बुधवार, १८ डिसेंबर, २०२४

‘ग्लॅड फॉर ग्लाड?’ : ग्लाड, वीरभूषण आणि मी

(‘थँक यू, मि. ग्लाड’ या अनिल बर्वे लिखित कादंबरी/नाटक यांबाबत विवेचन करणारे दोन लेख ‘वेचित चाललो’ वर लिहिले होते. विषयसंगतीनुसार काही तपशील वगळून हा मजकूर एकत्रितरित्या ‘तत्रैव’ नियतकालिकाच्या नोव्हेंबर-डिसेंबर-२०२४ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)


थँक यू, मिस्टर ग्लाड
कवितासंग्रह: ‘थॅंक यू, मिस्टर ग्लाड’
लेखक: अनिल बर्वे
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती सहावी, दुसरे पुनर्मुद्रण (२०२०)


—काही झाले तरी ग्लाडसाहेबांची राजनिष्ठा मोठी कडवी होती हे खरे. प्राण गेला तरी साहेब खाल्ल्या मिठाला जागल्याशिवाय राहिला नसता. बेचाळीसच्या चळवळीत हाती सापडलेल्या सत्याग्रह्यांना कारणे शोधून शोधून ग्लाडसाहेबाने गुरासारखे बडवून काढले होते. पण युनियन जॅक उतरून तिरंगा वर चढला, तेव्हा ग्लाडसाहेबाने दु:ख आवरून एक कडक सॅल्यूट ठोकला नि आपली सेवा तिरंग्याला रुजू केली. ग्लाडसाहेबांची जेवढी निष्ठा फिरंग्याला होती तेवढीच आता तिरंग्याला होती...
(पान ७).

... नक्षलवादी चळवळीचा वाढता जोर पाहून साहेबाच्या उरात धडकी भरे. भारतात खरेच ‘कम्युनिस्ट रेव्होल्यूशन’ होणार असे त्याला वाटू लागे. अर्थात जरी भारतात कम्युनिस्ट रेव्होल्यूशन झाले असते, तरी फारसे काही बिघडले नसते. तिरंगा उतरून लाल बावटा वर चढल्यावर ग्लाडसाहेबाने दु:ख आवरून एक कडकडीत सॅल्यूट ठोकला असता, नि आपली सेवा लाल बावट्यालाही रुजू केली असती."
(पान १४)
---


अनिल बर्वे यांच्या अतिशय गाजलेल्या ‘थँक यू, मि. ग्लाड’ या कादंबरीतील हे दोन परिच्छेद! निष्ठेचे सातत्य, निष्ठाविषय मात्र बदलता हे वरवर पाहता परस्परविसंगत वाटते. पण थोडा विचार करुन जाऊन पाहिले, तर असे दिसते की हे शक्य आहे– नव्हे हे फारच सार्वत्रिक आहे. सद्य राजकारणातील एखाद्या एखाद्या नेत्याने पक्ष बदलला, की त्याच्या कार्यकर्त्यांच्या निष्ठाही त्याला अनुसरून बदलतात. नव्या पक्षाशी त्यांच्या निष्ठा जुन्या पक्षावर होत्या तितक्याच तीव्र असतात. सध्याचे राजकारण पाहिले तर राजकारणातली गणितं बदलली की सर्वसामान्यांच्या निष्ठाही त्यानुसार हेलकावे खाताना दिसतात. काल ज्याचे गुणगान गाताना थकत नव्हती; परिस्थिती बदलताच, आज त्याच्या नावे शंख करणारी माणसे दिसतात. त्यामुळे ग्लाडच्या प्रवृत्तीचे हे वर्णन वाचल्यावर हा मि. ग्लाड मला सर्वसामान्यांच्या प्रवृत्तीचे एक रूपच वाटू लागला.

एकीकडे ‘आपला महान देश...’ वगैरे जपमाळ ओढणारी जमात दुसरीकडे ब्रिटिशांनी आणलेल्या नोकरशाहीची कास धरुन आपले पोट भरत होती. त्यावेळी तिला ब्रिटिश सत्ता ही उत्थानकारी वाटत होती. देश बिटिश सत्तेच्या अंमलाखालून मुक्त झाल्यावर, निर्माण झालेल्या संधींचा सर्वाधिक लाभही याच जमातीने घेतला. एका बाजूने हा फायदा घेत असतानाच, ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील लढ्याच्या धुरिणांना बदनाम करुन ते ही श्रेय आपल्या खाती ओढून आणण्याचा त्यांचा आटापिटा सुरु झाला. आता ते स्वत:ला ब्रिटिशविरोधी लढ्याचे वारसदार म्हणून सिद्ध करण्याची खटपट करु लागले.

वर ग्लाडबाबत म्हटल्याप्रमाणे उद्या जर खरोखरच कम्युनिस्ट क्रांती झाली, नि देश लोकशाहीकडून तथाकथित श्रमिकांच्या एकाधिकारशाहीकडे सरकला, तर आज विरोधी मताच्या व्यक्तीला तुच्छतेने ‘अर्बन नक्षलवादी’ संबोधणारी ही जमात एकमेकाला ‘कॉम्रेड’ म्हणून संबोधू लागेल यात शंका नाही.

‘जे आपले आहे ते– नव्हे फक्त तेच– श्रेष्ठ आहे’ हा दुराग्रह असणारी ही जमात कोणत्याही समाजात बहुसंख्येनेच असते. ‘आपण नेमके श्रेष्ठ जातीमध्ये, धर्मामध्ये, देशामध्ये, सत्तेच्या मॉडेलमध्ये कसे काय जन्माला आलो बुवा?’ असा प्रश्न तिला पडत नसतो. न निवडलेल्या, अनायासे मिळालेल्या आपल्या गटाचे निर्विवाद श्रेष्ठत्व ती अत्यंत आक्रमकपणे प्रतिपादित असते.

या जमातीमधील प्रत्येक जण एका बाजूने शोषित असतो, तर दुसर्‍या बाजूने शोषकाच्या भूमिकेत जाऊन आपल्या शोषकांचा सूड आपल्याहून दुबळ्या, आपल्या अधीन व्यक्तींवर उगवत असतो. काही वर्षांपूर्वी एक सुरेख लघुकथा वाचली होती. अडचणीत आलेल्या, वैतागलेल्या मुख्यमंत्र्यांपासून सुरु झालेली साखळी— मंत्री, त्यांचा सचिव, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, त्याच्या हाताखाली काम करणारा तात्यापर्यंत पोचते. घरी पोहोचलेला तात्या तिथला राग/वैताग बायकोवर काढतो, मग ती त्यांच्या मुलावर आणि तो एका भटक्या कुत्र्यावर... त्याने पेकाटात हाणल्याने केकाटलेले कुत्रे, ते धडकल्यामुळे पडलेला भय्या, त्याच्या धक्क्याने हेलपाटलेली बुरख्यातली बाई आणि त्यातून निर्माण झालेला हिंदू-मुस्लिम तणाव पुन्हा मुख्यमंत्र्यांसमोर नवी समस्या उभी करतो. प्रत्येक टप्प्यावरचा शोषित हा शोषक बनून शोषणाला खालच्या टप्प्याकडे टोलवत जातो आणि मागच्या समस्येच्या निराकरणाऐवजी नव्या समस्येला जन्म देत जातो.

‘थँक यू, मि. ग्लाड’ मधील जेलर ग्लाड हा असाच एका टप्प्यावरचा शोषित आहे. जर्मनीत असताना त्याच्यादेखत त्याच्या ज्यू पत्नीला– ‘मारा’ला– गेस्टापो ओढून घेऊन गेले. आडदांड प्रकृतीचा ग्लाड त्यांच्यासमोर पार हतबल ठरला होता; प्रतिकार करणे तर सोडाच, पण माराला सोडावे म्हणून तो त्यांच्यासमोर गयावया करत लीन झाला होता. इतके पुरेसे नव्हते; माराने त्याच्या भेकड लाचारीचा अधिक्षेप केला होता. यातून एक प्रकारे त्याच्यातल्या पौरुषाचा निर्णायक पराभव झालेला होता. त्याने त्याचा अहंकार दुखावला गेला.

ती खदखद घेऊनच तो भारतात आला आहे, मनातून सूडाने पेटलेला आहे. त्याच्या लाडक्या माराला ठार मारणार्‍या नाझींचा त्याला सूड घ्यायचा आहे. पण त्या वेळी नाझींशी दोन हात करणे त्याच्या कुवतीचा भाग नव्हते. तिथे शोषित असलेला ग्लाड आता शोषकाच्या भूमिकेत जाऊन त्याच्या हाती सापडलेल्या कैद्यांवर सूड उगवून आपल्या गमावलेल्या पौरुषाला पुन्हा पुन्हा आळवत राहातो. त्यातून ‘माराची हत्या करणार्‍या नाझींचाच जणू आपण सूड घेत आहोत’ अशी काहीशी भावना त्याच्या नेणिवेमध्ये निर्माण होत असावी.

एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामधील क्रौर्य हे अनेकदा त्याच्या मनाच्या तळाशी असलेल्या वैफल्याचा, न्यूनगंडाचा अवतार असते. भाषिक संवादामध्ये कमकुवत बाजू असलेला ज्याप्रमाणे आवाज वाढवून वा समोरच्याची मुस्कटदाबी करुन आपले म्हणणे सिद्ध करण्याचा आटापिटा करतो, त्याचप्रमाणे हा क्रूरपणा म्हणजे वास्तविक न्यूनगंडावर या तथाकथित शौर्याचे ढिगारे चढवून त्याला गाडून टाकण्याचा प्रयत्न असतो.

सर्वसामान्य माणसेही ग्लाडसारखीच असतात. कुठे तरी झालेल्या अन्यायाचा कुठे तरी सूड घेतला याचे समाधान त्यांना पुरेसे असते. कुणीतरी केलेल्या गुन्ह्याची कुणाला तरी वा कुठे तरी शिक्षा मिळाली की ते आनंदी होतात. कुठल्याशा दुबळ्या धाग्याने का होईना– मूळ गुन्हेगाराशी ज्याचा संबंध लागतो अशा कुणाला शिक्षा देता आली तरी ते पुरेसे समजले जाते. ‘नाझी हे गुन्हेगार होते नि आपल्या हाती सापडलेलेही गुन्हेगारच आहेत’ हा धागा ग्लाडला पुरेसा वाटत असतो. हीच वृत्ती सामान्य नागरिकाचीही असते, मग ते अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातले असोत की भारतासारख्या देशातले. बहुसंख्या ही ‘अमुक गुन्ह्याचा गुन्हेगार अमुक जात वा धर्माचा आहे, म्हणून त्या गटातील कुणालाही त्याची शिक्षा झाली तरी ते न्याय्य आहे’ असे मानणारी असते.

११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूड तेथील जनतेला हवा होता. पण अशा प्रकारच्या संघटित आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कृत्यामधले मुख्य सूत्रधार सापडणे जवळजवळ अशक्यच असते. त्यामुळे मग ते नाही, निदान त्यांच्या गटाची– धर्माची माणसे मारून सूड घेतल्याचे समाधान तेथील जनतेला हवे होते. अध्यक्ष बुश यांनी ‘Weapons of Mass Destruction'ची भुमका उठवून इराकचा— एका मुस्लिम राष्ट्राचा! — विध्वंस केला आणि जनतेला ते समाधान दिले. गुन्हा केला कुणी नि त्याची शिक्षा कुणाला मिळाली. पण लोकक्षोभ शांत झाला. (आणि बुश राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले.)(१)

भारतातही अशा तात्कालिक सूडाच्या कथा भरपूर सापडतात. यातूनच ‘एन्काउंटर स्पेशलिस्ट’ नावाची जमात निर्माण होते. लोकांना हा झटपट न्याय आवडतो... अर्थात जोवर तो आपल्या अंगाशी येत नाही तोवर! म्हणून मग हैदराबादमधील नृशंस बलात्काराने उठलेल्या जनक्षोभाला शांत करण्यासाठी पोलिस चार फाटक्या जिवांना संशयित म्हणून समोर आणतात, त्यांना आरोपी म्हणून घोषित करतात आणि नंतर तथाकथित एन्काउंटरमध्ये त्यांचा निकालही लावतात. सर्वसामान्य तर सोडाच सेलेब्रिटी मंडळीही पोलिसांची स्तुती करताना थकत नाहीत. त्या पोलिसांवर पुष्पवृष्टी केली जाते. ज्यांच्याविरोधात अद्याप तपासही पूर्ण झालेला नाही अशा आरोपींच्या घरावर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे शासन सरळ बुलडोझर चालवते, आणि स्वत:ला संभावित म्हणवणारे या न्यायाबद्दल (?) शासनाचे कौतुक करताना थकत नाहीत.

हैदराबाद एन्काउंटर(?)मध्ये मारले गेलेले हे संशयित हे गुन्हेगार सोडा, अद्याप आरोपीही नव्हते. तीच बाब म.प्र. नि उ.प्र. मध्ये आपला निवारा गमावून बसलेलेही. मग खरेच गुन्हेगार होते का? असा प्रश्नही फारसा कुणाला पडत नाही. असले, तरी ‘त्यांना न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून शिक्षा व्हायला हवी’ असा आग्रह कुणी धरला नाही. पोलिस म्हणाले म्हणजे ते गुन्हेगार होतेच असे समजणार्‍या या संभावितांनी ‘सर्वच गुन्ह्यांच्या केसेसमध्ये आपण असे मान्य करतो का?’ असा प्रश्न स्वत:ला विचारून पाहिला नाही.

ज्या गटाने हैदराबादचे तथाकथित एन्काउंटर ‘पोलिस म्हणतात म्हणजे ते गुन्हेगार होते’ असा दावा केला होता, त्याच गटाने ‘त्यांच्यावर’ सूड घेतला गेला या आनंदात, आठ वर्षांच्या चिमुरडीवर अनेकांनी अनेकवार केलेला बलात्कार नि तिची हत्या अप्रत्यक्षरित्या समर्थनीय ठरवली होती. त्यावेळी मात्र पोलिसांनी जाहीर केलेल्या आरोपींना गुन्हेगार मानायची त्यांची तयारी नव्हती. उलट आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे काढले गेले होते.

जनता ही अशी स्वार्थी नि नीच वृत्तीची असते. बहुसंख्य प्रत्यक्ष कृती करत नसले, तरी त्यांच्यात ती प्रवृत्ती जिवंत असते. म्हणून आठ वर्षांच्या असिफावर केलेल्या बलात्काराने ती तिला विकृत आनंद होतो, चार फाटक्या जिवांच्या एन्काउंटरने तिला कृतकृत्य झाल्यासारखे वाटते; पण त्याचवेळी एखाद्या मद्यधुंद हिंदी हीरोने गाडीखाली चिरडलेल्या पाच जिवांना न्याय मिळावा यापेक्षा, त्याची सुखरूप सुटका व्हावी यासाठी देव पाण्यात घालून बसते...

... आणि हीच जनता जेलर ग्लाडने क्षुल्लक कारणाने बडवून काढलेल्या कैद्यांबद्दल काडीची सहानुभूती न राखता, ‘मग काय गुन्हेगारच तर आहेत’ म्हणत निर्लज्ज समर्थन करते! पण नेमक्या त्याच वेळी नक्षलवाद्याने केलेल्या तशाच प्रकारच्या कृतीला ती भयंकर समजते, ‘त्याला तातडीने फाशी दिली पाहिजे’ असे म्हणते. आणि आता हे एकदा सोयीचे झाले, की गैरसोयीची मते मांडणार्‍या कुणालाही ‘अर्बन नक्षलवादी’ असल्याचा शिक्का मारुन तुरुंगात घालू पाहाते... कारण ‘सध्या’ नक्षलवादी सत्ताधारी नाहीत; असते... तर त्यांचे मूल्यमापन वेगळे झाले असते !

दुसरीकडे ग्लाडसमोर उभा ठाकलेला वीरभूषण पटनाईक हा पोलिस चौकी उडवून सात पोलिस आणि एक सब-इन्स्पेक्टरची हत्या केल्याबद्दल फाशीची शिक्षा झालेला नक्षलवादी. मार्क्सवादाचा हा अतिआक्रमक अवतार नक्षलवाद मध्यपूर्व भारतात अजूनही मूळ धरुन आहे. नक्षलवादी लोकशाही व्यवस्था आपापत:च भांडवलशाहीची बटीक आणि म्हणून शोषक मानतात. या व्यवस्थेचे सर्व घटक हे शोषकांचे हस्तक आहेत असे ते मानतात. लोकशाही व्यवस्थेची उपव्यवस्था असलेल्या दंडव्यवस्थेचे नि न्यायव्यवस्थेचे प्रतिनिधी असलेले पोलिस आणि अन्य सशस्त्र दले त्यांचे शत्रूच आहेत. इतकेच नव्हे तर लोकनियुक्त प्रतिनिधी, प्रशासनातील लोक, त्यांच्या वतीने लोकाभिमुख कार्य करणारेही अप्रत्यक्षरित्या या ‘शोषक’ व्यवस्थेचे आधार असल्याने क्रांतीचे शत्रू आहेत असा त्यांचा दावा असतो.

ती लोकशाही व्यवस्था उलथून टाकून नवी लोकाभिमुख व्यवस्था उभी करण्याचा उद्देश असल्याचा दावा करतात. सर्वात महत्वाचा मुद्दा हा, की या त्यांच्या तथाकथित ‘स्वातंत्र्यलढ्यात’ अगदी सामान्य व्यक्तीप्रती केलेल्या हिंसेचा वापरही ते त्याज्य मानत नाहीत. किंबहुना तेच त्यांचे मुख्य हत्यार आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेला समांतर अशा ‘पीपल्स कोर्ट’ नामक व्यवस्थेकरवी त्यांचा निवाडा करण्याचा त्यांचा प्रघात आहे. आणि अशा क्रांतिशत्रूंना त्यांच्याकडे एकच शिक्षा आहे, देहदंड !

थोडक्यात आजच्या लोकशाहीमध्येही ‘कॉल द डॉग मॅड अँड शूट हिम’ मानसिकतेच्या बहुसंख्येला अभिप्रेत असलेली व्यवस्थाच नक्षलवादालाही अभिप्रेत आहे. आणि म्हणून उद्या नक्षलवादी व्यवस्था प्रस्थापित झाली, तर ग्लाडप्रमाणेच देशभक्तीची जपमाळ पेटीत ठेवून, देशभक्तीचा झगा उतरवून, बहुसंख्य लोक लाल कफनी चढवतील आणि न पटणारी मते मांडणार्‍याला ‘देशद्रोही’ वा ‘अर्बन नक्षलवादी’ म्हणण्याऐवजी ‘क्रांतिशत्रू’ किंवा ‘प्रतिक्रांतिवादी’ म्हणून हिणवू लागतील. त्यांच्या दृष्टीने फरक झाला तर इतकाच होईल... आणि म्हणून जेलर ग्लाड अशा जनतेचा डार्लिंग असतो.

जेलर ग्लाड हा ही नक्षलवाद्याप्रमाणेच आपल्या व्यवस्थेच्या अंतर्गत गुन्हेगारांविरोधात हिंसेचा सढळपणे वापर करणारा आहे. त्याअर्थी हे दोघे दोन विरोधी व्यवस्थांमधले एकमेकांचे प्रतिबिंबच म्हणावेत असे. तो तुरुंग म्हणजे ग्लाडसाहेबाचे साम्राज्य. तिथले कर्मचारीच काय पण त्या आसमंतातले सजीव-निर्जीव सारेच साहेबासमोर चळचळा कापणारे. नक्षलवादी प्रमुख तुरुंगाधिकारी असलेल्या ग्लाडला ‘जेलरसाहेब’ या उपाधीने न संबोधता सरळ ‘मि. ग्लाड’ म्हणून संबोधतो आहे. एक प्रकारे त्याच्या सत्तास्थानाला, अधिकाराला आणि पर्यायाने तो ज्या व्यवस्थेचा भाग आहे तिच्या सार्वभौमत्वाला आपण नाकारतो असा स्पष्ट संकेत देतो आहे.

ग्लाडची ख्याती पाहता सुरुवातीला एकतर्फी होईल असा सामान्य तर्क असलेला दोघांचा सामना पाहता-पाहता तुल्यबलांचा होऊन जातो. बाहुबळ, हिंसा ही प्रमुख हत्यार मानणार्‍या दोघांचा हा सामना मात्र मनोबलाचा सामना होऊन राहतो. आणि या कादंबरीचे तेच वैशिष्ट्य आहे. यात कुठेही लोकशाही आणि नक्षलवादाला अभिप्रेत असलेल्या व्यवस्थांचा, दृष्टिकोनाचा संघर्ष नाही. संघर्ष आहे तो दोन व्यक्तिंमधला. ताठ मानेचा ग्लाड आणि ताठ कण्याचा वीरभूषण यांच्यातला!

संघर्षाच्या अखेरीस ग्लाडची मान किंचित झुकते. ब्रिटिशांची चाकरी करत असताना भारतीय स्वातंत्र्यसैनिकांना त्याने गुन्हेगारांप्रमाणे निष्ठुरपणे वागवले होते. पण वीरभूषणला तो निव्वळ गुन्हेगार न मानता क्रांतिकारक म्हणून मान्यता देतो. अर्थात याचा अर्थ त्याला नक्षलवाद्याची विचारधारा पटली आहे असा नाही. व्हॉल्टेअरच्या उक्तीला अनुसरून आपल्याला न पटणार्‍या विचारधारेचा निष्ठावान पाईक म्हणून त्याला तो क्रांतिकारक म्हणतो आहे. आणि याला त्या नक्षलवाद्यामधल्या माणसाचे त्याला झालेले दर्शन अधिक कारणीभूत आहे. दुसरीकडे लोकशाही धिक्कारुन पर्यायी व्यवस्थेच्या निर्मितीसाठी शस्त्र उचलणार्‍या नक्षलवाद्याचा स्वत:च्या स्थानाबद्दलचा भ्रमनिरासही ग्लाडमुळे होतो. त्याअर्थी त्याचा कणाही झुकतो आहे.

‘...ग्लाड’मध्ये वीरभूषणने जेनीची प्रसूती करण्याच्या आणि ताठ कण्याच्या कैद्याप्रती जेलरच्या मनात सहानुभूती निर्माण होण्याच्या प्रसंगांच्या आवृत्या पुढे नाटक-चित्रपटांत पुन्हा पुन्हा येत राहिल्या. ‘थ्री इडियट्स’ या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटामधील प्रि. सहस्रबुद्धेंच्या मुलीच्या प्रसूतीचा क्लायमॅक्स आठवून पाहा. तशीच धुवांधर पावसाळी रात्र, तसेच तुंबलेले रस्ते, तसाच तुटलेला संपर्क आणि प्रिन्सिपलच्या नावडत्या विद्यार्थ्यानेच केलेली त्याच्या मुलीची प्रसूती ! ‘मी नथुराम गोडसे बोलतोय...’ मध्ये वैचारिकदृष्ट्या दुसर्‍या अक्षावर असलेल्या- पण नक्षलवाद्याप्रमाणेच हिंसा हे हत्यार समर्थनीय मानणार्‍या नथुरामच्या व्यक्तिमत्वामध्ये नाटककाराने वीरभूषण पटनाईकचे बरेच रंग मिसळून दिलेले दिसतात. त्यातील जेलर शेखची तर वाक्येच्या वाक्ये ग्लाडची आठवण करुन देतात.

कादंबरी वाचत असताना त्यातील वीरभूषण पटनायक या कैद्याच्या (नक्षलवाद्याच्या) ताठ कण्याच्या व्यक्तिमत्वाचा वाचकाच्या मनावर प्रभाव पडत जातो. अखेरच्या प्रसंगामध्ये जेलर ग्लाड त्याचे श्रेष्ठत्व अप्रत्यक्षपणे मान्य करतो असा उतावळा निष्कर्ष काढला जाऊ शकतो- काढला गेला. त्यातून नकळत वीरभूषण या पात्राचे उदात्तीकरणही झाले.

यातून झालं असं की एखाद्या एकांगी विचाराच्या व्यक्तिमत्वावर मानवी वृत्तीचा शेंदूर लावून त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी या व्यक्तिमत्वाने एक आराखडाच (template) देऊ केला. महात्मा गांधीच्या खुन्याचे समर्थन करण्यासाठी याच नाटकावर हिंदुत्ववादी संस्करण करुन रंगभूमीवर आणण्यात आले. आजच्या प्रचार-लढाईच्या कालखंडात भानावर राहणे किती मोलाचे आहे हे आपण सर्व जाणतोच. त्यामुळे या कादंबरी/नाटकाकडे अधिक वस्तुनिष्ठपणे पाहणे, भारावून न जाणे हे महत्त्वाचे ठरते.

‘थँक यू मि. ग्लाड’च्या शेवटाकडे झुकताना ‘वीरभूषण हा आपला शत्रू असला तरी आपल्या विचारांवर निष्ठा असणारा, त्यासाठी सर्वस्व झोकून देणारा आहे, त्या अर्थी क्रांतिकारक आहे’ अशी जाणीव ग्लाडला होते. म्हणूनच एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्याला फाशी न देतात क्रांतिकारकाला साजेसा मृत्यू तो देऊ करतो. आणि यातून वाचकाला वीरभूषणबाबत निर्माण झालेली सहानुभूती अधिक गाढ होत जाते. पण...

...‘हा विचार ग्लाडचा आहे’(!) हे विसरून चालणार नाही! वीरभूषणने सात-आठ व्यक्तींची हत्या केली आहे, पण ती त्याच्या ‘वैचारिक निष्ठेतून केली आहे’ असे त्याचे म्हणणे आहे. आणि जेलर ग्लाडलाही अखेरीस - परिस्थितीवश - मान्य झालेले दिसते. ग्लाड असा विचार करु शकतो, कारण ज्यांच्याशी आपले प्रत्यक्ष वैर वा संघर्ष नाही अशांप्रती एकतर्फी शारीरिक हिंसा हे त्याच्याही दृष्टीने स्वसत्ता प्रस्थापित करण्याचे अथवा राबवण्याचे वैध हत्यार आहे. तेव्हा आपल्या निष्ठेसाठी विरोधी(?) बाजूंच्या काही जणांवर अत्याचार झाले तर त्यात काही गैर नाही, असाच त्याचाही समज आहे... आपल्या आसपासच्या बहुसंख्येचाही असतो! त्यामुळे ‘पाशवी वृत्ती तीच, फक्त वैचारिक भूमिका वेगळी’ असणार्‍या वीरभूषणकडे ‘मला न पटणार्‍या विचारांचा क्रांतिकारक’ म्हणून जेलर ग्लाड पाहू शकतो.

ग्लाड ‘बळी तो कान पिळी’ याच विचाराचा असला, तरीही वीरभूषणने त्याच्यातील विचाराला जागवले आहे, उपकृतही केले आहे. म्हणून तो असा विचार करु शकतो. एरवी विरोधकांवर मात करण्यासाठी ‘पुरा तयांचा वंश खणावा’ वृत्तीचा एखादा अतिरेकी मानसिकतेचा हिंदुत्ववादी नक्षलवाद्यांबद्दल असा विचार करु शकेल? किंवा उलट दिशेने एखादा नक्षलवादी अशा हिंसाप्रेमी हिंदुत्ववाद्याबद्दल असा विचार करु शकेल? विशिष्ट वैचारिक दृष्टिकोन असणार्‍यांचे सोडा, तुमच्या-आमच्यासारखे वैचारिकतेचा केवळ झेंडा खांद्यावर मिरवणारे, एरवी वैचारिकतेमधील री पहिली की दुसरी हे ही माहित नसणारे हे करु शकतील का?

माझ्यापुरते याचे उत्तर नकारार्थी आहे. कारण माझ्या विचारांचे पोषण लोकशाही मूल्यांवर झाले आहे. आणि माझ्या दृष्टीने ती मूल्ये म्हणजे डाव्यांप्रमाणे वा हिंदुत्ववाद्यांप्रमाणे ‘मला हवी तशी हुकूमशाही प्रस्थापित होईतो- नाईलाजाने घालावी लागणी टोपी’ नाही. तिच्यातील दोष मान्य करुनही ती मला निर्विवादपणे स्वीकारार्ह असलेली व्यवस्था व विचारसरणी आहे.

निरपवाद, निरपेक्ष अशी न्यायाची कोणतीही कल्पना या जगात अस्तित्वात नसते! जो तो आपल्याला अभिप्रेत व्यवस्थेला अनुसरूनच न्याय-संकल्पना मांडत असतो. वीरभूषणने तेच केले आहे नि ग्लाडनेही. मी ही माझ्या व्यवस्थेला अनुसरूनच माझी कल्पना विकसित करणार हे साहजिक आहे. आणि माझ्या न्याय-संकल्पनेच्या परिघामध्ये या दोघांचेही वर्तन निषेधार्ह आहे— दंडनीय आहे!

मानवी समाजातील सर्वच व्यवस्थांमध्ये माणसे एकक (subjects) असतात आणि त्या व्यवस्थेच्या अंतर्गत त्यांच्या तंट्यांचे, संघर्षाचे, हक्काचे निवाडे करता येतात. पण दोन व्यवस्थांना पोटात घेणारी एखादी मातृ-व्यवस्था (super-system) नसते, जिथे त्या दोन्हींना त्या व्यवस्थेअंतर्गत एकक (subject) मानून त्यांच्या परस्परसंबंधांचे निवाडे तिच्या अंतर्गत करणे शक्य व्हावे. तेव्हा अशा दोन व्यवस्थांचे परस्पर-वर्तन आणि मूल्यमापन हे उभयपक्षी अधिकृत वा अनधिकृतपणे मान्य केलेल्या द्विपक्षीय करार वा संकेतांनुसारच होत असते.

मला अभिप्रेत असलेल्या लोकशाही व्यवस्थेचा आधार असणार्‍या सामान्य पोटार्थी व्यक्तींनाही त्याच्या व्यवस्थेचा शत्रू मानून वीरभूषण त्यांची हत्या करत असतो. लोकशाही व्यवस्थेनेही त्याच्याबाबत उलट दिशेने तीच भूमिका घेतली, तर माझ्या मानवतावादी भूमिकेला अनुसरून तिचा निषेध करणे मला अवघड होत असते. त्याच्या व्यवस्थेतील ‘पीपल्स कोर्ट’ जर लोकशाही व्यवस्थेमधील व्यक्तींचा एकतर्फी निवाडा करत असेल, तर लोकशाही व्यवस्थेतील न्यायव्यवस्थेनेही त्याचा एकतर्फी निवाडा केला, तर अन्याय म्हणता येईल का? पण लोकशाही व्यवस्था- निदान सैद्धांतिक पातळीवर- तसा करत नाही हेच माझ्या लोकशाही व्यवस्थेवरील निष्ठेचे मुख्य कारण आहे.

दोन व्यवस्थांमधील परस्पर-संघर्षामध्ये ‘न्याय’ ही संकल्पना मोजायची ती कशाच्या आधारे? त्याच्या व्यवस्थेत देहदंड हा चौकी बॉम्बने उडवून दिला जात असेल, तर या व्यवस्थेत दोराला लटकवून फाशी देऊन दिला जातो एवढाच काय तो फरक आहे. ‘फाशी देणे योग्य आहे का?’ ही चर्चा आपण लोकशाही व्यवस्थेअंतर्गतच करु शकतो. ती त्या व्यवस्थेच्या अंतर्गत बाब आहे. त्या व्यवस्थेअंतर्गत जोवर ती अस्तित्वात आहे, तोवर तिला अनुसरून निवाडे होत राहणार. ग्लाडची गोष्ट आणखी वेगळी आहे. तो तांत्रिकदृष्ट्या लोकशाही व्यवस्थेअंतर्गत असला, तरी तुरुंग ही त्याच्या अखत्यारितील व्यवस्था आहे. आणि तिच्याअंतर्गत तो त्याची दंडव्यवस्था राबवतो आहे, जी बव्हंशी वीरभूषणप्रमाणेच एकतर्फी निवाडा करणारी आहे.

यातील योग्य कुठले वा अयोग्य कुठले याबद्दल नैतिक निवाडा करणे अशक्यच आहे. कारण नैतिकतेची कल्पना ही नेहमीच व्यक्ती तसंच व्यवस्थासापेक्ष असते. आणि वर म्हटले तसे दोन व्यवस्थांच्या संदर्भात सामूहिक नैतिकतेच्या कल्पनांना आधार देणारी सामायिक व्यवस्थाही अस्तित्वातच नाही. आणि म्हणून ग्लाडने वीरभूषणचा निवाडा क्रांतिकारक म्हणून केला असला, तरी लोकशाहीवादी व्यवस्था मानणार्‍या माझ्यासारख्याला तसा करणे शक्य नाही.

जो न्याय वीरभूषणला लावावा लागतो, तोच ‘न्यायालयात न्याय मिळत नाही’ असा कांगावा करत विध्वंसाचा वडवानल पेटवणार्‍या, स्वत:ला धर्मयोद्धे समजणार्‍यांनाही ! यांच्या दृष्टीने लोकशाही व्यवस्थेचे पाईक हे शोषकांचे अथवा अन्य धर्माला पक्षपाती आणि म्हणून दंडनीय असतात. त्याचप्रमाणे लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने हे दोघेही गुन्हेगारच असतात, क्रांतिकारक नसतात!

त्यामुळे ग्लाडच्या वैय्यक्तिक अनुभवातून- कदाचित उपकाराच्या ओझ्याखाली – ग्लाडचा कणा झुकला असला, तरी ते वीरभूषणच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र मानण्याची गरज नाही! ग्लाड असो की वीरभूषण, दोघांच्याही परस्परसंबंधात यथावकाश आपुलकीचा एक धागा निर्माण होतो आहे. तरीही ते दोघेही मूलत: हिंसेचे उपासक आहेत आणि सामान्यांचे कर्दनकाळ आहेत हे विसरुन चालणार नाही. त्यांच्या परस्पर-आपुलकीचा प्रादुर्भाव आपल्या मनात होऊ न देणेच शहाणपणाचे आहे.

ग्लाडची परिस्थिती वीरभूषणहून वेगळी आहे. जरी तो वीरभूषणबाबत ‘माझ्या विपरीत विचारांचा क्रांतिकारक’ या निष्कर्षाप्रत पोहोचत असला तरी यात दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला, ‘आपल्याला वैचारिक भूमिका आहे, दृष्टिकोन आहे’ हा त्याचा भ्रमच आहे. कुणीतरी आपल्यावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन इतर कुणावर तरी अत्याचार करुन करण्याचा प्रयत्न करणे यात कुठलीही वैचारिक भूमिका नाही. असलाच तर भेकडाचा सूड आहे.

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे तो सत्तेच्या बाजूला राहणारा, निष्ठा बदलणारा आहे. आपल्या वैफल्याचे विरेचन व्यवस्थेने आपल्या तावडीत आणून सोडलेल्या, त्याअर्थी दुबळ्या, जीवांवर करणारा तो एक भेकड जीव आहे. आपली भीरूता जाहीर होऊ नये म्हणून त्याला क्रौर्याचा आधार घेऊन आपला दरारा निर्माण करावा लागतो, राखावा लागतो. आक्रमकता हा अनेकदा न्यूनगंडाचाच आविष्कार असतो याचे तो मूर्तिमंत उदाहरण आहे.

वीरभूषणने नाममात्र का होईना सर्वकल्याणकारी तत्त्वज्ञान अंगीकारले आहे— म्हणजे कदाचित ते अभ्यासले आहे. त्याच्या या सर्व-कल्याणाच्या व्याख्येमधून इतर व्यवस्थांचे पाईक वा लाभधारक सोयीस्करपणे वगळलेले आहेत. ते केवळ परकेच नव्हे तर थेट शत्रू मानले आहेत. त्यांचे निर्दालन करण्यास हिंसेचा वापर समर्थनीय मानला आहे.

हे ज्यांना असमर्थनीय वाटते त्यांनी समाजाअंतर्गत अन्य-धर्मीयांच्या अथवा अन्य-जातीयांबाबत आपली भावना अशीच आहे का हे स्वत:ला विचारून पाहायला हरकत नाही. इतकेच कशाला आपला देश महासत्ता व्हावा, इतर देशांवर त्याने वर्चस्व गाजवावे या वेडाने झपाटलेले लोक अन्य देशांतील- अथवा शत्रू म्हणून निवडलेल्या देशांतील - सामान्य नागरिकांची बॉम्बस्फोट वा तत्सम मार्गाने केली जाणारी हत्याही समर्थनीय मानत नाहीत काय? ‘पुरा तयांचा वंश खणावा’ ही प्रवृत्ती या ना त्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या मनात ठाण मांडून बसलेली नसते का? वीरभूषणच्या विचारांतून येणारी हिंसा ही किती भयंकर द्रोही, मानवतेविरोधात आहे वगैरे म्हणत असताना देश, धर्म, वंश वगैरे आधारावर होणार्‍या एकतर्फी हिंसेचे मात्र आडवळणी समर्थन करताना आढळतात.

याचे कारण माणसांनी भौतिक प्रगती कितीही साधली असेल पण मूलत: माणूस हा अजूनही टोळ्या करून राहणारा प्राणी आहे. आणि अन्य टोळीच्या कोणत्याही सभासदाबद्दल तो तीव्र शत्रुत्व मनात बाळगून असतो. त्याने जन्माला घातलेले सर्व धर्म, स्वत:ला सर्व-कल्याणकारी म्हणवणारी तत्त्वज्ञाने, व्यवस्था या शत्रूलक्ष्यी मांडणीच करत असतात. त्यातून मनुष्यप्राण्याच्या मनातील हिंसेचे विरेचन होण्यास एक वाट निर्माण होत असते. बहुसंख्य व्यक्तींना शाब्दिक विरेचन पुरते, गल्लीतल्या गुंडांना दुबळ्यांच्या मर्यादित वर्तुळात हिंसेचा वापर करुन पाहावासा वाटतो. पाठीशी जात, देव, देश, धर्माचे अधिष्ठान असले की या हिंसेला आणखी मोठे पाठबळ मिळते नि त्याची व्याप्ती वाढते.

या सार्‍याचा विचार करता वीरभूषण काय की ग्लाड काय या भेकड, टोळीबद्ध प्राण्यांतील एक प्राणी आहेत इतकेच. तुम्ही या दोहोंशी सहमत नसाल, तर तुमच्या भूमिकेचे मी स्वागत करेन. परंतु तेवढे पुरेसे नाही. या दोहोंच्या विचारांचे मूळ असलेली, मित्र-शत्रूंच्या व्याख्येमध्ये सरसकटीकरण करणारी शत्रूलक्ष्यी मांडणी टाळून- त्या कुबड्या टाकून निरपवाद, स्वत:च्या पायावर उभी असणारी विचारसरणी अंगीकारणे गरजेचे आहे. लोकशाही ही तुम्हा-आम्हाला उपलब्ध असणारी अशी एक व्यवस्था आहे. ती स्वीकारायची असेल तर वीरभूषणचा ताठ कणा वा ग्लाडचा तथाकथित मनाचा मोठेपणा यांनी फार भारावून न जाण्याचे भान राखायला हवे आहे. त्याचबरोबर त्या दोहोंमधील दोषच वेगळ्या रंगात रंगवून मांडणार्‍या तथाकथित पर्यायी व्यवस्थांनाही नाकारणे आवश्यक आहे.

- oOo -

(१) शिफारस: बेगिन, बालाकोट, बुश आणि अंधारातील अधेली


हे वाचले का?

शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

दोन बोक्यांनी... (एक सामाजिक-राजकीय रूपककथा)

TwoCatsAndTheMonkey
AI-Generated Image for this article (Courtesy: deepai.org)

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे...

एक लहानसं गाव होतं. गावाचं नाव होतं... पण ते नावाचं जाऊ द्या. ते महत्त्वाचं नाही, कुठल्याही गावासारखं ते एक गाव होतं. गावात शेत कसणारे कुणबी होते, नांगर ओतणारे लोहार होते, चपला बांधणारे चांभार होते, मडकी घडवणारे कुंभार होते, घाणा चालवणारे तेली होते... या सार्‍यांवर राज्य करणारे पाटील होते, त्यांच्या मदतीला कुलकर्णी होते. शाळा चुकवणारी पोरे होती, पारावरची पाले होती; नदीवरची धुणी होती, चोरट्या प्रेमाची कहाणी होती. कुठे कुणाचे दाजी होते, कुठे कुणाचे ‘माजी’ होते; काही काही पाजी होते, बाकी उडदामाजि होते...

गावाच्या गरजा मर्यादित होत्या. अन्नाची गरज शेती व गावालगतचे जंगल यांतून भागत असे. इतर किरकोळ गरजा भागवण्यास गावात महिन्यातून दोनदा एक व्यापारी येई. त्याचं नाव पुरुषोत्तमभाई. गावात न मिळणार्‍या वस्तू घेऊन येई, त्याच्या बदल्यात चोख दाम मोजून घेई. कुणाला पैशाचीच नड असेल, तर पुरुषोत्तमभाई त्यांच्याकडचे किडुकमिडुक विकत घेई नि त्या बदल्यात त्या गावकर्‍याला पैसे देई. पुरुषोत्तमभाईची फेरी झाली, की गावात लहान-लहान सुखाची पावले उमटत नि पुरुषोत्तमभाईच्या खिशात पैशाची. एकुण गावाचं सारं काही छान चाललं होतं. गावाच्या या संथ, सुस्थिर जगण्यात खडा टाकला तो अलबत्त्या नि गलबत्त्याच्या भांडणाने. भांडण तरी कसलं... सारं एक रुपयाचं!

तर झालं असं की अलबत्त्या नि गलबत्त्या हे दोघे मित्र. दोघांच्याही घरी थोडी जमीन होती, ती कसणारे बापदादे होते, मदत करायला कुळवाडी होते. या दोघांनी कधीमधी त्यांना मदत केली, तरी बहुतेक वेळा दिवसातून दोनदा भाकरी मुरगाळण्यापुरते घरी येणारे हे दोघे तरूण एरवी पारावर, देवळात वा रानात बसून प्राचीन भारतातील सुवर्णकाळाची उजळणी करत बसत. ‘ऑस्ट्रेलिया म्हणजे अस्त्रालय’, ‘मॉरिशस म्हणजे मारिचस्‌’ वगैरे शोध ते एकमेकाला सांगून प्रबोधन करत. सोन्याचा धूर येणारा देश कसा कचर्‍यात चालला आहे यावर हळहळ व्यक्त करत.

एखाद्या भेटीत ‘फ्रान्स हा अपरान्त म्हणजे कोकणस्थ मंडळींनी तिकडे जाऊन वसवलेला देश आहे’ हे अलबत्त्या अपरान्त → अप्रान्त → प्रान्त → फ्रान्स या व्युत्पत्तीच्या आधारे सांगे. तर त्याचे म्हणणे खोडून काढताना गलबत्त्या प्रान्तचा अपरान्तशी काहीही संबंध नसून ‘हिंदुस्थानचा मुख्य भूभागापासून दूर असलेला प्रान्त’ एवढ्याच अर्थाने प्रान्त हा शब्द वापरला जात होता असे प्रतिपादन करी. असा तपशीलात मतभेद असला तरी ‘प्रान्त’चे फ्रान्स झाले’ यावर मात्र दोघांचे चटकन एकमत होई.

भूतकाळाचे दळण दळण्याचा कधी कंटाळा आलाच तर ते भविष्याकडे वळून ‘देश महासत्ता झाल्याची’ किंवा ‘आपण(!) पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकल्याची’ स्वप्ने रंगवत बसत. क्वचित एखादा तिसरा गडी त्यांना सामील झाला, तर त्यांच्या चर्चेची गाडी वळण घेऊन अमेरिकेच्या अध्यक्षाच्या निवासस्थानामध्ये असलेल्या सुखसोयींपासून ‘प्राचीन काळी द. अमेरिकेने केलेल्या नेत्रदिपक प्रगतीमध्ये भारतीयांचा सिंहाचा वाटा’ वगैरेपर्यंत भरधाव सुटे. तिसर्‍याने त्यात स्वत:ची अशी काही भर घालण्याचा प्रयत्न केला की दोघे एक होऊन त्याचे म्हणणे खोडून काढत.

गप्पांचा भर ओसरला की तिथेच एखाद्या झाडाखाली ताणून देत. या कार्यक्रमात त्यांचा दिवस सुखाने सरत असे. सूर्य क्षितिजापार गेला, की ते रमतगमत घरी परतत आणि दोन भाकरी मुरगाळून उद्याची चिंता न करता गाढ झोपी जात.

असेच एक दिवशी एकदा सूर्य कलला आणि दोघे घरी निघाले. रानाकडून गावाकडे येणार्‍या वाटेला शिवेवरच एक चिंचोळा फाटा फुटला होता. तो सरळ गावकुसाबाहेरच्या वस्तीकडे जात होता. येता येता तिकडे काही कामासाठी निरोप देऊन ये असे बापाने सांगितल्याची अलबत्त्याला आठवण झाली. त्यामुळे फाट्यावर पोहोचताच त्याने गलबत्त्याला ‘तू पुढे हो’ म्हणून सांगितले.

Fighting
AI-Generated Image (Courtesy: Freepik.com)

गलबत्त्या गावच्या वाटेवर चालू लागला. इतक्यात गलबत्त्याच्या पुढे रस्त्यावर काहीतरी चमकलेले अलबत्त्याने पाहिले. ते एक रुपयाचे नाणे असल्याचे त्याच्या ध्यानात आले. ते उचलण्यास तो पुढे होणार इतक्यात तो रुपया नेमका गलबत्त्याच्या पायाखाली आला. काय टोचले म्हणून गलबत्त्याने उचलला. अलबत्त्या म्हणाला ‘मी आधी पाहिला, तेव्हा तो माझा आहे–’ गलबत्या म्हणे, ‘छे: मी आधी उचलला, तो माझा आहे.’

कधी नव्हे ते दोघांचे भांडण पेटले. गलबला ऐकून गावाच्या वाटेवर थोडा पुढे चाललेला पुरुषोत्तमभाई परत मागे आला. दोघांनी आपापले म्हणणे त्याच्या कानी घातले. पुरुषोत्तमभाई हसला नि म्हटला, ‘अरे भाई, झगडा कशाला करता. हा माझा एक रुपया घ्या नि दोघांनी एक-एक रुपया घेऊन भांडण मिटवा’.

असे म्हणताना खिशात हात घालताच त्याला पडलेल्या भोकातून त्याचे एक बोट भस्सदिशी आरपार गेले. तो रुपया आपल्याच खिशातून पडला असल्याचे त्याच्या लक्षात आले. आता ‘तो रुपया माझा आहे’ म्हणावे, तर दोघांत तिसरा सामील होणार नि भांडण वाढणार. निवाडा काहीच होणार नाही. म्हणजे शेवटी रुपयावर पाणी सोडावेच लागणार, हे त्याला ध्यानात आले.

त्याने थोडा विचार केला नि अखेर त्याच्या चेहर्‍यावर हसू फुटले. ‘जाऊ द्या, तुम्ही दोन इतके चांगले मित्र, एका रुपयासाठी का भांडता? तो रुपया मला भांडवल म्हणून द्या. मी महिन्याभरात दुप्पट करून देतो. मग दोघेही एक एक रुपया घ्या.’ पण दोघेही हट्टाला पेटले होते. महिनाभर थांबायची त्यांची तयारी नव्हती.

तणतणत दोघे गावात पोहोचले, ते थेट चावडीवर गेले. गावची चार संभावित नि ज्येष्ठ मंडळी जमली. आधी दोघांची समजूत घालणे सुरू झाले. पण दोघे हट्टाला पेटलेले. मग त्यांच्या घरी निरोप गेला. दोघांच्या घरचे हजर झाले. या दोघांच्या भांडणाचे कारण ऐकून त्यांनीही कपाळाला हात लावला. पण हे दोघे त्यांचेही ऐकेनात. मग नाईलाजाने पंचांसमोर निवाडा करावा असा निर्णय झाला. पंचांनी दोन्ही पक्षांना ‘निवाड्याचा खर्च’ म्हणून प्रत्येकी पाच रुपये जमा करण्यास सांगितले. शिवाय प्रथेनुसार प्रत्येकी एक टॉवेल, टोपी आणि निवाड्याच्या दिवशी कोंबड्याचे जेवण द्यायचे होते. आणि निवाडा होईतो तो रुपया पंचांकडे जमा करून घ्यावा असे ठरले.

अखेर पंचायत बसली. दोघांनी मोठा जोरदार आरडाओरडा केला.

अलबत्त्या म्हणे, “मी आधी पाहिला. तेव्हा तो माझा.”

गलबत्त्या म्हणे, “पण मी तो प्रथम उचलला. ज्याच्या हाती रुपया तो त्याचा.”

गलबत्त्या म्हणे, “आज माझे भविष्य होते,‘अचानक धनलाभ’; तेव्हा रुपया माझ्याचसाठी आला आहे.”

अलबत्त्या म्हणे, “माझे भविष्य होते ‘अनपेक्षित धनलाभ’; तेव्हा तो रुपया देवाने माझ्यासाठीच धाडला आहे.”

तुंबळ वाद-प्रतिवाद झाले. तरी तिढा सुटेना. दोघे थकले. मग इतर लोक उभे राहिले.

अलबत्त्याच्या बाजूने गणपा उभा राहिला. तो म्हणे, “डोळे हे शरीरावर हाताहून वरच्या स्थानावर असतात. तेव्हा पाहण्याला अधिक महत्त्व आहे. ज्याने प्रथम पाहिले, रुपया त्याचा.” चावडीवर उपस्थित असलेल्या काही गावकर्‍यांनी माना डोलावल्या.

राजाभाऊ गलबत्त्याच्या बाजूने उभा राहिला. तो म्हणे, “हॅ: डोळ्यांनी काय आपण हिमालयही पाहू हो, म्हणून तो अलबत्त्याचा होईल काय? अन्न हाताने उचलून तोंडात न घालता नुसते नजरेने पाहिले तर पोट भरेल काय?” काही गावकर्‍यांना त्याचेही म्हणणे पटले.

आता समोर बसलेले सारेच आपापल्या परीने युक्तिवाद करू लागले. चावडीचा आखाडा झाला.

त्या गोंधळातच गावच्या इतर कुणाहीपेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेला धोंडिबा म्हणाला, “आरं पोरानो, जानी दोस्त तुम्ही. यका रुपयापायी कशाला तंडतायसा. दोघंबी अधेली-अधेली वाटून घ्या की.” पण त्याच्याकडे कुणी लक्ष दिले नाही.

अखेर पंचांनी आपण उद्या निर्णय देऊ असे जाहीर करून सभा संपवली. पण निर्णय द्यायचा म्हटले तरी पंचामध्येही मत-मतांतरे होतीच. जे चावडीसमोर झाले तेच त्यांच्या खासगी बैठकीत पुन्हा घडणार असा रंग दिसू लागला. त्यामुळे त्यांनी ‘पुढल्या आईतवारी निर्णय देऊ’ असे सांगून डोक्याचा आजचा ताप एक आठवडा पुढे ढकलून दिला.

त्या दरम्यान पुरुषोत्तमभाई अलबत्त्याच्या कानी लागला. ‘गावोगावीचा अनुभव आहे माझा. पंचांना काहीतरी देऊन आले पाहिजे’, तो म्हणाला. ‘पाच रुपये आणि टॉवेल-टोपी दिली की,’ अलबत्त्या भाबडेपणाने म्हणाला. पुरुषोत्तमभाई लबाड हसला. ‘अरे येड्या तो पंचायत बसल्याचा मेहनताना झाला. निवाडा आपल्या बाजूने व्हायचा तर जास्तीचा पैसा द्यायला हवा.’ अलबत्त्या विचारात पडला. त्या रुपयापायी आधीच दहा-एक रुपयाला चुना बसला होता. त्याच्या म्हातार्‍याने त्याबद्दल फैलावर घेतला होता. आता ‘आणखी पैसे कुठून आणणार?’ असा प्रश्न त्याला पडला.

पण त्यासाठी पुरुषोत्तमभाई होता ना. अलबत्त्याला आवश्यक तो पैसा द्यायला तो एका पायावर तयार होता. जमतील तसे, सावकाशीने, रुपया-दोन रुपये परत करण्याची सवलत द्यायचीही त्याची तयारी होती. फक्त अलबत्त्याला त्यावर माफक व्याज द्यावे लागणार होते. ‘माझ्या धंद्यातला पैसा तुला देणार. मग त्यावरचा माझा नफा बुडणार. तो तू मला द्यायला नको का?’ त्याने आर्जवी स्वरात विचारले. अलबत्त्या तयार झाला. पंचांपैकी कुणाला नि किती पैसे द्यायचे याचा अदमास घेण्याची नि ते पोहोचवण्याची जबाबदारीही पुरुषोत्तमभाईने स्वत:कडे घेतली. अलबत्त्या निश्चिंत झाला.

पुरुषोत्तमभाईने पंचांना एक-एकटे गाठून पटवायला सुरुवात केली. त्यांना पैसे देऊन त्याने निवाडा पुढे ढकलण्याची गळही घातली. त्यानुसार पंचानी निवाड्यासाठी आणखी एक आठवडा वाढवून घेतला. आणि त्याचबरोबर सुरुवातीला अलबत्त्या नि गलबत्त्याला दिलेला प्रस्ताव त्याने त्यांनाही दिला. तो रुपया आपल्या धंद्यात गुंतवावा नि महिन्याभराने दोन रुपये मिळतील. त्यातला एक रुपया अनायासे पंचांना मिळेल अशी लालूच त्याने दाखवली. पंचाना हा ‘हपापाचा माल गपापा’ सल्ला भलताच पसंत पडला नि त्यांनी तो रुपया पुरुषोत्तमभाईच्या स्वाधीन केला.

सारे काही उरकून पुरुषोत्तमभाई अलबत्त्याकडे आला आणि त्याने पैशांचा हिशोब त्याच्या कानी घातला. त्याचवेळी गलबत्त्याने थोडे पैसे देऊन निवाड्याची तारीख पुढे ढकलून घेतल्याचेही कानावर घातले. ‘तो आणखी पैसे जमवण्याच्या खटपटीत असून ते जमले की पंचांना ते देऊन तो निकाल आपल्याकडे फिरवून घेईल’ अशी धोक्याची घंटाही वाजवली. निवाड्याची तारीख येईतो अलबत्त्याच्या अपरोक्ष पुरुषोत्तमभाईने गलबत्त्यालाही गाठले आणि हाच सोपस्कार पार पडला. पण त्याचा म्हातारा ‘पैसे देत नाही’ म्हटल्यावर गलबत्त्याने त्याच्या नकळत घरातले पैसे चोरून पुरुषोत्तमभाईच्या स्वाधीन केले.

असे दोन-तीन वेळा झाल्यावर दोघेही घायकुतीला आले. ‘आता काय तो पाड लाव’ अशी गळ अलबत्त्याने पुरुषोत्तमभाईला घातली. गलबत्त्याने ‘घरचे पैसे चोरणे आता दिवसेंदिवस अवघड झाले आहे. म्हातारा बारीक ध्यान ठेवून असतो.’ अशी तक्रार करायला सुरुवात केली. मग पुरुषोत्तमभाईनेही कौल दिला आणि दहा दिवसांनी पंचांनी निर्णय जाहीर केला.

SplittingTheDollar
(Courtesy: getty images)

या निकालानुसार ‘दोघांनाही प्रत्येकी एक अधेली’ देण्यात येणार होती. पुरुषोत्तमभाईने त्या सापडलेल्या रुपयाच्या बदली दोन अधेल्यांची मोड देऊन त्याबद्दल कमिशन म्हणून दोघांकडून प्रत्येकी पाच पैसे घ्यावेत असे पंचांनी सुचवले होते. ‘मग मी तरी दुसरं काय सांगिटलो होतो. उगा पंचाचं धन केलो आन्‌ चावडीवर सोंगं नाचिवली.’ वैतागाने धोंडिबा पुटपुटला नि काठी उचलून निघून गेला.

‘घे मुडद्या अधेली. रुपया मला दिला असतास, तर स्वत:हून तुला चहा पाजला असता. फुंक आता अर्धी विडी त्या अधेलीची.’ अलबत्त्या संतापाने म्हणाला नि तरातरा निघून गेला. गलबत्त्याही संतापाने पेटला नि पुटपुटत घरच्या वाटेने गेला.

पंचांनी दोनही बाजूंना काही देऊ करणारा सोपा निकाल दिला असला, तरी त्याने उलट दोघेही अधिकच असंतुष्ट झाले. आपला रुपया आपल्याच दोस्ताने घशात घालण्याचा प्रयत्न करावा याने आधीच दुखावलेले ते दोघे आता पंचानीही अन्याय केल्याच्या भावनेने धुमसत होते. यथावकाश पुरुषोत्तमभाई पुन्हा दोघांच्या कानी लागला. नेहमीचा रतीब सोडून आता तो वारंवार गावात येऊ लागला. अशाच एका फेरीदरम्यान इतर सामानासोबत त्याने चपट्या बाटल्याही आणल्या. प्रथम गप्पा मारताना सोबत म्हणून त्याने प्रत्येकासोबत एक-एक बाटली फोडली. तिच्या संगतीने निर्घोर मनाने नि आवेशपूर्ण वृत्तीने मारलेल्या गप्पांमुळे दोघांमधील वीरश्री चैतन्याने सळसळू लागली. दोघांनाही ती हवीहवीशी वाटू लागली. बाटलीतील प्रत्येक घोटासोबत दोघांमधील दरी वाढत चालली, आणि आधीच्या कर्जासोबत बाटल्यांचे कर्जही आता वाढू लागले.

या आवेशपूर्ण चर्चांदरम्यान बव्हंशी ऐकण्यापुरते– आणि चणे खाण्यापुरते – सामील असणार्‍या पुरुषोत्तमभाईने कोर्टात जाऊन न्याय मिळवण्याचे पिल्लू हळूच सोडून दिले. दोघांपैकी एकाच्या गळी जरी हे उतरवता आले तरी त्याचे काम होणार होते. त्याच्या सुदैवाने दोघांनाही ही कल्पना पसंत पडली. वकील गाठून देणे, कोर्टाच्या कार्यवाहीची माहिती देणे, जाण्यायेण्याची सोय करणे वगैरे सारे काही पुरुषोत्तमभाईने अंगावर घेतले. त्याने ही जबाबदारी तालुक्याच्या गावातील दोन परिचित वकीलांवर सोपवून गावाला यांत आपला थेट संबंध दिसू नये याची खातरजमा करुन घेतली. त्याचबरोबर वकीलांना या दोघांकडून मिळणार्‍या पैशांमध्ये रुपयात चार आणे भागीदारीही नक्की करून टाकली. ते वकीलही मुरलेले असल्याने त्यांनी हे दोन बकरे ‘झटका’ पद्धतीने न कापता ‘हलाल’ करावेत असे ठरवून टाकले.

आता कोर्टाच्या कामासाठी लागणारा पैसा उभा करावा लागणार होता. दोघेही अपरिहार्यपणे पुरुषोत्तमभाईला शरण गेले. पण मागच्या कर्जाचा बोजा हलका केल्याखेरीज नव्या कर्जांची खाती उघडण्यास पुरुषोत्तमभाईने असमर्थता व्यक्त केली. ‘मी आपला लहानसा व्यापारी. गावोगाव हिंडून किडुकमिडुक विकतो तेव्हा चार पैसे मिळतात. आधीच माझ्या धंद्याचे अर्ध्याहून अधिक पैसे व्याजाच्या आमिषाने तुम्हाला देऊन बसलोय. त्याने धंद्याची तंगी झाली आहे.’ तो अजिजीने म्हणाला.

परतफेडीसाठी दोघांकडे अर्थातच पैसे नव्हते. त्यांनी हात नि काखा वर केल्यावर भाईने त्यांच्या जमिनींचा विषय हलकेच पुढे सरकवला. अलबत्त्याच्या बापाची जमीन ही वंशपरंपरागत असल्याने त्याने आपली वाटणी मागावी असे त्याने सुचवले. मग त्याला आपल्या वाट्याची जमीन विकून वा तारण ठेवून त्याला हवे तितके कर्ज उभारता येईल, आपले पैसे देऊन उरलेल्या पैशांत बसल्या जागी करण्याजोगा काही व्यवसाय करता येईल असे त्याने सुचवले. शेतातील कष्ट आपल्याच्याने व्हायचे नाहीत हे ठाऊक असलेल्या अलबत्त्याला हा उपाय एकदम पसंत पडला.

अलबत्त्याने घरी पोहोचताच म्हातार्‍याकडे आपली मागणी नोंदवली. म्हातारा हबकलाच. जमिनीचे तुकडे करणे याचा अर्थ दोघांकडेही तुटवडा निर्माण होणे आणि अखेरीस जमिनी पुरुषोत्तमभाई वा अन्य कुणाच्या घशात जाणे आहे हे अनुभवाने ठाऊक होते. त्याने आणि कोंडिबाने अलबत्त्याला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण अलबत्त्या ऐकेना. ‘माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे हा. गलबत्त्याचे नाक खाली केल्याखेरीज मी स्वस्थ बसणार नाही.’ अशी गर्जना करत निर्वाणीचा उपाय म्हणून त्याने वाटणीसाठी कोर्टात जाण्याची धमकी दिली.

आता म्हातारा खचला. एकतर कोर्टाचे काम म्हणजे पैसे नि वेळ यांचा सत्यानाश हे त्याला ठाऊक. त्यातच हट्टाला पेटलेलं आपलं हे पोरगं घरच्या नि गलबत्त्यावरच्या अशा दोन खटल्यांमध्ये भिकेला लागणार हे त्याला स्वच्छ दिसत होते. अखेर सुज्ञपणे म्हातार्‍याने वाटणी करण्यास रुकार दिला. अलबत्त्याच्या त्याच्या वाटणीची जमीन त्याला देऊन टाकली नि आपल्या वाट्याची वाचवली.

पण इकडे गलबत्त्याच्या म्हातार्‍याने पैसे वा जमीन देण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर त्याच्या त्राग्याला न जुमानता त्याला सरळ घराबाहेर काढले. एव्हाना पुरुषोत्तमभाईने गावातच एक घर घेतले होते. खाली दुकान नि वर राहण्याची जागा अशी तजवीज त्याने केली होती. गावच्या मंडळींना किडुकमिडुक विकणे वा विकत घेणे सोडून त्याने गावच्या मंडळींच्या धान्याचा अडता म्हणून जम बसवला होता. त्याने गलबत्त्याला सरळ दुकानातील अंगमेहनतीच्या कामाला जुंपला, नि बदल्यात दोनही वेळचे जेवण नि दुकानाच्या बाहेरील फळीवर झोपण्याची परवानगी दिली. कुणब्याचा गलबत्त्या आता पुरुषोत्तमभाईचा गडी आणि राखणदार म्हणून राहू लागला.

दरम्यान कोर्टात पहिली तारीख पडली...
.
.
.
... आणि तारखांमागून तारखा पडू लागल्या.

अलबत्त्याच्या वाटची जमीन आता पुरुषोत्तमभाईकडे आली होती. त्यावर त्याची कुळे कसत होती, त्यांच्या कष्टाचे फळ गोण्यांमध्ये भरून दुकानामागे असलेल्या कोठीच्या खोलीमध्ये जमा होऊ लागले. गलबत्त्या डोळ्यांत तेल घालून त्यांवर लक्ष ठेवू लागला आणि दारी ट्रक उभा राहिला की त्या गोण्या त्यांतून चढवू लागला. अलबत्त्या-गलबत्त्यांप्रमाणेच गावचे इतर लोकही अडी-अडचणीला पुरुषोत्तमभाईकडे हात पसरू लागले. पहिला रुपया त्याने गमावला असला तरी गावातील सार्‍यांचेच रुपये आता बिनबोभाटपणे त्याच्याकडे येऊ लागले. पुरुषोत्तमभाई आता पुरुषोत्तमसेठ म्हणून ओळखला जाऊ लागला.

Purushottamseth
(Courtesy: shuttercock images)

पुरुषोत्तमभाईच्या खिशातून जिथे तो रुपया पडला, त्या जागी त्याने मारुतीचे एक देऊळ बांधले होते. लोक त्याला गंमतीने ‘रुपया-मारुती’ म्हणू लागले. यासोबतच ‘बाटलीपे चर्चा’ करत असताना पुरुषोत्तमसेठने रुपया-मारुती नवसाला पावत असल्याचे विविध किस्से बाटली-भक्त झालेल्या गावकर्‍यांच्या मनात सोडून दिले. ‘त्या शिवेवरून जात असताना आपल्याला मारुतरायाचा दृष्टांत कसा झाला, त्यातून मारुतरायाने सांगितल्याप्रमाणे आपण वागत गेल्याने आपला उत्कर्ष कसा होत गेला’ याचा किस्सा त्याने प्रथम रंगवून रंगवून सांगितला. पुरुषोत्तमसेठची भरभराट लोक पाहात आलेच होते. कधी काळी किडुकमिडुक विकणारा आज दुमजली घराचा नि बर्‍याच मोठ्या जमिनीचा मालक झालेला त्यांनी पाहिला होता. ‘हे कुण्या देवाच्या कृपाप्रसादाखेरीज शक्य नाही’ असे त्यांनाही वाटत होतेच. त्यामुळे ‘ही रुपया-मारुतीची कृपा’ या दाव्यावर त्यांचा चटकन विश्वास बसला.

मग मारुतरायाची कृपादृष्टी आपल्याकडेही वळावी नि त्याने आपल्याही आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून ते त्याला साकडे घालू लागले. त्याला साकडे घातले की – बहुतेक वेळा – रुपयाला दहा पैसे व्याजाने पुरुषोत्तमसेठ कर्ज देऊन त्या गावकर्‍याची अडचण दूर करी. त्याबदल्यात त्या गावकर्‍याचे भविष्यातील रुपये पुरुषोत्तमसेठच्या तिजोरीची वाट चालू लागत. त्यामुळे रुपया-मारुतीनेच आपल्या अडचणीचे निवारण केल्याची भावना गावकर्‍यांच्या मनात रुजून जाई. त्यातून ‘नवसाला पावणारा’ अशी त्या मारुतीची ख्याती पंचक्रोशीत पसरू लागली.

अलबत्त्या, गलबत्त्या आणि गावच्या लोकांच्या रुपयाची वाट आपल्या खिशापर्यंत आणून पोहोचवल्यानंतर गावाबाहेरील इतर लोकांच्या खिशातील पैसा पुरुषोत्तमसेठला खुणावू लागला होता. त्याच हेतूने त्याने देवस्थानभोवती नवसाला पावत असल्याच्या किश्शांची तटबंदी बांधली होती. त्यातून ‘रुपया-मारूती’ची ख्याती पंचक्रोशीतील गावांत पसरू लागली होती. तेथील लोकही त्याच्या कृपाप्रसादाच्या आशेने गावाची वाट तुडवू लागले होते. त्यांची सेवा करता यावी म्हणून देवस्थानच्या आसपासची बरीचशी जमीन पुरुषोत्तमसेठने ताब्यात घेतली होती. तिथे गाळे बांधून त्याने पूजेचे साहित्य, रेवडी-बत्तासे, शेव-चिवडा, चहा-भजी आदी विक्रीसाठी भाड्याने देऊन टाकले. रुपया-मारुतीच्या कृपेने हे उत्पन्न विनासायास त्याच्या तिजोरीमध्ये जमा होऊ लागले. पाहता पाहता देवळाचा विस्तार होऊन देवस्थान उभे राहिले.

रुपया-मारुतीच्या कृपेने भरभराट झालेला पुरुषोत्तमसेठ हा पंचक्रोशीतील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला. तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील वजनदार राजकीय नेत्यांमध्ये त्याची उठबस सुरू झाले. त्यांतील काही अधूनमधून त्याच्या बंगल्यावर पायधूळ झाडू लागले. आलेला प्रत्येक पाहुणा आवर्जून देवस्थानला भेट देई. तिथे मारुतरायासमोर नतमस्तक झालेल्या नेत्याचे अनेक फोटो त्यांचे चेले काढून घेत. त्यांचा उपयोग पुढे नेत्याला आपली इमेज उजळण्यासाठी, तर पुरुषोत्तमसेठला देवस्थानची इमेज उजळण्यासाठी होत असे. या सार्‍या राजकीय लागेबांध्यांच्या आधारे येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत पुरुषोत्तमसेठ सरपंचपद हस्तगत करण्याच्या खटपटीत असल्याची वदंता होती. तसे झाले तर तो गावाचे कसे भले करू शकेल याच्या अनेक शक्यतांची उजळणी अलबत्त्या, गलबत्त्या आणि बाटली-भक्त करू लागले होते. गावाचे मुघलकालीन नाव बदलून ‘रुपयाची वाडी’ ठेवावे अशी मागणी पुढे येऊ लागली होती.

असेच आणखी काही महिने गेले...

एके दिवशी सरकारने ‘आता किमान चलन पाच रुपयाचे असेल’ असे जाहीर करून त्याहून कमी दर्शनी किंमतीची सर्व नाणी चलनातून काढून घेण्याची घोषणा केली. ‘आता आपल्या रुपयाचे काय?’ या प्रश्नाचे भूत अलबत्त्या नि गलबत्त्याच्या मेंदूत एकाच वेळी थैमान घालू लागले.

- oOo -

टीप: कथेची नाळ ‘दोघांचे भांडण, तिसर्‍याचा लाभ’ सांगणार्‍या पंचतंत्रातील तात्पर्यकथेशी जुळते हे बहुतेक वाचकांच्या ध्यानात आले असेलच. (कथेचे शीर्षकही त्या कथेवरुन लिहिल्या गेलेल्या ‘दोन बोक्यांनी आणला हो आणला, चोरून लोण्याचा गोळा’ या बडबडगीतावरुनच घेतले आहे.) या खेरीज निकोलाय गोगोल या रशियन लेखकाच्या ‘The Tale of How Ivan Ivanovich Quarreled with Ivan Nikiforovich’ या कथेशीही ती नाते सांगते. (जिच्यावरून ‘एनएफडीसी’ने ‘कथा दोन गणपतरावांची’ हा मराठी चित्रपट निर्माण केला होता.) परंतु तिचा प्रवास ‘एक लहानशी, नगण्य घटना एका व्यापक बदलास गती देऊ शकते’ हे सांगणार्‍या ‘बटरफ्लाय इफेक्ट’च्या वाटेवरून होतो. कथानकाला अर्वाचीन सामाजिक नि राजकीय घटनांचे संदर्भ आहेत हे सहज दिसून यावे.

---

(ही कथा ‘पुरुष उवाच - २०२४’ दिवाळी अंकामध्ये प्रथम प्रसिद्ध झालेली आहे.)


हे वाचले का?

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४

I. P. L. (इंडियन पोलिटिकल लीग)

काही वर्षांपूर्वी कुणीतरी (बहुधा अण्णा हजारे, खात्री नाही) म्हणाले होते, ‘आपल्या लोकशाहीमध्ये पक्षीय लोकशाहीला स्थान नाही. सर्व उमेदवारांनी स्वबळावर लढावे. नंतर विजयी उमेदवारांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे.’ सध्या ‘जिकडे उमेदवारी तिकडे हरी हरी’ या उक्तीनुसार आपले बहुतेक राजकारणी वागताना दिसत आहेत. हे पाहता अशा पक्षातीत निवडणुकांची वेळ जवळ आलेली आहे असे वाटू लागले आहे.

मग ‘उगाच अंदाजपंचे दाहोदरसे होण्यापेक्षा सारं काही नीट वैधानिक पातळीवरच का करु नये?’ असा विचार मी करत होतो. ‘आणि म्हणोन’, ‘या ठिकाणी’, ‘प्रभू श्रीरामांच्या कृपेने’ हा एक प्रस्ताव देतो आहे. पटतो का पाहा. नाही तर दुरुस्त्या सुचवा.

सर्वप्रथम निवडणूक आयोग ही वैधानिक संस्थाच विसर्जित करुन टाकावी. तिच्या जागी नवी व्यवस्था असावी. आणि हा बदल नियोजन आयोगाकडून नीती आयोगाकडे— म्हणजे काटेकोरपणाकडून भोंगळपणाकडे इतपतच मर्यादित नसावा. आयपीएल मॅनेजिंग कौन्सिलच्या धर्तीवर तिचे काम चालावे.

The_Menu
timescontent.timesgroup.com येथून साभार.

या कार्यकारी मंडळाकडे प्रामुख्याने दोन कामे असतील. पहिले म्हणजे आज ज्या प्रकारे निवडणुकांचा कार्यक्रम कार्यवाहीत आणला जातो, त्याच धर्तीवर निवडणुका घेणे. यासाठी आवश्यक वाटल्यास सध्याच्या आयोगाच्या धर्तीवर एक उपसंस्था निर्माण केली जावी.

राष्ट्रीय, स्थानिक, स्वघोषित अशा सर्व प्रकारच्या पक्षांवर संपूर्ण बंदी घालण्यात यावी. सार्‍यांनी स्वबळावर (अपक्ष) लढावे. मग त्यातून निवडून आलेल्या प्रतिनिधींचा आयपीएलच्या धर्तीवर लिलाव करावा. हे कार्यकारी मंडळाचे दुसरे काम असावे.

‘निवडणुका या नियमित होणार्‍या स्पर्धा आहेत’ या दृष्टीने त्यांच्याकडे पाहून त्यांचे काटेकोर नियोजन केले जावे. लोकसभेच्या निवडणुका या राष्ट्रीय स्पर्धा असून आयपीएलच्या धर्तीवर यात ‘संघ’ (म्हणजे मराठीमध्ये टीम्स) - पक्ष नव्हे! - असावेत. हे या संघांची मालकी विविध ‘फ्रँचायजीं’कडे असावी. उदा. अदानींची एक, अंबानींची दुसरी, लॉरेन्स बिश्नोईची तिसरी, बाबा रामदेवांची चौथी, बाबा राम रहिमची पाचवी, तिरुपती बालाजी ट्रस्टची सहावी... वगैरे.

आयपीएल फ्रँचायजी जसे खेळाडू प्रशिक्षित करण्याच्या भानगडीत न पडता, आधीच गुणवत्ता सिद्ध झालेले खेळाडू सरळ विकत घेते, तसेच हे राजकीय संघ उमेदवारी, प्रचार वगैरे भानगडीत न पडता थेट निवडून आलेल्या प्रतिनिधींना लिलावात विकत घेतील... साधारण २०१४ पासून भाजप करतो आहे तसे.

अदानींना त्यांच्या परदेशात रेजिस्टर्ड असलेल्या फॅमिली ट्रस्टतर्फे ही फ्रँचायजी घेता यावी म्हणून त्यात परकीय गुंतवणुकीला परवानगी द्यावी. त्याचा फायदा घेऊन दाऊद इब्राहिम गुपचूप एक पक्ष खरेदी करेल. मग तो नक्की कुठला यावर फडणवीस, राज ठाकरे, संजय राऊत यांचे तुंबळ भांडण होईल. तिघेही एकमेकांकडे बोटे दाखवतील. (हे पाहून) शरद पवार गालातल्या गालात हसतील.

पक्ष ही संकल्पना मोदीत– आय मिन मोडीत निघाल्याने पक्षांतर-बंदी कायदाही रद्दबातल होतो. यातून प्रत्येक लोकप्रतिनिधी हा रसायनशास्त्रातील एखाद्या ‘फ्री रॅडिकल’सारखा राहून स्वार्थानुसार— अर्रर्र, जनतेच्या हिताला अनुसरून, वारंवार संघ बदलू लागला तर सत्तेचा लंबक सतत हलता राहील. हे टाळण्यासाठी लोकप्रतिनिधीला विकत घेताना संघ-व्यवस्थापक फ्रँचायजी त्यांना एक करार देऊ करेल. यात प्रतिनिधींची कामे, मानधन, बाहेर पडण्याच्या अटी इत्यादि बाबी कायदेशीरपणे नोंदल्या जाव्यात. सध्या लोकप्रतिनिधी अनेक उद्योगपतींशी जे अनौपचारिक, पडद्यामागचे करार करतात, त्यातील बरीचशी कलमे यात समाविष्ट करता येतील.

निवडणूक आयोगाची जागा घेतलेल्या, स्टॉक एक्स्चेंज अथवा सेबीच्या धर्तीवर काम करणार्‍या कार्यकारी मंडळावर फ्रँचायजींचे प्रतिनिधी असावेत. त्यांतूनच एक - शक्य तो लिलावानेच - अध्यक्ष निवडावा. अध्यक्षाला सरन्यायाधीशांच्या समकक्ष स्थान नि अधिकार असावेत. या सरनिवडणूक अधिकार्‍याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागता येऊ नये म्हणून हे ‘बूच’ मारून ठेवावे.

लोकसभा नि विधानसभा निवडणुकांनंतर पंतप्रधानपदासह अन्य मंत्रिपदांसाठीही लिलाव होतील. हे लिलाव व्यक्तिगत पातळीवर होतील.

LeaderUnderHammer
ThePrint.com वरून साभार.

या नंतर लोकप्रतिनिधी आणि मंत्रि-प्रतिनिधी यांचे लिलाव होतील. मंत्रि-प्रतिनिधींना कॅप्ड खेळाडूंप्रमाणे, तर इतर प्रतिनिधींना अनकॅप्ड खेळाडूंप्रमाणे वेगवेगळे निवडले जाईल. एका फ्रॅंचायजी-संघाला जास्तीत-जास्त चार ते सहा मंत्रि-प्रतिनिधी खरेदी करण्याची मुभा असेल. यातून मंत्रिपरिषदेवर एकाच फ्रँचायजीचे आणि पर्यायाने उद्योगपती-चमूचे वर्चस्व राहणार नाही याची खातरजमा करुन घेता येईल.

अगदी नव्वदी उलटलेल्यांसह सर्वांनाच प्रत्यक्ष खेळात भाग घेण्याची इच्छा असल्याने निवृत्त खेळाडू ही जमातच अस्तित्वात इथे आस्तित्वात नसेल. परंतु पूर्वी लोकप्रतिनिधी असलेले पण आता पराभूत झाल्याने लिलावात संधी न मिळालेले पर्याय म्हणून उपलब्ध असतील. यातील ज्येष्ठांना कोच म्हणून मागल्या दाराने आत येण्याची संधी उपलब्ध असेल. याखेरीज प्रशासनातील अनुभवी बाबू लोकांनाही हीच संधी उपलब्ध करुन देण्यात येईल. यातून फ्रँचायजी, त्यांचे मालक यांचे प्रशासनाशी चांगले संबंध निर्माण होतील. याचा देशउभारणीसाठीही उपयोग होईल.

दरम्यान राजू शेट्टी ‘शेतकरी उमेदवाराला वाजवी भाव मिळालाच पाहिजे’ म्हणून आंदोलन करतील. त्याच धर्तीवर जरांगे, हाके, जानकर आदी मंडळी आपापल्या मागण्यांच्या आवृत्त्या सादर करतील.

वैदर्भीय मंडळी ‘पुण्या-मुंबईच्या प्रतिनिधींना नेहमीच लायकीपेक्षा जास्त भाव मिळतो.’ म्हणून कुरकुर करतील. दरम्यान मराठवाड्यातील बरेच प्रतिनिधी अनसोल्ड राहून नंतर बेस प्राईजला उचलले जातील.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आधीच पक्ष-निरपेक्ष, अर्ध-अध्यक्षीय (नगराध्यक्ष, सरपंच यांची थेट निवड) पद्धत असल्याने तिथे तीच चालू राहील.

आयपीएल, एमपीएल नि पीपीएल (राष्ट्रीय, राज्य, शहर) या तीन पातळीवरील लीग्जप्रमाणेच प्रत्येक पातळीवर वेगवेगळ्या फ्रॅंचायजीज असतील.

सर्व मंत्री स्वतंत्रपणे निवडून येत असल्याने प्रत्येकावर स्वतंत्रपणे अविश्वास ठराव आणता येईल. त्या मंत्र्याला विकत घेतलेल्या फ्रॅंचायजीला/संघाला त्यावर व्हिटो म्हणजे नकाराधिकार वापरता येईल. थोडक्यात आपल्या अधिकारात ते त्याचे मंत्रिपद वाचवू शकतात.

अविश्वास ठराव पास झाल्यानंतर नव्याने होणार्‍या मंत्रिपदाच्या लिलावामध्ये निवडला गेलेला नवा मंत्री त्याच फ्रँचायजीचा नसेल, तर नव्या मंत्र्याच्या फ्रॅंचायजीने उर्वरित कार्यकालासाठी जुन्या मंत्र्याच्या फ्रँचायजीना प्रो-रेटा बेसिसवर नुकसानभरपाई देणे बंधनकारक असेल.

याशिवाय आपल्याला नको असलेला मंत्रि-प्रतिनिधी, लोक-प्रतिनिधी रिलीज करुन अन्य फ्रॅंचायजीना ‘विकण्याची’ मुभाही फ्रँचायजी-संघांना असेल.

पुढील निवडणुकीपूर्वी यातील काही जणांना रीटेन करण्याची मुभा फ्रॅंचायजींना दिली जाईल. रीटेन केलेला प्रतिनिधी पुढील निवडणुकीत पराभूत झाला, तर त्याला सहा महिन्यांत निवडून येणे आवश्यक आहे. अन्यथा फ्रँचायजींबरोबरचा त्याचा करार आपोआप संपुष्टात येईल.

Chanda_aur_Dhanda
Satish Acharya यांचे भाष्यचित्र.

‘दर लिलावात सर्व खासदार/आमदारांना रिलीज करायलाच हवे. तीन टर्म्स झाल्या आहेत. आता भाजपला मोदींना रीटेन करू देऊ नये.’ अशी तक्रार घेऊन आलेल्या नाना पटोलेंना ‘हिंमत असेल तर अशीच तक्रार राहुल गांधींबद्दल करुन दाखवा.’ असे उत्तर कार्यकारी मंडळाकडून दिले जाईल.

या व्यवस्थेमध्ये बंडखोर ही संकल्पनाच नाहीशी झाल्याने कुणी कुणाला ‘गद्दार’ म्हणणार नाही. ‘पाठीत खंजीर खुपसला’ म्हणणार नाही. निष्ठा नावाची बाबच नाहीशी झाल्यावर या दोन्हींचा प्रश्नच उद्भवत नाही.

मुख्य म्हणजे सर्वांनाच खोके मिळू लागल्याने ‘पन्नास– किंवा कितीही– खोके, एकदम ओके’ ही घोषणा रद्दबातल होईल. एकनाथ शिंदेंच्या चेहर्‍यावर चंद्रकांत पाटलांइतके रुंद हसू दिसू लागेल.

-oOo-


हे वाचले का?

शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

स्वबळ की दुर्बळ

‘लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा अधिक’ तर होताच, पण ‘एकुण कामगिरीही तोडीस तोड होती’. त्यामुळे ‘विधानसभेच्या जागा वाटपामध्ये शिंदे वरचढ असतील’... आहेत... ‘शहांचा सल्ला त्यांनी धुडकावला’... वगैरे आम्ही वाचत आहोत...

दरम्यान लोकसत्तामधील आजचा लेख असे सांगतो की, भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे, कमळ चिन्हावर लढणारे १५२, अधिक शिंदेसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन पक्षांत निर्यात करुन एकुण १७ असे एकुण १६९ उमेदवार उभे केले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकुण १६४ जागा लढवल्या होत्या असे स्मरते.

MVA_Press

काँग्रेसच्या पीछेहाटीच्या अनेक कारणांमध्ये एक कारण इतर पक्षांसोबत केलेल्या आघाड्या नि घेतलेली दुय्यम भूमिका आहे हे माझे ठाम मत आहे. ते यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित करतो. दारूण पराभव झाला तरी चालेल, पण पुर्‍या शक्तिनिशी लढावे हाच बहुधा पक्षाच्या हिताचा मार्ग असतो.

हे पुरेपूर ओळखून, भाजप (त्यांच्याबाबतीत तर दारूण पराभवाची शक्यता नगण्य आहे.) “लोकसभेचा पराभव ‘कालचा होता’, आजही आम्हीच शिरजोर आहोत” हे ठणकावून सांगते आहे. उलट मविआमध्ये मोठा भाऊ असून एक हरियानाचा पराभव पाहून काँग्रेसने शेपूट घातले नि दहा ते पंधरा आमदार असलेल्या पक्षांना बरोबरीचे स्थान दिले आहे.

मागील वेळच्या निकालानुसार जागावाटप झाले असल्याने, दोन सेना नि दोन राष्ट्रवादी बहुतेक ठिकाणी परस्परांविरोधात लढत आहेत. यातून दोघांचाही शक्तिपात (मागील एकत्रित पक्षांच्या कामगिरीच्या तुलनेत) नक्की आहे. या धोक्यापासून भाजपने स्वत:ला सुरक्षित करुन घेताना बहुसंख्य जागा स्वत:कडेच घेतल्या आहेत. उलट काँग्रेसने शेपूट घालून मविआच्या पराभवाची मुहूर्तमेढ रोवून ठेवली आहे.

आणखी काही उदाहरणे हवी असतील, तर आप, मनसे, वंचित यांचीच घेता येतील. आपने स्वबळावर लढलेले गोवा, गुजरात नि हरयानामध्ये अंगाशी आले असले, तरी तेथील भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसची आणखी पीछेहाट करुन ठेवली आहे. भविष्यात तिची जागा बळकावण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. दिल्ली नि पंजाबमध्ये त्यांची ही स्ट्रॅटेजी चांगलीच यशस्वी ठरली (अर्थात याला स्थानिक गणिते नि त्या त्या वेळची परिस्थिती धरून इतर कारणेही असतात. रिस्क तिथूनच येते.)

मनसेने पहिल्या विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारून १३ आमदार निवडून आणले. तेव्हा त्यांचा स्वत:चा असा प्लॅटफॉर्म ब्लू-प्रिंटच्या रूपात उभा केला होता, मराठी अस्मितेची नेमकी भूमिकाही होती. परंतु पुढे मोदी उदयानंतर मोदींसाठी निवडणुका न लढवण्याचा निर्णय आत्मघाती ठरला नि बाकी सारे गुंडाळून ‘उद्धवसेनाविरोध’ हा एक-कलमी कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केल्याने (आणि तो फडणवीस नि नंतर एकनाथ शिंदे अधिक प्रभावीपणे राबवू शकत असल्याने) स्वत:चे असे स्थान शिल्लक ठेवले नाही.

Raj_Fadanvis

उशीरा का होईना उपरती होऊन यांनी पुन्हा स्वबळाचा नारा दिल्याने बदल घडू शकेल का असा प्रश्न उभा राहतो. एक गोष्ट अनुकूल आहे आणि ती म्हणजे सहा पक्षांच्या काटाकाटीच्या खेळात काही ठिकाणी तिसर्‍याच कुणाला लॉटरी लागू शकते (आठवा– चार पक्षांच्या साठमारीत १२५ मतांनी निवडून आलेला अरुण गवळी), यात मनसे असू शकत होती. परंतु दोन दिवसांपूर्वीच ‘मनसेच्या पाठिंब्याने भाजपचे सरकार’ अशी घोषणा करुन राज ठाकरेंनी तिसरा पर्याय ही भूमिका स्वत:च मोडीत काढली आहे...

...आणि त्याचवेळी शिंदेसेनेविरोधात मतदान करु इच्छिणार्‍या भाजपच्या मतदारांना डोळाही मारला आहे! याचा परिणाम म्हणून भाजपच्या मतदारांनी शिंदेसेनेऐवजी मनसेचा आमदार दिला तर भाजपची ‘चित भी मेरी, पट भी मेरी’ अशी स्थिती होणार आहे.

किंबहुना शिंदेसेनेच खच्चीकरण होऊन काही आमदार मनसेकडून आले, तर त्यांना फायदेशीरच आहे. सत्ता न गमावता शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी करता येईल. मनसेने भाजपकडे दहा जागांवर पाठिंब्याची मागणी केली आहे. माहीमसह या दहाही जागांवर शिंदेसेनेचे उमेदवार आहेत. ही शक्यता ओळखूनच कदाचित, शिंदेसेनेने माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधातील आपला उमेदवार मागे घेण्यास नकार दिलेला आहे. थोडक्यात भाजप आपल्या सहकारी पक्षांतच कलागत लावून दोघांची शक्ती वाढणार नाही याची खातरजमा करुन घेत आहे.

वंचितची कथाही मनसेप्रमाणेच आहे. त्यांनी पहिली निवडणूक स्वबळावर लढवली तेव्हा भरपूर मते मिळवली. त्यातून त्यांची ताकद सिद्ध केली. परंतु तिची किंमत वसूल करताना अवाच्या सवा मागण्या करुन हातची संधी गमावली. आणि नंतर युती वा आघाडी यांच्याबाबत उलटसुलट भूमिका घेत विश्वासार्हता गमावली. आता नवजात अशा लहान-सहान पक्षांची गोधडी शिवून त्यात ताकद मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे.

या खेरीज अनेक स्थानिक पक्षांबाबतही पाहिले तर स्वबळावर लढणे ही ‘हाय रिस्क, हाय रिटर्न’ स्ट्रॅटेजी आहे. तृणमूल, बीजेडी, टीआरएस, बसपा, वायएसआर काँग्रेस वगैरे पक्षांनी ही यशस्वीपणे राबवून दाखवलेली आहे. विशेष म्हणजे यातील बहुतेकांनी काँग्रेसचीच राजकीय भूमी ताब्यात घेतलेली आहे.

भाजपचे चाणक्य हे पुरेपूर जाणून आहेत. त्यामुळे एकवेळ पराभव स्वीकारतील (तो ही काही महिन्यात विजयात रूपांतरित करता येईलच) पण लवचिकपणा दाखवून आपली भूमी शिंदेसेनेच्या ओटीत घालण्याचा काँग्रेसी गाढवपणा ते कधीच करणार नाहीत.

-oOo-


हे वाचले का?

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

दोन हजारची नोट आणि चाकावरची अ‍ॅन्टेना

काही वर्षांपूर्वी एका महान नेत्याच्या सरकारने दोन हजार रुपयाच्या नोटेमध्ये गुपचूप जीपीएस चिप बसवल्याची कुजबूज ऐकायला मिळाली होती. या चिपवरून ती नोट कुठे आहे हे बिनचूकपणे सांगता येते असे एका चॅनेलकाकूंनी आम्हाला डेमोसह समजावून सांगितले होते.

बहुतेक काळा पैसा साठवणारे नेहमी मोठ्या दर्शनी किंमतीच्या नोटांमध्ये तो साठवत असल्याचे एका चाणाक्ष (हा शब्द `चाणक्य'वरुन आला असावा का?) नि धूर्त नेत्याने ओळखले होते. म्हणून या सर्वात मोठ्या दर्शनी किंमतीच्या नोटेची लालूच दाखवण्यात आली होती नि त्यात जीपीएस चिप दडवली होती

एक दोन मूर्ख चॅनेल पत्रकारांनी हे गुपित फोडल्याने पंचाईत झाली होती. परंतु नंतर शासनाने सफाईने (हिंदीमध्ये ‘आनन फाननमें’ किंवा इंग्रजीत swiftly) सक्रीय होत त्याबद्दल अधिक माहिती जाहीर होऊ नये याची काळजी घेतली.

त्यामुळे त्या चिपसोबतच `चिप-पोर्टेशन'चे तंत्र काम करत असल्याची माहिती कुणाला समजली नाही. आज दहा वर्षांनंतर ते तंत्र कार्यरत झाले असल्याची बातमी आतल्या गोटातून मिळाली आहे.

या तंत्राच्या साहाय्याने ती नोट जिथे आहे तिथून पोर्ट करुन (तुम्ही ‘स्टार ट्रेक’ नामक मालिका पाहिली असेल. त्यात ‘व्हूउउउउउश:.... इथून गायब, तिकडे हजर’ प्रकाराने माणूस यानातून ग्रहावर किंवा ग्रहावरून यानामध्ये जात असे. त्यातील माणसांच्या जागी नोट कल्पून पाहा.) थेट रिजर्व्ह बँकेच्या सिक्रेट लॉकरमध्ये पाठवली जाते आहे. (काही दुष्ट लोक कुण्या अदानीच्या तिजोरीत जाते असे म्हणतात, पण तो अपप्रचार आहे.) सार्‍या काळ्या पैशाला असे गुप्तपणे थेट सरकारजमा केले जात आहे. त्यामुळे व्यवहारातून या नोटा गायब झाल्या आहेत.

आपल्या तिजोरीतून वा तांदुळाच्या डब्यातून या नोटा गायब होत असल्याने काळा-पैसा धारकांमध्ये घबराट पसरली आहे. काहींना हा भानामतीचा प्रकार वाटला. पण मग एका गुजराती वृत्तपत्राने खुलासा प्रसिद्ध केल्यावर काय घडते आहे ते सार्‍यांना समजले.

पण त्यांना बदलून घेण्यास फार उशीर झाला आहे. आता मोबाईल-पेमेंट क्रांतीनंतर (हा आणखी एक मास्टरस्ट्रोक) बाजारातही मोठी नोट कुणी हाती घेत नसल्याने खपवणेही मुश्किल झाले आहे. आणि आपसांत रोखीची देवाणघेवाण करणारे काळा पैसावाले आपल्या या– म्हणजे काळापैसाधारक – जातभाईकडूनही स्वीकारेनासे झाले आहेत. बरं हा सारा पैसा काळा असल्याने त्याबद्दल जाहीर बोलणे शक्य नसल्याने त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो आहे.

देशातील सारा काळा पैसा अशा रीतीने बिनबोभाट देशाच्या (किंवा कुण्या अदानीच्या) तिजोरीत आणण्याचा हा मास्टरस्ट्रोक कमालीचा यशस्वी झाला आहे. आपल्या देशातील अनेकांना नेहमीप्रमाणे पोटदुखी झाल्याने याचे म्हणावे तेवढे श्रेय सरकारला दिले जात नाही. परंतु परदेशांत मात्र या भारतीय तंत्राबाबत भरपूर कुतूहल निर्माण झाले आहे. काही देशांत याचा उपयोग इतर गोष्टींसाठी केला जाऊ लागला आहे.

आता हेच पाहा ना. नासाने आता याच चिपचा वापर करुन टायर्स बनवायला सुरुवात केली आहे. सर्व टायर्स आता या चिप्ससह उत्पादित होतात. याचा फायदा असा की गाडी नो-पार्किंगमध्ये लावली तर तिला उचलून न्यायला Tow-truck पाठवायची गरज पडत नाही. फक्त एक बटन दाबून व्हूउउउश: करुन ‘इम्पाउंड लॉट’मध्ये आणून टाकता येते.

यातून तिथले पार्किंगचे नियम मोडणार्‍यांनी यावर तोडगा शोधला आहे, तो सोबतच्या चित्रात दाखवला आहे.

भारतीय काळा पैसावाले असाच काहीसा उपाय शोधून आपला पैसा वाचवतील का? असा प्रश्न ‘बोल मर्दा’ या आंतरराष्ट्रीय मराठी पोर्टलचे बातमीदार कम टाईपसेटर चिंटू चोरडिया यांनी विचारला आहे

- oOo -


हे वाचले का?

गुरुवार, ६ जून, २०२४

आपले राष्ट्रीय खेळ

आयपीएल आणि निवडणुका हे आपले राष्ट्रीय खेळ आहेत... !

दोन्हीं प्रकारामध्ये नवा सीझन आला की ‘मोसम’ पाहून खेळाडू संघ बदलतात किंवा नवे मालकच त्यांना विकत घेतात.

मालकांना आवडला नाही तर ते सीझन चालू असताना मध्येच कॅप्टन बदलतात.

दोन्हींमध्ये गोलंदाज एकामागून एक चेंडू फेकत राहतात, फलंदाज ते मारत राहातात आणि ‘कमेंट्री बॉक्स’पासून (यात ‘X’-बॉक्सपण आला!) समाजमाध्यमांवरचे काही हजार, काही लाख लोक तो पकडायला धावाधाव करत असतात.

प्रत्येक सामन्यातील एक डाव दिवसा नि एक रात्री खेळला जातो... क्वचित पहाटेसुद्धा!

प्रत्येक सामन्यापूर्वी ‘प्रतिस्पर्धी कोण आहे’ याबरोबरच मैदानावरील ‘खेळपट्टी’ आणि ‘बाजूच्या हिरवळीची स्थिती’ आदि परिस्थितीजन्य घटकांचा विचार करून टीम निवडली जाते. चेन्नईमध्ये फिरकी गोलंदाजांना प्राधान्य असते, तर अहमदाबादमध्ये वेगवान गोलंदाजांची चलती असते.

खेळ पाहण्यास बसलेल्या प्रेक्षकांना इच्छा नसूनही, समोरील जाहिरातींमध्ये काही तथ्य नाही हे ठाऊक असूनही, त्या पाहाव्याच लागतात. समोरची प्रसिद्ध व्यक्ती जे ग्यान देते ते निमूट ऐकून घ्यावेच लागते.

पैसे खर्चणारे, एक टीम निवडून तिला प्रोत्साहन देणारे, विरोधी टीमच्या समर्थकांवर शाब्दिक वार करणारे, एकमेकांना भिडणारे प्रेक्षकच असतात.

‘ड्रिंक्स’ ब्रेकमध्ये परस्परविरोधी टीमचे खेळाडू एकाच आईस-बॉक्समधून पाणी नि कोल्ड्रिंक पितात. तसंच सामना संपल्यावर परस्परांसोबत डिनर पार्ट्या करतात.

प्रेक्षकांनी खर्चलेल्या पैशांतून खेळणार्‍या दोन्ही टीम्सच्या खेळाडूंना, डग-आउटमध्ये नुसतेच बसलेल्या टीम सपोर्ट स्टाफला, त्यांच्या मालकांनाच काय पण टीव्हीवरील निवेदकांनाही(!) मानधन मिळून त्यांची चांदी होते.

सामना संपला, गुलाल उधळून झाला की प्रेक्षक आपला खिसा किती हलका झाला याचा अंदाज घेत-घेत पुढच्या काटकसरीची चिंता करत घरी जातात (किंवा टीव्ही बंद करतात.)

दोन्हींमध्ये मोजके स्थानिक/मूलनिवासी खेळाडू आणि बाकीचे थोडे देशातले, थोडे परदेशातले असे पैसे देऊन खरेदी करून एक टीम तयार केली जाते. पण ‘नालायक असले तरी स्पर्धेच्या/संघर्षाच्या प्रसंगी आपल्या जातीच्या, धर्माच्या, देशाच्या, गावच्या माणसाची बाजू घ्यायला हवी’ या निष्ठेतून अशा ‘आपल्या नसलेल्या’ आपल्या टीमची बाजू सर्वसामान्य चाहते प्रसंगी आपल्याच माणसांशी वैर पत्करुनही लढवत असतात.

एक लहानसा फरक असा आहे की आयपीएलमध्ये खेळाडूंचा रीतसर लिलाव होतो, तर निवडणुकीत ‘होस्टाईल टेक-ओव्हर’देखील (Hostile Take-over) होते.

प्रत्यक्ष निवडणुकीआधी बाहेरुन नेते आयात करतात, निवडणुकीदरम्यान बाहेरुन नेते आयात करतात आणि निवडणूक झाल्यावरही बाहेरुन नेते आयात करतात. (अदानी जसे कंपनी शून्यापासून सुरु करण्याचे नि वाढवण्याचे कष्ट न घेता सरळ इतरांची बळकावतो तसेच.) थोडक्यात पळवापळवी हा राजकारणाच्या अनेक उपखेळांपैकी एक खेळ आहे.

... कारण आयपीएल आणि निवडणुका हे आपले राष्ट्रीय खेळ आहेत !!

GameOrSport
https://www.sportsbusinessjournal.com/ येथून साभार.

प्रत्येकाचा एक संघ असतो नि एक लाडका खेळाडू असतो. हे दोन्ही जग्गात भारी आहेत असा त्याचा समज असतो. यांची कामगिरी खालावली तर ती ‘सदोष पंचगिरी’मुळेच असा त्यांचा ठाम विश्वास असतो. ‘पंच बदला निकाल बदलेल’ या उक्तीवर त्यांचा ठाम विश्वास असतो. कारण...

आपलं पोरगं कोणत्या शाळेत नि कितव्या इयत्तेत शिकते याचा पत्ता नसलेल्यालाही फडणवीसांचा स्ट्राईक रेट किती नि त्यांनी कुठल्या पक्षातून किती नेते आयात केले याचे स्टॅटिस्टिक्स बिनचूक मुखोद्गत असते. आणि असे असून बीसीसीआय आपल्याला ईशान किशनप्रमाणेच करारापासून वंचित ठेवते याची त्याला खंत नसते. कारण...

उपकर्णधार म्हणून साधी स्वतंत्र रूम मागितली म्हणून सुरेश रैनाला स्पर्धेच्या मध्येच परदेशातून हाकलून लावले जाते. दुसर्‍या पक्षात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला म्हणून जडेजासारख्या दिग्गज खेळाडूला एका आयपीएलचे तिकीट नाकारले जाते. पण ‘निवडून येण्याची क्षमता’ आणि ‘श्रेष्ठींशी नाते’ या गुणांच्या बळावर हार्दिक पांड्याला मात्र भाजपमधून शिंदेसेनेमध्ये प्रवेश केल्यावरही निलंबित केले जात नाही. तरीही...

दुसर्‍या पक्षातून येऊन थेट तिकीट मिळवलेला हार्दिक ‘कसा निवडून येतो बघतोच.’ असे म्हणत कुणी रामदास बुमराह बंड करतो. पण वरिष्ठांनी ‘समजावल्या’वर (समजूत घातल्यावर नव्हे, प्लीज नोट!) ‘संघ नि देशासाठी’ म्हणून निमूटपणे तिसरा गोलंदाज म्हणून चेंडू हाती घेतो. कारण...

ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांनाही ‘लोकसभेसाठी थेट उमेदवारी मिळणार नाही’ असे हायकमांड जाहीर करते. एवढेच नव्हे तर किमान एका ग्रामपंचायतीमध्ये आपले पॅनेल निवडून आणल्याखेरीज पक्षप्रवेशही होणार नाही असे बजावते. पण हार्दिक पांड्याचा थेट पक्षप्रवेश होऊन त्याच दिवशी उपमुख्यमंत्रीपदही बहाल केले जाते. तरीही...

‘आयुष्यातील इतकी वर्षे संघाला दिली. आता अशा बाहेरून आलेल्या नेत्यांसाठी आम्ही काय सीमारेषेवर पाण्याच्या बाटल्या घेऊन बसायचेच का?’ असा प्रश्न यापूर्वी अवघड मतदारसंघही जिंकून दिलेल्या रोहित शर्माला पडत असतो. तरीही...

ड्रीम-११ किंवा फँटसी-लीग सारख्या कंपन्या केवळ क्रिकेटसदृश मैदानी खेळांसाठी आभासी खेळ देऊ करतात. पण तितक्याच लोकप्रिय असलेल्या– आणि चॅनेल माध्यमे ‘सिंहासन का क्वार्टर-फायनल’, ‘सिंहासन का सेमी-फायनल’ किंवा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ वगैरे नावांनी डायरेक्ट टेलेकास्ट करत असलेल्या निवडणुकांसारख्या सर्वाधिक लोकप्रिय खेळासाठी मात्र असा आभासी खेळ देत नाहीत. याचा निषेध केला जातो आहे. कारण...

‘एक देश एक निवडणूक’ या संकल्पनेमध्ये केवळ दर पाच वर्षांनीच या खेळाची मजा लुटता येणार असल्याने अभिजित बिचुकले ‘जंतर मंतर’वर उपोषणास बसणार आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून आरसीबी संघ त्याच्या व्यवस्थापनासह एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे. कारण...

उलट ‘आयपीएलच्या धर्तीवर वार्षिक निवडणूक असायला हवी आणि ती ही पळण्याच्या शर्यतीप्रमाणे ‘सारे एकदम’ न लढवता आयपीएलच्या धर्तीवर ‘एकास एक’ पद्धतीने लढवावी– म्हणजे मनसेसारख्या पक्षांनाही एखाद-दुसर्‍या विजयाची संधी मिळू शकेल’ अशी मागणी मूळसेना-नेते भंजक खाऊच आणि गतस्वाभिमान-नेते हरिहर नानू खाणे यांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे केली आहे. कारण...

‘लोकांना सतत निवडणुकांच्या धामधुमीत नि उत्तेजित अवस्थेत ठेवण्याने आपल्या लाथाळीला मिळणारा वाव नाहीसा होईल’ या भीतीने बायचुंग भुतिया या फुटबॉल महाशक्तीने आपल्याला छुपा पाठिंबा दिल्याचा दावा या दोघांनी केला आहे. कारण...

आयपीएलच्या ’फॅन पार्क’ संकल्पनेमध्ये ज्याप्रमाणे सामने नसलेल्या शहरांत चाहत्यांना स्टेडियममध्ये एकत्र सामना पाहण्याचा आनंद दिला जातो, त्याच धर्तीवर आपापल्या नेत्याच्या अन्य शहरांतील सभांना उपस्थित राहण्याची संधी मिळावी यासाठीही असे फॅन पार्क निर्माण करून तिथे मोठ्या स्क्रीनवर आपल्या लाडक्या नेत्याचे संपूर्ण भाषण लाईव्ह दाखवावे अशी मागणी सर्वपक्षीय फॅन्सतर्फे करण्यात आली आहे. कारण...

आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघांचे स्वत:चे चॅनेल्स व वेबसाईट्स असतात नि त्यावरून आपल्या लाडक्या संघ व खेळाडूंच्या जुन्या खेळी पुन्हा पुन्हा पाहून आनंद घेता येतो. त्याचप्रमाणे आप-आपल्या लाडक्या नेत्यांची भाषणे, विरोधी नेत्यांच्या भाषणातील चुका अधोरेखित/निर्माण करणारे मीम्स आणि रील्स, चॅनेल-चर्चेमध्ये आपल्या पक्षाच्या प्रवक्त्याने विरोधी पक्षाच्या प्रवक्त्याला वा चॅनेल-प्रतिनिधीला कस्सला धुत्तला हे दाखवणारे असे सारे व्हिडिओज, माहिती, लेख वगैरे एकाच ठिकाणी देणारे चॅनेल्स आणि वेबसाईट्स असायला हव्यात अशी आग्रहाची मागणीही करण्यात आली आहे. कारण...

आयपीएलमध्ये प्रत्येक ओव्हरनंतर जाहिरात दाखवतात त्याच धर्तीवर निवडणुकीतील प्रचाराच्या भाषणांदरम्यान जाहिराती दाखवण्यात याव्यात अशी मागणी थडानी ग्रुप्स या मॉरिशसस्थित आफ्रिकन-अमेरिकन कंपनीने केली आहे. ‘म्हणजे अजून पैसा’ हे ध्यानात आल्यावर डोळे लकाकलेल्या बीसीसीआय प्रमुखांनी ‘एक देश एक निवडणूक’ अध्यादेशामध्ये या पुरवणी मागणीचा समावेश करण्याचे आश्वासन दिले आहे. कारण...

एका भाषणात दोनच बाउन्सर(!) अलौड असावेत, ‘रिव्हर्स’ स्वीप या फटक्यावर प्रचारामध्ये बंदी घालण्यात यावी. निवडणुकांचा प्रचार चालू असताना ऐनवेळी ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून हार्दिक पांड्याप्रमाणे विरोधी उमेदवारच आपला उमेदवार म्हणून जाहीर करण्याची सोय असायला हवी... इत्यादि मागण्या ‘गुजरात जायन्ट्स’(!) संघाने निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. कारण...

निवडणुका अधिक रोमांचकारी होण्यासाठी मागे फन्ना पाडारे(!) यांनी मागणी केल्याप्रमाणे, युक्रेनसोबत युद्ध पुकारल्यानंतर खेळणार्‍या रशियन खेळाडूंप्रमाणे अपक्ष म्हणून निवडणुका लढवाव्यात नि नंतर आयपीएलच्या धर्तीवर विजेत्यांचा लिलाव करून विविध संघांनी त्यांना विकत घ्यावे. जे सर्वाधिक खासदार विकत घेऊ शकतील त्यांना सरकार स्थापन करण्यास पाचारण करावे. कारण...

...कारण आयपीएल आणि निवडणुका हे आपले राष्ट्रीय खेळ आहेत !!!

- oOo -


हे वाचले का?

बुधवार, १५ मे, २०२४

शब्दांनी हरवुनि जावे

आठ-दहा दिवसांपूर्वी गलगोटिया विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांचा राजकीय कारणासाठी उपयोग करून घेण्याचा प्रकार उघडकीस आला. एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता - बहुधा- मतदार असलेल्या हे विद्यार्थी आपण इथे काय करत आहोत, हाती धरलेल्या घोषणापत्रांवर काय लिहिले आहे वगैरे बाबत अनभिज्ञ दिसत होते. सद्य राजकीय सामाजिक स्थितीचे प्रतिबिंबच त्यांच्या वर्तनात दिसत होते असे म्हणता येईल.

या प्रकारात सर्वात धक्कादायक बाब ही की या प्रतिनिधीने काही जणांना त्यांच्या स्वत:च्या हातात असलेल्या घोषणापत्रावर काय लिहिले आहे हे वाचण्यास सांगितले असता इंग्रजीमध्ये लिहिलेले तर सोडाच काहींना मातृभाषा हिंदीमध्ये लिहिलेली ती घोषणाही वाचता येत नव्हती. यावरून त्यांच्या शिक्षणाबद्दल, यांना मतदार म्हणून मान्यता देण्यात घाई होते आहे का इत्यादि प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत. परंतु मला यात एका संक्रमणाची चाहूल दिसते आहे. यात बरे-वाईट परिणाम दिसतीलच, परंतु याचे संभाव्य दुष्परिणाम मला दिसतात जे अधोरेखित करावेत असे वाटते.

IAmConfused
https://www.freepik.com/ येथून साभार

यांना शब्दांचे अर्थ समजावेत ही अपेक्षा बाजूला ठेवूनही मला असा प्रश्न पडतो, ‘ज्या मुलांना सज्ञान झाल्यावरही ही चिरपरिचित लिपी बिनचूक वाचता येत नसेल तर याचे कारण काय असावे?’ लहानपणापासून नागरी लिपीतील मजकूर वाचणे त्यांच्या अंगवळणी पडलेले आहे. पहिल्या इयत्तेत मुळाक्षरे त्यांनी गिरवली आहेत, जाता-येता दुकानांचे बोर्ड वाचले आहेत, (निदान) क्रमिक पुस्तके वाचली आहेत. मग वय वाढू लागल्यावर हे ‘अनरिंगिंग ऑफ बेल’ किंवा हे ‘अनलर्निंग’ म्हणावे का? असेल तर हे का घडत असावे?

शाळेत असताना पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर मागील इयत्तांमध्ये आत्मसात केलेली माहिती (मी ‘ग्रहण केलेले ज्ञान’ म्हणण्याचे धाडस करत नाही) स्मरणातून सहज निसटून जाण्याला गंमतीने ‘पुढचे पाठ मागचे सपाट’ असे म्हटले जाई. ही पाठांतरप्रधान, संस्कारप्रधान समाजात असलेली जन्मव्याधी आहे. आकलनाऐवजी अनुकरणाला, ग्रहण करण्याऐवजी पाठांतराला महत्त्व देणार्‍या पंतोजी शिक्षणपद्धतीमध्ये याहून वेगळे अपेक्षित नाही.

मागच्या स्तरावर नवा स्तर चढला की आधीच्या स्तराकडे पोहोचण्यास नव्या स्तराचा अडथळा तयार होतो. आकलन म्हटले तर प्रत्येक स्तरातील ज्ञानाची एक अनुक्रमणिका, what and where किंवा संगणकाच्या भाषेत सांगायचे तर मास्टर फाईल टेबल (MFT) तयार होऊन त्याआधारे हवे तेव्हा त्या स्तरातील माहिती उपसून काढण्याची सोय होत असते. पाठांतरप्रधान मंडळी कपड्यांच्या घड्यावर घड्या ठेवून नुसतेच ‘कोठावळे’ (hoarders) होऊन राहतात.

हे ‘अनलर्निंग’ त्याच्याही पुढचा टप्पा आहे का? जी वाक्ये त्यांनी शाळेत असताना सहज वाचली असती, ती आज त्यांना का वाचता येत नाहीत? त्यांनी स्वत:च्या बुद्धीने जे लिहिले असते त्याचेच आकलनही त्यांना का होत नाही? या प्रश्नांची उत्तरे शोधताना, मला स्वत:चेच अनुभव जमेस घेऊन काही एक आकलन होऊ लागले. हे कितपत गंभीर आहे मला माहित नाही, परंतु ‘हे असे नाहीच’ वा ‘प्रमाण नगण्य आहे’ असे कुणी म्हणाले, ‘वडाची साल पिंपळाला लावतो आहेस’ (किंवा फेसबुक वा एकुण सोशल मीडिया नागरिकांच्या प्रवृत्तीला अनुसरून वैय्यक्तिक शेरेबाजी करत ‘तुझा छुपा अजेंडा आहे’) असे कुणी म्हणाले तर मी अजिबात मान्य करणार नाही हे नक्की.

माझ्या मते याला ‘दृश्यात्मकतेच्या आहारी जाणे’ हा मोठा दोष कारणीभूत आहे.माझी ब्लॉगयात्रा’ या मालिकेमध्ये मी अभिव्यक्तीच्या शब्द या माध्यमाची निवड मी का केली यावर थोडे भाष्य केले होते. त्याचबरोबर फेसबुकसह सर्वत्र फोटो/इमेज अथवा व्हिडिओ यांचे प्राबल्य असल्याने अभिव्यक्तीच्या काय समस्या निर्माण होतात याबाबतही थोडे लिहिले होते.

एक उदाहरण म्हणून माझी कालचीच फेसबुक-पोस्ट पाहता येईल. त्या पोस्टमध्ये मी सरमिसळ घटक अथवा confounding factors बाबत बोलत होतो. त्या मुद्द्याचे उदाहरण म्हणून एक भाष्यचित्र जोडले होते. सुरुवात जरी उपहासाने केली असली तरी माझ्या मते पोस्ट गांभीर्यपूर्वक मांडणी करणारी होती. (पोस्ट असल्याने मांडणी स्वैर होती हा दोष मान्य.) परंतु फेसबुक दृश्यात्मकतेला अवाजवी प्राधान्य देत असल्याने इमेजने व्यापलेली जागा मजकुराहून अधिक असते. यातून झाले असे की फेसबुकवर वा काही फेसबुककर नसलेल्या काहींना लिंक पाठवल्यावर हा: हा: अशी प्रतिक्रिया आली.

निव्वळ भाष्यचित्र पाहता ती वाजवी आहे... कदाचित. परंतु पोस्ट वाचल्यानंतर तशी येण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणजे या प्रतिसादकांनी पुरी पोस्ट वाचली असण्याची शक्यता कमी आहे. चटकन इमेज पाहिली नि प्रतिसाद दिला असे झाले असण्याची शक्यता बरीच आहे. ‘लिहिले असेल नेहमीप्रमाणे लांबलचक, कशाला वाचा’ या विचारही एखाद्याने केला असेल (‘हा पाच मैल लिहितो, एवढे कोण वाचणार’ अशी एका मित्राची प्रतिक्रिया फार पूर्वी आलेली होती. तो दोष मान्य करून त्याच्या त्या प्रतिक्रियेमध्येच शब्दमाध्यमाबद्दलचा कंटाळा दिसतो हे नोंदवून ठेवतो.)

मी लिहितो म्हटल्यावर ‘समय के साथ चलो’ वाल्यांनी ‘लेखन अधिक पोहोचावे म्हणून संपूर्ण मजकूर फेसबुकवर टाकावा’ असा सल्ला दिला होता. त्याचा प्रतिवाद करताना मी फेसबुकच्या इमेज-मजकूर असमतोलाबद्दल आणि मांडणीच्या जाचक मर्यादेबद्दल नि त्याच्या परिणामांबद्दल लिहिले होते. ही मागची फेसबुक-पोस्ट याचे आणखी एक उदाहरण.

आज बहुसंख्येला मीम्स, रील्स, मायक्रो-व्हिडिओज वगैरे माध्यमांतूनच सारे काही हवे असते. त्यातून मग आकलनप्रधान, विश्लेषणप्रधान, मुख्य म्हणजे शब्दप्रधान मांडणी करणार्‍यालाही यू-ट्यूब चॅनेल चालू कर, छोटे व्हिडिओ बनव, पॉडकास्ट कर वगैरे सल्ले दिले जातात. शब्दाचे वाचन कमी कमी करत नेणार्‍या या पिढीमध्ये लिपीशी बांधिलकी विरत जाणार हे अपरिहार्य आहेच.

‘J1 झालं का?’ या सनातन प्रश्नापासून सुरु झालेली चॅट भरपूर प्रमाणात इमोजींचा वापर करते. टाईप कमी करावे लागावे हा उद्देश असतो. म्हणजे ‘मला हे आवडले नाही’ या वाक्याच्या जागी रागावलेली एक इमोजी टाकली की काम भागते. कदाचित लिपीप्रमाणेच पुढे या इमोजीचा अर्थ लावणेही मेंदू बंद करेल नि थेट त्यातील त्या-त्या भावनेचे निदर्शक असणारे केंद्र उद्दीपित करेल. हे कदाचित प्रासंगिक संवाद वा देवाणघेवाणीस पुरेसे असेलही, पण दस्तऐवजीकरणावर याचा काय परिणाम होईल याचा विचारही करायला हवा.

नफा हेच एकमेव उद्दिष्ट घेऊन उभे राहिलेली भांडवलशाही व्यवस्था भरपूर पैसे निर्माण करत असली तरी गुणवत्ता, वैविध्य आणि मुख्य म्हणजे पर्यावरण याची ऐशीतैशी करते; तसेच प्रासंगिक संवाद महत्त्वाचा नि बाकी सारे दुय्यम समजू लागणे घातक आहे का याचा विचार आवश्यक आहे का या प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारुन पाहायला हवा.

पोस्ट आधीच भरपूर लांबल्यामुळे फार उदाहरणे देत नाही. एकदोनच पाहू. समजा हे दृश्यप्रधान जगातील तरूण एखाद्या गुन्ह्याचे साक्षीदार असतील आणि पोलिसांच्या आरेखकाने यांना पाहिलेल्या गुन्हेगाराचे वर्णन विचारले अथवा घटनाक्रम नि गुन्ह्याच्या स्थानावरील जड वस्तूंच्या स्थितीबाबत विचारणा केली, तर वास्तवाच्या त्या अवकाशातील विविध घटकांसाठी नेमके शब्द यांना सापडतील, की मनात त्याला अनुरूप इमोजीच फक्त उमटतील? की वस्तुनिष्ठतेच्या नि दृश्यात्मतेच्या अवाजवी आहारी गेलेला माणूस संभाव्य मानवी वावराच्या परिसरातील प्रत्येक चौरस से. मी. वर विविध अँगलने पाहणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवेल, जेणेकरुन माणसाच्या वर्णनक्षमतेवर अवलंबूनच राहायला नको?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे संगणकाच्या पडद्यापलिकडे माणसाचा परस्परसंवाद - आज झाला आहे त्याहून - कमी होत जाईल. समोरासमोर बसून एकमेकांना ‘आयएम’ करणे अधिक सुलभ होईल का? कारण अनेक वाक्यांची रचना ही शब्दांऐवजी इमोजींनी करणे अंगवळणी पडलेले असेल. आजही लांबलचक मजकूर कुणी वाचायचा म्हणून बहुतेक अ‍ॅप्स, उपकरणे (devices) यांची लायसन्स-अग्रीमेंट्स आपण न वाचता अ‍ॅक्सेप्ट करुन पुढे जातो. या अधीर वृत्तीला अज्ञानाची जोड मिळून हे भूत आणखी किती विक्राळ रूप धारण करेल?

आज हा अतिरंजित कल्पनाविस्तार वा प्रलयघंटानाद वाटू शकेल, परंतु माझ्या मते हे वास्तव दूर असले तरी आपल्या वाटेवर आहे हे नक्की

- oOo -


हे वाचले का?

मंगळवार, ३० एप्रिल, २०२४

मी लिंक टाकली

संसदीय निवडणुकांची धामधूम चालू असल्याने समाजमाध्यमांवर असणारे ट्रोल्स सक्रीय होत आहेत. सत्ताधार्‍यांच्या सोयीसाठी कोणत्याही मुद्द्याला हिंदू-मुस्लिम वादाचा तडका देण्यास ते तत्पर होऊ लागले आहे. अनेक तोंडांनी, हातांनी आणि अकाउंट्समधून प्रसवलेले प्रचारसाहित्य परस्परांच्या लेखन-लिंक्स नि दाखले देत वेगाने पसरवणे चालू आहे.पावसाळ्याच्या तोंडावर जसे बेडकांचे ड्रांव ड्रांव अधिक कर्कशपणे ऐकू येऊ लागते, तसेच यांचे दुर्दरगान निवडणुकीच्या पुढील टप्प्यांत अधिक कर्कश होत जाईल.

स्वत:च्या जिवाची बाजी लावून मालकाला संभाव्य धोका वाटणार्‍या प्रत्येकावर भुंकणार्‍या श्वानाप्रमाणे यांचे वर्तन होत असते. वारयोषिता स्वत:चे पोट जाळण्यासाठी चोळीची गाठ सोडते; हे मालकाला आपला दलाल मानून त्याच्यासाठी आपली चोळी त्यागतील नि आपल्या अब्रूला त्याच्या राजकीय समर्थनाच्या बाजारात उभी करतील.

अशांनी उघड व्यक्त न केलेले हे मनोगत.
---

InternetTroll
https://www.socialpilot.co/blog/social-media-trolls येथून साभार.
(कविवर्य ना. धों. महानोर यांची क्षमा मागून...)
    
मी लिंक टाकली
मी शिंक टाकली
मी गुडघी अक्कलेची, बाई पिंक टाकली

हिरव्या पोस्टीत, भगव्या पोस्टीत वळवळ वळवळ केली
भर वादामधी जाळ, फुंकून ठिणगी फुलली

ह्या पोस्टींवरती
ते मीम पांघरती
मी फक्त हासले बाऽई, नाही कमेंट केली... नाही कमेंट केली

हिरव्या पोस्टीत, भगव्या पोस्टीत, वळवळ वळवळ केली...

अंगात माझिया
घुसलाय फेकिया
मी भिंगरभिवरी त्याची गोऽ बटीक झाली
मी चाळीस पैशांसाठी बाई चोळी टाकली

हिरव्या पोस्टीत, भगव्या पोस्टीत, वळवळ वळवळ केली...
 
- oOo -

हे वाचले का?

रविवार, २८ एप्रिल, २०२४

अ.सं.सं. मध्ये मल्ल्यामहर्षी

(२०१६ मध्ये प्रथम विजय मल्ल्या यांच्या नंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी, नीतिन संदेसरा यांनीही आर्थिक गैरव्यवहाराच्या गुंत्यातून सुटण्यासाठी परदेशात पलायन केले. त्याच सुमारास भारतामध्ये झालेल्या नोटाबंदीच्या अनुषंगाने लिहिलेल्या फेसबुक पोस्टचा थोडा विस्तार करुन लिहिलेली ही काल्पनिका.)
---

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार महान भारतीय अर्थशास्त्री विजय मल्ल्या ऊर्फ मल्ल्यामहर्षी यांनी युरपमधून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांकडे (अ.सं.सं.) गुपचूप गमन(१) केले. सुरक्षिततेच्या कारणास्तव ही बातमी तर गुप्त ठेवण्यात आलीच होती. अणुबॉम्ब निर्मितीच्या ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’च्या वेळी प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ नील्स बोर याला ज्या सफाईने अमेरिकेमध्ये नेण्यात आले होते त्याच सफाईने हे ऑपरेशन पार पाडण्यात आले.

प्रथम एका कार्गो विमानाने मल्ल्यामहर्षींना डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. आधीच सूचना मिळाल्याप्रमाणे, विमानतळावरील अ.सं.सं.च्या अधिकार्‍यांनी इमिग्रेशन-चेक वगैरेचे सोपस्कार बाजूला ठेवून त्यांना थेट एका अति-सुरक्षित अशा लहानशा विमानाकडे नेले. हे विमान खुद्द अ.सं.सं. अध्यक्षांनीच पाठवले होते, हे नंतर प्रेस-ब्रिफिंगमध्ये उघड झाले. या विमानाने महर्षींना थेट रीगन विमानतळाकडे नेण्यात आले. तिथे मात्र त्यांचे आगमन जाहीर करण्यासाठी स्पेशल बँड आणवून वाजतगाजत त्यांना थेट राष्ट्राध्यक्ष निवासाकडे नेण्यात आले.

नील्स बोर याच्या आगमनाचे कारण बरेच उशीरा उघड झाले होते. तसेच मल्ल्यामहर्षींना कोणत्या मोठ्या ऑपरेशनसाठी ‘कमिशन’ करण्यात आले आहे यावर अ.सं.सं.च्या माध्यमांमधून घनघोर चर्चा सुरू झाल्या. भारतीय माध्यमांनी ‘फक्त आमच्याच चॅनेलला मिळालेली गुप्त बातमी’ म्हणून ‘मल्ल्यामहर्षींना अध्यक्षांचा ‘मद्य-सचिव’ म्हणून नेमण्यात येणार आहे’ यापासून ‘स्वदेशात अडचणीत आल्यास परदेशाश्रय कसा घ्यावा’ यावर व्हाईट हाऊसमध्ये निवडक रिपब्लिकन खासदारांना ते मार्गदर्शन करणार असल्याची’ ब्रेकिंग न्यूज – अर्थात ग्राफिक्स वगैरेसह – वाजवण्यास सुरुवात केली. भारतीय माध्यमांच्या पावलावर पाऊल टाकत अमेरिकन माध्यमांनी मल्ल्यामहर्षींचा सहभाग असलेल्या या संभाव्य गुप्त कार्यक्रमाला ‘ऑपरेशन रॉयल चॅलेंज’ असे नाव देऊन टाकले.

MallyaaAndTrump

मल्ल्यामहर्षी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी पोहोचले. औपचारिक स्वागत झाल्यावर अध्यक्ष ट्रम्प नि मल्ल्यामहर्षी दोघेच त्यांच्या अति-सुरक्षित चर्चागृहात गेले. दोघांची जेमतेम दोनच मिनिटे चर्चा झाली. यावरून प्रस्तावित ऑपरेशनबाबत अध्यक्षांची मल्ल्यामहर्षींसोबत आधीच सविस्तर चर्चा झाली असल्याचे फॉक्स न्यूजने आळवण्यास सुरुवात झाली. चर्चागृहातून दोघेही बाहेर येऊन थेट पेंटगॉनकडे रवाना झाले. तासाभरातच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पायउतार झाल्याची आणि त्यांच्या उपाध्यक्षांनीही राजीनामा दिल्याची बातमी पसरली. सोबतच मल्ल्यामहर्षी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत असल्याची बातमीही आली.

अ.सं.सं. मधील नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रोजगार धंदे सोडून लोक रस्त्यावर आले, एकमेकांना मिठ्या मारुन, जोर-जोरात घोषणाबाजी करत आणि मुख्य म्हणजे बीअर पीत ते आपला आनंद व्यक्त करत होते. ही भिकारडी जर्मन बीअर आपल्याला प्यावी लागणार नाही, अस्सल भारतीय बनावटीची बीअर मल्ल्यामहर्षी आपल्याला उपलब्ध करून देतील या कल्पनेनेच तरुणांचा जल्लोष सुरू झाला.

पदभार स्वीकारल्यानंतर मल्ल्यामहर्षींनी पहिलीच घोषणा केली ती ‘नोटाबंदीची’! वरिष्ठ सभागृह (Senate) तसंच प्रतिनिधी-गृहातील (House of Representatives) रिपब्लिकन सदस्यांनी धडाधड केलेल्या ट्विट्स, पोस्ट्स नि फेसबुक लाईव्हद्वारे ‘अमेरिका फर्स्ट’ या मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा आता सुरु होत असल्याचे ढोल वाजवायला सुरुवात केली. भारतात अतिशय यशस्वी झालेल्या या उपायाची अंमलबजावणी करण्याचे जाहीर झाल्याने अ.सं.सं. मधील नागरिक आणखीनच खूश झाले आणि ‘आले रे आले, अच्छे दिन आले’ अशा घोषणांनी त्यांनी आसमंत दणाणून सोडले.

भारताप्रमाणेच अ.सं.सं. मधील विरोधकांचा आरडाओरडा सुरु झाला(२). पण मोदींप्रमाणेच मल्ल्यामहर्षींनी या विरोधाला भीक घातली नाही. रिपब्लिकन प्रतिनिधी, ट्रम्प-आर्मी, ‘फॉक्स’सारखी माध्यमे यांनी विरोधकांना ‘चीनचे हस्तक’ म्हणून हिणवण्यास सुरुवात केली. या गदारोळामध्ये फेडरल रिजर्वने केलेला विरोधही पाचोळ्यासारखा उडून गेला.

नोटाबंदी जाहीर झाल्याने जुन्या नोटांच्या बदली देण्यासाठी नव्या डॉलर नोटा(३) छापण्यास सुरुवात झाली. मोठ्या दर्शनी किंमतीच्या नोटांमध्ये काळा पैसा साठवला जात असल्याने रद्द केलेल्या पाचशे नि हजारच्या नोटांऐवजी दोन हजारच्या नोटा छापणार्‍या मोदींच्या पावलावर पाऊल टाकून मल्ल्यामहर्षीं काम करू लागले. त्यांनी अ.सं.सं.ला वेगाने श्रीमंत करण्याच्या उद्देशाने थेट पाच मिलियन डॉलर्सच्या नोटा छापण्याचचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रत्येक नागरिकाला पंधरा मिलियन डॉलर्स सरकारतर्फे देण्याची घोषणा केली(४). पुढील दोन महिन्यांमध्ये हे वाटप व्हावे या दृष्टीने नियोजन करण्याचा आदेश त्यांनी दिला.

ज्या दिवशी हे वाटप सुरू होणार होते, त्या दिवशी भल्या पहाटेपासून लोकांनी एटीएम्ससमोर रांगा लावल्या होता. रांगेतले काळे, पांढरे, पिवळे, तांबडे, बुटके, उंच, काळ्या डोळ्याचे, निळ्या डोळ्यांचे, भुर्‍या डोळ्यांचे, स्त्री, पुरुष, तरुण, वृद्ध सारेच आनंदाने एकमेकांना मिठ्या मारत होते, शुभेच्छा देत होते. येऊ घातलेल्या ‘अच्छे दिनां’च्या चाहुलीने झालेला आनंद त्यांना आवरता येत नव्हता. अखेर ती वेळ आली. सकाळी सहा वाजता रेडिओवरून(५) सर्व एटीएम नव्या नोटांनी गच्च भरल्याची नि सर्वांसाठी ते खुले झाल्याची घोषणा मल्ल्यामहर्षींनी केली नि नागरिकांची आपल्या नेहमीच्या शिस्तीला विसरून एटीएममधे घुसण्याची अहमहमिका सुरू झाली.

वॉशिंग्टनच्या रस्त्यावर राहणार्‍या एका बेघर व्यक्तीने त्याच्या ‘घरा’शेजारच्या एटीएमसमोर दोन दिवसांपासून नंबर लावलेला होता. एटीएममधून पैसे काढून ती व्यक्ती बाहेर पडली आणि कॅमेर्‍यांचे क्लिकक्लिकाट चालू झाले. ‘आम्हीच पैले’ म्हणत त्याचा ‘बाईट’ घेण्यास धावलेल्या चॅनेल प्रतिनिधी आणि स्वयंघोषित यू-ट्युब चॅनेलशास्त्रींना धक्काबुक्की करत बाजूला करुन काही तरुण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले. आनंदातिशयाने त्या भाग्यवंताला डोक्यावर घेऊन त्यांनी नाचायला सुरुवात केली. पहिला उत्साह ओसरल्यावर तिला खाली उतरवण्यात आले. नव्या नोटेस तिने उंच धरून सर्वांनी त्यासोबत सेल्फी काढावी असा प्रस्ताव एका तरुणाने मांडला नि तो उत्साहात नि एकमताने पास झाला.

ताबडतोब त्या ‘प्रथम-नोट-प्राप्त’ भाग्यवंताला मधे घेऊन त्याच्या आजूबाजूने बरेच लोक दाटीवाटीने उभे राहिले. त्या भाग्यवंताच्या शेजारी उभे असलेल्या तरुणाने मोबाईल समोर धरून सर्वांना ‘से बीअऽऽऽऽर’असे म्हणून क्लिक केले. त्याच वेळी समोरुन फोटो काढण्यासाठी सज्ज असलेल्या एकाने झूम थोडा कमी करून सर्वांना कव्हर करता यावे यासाठी स्क्रीनवर बोटे टेकवली. इतक्यात एटीएममध्ये नंबर लागून नोटा मिळालेला एकजण अत्यानंदाने धावत त्याच्या शेजारून गेला. जाता जाता त्याचा धक्का या कॅमेर्‍याधार्‍याला लागला नि वाईड अँगलऐवजी उलट कॅमेरा जास्तच झूम झाला. समोरचे सारे लोक आता आउट-ऑफ-फोकस जाऊन स्क्रीनवर फक्त नोट दिसत होती. त्यावर लिहिलेले वाक्यही स्पष्ट वाचता येत होते...

‘इन फ्रॉड वी ट्रस्ट’ (६)

- oOo -

टीपा :
(१). ‘पलायन केले’ असे म्हणणार होतो पण कुणाच्या तरी भावना दुखावल्या तर पंचाईत. (* टीप ६ पहा.)
(२). ‘तसंही या डेमोक्र्याट्यांना आरडाओरड करणं सोडून दुसरं येतंय काय?’ - सॅम-बिन पॅट्रोस, अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी, दक्षिण-पश्चिम न्यू हॅम्पशायर परगणा, गल्ली क्र. ८.
(३). तिकडे त्यांना बिल्स म्हणतात नि बिलाला चेक. पण ‘ज्याले ऑनर करु नही, त्याले चेक म्हनू नही’ असं सांगून अ.सं.सं.च्या लोकांचे हे उलटे डोकेही मल्ल्यामहर्षी लवकरच सरळ करतील.
(४). ‘त्यापेक्षा किंगफिशर माईल्डचे पंधरा क्रेट दिले असते तर अधिक उपयोगी ठरतील, या रिपब्लिकनांच्या देशात!’ - योशुआ सिनहॅम, ‘हिलरी इज किलरी’ या डेमॉक्रॅटिक पार्टी-अंतर्गत दबाव गटाचे निमंत्रक.
(५). ‘टीव्ही नव्हता का?’ बावळट प्रश्न विचारणार्‍याला ‘ग्वाटानामो बे**’ला डीपोर्ट करण्यात येईल. (** टीप ६ पहा.)
(६). ज्यांना संदर्भ माहीत नसेल, त्यांनी आपल्या धार्मिक/अधार्मिक श्रद्धेय पुस्तकांत सारे ज्ञान आहे या आपल्या दाव्याची सुरळी करून... ...माळ्यावर टाकून द्यावी.

---
संबंधित लेखन:

अब्ज अब्ज जपून ठेव (अर्थात ’मल्ल्याला सल्ला’) >>
अशी ही पळवापळवी >>
---


हे वाचले का?

बुधवार, १७ एप्रिल, २०२४

गजरा मोहोब्बतवाला

सिंहगड रस्ता हा पुण्यातील काही प्रमुख रस्त्यांपैकी एक. पुण्याच्या दक्षिण भागाकडे जाणारा एकमेव मोठा नि म्हणून वर्दळीचा रस्ता. एका अस्मिताजीवी कोथरूडकर मैत्रिणीच्या मते ’ईं ऽऽऽऽ सिंहंगंडं रोंडं कांऽऽयं...’ असा प्रश्न विचारण्याजोगा असला, तरी रस्त्याचा आकार नि वर्दळीच्या गुणोत्तराच्या दृष्टीने पाहिले तर रस्त्यांमधला उच्चवर्गीय (उ.र.) .

माझ्या घराकडे यायचे तर या मुख्य रस्त्यावरून एका चौकात आत वळावे लागते. याच्या आजूबाजूला मोठी वस्ती पसरल्याने मुख्य रस्त्याच्या इतका नाही पण अगदी गल्लीही नाही असा– मध्यमवर्गीय रस्ता (म. र.). या रस्त्यावरूनही आमच्या सहनिवासाकडे (सोसायटी) यायचे तर एका गल्लीत वळण घ्यावे लागते. ही गल्ली अर्थातच निम्नवर्गीय रस्ता (नि.र.), जेमतेम एक लेनइतकी रुंद. आता मी सांगणार आहे तो किस्सा या म.र.कडून आमच्या नि.र.च्या वळणार घडलेला आहे.

‘याला किस्सा, अनुभव म्हणावे का?’ असा प्रश्न कुणाला पडेल. पुरे वाचल्यावर ‘ही एक नित्य घडणारी किरकोळ, अदखलपात्र घटना आहे’ असे बहुतेकांचे मत असेल. (आणि हे खरडणे खरं तर त्यांच्याच साठी आहे.) पण हा प्रसंग माझ्या डोक्यात कायमचा घर करून राहिलेला आहे याचे कारण– कदाचित– माझी पिंडात ब्रह्मांड पाहण्याची अगोचर वृत्ती असेल. ते काही असो, तो प्रसंग आणि त्या वेळी माझ्या मेंदूचे फसफसणे इथे मांडून मोकळा होणार आहे.

---

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एके दिवशी घरातून बाहेर पडलो, सोसायटीचे फाटक ओलांडून नि.र. वर आलो. इथून म.र.ला जोडणारे वळण काही फुटांवर आहे. भारतीय मंडळींचा वाईट सिव्हिक-सेन्स आणि इतरांच्या सोयीचा शून्य विचार यांचा सज्जड पुरावा पाहायचा तर ‘जरा विसावू या वळणावर’.

StreetFlowerSeller
https://scroll.in/ येथून साभार.

नि.र.कडून उजवीकडे वळणावरच एक गजरेवाला उभा आहे. त्याच्या समोर काही क्रेट्स आडवे टाकून त्यावर एक फळी टाकलेली आहे. त्यावर ओतलेल्या अनाकलनीय रंगाच्या मोगर्‍याच्या फुलांवर तो पाणी मारतो आहे. त्याच्या शेजारी एका फळवाल्याने त्याच पद्धतीने पथारी लावलेली आहे. त्याच्या पायाशी फळांच्या खोक्यांतून बाहेर पडलेले गुलाबी कागद, स्पंजची जाळी, पुठ्ठे वगैरे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. या दोघांनी मिळून उजवीकडे वळण्यास– आणि तिकडून नि.र.कडे आत वळण्यास अडथळा निर्माण केला आहे.

नुकताच गजरा किंवा मोगरा घेऊन निघालेली एक माता, कुणी एक आजी भेटल्यामुळे तिच्याशी गप्पा मारत फळवाल्यासमोरच उभी आहे. तिचे तीन-चार वर्षांचे मूल तिचे बोट पकडून असले तरी रस्त्याच्या मधोमध उभे आहे, याची तिला जाणीव नाही. या तिघांनी मिळून नि.र.चा अर्धा रस्ता अडवलेला आहे. या दोन विक्रेत्यांच्या समोरच्या बाजूला, म्हणजे डावीकडील वळणावर आणखी एक फळवाला आपले दुकान मांडून आहे. त्यामुळे हा फळवालाआणि ते पलीकडचे मूल यांच्या मधून जेमतेम एक रिक्षा कशीबधी जाऊ शकेल इतकाच रस्ता शिल्लक आहे. त्यातूनच मला बाहेर पडून इच्छित स्थळाकडे प्रयाण करायचे आहे.

मी तिथे पोहोचतो न पोहोचतो, तोच म.र. वरून उजव्या बाजूने एक कार येते नि थेट त्या गजरेवाल्याच्या शेजारी थांबते. आता म.र.कडून आमच्या नि.र. कडे वळण्यासाठी तिकडून येणार्‍यांना राँग साईडने जाऊन या कारच्या पुढून काटकोनात वळण घेण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. आणि तसे केलेच तरी... माता, मूल आणि आजींच्या गप्पा चालू आहेत... दोन्ही फळवाल्यांसमोर कुणीतरी उभे आहे... म्हटल्यावर ते वळलेले वाहन उरलेला रस्ता बंद करत अडकून पडणार हे नक्की झाले.

पण ते जाऊ द्या. आपल्या वाहतूक नियमांबाबत बेशिस्त देशात (एक मिनिट– चुकलो हं. आमच्या बेशिस्त गावात– तुमचे गाव गुणी आहे, ओके?) यात काय नवीन असे तुम्ही म्हणणार हे मला ठाऊक आहे. महासत्ता होण्याच्या वाटेवर सिव्हिक-सेन्स– जबाबदार सार्वजनिक वर्तणूक हा मुद्दा आपण धरत नाही. किंबहुना एकुणातच इतिहासाचा चिखल चिवडणार्‍यांच्या शिक्षणपद्धतीमध्ये नागरिकशास्त्र तसेही दहा-वीस गुणांपुरते अंग चोरून उभे असते; बहुतेकांनी ऑप्शनला टाकलेले असते.

त्या कारची काच ऐटीत सर्रकन खाली होते. खिडकीतून गॉगल लावलेला एक ऐटबाज चेहरा बाहेर डोकावतो. शेजारी त्याचं खटलं/पत्नी/पार्टनर/जोडीदार बसलेली आहे. ऐटबाज चेहरा गजरेवाल्याला दोन गजरे मागतो. गजरेवाला प्रत्येकी दहा रुपये प्रमाणे एकुण वीस रुपये किंमत सांगतो. ऐटबाज चेहरा ‘छे: इतक्या लहानशा गजर्‍याचे दहा रुपये? काहीही काय सांगतोस. दहाला दोन दे.’ म्हणत घासाघीस सुरू करतो. गजरेवालाही ‘खरेदी पण एवढी नाही’ वगैरे सुरू करतो. अठरा रुपये, पंधरा रुपये वगैरे एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे सुरू होते. पण गजरेवाला अजिजीने नकार देत राहतो.

ऐटबाज व्यक्तीच्या कारने म.र. आणि नि.र. दोहोंचीही कोंडी केलेली असल्याने आसपास हॉर्न वाजू लागलेले असतात. ऐटबाज चेहर्‍याशेजारच्या पत्नीच्या चेहर्‍यावर वैतागाचे भाव दिसू लागतात. अखेर ‘दे चल.’ असे म्हणत ऐटबाज चेहरा दोन गजरे घेतो आणि बायकोकडे देतो. खिशातून पाकीट बाहेर काढतो नि गजरेवाल्याच्या हातावर पंधरा रुपये टिकवतो. गजरेवाला ‘अजून पाच रुपये द्या.’ म्हणू लागतो. पण ‘नाही नाही, हे बरोबर आहेत’ असे म्हणत ऐटबाज चेहरा आपल्या अष्टलक्षी गाडीला टाच मारून भरधाव वेगाने निघून जातो.

हतबुद्ध झालेला गजरेवाला गोठलेल्या अवस्थेत काही क्षण उभा असतो. भानावर येतो नि नशिबाला बोल लावत पैसे खिशात टाकून मोकळा होतो. दरम्यान म.र. नि नि.र. दोन्ही रस्ते मोकळे झाल्याने हुश्श: करत मागचे सारे मोकाट सुटतात. गजरेवाला पुढच्या गाडीवाल्याची वाट पाहात ताटकळत उभा राहतो.

---

ऐटबाज चेहर्‍यावरचा दीड-एक हजार रुपयांचा गॉगल, जोडीदाराच्या अंगावर असलेली पाच ते सात हजारांची साडी आणि पाच ते आठ लाखांची गाडी खरेदी करताना याला पैसे कमी पडले नसावेत. गजरेवाल्याप्रमाणेच रस्त्याच्या कडेला गाडी लावून विकले जाणारे शंभर-दीडशे रुपयांचे गॉगल त्याला ‘बिलो डिग्निटी’ वाटत असावेत. चांगल्या दर्जाचे, पण अन-ब्रँडेड कपडे त्याला चालत नसावेत. पैसे देताना– देणार्‍या हातात घातलेली अंगठी पितळेची आहे की सोन्याची हे त्याला स्वत:ला खात्रीपूर्वक सांगता आले नसते. त्यात घातलेला खडा वा हिरा खरा आहे की खोटा याचीही त्याला गंधवार्ता नसते. तरीही सुवर्णकाराने सांगितलेली (आणि वर डिस्काउंटची भाषा करून थातुरमातुर कमी केलेली) किंमत त्याने निमूट मोजली असेल. पण गजरेवाल्याचे पाच रुपये मारण्यासाठी भर चौकात चालत्या गाडीत बसून त्याने पेट्रोल जाळले होते, म.र. नि नि.र. दोहोंकडे अडकलेल्या वाहनांनाही जाळण्यास भाग पाडले होते. यातून पाच रुपयांहून अधिक रकमेची नासाडी त्याने केली होती. पण याची त्याला समजच नव्हती.

यावरून मला ‘डिस्काउंट असेल तरच पुस्तक खरेदी करणार, तीनशेहून अधिक रकमेचे पुस्तक खरेदी करणार नाही,’ म्हणणारे पण बारमध्ये बसल्यावर पुर्‍या बाटलीच्या किंमतीमध्ये एक पेग विकत घेताना कोणतीही घासाघीस न करणारे, वर वेटरला उदारहस्ते टिप देणारे मित्र आठवतात. ऋण काढून सण साजरे केल्यासारखे कुवत नसताना आयफोन, आयपॅड मिरवणारे, पण आरोग्य-विमा (health-insurance) मात्र ‘महाग आहे’ म्हणून न घेणारे मित्र आठवतात. इतरांकडे आहे म्हणून चार-चाकी गाडी घेऊन पेट्रोल– चुकलो, डीजल परवडत नाही म्हणून दारी शोभेची वस्तू म्हणून उभी करुन ठेवणारे, पण त्याचवेळी पैसे वाचवण्यासाठी अर्धा रविवार– कुटुंबाला न देता, स्कूटर हाणत मंडई वा मार्केटयार्डमध्ये जाऊन आठवड्याभराची स्वस्त(?) भाजी घेऊन येण्यावर खर्च करणारे आठवतात...

आपल्या जगण्याचे प्राधान्यक्रम गंडले आहेत असे यांना वाटत नसावे का? आरोग्य-विम्यापेक्षा आयफोन हवासा वाटत असेल, तर आपल्या गरजांची व्याख्या दुसरेच कुणी करते आहे याचे भान आपल्याला कधी येईल? मुळात ज्यांच्या आठवड्याभराच्या भाजीचे एकुण बिल दोनशेच्या वर जात नाही, त्यांचे किती पैसे घाऊक खरेदी केल्याने वाचणार आहेत?

त्यावर एक पळवाट असते की तिकडे चांगली भाजी मिळते म्हणे. सोने गुंतवणूक म्हणून फायदेशीर नाही हे दाखवून दिल्यावर, ‘पण ते ल्यायलाही मिळते’ ही पळवाट जशी काढली जाते तसेच हे. ते खरे असले तरी बरोबर घट नि घडणावळ नावाचे तोट्याचे हिस्से येतात, ते मात्र मोजायचे नसतात... जसे इथे वेळ नि ऊर्जा जमेस धरायची नसते. खरा धार्मिक-खोटा धार्मिक, आर्थिक मध्यमवर्गीय वि. मानसिकतेने मध्यमवर्गीय वगैरे पळवाटा याच जातीच्या. गैरसोयीच्या, तोट्याच्या बाजूकडे दुर्लक्ष करत आपले पूर्वग्रह जपणे हा ग्राहक म्हणून, गुंतवणूकदार म्हणून, सश्रद्ध म्हणून, नास्तिक म्हणून, पुरोगामी म्हणून, धर्मराष्ट्रवादी म्हणून आपल्या प्रत्येकाची सवय असतेच. तिथे पुन्हा ‘आपला गट सोडून ती इतरांमध्येच आहे’ हा एक जास्तीचा नि सामायिक पूर्वग्रहदेखील असतो.

कौतुकाने पत्नीसाठी गजरा घेताना तो मिळाल्यावर तिच्या चेहर्‍यावरचा आनंद अधिक सुखदायक, की पाच रुपये वाचवण्याच्या खटाटोपात तिच्या चेहर्‍यावर उमटलेला वैताग? चलनात मोजलेली किंमत हे सुखाचे, आनंदाचे, समाधानाचे मोजमाप कधीपासून झाले याचा विचार कधी करावासा वाटतो का? विकत घेतलेला ‘गजरा मोहोब्बतवाला आहे, घासाघीसीचे पंधरा रुपयेवाला नाही’ याची जाणीव बायकोला झाली तर ती अधिक आनंदी होईल ना? त्यातून नाते अधिक दृढ होईल की आठ लाखाच्या कारमध्ये बसून, दहा मिनिटे खर्च करुन, वट्ट पाच रुपये वाचवल्यानंतर?

असे प्रसंग पाहिले, की बार्गेनिंग करणार्‍या जमातीबद्दलची माझ्या मनातील तिडिक अधिक तीव्र होत जाते. आपल्या महान देशांतील हे खुजे लोक, ‘घासाघीस केली नाही तर आपल्याला फसवतील, किंवा इतरांना स्वस्त मिळेल नि आपण जास्त पैसे देऊन येऊ’ या न्यूनगंडाने पछाडलेले असतात. दुसरीकडे घासाघीस या प्रकाराने जगण्यातील अनेक वस्तूंबाबत गुणवत्तेची ऐशीतैशी होते हे यांच्या ध्यानात येत नाही. सतत स्वस्त ते उचलायचे या एकांगी भूमिकेने गुणवत्ता असलेले पण अधिक किंमतीचे उत्पादन स्पर्धेबाहेर फेकले जाते. वर हे जीव ‘दोन्हींची गुणवत्ता सारखीच आहे’ असे अट्टाहासाने प्रतिपादन करत राहतात, कारण ‘आपण गुणवत्तेशी तडजोड केलेली नाही’ हे ते स्वत:ला नि इतरांना पटवू पाहात असतात. (दुसरीकडे ‘महाग तेच गुणवत्ता असलेले’वाली जमात असते, पण हा लेख त्यांच्यासाठी नाही.)

इतिहास हा देशाच्या प्रगतीच्या वाटेवरली क्विकसँड किंवा दलदल आहे, तसेच बार्गेनिंग करणे ही ग्राहकाच्या मनोभूमिकेतील. ही विषवल्ली उपटून टाकली तर आपली ऊर्जा, वेळ तर वाचतोच, पण खरेदीतला, उपभोगातला आनंदही अधिक निष्कलंक, निर्भेळ होत जातो. बघा एकदा प्रयत्न करून.

-oOo-


हे वाचले का?