बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१९

राज्यांतील निवडणुका आणि मोदीलाट

देशाच्या विधानसभांमधून भाजप कसा आता हद्दपार झाला आहे म्हणून ’मोदी लाट हटली’ किंवा ’मोदींची कामगिरी पाहा’ म्हणणार्‍यांनो जरा थांबा.

मोदींचे मूल्यमापन मोदी ज्या भूमीवर लढतात तिथेच व्हायला हवे.

ModiWinsAgain

पोटनिवडणुकांमध्ये अगदी उ.प्र.च्या मुख्यमंत्री नि उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप पराभूत झाला होता, पण २०१९ च्या मध्यावधी निवडणुकांत उ.प्र. मध्ये पुन्हा भाजपने ९०% जागा जिंकल्या.

राजस्थान, म.प्र., छत्तीसगड मध्येही विधानसभा गमावूनही मोदींच्या भूमीवर म्हणजे लोकसभा निवडणुकीत जवळजवळ १००% यश मिळवले आहे.

गंमत म्हणजे महाराष्ट्राचे हे नाट्य रंगलेले असताना राजस्थानातील स्थानिक स्वराज्य संस्थातून काँग्रेसने प्रचंड मुसंडी मारत २३ ठिकाणी आपले वर्चस्व स्थापन केले, तर भाजप फक्त सहा ठिकाणी सत्ताधारी झाला.

गुजरातमध्ये काही काळापूर्वी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून राजीनामा देऊन आलेले ठाकोर समाजाचे नेते अल्पेश ठाकोर पराभूत झाले होते...

थोडक्यात कुठल्या निवडणुकीत मोदींकडून आशा ठेवायची नि कोणत्या नाही याचे गणित विश्लेषकांपेक्षा जनता अधिक काटेकोरपणे करताना दिसते. तेव्हा चिलॅक्स डूड.
---

भक्तांनो,

२०१४ लोकसभा निवडणुकीत सेना आमचा बालमित्र, विधानसभा निवडणुकीत सेना दगाबाज म्हणून अफवामशीन चालवा; पुढे २०१९ लोकसभेपर्यंत सतत काडीमोडाच्या उंबरठ्यावर असल्यासारखे कधी मिठ्या कधी ठोसा असे संभ्रमात; लोकसभेत पुन्हा सेना कित्ती गुणी गं बाय आमच्या हिंदुत्वाची लेक, तिला बोलू नका म्हणून विरोधाची तलवार- म्यान नाही तरी उगाच आपली गालावर टेकवल्यासारखी वापरायची ती विधानसभेपर्यंत. आता युतीचे सरकार येत नाही म्हणून सेनेच्या नावे शंख नि अफवामशीन पुन्हा जोरात चालू. आता अजित पवार आपल्या बाजूला आले धावाधाव करुन त्यांच्या मुतण्याच्या कमेंट ’ओन्ली मी’ करा, तीन दिवसात परत गेले की परत पब्लिक करा... अरे तुमच्यापेक्षा वातकुक्कुटे दिशा बदलण्यास थोडा जास्तच वेळ घेत असतील. नेत्यापायी आपली अब्रू का वेशीवर टांगताय?

सेनेकर्‍यांनो,

तुमची भूमिकाही काही वेगळी नाही. भक्तांच्या सारखी, तुमचा नेता नि पक्ष वेगळा इतकेच. दुसरे असे की फार नाच करण्यापूर्वी, उद्धव ठाकरे अद्याप विधिमंडळाचे सदस्य नाहीत, त्यांना सहा महिन्यात निवडून यावे लागणार आहे हे विसरु नका. ते विधानपरिषदेवर गेले तर ’मागच्या दाराने मुख्यमंत्री’ आणि त्यांच्यासाठी कुणी राजीनामा देऊन विधानसभेची पोटनिवडणूक घेतली तर ’निवडणूक लादल्याचा आरोप’ भाजपकडून होणार आहे त्याचा विचार करा. (भाजपवाले आरोप करण्यात एकदम तयार. निव्वळ तेवढ्या तेवढ्या बळावर दोन लोकसभा निवडणुका जिंकल्यात त्यांनी.) शिवाय पोटनिवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता विसरु नका. तसे झाले आज जितका उन्माद आहे त्याच्या दसपट वेगाने भक्तांप्रमाणेच बिळात पळावे लागेल. (शक्यतांचा विचार करायची आणि आपल्या गैरसोयीचे घडणारच नाही असा फाजिल आत्मविश्वास टाळण्याची सवय लावून घ्या.)

राष्ट्रवादीक‍र्‍यांनो,

थोरले पवार निष्णात राजकारणी आहेत हे सर्वांना माहित आहे, ते पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे. पण या एका यशाने लगेच पंतप्रधानपदाचे उमेदवार, राष्ट्रपती, स्टार वॉर्सच्या डार्थ व्हेडरला पराभूत करण्यास सक्षम असा एकमेव योद्धा वगैरे कल्पनेचे वारू फार ताणू नका. नेता मोठा असला तरी पक्षाला कधीही महाराष्ट्रात स्वबळावर सरकार स्थापन करता आलेले नाही हे विसरु नका. ही किमया ममता बॅनर्जी, मायावती, नवीन पटनाईक (४ वेळा), चंद्रशेखर राव, चंद्राबाबू नायडू, जगनमोहन रेड्डी यांनी केली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीच्या बळाचा विचार करा नि विस्ताराच्या दृष्टीने राष्ट्रवादी कुठे नि का कमी पडली याचे मूल्यमापन करा.

काँग्रेसवाल्यानो,...

नाही नको. मी इथे अगदी अमेरिकेच्या एखाद्या पक्षाबद्दल वा नेत्याबद्दल लिहिले तरी हटकून खाली ’ते काँग्रेसवाले तर...’ चा प्रतिसाद-पो टाकणारे अवतीर्ण होतातच. मग हे कष्ट त्यांनाच घेऊ द्या. कायै लोकांच्या तोंडचा घास हिरावून घेऊ नये असे मला प्रामाणिकपणे वाटते. आणि मी काँग्रेसवर लिहिलेच तर ’ते कम्युनिस्ट तर...’ किंवा ’समाजवादी तर...’ म्हणून पो टाकणारच आहेत. त्यापेक्षा त्यांना काँग्रेसवरच पोटभर पो टाकू द्या. आयटीसेलकडून त्यांना रसदही मिळते त्यावर. काहीतरी बरे लिहितील.

- oOo -


हे वाचले का?

शोले पुन्हा पाहिल्यानंतर

SholeyPoster

विषयसंगतीमुळे हा लेख ’वेचित चाललो...’ या ब्लॉगवर हलवला आहे. तो इथे वाचता येईल.

- oOo -


हे वाचले का?

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१९

विचार आणि सत्ता

विचार नि विश्लेषण कितीही दर्जेदार, व्यापक हितकारी वगैरे असले, तरी जोवर त्यांची अंमलबजावणी होत नाही, तोवर त्यांना सुविचाराच्या वहीत लिहून ठेवलेल्या संदर्भहीन सुविचाराइतकेच महत्व असते... किंवा ज्यावर कधीही प्रश्न न विचारता त्यातील मजकूर शिरोधार्य मानायचा असतो अशा धर्मग्रंथांसारखे! अंमलबजावणी करायची तर सत्ता हवी, आणि सत्ता हवी असेल तर आपले सोवळे उतरवून थोड्या तडजोडीला तयार असावे लागते.

CoomunistFlag

हे शहाणपण ’काँग्रेस, भाजप दोघेही वैट्टं वैट्टं’ हा जप करत बसलेल्या आणि राजकीय ताकद शून्य झालेल्या समाजवाद्यांना किंवा बुद्ध्यामैथुन करत बसलेल्या समाजवादी आणि कम्युनिस्टांना यायला हवे. जिवंत राहिला तर माणूस बळ वाढवून नंतर शत्रूशी लढू शकेल. त्यासाठी प्रतिस्पर्ध्यांपैकी एकच प्रचंड ताकदवान होऊ नये यासाठी प्रसंगी दुय्यम प्रतिस्पर्ध्याला बळ द्यावे लागते. नाहीतर मार्टिन निमॉयलरच्या त्या कवितेत म्हटल्याप्रमाणे "When they came for me, no one was there to speak for me" अशी स्थिती व्हायची.

कम्युनिस्ट जर परस्परांत लढून काँग्रेस भाजप दोघेही जातील नि आपल्याला संधी मिळेल या भ्रमात असतील, तर ते तद्दन मूर्ख आहेत. मुळात कम्युनिजम रुजण्यास परिस्थितीच अनुकूल नाही. ग्रांथिक पोपटपंची करुन ती होणारही नाही. त्यासाठी मार्क्सने केले तसेच सद्यस्थितीचे आकलन करुन घेऊन त्यावर डावा विचार उभारायला हवा. सध्या पुस्तकी कम्युनिस्ट परकीय लेखकांनी मार्क्सवादावर लिहिलेली पुस्तके वाचून इथल्या मंडळींच्या नावे बोटे मोडण्यापलिकडे काहीही करत नाहीत. वास्तवाचा नि त्यांचा फक्त इतरांवर आगपाखड करण्यापलिकडे काही संबंध दिसत नाही.

सर्वसामान्य माणसाकडे गमावण्याजोगे बरेच काही आहे. हा समाज बूर्ज्वा विचार नि जीवनपद्धतीवरच पोसला जातो आहे. ९२ नंतर 'अफ्लुअन्स'ची आस प्रत्येकाला आहे. जुन्या समाजव्यवस्थेच्या गृहितकांवर बांधलेले विचार नि त्यावर आधारित व्यवस्था मला आजच्या व्यवस्थेने दिलेले फायदे नाकारायला लावणार असेल, तर सामान्य माणसाची तसे करण्याची तयारी नाही. त्या मानसिकतेवर बोटे मोडणार्‍या कम्युनिस्ट विचारवंताचे जगणॆही बूर्ज्वाच असेल तर आज बूर्ज्वा काय नि श्रमाधारित व्यवहार कुठला याची नव्याने व्याख्या केलेली काय वाईट. जुन्या पोथीला नि चौकटींना चिकटून बसायचे असेल तर धर्म नि धर्मग्रंथ जोडीपेक्षा यात फरक तो काय राहातो?

दुसरे असे की भाजप नि काँग्रेस गेले तर आपण तिसरा पर्याय आहोत हे लोकांना पटवावे लागेल. त्यांनी रिकामी केलेली राजकीय भूमी भरुन काढण्यासाठी तितकेच व्यापक राजकीय संघटन उभे ठेवावे लागेल. पर्याय उभा न करता समोरची इमारत पाडण्याने नव्या भस्मासुराला ती भूमी आंदण देण्यापलिकडे काही साधत नाही. अण्णा आंदोलन आणि महाराष्ट्रातील सद्य राजकीय स्थितीत सेनेने केलेल्या या चुकीची कम्युनिस्ट पुनरावृत्ती करतील इतकेच.

हाच काहीसा प्रकार ब्राह्मणवादाविरोधात उभ्या असलेल्या बहुजन चळवळीच्या बाबत घडतो आहे. विद्रोहाच्या प्रेमात पडून पर्याय न उभारता केवळ प्रतिकारावर भर दिल्याने चोख पर्यायी व्यवस्था उभीच केली जात नाही. ’संविधानावर आधारित’ हे पुस्तकी उत्तर दिले जाते. याचा अर्थ काय हे सर्वसामान्य माणसाला समजत नाही. आमच्या जगण्याचे बंध, परस्पर-संबंध यांची रूढ चौकट सोडून संविधानानुसार जगायचे म्हणजे काय, हे त्यांना ध्यानात येणे शक्य नाही. वारशाने आलेले व्यवस्था, विचार, कर्मकांडे हे त्यांना समजतात, त्यांचा वांझपणा, घातकपणा तुम्ही उकलून समजावून दाखवलात तर त्यांना पटेलही; पण ते नाहीत तर दुसरे काय, या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. आणि ’संविधान अनुसरा’ या उत्तरावर ते बुचकळ्यात पडण्यापलिकडे काही घडणार नसतेच.

थोडक्यात व्यवस्था ही ज्या माणसांसाठी रुजवायची आहे, त्या माणसांची मानसिकता, त्यांच्या गरजा समजून नवी व्यवस्था त्यांच्या आयुष्यात सारता यायला हवी, धर्मग्रंथासारखी कुण्या देवाचा शब्द म्हणून नव्हे. देव, धर्मादि जुन्या अवस्था अनेक अर्थांनी नुकसानकारक असल्या, तरी त्यांची कोणती गरज भागवतात जेणेकरुन त्या व्यवस्थांनीच दुय्यम ठरवलेले समाजघटकही त्यांना सुखासुखी सोडण्यास तयार होत नाहीत, याचा विचार करायला हवा. 'ते मूर्ख अडाणी असतात म्हणून’ असे उत्तर देणारा स्वत:च मूर्ख असण्याची शक्यता अधिक.

आखाड्यात खेळलेल्या मल्लाचे लंगोट ’बघा किती मळले आहेत’ असे आखाड्यात कधीही न उतरलेल्या भिकंभटाने म्हणावे तसे कम्युनिस्टांचे झाले आहे. आम्ही फक्त माती नसलेल्या स्वच्छ आखाड्यातच लढू असा त्यांचा आग्रह आहे. तसा तो कधीही होणार नाही हे वास्तव मान्य करुन, कदाचित आखाडा साफ करण्यापेक्षा ती माती आपल्या अंगाला लागली तरी चिकटणार नाही असा उपाय शोधून आखाड्यात उतरायलाच हवे. आखाड्याबाहेर बसून कमेंटरी करत बसल्याने हाती काही लागणार नाही.

शहरातील सगळेच ट्रॅफिक सिग्नल हिरवे होईपर्यंत मी गाडी गराजबाहेर काढणार नाही, कारण सिग्नलला फुकट इंधन जळते असे म्हणून चालत नाही. गाडी कायमची गराजमध्ये पडून राहील. त्याऐवजी झटपट स्टार्ट होईल अशी गाडी बनवण्याकडे लक्ष द्यायला हवे. त्यातून सिग्नलला गाडी बंद करता येईल नि इंधन वाचेल. एक फरक लक्षात घ्यायला हवा की गाडी आपली आहे, त्यात हवे ते बदल करुन तिला अधिकाधिक कार्यक्षम करुन आपले उद्दिष्ट साध्य करु शकतो. रस्ते नि सिग्नल ही सामायिक मत्ता आहे, त्यातील बदल करण्यासाठी सर्व भागधारकांमध्ये जागृती करणे, बदल करण्यासाठी आवश्यक ती सहमती निर्माण करणे, सगळे सिग्नल सतत हिरवे ठेवणॆ योग्य कसे हे त्यांना पटवणे(थोडक्यात आपले विचारदारिद्र्य उघड करणे) वगैरे अधिक कष्टाचे काम आहे आणि निर्दोष आहे असेही नाही. त्यापेक्षा आपल्या गाडीमध्ये बदल करणे हा कमी ऊर्जा, साधने वापरुनही यशाची शक्यता अधिक देणारा पर्याय आहे.

हे एका फटक्यात सुचले तसे लिहिले आहे. कदाचित काही अंतर्गत विसंवाद दिसेल, काही तपशीलांत चूकही असेल. त्याअर्थी हा साधकबाधक नव्हे तर तात्कालिक विचार म्हणायला हरकत नाही. पण एकुण भावना महत्वाची आणि टीका करणारा प्रत्येक जण विरोधक, शत्रू नसतो किंवा प्रत्येक प्रश्न हा आरोप नसतो इतके ध्यानात घेण्याइतपत खुलेपणाने वाचता आले तर उत्तम.

- oOo -


हे वाचले का?

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९

गिव एव्हरी डेविल हर ड्यू

मला राजकीय मते आहेत हे उघडच आहे. ती मी कधीच लपवली नाहीत. पण याचा अर्थ मी एक बाजू घेऊन ती बाजू पवित्र नि योग्य, त्या बाजूच्या माणसाने, पक्षाने, नेत्याने म्हटले ते तंतोतंत खरे असे म्हणत तलवारी घेऊन कुणावर हल्ले केले नाहीत. शाब्दिक हल्ले नक्कीच केले आणि करतही राहीन, पण ते माझ्या स्वत:च्या मतांसाठी, इतर कुणाच्या मला मनातून न पटलेल्या मुद्द्यावर समर्थन करण्यासाठी नाही.

अमुक मत माझ्या बाजूच्या बहुसंख्येचे, जातीचे, धर्माचे, पक्षाचे, नेत्याचे आहे ’म्हणून’ माझे असायला हवे, नि मला पटत नसून खाली डोके वर पाय करुन, एक डोळा मुडपून, एक तिरळा करुन, नाकपुड्या फेंदारून अष्टवक्रासनात बसून कसे बरोबर दिसते, अशा मखलाशा करणे यात काही शहाणपणा आहे असे मला वाटत नाही.

मी माझीच मते मांडतो. ती इतर कुण्या व्यक्तीच्या, गटाच्या, गावच्या, गल्लीतल्या, पेठेतल्या, ओसाडगावच्या व्यक्तीशी मिळतीजुळती आहेत, यानुसार ती व्यक्त करावीत की नाही हे ठरत नाही. मग सोबत असलेल्या एखाद्याने "तू असे ’त्यांच्या’ सोयीचे मत कसे व्यक्त करु शकतोस?" असा प्रश्न विचारला की काळेंच्या पद्धतीने (सेनेच्या पद्धतीने असते, मनसे पद्धतीने असते तर काळेंची का नसावी?) त्याचा समाचार घेतला जातो. माझे मत अमुक असेच असायला हवे ही अपेक्षा मी माझ्या जवळच्या माणसांचीही कधी पुरी केलेली नाही.

प्रत्येकाच्या बुद्धीला असतात तशा माझ्या बुद्धीलाही मर्यादा आहेतच. आणि माझ्याहून असंख्य बुद्धिमान लोक या जगात आहेत याची जाणीव आहेच. पण त्यांचेही मत मी ’प्रमाण’ मानणार नाहीच. त्याला चॅलेंज करण्याचा माझा हक्क, आकलनाच्या माझ्या मर्यादेत जगण्याचा हक्क मी राखून ठेवला आहे. ’आपल्याला काय कळतंय. आपण सामान्य माणसं.’ असं म्हणत कुणी ’इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी इक्वल टु मोअर इन्फिनिटी’ असे तारे तोडणार्‍या किंवा गटाराच्या गॅसवर चहाचा ठेला लावणार्‍या किंवा वडे तळून उरलेल्या तेलावर वाहने चालवण्याची अफाट क्रांतिकारी आयडिया देणार्‍यासमोर लोटांगण घालणार्‍यांच्या झुंडीचा भाग मी नाही. तसेच उलट दिशेने, त्या उदाहरणांमुळे ती व्यक्ती एका क्षणात पूर्ण मूर्ख ठरते असा दावा करणारे दुसर्‍या बाजूच्या झुंडीतले लोकही मला पूर्णपणे आपले वाटत नाहीत...

मी कुठल्या बाजूचा आहे की तटस्थ आहे की आणखी कसा याची फिकीर मी करत नाही. आपल्या विचाराशी एकनिष्ठ असले, संभाव्य चुकांचे भान असले, कुणाचे गुलाम नसले आणि प्रवाहाबरोबर वाहात न जाण्याचे भान असले की इतरांच्या जगण्याची उठाठेव करणार्‍या टिनपाट फेसबुकीं एककल्ली भक्तांना वा दुराग्रही विरोधकांना महत्व द्यायचे कारण नाही.

CuteDevil
https://joepalmer.wordpress.com/ येथून साभार.

माझे कायमचे धोरण हेच आहे, ’मला तुझे हे म्हणणे मान्य, वा पटले, वा पटले नाही. या पलिकडे संपूर्ण व्यक्ती म्हणून माझे तुझ्याबद्दल उलट मतही असू शकेल.’ (तटस्थतेचा आव आणण्यासाठी मला हे करावेच लागणार ना. :) ) माझे एक मत तुम्हाला पटले, म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही पाठवून सोबत आलात, की 'आता मी फक्त तुमच्या बाजूचीच मते उचलून धरावीत हा तुमचा भ्रम आहे, माझा दावा नाही' हे तुम्ही समजून घ्यायला हवे. तुम्हाला न पटणारे मी काही लिहिले, की मी ’तटस्थतेचा आव आणतो’ असा हेत्वारोप करणे हे तुम्हाला मतभिन्नता मानवत नसल्याचे लक्षण आहे.

गंमत म्हणजे अनेकदा हा आरोप उलट दिशेने आधीच केला जातो. आपल्या शेरेबाजीला आपले विचार वा विश्लेषण समजणारे हे लोक केवळ प्रात:स्मरणीयच असतात. (माझाच नियम तोडतो आहे, माफ करा: एक सद्गृहस्थ शेरेबाजी करणार्‍या, हेत्वारोप करणार्‍या ’केवळ तीन शब्दांच्या’(!) जोरावर अनेक वर्षे मैला-मैलाच्या प्रतिक्रिया देत असतात नि वर समोरच्याला ’तुम्हाला मतभिन्नता मानवत नाही तर आपली तळी उचलणारेच लोक जमवा.’ असा कांगावाही स्वत:च करतात.) राजकारण्यांकडून, गुन्हेगारांकडून 'प्रिएम्टिव स्ट्राईक' नावाचा प्रकार सामान्य माणसेही उत्तम शिकली आहेत याचे हे लक्षण आहे. :)

फेसबुक हे गण्याला गणपतराव करणारा फिल्टर आहे. चार लाईक्स मिळू लागल्या की प्रत्यक्षातही आपण गणपतरावच आहोत असा भ्रम त्याला होतो आणि आपल्या कुवतीपेक्षा मोठा घास तो घेऊ लागतो. सामाजिक माध्यम म्हटले की, शृंगारिक अर्थाने नसले तरी वर्चुअल अर्थाने तोंडाला तोंड लागतेच. त्यातून वैतागही पदरी येतो. ’अरे तुझी लायकी काय बाबा. चवथी पास मुलाची समज नाही आणि कुणाची अक्कल काढतोस?’ असे अनेकदा म्हणण्याची इच्छा झाली आहे. पण त्या चवथी पास प्राण्याने ज्या खरोखरच्या लायक माणसाची अक्कल काढली त्याचे लढे त्यालाच लढू द्यावे म्हणून बहुधा गप्प राहिलो आहे. कुणाची वकीली करण्याचा प्रयत्न केलेला नाही.

हे समाज-माध्यम म्हणून ओळखले जात असल्याने संवाद महत्वाचा असतो. आणि त्यातून विसंवाद आलाच आणि पाठोपाठ भांडणही. पण विसंवादाला आपल्या सुरक्षित क्षेत्रात, आपल्या वॉलवर नेऊन आपली झुंड जमवून आपले मत वाजवणारे पाहिले की समाजात विचारापेक्षा जमाव जमवून आपले खरे करण्याला किती महत्व आहे हे दिसते.

हे पाप माझ्या हातून घडू नये म्हणून काही मंडळींनी नाव घेऊन, काहींनी नाव न घेता माझी टिंगलटवाळी करणारी, टीका करणारी, कुत्सित शेरेबाजी करणारी पोस्ट केली तरी त्याची दखल घेतलेली नाही. इथले कुणीही माझे सुहृद नाही की कुणी शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्यावर मी पोस्ट लिहावी इतके महत्व मी क्वचितच कुणाला देतो. त्यातही एका विशिष्ट मानसिकतेचा, मताचा आढावा वा टीका यासाठी. नाव न घेता जनरलाईज पोस्ट करायची पण रोख एका विशिष्ट व्यक्तीवर, हा बुरख्यातला पळपुटेपणा मी कधीही केला नाही. त्यामुळे असले प्राणी गेले तर उनकी जै जै म्हणून सोडून देत आलो आहे.

काही लोक तर फक्त तुमच्याशी पंगा घेण्यासाठीच तुमच्याशी जोडून घेतात. अशा व्यक्तींची मानसिकता नक्की काय असते याबाबत कुतूहल आहे. म्हणजे आयुष्यातील आपल्या दगदग, कामाचे, घरचे ताण यातून आपण समाजमाध्यमावर येतो. तिथे पुन्हा हटकून वाद घालण्याची सोय करण्याची, डोक्याचा ताप आणखी वाढवण्याची उठाठेव हे लोक का करत असतील? माझे म्हणणे मान्य तंतोतंत मान्य करत नाहीस तोवर तू पुरेसा तटस्थ नाहीस, तिकडचा आहेस. दुसरीकडे 'तिकडच्यांच्या सोयीचे दहा टक्के तू बोलतोस म्हणून तू आमचा नाहीस' हे तिकडचे म्हणणार. ’माणूस हा बुद्धी विकसित झालेला, पण अक्कल अजूनही खुरटलेला प्राणी आहे’ असे मी म्हणतो ते त्यासाठी.

दाऊद इब्राहिमला उत्तम गाता येत असते तरी मी त्याची त्याबद्दल प्रशंसा केली असती. त्यातून त्याच्या कृष्णकृत्यांचे समर्थन करता असे म्हणणार्‍या विचारशून्यांच्या मताला मी हिंगलून विचारले नसते. अडवानींनी मला समाजवाद उत्तम समजावून दिला असता, तर मी त्याबद्दल त्यांची वाखाणणी केली असती. मार्क्सची सारी मते पटत नसली, तरी त्याने त्याला अपेक्षित व्यवस्थेसाठी प्रथमच वापरलेल्या सर्वांगीण दृष्टिकोनासाठी (holistic approach) मी त्याला दाद दिली.

संघाची नि माझी वैचारिक झटापट सर्वज्ञात असून त्यांचे एकमेवाद्वितीय असे संघटनकौशल्य डोके ठिकाणावर असलेल्या कुणालाही नाकारता येणार नाही. अलिकडे अर्धवट पुरोगाम्यांकडून सतत माफीवीर (ऐतिहासिक तथ्याबद्दल माझे काही म्हणणे नाही, आक्षेप वृत्तीबद्दल आहे) म्हणून हिणवले जाणारे सावरकर हे हिंदुत्ववादी असले म्हणून मला प्रात:स्मरणीय वगैरे अजिबात नसले, तरी त्यांनी भाषाशुद्धीच्या क्षेत्रातील, साहित्याच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान मी नाकारणार नाही.

राजकारणाच्या क्षेत्रात नेहरूंइतके उत्तुंग, बुद्धिमान आणि कर्तृत्ववान नेतृत्व भारतात दुसरे एकही सापडणार नाही असे माझे मत आहे. पण त्याचवेळी ते जनतेचे नेते असले तरी, काँग्रेस पक्षांतर्गत बहुसंख्येचे नेते नव्हते हे नाकारत नाही. पण असे म्हणताना बहुसंख्येने निवडलेला नेता कर्तृत्ववान असता असा अपलाप करणार्‍या नेहरुद्वेष्ट्यांशीही मतभेद व्यक्त करतो.

गांधीबाबाने राजकारणाची धर्माशी घातलेली सांगड मला मान्य नाही. पण 'माणूस नैतिक पातळीवर बदलला नाही तर कोणतीही व्यवस्था उभी राहाणार नाही' या त्याच्या दृष्टिकोनाशी मी तंतोतंत सहमत आहे. भांडवलशाहीच्या ’निकोप स्पर्धाव्यवस्था’ संकल्पनेला आणि दुसर्‍या टोकाला असलेल्या कम्युनिस्टांना अपेक्षित जनसंघटनांच्या स्वरूपातील समाजाला स्थिर ठेवायचे असेल, तर त्याचा पाया गांधीबाबाच्या या तत्त्वाने जाऊनच बळकट होऊ शकतो यावर माझा ठाम विश्वास आहे. अन्यथा 'निकोप स्पर्धा' नावाचे काही अस्तित्वात राहात नाही, (ज्याचा अनुभव आपण पदोपदी घेतच असतो) आणि ’एकमेका साह्य करु’ या गृहितकावर उभ्या असलेल्या साम्यवादी समाजाला स्वार्थाची वाळवी केव्हाच पोखरुन जमीनदोस्त करते. दंडशक्तीच्या आधारे एखादी व्यवस्था स्थिर ठेवता येईल यावर, ज्यांच्या हाती ती दंडशक्ती आणि इतरांचे मेंदू आहेत केवळ त्यांचाच विश्वास असू शकतो.

थोडक्यात काय सर्व रंगाच्या, इझमच्या, बाजूच्या लोकांच्या दृष्टीने मी एक तंतोतंत परका माणूस आहे. माझी मानसिक जडणघडणच तशी आहे. विचाराने नास्तिक (वैफल्याने नव्हे!) झालेल्याला जसे पुन्हा आस्तिक होणे शक्य होत नाही तसेच ही घडण बदलणे मला शक्य नाही.

तेव्हा एक मत पटले म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची किंवा न पटले म्हणून याला चांगला फैलावर घेऊ म्हणून वादाच्या खुमखुमीनेही पाठवू नका बाबांनो, तायांनो. पुढच्या अपेक्षाभंगातून वादंग, कुत्सितपणा, भांडणे, अक्कल काढणे होणार असेल तर (फेसबुकने) दिल्या भिंतीवर सुखी राहा. आम्हीही राहतो.

-oOo-


हे वाचले का?

पर्यायाचा विचार, सिंहासनाचा खेळ आणि सेनेचा वाघ

एखादी जुनी व्यवस्था, जुनी निवड ही ’कालबाह्य झाली आहे, घातक आहे, बदलली पाहिजे’ म्हणून ओरड सुरु झाली की सर्वप्रथम ’पर्याय काय?’ या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे. अन्यथा आगीतून फुफाट्यात पडण्याचा अनुभव अनेकदा येतो. ‘आहे हे इतके वाईट नि घातक आहे की पर्याय म्हणजे इतर काहीही चालेल' किंवा' हे आधी जाऊ तर द्या, पर्याय आपोआप उभा राहील’ हे उत्तर पर्यायाचा विचारच न केल्याचे निदर्शक असते. ते वैचारिक आळशीपणाचे किंवा विद्रोहाचा विचार करता थकलेल्या मेंदूकडे रचनात्मक विचारासाठी, योग्य निरासाचा विचार करण्यासाठी पुरेशी ऊर्जाच शिल्लक न राहिल्याचे लक्षणही असते.

जुन्या विचाराला, व्यवस्थेला नाकारून नवा विचार, नवी व्यवस्था स्वीकारताना त्यालाही मूल्यमापनाच्या, विश्लेषणाच्या माध्यमातून तावून-सुलाखून बाहेर पडणे आवश्यक असते. जुन्यातले काही दोष हा नवा पर्याय निवारतो आहे हे सिद्ध करावे लागते. त्याचप्रमाणे जर हा नवा पर्यायही काही नवे दोष घेऊन येत असेल (आणि तो येतोच, पण तो देणाऱ्याला ते दिसत नाहीत वा दिसले तरी मान्य केले जात नाहीत इतकेच) तर त्यांतून होणारे नुकसान हे जुन्या पर्यायांतील दोषांतून होणाऱ्या नुकसानापेक्षा व्याप्तीने अथवा गुणवत्तेने कमी घातक आहेत हे वस्तुनिष्ठपणे सिद्ध करता यायला हवे. तेव्हाच तो नवा पर्याय स्वीकारार्ह होऊ शकतो. पर्यायांची निवड केवळ त्यांच्या निष्ठावंतांच्या बहुसंख्येच्या आधारे करायची म्हटली, तर सुमारांची निवडच विजयी ठरण्याची शक्यता अधिक असते. कारण त्यांच्या निष्ठा या पर्यायाच्या गुणवत्तेपेक्षा अन्य निकषांवरच जोडल्या असण्याची शक्यता अधिक असते.

हा प्रश्न केवळ राजकीय नाही. हाच प्रश्न विशिष्ट विचारसरणीचे झेंडे घेतलेल्यांना विचारला, तर बहुतेक वेळा त्याचे उत्तर समाधानकारक नसते. आणि तसे ते नाही, हे त्यांना मान्य नसते. पण ज्या प्रकारचे आरोप वा चुका इतरांच्या बाबतीत अहमहमिकेने दाखवतात (अनेकदा ते साधारही असते) नेमके तेच निकष, त्याच प्रकारच्या चुका ते स्वत:च्या इझम अथवा नेत्याबाबत मात्र मान्य करण्यास तयार नसतात. उदाहरण द्यायचे तर भांडवलशाहीचे सारे विवेचन हे अस्थिर अशा बाजार-संतुलनाच्या गृहितकावर आधारित आहे असा आरोप करणाऱ्या कम्युनिस्टाला त्याला अपेक्षित असलेली अंतिम अवस्था- वर्गविहीन समाज अथवा जनसंघटनांचे राज्य – ही अवस्थाही तितकीच अस्थिर, क्षणभंगुर आहे, माणसाचा स्वार्थ नि ईर्षा तिला शक्य तितक्या लवकर धुळीला मिळवणार आहे हे मात्र मान्य नसते.

थोडक्यात ते इतरांच्या चुकांचे काटेकोर विश्लेषण करतात, आपली सारी बुद्धी पणाला लावून इतरांच्या बाजूचे व्यवस्थित निर्दालन करतात. पण त्याला पर्याय द्यायची वेळ आली की तेही फारसा विचार, उहापोह न करता सदोष पर्यायच समोर ठेवतात. पण त्यातले दोष नाकारुन तो निर्दोष असल्याची बतावणी करतात इतकेच. पण तो तसा नाही हे सप्रमाण – अगदी त्यांचेच निकष लावून, दाखवून दिले तरी ते मान्य करण्याचे नाकारतात. फारतर ‘त्या व्यवस्थेला/व्यक्तीला संधी दिली, आता हिला/यालाही संधी द्या’ म्हणून पळवाट काढत असतात.

इतरांच्या चुका, त्यांचे दोष काढण्यात ते इतके मग्न असतात, इतकी ऊर्जा खर्च करतात की पर्यायाचा विचार सुरू होईतो बहुधा ते थकून जातात नि कुठलातरी एक पर्याय समोर ठेवून ‘हा अंतिम नि निर्दोष पर्याय’ असे जाहीर करून टाकतात. त्यावर आलेले आक्षेप हे, ‘आमच्याबद्दलच्या आकसाने घेतले आहेत’, ‘समोरच्याला आमचे म्हणणे नीट समजलेले नाही’, ‘त्याने आणखी अभ्यास करावा’, ‘बाहेरून न पाहता आत येऊन पाहावे’ अशा तर्कसंगतीने खोडता न येणाऱ्या, आदेशस्वरुप, अंतिम निवाडासदृश प्रतिवादांच्या आधारे झटकून टाकतात.

ाजकारण, विचारसरणीच नव्हे तर अनेक कथा, कादंबरींबाबत तसंच नाटक आणि चित्रपट या ललित कलांबाबत अनेकदा असाच अनुभव येत असतो. सारी कथावस्तू बारीक बारीक तपशीलांसह अतिशय बारकाईने विणून झाल्यावर शेवटाला पोचेतो लेखक/पटकथालेखक बहुधा थकून जातो. किंवा आपणच विणलेल्या मजबूत जाळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला सापडेनासा होतो. मग तो स्वत:चे ते जाळे कापून काढल्यासारख्या घाईगडबडीने काही धागे कापत त्यातून बाहेर पडतो. त्यात त्यानेच बांधलेल्या देखण्या कथावास्तूच्या काही विटा निखळतात. नाटक, चित्रपटांसारख्या वेळेचे बंधन असलेल्या (लेखनात कदाचित शब्द अथवा पृष्ठसंख्येचे बंधन पाळताना) अनेकदा शेवट धाडकन पडल्यासारखा भासतो तो त्यामुळेच.

RautOnOffensive

आज महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनाही असेच आपणच विणलेल्या जाळ्यात धडपडताना दिसते आहे. जवळजवळ तीन-दशके असलेली भाजपसोबतची युती तोडून त्यांनी स्वतंत्र जाण्याचा विचार केला खरा, पण त्यानंतरच्या पर्यायाचा विचार करण्यावर त्यांनी फार लक्ष दिले असे दिसत नाही. भाजपसोबत मुख्यमंत्रीपदाचे गणित त्या दबावानेच जमेल, असा बहुधा तिच्या नेत्यांचा होरा असावा. यासाठीच ‘गुड कॉप, बॅड कॉप’चा खेळ मातोश्री खेळत होती. म्हणूनच भाजपवर केलेला सारा शाब्दिक अग्निवर्षाव हा उद्धव ठाकरे अथवा प्रत्यक्ष राजकारणात उतरलेल्या कुण्या नेत्याने नव्हे, तर संजय राऊत यांच्यामार्फत होत होता. आणि हा डाव यशस्वी होण्यासाठी शरद पवार यांच्याशी संपर्कात राहून, ‘आम्हाला तो पर्यायही उपलब्ध आहे’ असे भासवत, दबाव आणखी तीव्र करण्याचा खेळ राऊत खेळत होते. भाजप थोडा नमते घेतो आहे असे दिसले असते, तर सामोपचाराची बोलणी करण्यास राऊत यांना मागे सारत उद्धव ठाकरे पुढे होणार होते, ‘गुड कॉप’ची भूमिका वठवणार होते.

संघपरिवारात राऊत यांची भूमिका बजरंग दल, वि.हिं.प. सारख्या आक्रमक संघटना वठवतात तर त्यांचे उपद्व्याप फार अंगाशी आले की ‘गुड कॉप’ची किंवा संकटनिवारकाची भूमिका घेऊन सरसंघचालक पुढे येतात असा अनुभव आहे.

पण सेनेचे गणित जसे बदलत होते, तसेच भाजपचे गणितही बदलते आहे, याचा अंदाज बहुधा सेनानेत्यांना आला नसावा. जरी फडणवीस यांची विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड झाली असली, तरी सेना हटून बसली तशी तिकडेही वारे फिरू लागले. फडणवीस यांना विंगमध्ये बसवण्यात आले. भाजपतर्फे चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी रंगमंचावर येत सरकारच्या स्थापनेसंबंधीच्या हालचालींबद्दल बोलायला सुरुवात केली. आणि राऊत यांच्या दैनिक प्रतिक्रियांना उत्तर देण्यासाठी भाजपतर्फे रामदास आठवले यांची योजना झाली. थोडक्यात मातोश्रीच्या तोडीचे नेते म्हणून चंद्रकांत पाटील आणि मुनगंटीवार, आणि राऊत यांना प्रत्युत्तर द्यायला तर स्वत:चा एकही खासदार वा आमदार निवडून आणू न शकणारे रामदास आठवले पुरेसे आहेत, असे भाजप सुचवू लागला होता.

आजवर सेना आणि भाजप यांच्या नात्यामध्ये सेना हा मोठा भाऊ होता. तर बाळासाहेब ठाकरे हे युतीचे निर्विवाद नेते होते. त्यांचे स्थान महाराष्ट्रातील भाजपच्या कोणत्याही नेत्यापेक्षा वरचे मानले जात होते. बाळासाहेबांचा आग्रह असे, की त्यांच्याशी केंद्रीय नेत्यांनीच बोलावे. महाजन-मुंडे त्यांचा हट्ट पुरवतही असत. पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती. तेव्हा सेना मोठा भाऊ होता. आता परिस्थिती बदलली आहे.

एरवी कोणत्याही राज्यात सत्तेचे गणित जमवण्यासाठी तातडीने धावून जाणारे अमित शहा इकडे फिरकलेही नाहीत. त्याच वेळी, महाराष्ट्राबरोबरच निवडणुका झालेल्या हरयानामध्ये तातडीने हालचाल करून त्यांनी भाजपचे सरकार स्थापन केले. आता सेना दुय्यम भूमिकेत आहे हे ठसवण्यासाठी ‘मी उद्धवना भेटणार नाही, त्यांनी राज्यातील नेत्यांशी बोलावे’ असेच ते सूचित करत राहिले. ज्याप्रमाणे सेनेने ‘आता दुय्यम भूमिका घ्यायची नाही, मग शेंडी तुटो वा पारंबी तुटो’ हे ठाम ठरवले, त्याचप्रमाणे यावेळी सेनेला आणखी दुय्यम भूमिका घेण्यास भाग पाडायचे, असे भाजपच्या चाणक्यांनी नक्की केलेले दिसले. ‘एकवेळ त्यासाठी युती तुटली तरी चालेल, पण सेनेसमोर नमणार नाही. त्यांच्यासोबत सत्ता सोबत स्थापण्यास हरकत नसली, तरी ती आपल्या अटी-शर्तींवरच राबवली जाईल’ हे पुरेसे स्पष्टपणे सेनेला दाखवून देण्यात आले. या दोनही ताठर भूमिकांनी, त्यांनी कदाचित केवळ दबावापुरत्या उभ्या केलेल्या सेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पर्यायाकडे सेनेला ढकलत नेले आहे.

ThakreWaiting

हे सेनेला अनपेक्षित असावे असे आता दिसू लागले आहे. कारण इथे वर म्हटले तसे पर्यायाचा पुरेसा वापर न केल्याचे पाप सेनेकडून घडलेले दिसते आहे. ‘आम्ही सरकार स्थापणार नाही.’ असे भाजपने निर्णायकरित्या राज्यपालांना सांगितल्यावर सेनेला दुसरा पर्याय म्हणून आघाडीकडे जाणे क्रमप्राप्त झाले. पर्यायाचा सांगोपांग विचार न करता तो स्वत:ला कायमच उपलब्ध असल्याचे सेनेने गृहित धरले आणि इथे सेना पेचात अडकली आहे.

पर्याय म्हणून या तीन पक्षांच्या आघाडीचा सेनेने खरोखरच विचार केला होता की नाही अशी शंका येते. भाजपने सरकार-स्थापनेस असमर्थता दर्शवण्यापूर्वी राऊत यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटी वगळता, या तीन पक्षांमध्ये कोणताही औपचारिक संवाद झाल्याचे दिसत नाही. जर हा सेनेचा युती-सरकारला पर्याय किंवा ’प्लॅन बी’ असेल, तर त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टिने निदान प्राथमिक चर्चा होणे अपेक्षित होते. अगदी थेट ’किमान सहमतीचा कार्यक्रम’ नाही, तरी अडचणीचे संभाव्य मुद्दे समोर ठेवून, त्यावर होणार्‍या मतभेदांतून मार्ग काढण्यासाठी बोलणी व्हायला हवी होती.

हे पुरेसे नाही म्हणून की काय, भाजपानंतर राज्यपालांनी सेनेला सरकार स्थापनेस पाचारण केल्यानंतर सेनेने या दोन पक्षांकडे पाठिंब्याची औपचारिक विनंतीही केली नाही. आपल्याला जसा पर्याय नाही, तसाच यांनाही नाही, त्यामुळे ते ’मागुते येतील’ हे गृहित धरण्यात आले. राजकीयदृष्ट्या सेनेची अपरिपक्वता इथे उघडी पडली.

भाजपला अंगठा – किंवा भाजपने त्यांना, किंवा दोघांनी एकमेकांना – दाखवल्यानंतर सेनेला जरी सत्तास्थापनेशिवाय पर्याय उरला नसला, तरी चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या काँग्रेसकडे विधिमंडळात गमावण्याजोगे फारसे काही नव्हते. विरोधी पक्ष म्हणून बसण्याचा पर्याय त्यांना कायमच उपलब्ध होता. याशिवाय हिंदी पट्ट्यात भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसला, सेनेसोबत जाण्याच्या निर्णयाला त्या व्यापक परिप्रेक्ष्यातही पाहावे लागणार होते. उत्तर भारतात सेनेबद्दल अजूनही अढी असल्यामुळे काँग्रेसच्या तिकडच्या नेत्यांकडून नकारात्मक प्रतिक्रिया येणार होत्याच.

त्यात भर म्हणून निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी भाजपला तोडीस-तोड हिंदुत्ववाद ठसवण्याच्या दृष्टिने अयोध्यावारी केली. एवढेच नव्हे तर निकालानंतर मी स्वत: मंदिर बनवण्यास जाईन अशी घोषणा केली. हे मुद्दे काँग्रेसच्या दृष्टिने अडचणीचे ठरणारे होते.

याउलट पाठिंबा दिला नाही, तरी विरोधात बसणे हे काँग्रेसच्या दृष्टिने निकालाचा भाग होतेच. किंबहुना पाठिंबा दिला तर चौथ्या क्रमांकाच्या पक्षाने दिलेला विनाअट पाठिंबा सत्तालोलुपतेचे निदर्शक असल्याचा आरोप सहन करावा लागणार होता. दुसरीकडे सेनेच्या धोरणामागे फरफटत गेल्याने स्वपक्षीयांचा रोष नि भाजपला आयते कोलित दिल्याचे पापही घडणार होते. अशा स्थितीत काँग्रेसने जपून पावले उचलण्याचा निर्णय घेतला हे अगदीच समजण्यासारखे आहे. पण ते तसा घेतील याचा अंदाज सेना-नेतृत्वाला आला नाही. भाजप सत्तेवरुन पायउतार झाला, की सगळे पाठिंब्यासाठी आपल्यामागे धावत येतील, ही अपेक्षा अविचारी ठरली.

पण काँग्रेस, राष्ट्रवादीचे क्षणभर बाजूला ठेवले तरी युतीचा केंद्रापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतचा विस्तार पाहता, भाजपशी फारकत घेण्याचा सेनेचा निर्णयही तसा दूरगामी होता. केवळ राज्यात आपले सरकार आणि मुख्यमंत्री हवेत हे साध्य समोर ठेवत युती मोडीत काढण्याने, केंद्रातील खासदारांनाही आपली भूमिका बदलण्याची गरज निर्माण झाली. तसेच मुंबईसह अन्य ठिकाणी जिथे महानगरपालिका, नगरपालिका वगैरे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही युती निर्णायक ठरली होती. आता तिच्यात पडलेली ही फूट कुठे कुठे नुकसान करणार आहे, तिथले अन्य कार्यकर्ते, नेते यांना काय गमवावे लागणार आहे, याचा विचारही करणे क्रमप्राप्त होते. केंद्रात केवळ अरविंद सावंत यांच्या रूपाने एकच मंत्री असल्याने भूमिका-बदल सुकर झाला असला तरी खासदारांना -राज्यातील सत्तेखातर- सत्तेकडून विरोधात झालेली बदली कितपत रुचणार आहे, हे ही अजून समोर यायचे आहे.

KeepWaiting

गल्ली पासून दिल्लीपर्यंत विविध पातळीवर सेना आणि आघाडीच्या दृष्टिकोनात मतभिन्नता आहे. एकीकडे प्रादेशिक पक्ष नि प्रादेशिक अस्मिता यांचे कुंपण, तर दुसरीकडे वैचारिक प्रवाह भिन्न असल्याने सेना + आघाडीचे सरकारचे घटक पक्ष भविष्यात अनेक मुद्द्यांवर परस्परविरोधांत उभे राहणार हे उघड आहे. त्याबाबत विचार न करता सत्तेत बसण्याची घाई, केवळ प्रादेशिक पक्ष असलेल्या सेना आणि प्रचंड लवचिक भूमिका असलेल्या राष्ट्रवादीला परवडणारी असली, तरी काँग्रेसला परवडणारी नाही याचे भान काँग्रेस नेतृत्वाने राखले आहे. आजच्या परिस्थितीत झालेली कोंडी जर फुटली नाही तर नव्याने निवडणुकीला सामोरे जाताना सेनेसमोर काय पर्याय उरतात याचा विचारही नेतृत्वाने करायला हवा होता. एकुणात अनुकूल तेच घडेल असे समजत शक्यतांचा विचार न करण्याची, आणि प्रतिकूल घडले की त्याचे खापर इतर कुणावर फोडण्याची परंपरा सेनेनेही अनुसरल्याचे दिसते आहे.

१९ तारखेला शरद पवार यांनी ’सत्तास्थापनेचे काय?’ या पत्रकारांच्या प्रश्नाला, गेल्या जवळजवळ महिन्याभरातील अनेक भेटी बैठकींनंतर, पुन्हा एकवार ’सेना-भाजपला विचारा’ म्हणत उडवून लावले आहे. यातून अस्वस्थ झालेल्या सेना आमदारांनी प्लॅन बी (खरेतर प्लॅन सी म्हणायला हवे) तयार करण्याची गळ उद्धव ठाकरे यांना घातल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. हे उशीरा आलेले शहाणपण म्हणावे लागेल. अडीच वर्षे मुख्यमंत्री नि युतीचे सरकार या ’प्लॅन ए’ ला सेना-आघाडी सरकार हा प्लॅन-बी विचारपूर्वक उभा न केल्याचा परिणाम म्हणून आज ’प्लॅन सी’चा विचार करण्याची वेळ आली आहे. पर्यायांच्या अनेक शक्यतांमध्ये त्यांना तो सापडतो की नाही हे काळच ठरवेल.

जगभर प्रचंड गाजलेल्या ’गेम ऑफ थ्रोन्स’ नावाच्या मालिकेचा या वर्षी प्रसारित झालेला शेवटचा सीझन प्रेक्षकांना एकदम जमिनीवर आणणारा ठरला. अपेक्षांचे प्रचंड ओझे घेऊन उतरलेल्या लेखक-निर्मात्याला ते पेलले नाही आणि त्याला सर्वांचाच रोष ओढवून घ्यावा लागला. महाराष्ट्रातील ’सिंहासनाच्या खेळा’त शिवसेनेच्या वाघाची गतही तशीच होऊ नये.

-oOo-

(पूर्वप्रसिद्धी: ’द वायर-मराठी’ https://marathi.thewire.in/shivsena-uddhav-thackeray-maharashtra-power-play)


हे वाचले का?

ऑनलाईन शॉपिंग आणि स्थानिक विक्रेते

EmotionalOnShopping

---
फेसबुकवर सचिन डांगे यांनी केलेली पोस्ट:

दहा वर्षांपूर्वी फ्रीज विकत घ्यायला एका इलेक्ट्रोनिकच्या दुकानात गेलो होतो. काहीतरी 5-स्टार असणारा फ्रीज पसंत केला आणि पैसे देऊन विकत घेतला. पण त्या दुकानदाराने घरी पाठवलेला फ्रीज 4-स्टार चा होता... तडक दुकान गाठले, त्याला पावती दाखवली आणि तक्रार केली तर वस्तू घेईपर्यंत जी-हुजुरी करून गोडगोड बोलणारा दुकानदार आता नीट वागत नव्हता. झालेली चूक मान्यही केली नाही.. 5-स्टार वाला फ्रीज नव्हता म्हणून 4वाला पाठवला, त्याला काय होतेय..इत्यादी.. त्याची किंमत पाचशे रुपये कमी होती, तेवढे परत दिले. वागणूक अशी की जसा मी त्या दुकानात हजर आहे की नाही.. फ्रीज घेतला, डिलिवरी झाली आणि हम आपके है कौन...

अशा प्रकारचे अनुभव भरपूर लोकांनी घेतले असतील...

डिलिवरी झाल्यावर काही प्रॉब्लेम आला तर थेट उत्पादक कंपनीला फोन लावा, आता तुम्ही कंपनीच्या भरोशावर, दुकानदाराचा काही संबंध नाही. अशा व्यवस्थेत जर दुकानदार मला काहीच value addition देत नसेल तर कशाला दुकानदाराचा विचार करावा? तेच सर्व कमी पैशात होत असेल तर online बरे आहे की..

आज असे काकुळतीला आलेले भावूक विनवणीचे बोर्ड बहुतांश त्याच इलेक्ट्रोनिक दुकानांमधून लागले आहेत... बाकी किरकोळ दुकानदारांना online shopping चा फारसा काही फरक पडलेला नाही ... खूप छळले आहे सामान्य ग्राहकांना ह्या इलेक्ट्रोनिक वाल्यांनी मागच्या तीस चाळीस वर्षात.... सबको यही पर हिसाब चुकाना पडता है. सबकी बारी आती है.

---

माझे असे काही अनुभव आहेत. त्यातील हा एक:

पुण्यातील एक प्रथितयश संगणक नि सुटे भाग विकणार्‍या दुकानात गेलो.तेव्हा गल्ली-बोळात संगणक विकणारे नि त्यासंबंधी सेवा पुरवणारी दुकाने फोफावली नव्हती. मध्यवस्तीमध्ये असलेले हे त्यातल्या त्यात प्रथितयश दुकान होते. (शिवाय चोरून पायरेटेड सॉफ्टवेअरही विकत असल्याने लोकप्रियदेखील.)

मला माझ्या संगणक (desktop)साठी इन्टरनल(internal) हार्डडिस्क घ्यायची होती. एक प्रसिद्ध कंपनीची हार्डडिस्क निवडली. वॉरंटी वगैरे नीट विचारून घेतले. पैसे ट्रान्स्फर केले नि थांबलो. डिस्क मिळाली. काही मिनिटे गेली. रिसीट मिळायचे नाव नाही. पुन्हा आठवण केली तर म्हणे, ‘रिसीट हवी असेल तर टॅक्स भरावा लागेल.’ वाद घातल्यावर म्हणे, ‘तुम्हाला किंमत सांगितली ती विदाऊट टॅक्स सांगितली. तुम्हाला रिसीट हवी आहे हे आधी सांगितलं नाहीत.’ म्हटलं, ‘वेगळं सांगायची गरज काय? संगणकाचे भाग– ते ही हार्डडिस्कसारखे वॉरंटी देणारे – रिसीट-विना कोण घेतो? रिसीट-विना वॉरंटी क्लेम कशी करणार?’ तर म्हणे, ‘तिची गरज नसते. आम्हाला आमचे गिर्‍हाईक माहित असते.’ अखेर थोड्या वादावादीनंतर रिसीट मिळाली. त्यात दिलेल्या पैशातूनच वजा केलेल्या टॅक्सचा उल्लेख होता!

घरी नेली नि संगणकाला जोडली तर त्याचा आयसी उडला. वॉरंटी क्लेमसाठी डिस्क घेऊन त्यांच्याकडे गेलो. आधी तर ही आमच्याकडची नाही असा विश्वामित्री सूर लावला. (‘आम्हाला आमचे गिर्‍हाईक माहित असते’ हे खरेच, पण आम्ही नंतर ओळख देऊ असे कुठे म्हटले होते.) मग रिसीट काढून दाखवल्यावर नरमले. मग दुकानाऐवजी समोरच्या बाजूला एका अंधार्‍या गल्लीत असलेल्या ‘सर्विस सेंटर’वर जाण्याचा आदेश मिळाला. निमूट तिथे गेलो तेव्हा ‘टेस्ट’ करून आयसी उडाला आहे असे सांगण्यात आले.

म्हटलं, ‘ते मला माहित आहे की, मला रिप्लेसमेंट हवी आहे.’ तर ‘आयसी वॉरंटीमध्ये येत नाही’ असे सांगण्यात आले. मी उडालोच. ‘अरे म्हटलं आयसी वगळला तर राहातं काय त्यात चार मॅग्नेटिक चकत्या नि त्यावर फिरणारा दांडू?’ पुन्हा ‘तुमची चूक असल्याने वॉरंटी व्हॅलिड राहात नाही.’ असे ऐकवले. म्हटले, ‘कशावरून माझी चूक? शेवटी कुठलाही पार्ट नेणारा स्वत: वा अन्य तज्ज्ञाकडूनच तो जोडणार. मी गेली दहा वर्षे माझ्या स्वत:च्या नि पाच वर्षे माझ्या कंपनीच्या संगणकांची डागडुजी करत आलो आहे. जोडणी मला व्यवस्थित करता येतेच.’ पुन्हा थोडा वाद घातला तर म्हणे, ‘कंपनीकडे पाठवावी लागेल, त्यांच्याकडून रिप्लेसमेंट येईल तेव्हा मिळेल.’ म्हटलं, ‘पाठवा, मला घाई नाही.’ तर म्हणे ‘शिपिंग चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील.’

आता माझी सहनशक्ती संपल्याने साडेपाच हजार रुपयांच्या त्या डिस्कसाठी आणखी साडेतीनशे भरले. पुढे महिनाभर फॉलो-अप केल्यावर ती हार्ड-डिस्क पदरी पडली. वास्तविक त्यांनी त्यांच्याकडील डिस्क देऊन वॉरंटी क्लेम फॉर्म भरून त्यावर माझी सही घेणे अपेक्षित असते. त्यानंतर तो फॉर्म पाठवून त्यांना कंपनीकडून दुसरी डिस्क मिळेल असा नियम होता. शिपिंग चार्जेसही कंपनी देत असे. त्यांनी मधल्या-मध्ये माझ्याकडून साडेतीनशे रूपये खिशात घातले.

त्यानंतर त्या दुकानाची पुन्हा पायरी चढलेलो नाही. पुढे अमेजनच्या उदयानंतर मी संगणकासंबंधी खरेदी ऑनलाईनच करू लागलो.

आणखी एक महत्वाचा मुद्दा असतो तो इलेक्ट्रॉनिक पेमेंटचा. ‘अमेजन’सारख्या (Amazon) कंपन्या डिजिटल पेमेंटसाठी आणखी सूट देतात. माझ्या साधारण एकवीस हजाराच्या टीवीवर मला जास्तीचा दीड हजार डिस्काऊंट केवळ डिजिटल पेमेंटसाठी मिळाला. याउलट हे दुकानदार ‘क्रेडिट कार्ड’ला दोन टक्के जास्त द्यावे लागतील म्हणतात.

एकदा एक आयनाईज्ड भांडे ऑनलाईन मागवले तर त्याचे हँडल तुटलेले निघाले, तातडीने ऑनलाईन रिप्लेसमेंट रिक्वेस्ट टाकली. एक दिवस गेला नि पर्यायी भांडे आले. त्याचेही हँडल तुटलेले निघाले. पुन्हा रिप्लेसमेंट रिक्वेस्ट टाकली. चोवीस तासात पिक-अप झाला नि चौथ्या दिवशी न मागता, भांडता रिफंड क्रेडिट झाला. हेच मी दुकानदाराकडे काही कारणाने रिप्लेसमेंटला गेलो तर वर लिहिलेल्या अनुभवाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता अधिक.

त्यांचा व्यवसाय चालावा ही सदिच्छा असतेच, पण त्यांनी ग्राहकांना उपलब्ध पर्यायांचा विचारही करायला हवा. ‘आमच्या फायद्यासाठी तुम्ही नुकसान सहन करा’ हे ग्राहक म्हणून गेलेला एखादा कॉम्रेडही मान्य करणार नाही. व्यवसायाचे आयाम बदलून नफा खर्चाचे गुणोत्तर नव्याने मांडायला हवे. ग्राहकाशी मग्रूर वर्तन करुन कसे चालेल. बाजारात स्वयंचलित वाहने आली की टांगेवाल्याला आपला व्यवसायाचे आयाम बदलण्याची गरज पडणारच. इलाज नाही. त्यासाठी गाड्याच आणू नका असे म्हणणे चूक आहे. (कॉम्रेड काहीही म्हणोत. :) )

आज एलआयसी, बँकाच काय अगदी रीटेल स्टोअरच्या काउंटरवरच्या माणसाला संगणक वापरता यावा लागतो. हा बदल रोजगारासाठी नोकरदारांना स्वीकारावाच लागला. त्याचप्रमाणॆ छोट्या व्यावसायिकांनाही व्यवसायात कालानुरुप, स्पर्धेनुरूप कोणते बदल करावेत हे शोधावेच लागेल. आपला यूएसपी(Unique Selling Point) राखावा लागेल.

इतके रीटेल स्टोअर्स उगवले, पण घराजवळचा किराणा-भुसार दुकान चालवणारा- ज्याला आपण सरसकट मारवाडी म्हणतो - दुकान कसे चालवतो पाहा. त्यांच्या दुकानात आता काय काय मिळते, सामान्य माणूस कोणत्या उत्पादनांसाठी केवळ त्यांच्यावरच अवलंबून आहे हे पाहिले तर लक्षात येईल, की त्यांनी बदलत्या परिस्थितीशी यशस्वीपणॆ जुळवून घेतले आहे. एसी दुकानात इलेक्ट्रॉनिक वस्तू भरुन काउंटरवर निवांत बसणार्‍यांना त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे...

मध्यंतरी एका मित्रासोबत त्या जुन्या दुकानी जाणे झाले. त्याला न मागता रिसीट आणि छापील किंमतीवर डिस्काऊंट मिळालेला पाहून भरून आलं. अर्थात याला वाढलेल्या स्पर्धेने उतरलेला माज जसा कारणीभूत होता, तसेच ग्राहकसंख्या कैकपट वाढल्याचे सकारात्मक कारणही होते.

-oOo-


हे वाचले का?

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१९

पवारांच्या अंतस्थ हेतूचे प्रतिबिंब दाखवणार्‍या दोन शक्यता

(सेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे सरकार येण्याचे आदल्याच दिवशी नक्की झालेले असताना, रात्रीतून चक्रे फिरुन अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. विधानसभेत अध्यक्षाची निवड अथवा विश्वासदर्शक ठराव यांच्या संदर्भात शरद पवार यांची भूमिका आणि त्यांच्यासमोर असलेले पर्याय यांचा थोडा उहापोह.)

महाराष्ट्रातील सत्तेच्या खेळात आपण सार्‍यांनी तर्काचे, विनोदबुद्धीचे वारु मोकाट सोडले आहेत. ते जरा बांधून ठेवू. घटनाक्रम हा सर्वस्वी परावलंबी असल्याने आणि रंगमंचावरील पात्रे लेखकाला न जुमानता आप-आपली स्क्रिप्ट्स स्वत:च लिहित असल्याने स्थिती कशी वळण घेईल, या पुढचा भाग केव्हा कालबाह्य होईल हे सांगणे अवघड आहे. तेव्हा तो ही मुद्दा क्षणभर बाजूला ठेवू. सार्‍यांचे लक्ष दोन पवारांवर केंद्रीत झालेले असताना भाजपवाले सेना, काँग्रेस अथवा राष्ट्रवादीचे आमदार फोडून बहुमताची तजवीज करतील (ते पुरेसे झाले नाही तर ते रामदास आठवलेंना पाठवून ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा मिळवून सरकार स्थिर करतील. :) ) ही शक्यताही घटनाक्रमाचा भाग म्हणून सोडून देऊ. सद्यस्थितीत फक्त नियमांच्या आधारे शक्यता तपासून पाहू. विशेषत: दोन पवारांसमोर काय पर्याय आहेत हे पाहू.

एक डिस्क्लेमर आधीच देतो. ही नोट थोडी कायदेशीर मुद्द्यावर, थोडी तर्कावर आधारित असल्याने घटनाक्रम अथवा परिस्थिती बदलाने रद्दबातल ठरेल. दुसरे, मी कायद्याचा अजिबात अभ्यास केलेला नसल्याने समजुतीचा घोटाळा होऊ शकतो. तिसरे, कायद्याबाबत कायदेतज्ज्ञांचे अर्थनिर्णयन वेगवेगळे असते इतपत सापेक्षता त्यात असते. तिचा प्रभाव त्यावर पडणार आहे. आणि चौथे म्हणजे, तर्काला पुन्हा थोडा कायद्याचा नि थोडा विचारकुवतीचा आधार असल्याने त्या दोन्हींच्या मर्यादाही आहेतच. शिवाय विश्वास प्रस्तावापर्यंत उरलेल्या काळात उलगडणार्‍या घटनाक्रमाचे कोणतेही भाकित त्यात समाविष्ट नसल्याने ती एक मर्यादा आहे. (आपण बरोबरच असतो, किंवा हे बरोबर आणि हे चूक हे ठामपणे सांगणार्‍यांबद्दल मला अलौकिक आदर आहे तो यासाठी. इतक्या मर्यांदाना, सापेक्षतेला साफ धुडकावून ते आपलेच बरोबर हे ठामपणे म्हणतात नि ते न पटलेल्याची अक्कल काढतात.)

नमनाला घडाभर डिस्क्लेमर देऊन झाल्यावर मुद्द्याकडे येतो. फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाबाबत दोन महत्वाच्या शक्यता दिसतात. विशेष म्हणजे या दोन शक्यतांपैकी कोणती प्रत्यक्षात उतरते, त्यावर थोरल्या पवारांचा अजित पवारांना पडद्याआडून पाठिंबा असल्याचा आरोप खरा असण्याची शक्यता अधिक की खोटा, हे ही बरेचसे स्पष्ट होऊन जाईल.

PawarThinking

पहिली शक्यता

ही सध्या वास्तवाला अधिक अनुकूल दिसते - ती म्हणजे, आहे अशा स्थितीत, अजित पवार अथवा फुटीर आमदारांवर कारवाई न करता, पवारांनी सेनेच्या मदतीने दाखल केलेल्या याचिकेला अनुसरुन तातडीने विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेणे. (खरेतर त्या आधी हंगामी अध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षाची निवड व्हायला हवी. तिथेच खरी परीक्षा होईल. )

समजा, शरद पवारांचा अजित पवारांना आतून पाठिंबा आहे :

असे असेल, तर ही खेळी वरकरणी सेनेशी सॉलिडॅरिटी दाखवणारी असली तरी त्यात भाजप-अजित पवार यांच्या सोयीचे तेच घडणार आहे. अजित पवारच एकदा राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते झाल्यावर विधिमंडळ पक्षाची बैठक तेच बोलावू शकतात. पक्षाध्यक्षांनी बोलावलेली बैठक अनौपचारिकच मानली जायला हवी. त्यामुळे त्यातील ठरावांना विधिमंडळाला ’लोकस-स्टॅंडाय’ अथवा वैधानिकता नाही.

त्यामुळे आजही तांत्रिकदृष्ट्या अजित पवारच राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. (अर्थात त्यांची निवड झाल्याचे अधिकृत पत्र विधासभा अध्यक्षांकडे गेले असेल तरच ती विधिमंडळाच्या दृष्टीने दखलपात्र असेल. अन्यथा नाही.) त्यांनी मतदानासाठी बजावलेला व्हिप राष्ट्रवादीच्या आमदारांवर बंधनकारक आहे.

त्यामुळे थोरल्या पवारांनी पक्षांतर-बंदी कायद्याची करुन दिलेली आठवण हा खुंटा हलवून बळकट करण्याचा, ’माझ्याकडे नव्हे, अजितच्या व्हिपकडे लक्ष द्या’ हे ठसवण्याचा प्रयत्न असू शकतो. थोडक्यात 'व्हिप धुडकावून ठरावाच्या विरोधात मतदान केले तर अजित पवार तुमचे सदस्यत्व रद्द करण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांकडे करु शकतात, तेव्हा गप त्यांचे ऐका' असा इशारा असू शकतो.

समजा, शरद पवारांचा आतून अजित पवारांना पाठिंबा नाही :

आणि त्यांनी आमदारांना व्हिप धुडकावून ठरावाच्या विरोधात मतदान करा असा आदेश दिला आणि त्यातील बहुसंख्येने तो मानला आणि सरकार बहुमत सिद्ध करण्यात अयशस्वी ठरले. तांत्रिकदृष्ट्या अजित पवारांना विधिमंडळ पक्षनेता म्हणून या सार्‍या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची विनंती विधानसभा-अध्यक्षांकडे करता येईल आणि ते भाजपचे असतील* तर ते तातडीने त्यावर निर्णय घेतीलच. (हे विश्वासदर्शक ठरावावर न होता अध्यक्ष निवडीच्या ठरावाबाबत घडले तर तोवर हंगामी अध्यक्षाला हा अधिकार आहे का मला ठाऊक नाही. नसेल तर तो आणखी एक फाटा फुटेल.)

पण इतक्या मोठ्या संख्येने आमदारांना अपात्र ठरवण्याची शिफारस करण्याचे धाडस अजित पवार करतील का हा मोठा प्रश्न आहे. कारण ते स्वत:च स्वत:चा पक्ष विसर्जित करत आहेत असे चित्र निर्माण होईल. एकतर थोरल्या पवारांनी बांधलेल्या राखलेल्या बारामतीचेचे ते आमदार असल्याने पुढच्या टर्मला त्यांना स्वत:च्या आमदारकीसाठी झगडावे लागेल. कदाचित मतदारसंघही बदलावा लागेल. अशा वेळी जे सहकारी पर्यायी मतदारसंघ देऊ करु शकतात त्यांची संख्या एका फटक्यात कमी करणे हा आत्मघातच ठरेल.

या प्रक्रियेत विधानसभेतील एकुण आमदारांची संख्या कमी झाल्याने फडणवीस यांच्या सरकारची स्थिती भक्कम होऊन अजित पवार मूठभर आमदारांचे नेते राहतील. गोव्यात ’गोवा फॉरवर्ड’ने भाजप-विरोधकांच्या संघटनांचा पाठिंबा मिळवून तीन आमदार निवडून आणले, नंतर जातीची सॉलिडॅरिटी दाखवत भाजपला पाठिंबा दिला (पर्रिकरांच्या मृत्यूनंतर ते कनेक्शन दुबळे झाले) आणि शेवटी काँग्रेसचे आमदार फोडून आत घेतल्यावर भाजपने त्यांच्या पार्श्वभागावर लाथ मारुन हाकलले... तेच भविष्य धाकट्या पवारांसमोर शिल्लक राहील.

दुसरी शक्यता

समजा, शरद पवारांचा आतून अजित पवारांना पाठिंबा नसेल तर...

हा एक पर्याय कदाचित शरद पवार यांना उपलब्ध आहे. विधिमंडळात कोणतेही मतदान (अध्यक्ष-निवड वा विश्वासदर्शक ठराव) होण्याआधीच त्यांनी अजित पवार यांना पक्षातून निलंबित करावे. यातून अजित पवार यांची आमदारकी शाबूत राहते. पण आता ते राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे सदस्य राहात राहणार नाहीत (इथे एक प्रश्नचिन्ह टाकून ठेवतो) त्यामुळे ते त्याचे नेतेही असू शकत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाला नवा नेता निवडण्याची मोकळीक राहील. आणि नवा नेता भाजप-विरोधात मत देण्याचा व्हिप बजावू शकेल. अर्थात अध्यक्ष भाजपचा असल्याने ते याला धुडकावून लावतील, नव्या नेत्याला मान्यता देण्यास नकार देतील. मग पवारांना पुन्हा त्यासाठी कोर्टाचे दार वाजवावे लागेल. तोवर ’वर्षा’ला निलाजरेपणॆ चिकटून राहिलेले फडणवीस खुर्चीलाही चिकटून राहतील. ज्याच्या मागे बहुमत नाही असा नेता निर्लज्जपणे, काळजीवाहू नव्हे तर अधिकृत मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहात राहील.

समजा, शरद पवारांचा आतून अजित पवारांना पाठिंबा असेल तर...

तर ते अजित पवारांना पक्षातून काढणार नाहीत, या पर्यायाची अंमलबजावणी करणार नाहीत. आणि जणू त्यांच्याच बाजूने हे करतो आहे असे भासवत सेनेकडूनच लवकरात लवकर मतदानाची मागणी केली जाईल अशी व्यवस्था करतील (आज सुनावणी होणारी याचिका याचाच एक भाग आहे.) आणि ऐन मतदानाच्या वेळी ’आमचे सदस्यत्व गमावण्याची भीती होती म्हणून आम्ही भाजपला मतदान केले’ अशी मखलाशी करत आमदार त्यांना हवे ते घडवून आणतील. (कदाचित त्यांना पडद्याआडचा खेळ माहित नसल्याने, खरोखरच्या भीतीनेही करतील. आणि ती भीती त्यांच्या मनात कायम राहावी यासाठी थोरले पवार पुन्हा पुन्हा पक्षांतरबंदी कायद्याच्या बागुलबुवा समोर ठेवत राहतील.) दोन्ही पवार काही महिने माध्यमांतून आपल्या संघर्षाच्या कथा रंगवतील. पुढे रक्षा-बंधनाच्या वेळी दादा ताईंच्या घरी जातील, थोडा इमोशनल ड्रामा घडेल नि ’मागचे सारे विसरु या’ म्हणत पवार कुटुंबिय अधिकृतपणे पुन्हा सोबत येईल.
---

थोडक्यात आता शरद पवार हे अजित पवार यांना विधिमंडळातील मतदानापूर्वी निलंबित करतात की नाही, या निर्णयामध्ये त्यांच्या अंतस्थ हेतूचे प्रतिबिंब पडलेले दिसेल.

आणि हो, जरी दुसरी शक्यता वास्तवात उतरली तरी, कायदेशीर पळवाटा, कोर्ट, खटले यात वेळकाढूपणा करत विरोधी पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत किंवा फुटण्याची वाट पाहात भाजपचे सरकार सत्ता सोडण्याचे टाळत राहील.

ज्याच्या मागे बहुमत नाही हे त्याच्यासह सर्वांनाच ठाऊक आहे असा एक नेता निर्लज्जपणे, केवळ काळजीवाहू नव्हे तर अधिकृत मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहात राहील. आणि संविधानाऐवजी डोक्यावरच्या घोंगडी टोपीशी अधिक निष्ठा असलेली व्यक्ती मालकांना हवे ते दिल्यामुळे आपला कार्यकाल संपल्यावर काय बक्षीस मिळेल याची स्वप्ने रंगवण्यात मश्गुल होईल. आणि आपण...

अहो तोवर झारखंडचे निकाल येतील की राव, एन आर सी आहे, कर्नाटकातील पोटनिवडणुका आहेत.... आपल्याला विषयांना काय कमी आहे.

-oOo-


हे वाचले का?

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१९

मी पण टॅक्सपेअर

जेएनयू चा प्रश्न आला की मोदी-भक्तांचे पित्त उसळून येते नि आपल्या टॅक्स-पेअर्स मनीचे काय करु नये याची पोपटपंची ते करु लागतात. मग मीच का मागे राहू?

TaxpayersManifesto

१. कोणाचाही पुतळा अथवा स्मारक उभारले जाऊ नये आणि मुख्य म्हणजे या नियमाला अपवाद अजिबात असू नयेत.

२. कुंभमेळ्यापासून हजयात्रेपर्यंत कोणत्याही धार्मिक कार्यक्रमावर खर्च करु नये. मंदिर, मशीद, बुद्धविहार, गुरुद्वारा, चर्चेस, जिनालये इत्यादि धर्मस्थळे बांधून नयेत वा त्यांना अनुदान देऊ नये.

३. सरकारी कामांच्या जाहिराती करू नयेत.

४. गावे, शहरे, स्टेडियम, इन्स्टिट्यूट्स, हॉस्पिटल इत्यादिंसह कुठल्याही गोष्टींच्या नामांतरावर खर्च करु नये.

५. कोणत्याही बुडत्या खासगी उद्योगांना मदत देऊ नये.

६. स्मार्ट सिटी नावाखाली फुटपाथ सुशोभीकरण करु नये.

७. लोकप्रतिनिधींसाठी लॅपटॉप, टॅब, स्मार्ट फोन अजिबात खरेदी करु नयेत. (त्या ऐवजी त्यांना पाटी-पेन्सिल द्यावी.)

८. सार्वजनिक मूत्रमंदिरांपासून रेल्वे-स्टेशनपर्यंत कुठेही वाय-फाय लावण्याचा भंपक विकास करु नये.

९. ज्याची लाभधारक खासगी कंपनी/न्या आहेत, अशी पीकविम्यापासून विमानाचे सुटे भाग उत्पादन करण्यापर्यंत कोणतीही स्कीम अथवा काम करु नये.

१०. नवे संसद भवन बांधू नये अथवा बुलेट ट्रेन नामक खेळण्यातल्या गाडीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडू नयेत.

---

माझ्या टॅक्सच्या पैशातून...

१. शालेय शिक्षण सर्वांना मोफत द्यावे.

२. शाळांमध्ये वैज्ञानिक शिक्षण यथास्थित द्यावे यासाठी प्रयोगशाळा उभाराव्यात, त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी.

३. तालुका पातळीवरील आरोग्य केंद्रांना अर्थसाहाय्य द्यावे.

३. शासकीय विमा कंपनीला अनुदान देऊन तिच्यामार्फत पीक-विमा योजना राबवावी.

४. दिल्लीसारखी परिस्थिती अन्य शहरांतून उद्भवू नये म्हणून आवश्यक असणार्‍या पर्यावरण योजनांवर खर्च करावा.

५. सर्व धार्मिक स्थळांच्या उत्पन्नावर ५०% कर लावावा नि तो वसूल करण्यासाठी आवश्यक त्या फोर्सची निर्मिती करावी, वेतन माझ्या टॅक्सच्या पैशातून द्यावे.

६. सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या दंड आणि न्यायव्यवस्थेमध्ये रिफॉर्म्स अथवा आमूलाग्र बदल घडवून ते सामान्यांना विश्वासार्ह, अवलंबण्यायोग्य वाटतील करण्यासाठी समितीचा आणि तिच्या शिफारसींच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तो खर्च करावा.

७. असंघटित क्षेत्रांच्या सर्वेक्षणासाठी आणि त्यांनाही किमानवेतनापासून हक्काच्या सुट्या वगैरे लाभ नियमित नोकरीप्रमाणे मिळवून देण्यासाठी आराखडा निश्चित करण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी आवश्यक ती यंत्रणा उभी करण्यासाठी खर्च करावा.

८. सर्व राष्ट्रीय नि राज्य महामार्ग उत्तम दर्जाचे असतील याची खातरजमा करुन घेण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स निर्माण करावा.

९. ईवीएमच्या विरोधकांना लस टोचून त्यांचा आजार दूर करावा.

१०. द्वेषाचा प्रचार-प्रसार करणार्‍यांना हद्दपार गुंडांप्रमाणॆ रोजची हजेरी सक्तीची करुन रोज एक लाख गुदगुल्या करण्याची शिक्षा द्यावी. त्यासाठी प्रशिक्षित गुदगुल्याकारांची नेमणूक करावी.

-oOo-


हे वाचले का?

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१९

टीआरपीची पैठणी

एक शहाणी-सुरती, शिकली-कमावती पोरगी होती. उपवर झाली. स्थळ सांगून आले. दाखवण्याचा कार्यक्रम झाला. पोरीला पोरगं काही पसंत नव्हतं. शिकलेलं असून बुरसटलेल्या विचाराचं, आई-बापाचा नंदीबैल असावा असं वाटत होतं.

TRP_Paithani

पण बोहोल्याच्या घाईला आलेल्या आत्या-मावशा-साळकाया-माळकाया-आज्या-काकवा सगळ्यांनी कलकलाट सुरु केला.

’त्यात काय पाहायचं. हाती पायी धड असलं म्हणजे झालं’ - आजी

’इतका विचार काय करायचा. थोडं डाव-उजवं होत असतंच. आम्ही नाही निभावून नेलं’ - काकू

’तुम्ही आजकालच्या पोरींना स्वातंत्र्य दिलंय त्याचा गैरफायदा घेताय. बापाने स्थळ आणलं ते त्याला समजत नाही म्हणून?’ एक मावशी करवादली

’अगं, असं विचार करत बसशील तर जन्मभर बिनलग्नाची राहशील.’ - एक साळकाई

या आणि अशा कलकलाटाने गोंधळून जात पोरीने लग्नाला रुकार दिला. लग्न झालं, आत्या-मावशा-साळकाया-माळकाया-आज्या-काकवा ठेवणीतल्या पैठण्या नेसून मिरवल्या, वीस-चाळीस वर्षांपूर्वीच्या आपल्या लग्नाच्या आठवणी उगाळल्या, त्या निमित्ताने उणी-दुणी काढून झाली. यथाकाल पोरगी नांदायला गेली.

पण नवरा दारुडा निघाला. बाहेरख्याली असावा अशीही लक्षणं दिसत होती. सुकलेली पोरगी माहेरपणाला आली. आत्या-मावशा-साळकाया-माळकाया-आज्या-काकवा जमल्या. तिला सांभाळून घेण्याचा सल्ला देऊ लागल्या, कुणी 'तुझं नशीबच फुटकं तर तू तरी काय करणार’ म्हणत त्यातल्या त्यात दिलासा देऊ लागल्या. इतक्यात एक म्हातारी `एक पोर झालं की ठीक होईल’ म्हणू लागली. एकुणात आत्या-मावशा-साळकाया-माळकाया-आज्या-काकवा पोरीला जमवून घेण्याचा सल्ला देऊन गेल्या.

पोरगी मन मारुन, अत्याचार सहन करुन संसार रेटते आहे. `हिच्यातच काहीतरी खोट असेल’ म्हणून तिचा विचार सोडून देत, पुन्हा ठेवणीतली पैठणी बाहेर काढण्यासाठी आत्या-मावशा-साळकाया-माळकाया-आज्या-काकवा तिच्या धाकट्या बहिणीला ’सगळं काही वेळच्यावेळी व्हावं होऽ. उशीर करु नको.’ म्हणून मागे लागल्या आहेत.

(’वर्तमानाचे संदर्भ’ या राजकीय पार्श्वभूमीवरील ब्लॅक कमेडीमधून)

-oOo -


हे वाचले का?

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१९

ड्रायविंग सीट

निवडणुका संपल्या होत्या...

सरकार-स्थापनेची दंगल सुरु होण्यापूर्वी, निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपाने निर्माण झालेली कटुता पुसून काढावी, भाषणे करुन आणि प्रचारातील दगदगीतून थोडा विसावा मिळावा, म्हणून काही सर्वपक्षीय नेते एका एअर-कंडिशन्ड मिनी-बसने के.डी. शिवकुमार यांच्या रिसॉर्टकडे निघाले होते. मुंबईहून पुणे, सातारा, कोल्हापूर, मग वळून कोकण असे करत एक एक नेत्याला घेत हा ’गरीब-रथ’ पुढे चालला होता. तेवढ्यात या ’श्रमपरिहार-यात्रे’त सहभागी होऊ न शकलेल्या विदर्भ नि मराठवाड्यातल्या एक-दोन नेत्यांचे, ’तुम्ही पुण्या-मुंबईवाल्यांचे नेहमी असेच असते. आम्हाला मुंबईला यायला लावता. आम्हाला डावलता.’ अशा तक्रारी करणारे फोन आले होते.

PicnicChalenHum

उजवीकडील सर्वात पुढच्या बाकावर भाजपच्या नेत्याशेजारी सेनेचा नेता बसला होता. ’शिवाजी महाराजांचा समुद्रातील पुतळा पटेलांच्या पुतळ्यापेक्षा उंच असायला हवा की खुजा’ यावर त्यांची हसत-खेळत चर्चा चालू होती. समोरच्याने एखादा चांगला मुद्दा काढला की प्रेमाने एकमेकांच्या पोटात गुद्दे मारत होते. त्यांच्या मागच्या सीटवर आठवले आणि सदाभाऊ खोत बसले होते. पैकी आठवले सीटच्या मधोमध बसून पुढच्या दोघांच्या मध्ये आपले तोंड खुपसून त्यांची चर्चा ऐकत होते. आणि ते दोघे लक्ष देत नसले तरी आपल्या मतांच्या चारोळ्या टाकत होते. त्यांना जागा करुन देण्यासाठी उजवीकडे एका बाजूला कलते बसून सदाभाऊ मात्र कृतकृत्य झालेल्या, भक्तिभावाच्या नजरेने त्या दोघांची चर्चा ऐकत होते.

डावीकडील सर्वात पुढच्या बाकावर कम्युनिस्ट नेता बसला होता. त्याचे नावही कुणाला आठवत नव्हते. पण गाडीत शिरल्याशिरल्या तिथे बसलेल्या काँग्रेसी नेत्यासमोर त्याने ’तुम्ही आता राजकारणातून निवृत्त व्हायला पाहिजे’ म्हणून जे भाषण सुरु केले होते, ते ऐकून काँग्रेसी नेता निमूटपणे खुर्ची सोडून शेवटच्या आडव्या बाकावर जाऊन आडवा झाला. ’तसेही त्या आळशाला झोपायचेच होते’ असे शेजारची जागा पटकावलेल्या ’अण्णास्वराज्य’ पक्षाच्या नेत्याने शेरा मारला.

त्यांच्या मागच्या सीटवर राष्ट्रवादीचा नेता बसला होता. त्याच्या आकारामुळॆ शेजारची सीट ’नो व्हेकन्सी’ अलिखित बोर्ड घेऊन कशीबशी अंग चोरुन खिडकीशी बसली होती. त्याने दोन सीटच्या मधोमध बस्तान बसवून, उजवा हात पाठीमागे सीटच्या पाठीवर आडवा टाकून आरामात बसत, आपले पाय तिरके ताणून उजवीकडील पहिल्या सीटवरील दोघांच्या पाठीमागे टेकवले होते. त्याने तसे करताच, ’हा नेहमी दोन्हीकडे कनेक्शन ठेवून असतो.’ असे अण्णास्वराज्यवाला कम्युनिस्टाच्या कानात कुजबुजला. राष्टवादीवाल्याच्या मागच्या सीटवर किरकोळ शरीरयष्टीचा, कपाळाला उभे गंध लावलेला मनसेवाला बसला होता. त्याने आपल्या धारदार जिभेच्या आधारे शेजारच्या शेकापवाल्याला हुसकावून लावत दोन्ही सीट स्वत:साठी बळकावल्या होत्या. आठवलेंप्रमाणेच मधोमध बसत, पुढे झुकून तो राष्ट्रवादीच्या नेत्याशी खालच्या आवाजात काहीतरी गुफ्तगू करत होता.

तिसर्‍या रांगेत मागे बसलेला मनसेचा नेता कान राष्ट्रवादीवाल्याकडे नि नजर भाजप-सेनेवाल्यांकडे ठेवून होता. वं.ब.आ.वाला गाडीत चढला तेव्हा काँग्रेसवाल्याने आधीच मागच्या बाकावर पथारी पसरल्याने, त्याला हवी असलेली एकमेव मधली सीट न मिळाल्याने त्याने कुरकुर केली होती. आता तो शेवटून दुसर्‍या रांगेत कधी डावीकडे, कधी उजवीकडे बसून कम्फर्टेबल सीट कुठली हे ठरवण्याचा प्रयत्न करत होता. त्या रांगेत खरंतर प्रहारच्या नेत्यासाठी एक सीट राखीव होती. पण ऐनवेळी कुठल्याशा प्रशासकीय अधिकार्‍याला फटकावण्याच्या कार्यक्रमात अडकल्याने तो येऊ शकला नव्हता. त्यामुळे वं.ब.आ.च्या नेत्याला दोन्हीकडे चॉईस उरला होता. बसच्या बरोबर मधल्या रांगेत डावीकडे मिसेस राणा नि उजवीकडे मिस्टर राणा बसले होते. दोघांसाठी असलेल्या सीटवर एक-एकटेच बसले असल्याने, घाटात गाडी वळणे घेई तसतसे ते डावीकडून उजवीकडे नि उजवीकडून डावीकडे घसरत होते.

यावेळी पावसाने कहर केल्यामुळे कोकणात शिरताच गाडीला खड्ड्यांचे दणके बसायला सुरुवात झाली. अमित शाह ज्या बेगुमानपणे पक्ष आणि गृहमंत्रालय चालवतात त्याच बेगुमानपणे बसचा ड्रायवर गाडी हाणत असल्याने सदोदित स्वतंत्र गाडी, हेलिकॉप्टर, विमानाने प्रवास करणार्‍या नेत्यांची सुखवस्तू हाडे नि चरबी चिडचिड करु लागली. ’एकाच बसमधून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा हा समाजवादी प्रयोग कुण्या मूर्खाने सुचवला?’ अशी पृच्छा उजवीकडील पहिल्या बाकावरुन झाली. डावीकडील पहिल्या बाकाने आपण तो ऐकलाच नाही अशी बतावणी करत. ’दिल्लीतील ’आप’चा प्रयोग मूलगामी कसा नाही’ यावर आपली चर्चा सुरूच ठेवली.

राणा दांपत्याने खड्ड्यांच्या दणक्यापासून एकमेकांना आधार देता यावा म्हणून एकाच बाजूच्या दोन सीट पकडल्या. काँग्रेसवाल्याची झोपमोड होऊन त्याने कूस बसलून अलीकडच्या सीटचा दांडा घट्ट पकडून ठेवत पुन्हा निद्रासनात प्रवेश केला. राष्ट्रवादीवाला मात्र उजव्या नि डाव्या दोन्हीकडच्या सीटचा आधार असल्याने आरामात बसला होता. आठवले नि मनसेवाले सीटच्या मधोमध आणि पुढच्या सीटवर झुकून, तिच्या पाठीकडील आडवा दांडा घट्ट धरुन बसले असल्याने त्यांनाही खड्ड्यांच्या दणक्यांना तोंड देणे थोडे सुकर झाले होते. अखेर प्रवासातील तो अटळ क्षण आला…

तास-दोन तास प्रवास झाल्यानंतर मंडळींना निसर्गाची आणि बरेच कशाची ओढ लागली. तेव्हा घाट उतरताना एका कोपर्‍यावर वसलेल्या राष्ट्रवादीच्याच एका दुसर्‍या नेत्याच्या ’क्षुधा-तृष्णा-शांतिगृहा’वर गाडी थांबवण्यात आली. घरचेच होटेल असल्याने दोन-चार टेबल ताब्यात घेऊन ती जोडून सार्‍या नेत्यांची आयताकृती मोठ्या टेबलवर गोलमेज परिषद सुरू झाली. ’बोलण्याचा हक्क आमचाच’ असे जन्मल्याक्षणीच जाहीर केलेल्या अण्णास्वराज्य पक्षाच्या नेत्याने ’आपला चक्रधर हा अत्यंत बेलगामपणे गाडी चालवत असल्याने त्याने राजीनामा द्यावा अन्यथा त्याच्यावर अविश्वास ठराव आणून त्याला पदच्युत करावे.’ असा प्रस्ताव मांडला. ’पण मग गाडी कोण चालवणार?’ असा प्रश्न काँग्रेसी नेत्याने हळूच राष्ट्रवादीच्या नेत्याला विचारला. पण तीक्ष्ण कानाच्या अण्णास्वराज्यवाल्याने तो ऐकला. ’आधी त्याला हाकला तर खरे. पर्याय आपोआप उभा राहील.’ अशी गर्जना केली. तोवर मागवलेले खाणॆ आले. या बाबाचे भाषण ऐकायला लागू नये, सुखाने खाता यावे, म्हणून सर्वांनी हा प्रस्ताव एकमताने मंजूर करुन टाकला.

खाणे झाल्यावर गाडीकडे येताच, अण्णास्वराज्यवाल्याने तातडीने ड्रायवरकडे जाऊन त्याला पदच्युत केल्याची बातमी स्वमुखे त्याला सांगितली. इतक्यात पोटभर खाऊन ढेकर देत तिथे पोचलेल्या कम्युनिस्ट नेत्याने ’सर्वहारा समाजातील या ड्रायवरच्या हक्काची तुम्ही पायमल्ली करत आहात, त्याच्यावर अन्याय करत आहात’ असा सूर लावला. ’चला आता या लेकाचीही सुरुवात झाली’ म्हणत वैतागून भाजपवाल्याने त्या ड्रायवरला प्रवासभत्त्यासह पूर्ण पैसे, वर आणखी हजार-दोन हजार देऊन त्याच्या घरी रवाना केले.

आता ’गाडी चालवणार कोण?’ या प्रश्नाकडे मंडळी वळली. ’ज्याने ड्रायवरच्या ड्रायविंगबाबत प्रथम आक्षेप नोंदवला, ज्याला सर्वाधिक त्रास होत होता त्यानेच गाडी चालवावी.’ असा प्रस्ताव राष्ट्रवादीवाल्याने गालातल्या गालात आणि मिशीतल्या मिशीत हसत दिला. त्यावर ’आपल्याला गाडी चालवण्यात इंट्रेस्ट नाही.’ असे बाणेदार उत्तर ’अण्णास्वराज्य’वाल्याने दिले. पण सर्वांनी अधिकच आग्रह चालवल्याने त्याचा नाईलाज झाला आणि, ’आपल्याला गाडी चालवता येत नाही आणि आपल्याकडे ड्रायविंग लायसन्सही नाही.’ अशी कबुली त्याने दिली. त्याला चार शिव्या घालून मंडळी ड्रायवरच्या शोधाला लागली. आता असे घाटाच्या मध्यावर नवा ड्रायवर कुठून आणावा, जवळच्या शहरातून बोलवावा तर तासभर तरी वाया जाणार असे दिसू लागले.

एवढ्यात एक बोलेरो वेगात येऊन डौलदार वळण घेऊन कचकन ब्रेक मारत होटेलसमोर थांबली. त्या गाडीच्या पुढच्या काचेवर असलेला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पाहून मनसे-नेत्याच्या अंगी अचानक वीरश्रीचा संचार झाला. ’अरे मर्दाची अवलाद आहे. मनात आणले तर मायभवानीच्या आशीर्वादाने रेल्वे एंजिन चालवून दाखवू. एक य:कश्चित गाडी चालवू शकत नाही की काय?’ म्हणत त्याने ड्रायविंगचे काम आपल्या शिरावर घेतले. भाजपवाल्याने ’अरे तुला शहरात चालवायचा अनुभव आहे, घाटात चालवण्यासाठी वेगळे कौशल्य लागते.’ अशी समजून घालण्याचा प्रयत्न केला. पण तो आता मागे हटायला तयार नव्हता. त्यातच ’बराच वेळ झाला. आता निघायला हवे.’ या विचाराने राष्ट्रवादीवाल्याने त्याला पाठिंबा दिला. काँग्रेसवाल्यानेही अन्य काही पर्याय दिसत नसल्याने हरकत घेतली नाही. उरलेली मंडळी तर ’तुम्ही घ्याल तो निर्णय’ मोडमध्ये असल्याने काही न बोलता सरळ गाडीत जाऊन बसली.

गाडी सुरु झाली. घाटाची वेड्यावाकड्या वळणांची सवय नसल्याने मननायक गाडी इतकी सावकाश चालवत होता की मागे वाहनांची रांग लागली. ’हॅ: याच्यापेक्षा काँग्रेसवाला जास्त वेगाने निर्णय घेतो.’ असा कुत्सित शेरा- अर्थात ’अण्णास्वराज्य’वाल्याने मारला. मागून कर्कश हॉर्नचा कोलाहल ऐकू येऊ लागला. त्यातच मागच्या काचेतून डोकावून पाहणार्‍या यातल्या एक दोघांचे चेहरे पाहून मागच्या गाड्यांतील मंडळींमध्ये हे आपले नेते आहेत ही बातमी पसरली. मग ते अधिकच चेव येऊन हॉर्न वाजवू लागले. त्यातच आतले इतर नेते सेनानायकाला वेग वाढवण्यासाठी सांगू लागले. या गदारोळात गोंधळलेल्या मननायकाने वेग अचानक वाढवला. त्याने पुढचे वळण हुकून बस सरळ रस्ता सोडून बाजूच्या खड्ड्यात कोसळली. घाट तसा संपत आलेला असल्याने खड्डा मोठा असला तरी खोल नव्हता आणि बसचा वेगही फार नव्हता. त्यामुळे बसचे नि त्यातील माणसांचे फार काही बिघडले नाही.

सर्वजण धडपडत बाहेर पडले. आता काय करावे याचा विचार सुरू झाला. स्वत:चे काम स्वत: करण्याची सवय मोडलेली असल्याने, बस बाहेर काढण्याचा प्रयत्न करु नये, त्याऐवजी आपण बाहेर कसे पडावे याचा विचार करावा या मुद्द्यावर अत्यंत दुर्मिळ असे एकमत ताबडतोब झाले. वर घाटामध्ये बसचा अडथळा दूर झाल्याने वेग पकडलेल्या मागच्या गाड्या थांबून यांना मदत करण्याच्या फंदात न पडता वेगाने चालू लागल्या होत्या. एकदोघांनी थांबून आत डोकावून पाहिले, कुत्सित हसून ते ही निघून गेले.

चांगला चार-पाच पुरुष खोल असलेल्या खड्ड्यातून बाहेर कसे पडावे यावर विचार विनिमय सुरू झाला. ’आपण आठ-दहा लोक आहोत. दहीहंडीप्रमाणे चळत लावून एकाने वर जाऊन एखादे वाहन थांबवावे नि त्यातील माणसांच्या मदतीने इतरांना बाहेर काढावे.’ असा सल्ला काँग्रेसवाल्याने दिला. त्यावर, ’तू चूप. हे सगळे तुझे पाप आहे. तू पनवती आहेस. तू आलास म्हणूनच अपघात झाला. तू विरोध केला नाहीस म्हणून हा लेकाचा साला मनसेवाला ड्रायविंगला बसू शकला नि हे असं झालं.’ असा हल्ला ’अण्णास्वराज्य’वाल्याने चढवला. या मार्‍याने काँग्रेसवाला गळपटला आणि चर्चेतून अंग काढून घेत तिथल्या दगडावर खुरमांडी घालून निर्णयाची वाट पाहात बसून राहिला.

त्या घाटातून आज दिवसभरात कधी गेलात तर कोकणाकडे घाट उतरताना ’वाट पाहीन पण एस्टीनेच जाईन’ या बोर्डच्या पुढे सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या वळणावर थांबून बाजूच्या खड्ड्यात डोकावून पाहा. मूळ पांढरा पण चिखलाने बरबटलेला पोशाख घातलेली, काही जाकीटधारी मंडळी तावातावाने कशावर तरी वाद घालताना दिसतील. त्यांच्यासाठी अग्निशामक दलाची शिडी, जेसीबी वगैरे मदत चुकूनही पाठवू नका. त्याचा वापर करण्यापूर्वीच ’आम्हाला अशी मदत करुन मिंधे करण्याचा तुमचा कावा आहे’ असा आरोप करुन वं.ब.आ. वाला एका दगडावर एकटेच बसलेल्या एका बापुडवाण्या माणसाच्या शेजारी तुम्हाला बसवेल. त्याऐवजी ती मिनी-बस बाहेर काढण्यासाठी क्रेन पाठवता आली तर पाहा. त्या माणसांपेक्षा तुम्हा-आम्हाला तीच अधिक उपयुक्त ठरु शकेल.

(कथा, प्रसंग काल्पनिक, पात्रे मात्र अस्सल)

-oOo-

(पूर्वप्रसिद्धी: ’द वायर-मराठी’ https://marathi.thewire.in/maharashtra-driving-seat-satire )


हे वाचले का?

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

अयोध्या-विवाद, निकाल आणि मी

* मी अयोध्या-विवादाला कधीच बारकाईने अभ्यासलेले नाही.

* भारतीय प्रसारमाध्यमे ही माध्यमे म्हणून केव्हाच निरुपयोगी झालेली आहेत. बातम्या हाच प्रपोगंडा, नाटक, चित्रपट आणि प्रवचन असलेल्या माध्यमांतून मिळालेल्या माहितीच्या आधारे मत व्यक्त करणॆ हा मूर्खपणा आहे असे माझे मत आहे.

* त्यामुळे झाल्या निर्णयावर माझी प्रतिक्रिया आनंद वा दु:ख दोन्हीची असू शकत नाही.

* मी टोळीच्या मानसिकतेचा नसल्याने विचारशून्य होत जन्मदत्त जातीय, धार्मिक, वांशिक, प्रादेशिक गटाची बाजू घ्यायला हवी असे मला वाटत नाही.

* सोयीचा निकाल आला की ’न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो. तो मानायला हवा.’ आणि गैरसोयीचा आला तर, ’हा आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे, त्यात निवाडा करण्याचा अधिकार न्यायालयाला नाही’ असे म्हणणार्‍यांच्या निरपेक्ष वृत्तीबद्दल मला अतीव आदर आहे.

BabariRamMandir

* मी मूर्खांच्या तोंडी लागत नसल्याने ’आता तुम्हाला दु:ख झाले असेल’ म्हणणार्‍या वय वाढून बसलेल्या शाळकरी मुलांना माझ्या प्रतिक्रियेस लायक समजत नाही.

* मी श्रद्धाळू वगैरे नाही. त्यामुळे मंदिर झाले, न झाले याचा मला आनंद वा दु:ख नाही.

* मी वादग्रस्त ठिकाणी कधी नमाजही न पढल्याने ती जमीन हिंदूंना दिल्याचे दु:खही नाही.

* तिथे मंदिर झाले म्हणून मी दर्शनाला जाणार नाही, तसेच पर्यायी ठिकाणी झालेल्या मशीदीत नमाज पढायलाही जाणार नाही.

तरीही...

* जनतेचा पैसा खर्चून दीर्घकाळ चाललेला हा खटला एकदाचा संपला याचा मला आनंद आहे.

* पण त्याचवेळी हा शेवट आहे, की त्याआधारे ’फोडा आणि राज्य करा’ पद्धतीचे राजकारण करणार्‍यांच्या हातात एक कोलित आले आहे याबाबत मी संभ्रमात आहे.

* निवाड्यासाठी आधार मानलेल्या दोन प्रमुख मुद्द्यांमुळे यातून पंडोराचा बॉक्स उघडला जाईल याची मला साधार भीती आहे.

* या निवाड्यापूर्वी झालेल्या आंदोलनांमुळे, त्यातून निर्माण झालेल्या वातावरणामुळे झालेल्या दंगलीत संपत्ती नि प्राण गमावलेल्या दोनही बाजूच्या लोकांचे स्मरण या निमित्ताने होते. आणि आता दोन दशके रखडत राहिलेल्या आणि ज्यातील अनेक आरोपी चक्रनेमिक्रमाने जगून निजधामालाही गेले आहेत अशा त्याबाबतच्या अनेक खटल्यांचे काय, हा प्रश्नही माझ्या मनात पुन्हा वर आला आहे.

* एक मंदिर वा मशीद उभारण्यासाठी अनेक जणांचे जीव गेले तरी बेहत्तर म्हणणारे, ’कुणीतरी त्याग केला पाहिजे’ म्हणणार्‍यांना माणूस म्हणावे का? या प्रश्नाचे उत्तर माझे मला केव्हाच मिळाले आहे.

* फाटक्या वस्त्रात राहणार्‍या आणि भिक्षेचा एक कटोरा इतकीच संपत्ती आयुष्यभर राखणार्‍या संताचे संगमरवरी पुतळॆ नि सोन्याचे सिंहासन असलेल्या मंदिरांचे आध्यात्मिक मॉल उभारणार्‍यांच्या या देशात, किमान गरजांच्या गोष्टींना प्राधान्य केव्हा मिळणार हा एक सनातन प्रश्न आहे...

...ज्याचे उत्तर कोणतेही न्यायालय कधीच देऊ शकणार नाही.

-oOo-


हे वाचले का?

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१९

पुलं जन्मशताब्दी

ज्यांचे नाव न घेता फक्त ’भाई’ म्हणून कानाच्या पाळीला हात लावणार्‍यांपासून, नाव उच्चारताच पोटशूळापासून मस्तकशूळापर्यंत सारे आजार उसळून येणार्‍यांपर्यंत सर्वांच्या आयुष्याचा भाग झालेला 'हशिवनारा बाबा’ आज शंभरीत पोचला.

विदूषक, नाटक्या, लेखक, परफॉर्मर, गायक; भीमण्णा, मन्सूरअण्णा, कुमार, वसंतखाँ पासून आरती प्रभू, बोरकरांपर्यंत अनेक ’उत्तम गुणांची मंडळी’ जमवून जगण्याचा उत्सव करणारा, हसता हसवता जगण्यातील विरुपतेवर बोट ठेवणारा, दांभिकतेची यथेच्छ खेचणारा आणि गाता, हसवता अचानक अंतर्मुखही करणार्‍या आजोबाला सेंचुरीच्या शुभेच्छा.
---

EkShoonyaMee

भारतीय इतिहासात हे सदैव असेच चालत आले आहे का? आत्मवंचना करत जगत राहण्याखेरीज काही इलाज नाही का? बालवयात, तरुण वयात, मनाच्या तुलनेने अधिक अपरिपक्व अवस्थेत ज्याला आपण संस्कृती संस्कृती समजत आलो तशी कधी संस्कृती होती का? गायन, वादन, नर्तन वगैरे कला देवळांच्या परिसरात वाढल्या म्हणतात. कला आपोआप थोड्याच वाढतात? त्या वाढवणारी हाडामासाची माणसे असतात. त्या गायिका, त्या नर्तिका ह्यांना न गाण्याचे किंवा न नाचण्याचे स्वातंत्र्य होते का? एखाद्या गणिकेच्या कन्येला गावातल्या देवदर्शनाला येणा‍र्‍या स्त्रीसारखे आपल्या नवऱ्याशेजारी बसून त्या देवाची पूजा करण्याचे भाग्य लाभावे असे वाटले तर तिथे कुणी सालंकृत कन्यादान केल्याचा कुठे इतिहास आहे का? की कुत्र्याच्या जन्मकाळापासून त्याला हाडकावरच वाढवल्यामुळे, पुरणपोळी ही आपल्या खाण्याची वस्तू नव्हे असे त्याला वाटावे, तसे त्या नर्तकीला लग्न ही आपल्या कामाचीच गोष्ट नव्हे असे पण वाटायला लागले? अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ उठते. आणि कुठलेही मोहोळ उठले की अंगावर फक्त डंख उठवणाऱ्या माशांची मुकाबला करून प्रत्येक जण त्याचा तो राहतो, तशी काहीशी माझे अवस्था झाली आहे. डोक्याला ही प्रश्नांची सवय लागलीच मुळी कशासाठी? डोळ्यांवर आघात करणाऱ्या गोष्टी टाळायच्या असतील तर डोळे त्या गोष्टीकडून दुसरीकडे फिरवता यायला हवेत! स्वतःच्या अपूर्णतेची जाणीव होत असताना अपूर्णाची पूर्णावस्था शून्याच्याकडेच स्वत:ला नेताना दिसते.

परवाचीच गोष्ट. किराणाभुसार दुकानात काड्याची पेटी घ्यायला गेलो होतो. गोड्या तेलासाठी भलीमोठी रांग होती. माणसे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. दुकानदार डोळ्यांत तेल घालून थेंबाथेंबाचा दाम दसपटीने वसूल करत होता. तेवढ्यात त्या रांगेतल्या एका फाटक्या परकरपोलक्यातल्या पोरीचा नंबर लागला. तिने दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली. दुकानदार "तेलाचे भांडे कुठाय?" म्हणून खेकसला.
ती म्हणाली, "येवढं पणतीभर द्या."
"अग, दिवाळीला अवकाश आहे! पणत्या कसल्या लावतेस?" पोरगी गांगरली. पण दारिद्र्य धिटाई शिकवते. लगेच सावरून म्हणाली, "दिवाळी कसली? खायाला त्याल द्या..."
"ह्या पणतीत?" दुकानदार म्हणाला.
मुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले. "यवडया पैशात किती बसतं ते द्या-"
"अग, दहा पैशाचं तेल द्यायला माप कुठलं आणू?"
"पण आमच्याकडे धाच पैशे हाइत्-" पोरीने स्वत:चा 'आमच्याकडे’ असा बहुवचनी उल्लेख केलेला पाहून त्या परिस्थितीतही मला मजा वाटली.
"अहो, कमीत कमी किती पैशाचं तेल देऊ शकाल तुम्ही?"
"अ‍ॅट लीस्ट फिफ्टीन-" दुकानदार,
त्याला ते सांगताना लाज वाटली असावी. नाहीतर तो इंग्लिश बोलला नसता. आपल्याकडे युटेरस, पाइल्स, सेक्शुअल इंटरकोर्स वगैरे शब्द आपण असेच लाज लपवायला इंग्लिशमधून वापरतो.

त्याची आणखी पाच पैशांची सोय केली. पोरीची पणती तरीही पुरती भरली नव्हती. तिच्या घरी पणतीहून अधिक मापाचे 'खायाचे तेल' परवडत नाही.

आता पणतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईशी होते ते तुटून गेले आहे, पणत्यांची आरास पाहिली, की 'आमच्याकडें धाच पैसे हाइत्' म्हणणारी ती मुलगी- नव्हे, एक प्रचंड आक्रोश मला ऐकू येतो. दिवाळीसारख्याच अनेक गोष्टीची नाती तुटत तुटत मी शून्य होत जातो.

(’एक शून्य मी’)

-oOo -


हे वाचले का?

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

देवळे आणि दांभिकता

गोव्यातील प्रसिद्ध शांतादुर्गा मंदिराबाहेरील हा फलक काल कुणीतरी शेअर केला त्यावरुन हा जुना अनुभव आठवला.

काही वर्षांपूर्वी एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने तिरुनेलवेलीला गेलो होतो. आमचे चार प्राध्यापक आणि मी नव-प्राध्यापक अशी टीम होती. आता आलोच आहे तर कन्याकुमारी, शुचीन्द्रम मंदिर वगैरे करावे असा बूट निघाला. मी भाविक वगैरे नसलो तरी इतरांबरोबर मंदिरात जाण्यास माझी ना नव्हती... आजही नसते. मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उत्तरीय पांघरून मंदिरात प्रवेश करु नये वगैरे सूचना होत्या. (आमच्या एका चावट प्राध्यापकाने, ’हा नियम स्त्रियांनाही लागू आहे का?’ असा प्रश्न विचारला. प्रश्न चावटपणे विचारला असला तरी माझ्या मते वाजवी आहे. )

पण काढलेले शर्ट्स ठेवण्याची व्यवस्था कुठेही दिसत नव्हती. तिथल्या कर्मचार्‍याला विचारले, तर तो म्हणाला ’हातावर टाकून घेऊन जा.’ कमरेचे कातड्याचे बेल्ट काढावेत का? असा प्रश्न विचारल्यावर, ’त्याची गरज नाही. फक्त वरचे कपडे काढून जा.’ असे उत्तर मिळाले.

हा प्रकार मला समजला नाही. म्हणजे उत्तरीयाने इंद्रमहाराजांना विटाळ होतो, पण अधरीयाने- त्याच प्रकारच्या कापडापासून बनवलेल्या तर सोडाच, अगदी जनावराच्या कातड्याने बनवलेल्या बेल्टने होत नाही. बरं ते उत्तरीय धडावर असेल तरच विटाळ होतो, हातावर असले तर होत नाही... ही गंमत मला कळली नाही. बेल्ट हा कातड्याचा असला तरी अधरीय म्हणून त्याचे वर्गीकरण करुन देवस्थान समितीने बहुधा त्याला exemption दिले असावे.

HypocracyAtTemples

माझ्या मते मूळ नियम हे आरोग्याशी निगडित असावेत. दक्षिणेतच अनेक मंदिरे अशी आहेत, जिथे व्यवस्थित आंघोळ करुन त्यांच्याकडून उपलब्ध करुन दिलेले धूतवस्त्र नेसूनच देवळात प्रवेश करता येतो. असे नियम समजण्याजोगे आहेत. देव या संकल्पनेशी पावित्र्याच्या कल्पना जोडल्या आहेत आणि त्यामुळे आरोग्याचा मुद्दा त्याला जोडून आला तर ते अगदीच वाजवी आहे. (स्वयंघोषित पुरोगाम्यांनी हे ’त्यांच्या दृष्टिकोनातून’ पाहाणॆ जमत नसेल तर सोडून द्या. तुमच्या दृष्टिने पुरोगामित्व हा झेंडा अथवा इझम आहे, जीवनपद्धती अथवा विचार नव्हे. )

पण त्यात भक्तांसाठी सोयी कराव्या लागतात, खर्च होतो. नफा कमी होतो. आणि त्या सोयीसाठी पैसे आकारावेत तर आध्यात्मिक पर्यटकांचा आकडा घटतो, (म्हणजे पुन्हा उत्पन्न घटते.)

त्यापेक्षा मोगलांचे मांडलिकत्व पत्करुन सुखासीन जीवन जगणार्‍या त्याच्या राणा प्रतापांच्या वंशजांनी, 'राणाजींनी केलेली 'चितोड परत मिळेपर्यंत गवताच्या गादीवर झोपेन’ म्हणून केलेली प्रतिज्ञा आपण पाळतो, असे स्वत:ला नि इतरांना पटवण्यासाठी पिसांच्या गादीखाली चार गवताच्या काड्या ठेवल्यासारखे हे कर्मकांड उरले आहे. ’उत्तरीय नाही’ एवढे कर्मकांड ठेवून मूळ हेतू शिंक्यावर टांगून ठेवलेला सोपा उपाय.

पण देवळाचे देवस्थान, आणि देवस्थानांचे 'आध्यात्मिक टूरिझम' झाले की असले कोलांटउड्या मारणारे नियम करुन पर्यटकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. देव नि श्रद्धा या व्यक्तीच्या आयुष्यात काही एक स्थान राखून असल्या, तरी देवस्थाने ही चोख धंदेवाईकच असतात, त्यांच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहायला शुचीन्द्रम मंदिराच्या त्या नियमाने मला शिकवले.

आमच्या गणितात इन्टिग्रेशन आणि डेरिवेटिव'चे काही मूलभूत नियम माहित झाले, की अवघड गणितेही सटासट सुटतात, हे जसे लक्षात आले तसे ’श्रद्धा, भक्ती वेगळी नि देवळे, देवस्थाने वेगळी. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा हवा’ हा मूलभूत नियम समजला नि पुढे अनेक बाबतीत त्याने उमज पडण्यास मदतच केली.

प्रशांत दामलेंच्या ’गेला माधव कुणीकडे’ मध्ये त्यांचे पात्र कुठे अडचणीत आले की ’मी कुठे काय, हा बघ.’ म्हणून आपल्या अंगावरची समस्या मित्राकडे टोलवून देत असते. अगदी तसेच अलिकडे मुद्द्यांना हेत्वारोपाने किंवा तसे दुसर्‍या धर्म/जात/गाव/देश यांच्याकडे बोट दाखवून ’त्यांच्याकडे नाही बघत तुम्ही’ किंवा ’त्यांना नाही बोलत तुम्ही’ म्हणून उडवून लावायचा सोपा उपाय वापरला जाऊ लागला आहे. अशा ’आमच्याच बाबतीत बोलता’ म्हणणार्‍या सर्वधर्मीय, सर्वस्थानीय, सर्ववर्गीय, सर्वजातीय... वगैरे गटाच्या लोकांसाठी:

कुणी म्हणेल, ’त्यांच्या चर्चमध्ये/ मशीदीमध्ये/ घरात ते काहीही नियम करतील, तुम्हाला पटत नसेल तर जाऊ नका.’ हे मला पुरेपूर मान्य आहे. त्याचबरोबर हास्यास्पद नि दांभिक निर्णयांना फाट्यावर मारण्याचा माझा नियमही असल्याने मी तिथूनच बाहेर पडलो, आणि ख्रिश्चन असल्याने त्या मंदिरात 'प्रवेश बंद' असलेल्या आमच्या अन्य प्राध्यापकाबरोबर मस्त भटकलो.

मंदिर/ चर्च/ मशीद ही खासगी प्रॉपर्टी आहे, त्यांनी तिथे नाकात बोट घालूनच प्रवेश केला पाहिजे असे नियम करण्याचा त्यांचा त्यांचा अधिकार मला मान्यच आहे. त्याचे समर्थन ते बाहेरच्यांसमोर करत असतील, तरीही माझी हरकत नाही. फक्त ते त्याला वैज्ञानिक आधार वगैरे आहे असे ते म्हणू लागले, नि इतरांनीही ते मान्य करावे असा अट्टाहास करु लागले, तर त्याच्याशी निगडित प्रश्नांची उत्तरे देण्यास ते बांधील आहेत. विशेषत: खाली डोकं वर पाय करुन प्रत्येक परंपरेत वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे आहे असल्या बतावण्या करणार्‍यांना तर हे प्रश्न विचारले जाणारच. तिथे ’मी कुठे काय, हा बघ.’ म्हणून पळ काढू देणार नाही मी.

- oOo -

जाताजाता:

’आमचे सारे ग्रेट', 'त्यांना सांगा की, आम्हालाच बोलता...’ जमातीच्या लोकांसाठी माझ्या घरात येताना 'खाली डोके वर पाय करुन चालावे लागेल’ असा नियम आहे. ज्यांना तो पाळायचा नाही, त्यांनी माझ्या घरात पाऊल न टाकण्याचे स्वातंत्र्य आहेच. आणि 'हा नियम इतरांसाठी का नाही? असा प्रश्न विचारणार असाल तर ’स्त्रिया आणि पुरुषांसाठी वेगळे नियम करणार्‍या देवस्थानांना विचारा की. तिथे नाही तुम्ही विचारत.’ असा तुमचाच तर्क तुम्हाला उलट फेकून मारेन. 😆

-oOo-


हे वाचले का?

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

पुलं, पुरस्कार आणि पोंक्षे

(’अक्षरनामा’ या पोर्टलवर जयवंत डोळे यांनी लिहिलेल्या ’गांधीवादी पुलंच्या नावचा पुरस्कार ’नथुराम’ पोंक्षे यांना?’ या लेखावरील प्रतिक्रिया.)
---

पहिला महत्वाचा हरकतीचा मुद्दा हा की पुलंना ’गांधीवादी’ हे लेबल लावणे चुकीचे आहे. माझ्या मते पोंक्षे नामक महाभागाची विचारधारा आणि पुलंची विचारधारा यात टोकाचा फरक आहे इतके नोंदवून थांबता आले असते.

एक पुलंप्रेमी म्हणून आणि पुलंनी विविध व्यासपीठांवरुन, लेखनातून मांडलेल्या विचारांशी बव्हंशी सहमत असलेली एक व्यक्ती म्हणून मला डोळे यांचा आक्षेप पटला आहे हे नमूद करतो. पण...

पुलंच्या नावाचा पुरस्कार पुलं परिवार, आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन या तिघांतर्फे देण्यात येतो आहे हे मी विसरत नाही. पुरस्कार देणारे जेव्हा एखाद्या दिवंगत व्यक्तीच्या नावे पुरस्कार देऊ करतात तेव्हा त्यात त्यांचा स्वार्थ, दृष्टिकोन मिसळलेला असतोच. अहो, हल्ली पोलिस, लष्कर, न्यायव्यवस्थेतही अनेकदा निवृत्तीकडे झुकलेले लोक राजकीय हवामानाचा अंदाज घेऊन उगवत्या सूर्याला अर्घ्य देणारे निर्णय घेताना दिसतात... त्यातील अनेकांची निवृत्तीनंतरची सोय लावली जाते हे ही आपण पाहतो. भारतीय माणसे, राजकारणी, तथाकथित समाजसेवक हे इतिहासातील घटना, व्यक्ती यांचा उदोउदो करतात ते त्याच्या आडून आपली पोळी भाजून घेण्यासाठीच.

उठता बसता शिवाजी महाराजांच्या, राम-कृष्णांच्या, शाहू महाराजांच्या, आंबेडकरांच्या नावच्या जपमाळा ओढणारे चोख स्वार्थी असतात. देवळात देवाच्या पायाशी दानपेटी असते, तसे या थोरांच्या पायी हे लोकांचे दान झेलायला बसलेलेच असतात. इतकेच नव्हे तर जाताजाता हे स्वयंघोषित पुजारी, पंडे, गुरव, मानकरी त्या व्यक्तीचे, घटनांचे रुपडे बदलून आपल्या सोयीचेही करुन घेत असतात.

आपले सणसणीत विरोधक असलेल्या पटेलांना भाजपने बळेच डोक्यावर घेऊन त्यांचा उदो उदो चालवला आहेच. उद्या डोक्यावरचे पटेल खांद्यावर, खांद्यावरचे कमरेवर आणि कमरेवरचे पायदळी जातील यात शंका नाही. काँग्रेसनेही गांधी टोप्या घालून गुंड-पुंडांचे, सरंजामदारांचे राजकारण केले आहेच. शाहू-फुले-आंबेडकरांचे अनुयायी म्हणवणारे सणसणीत जातीयवादी आसपास भरपूर सापडतील. भाजपने सावरकरांना डोक्यावर घेताना त्यांचा विज्ञानवाद पायदळी तुडवून सोयीस्करपणे फक्त हिंदुत्ववाद तेवढा स्वीकारला. ’गोरक्षण नव्हे, गोभक्षण करा’ म्हणणार्‍या सावरकरांचा उदो उदो करताना ’गोहत्याबंदी’ सारखा प्रतिगामी निर्णय घेतला.

PaintingTheIdol

थोडक्यात काय दिवंगतांना खांद्यावर घ्यायचे ते स्वत:चे घोडे दामटण्यासाठी. एखाद्या देखण्या दगडी मूर्तीला पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवा रंग फासून तिला अधिक 'सेलेबल' करणार्‍या देवस्थान समितीमध्ये आणि असे पुरस्कार देणार्‍यांमध्ये फार फरक समजता कामा नये.

भांडवलशाहीने एक शिकवले आहे, खिशात पैसा किती येतो, नफा किती मिळतो हे महत्वाचे. मूर्ती आम्ही विकतो आहोत, तिला रंग कोणता लावणार हे आम्हीच ठरवणार. आणि बाजारात कोणत्या रंगाच्या मूर्तीला अधिक मागणी आहे त्यानुसारच आम्ही हा रंग ठरवणार आहोत.

तसेच पुलंच्या नावे आमचा टीआरपी किती वाढतो हे महत्वाचे असते. त्यात पुलंनी त्यांची भूमिका थोडी अ‍ॅडजस्ट करुन घेतली तर कुठे बिघडले. बाजारात सध्या हिंदुत्ववादी पुलंना गिर्‍हाईक जास्त आहे. तर आम्ही त्यांच्यावर पोंक्षेंचा रंग फासून त्यांना विकू. हाय काय न नाय काय. उद्या कम्युनिस्टांचे राज्य आले तर आम्ही कॉम्रेड पुलं असे व्हर्शन विकू. शेवटी काय, कार्यक्रमासाठी आम्हाला स्पॉन्सर मिळण्यासाठी, गर्दी जमवण्यासाठी जो रंग द्यायचा तो देऊ की. एवढी कटकट कशापायी करता म्हणे.

तुम्ही कलेच्या क्षेत्राशी कितपत संबंधित आहात मला ठाऊक नाही. 'कट्यार काळजात घुसली' म्हणून दारव्हेकरांचे एक संगीत नाटक आहे. चार सहृदयी आणि परस्परांबद्दल नितांत आदर नि आपुलकी असणार्‍या व्यक्तींमधला व्यवस्थेने निर्माण केलेला संघर्ष आणि त्यातून प्रत्येकाची होणारी तडफड याचे सुरेख दर्शन त्यात घडते. सुष्ट-दुष्ट अशी मांडणी करुनच जगाकडे पाहणार्‍या करंट्यांच्या जगात सुष्ट सुष्टांमधलाच संघर्ष रंगवणारे दुर्मिळ नाटक. त्याचा चित्रपट करताना त्याचे 'सर्व हिंदू गुणी बालके आणि एक अपवाद वगळता सगळे मुस्लिम वैट्टं राक्षस' असले भिकार चित्रण आम्ही पाहिले. दारव्हेकर जिवंत असते तर तेंडुलकरांसारखे ’मला पिस्तुल द्या’ म्हणू लागले असते याची मला खात्री आहे.

याच कारणाने माणसाने आपला वारसा काय असेल यावर आपले डोके खपवू नये. कारण पुढचे लोक तो पुसून त्यांना हवा तो वारसा तुमचा म्हणून हट्टाने रुजवून देतात. आसपास किती विचारहीन, कणाहीन माणसे त्यांनी जमा केली आहेत त्यावर ते रुजेल की नाही ते ठरते. बुद्धिहीनांचा जमाव वाढला की निर्बुद्धालाही आईन्स्टाईनपेक्षा हुशार असल्याचे सर्टिफिकेट मिळून जाते. आणि त्याच्या शाळकरी कल्पनांना मास्टरस्ट्रोक वगैरे म्हणत त्यांचे भाट व्हॉट्स-अ‍ॅपवर पसरवत राहतात. आधीच दिवंगत होऊन बसलेले आपण त्याला काहीही करु शकत नसतो.

फारतर लेख, व्याख्याने, आंदोलने ही हत्यारे घेऊन लढणार्‍या आपण प्रॉपगंडा नावाचे एक हत्यार दुर्लक्षित केले. हे मान्य करायला हवे. स्वत: न वापरणे हा मुद्दा वेगळा नि इतर कुणी वापरणार नाही हा मुद्दा वेगळा, हे इथे मुद्दाम नमूद करतो. जरी ते अपवित्र असले म्हणून आपण नाकारले तरी विरोधक वापरणार नाहीत असे गृहित धरता येत नाही. हळू हळू एक एक आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्र काबीज करण्यासाठी त्याचा वापर केलेला पाहूनही आपण लेख लिहिण्यापलीकडे काही करु शकत नाही हा आपला दोष आहे. हे आपण मान्य करायला हवे.

आणि ज्याच्याशी ७०-८०% विचार जुळतात अशा एखाद्या विचारवंताची एखाद्या विषयातली मांडणी आपल्या पटत नाही म्हणून त्याला दूर ढकलून विरोधकांच्या गटात अनायासे पोचवणारे अस्पृश्यतावादी करंटेपणही तुम्हा-आम्हा पुरोगाम्यांचेच. मग पुलं म्हटले की त्यांच्या कुठल्यातरी व्यक्तिचित्रणातले उल्लेख शोधून ’ते श्रद्धेचे उदात्तीकरण करतात’ म्हणून नाक मुरडणारे पुरोगामी मुखंड मला ठाऊक आहेत. या मार्गाने आपणच पुलंना प्रतिगाम्यांच्या गोटात का ढकलत आहोत असा प्रश्न त्या विद्वानाला पडला नव्हता. असे चार-दोन दिवटे निघाले की बाहेर फेकले गेलेले पुलं अल्लदपणे झेलून त्यांच्यावर सोयीचा रंग चढवणे सोपे जाते. त्याची सुरुवात पोंक्षेंना सोबत घेऊन झाली आहे असे म्हणू या.

विठोबाला जसा बहुजनांकडून हिसकावून त्याचा वैष्णव देव केला, विवेकानंदांना हिंदुत्ववादी संत अशी इमेज बनवली, अनेक सांस्कृतिक परंपरा या आपले रंग फासून आपल्याच असा दावा करत पचवल्या, त्यांच्यासाठी पुलं एक किरकोळ प्यादे आहे हे ध्यानात घ्या.

तेव्हा डोक्याला त्रास करुन न घेता पुलंच्या नावच्या पुरस्कार पोंक्षे नामक समाजवाद्याला दिल्याबद्दल तीनही प्रायोजकांना उदंड धन्यवाद द्यावेत हे उत्तम नाही का?

-oOo-


हे वाचले का?

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

त्राता तेरे कई नाम

अलिकडेच ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ नावाची एक इंग्रजी दूरदर्शन मालिका अतिशय गाजली. पक्षप्रतोद ते अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असा एका महत्त्वाकांक्षी राजकारण्याचा प्रवास, त्या निमित्ताने राजकारणाचे अनेक ताणेबाणे, त्यात गुंतलेल्या अर्थसत्तेची भूमिका, त्या सापटीत पत्रकारांची होणारी फरफट आणि त्या वावटळीत सापडलेल्यांचे पडलेले बळी, असा विस्तृत पट त्यात मांडला होता. या राष्ट्राध्यक्षाचे व्यक्तिमत्व उजळण्यासाठी प्रॉपगंडा तयार करण्यासाठी नेमल्या गेलेल्या, पण स्वतंत्र बाण्याच्या टॉम येट्स या लेखकाचे त्यात एक मार्मिक वाक्य आहे. Nobody cares about an idea. They might care about a man with an idea. I only care about the man. भारतीय राजकारणाचा विचार केला तर भारतीय मतदारांचा मानसिकतेचे इतके अचूक वर्णन दुसरे होऊ शकणार नाही.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. भाजप-सेनेला सत्ता मिळणार, हे अगदी विरोधकांनाही पहिल्यापासून ठाऊक होतेच. त्यामुळे तसे पाहिले तर प्रचारात फार काही थरार वगैरे अपेक्षित नव्हता. सरकार स्थापनेबाबत जरी अनपेक्षित घडण्याची शक्यता नसली, तरी निकाल मात्र अनपेक्षित लागले. आणि हा बदल घडला तो शरद पवार या राजकारणातील ‘ऐंशी वर्षाचा असून म्हातारा, वय सोळा’ असल्याच्या ऊर्जेने धावाधाव केलेल्या राजकारणातल्या जुन्या मल्लामुळे.

गेल्या काही वर्षांत स्थानिक नेत्यांकडे धुरा सोपवून मागे सरकलेल्या पवारांनी पुन्हा मैदानात उतरून शंख फुंकला आणि त्यांच्या झंझावातामुळे खांदे पाडून बसलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा चैतन्य संचारले. त्याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादीने मागच्या तुलनेत तब्बल ३० टक्के अधिक जागा जिंकल्या आणि सोबत घेतलेल्या जवळजवळ निर्नायकी अशा काँग्रेसलाही आपले बळ राखण्यास मदत केली.

TheSavior
askgramps.org येथून साभार.

वर उल्लेख केलेल्या टॉम येट्सच्या विधानात म्हटल्याप्रमाणे लोक तत्त्वांना, मुद्द्यांना ओळखत नाहीत, ते चेहऱ्याला ओळखतात. 'अमुक एक विपदा ‘कशी निवारता येईल?’ यापेक्षा ‘कोण निवारील?’ हा प्रश्न त्यांना अधिक समजतो, नि त्याचे उत्तर त्यांना हवे असते. या देशात जोरात चाललेली तथाकथित बुवा-बाबांची, राजकारण्यांची दुकाने हेच सिद्ध करतात.

सामूहिक नेतृत्व या देशाला मानवत नाही हे पुन्हा-पुन्हा सिद्ध झाले आहे. देशात सर्वाधिक काळ सत्ताधारी राहिलेला काँग्रेस हा पक्ष नेहमीच एका नेत्याच्या करिष्म्यावर उभा होता. पं नेहरु, इंदिरा गांधी आणि शेवटी राजीव गांधी या नेतृत्वाकडे भोळीभाबडी जनता त्राता म्हणूनच पाहात होती. राजीव गांधीच्या हत्येनंतर काँग्रेसला उतरती कळा लागली. यातूनच भाजपच्या नेतृत्वाखाली विरोधकांचे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकून राहिले. हे ओळखून काँग्रेसच्या मुखंडांनी पुन्हा एकवार गांधी घराण्याला साकडे घातले नि सोनिया गांधी यांना नेतेपद दिले.

ModiVsRahul

संघानेही नेमके हेच हेरून, अडवानींसारख्या ज्येष्ठाचा विरोधाला न जुमानता, आपली ‘सामूहिक नेतृत्वाची’ परंपरा दूर सारून नरेंद्र मोदींना पक्षाचा चेहरा म्हणून पुढे आणले. हे करत असतानाच काँग्रेसचा चेहरा उध्वस्त करण्याची रणनीती आखली. त्यांच्या सुदैवाने राहुल गांधी यांच्या पहिल्याच फसलेल्या मुलाखतीने त्यांचा मार्ग सुकर झाला. मोदींची प्रतिमा आणखी उंच आणि राहुल गांधींची अधिकाधिक मलीन/क्षुद्र करण्याची पुढची कामगिरी त्यांच्या माध्यम-कार्यकर्त्यांनी चोख पार पाडली. अनेक माध्यमांनी राहुल गांधी हे अध्यक्ष नसताना, विरोधी पक्षनेते नसतानाही ‘मोदी विरुद्ध गांधी’ या आणि अशा शीर्षकाखाली अप्रत्यक्ष प्रॉपगंडा मशीनरी चालवली. भारतीय राजकारणातील संघर्ष हा दोन विचारसरणी, दोन राजकीय पक्ष नव्हे तर दोन चेहऱ्यांमधील आहे हे ठसवण्याचे काम केले.

याचाच परिणाम म्हणून भाजपला प्रथमच स्वबळावर सत्ता मिळवता आली. यापूर्वी वाजपेयी किंवा अडवाणी हे पक्षाचे फक्त नेते होते. २०१४ मध्ये प्रथमच ‘अब की बार भाजपा सरकार’ नव्हे तर ‘अब की बार मोदी सरकार’ हा नारा दिला गेला होता. हा फरक जरी मोदींच्या ‘पक्षापेक्षा मोठे होण्याचा प्रयत्न’ म्हणून टीकेचा धनी झालेला असला, तरी सर्वसामान्यांना ‘दिसेल’ असा एक निश्चित चेहरा समोर आल्याचा फायदाच त्यातून मिळाला हेच वास्तव आहे.

प. बंगालमधे तेवीस वर्षे मुख्यतः ज्योती बसूंचा चेहरा घेऊन उभ्या असलेल्या कम्युनिस्ट सरकारला त्यांच्या मृत्यूनंतर सत्तेतून पायउतार व्हावे लागले. एकेकाळी भरघोस बहुमताने सत्ता राबवलेल्या डाव्या आघाडीला २०१६च्या निवडणुकीत एकूण आमदार संख्येच्या जेमतेम दहा टक्के प्रतिनिधी निवडून आणता आले नि ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. तर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना बंगालमधून एकही खासदार निवडून आणता आलेला नाही! याउलट ममता बॅनर्जींचा चेहरा घेऊन उभा राहिलेल्या तृणमूल काँग्रेस या स्थानिक पक्षाने सलग दुसऱ्यांदा स्वबळावरच नव्हे तर दोन-तृतीयांश बहुमतासह सरकार स्थापन केले.

त्रिपुरामध्ये माणिक सरकार, ओदिशामध्ये नवीन पटनायक या नेत्यांनी तीन-चार वेळ सलगपणे आपल्या नेतृत्वाखाली आपल्या पक्षाला सत्ता मिळवून दिली होती. तमिळनाडूत तर जवळजवळ एकच विचारसरणी असलेले दोन पक्ष वर्षानुवर्षे केवळ दोन विरोधी चेहऱ्यांचीच लढाई लढत आहेत. प्रथम एनटीआर नि नंतर चंद्राबाबू नायडू ही तेलगू देशमची ओळख आहे, अब्दुल्ला घराणे ही नॅशनल कॉन्फरन्सची, मुलायमसिंग यांचे यादव घराणे ही समाजवादी पक्षाची. बसपाच्या मायावतींना तर सर्वेसर्वा असेच विशेषण लावले जाते.

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा प्रथम शरद पवार, मग अजित पवार आणि आता उदयाला येऊ पाहणारे नवे नेतृत्व म्हणजे रोहित पवार असा पवार घराण्याचाच आहे. शिवसेनेचेही ठाकरे घराणेच कायम नेतृत्व करते आहे. तिशीदेखील न ओलांडलेल्या, राजकारणाचा आणि प्रशासनाचा कोणताही अनुभव नसलेल्या आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी हयात राजकारणात घालवलेले, साठी उलटलेले शिवसैनिक हिरिरीने करतात तेव्हा त्या प्रवृत्तीमागेही ‘चेहरा कायम रहे’ ही आसच अधिक असते.

निश्चित चेहरा हवा याच कारणासाठी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बदनाम झालेल्या आणि मोदींनी घोषित केलेली ७५ वर्षांची मर्यादा ओलांडलेल्या येदियुरप्पांनाचा कर्नाटक भाजपचा चेहरा म्हणून कायम ठेवण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या हरयाना आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींनंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने – म्हणजे अमित शहा यांनी – पुन्हा मागच्याच मुख्यमंत्र्याच्या हाती सुकाणू सोपवण्याचा निर्णय घेतला, तो त्या त्या राज्यात पक्षाचा एक निश्चित चेहरा असावा म्हणूनच. त्या तुलनेत महाराष्ट्रातील प्रत्येक सत्ताकाळात किमान दोन मुख्यमंत्री देणाऱ्या काँग्रेसची आज झालेली निर्नायकी अवस्था पाहिली की हा मुद्दा पुन्हा एकदा ठळक होतो आहे.

पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे हे तीन माजी मुख्यमंत्री (राणे बाहेर पडले अन्यथा ते काँग्रेसचे नसले तरी काँग्रेसमधले चौथे) . विलासराव देशमुखांसारख्या आणखी काही माजी मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी काँग्रेसमध्ये असल्याने एक निश्चित चेहरा देण्यास अडचणी येतात. याच कारणाने अशोक चव्हाण पायउतार झाल्यावर संगमनेरच्या पलीकडे फारसा प्रभाव नसलेल्या बाळासाहेब थोरातांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवण्यात आले. हे बहुतेक नेते आपापल्या मतदारसंघाबाहेर फार लक्ष घालताना दिसत नाहीत.

याउलट फडणवीस राज्यात कुठे कुठे पक्ष कमजोर आहे, कुठे उमेदवार आयात करावा लागणार, तो कोण असावा, विरोधकांच्या स्थानिक राजकारणावर बारीक लक्ष ठेवून त्यातील कोणता मासा गळाला लावता येईल, यावर लक्ष ठेवून ते पक्षांतर वाजतगाजत घडवून आणतात. मोदी-शहांनी त्यांना महाराष्ट्र भाजपचा चेहरा म्हणून पाठिंबा दिलेला असल्याने, आपल्या या कष्टाचे फळ मिळत असताना श्रेष्ठींकरवी ते दुसराच कुणी हिरावणार नाही याची बरीचशी शाश्वती त्यांना असावी. याउलट काँग्रेसचे संस्थानिक एकमेकांच्या परिघात फिरकायचे नाही अशा अलिखित नियमाने वागतात. त्यातून त्यातला कुणी एक इतरांपेक्षा मोठा होण्याची, महाराष्ट्रव्यापी चेहरा म्हणून उभा राहण्याची शक्यता संपुष्टात येते. पक्ष विखंडित होत जातो नि गळती लागून हळूहळू प्रभावहीन होत जातो.

या तर्काच्या पुष्ट्यर्थ काँग्रेसचीच अन्य राज्यांतील वाटचाल पाहता येईल. २०१४च्या मोदींच्या ‘टर्निंग पॉईंट’ ठरलेल्या विजयानंतर झालेल्या पंजाबच्या निवडणुकांत कॅप्टन अमरिंदरसिंग या नेत्याच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मोदींच्या भाजपला धूळ चारली. मागच्या महिन्यातील हरयानातील निवडणुकीत भूपिंदर हुड्डा या माजी मुख्यमंत्र्याच्या हाती पुन्हा सुकाणू देताच ९० पैकी ७५ जागा जिंकण्याची डरकाळी फोडणाऱ्या भाजपला काँग्रेसने घाम फोडला. राजस्थानात अशोक-गेहलोत-सचिन पायलट, मध्य-प्रदेशात कमलनाथ-ज्योतिरादित्य सिंदिया यांचे चेहरे सत्तास्थानी असणारे हे निवडणुकीपूर्वीच जनतेला ठाऊक होते. तिथे भाजपच्या सत्ता उलथून जनतेने काँग्रेसला पुन्हा सत्ता दिली.

त्याचवेळी उलट दिशेने पाहिले, तर गोव्यातून मनोहर पर्रिकर केंद्रात मंत्री म्हणून जाताच भाजपचे बळ घसरुन त्यांना काँग्रेसहून कमी जागा मिळाल्या. नाईलाजाने त्यांना पुन्हा राज्यात परतून तिथले सत्तास्थापनेचे गणित जमवावे लागले.

इंदिरा गांधी यांच्या राजकारणाबाबत असे म्हटले जाई, की त्या राज्यात कोणत्याही एका व्यक्तीचे नेतृत्व उभे राहू देत नसत. सतत एकासमोर दुसरा उभा करून त्यांचे बळ फार वाढणार नाही याची दक्षता त्या घेत. हे योग्य की अयोग्य यावर दोन्ही बाजूंनी तर्क देता येतील. वर म्हटल्याप्रमाणे यातून एक चेहरा उभा राहात नसल्याने सत्ताकारण डळमळीत होण्याचा धोका असतो. पण बळकट केंद्रीय नेतृत्व असले की ते ज्या डोक्यावर हात ठेवेल तो चेहरा केंद्राचाच चेहरा म्हणून जनता पाहात असते. इंदिराजींच्या मृत्यूनंतरही कित्येक वर्षे ‘मतदान कुणाला करणार?’ या प्रश्नावर ‘बाईला’ असे उत्तर देणारे अनेक मतदार होते ते याचमुळे.

पण याची दुसरी बाजू अशी की राज्यातले नेतृत्व बळकट झाले की संधी साधून ते दुबळ्या केंद्रीय सत्तेला झुगारून स्थानिक पातळीवर स्वतंत्र होऊन राजकारण करू शकते. ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, चंद्रशेखर राव, जगनमोहन रेड्डी आणि अर्थातच शरद पवार ही काँग्रेसला झुगारून स्वतंत्र झालेली ठळक उदाहरणे आहेत. यातील शरद पवारांचा अपवाद वगळता इतरांनी काँग्रेसला मागे टाकून स्वबळावर सत्ताही मिळवल्या. पण हे सारे केंद्रातील नेतृत्व दुबळे झाल्यानंतर.

आजच्या भाजपची मार्गदर्शक संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही भूमिका काहीशी अशीच आहे. नेत्यापेक्षा पक्ष/संघटना मोठी असायला हवी असा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे भाजपमध्येही कोणता नेता फार मोठा होऊ नये अशी त्यांची भूमिका असे. त्यातून संघटनेचे नियंत्रण भक्कम राही. अटलजींच्या काळापर्यंत ते यात बव्हंशी यशस्वीही झाले. पण अडवाणींना मागे सारण्यासाठी पुढे आणलेल्या मोदींनी मात्र त्यांचे हे धोरण साफ मोडीत काढले. सत्ताकारण हेच सर्वोच्च मानून त्यांनी सर्व प्रकारच्या राजकीय तडजोडी करताना संघविचार, संघटनेचे हित वगैरे सरळ झुगारून दिले. केंद्राप्रमाणेच राज्यातही एकचालकानुवर्तित्व निर्माण करणे हा ही त्याचाच एक भाग आहे.

पण त्याचवेळी ज्याप्रमाणे राजीव गांधींच्या मृत्यूनंतर केंद्रीय नेतृत्व दुबळे झाल्यानंतर राज्यातील संस्थानिकांना स्वतंत्र होण्याची संधी मिळाली, तशी 'भविष्यात मोदी-शहांचे नेतृत्व दुबळे झाल्यामुळे किंवा त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या मर्यादित कुवतीमुळे, तीच संधी हे त्यांचे संस्थानिक घेऊ शकतील का?' या प्रश्नाला होकारार्थी उत्तर मिळण्यात रा.स्व. संघ या संघटनेचा मोठा अडसर आहे. काँग्रेस ज्या वेगाने विखंडित झाली तसे मोदी-शहांच्या नंतर अथवा त्यांचे नियंत्रण कमी झाल्यामुळे भाजपही विखंडित होण्याची शक्यता कमी आहे.

बुद्धिवाद्यांची तशी अपेक्षा असली, तरी भारतातील राजकारण तत्त्वनिष्ठ कधीही नव्हते. अलीकडे बंगालमधील तथाकथित कम्युनिस्ट केडरने ममता बॅनर्जींना विरोध म्हणून भाजपचा प्रचार करून 'आपली निष्ठा कम्युनिस्ट सरकारशी होती (कारण ते ‘सरकार’ होते!) कम्युनिस्ट विचारसरणीशी नव्हे' हे अप्रत्यक्षपणे सिद्ध केलेच आहे. समाजवादी विचारसरणीचा टेंभा मिरवणारे नीतिशकुमारांसारखे नेते एनडीए, यूपीए असे तळ्यात-मळ्यात खेळत असतात.

पण हे राजकारण पक्षनिष्ठही कधीच नव्हते. कारण पक्ष हा विचारसरणी नसली, तरी एका विशिष्ट दृष्टिकोनाच्या आधारे एकत्र असलेल्या नेत्या-कार्यकर्त्यांचा समूह असायला हवा.इथले पक्ष हे एक चेहरा नि उरलेले त्याच्या रथाला जोडलेले घोडे अशी रचना असलेला जमाव असतो. मुलायमसिंह, लालूप्रसाद यादव, चंद्रशेखर राव, शरद पवार, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे, देवेगौडा, करुणानिधी यांचे पक्ष त्यांच्या घराण्यांच्या प्रायवेट लिमिटेड कंपन्याच आहेत. त्या त्या घराण्यातील चेहरा हाच त्या पक्षाचा चेहरा असतो, तो यशस्वी होतो की अयशस्वी होतो हा मुद्दा अलाहिदा.

त्या त्या नेत्यांनी अथवा पक्षांनी विचारसरणीच्या कितीही बाता मारल्या तरी सत्ता हे एकच तत्त्व ते खऱ्या अर्थाने जाणत असतात. निवडणूक कोणतीही असो आणि विचारांच्या, विकासाच्या, प्रगतीच्या, जनतेच्या सेवेच्या बाता कुणीही मारो, जनतेच्या मनातला प्रश्न ‘याला निवडावे की त्याला?’ असाच असतो. आणि मतदार जो चेहरा निवडेल त्याचा पक्ष सत्ताधारी होतो.

पुरोगामी वर्तुळातील अनेकांना ही व्यक्तिकेंद्रित रचना पटत नाही. परंतु त्यांनी एक ध्यानात ठेवायला हवे की शेवटी राजकारण हे व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याचे प्रतिबिंबच असते. जोवर भारतात देवळांत गर्दी आहे, बुवा-बाबांचे मठ ओस पडलेले नाहीत, बलात्कारितेच्या समर्थनार्थ मूठभर माणसे उभी राहात नाहीत पण बलात्कारी बाबाच्या समर्थनार्थ हजारोंचा जमाव जमून जाळपोळ करतो आहे, तोवर राजकारणातही त्याच मानसिकतेचे प्रतिबिंब उमटत राहणार आहे. लोक तिथेही त्रात्याच्याच शोधात राहणार आहेत, आणि ‘मीच तो’ असा दावा आक्रमकपणे करणाऱ्याला, आध्यात्मिक गुरुच्या पायावर ज्या निष्ठेने डोके ठेवतात, त्याच निष्ठेने निवडून देणार आहेत. प्रश्न असा आहे की तुम्ही तसा नेता उभा करून राजकारण करणार आहात, की समाजाच्या मानसिकतेमध्ये मूलभूत बदल घडण्याची वाट पाहात तोवर सत्ताकारणाचा प्रांत विचारविरहित, व्यक्तिकेंद्रित राजकारणाला आंदण देऊन टाकणार आहात?

-oOo-

(पूर्वप्रसिद्धी: ’द वायर - मराठी’)


हे वाचले का?