल या अग्रगण्य कंपनीच्या बहुतेक प्रणाली आपल्याला एक पैसाही न देता वापरायला कशा मिळतात याचा शोध घेतला, तर या माहिती-चलनाचे महत्व समजून येईल. मग पैसे मोजून एखादी वस्तू विकत घेताना, आपण वाजवी किंमतच मोजत आहोत ना, विक्रेता मूळ किंमतीपेक्षा अधिक पैसे आपल्याकडून घेत नाही ना याची जशी खात्री करुन घेतो. त्याचप्रमाणे या माहिती-चलनाबाबत का नसावे?
सॅमीने २०११ मध्ये अॅपल, गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या जगातील बलाढ्य कंपन्या आपल्या संगणक, प्रणाली आणि अॅपमार्फत ग्राहकाची माहिती जमा करुन तिचा परस्पर गैरवापर करतात हे उघडकीस आणले. तुम्ही कुठे आहात हे सेवादात्या कंपनीला सांगणारी ’लोकेशन सर्व्हिस’ बंद केलेली असतानाही तुमचा आयफोन ’अॅपल’च्या सर्व्हरला तुमची माहिती पुरवतच राहतो हे सॅमीने सिद्ध केले. त्याचप्रमाणॆ गुगलच्या अॅंड्रॉईड मधील अशीच चलाखी चव्हाट्यावर मांडण्यासाठी त्यांचेच तंत्र वापरुन माहिती जमा करणारे अॅंड्रॉईडमॅप हे अॅप त्याने लोकांसमोर ठेवले.
जेव्हा तुम्ही एखादी वेबसाईट पाहात असता, तेव्हा काही माहिती (उदा. तुमचे जीमेल लॉगिन) संगणकावर राखून ठेवते, जेणेकरुन पुन्हा ती साईट पाहताना तुम्हाला ’मागील पानावरुन’ पुढे जाता यावे. ही माहिती ज्यात साठवली जाते तिला ’कुकी’ म्हटले जाते. नको असेल तेव्हा ग्राहकाला ही माहिती काढून टाकता येते, यायला हवी. परंतु काही कंपन्यांनी ग्राहकाने काढून टाकलेली अशी कुकी पुन्हा तयार करण्याची शक्कल शोधून काढली आणि ग्राहकाची माहिती कायमस्वरुपी वापराची सोय करुन ठेवली. सॅमीने हे तंत्र शोधून त्याला ’एव्हरकुकी’ नावाने चव्हाट्यावर आणले. अनेक कंपन्यांना आपले हे उपद्व्याप बंद करावे लागले.
अशा नकारात्मक प्रसिद्धीमुळे कंपन्यांची भांडवली बाजारात असलेली पत ढासळण्याचा धोका असे. म्हणून त्या अशा लोकांना स्वामित्वहक्क कायद्याची, व्यावसायिक नुकसानाची भरपाई मागण्याची धमकी देऊन त्यांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करत. मग सॅमीसारख्या अनेकांनी कंपन्यांकडे न जाता त्यांच्या चुका इंटरनेटच्या वेशीवर टांगायला सुरुवात केली. हळूहळू परिस्थिती बदलत गेली. आता कंपन्याच अशा ’नैतिक घरभेद्यां’ना आपल्या प्रणालीतील चुका आगाऊच शोधण्यास उद्युक्त करतात, जेणेकरुन प्रत्यक्ष ग्राहकाकडे जाण्यापूर्वीच त्या निस्तरत्या याव्यात.
व्यावहारिक जगात तुमच्या समस्यांबाबत, संभाव्य धोक्यांबाबत लढणारे अनेक जागले आपल्या आसपास असतात. त्यांच्या संघर्षाचे लाभधारक असलेल्या व्यक्तींना हा परस्परसंबंध सहज दिसू शकतो. तरीही यातले बहुसंख्य त्याकडे डोळेझाक करुन त्यांची ’प्रगतीविरोधी’ म्हणून संभावना करतात. दूर अमेरिकेत बसलेल्या सॅमीसारख्या कुण्या संगणक-तज्ज्ञामुळे आपल्या आयुष्यातील किती धोके टळले याची तर जाणीवही बहुतेकांना असणारच नाही. मग त्याबद्दल कृतज्ञ राहण्याची तर गोष्ट तर दूरच राहिली.
-oOo-
(पूर्वप्रसिद्धी: दिव्य मराठी - रसिक पुरवणी, दिनांक २२ मार्च २०२० )
पुढील भाग >> कोरोनाचा क्रूसेडर : ली वेनलियांग