सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

चलनमुक्त समाज आणि इतिहास (सहलेखक: अ‍ॅड. राज कुलकर्णी)

चलनातून पाचशे नि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बाद करत 'कॅशलेस' अर्थव्यवस्था हे आपले अंतिम उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच जाहीर केले आहे. अशा प्रकारच्या व्यवस्थेचे नागरिकांच्या अर्थव्यवहारावर होऊ शकणार्‍या संभाव्य परिणामांबाबत चर्चाही सुरू झाल्या आहेत. परंतु अशा प्रकारची व्यवस्था सामाजिक पातळीवर काही बदल घडवू शकेल का हे पाहणेही आवश्यक ठरेल. हा मुद्दा उपस्थित करण्याला ऐतिहासिक आधार आहेत आणि इथे त्यातील एका पैलूचा वेध घेण्याचा प्रयत्न आहे.

WeeklyBazaar

जगभरात मानवी संस्कृती जसजशी विकसीत होवू लागली तसतशी अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांपलिकडे माणसाच्या गरजांची संख्या वाढू लागली. आपल्या गरजेच्या सर्वच वस्तू आपापल्या निर्माण करण्याऐवजी एकेका उत्पादनाची जबाबदारी एका व्यक्तीला वा समूहाला देऊन त्या वस्तूंची गरजेनुसार देवाणघेवाण करण्याचा मार्ग स्वीकारण्यात आला. एकच व्यक्ती वा समूह एकाच प्रकारचे उत्पादन वारंवार घेत राहिल्याने उत्पादनाची गुणवत्ता सुधारली आणि उत्पादनासाठी आवश्यक कालावधी कमी होत गेला. अशा तर्‍हेने सुरु झालेला वस्तू-विनिमय हाच सहजीवनाचा आधार बनला. प्राचीन काळापासून सुरु झालेली वस्तू-विनिमयाची ही पध्दत भारतात अगदी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत चालू होती.

भारताचे ग्रामीण अर्थकारण संपूर्णपणे या वस्तू-विनिमय पद्धतीवर आधारलेले होते. गावात दैनंदिन व्यवहारासाठी उपयुक्त असणारया विविध वस्तू बनविण्याचे काम हे बलुतेदारी व्यवस्थेनुसार ठरलेले असे. या बलुतेदारांना दोन्ही हंगामानंतर वर्षभराचे बलुते देवून त्याच्याकडून वर्षभराची सेवा पुरवली जात असे. हळूहळू विशिष्ट वस्तूचे उत्पादन हा त्या त्या गटांचा पारंपरिक, वंशपरंपरागत व्यवसाय बनला. यालाच आपण बलुतेदारी पध्दत म्हणतो. या बलुतेदारीला सामाजिक चौकटीत घट्ट बसवत जातीव्यवस्थेचा जन्म झाला. त्रिं. ना. आत्रे यांच्या गावगाडा या ग्रामीण अर्थकारण आणि प्रशासनाची सखोल माहिती देणाऱ्या ग्रंथात बलुतेदारी पद्धतीचे कार्यान्वयन कशा पद्धतीने चालत असे याचे खूप विस्ताराने वर्णन केले आहे.

जगातील सर्वच प्राचीन संस्कृतीतील अर्थकारण हे मुळात शेतीवर आधारित असल्यामुळे वस्तू-विनिमयात प्रमुख वस्तू म्हणजे शेतमाल आणि पाळीव जनावरे यांचा समावेश होत असे. निव्वळ देवाण-घेवाणी पलिकडचे व्यवहारदेखील वस्तूंच्या स्वरूपात पुरे केले जात. अगदी दान किंवा दंड यासारख्या एकतर्फी क्रियांची पूर्ती देखील वस्तू-स्वरूपात केली जात असे. रामायण, महाभारत या सारख्या ग्रंथात द्रव्यदान आणि द्रव्यदंड यांचा उल्लेख येतो तो मुळात वस्तू स्वरूपातील दान आणि दंड या अर्थाचाच आहे. अमुक व्यक्तीला १०० गाई देण्याचा दंड ठोठावण्यात आला किंवा अमुक ब्राह्मणाला १०० गाई दान दिल्या, असे उल्लेख पुराणात देखील आहेत.

पुढे विनिमय-व्यवहाराची व्याप्ती वाढल्यावरही व्यवहारात आवश्यक वस्तू खरेदी करताना देखील दुकानदाराला धान्य देवून खरेदी केल्या जात असत. आठवडी बाजाराच्या दिवशी ‘फडी’वर धान्य घालून, थोडेफार पैसे घेतले जात असत आणि त्या पैशातून त्याच बाजारात विविध वस्तूंची खरेदी केली जात असे. म्हणजे आठवडी बाजारात धान्य घेवून गेलेला व्यक्ती येताना पुन्हा वस्तू घेवून येत असे.

विकासाच्या प्रक्रियेत समाज जीवन बदलले तशा गरजा बदलल्या, वाढल्या आणि परिणामी विनिमयातील वस्तूंची संख्या वाढत गेली. या संख्यात्मक वाढीमुळे वस्तू-विनिमय व्यवहारात खूप अडचणीचा होवून बसला. सर्वच वस्तूंना एकाच मापाने मोजता यावे यासाठी चलनाचा शोध लागला. माणिक, मोती, शंख, शिंपले, कवडी यांचा वापर चलन म्हणून केला जावू लागला. पुढे या वस्तूंची उपलब्धता आणि टिकाऊ पणा या दोन गोष्टींबाबत येणार्‍या अडचणींमुळे पर्यायाचा शोध सुरु झाला आणि धातूंची नाणी तयार करण्यात आली. चलनाचा वापर सुरु झाल्यानंतरही अनेक कारणांनी वस्तू-विनिमया ची पद्धत सुरूच राहिली. चलन अत्यल्प प्रमाणात आणि समाजातील ठराविक लोकांपुरतेच मर्यादित होते.

प्राचीन भारतात मौर्य काळापासून सर्वसामान्य लोकांनी चलन मोठ्या प्रमाणावर वापरण्यास सुरुवात झाली आणि हाच तो कालखंड होता ज्या काळात वर्णाश्रम व्यवस्थेवर आघात करून जन्मजात श्रेष्ठत्वाला विरोध करणारे जैन आणि बौद्ध या सारखे धर्मसंप्रदाय समाजात स्थिरावले होते. पुढील कालखंडात सातवाहन, गुप्त, कुशाण, शक आदी राजवटींच्या काळात व्यापार उदीम वाढीस लागला आणि चलन-विनिमय व्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रचलित झाली. वस्तू-विनिमय कमी झाला. उत्पादने आणि सेवा यांचा मोबदला चलनाच्या स्वरुपात दिला जावू लागल्यामुळे जन्मदत्त रोजगाराखेरीज अन्य रोजगार स्वीकारणे शक्य होऊ लागले. यातून जन्मदत्त रोजगाराशी बांधून घातलेल्या जातीव्यवस्थेवर आघात होण्यास सुरुवात झाली

चातुर्वर्ण्य व्यवस्थेत कृषी, गोरक्ष आणि वाणिज्य ही तिन्ही कामे वैश्य वर्णीयांची होती आणि बदललेल्या आर्थिक सामाजिक परिस्थितीत संपत्ती मिळवण्याची हीच प्रमुख साधने होती. चलन पद्धतीत झालेल्या क्रांतीमुळे आणि वाढलेल्या व्यापारामुळे प्राचीन भारतातील सर्व समाज वैश्य वर्णीय यांची कामे करू लागला ! याचा फायदा शूद्र समाजाला देखील झाला, कारण बदललेल्या अर्थकारणात मनुष्यबळाची प्रचंड मोठी आवश्यकता होती. व्यापारासाठी आवश्यक त्या उत्पादनाच्या वेगात आणि मोठ्या प्रमाणावर निर्मितीसाठी कामगारांच्या श्रेणी निर्माण झाली असल्याचा संदर्भ ए .एस. अळतेकर यांनी त्यांच्या ‘स्टेट अँड गव्हर्नेंट इन एन्शन्ट इंडिया’’ या ग्रंथात नमूद केले आहे. असे असले तरी व्यवस्थेच्या ठेकेदारांनी ताबडतोब 'शूद्रांना धनसंचयाचा अधिकार नसल्याचा' नियम घालून देऊन चलनाने शूद्रांसाठी उघडलेली दारे पुन्हा बंद करून टाकली.

प्राचीन भारतीय इतिहासातील व्यापारी संस्कृतीचा हा उर्जित काळ सहाव्या-सातव्या शतकापर्यंतच राहिला. हर्षवर्धन हा शेवटचा मोठा सम्राट; त्यानंतर एकही मोठे आणि स्थैर्य असणारे साम्राज्य निर्माण झाले नाही. व्यापाराला राजाश्रय देणारी राजघराणी संपुष्टात आल्यामुळे व्यापार उध्वस्त झाला आणि परिणामी चलन व्यवस्था अविश्वासार्ह ठरत पुन्हा वस्तु-विनिमयाला सुरुवात झाली. ज्याचा परिणाम पुन्हा जातीव्यवस्था बळकट होण्यामध्ये झाल्याचे दिसून येते. सहाव्या आणि सातव्या शतकात या देशात काय घडले असेल तर केवळ तत्त्वचिंतकांच्या चर्चा आणि वेदांत, द्वैती, अद्वैती यांच्यातील मतमतांतराचे खंडन आणि मंडन ! याच पार्श्वभूमीवर आदि शंकराचार्यांनी सनातन वैदिक वर्णाश्रमधर्माची पुनर्मांडणी केली, ज्यातून पुन्हा श्रौतस्मार्त परंपरातून वर्णव्यवस्था बळकट झाली.

ती नष्ट होण्याची सुरूवात कांही प्रमाणात शिवाजी महाराजांच्या आणि त्यानंतर ब्रिटीशांच्या काळात सुरु झाली! ब्रिटिशांनी भारतीय चलन व्यवस्थेचे एकीकरण करून त्यात एकरूपता आणली आणि सेवेचा मोबदला रोख स्वरुपात दिला जाऊ लागला.पूर्वीच्या व्यवस्थेत धनसंचयाचा अधिकारच नाकारल्या गेलेल्या शूद्र समाजाला या चलनाच्या माध्यमातून धनसंचय करणे शक्य होऊ लागले. समाजातील उपेक्षित असणारा दलित समाज ब्रिटीशांच्या काळात मोठ्या प्रमाणात ब्रिटीशांच्या सैन्यात भारती झाला आणि त्यातून मिळणाऱ्या रोख रकमेच्या स्वरूपातील वेतनामुळे त्याचे सामाजिक परावलंबित्व संपुष्टात आले. जातीव्यवस्थेला व्यवस्थेला पुन्हा एकवार हादरे बसू लागले. डॉ. आंबेडकरांनी दलित समाजाच्या उद्धारासाठी गावकी सोडण्याचा धरलेला आग्रह धरण्याचे कारण 'ग्रामीण अर्थकारण हे पूर्णतः जाती व्यवस्थेवर आधारलेले होते' हेच होते. बलुतेदारीची ही पद्धत देशात अगदी १९७२ च्या दुष्काळापर्यंत अस्तित्वात होती, दुष्काळाच्या काळात ग्रामीण भागातील दलित समाजाचे मोठ्या प्रमाणावर शहराकडे स्थलांतर झाले आणि ही व्यवस्था नंतर मोडकळीस येत गेली.

आज नव्याने उभ्या राहू पाहात असलेल्या कॅशलेस व्यवस्थेने पूर्वी अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेच्या अशा अनुषंगांचा विचार अवश्य करायला हवा. त्या व्यवस्थेतून एक शोषणप्रधान सामाजिक चौकट तयार झाली होती, आजच्या व्यवस्थेने वेगळ्या स्वरूपात अशीच एखादी सामाजिक व्यवस्था निर्माण करू नये याचे भान आपण सार्‍यांनी राखायला हवे आहे. अर्थात पुन्हा ऐतिहासिक बलुतेदारी पद्धत येईल असा याचा अर्थ नाही. कारण आज इंटरनेट्च्या जमान्यात संकल्पना पातळीवर चलन अस्तित्वात राहून पूर्वी 'कागदोपत्री' म्हणत तसे व्यवहार होऊ शकतातच. जोवर व्यवस्था मजबूत आहे तोवर चलन धातूचे आहे, चामड्याचे आहे की व्हर्चुअल याला फार महत्त्व नसते. ती व्यवस्था त्या चलनाला जामीन असते. परंतु एकामागून एक तुघलकी निर्णय घेतल्याने जर व्यवस्थाच डळमळीत झाली तर मात्र प्रगतीचे काटे उलट दिशेने फिरू शकतात. हे होऊ नये याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायला हवी.

- डॉ. मंदार काळे
  अ‍ॅड.राज कुलकर्णी

----

(पूर्वप्रसिद्धी: हा लेख १९ डिसेंबर २०१६ रोजी ’अक्षरनामा’ या पोर्टलवर निश्चलनीकरणाचा निर्णय तुघलकी ठरू नये इतकंच! या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला.)


हे वाचले का?

रविवार, ४ डिसेंबर, २०१६

सर्वेक्षणांचे गौडबंगाल

कार्ल मार्क्सचा सहाध्यायी फ्रेडरिक एंगल्सने एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर इंग्लंडमधील कामगार वर्गाच्या दारुण अवस्थेवर प्रकाशझोत टाकणारा अहवाल लिहून समाजनिर्मितीत सर्वेक्षणावर आधारित मूल्यमापन पद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. आजची प्रस्थापित व्यवस्था संख्याशास्त्राचे नियम आणि मूल्यमापन पद्धती धुडकावत जनमत स्वत:च्या बाजूने वळवण्याचे डावपेच रचत आहे. नोटाबंदीनंतर सर्वेक्षणांतून झालेले फसव्या जगाचे दर्शन हे त्याचेच द्योतक आहे...
---

वृत्तपत्रे, चॅनेल्स, इन्टरनेट पोर्टल्स यांच्यामार्फत अनेक सर्व्हे घेण्यात येतात. उदा. सलमान खान दोषी आहे असे तुम्हाला वाटते का?' किंवा 'अमीर खान असहिष्णुतेबद्दल जे म्हणाला त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का?' वगैरे. त्याचे निकालही लगेच लाईव्ह दिसत असल्याने आपले मत बहुसंख्येबरोबर गेले किंवा नाही हे ही लगेच तपासता येते. आणि बहुसंख्या आपल्या बाजूला आहे म्हटले की आपण बरोबर असल्याचा समज होऊन आपण समाधान मानून घेतो. एकुणात असे सर्व्हे लाखोंच्या संख्येने, चोवीस तास, वर्षभर चालूच असतात.

अधूनमधून कुण्या संशोधन संस्थेच्या हवाल्याने एखादा प्रचलित समज साफ खोटा असल्याची बातमी येते. हे सर्व्हे कोण नि कसे करते, त्यांची विश्वासार्हता किती, याबाबत आपण संपूर्णपणे अनभिज्ञ असतो. निष्कर्ष सोयीचा असला की आपण विश्वास ठेवतो, नसला तर 'हा बकवास आहे' असे म्हणून मोकळे होतो. खरं तर असे अभ्यास करण्याचा आराखडा करण्यासाठी संख्याशास्त्रात अनेक नियम, मूल्यमापन पद्धती, दृष्टिकोन दिलेले आहेत. कोणत्या परिस्थितीत कोणता पर्याय वापरावा याचे आडाखे देखील. तेव्हा हो का नाही सांगा नि निकाल लावा इतके सोपे ते असत नाही.

सामान्यपणे असे सर्व्हे हे बहुपर्यायी प्रश्न असतात. त्या पर्यायांत अनेकदा सर्व शक्यता - विशेषतः सर्व्हे करण्याच्या हेतूच्या विरोधात जाणार्‍या - अंतर्भूत केलेल्याच नसतात. उदाहरणाच्या सोयीसाठी एकच प्रश्न नि पर्याय घेऊन पाहू या. हे उदाहरण अर्थातच सोपे नि सहज समजण्याजोगे घेतले आहे. व्यवहारात अशा विसंगती सहज दिसून येत नाहीत.

प्रश्नः 'आपल्या देशाऐवजी अन्य देशात स्थलांतर करण्याची वेळ आली तर जगातील कोणत्या देशात राहणे पसंत कराल?'

पर्याय: १. पाकिस्तान २. चीन ३. सीरिया आणि ४. बुर्किना फासो.

उत्तरासाठी दिलेले पर्याय पाहिले तर यात जगातील जवळजवळ सर्वच लोकांचे स्थलांतरासाठी प्राधान्य असणारे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युरप, ऑस्ट्रेलिया वगैरे देश वगळलेले आहेत. तेव्हा या सर्व्हेवरून 'जागतिक' निष्कर्ष काढणेच चुकीचे आहे. आणि तरीही या सर्व्हेचा निष्कर्ष लिहिताना 'भारतीय लोक स्थलांतरासाठी बुर्किना फासो या देशाला सर्वाधिक पसंती देतात!' असा लिहिला जाईल.

एका मराठी वृत्तपत्राने मध्यंतरी धक्कादायक शीर्षक असलेली बातमी छापलेली होती. 'देशातील ३२% मुस्लिम तुरुंगात!' डोके ठिकाणावर असलेल्या कुणालाही हे शक्य नाही, हे समजायला हरकत नव्हती. आतील मजकूर पाहता 'देशातील तुरुंगातील कैद्यांमधे ३२% मुस्लिम कैदी आहेत.' असा निष्कर्ष दिसला. (म्हणजे शीर्षक ’देशातील तुरुंगात ३२% मुस्लिम’ असे हवे होते.) दुर्दैवाने हे दोन्ही एकच समजणे हा अडाणीपणा फारसा दुर्मिळ नाही. असाच अपलाप सर्व्हेंच्या निष्कर्षांबाबतही होताना दिसतो. विचारलेला प्रश्न नि काढलेला निष्कर्ष यात अनेकदा परस्परसंबंधच नसतो.

पुन्हा एक उदाहरण घेऊ. समजा आमचा पुण्याबाहेरचा कुणी मित्र ठरवतो की किती पुणेकरांना श्रीखंड आवडते हे ठरवू या. मग तो प्रश्न काढतो 'पुणेकरांना श्रीखंड का आवडते?' आणि पर्याय देतो १. त्याचा रंग भगवेपणाकडे झुकलेला असतो म्हणून, २. त्यात आंबट-गोडाचे सुरेख मिश्रण असते म्हणून, ३. दह्यापासून घरच्याघरी बनवता येते म्हणून ४. नागपूरकरांना आवडते म्हणून.

आता समजा २. या पर्यायाच्या बाजूने ७०% मते पडली तर निष्कर्ष लिहिला जाईल '७०% पुणेकरांना श्रीखंड आवडते कारण त्यात आंबट-गोडाचे सुरेख मिश्रण असते'. पण आकडेवारी देताना मुळातच पंचाईत झाली आहे. ७०% पुणेकरांना श्रीखंड आवडते असे नव्हे, तर 'ज्या पुणेकरांना श्रीखंड आवडते (आणि त्यातील ज्यांनी या प्रश्नाला उत्तर दिले त्यापैकी) ७०% पुणेकरांना श्रीखंड आवडते कारण त्यात आंबट-गोडाचे सुरेख मिश्रण असते' असा आहे. ती टक्केवारी पुणेकरांची नव्हे तर कारणाची आहे. थोडक्यात सांगायचे तर किती टक्के पुणेकरांना श्रीखंड आवडते या प्रश्नाचे उत्तर या सर्व्हेने मिळणारच नसते.

इतकेच नव्हे तर या सर्व्हेंची विश्वासार्हता मर्यादित असते, कारण इथे प्रश्नकर्ता randomization चे सारे नियम पायदळी तुडवत येईल त्या उत्तरांना सामील करून घेत असतो. यातून ज्या गटासाठी निष्कर्ष काढला जातो आहे त्या गटातील सर्व उपगटांना आवश्यक ते प्रातिनिधित्व मिळाले आहे किंवा नाही याची कोणतीही तमा यामध्ये बाळगलेली नसते.

पुन्हा एकदा पहिले उदाहरण घेऊ. हा सर्व्हे समजा एखाद्या न्यूज पोर्टलने चालवला तर संपूर्ण भारतीय समाजाचा अतिशय लहान गट या प्रश्नाचे उत्तर देणार असतो. १. ज्या भाषेत (उदा. इंग्रजी) प्रश्न आहे ती भाषा वाचू शकणारा, २. इंटरनेट उपलब्ध असणारा, ३. तो प्रश्न तो सर्व्हे उत्तरांसाठी खुला असलेल्या काळात त्या पोर्टलला भेट देणारा, ४. आपण त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे इतपत तो प्रश्न महत्त्वाचा मानणारा इ. इ. अनेक शक्यतांनी हा गट लहान होत जातो.

आता यातून निघालेला निष्कर्ष हा खरंतर या लहानशा गटाच्या प्रतिसादातून निघालेला असतो. तो देशातील सर्व नागरिकांचा 'प्रातिनिधिक' निष्कर्ष आहे याची कोणतीही खात्री देता येत नाही. एखाद्या गटाच्या प्रतिसादातून काढलेला निष्कर्ष हा मोठ्या गटाचा 'प्रातिनिधिक' असावा यासाठी अनेक संख्याशास्त्रीय नियम, चौकटी उपलब्ध आहेत. त्यांच्या आधारे काढलेला निष्कर्षच प्रातिनिधिक मानता येतो. आपल्याला सोयीच्याच लोकांच्या प्रतिक्रिया घ्या नि त्या सर्वांच्या प्रातिनिधिक आहेत असा दावा करा ही चलाखीच असते आणि त्यातून आलेला निष्कर्ष अर्थातच बनावट असतो.

वरील सर्व्हेचा निष्कर्ष देताना 'भारतीय जनता' असा शब्दप्रयोग करून -अज्ञानातून वा हेतुतः - केला जाईल. आणि मग हा सर्व्हे एखादी विक्री-सल्लागार संस्था बुर्किना फासोच्या पर्यटन विभागाला विकू शकेल, जेणेकरून ते हा सर्व्हे वापरून भारतीय पर्यटकांना भुलवू शकतील.

अनेकदा प्रश्नातच उत्तर अधोरेखित करून या सर्व्हेचा निकाल लावलेला असतो किंवा अनेकदा हे दिलेले पर्याय हे मोठ्या रेघेशेजारील छोटी रेघ स्वरूपाचे असतात, ज्यातून उत्तर देणारा शेवटी आपल्याला हवा तोच पर्याय निवडेल याची खातरजमा करून घेतली जाते. पहिले उदाहरण पाहिले तर जगाच्या नकाशावर बुर्किना फासो हा देश कुठे आहे हे माहीत नसतानाही भारतीय लोक त्याची निवड करतील. वास्तवात निवडले जाणारे अनेक पर्याय इथे दिलेलेच नसल्याने हा निष्कर्ष साफ चूक तर आहेच पण त्याच बरोबर अन्य पर्याय असे दिले आहेत की सर्व्हे ज्या व्यक्तिंसाठी घेतला आहे त्यांची मानसिकता विचारात घेता पर्याय ४ हाच बहुसंख्येला निवडावा लागेल.

NamoAppResults

डिजिटल जगात तर हे सर्व्हे त्यात हितसंबंध गुंतलेल्यांकडून सरळसरळ हायजॅक केले जातात. मोठया संख्येने एका बाजूचे लोक मतदान करून हवा त्या निष्कर्षाकडे तो वळवून घेतात. त्यासाठी व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुकसारखी अन्य समाज-माध्यमे यातून त्याबाबत आवाहन करून आपल्या बाजूच्या लोकांना उत्तरे लिहिण्याचे आवाहन केले जाते. थोडक्यात असा अनियंत्रित सर्व्हे गटबाजीच्या आधारे आपल्याला हव्या त्या निकालाच्या दिशेने वळवता येत असतो. यातून या सर्व्हेंचा निष्कर्ष प्रमाण मानण्यास आवश्यक असणारी महत्त्वाची तत्त्वे पायदळी तुडवली जातात.

वरील सर्वच प्रकार विकली गेलेली चॅनेल्स सफाईदारपणे राबवताना दिसतात. इथे प्रश्नांतर भावनिकतेचा, अस्मितेचा वगैरे मुलामा चढवला की प्रश्नांची हवी ती उत्तरे मिळवता येतात, ती प्रातिनिधिक मुळीच असत नाहीत. अशी आणखी बरीच कारणे, उदाहरणे देता येतील.

सर्व्हे राबवण्याचे तंत्र कितीही प्रगत असले तरी त्याचे यश आणि विश्वासार्हता हे तो राबवणार्‍याच्या बौद्धिक कुवतीवर आणि प्रामाणिकपणावर अवलंबून असते. आज सोशल मीडियातून, तथाकथित न्यूज पोर्टल्सवरून आणि व्हॉट्सअॅपसारख्या पीअर-शेअर माध्यमांतून मिळणार्‍या माहितीची विश्वासार्हता जशी रसातळाला गेली आहे, तसेच या सर्व्हेंचेही असते.

फेसबुकवर 'तुम्ही मागच्या जन्मी कोण होतात?' किंवा 'महाभारतातील कोणते पात्र तुमच्या व्यक्तिमत्त्वात दिसते?' वगैरे प्रश्नांची उत्तरे आपण फुटकळ चाचणी घेऊन मिळवतो तसेच हे सर्व्हे. फरक इतकाच की ती केवळ गंमत आहे हे आपल्याला ठाऊक असते, तर या तथाकथित सर्व्हेंचे निकाल घेऊन आपण एकमेकांशी भांडत वेळ नि ऊर्जा व्यर्थ वाया घालवत बसतो.

पण एक नक्की, असले सर्व्हे घेणे (खरंतर एका प्रश्नाला 'सर्व्हे' म्हणणं म्हणजे हत्तीच्या शेपटीच्या बुडख्याच्या केसाला हत्ती समजण्यासारखे आहे.) आपल्याला काहीतरी समजल्याचा आभास निर्माण करतात, सोयीचा निष्कर्ष काढून 'आपणच बरोबर असल्याचे' समाधान मिळवण्यास सोयीचे ठरतात. बहुतेकांना ते पुरेसे असते. हजारो वर्षांनंतरही जगातील विपन्नता सरत नाही, तरीही कुणी दृश्य/अदृश्य जादूगार येऊन एका झटक्यात ती दूर करेल यावरचा माणसांना विश्वास ढळत नसतो ना अगदी तसेच.

---

न्यूज चॅनेल्सनी घेतलेले मासिक ’मोदीच हीरो’ हे सर्व्हे त्यांच्या करमणूक पॅकेजचा भाग आहेत असे समजूनच पाहावे वा न पाहावे. त्या सर्व्हेंचा अंदाज बरोबर ठरतो की चूक हा मुद्दाच नाही; मुद्दा आहे त्यांचा रतीब घालण्याचा आणि त्याचा देशाच्या मतावर परिणाम घडवण्यासाठी हत्यार म्हणून वापरले जाण्याचा.

गेली दोन वर्षे या चॅनेल्सनी सर्वसामान्यांना पुन्हा पुन्हा ’कोण जिंकणार?', 'कोण हरणार?’, ’का जिंकले?', 'का हरले?’, ’कोण बरोबर?’, ’कोण चूक?’ या प्रश्नांभोवती फिरत ठेवून भरपूर करमणूक केली नि करवून घेतली आहे. निवडणुका हा सर्वसामान्यांचा पैजा लावणे नि त्यावर वाद घालणॆ याचा मुख्य आधार झाला आहे.

राजकारणाकडे आपण एखाद्या व्हिडिओ गेमसारखे पाहू लागलो आहोत. त्या खेळातील चढ-उताराचा कैफ एन्जॉय करतो. तर्कापुरता 'मग त्याचा आमच्या आयुष्यावर परिणाम होत नाही का?’ हे कारण पुढे करत असताना 'केंद्राच्या अमुक निर्णयाचा आपल्यापर्यंत येईतो परिणाम नक्की कसा होइल?' याबाबत विचार मात्र करत नाहीत; इतरांवर काय होईल हे तर कुणाच्या खिजगणतीतही नसते. पुरेसा टाईमपास झाल्यावर वेळ घालवण्यासाठी, मनोरंजनासाठी इतर करमणुकीकडे वळताना हा गेम बंद करुन टाकतो.

गावात शिक्षण, कौशल्य, इच्छा वा संधी नसल्याने हाताला काम नसलेले तरुण आणि बाद झालेले म्हातारे जसे पारावर बसून अमेरिकेच्या (लोकांची लफडी चघळायला मनापासून आवडणार्‍या भारतीयांचा लेविन्स्की प्रकरणापासून फेवरिट झालेल्या) बिल क्लिंटन पासून ते 'चीनसारखी एकाधिकारशाही पायजे’ वगैरे वाट्टेल त्या विषयावर एखाद-दोन बिडीच्या आधारे चर्चांचा फड रंगवतात, मध्येच एखादी गावची पोरगी वा स्त्री जाताना दिसली की चर्चा थांबवून तिला निरखूऽन पाहातात, ती दूर गेली की पुन्हा चकाट्या पिटू लागतात तसे आपले झाले आहे.

दोन ते अडीच जीबी मोबाईल डेटा आणि चघळायला मोदींचं पारडं अजून जड झालं की हलकं यावर येणारे सर्व्हे नि चालणार्‍या चॅनेल-चर्चा यांमध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा, खल वा कृती करण्यासाठी कुवत वा इच्छा शिल्लक राहात नसल्याने देश या दोन गोष्टींच्या अफूच्या धुंदीत जगत राहतो.

-oOo-

(पूर्वप्रसिद्धी: ’---’ इथवरचा लेख ४ डिसेंबर २०१६ रोजी 'दिव्य मराठी’च्या ’रसिक’ पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला आहे.


हे वाचले का?

शनिवार, ३ डिसेंबर, २०१६

दक्षिणायन अनुभवताना

(मडगांव, गोवा इथे नुकत्याच पार पडलेल्या 'दक्षिणायन' अधिवेशनाला माझ्यासह काही मित्र हजर होते. त्यासंबंधी 'आंदोलन' मासिकासाठी लिहिलेला हा लहानसा वृत्तांत.)

गेल्या तीन-साडेतीन वर्षांत विवेकवादाच्या, पुरोगामित्वाच्या तीन अध्वर्यूंची हत्या झाली आणि भारतातील सामाजिक परिस्थिती ढवळून निघाली. परंपरेचा उद्घोष करत, शत्रूलक्ष्यी मांडणी करत अनेक गटांचा सामाजिक राजकीय क्षेत्रात नंगा नाच सुरू झाला. एफटीआयआयसारख्या संस्थांपासून मंत्रिमंडळापर्यंत सर्वत्र सुमारांची सद्दी सुरू झाली नि या उन्मादी गटांना बळ मिळत गेले. आम्ही सांगू तेच बोला, आमच्या विरोधात जाईल असे बोलू नका अन्यथा तुमचा 'दाभोलकर करू' किंवा 'कलबुर्गी करू' अशा उघड धमक्या सुरू झाल्या.

विचारांचा लढा लढणारे पुरोगामी या हिंसक मार्‍यापुढे काहीसे हतबुद्ध झाल्यासारखे भासले. जरी नेते सावरले तरी कार्यकर्त्यांमधे भीतीचे, हताशेचे वातावरण पसरू लागले. उजेडापेक्षा काळोख मोठा होत आहे अशी भावना त्यांच्यात रुजू लागली. अशा वेळी पुरोगामी विचारवंत, साहित्यिक, कलाकार, पत्रकार यांना सोबत घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना 'रणात झुंजणारे आहेत अजून काही' सांगण्यासाठी डॉ. गणेश देवी यांच्या प्रेरणेने 'दक्षिणायन' यात्रेची सुरुवात झाली.

या यात्रेचे दुसरे पर्व १८ ते २० डिसेंबर रोजी गोव्यातील मडगांव इथे पार पडले. महाराष्ट्रातून रावसाहेब कसबे, तारा भवाळकर, विद्या बाळ, निखिल वागळे, राजदीप सरदेसाई, सागरिका घोष, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, अभय कांता, प्रवीण बांदेकर आदी मान्यवरांनी हजेरी लावली तर गोव्यातून संयोजक श्री दत्ता नायक, क्लॉड अल्वारेस आदी मान्यवर उपस्थित होते. या परिषेदमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, जम्मू - काश्मिर, पंजाब, बंगाल, दिल्ली राज्यांमधील विचारवंत, कलाकार, साहित्यिक, विद्यार्थी, नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

DakshinayanProcession

यात्रेची सुरुवात रविंद्र भवन येथून निघालेल्या मूक मोर्चाने झाली ज्याचे नेतृत्व श्री. हमीद दाभोलकर, श्रीमती मेघा पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांचे पुतणे श्री. श्रीविजय कलबुर्गी यांनी केले. तिची सांगता डॉ. लोहिया मैदानावर होऊन तिथे जाहीर सभा होऊन 'सनातन'चा गोवा अशी चुकीची होऊ घातलेली ओळख पुसून टाकण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

दुसर्‍या दिवशी प्रत्यक्ष कार्यक्रम हे चार समांतर सत्रांतून आयोजित करण्यात आले होते. पहिल्याच सत्रात 'देशातील विचारवंत पराभूत आहेत का?' या विषयावर परिसंवाद झाला. यात व्हिक्टर फरेरो, पीटर डिसूझा, रहमत तेरेकेरे आदींनी भाग घेतला. अलीकडे 'पुरोगामी आत्मपरीक्षण करत नाहीत' असा घरबसल्या आरोप करणार्‍यांनी या परिसंवादाला हजेरी लावली असती तर - कदाचित- त्यांचे मत बदलले असते का? असा विचार मनात येऊन गेला.

याशिवाय याच सत्रात 'देशभक्ती, राष्ट्रवाद आणि मानववाद', सांप्रदायिकते विरोधातील संघर्ष, विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष, काश्मिरमधील परिस्थिती, माध्यम स्वातंत्र्य आणि लोकशाही, सेन्सॉरशिप, अंधश्रद्धा आणि विवेक हे विषय केंद्रस्थानी ठेवून विचारांची देवाणघेवाण करण्यात आली.

यात विशेष उल्लेख करावा लागेल तो गुजरातमधे दलितांसाठी जमीन सुधारणा कार्यक्रमाला वाहून घेतलेल्या मार्टिन मक्वान यांचा. वाजतगाजत आलेल्या नि विकासाचे रम्य स्वप्न मध्यमवर्गीय नि उच्च-मध्यमवर्गीयांसमोर ठेवून त्यांचा बुद्धिभेद करणारे हत्यार म्हणून समोर आलेल्या 'गुजरात मॉडेल'ची दुसरी बाजू त्यांनी उलगडून दाखवली. 'सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांच्या शोषणावर उभे असलेल्या या धोकादायक मॉडेलशी आपण पुरेशा गांभीर्याने लढत नाही' अशी खंत व्यक्त केली आणि 'आपण जर मानवतेसाठी लढत असू तर संख्येने आपण इतके कमी का आहोत?' असा प्रश्न समोर ठेवून समोरच्या प्रतिनिधींना अंतर्मुख केले.

अमोल पालेकर, आनंद पटवर्धन आणि संभाजी भगत यांनी कलाकारांचे प्रतिनिधी म्हणून मांडलेल्या भूमिका महत्त्वाच्या ठरल्या. आपण सर्व पुरोगामी, विवेकवादी लोक कायदा आणि संविधानाला बांधिल असल्यामुळं कलेची अभिव्यक्ती जपण्याची लढाई ही पूर्णपणे संविधानिक असल्याचं मत अमोल पालेकर यांनी व्यक्त केलं. बहुभाषिक कविसंमेलनातून कवींनी आपले विचार मांडले, तर संभाजी भगत यांनी विद्रोही जलशाच्या माध्यमातून प्रतिनिधींशी संवाद साधला. प्रतिगामी शक्तींना उघडे पाडणारी आणि म्हणून त्यांच्या डोळ्यात सतत सलणारी 'जयभीम कॉम्रेड' ही आनंद पटवर्धन यांची फिल्मही सादर करण्यात आली. त्यावर श्री. पटवर्धन यांनी विविध प्रतिनिधींशी संवाद साधला.

DakshinayanLecture

तिसरा दिवस माध्यम प्रतिनिधींचा ठरला. माध्यम व्यवस्था सरकारी यंत्रणा व उद्योगपतींच्या बांधली गेली असल्यानं ही लढाई कठीण असल्याचं नमूद करतानाच निखिल वागळे आणि सागरिका घोष यांनी पर्यायी माध्यमव्यवस्थेची नितांत गरज असल्याचं सांगितले. पुरोगामी, विवेकवादी लोकांनी स्वत:ची माध्यमव्यवस्था तयार केल्याशिवाय सद्य परिस्थितीला तोंड देणं अशक्य असल्याची जाणीवही करून दिली. परिषदेचा शेवट झाला तो योगेंद्र यादव यांच्या मांडणीने. त्यांनी निवडणुकांच्या राजकारणांपेक्षा, विचारांचं राजकारण करण्याची गरज व्यक्त केली. त्याच सोबत ’भारत’ ही संकल्पना नव्यानं लोकांसमोर घेऊन जाण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि डॉ. कलबुर्गी या विवेकवाद्यांच्या हत्यांमुळे विवेकवादाची मशाल विझू न देता ती उचलून पुढे जावे या मूळ उद्देशाने सुरु झालेले दक्षिणायन, त्याचा पहिला उद्घोष अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा असणे अपरिहार्य होते. परंतु या दुसर्‍या सत्रात आत्मपरीक्षणाचा, संभाव्य कृतीचा विचारही चर्चेच्या, संवादाच्या परिघात आणत त्याची व्याप्ती वाढवण्यात आली. नेटक्या आयोजनाने गोवेकरांनी प्रतिनिधींकडून पसंतीची पावती मिळवलीच, पण या निमित्ताने 'सनातन' संस्थेशी जोडले जाऊ पाहणारे गोव्याचे नाव पुरोगामी विचारांशी जोडले गेले हा एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करून ठेवायला हवा.

-oOo-

संकलन: Abhishek Bhosale, Akshay Ashok Rajage
शब्दांकनः डॉ. मंदार काळे

लेखासोबत जोडलेली दोन्ही छायाचित्रे https://indianculturalforum.in/2016/12/07/dakshinayan-the-long-path-towards-reason/ येथून साभार.


हे वाचले का?

रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६

... कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे

ताई,

तुम्ही धरण बांधायला काढलं. म्हटला आमचं गाव बुडणार. मग आमचं घरदार, जमिनी बुडवल्या नि एका गावच्या पाच पन्नास लोकांना अनोळखी उंबर्‍यांच्या पाच-पन्नास गावांत विखरून टाकलेत. तुटपुंज्या मोबदल्यासाठी आणि सुपीक जमिनीच्या बदल्यात मिळणारा वांझ जमिनीचा तुकडा पदरी पाडून घेण्यासाठी आयुष्यभराची वणवण पाठी लावली. धरणाच्या पाठीमागच्या टेकाडावार फार्म हाऊस बांधून काढणारे नक्की कुठून उगवले आम्हाला कळलंही नाही. आम्ही विचारलं, 'असं का?'

तुम्ही म्हणालातः देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.

Sacrifice

दादा,

तुम्ही गावात कारखाना काढू म्हटला. पुन्हा आमच्या जमीनी घेतल्यात. म्हटलात आमच्या पोराबाळांना नोकरी देऊ. कास्तगारी करून स्वाभिमानाने जगणारी आमची पोरं हातात दंडुका घेऊन दारात टाकलेल्या खुर्चीवर बसून येणार्‍या जाणार्‍या कोटाला सलाम ठोकू लागली. कारखान्यात चाकरी करून फटफट्या उडवणार्‍या नि ऐटीत मोबाईल मिरवणारी पोरं मात्र बाहेरून आली. आम्ही विचारलं, 'असं का?'

तुम्ही म्हणालातः देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.

अण्णा,

कधीतरी डाळीचं उत्पादन कमी झालं पण नेमकं आमच्याकडे मायंदाळ डाळ झाली. वधारलेले भाव पाहून कधी नव्हे ते चार पैशांची आस वाढू लागली. पण तेवढ्यात शहरांतून महागाईची बोंब उठली. लगेच तुम्ही डाळ आयात करून भाव पाडलेत. जास्तीच्या पैशावर पाहिलेली सारी स्वप्ने मातीत घातलीत. आम्ही विचारलं, 'असं का?'

तुम्ही म्हणालातः देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.

भाई,

चुकूनमाकून धरण पावलं नि जमीनीला ओल आली. वांझ जमीन सोडून शहरात मजुरी करायला गेलेली पोरं परतुन आली, चार पिकं काढू लागली. पण आमच्या पैशावर सहकाराचे ठेकेदार आणि व्यापारी बोलेरो नि स्कोडा उडवू लागली. हे असं कसं झालं हे आम्हाला समजलंच नाही. आम्ही विचारलं, 'असं का?'

तुम्ही म्हणालातः देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.

रावसाहेब,

तुम्ही म्हणालात देशांत खूप काळा पैसा आहे, नोटा रद्द करून सारा बाहेर काढतो. आमचे नुकसान झाले तरी चालेल पण श्रीमंताना धडा शिकवा असे 'सवत तरी रंडकी होऊ दे' समाधान आम्ही मानू लागलो. पण तुम्ही आमच्या पतपेढ्या, सहकारी बँका, जिल्हा/ग्रामीण बँकांना पैसे न देता आमची कोंडी केलीत. दातावर मारायला पैसा नसलेल्यांना तुम्ही 'व्हॉट्सअ‍ॅप वापरता तसे कॅशलेस व्यवहार करा' म्हणालात. पण साहेब, सगळं इंग्रजीत असलेल्या त्या तुमच्या अ‍ॅपवर आम्ही कसे व्यवहार करणार?' असा प्रश्न विचारावासा वाटला होता पण आमचे वडील म्हणाले ते 'मग इंग्रजी शिका' म्हणतील. आम्ही विचारलं, 'असं का?'

तुम्ही म्हणालातः देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.

मोठे साहेब,

सगळ्या जुन्या नोटा तुम्ही कचर्‍यात टाकल्यात, बाजारात गिर्‍हाईक नावाचं चिटपाखरू दिसेनासं झालं. आमच्या भावांचा वीस लाख किलो टोमॅटोचा चिखल झाला, कांदा तीस पैसे किलोनेही कुणी घेईना. आम्ही विचारलं, 'असं का?'

तुमचे स्मार्टफोनी शिलेदार म्हणाले: देशाचा विकास व्हायचा तर कुणीतरी त्याग करायलाच पाहिजे.

मला आता एकच सांगा, सैन्यात जीव द्यायला जाणारे आम्ही, शेतीवरून विस्थापित झालेले आम्ही, तुम्हाला नोटा बदलायच्या म्हणून भिकेला लागणारे आम्ही, टोमॅटोच्या चिखलात रुतणारे आम्ही. आम्हाला सतत 'प्रगतीसाठी, विकासासाठी कुणीतरी त्याग करायला हवा' म्हणून शहाणपण शिकवणारे तुमचे स्मार्टफोनी, ट्विटरी, फेसबुकी मित्रमैत्रिणी देशासाठी नक्की कुठला त्याग करताहेत, करणार आहेत?

- oOo -


हे वाचले का?

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

कास्त्रो

(क्यूबाचा हुकूमशहा फिडेल कास्त्रो याचे काल निधन झाले, त्या निमित्ताने मनात उमटलेले विचार)

FidelCastro

'कल्याणकारी हुकूमशहा' (benevolent dictator) अशी एक संज्ञा अधूनमधून कानावर पडत असते. उच्च-मध्यमवर्गीय आणि नव-मध्यमवर्गीयांना ती आकर्षक वाटते. लोकशाही म्हणजे भोंगळ, हुकूमशाही कशी 'रिझल्ट ओरिएंटेड' असते वगैरे दावे एरवी निर्णयप्रक्रियेवर फारसा प्रभाव राखू न शकणारे करत असतात. असा 'बायपास' आपल्याला हवे ते घडवेल अशी त्यांना आशा असते.

परंतु याचा अर्थ योग्य काय नि अयोग्य काय याबाबत ते फारसे चिकित्सक असतात असे समजायचे कारण नाही. आपण सोडून अन्य गटांचे फाजील लाड या लोकशाहीमुळे होत आहेत, गुणवत्तेला किंमत राहिलेली नाही इ. तक्रारी ते वारंवार करत असतात आणि याचे खापर बहुमताच्या लोकशाहीवर ते फोडत असतात

पण कल्याणकारी हुकूमशहा म्हणतात त्याची गुणवैशिष्ट्ये काय, तो कसा ओळखावा, त्याचे मूल्यमापन कसे करावे याबाबत फार विचार करण्याची तसदी ते घेत नाहीत. अध्यात्मिक जीवनात जसा एक छानसा बुवा-बाबा-देव शोधून 'तो सारे बरे करील' यावर विश्वास ठेवून त्याच्या मांडीवर डोके ठेवून ते झोपी जातात तशीच काहीशी त्यांची भावना या कल्याणकारी हुकूमशहाबाबत असते.

मी स्वतः लोकशाहीवर विश्वास असलेला असल्याने अशा कल्याणकारी हुकूमशहाची सत्ता यावी असे मला मुळीच वाटत नाही. परंतु एका व्यक्तीचे मत आणि वास्तव यात तफावत ही असणारच. मग समजा आलाच एखादा हुकूमशहा नि आपण कल्याणकाही हुकूमशाही राबवणार असे म्हणू लागला तर त्याचे मूल्यमापन कसे करावे? त्याचा दावा सत्य आहे की मूळ सत्तालोलुपतेला दिलेले अवगुंठन आहे हे कसे तपासावे? याचा विचार करून ठेवणे अपरिहार्य ठरते.

अर्थात अशी मूल्यमापनाची चौकट तयार करणे सोपे नाही. तेव्हा निदान सुरुवात म्हणून जगभरात झालेले हुकूमशहा आणि त्यांची कामे यातून काही दखलपात्र, कल्याणकारी असे काही सापडते का हे पहायला हरकत नाही. (शिवाय हुकूमशाही नि एकाधिकारशाही यात आपण भेद मानतो का, मानावा का हा एक प्रश्न इथे उपस्थित होतो.) याचा शोध घेताना क्यूबाचा अध्यक्ष फिडेल कास्त्रो याने राबवलेल्या आरोग्य क्षेत्रातील सुधारणांबाबत माझा वाचना आले होते. त्यावर 'पुरोगामी जनगर्जना'साठी मी लेख लिहिला होता.

कल्याणकारी म्हणवणार्‍या हुकूमशहांचे मूल्यमापन करताना कास्त्रोची या क्षेत्रातील कामगिरी विचारात घ्यायला हवी.

- oOo -


हे वाचले का?

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६

मराठी साहित्यातले नेहरु

राजकारण असो की साहित्यकारण, आपल्या नि आपल्या गटाची प्रगती व्हायची असेल त्याला एकसंघ ठेवायचा असेल, तर दुर्योधनाने जसा सतत पांडवांचा बागुलबुवा उभा करून आपल्या शंभरांची एकजूट राखली तसे एक बाह्य शत्रू, एक बाह्य विरोधक सतत जिवंत ठेवावा लागतो.ही शत्रूलक्ष्यी मांडणी आदिम माणूस जेव्हा टोळ्या करून राहात होता तेव्हापासून रक्तात भिनलेली आहे. माणसाला जसजशा प्रगतीच्या वाटा सापडत गेल्या तसतशी ही गरजही बदलत गेली असली तरी पुरी नष्ट झालेली नाही.

सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय असो की धार्मिक कोणत्याच क्षेत्रात, कुण्याही मोठ्या झालेल्या व्यक्तीला अथवा संघटनेला समाजाची जमीन राब घातल्यासारखी स्वच्छ नि बीजरोपणायोग्य अशी आयती मिळालेली नाही. जुन्या, प्रस्थापित व्यक्तींच्या आणि विचारव्यूहांच्या मर्यादा दाखवून देत असतानाच त्यांचे ऋण मनमोकळेपणे आणि डोळसपणे मान्य करून (हे महत्त्वाचे !) पुढे जाणे आवश्यक असते.

पण आपले स्थान निर्माण करू इच्छिणारे आणि तरीही आपल्या पूर्वसुरींचा साकल्याने नि साक्षेपाने विचार करून मूल्यमापन करण्याची कुवत असणारे आता जवळजवळ अस्तंगत झाले आहेत. तुम्ही एखाद्या नेत्याचे, लेखकाचे, विचारवंताचे नाव उच्चारताच समोरचा/ची एकदम तलवार तरी उभारतो, झेंडा तरी उभारतो किंवा एक कुत्सित हसू तरी फेकतो. या तीनच्या पलिकडच्या शक्यता आता जवळजवळ दिसून येत नाहीतच.

'आम्हाला समजलेले सत्यच काय ते वैश्विक' हा गंड केवळ धार्मिकांची मिरासदारी आहे असे मुळीच नाही, 'आम्हाला रुचते तेच श्रेष्ठ साहित्य' (आकलनाबाबत मी काहीही बोललेलो नाही याची कृपया नोंद घ्यावी) हा गंड घेऊन जगणार्‍या प्रसिद्ध नि अप्रसिद्ध अशा दोन्ही प्रकारच्या साहित्यिकांची वारुळे जागोजागी दिसतात. आपली नावड आणि लेखनाचे सर्वंकष सामान्यत्व या दोन वेगळ्या गोष्टी आहेत याचे भान भल्या-भल्या 'मराठी सारस्वताच्या सेवकां'ना नसते.

अगदी वस्तुनिष्ठ साहित्यिक मूल्यमापन म्हटले तरी ते निकषांच्या अधीन असते हे विसरता कामा नये. 'मराठी साहित्य हे निकस आहे कारण त्यात वैश्विक भान नाही.' असे कुण्या समीक्षकाचे वाक्य फेसबुकवर पोस्ट म्हणून कुणी लिहिले होते. मुळात हे भलतेच सबगोलंकार वाक्य आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ पुरेसे पुरावे नि तर्क दिल्याखेरीज त्याचा अर्थही स्पष्ट होणे अवघड आहे. पण ते असो. यावर 'वैश्विक भान असणे ही श्रेष्ठ लेखनासाठी किमान पात्रता आहे का?' असा प्रश्न मला पडला होता.

गंमत म्हणजे हे वाक्य फेकणारे बहुधा वंचित साहित्य हे वैश्विक असल्याचा समज बाळगून असतात. 'जगभराचे वंचित एकाच प्रकारचे असतात. त्यांच्या समस्या, त्यांचे जगणे एकाच मुशीतले असते' असा भाबडा समज असणार्‍या राजकीय व्यूहाची पोथी मिरवणार्‍यांचे सोडून द्या. त्यांना संघटन ही अपरिहार्यता असल्याने काही व्यावहारिक तडतोडी कराव्या लागतात. परंतु साहित्यिकांनीही अशा एकसाचीकरणाची, किंवा एक प्रकारच्या साहित्यिक एकेश्वरवादाची पुंगी वाजवावी हे अनाकलनीय आहे.

नेहरूंनी सामाजिक पातळीवर जसा जगण्याचे बहुपर्यायी आयाम, बहुसांस्कृतिकवाद मान्य केला. ते शहाणपण आमचा रथ सर्वसामान्यांपेक्षा वेळा आहे, तो जमिनीपासून चार अंगुळे वर चालतो असा समज करून घेत स्वतःला समाजाचे सांस्कृतिक, वैचारिक नेते मानत स्वतःसाठी सर्वंकष(!) अभिव्यक्ति-स्वातंत्र्याची अपेक्षा ठेवणार्‍या साहित्यिकांनी मात्र केलेला दिसत नाही.

आम्ही समाजाचे नेते या गंडाची दुसरी बाजू म्हणजे 'सर्वसामान्यांना जे रुचते, उमजते ते सामान्य' हा उफराटा तर्क नि गंड. आपला गट अबाधित राखण्यासाठी जसा एक बाह्य शत्रू लागतो तसेच आपल्या गटाअंतर्गत आपले तथाकथित उच्च स्थान वगैरे निर्माण करण्यासाठी बहुसंख्येपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे सतत सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे. श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी फार कष्ट करावे लागतात नि त्यासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता आपल्या अंगी असेलच असेही नाही. आता यावर दोन सोपे उपाय आहेत.

पहिला म्हणजे बहुसंख्येला तुम्ही मूर्ख आहात, तुम्हाला काही कळत नाही हे सतत सांगत राहणे. यासाठी एखादा लेख, एखादा लेखक, एखादे पुस्तक, एखादा गायक, एखादा चित्रपट लोकप्रिय होऊ लागला की ताबडतोब तो कसा सामान्यच नव्हे तर वाईट आहे हे सर्वसामान्यांना सांगायला सुरुवात करणे. आपली समज काहीही असो, बहुसंख्येला ती नाही हे सतत सांगत राहावे. 

दुसरा सोपा उपाय म्हणजे अन्य श्रेष्ठ ठरलेल्या किंवा मानल्या जाणार्‍यांचे श्रेय हिरावून घेण्याचा प्रयत्न करणे. अमुक एक माणूस चूक आहे असे सिद्ध करून दिले, की त्याच्या रिकाम्या केलेल्या देव्हार्‍यात सामान्य अज्ञ जन थेट आपल्यालाच जागा देतील- इतिहासाचा विचार करता रास्तपणे - हा उपाय त्याहून सोपा असतो. कर्तृत्वापेक्षा निंदा केव्हाही सोपी असते. तिला निर्मितीची अपरिहार्यता नसते, मूर्तिभंजनाच कौशल्य जमले की पुरते.

पुरेसा कलकलाट करता आला की साठ-पासष्ट वर्षे घडवलेला देश चार महिन्यात 'कचर्‍यात गेल्याचे' सिद्ध करता येते, नेहरुंचा वारसा नाकारता येतो. त्यांनीच निर्माण केलेल्या सुस्थिर देशातील व्यवस्थेवर आयता कब्जा करताना त्यांनी देश कचर्‍यात नेला हे निलाजरे दावेही करता येतात. नेहरूंच्या डोक्यावर पाय दिल्याखेरीज नव्या नेत्यांना आपले स्थान निर्माण करताच येत नाही, तितका आत्मविश्वास त्यांच्या मनात कधी निर्माणच होत नाही हे उघड दिसते आहे.

PLAndNehru

मराठी साहित्यात सध्या हाच 'मान' पुलंचा आहे. आज 'पुलंनी वाचकांची अभिरुची बिघडवली.' हे परवलीचे वाक्य म्हटल्याखेरीज नव्या साहित्यिक वारकर्‍यांच्या दिंडीत प्रवेशच मिळत नाही. त्यांच्या डोक्यावर पाय दिल्याखेरीज साहित्यिक क्षेत्रात आपल्याला मान मिळणार नाही, असा काहीसा समज नवलेखकांचा होताना दिसतो आहे.

सामाजिक जाणीवेचे लेखन, किंवा अगम्य घाटाचे लेखन किंवा कुण्या फलाण्या परदेशी लेखकाचे लेखन ते तसे आहे म्हणूनच श्रेष्ठ आणि 'मध्यमवर्गीय जाणिवां'चे लेखन व्याख्येनुसारच कमअस्सल, असे एकतर्फी निकाल देत लोक पुढे जाताना दिसतात.

जसे वाचक खांडेकर, फडके, अत्रे, पुलं या मार्गाने पुढे येताना आता अनेक वाटांनी विखुरले तसे वाचकांची अभिरुची विस्तारली, त्यांच्यासमोर अनेक पर्याय निर्माण झाले. आपल्या इच्छेनुसार, कुवतीनुसार, आवडीनुसार निवड करताना अन्य पर्यायांना मुळातच कमअस्सल ठरवण्याची गरज नाही याचे भान मात्र अजून लेखकांना आलेले नाही तिथे वाचकांना कुठून येणार.

खांडेकरांच्या कादंबर्‍यांतून दिसणारा - नाक वरुन चालणार्‍यांना बेगडी वाटणारा - देशप्रेमी, त्यागी वगैरे स्वरूपाचा नायक, फडकेंच्या कादंबर्‍यांतून रोमँटिक वगैरे झाला. देशात जन्माला आलेली नोकरशाही, औद्योगिकरणाने झालेले नागरीकरण, त्यातून एकाच वेळी निर्माण झालेले मध्यमवर्गीय आणि कामगार समाज.आणि या दोन्हींना सामावून घेणारी शहरे, त्यातून उभे राहणारे जगणे यातील अनेक पैलूंचा पुलंसारख्या माणसाने बहुधा नर्मविनोदी शैलीत वेध घेतला. कधी टोपी उडवली, कधी वैगुण्यावर बोट ठेवले, कधी त्यातील वरवरच्या संघर्षातही मुळी घट्ट असलेल्या नात्यांची वीण उलगडून दाखवली.

साहित्य, संगीत, कला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बोरकरांपासून आरती प्रभूंपर्यंत, वसंतखाँपासून मन्सूरअण्णांपर्यंत अनेक 'उत्तम गुणांची मंडळी' जोडत गेलेला हा माणूस पुढच्या अनेक पिढांतील संभाव्य गुणवत्तेलाही हात देत गेला.

प्रत्येक व्यक्तीच्या आकलनाचे एक वर्तुळ असते. तसेच त्यांचेही होते. पण 'ते वर्तुळ दुय्यम नि आमचे हे वर्तुळ श्रेष्ठ' हे विधान पुराव्याशिवाय केले तर अदखलपात्र असते. केवळ त्यांचा झेंडा तपकिरी रंगाचा नि आमचा चॉकलेटी रंगाचा म्हणून आम्ही श्रेष्ठ हे विधान जितके हास्यास्पद तितकेच. कारण आधी चॉकलेटी रंग श्रेष्ठ का याची मीमांसा द्यावी लागते, त्यासाठी निकष द्यावे लागतात आणि सर्वात महत्त्वाचे मुळातच त्याला श्रेष्ठ ठरवता येईल अशा पक्षपाती निकषांना कटाक्षाने दूर ठेवावे लागते.

अर्थात 'डोक्यावर पाय देऊन' वर चढण्याची इच्छा असणार्‍यांना एवढे कष्ट घ्यायचे नसतात. 'पासष्ट वर्षात देश कचर्‍यात गेला' किंवा 'पुलंनी मराठी वाचकाची अभिरुची बिघडवली.' ही विधाने बिनदिक्कतपणे करून पुढे जायचे असते.

- oOo -


हे वाचले का?

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०१६

'विकसित' भारतातील वाघ

नव्या बातम्या 'विकसनशील' नव्हे विकसित भारतातल्या...

TigerFood
हे meme कायप्पामार्फत मिळाले असल्याने याचा चतुर कर्ता मात्र ठाऊक नाही.

१. वाघांच्या एकादशीच्या उपासासाठी साबुदाणा आणि शेंगदाणे यांच्यासाठी टेंडर मागवण्यात येत आहे. विहित नमुन्यात अर्ज पाठवावेत.

२. करवा चौथच्या वेळी चाळण्या उपलब्ध करून न दिल्याबद्दल समस्त वाघिणींनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले आणि सायंकाळी पंचगव्य सेवनाने सोडले.

३. कालच्या काकडीच्या कोशिंबीरीत खडे होते म्हणून वाघांनी जेवण आणून देणार्‍या मदतनीसाला चारही बाजूंनी घेरुन कोपर्‍यात घेतले आणि..... दहा उठाबशा काढायला लावूनच सोडले.

४. आठवड्याचा मेन्यू ठरवण्याचा लोकशाही हक्क वाघांना मिळाल्यापासून त्यांच्यात रोज भांडणे होताना दिसू लागली आहेत. काल तांदळाची भाकरी की ज्वारीची यावर दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. वाद नको म्हणून मीटिंगच्या अध्यक्षस्थानी असलेल्या वाघाने आपल्या अधिकारात बाजरीची भाकरी असा निर्णय दिल्यावर दोन्ही गटांनी एकत्र होत त्याला बडवून काढले. 

एका देशीवादी वाघाने 'जाऊ द्या, भांडू नका. नाचणीची भाकर पौष्टिक असते. तीच घ्या' अशी समन्वयवादी (शब्द समन्वयवादी' असा आहे, समाजवादी नव्हे, नीट वाचणे!) भूमिका घेताच 'अध्यक्ष वाघाच्या विरोधात सतत भूमिका घेणे सोडा' असे म्हणत अध्यक्षासकट सारे उरलेले वाघ त्याच्या अंगावर धावून गेले आणि 'याला सिंहांच्या पिंजर्‍यातच सोडले पाहिजे' असा आग्रह धरू लागले.

५. सिंहांनी तुरडाळीच्या आमटीसाठी हट्ट धरला म्हणून तिथल्या केटररने त्यांना 'डाळ ठेवलीये तुझ्या बापाने, गुमान ताकाबरोबर भात खा.' असा दम दिला.

६. हे निलाजरे वाघ बेशरमपणे झाडपाल्याची भाजी ऊर्फ पालेभाजी खातात, याने आमच्या धार्मिक भावना दुखावतात असा आरोप सिंहानी करायला सुरुवात केली. हे पालेभाजी खाणे रात्री गुपचुप होत असल्याने सिंहांनी आळीपाळीने रात्रीचा पहारा सुरु केला.

७. वाघ आणि सिंहाच्या शाकाहारी असण्याने आमची संख्या अमर्याद वाढते, त्यामुळे पिंजर्‍यात खूप गर्दी होते या साठी आम्हाला 'इच्छामरणा'चा कायदा लागू करा या मागणीसाठी काळवीटांच्या पदच्युत नेत्याने आमरण उपोषण सुरू केले आहे. तर यापेक्षा कळपाच्या नेत्याची नसबंदी करा या मागणीसाठी काळवीट माद्यांनी मोर्चा उघडला आहे. ('हा उंडगा फुकटचा गिळतोय आणि xxxx' एक पुनरुत्पादन-बाद ज्येष्ठ नागरिक पदास पोहोचलेली मादी म्हणाली.)

८. पिंजर्‍यातल्या वाघांना पाहण्यासाठी रोज गर्दी करणार्‍या गायी, म्हशी आणि त्यांचे पाडे-रेडे यांच्या गर्दीमुळे आपली दुपारची झोप मोडत असल्याने दुपारी १ ते ४ या वेळात प्राणिसंग्रहालय बंद ठेवावे, अगदी गोवंशीयांनाही प्रवेश देऊ नये अशी मागणी महाराष्ट्रातील पुणे नावाच्या गावाहून नुकतीच बदली होऊन आलेल्या बिबट्याने प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनाकडे केली आहे.

९. 'सेल्फी विद लायन' ही नवी क्रेज गोवंशीयांमधे भलतीच लोकप्रिय झालेली असून त्यासाठी अतिरिक्त बोनस म्हणून दर रविवारी भगर/वरई आणि शेंगदाण्याची आमटी असा जादाचा मेन्यू द्यावा अशी मागणी 'मार्जारकुल सेने'च्या अध्यक्षांनी केली आहे.

१०. टोमॅटोचा लाल रंग पाहून रक्ताची, शिकारीची आणि कम्युनिस्टांची आठवण होत असल्याने जेवणातून तो बाद करावा अशी मागणी गुजरातमधून आलेल्या सिंहानी केली आहे. त्यावर पंजाबी डिशेसचे फॅन असलेल्या वाघांनी याला आक्षेप घेत 'त्यापेक्षा या हलकटांच्या जेवणातून ते उंधियु वगैरे बाद करा आधी, लेकाचे त्यांच्या पिंजर्‍यात बसून आचवतात तर त्या वासाने इथे आम्हाला गुदमरायला होते' अशी मागणी केली आहे.

- आमच्या वार्ताहराकडून.

(बातमी: छत्तीसगडमध्ये वाघांसाठी 'बीफ' खरेदी करण्याचे टेंडर हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे रद्द)


हे वाचले का?

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

आपला देश महान आहे.

१. 'कट्यार...' गाजू लागला की त्याच्याशी संबंधित नसलेला कुणीतरी 'हे फक्त ब्राह्मणानेच करावे, इतरांचे ते काम नोहे' असे म्हणतो आणि अचानक तो चित्रपट ब्राह्मणी ठरून जातो. ब्राह्मण 'मस्ट वॉच हं' चे मेसेज एकमेकाला फॉरवर्ड करू लागतात, तर ब्राह्मण आणि ब्राह्मण्यविरोधक त्याच्यावर आगपाखड करू लागतात.

'अरे हा केवळ चित्रपट आहे, त्यात जातीचे काय?' म्हणणार्‍याला 'तुम्हाला काय कळणार शतकाशतकांच्या शोषणाचे दु:ख' म्हणून कानाखाली वाजवली जाते. (गाल चोळताना कट्यार आणि शतकाशतकांच्या शोषणाचा नक्की संबंध काय यावर तो विचार करून थकतो.)

WeepingTricolor

२. सैराट गाजू लागला की फँड्री पाठोपाठ दुसरा यशस्वी चित्रपट देणार्‍या या दिग्दर्शकाचे त्याच्या कौशल्याचे कौतुक सुरू होते. आता त्याला दलित आयकॉन बनवणारे मेसेजेस नि पोस्टसचा पूर येतो. फेसबुक आणि वॉट्सअ‍ॅप वर तथाकथित उच्चवर्णीय जातींना, त्या जातीच्या कलाकारांना हिणवणार्‍या पोस्ट दिसू लागतात. पुन्हा पोलरायजेशन होऊन सैराट हा मराठा समाजाची बदनामी करणारा चित्रपट आहे म्हणून गदारोळ होतो, समाजात उभी फूट पडते. नागराज हा सार्‍या समाजाचा आयकॉन होऊ शकत होता तो एकाच समाजाच्या वर्तुळात बंदिस्त होतो.

३. भारतीय सैन्य पाकिस्तानवर स्ट्रॅटेजिक स्ट्राईक्स करते नि उरीच्या हल्ल्यासारखे पुन्हा होऊ नयेत म्हणून प्रि-एम्टिव स्ट्राईक्स घेते. लगेच या निमित्ताने आपापल्या वैचारिक विरोधकांना हिणवण्याचे सत्र सुरू होते. थोडक्यात पुन्हा एकवार पार्ट्या पाडून कम्पल्सरी तू विरुद्ध मी चे खेळ सुरू होतात. आर्मीच्या जिवावर पूर्वी अंगाशी आलेला साहसवाद नि तेव्हा आपली जिरवणारे विरोधक यांचा हिशोब चुकता करणे सुरू होते.

मुळात 'आता हे कुठे आहेत', किंवा 'आता हे चूप बसतील' किंवा 'बसले आहेत' असे एकतर्फी जाहीर करताना आपण अशा नक्की किती लोकांना ओळखतो याचा विचार ही मंडळी करतात का?

बरं यात एखाद्याला पलिकडे ढकलून देऊन 'हे यश तुमचे नाही.' किंवा 'हे श्रेय तुमचे नाही' हे बजावण्यातून नक्की काय साधतो... तर साधतो हे की बूड न हलवता, काडीचे कष्ट न करता कट्यारच्या, नागराज मंजुळेंच्या, भारतीय लष्कराच्या यशाचे श्रेय आपण आपल्या पदरात बांधून घेऊ इच्छितो. त्यांच्यासाठी वाढलेल्या पंगतीत आपली ताटली घेऊन फुकटचे दोन घास गिळू इच्छितो इतकेच. एरवी कट्यारच्या निर्मितीत, नागराज मंजुळेंच्या यशात किंवा भारतीय लष्कराच्या वाटचालीत, उभारणीत आपला काडीचा वाटा नसतो. पण जिथे ऐतिहासिक व्यक्तींच्या यशावर दावे करत भांडतो आपण तिथे वर्तमानातल्या हाडामांसाच्या व्यक्तींचे काय.

सुज्ञ वाटणारी, ज्यांच्याकडून काही सकारात्मक घडेल असे वाटणारी अनेक मित्रमंडळी एक एक करून पाहता पाहता उन्मादी झालेली पाहिली. एकाचा ज्वर उतरत नाही तो दुसर्‍याचा अंतराळी जातो. देश महान होतो तो त्यातील माणसांमुळे. देश म्हणजे काही जमिनीचा तुकडा नव्हे, देश म्हणते त्यातील समाज. तो समाज सदैव लहान लहान तुकड्यात विभागला जात असताना आणि छुपे वा उघडपणे त्यात सामील होत लहान लहान वर्तुळात सुरक्षितता शोधणारे आणि त्यासाठी आवर्जून काही शत्रू निर्माण करत आपला गट राखणारे असताना हा देश महान आहे किंवा भविष्यात महान होण्याचीही काही शक्यता आहे यावर माझा काडीचाही विश्वास नाही. सतत एकमेकांवर आरोप केल्याशिवाय ज्यांचे कर्तृत्व सिद्ध होत नाही ते कर्तृत्वशून्यच असतात हे समजून चालायचे असते. अशा माणसांकडून देश महान होण्याचे तर सोडाच, आहे असा राखणेही अवघड असते.

सध्याच्या परिस्थितीत मला तरी हा देश विखंडित होत जाताना दिसतो आहे. मी तुझी एक चूक, एक दोष दाखवला की दबा धरून बसायचे नि तुझी चूक, दोष दाखवून स्वतःला धन्य मानायचे या वृत्तीने जगणारे लोक काहीही निर्माण करू शकत नाहीत. विषवृक्षाच्या रुजवलेल्या मुळ्यांतून एवढा मोठा वृक्ष उभा राहिलाय की आता तो छाटणे कुणाच्याच हाती राहिलेले नाही. आपण फक्त तो रुजवला कोणी यावर जगाच्या अंतापर्यंत वाद घालत बसू. मला हे करायचे नाही.

हा समाज अंतर्बाह्य किडला आहे असे माझे स्पष्ट मत झाले आहे आणि त्याबाबत मी काही बोलू अथवा करू शकेन याची मला कणमात्र शक्यता वाटत नाही.

- oOo -


हे वाचले का?

शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

मी अजून जहाज सोडलेले नाही! - बाबा आमटे

कालचा दिवस म्हणजे पर्वणी. बाबा आमटेंचे लेखन आणि अभिवाचक म्हणून चंद्रकांत काळे आणि सचिन खेडेकर हे अभिवाचन गुरु, आमचे आदर्श, एकाच व्यासपीठावर. म्हणजे हल्लीच्या भाषेत काय म्हणतात तसा डब्बल धमाका. ऐंशी मिनिटांचा कार्यक्रम संपला तेव्हा असं वाटलं 'असा कसा अर्ध्या तासात उरकला यांनी', पण घड्याळ योग्य वेळ दाखवत होते.

एका गोष्टीची गंमत वाटली. ती म्हणजे प्रेक्षकांची उपस्थिती. जेमतेम चाळीस-पन्नास प्रेक्षक. निर्माती असलेल्या सोनाली कुलकर्णीला इवेंट मॅनेजमेंट शिकवायला हवे. आमचे साहित्यिकही गर्दी जमवायला अमिताभ सारखे, अमीर खानसारखे 'विशेष आकर्षण' घेऊन येतात, दहीहंडीच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण 'सनी लिओन' असते तेव्हा लाखभराचा समुदाय उपस्थित होतो.... हे आपले उगाचच हो, आमचे आपले नेहमीसारखे. पण बाबांच्या कविता ऐकायला पन्नास माणसे जमतात हेच खरंतर खूप आहे म्हणतो मी. अजून त्यांचे नाव लोकांना ठाऊक आहे हे काय कमी आहे. असो.

जाता जाता: बाबांच्या 'मी अजून जहाज सोडलेले नाही!' मधला काही भाग...आजच्या काळाला बराचसा सुसंगत असा!
---

JwalaAaniPhule
मी: सामाजिक कार्यकर्ता ज्याला म्हणतात
तो एक माणूस!
पेटत्या मांसखंडांच्या प्रकाशात
रस्ता धुंडित नवे समाजकार्य जन्माला येईल
या एकाच उमेदीने मी
या अघोरी निर्णयाप्रत येऊन पोचलो होतो.

निर्णय घेणार्‍या केंद्रांची बेसुमार वाढ
हा लोकशाहीचा शाप आहे
सामान्य माणसाला तो थोडे स्वातंत्र्य
आणि पुष्कळसा गोंधळ देत असतो
शाश्वत मूल्यांनाही तो बाजारपेठेत आणतो
आत्मार्पणालाही दुकाने उघडायला लावतो
प्रत्येकाची ताकद ही गर्दी खेचणार्‍या
आवाजावर ठरत असते.

प्रतिभेला जाहिरातीवर खर्ची पडावे लागते
आणि गुणांना सौदेबाजीतही तरबेज असावे लागते.
विद्यापीठ चालवण्याची व्यवस्था
बंडखोर विद्यार्थी आपल्या हातात घेतात
पण त्यांना वेळापत्रकदेखील करता येत नाही!
स्वातंत्र्यदेवतेच्या राज्यात
बंदुका सिगारेटच्या पाकिटाएवढ्या सवंग होतात
आणि न्याय विकृतीच्या हातातही सहज येतो
आणि तो कोणत्याही देदिप्यमान बिंदूवर
माथेफिरूच्या निरागसपणाने डागला जाऊ शकतो
आणि ही गर्दी म्हणजे बहुमत
हे तरी खरे आहे का?
सडकेवरची बेफाम क्रान्ती
आणि मतपेट्यांतून बाहेर पडणारा मूक निर्णय
या ही दरी व तो कडा
एवढी तफावत असू शकते
हे नुकतेच मी वर्तमानपत्रातून वाचले आहे.

जेव्हा संकल्प रूप घेतील
आणि उद्याला आकार येईल
तेव्हा कदाचित त्यांना कळेल
की त्यांचे शत्रू वेगळे होते
हातापायांवर खिळे ठोकून घेताना
दु:ख होतेच होते
पण हेच खिळे कडा चढताना
पाय रोवण्याच्या कामी पडत असतात.

'समाजकार्या'ची ही आंबट कैरी
खाताखाता दात आंबून गेले आहेत
तरी ती सोडवत नाही
राजकीय पाणबुडे कोणत्या क्षणी
जहाजाला सुरुंग लावतील याचा नेम नाही
पण बुडण्याची खात्री वाटू लागली
तरी माझे हे जहाज मी सोडणार नाही
कारण त्यावर माझी सगळ्यात जास्त प्रीती आहे
बुडत्या जहाजाच्या कर्णधारालाही ओढ असते घराची
पण प्रसंग येतो तेव्हा घर बाजूला पडते.

जहाजाबरोबर स्वतःला बुडवून घेणारे कर्णधार जेथे असतात
तेथेच बुडता देश वाचवणार्‍या नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात.

वाट पाहणार्‍या किनार्‍यांना
आणि लाटांच्या उग्र कल्लोळाला कळू द्या
मी अजून जहाज सोडलेले नाही!

- बाबा आमटे 
- oOo -

हे वाचले का?

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

तो कलकलाट होता...

काही काळापूर्वी मराठी संस्थळांवर असताना मी आपले लेखन दर्जेदार असल्याचे कसे ठसवावे यावर एक लेख लिहिला होता. (जिथे लिहिला त्या संस्थळाबरोबरच तो शहीद झाला.)

त्यात एक मुख्य धागा होता तो असा की अनेक ठिकाणी आपणच वेगवेगळ्या अवतारांनी असावे नि इथले तिथे, तिथले आणखी कुठे असे रेफरेन्सेस देत ते लेखन अनेक ठिकाणी रेफर झाल्याचे, एक प्रकारे मान्य झाल्याचे ठसवावे असा होता.

ArnabWithABlowHorn

निवडणुकांच्या काळात नीती सेन्ट्रल आणि त्यासारख्या अनेक वेबसाईट अचानक निर्माण झाल्या नि परस्परांच्या हवाल्याने बातम्या पसरवू लागल्या. नीती... च्या अवतारसमाप्तीनंतर स्क्रोलने लिहिलेल्या लेखात यांची एक लहानशी यादीच दिली होती.

खोटे अनेक तोंडांनी वदवून खर्‍याचा आभास निर्माण करणे हा आता भारतात प्रस्थापित होऊन बसलेला प्रकार आहे. आज याचे आणखी एक उदाहरण दिसते आहे. PoKमध्ये घुसून वीस अतिरेकी ठार मारून 'ऊरी'चा बदला घेतला अशा बातम्या अनेक पोर्टल्सवर दिसू लागल्या आहेत. आश्चर्य म्हणजे अजूनतरी एकाही बड्या वृत्तपत्रसमूहाने वा चॅनेलने याची दखल घेतली नसली, तरी आपल्याच गटातल्या दुय्यम चॅनेलच्या पोर्टलवर ही बातमी टाकून कितपत खपते आहे याची चाचपणी चालू झाली आहे.

प्रथम ही बातमी क्विंट्वर दिसली, मग 'कोब्रापोस्ट'वर (तरुण तेजपाल यांच्या अटकेनंतर 'रंग' बदललेला) . नुकतीच क्विंटचा हवाला देऊ ही बातमी ABP Majhaच्या वेबसाईटवर दिसू लागली आहे. कदाचित आता ती त्या चॅनेलवर येईल. फारसा गदारोळ झाला नाही, तर त्यांच्या हिंदी चॅनेलकडे सरकेल असा अंदाज आहे.

हा कालपर्यंतचा अपडेट. आज हीच बातमी क्विंटच्याच हवाल्याने 'दिव्य मराठी'ने नकाशा बिकाशा काढून दाखवत अधिक अधिकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारण्यांचा अजेंडा राबवणारी 'फ्रस्ट्रेटेड इंडियन', इतकेच नव्हे तर डिफेन्सन्यूज.इन या नावाने जणू लष्कराची अधिकृत साईट असल्याचा आभास निर्माण करण्यार्‍या खासगी साईटनेही ही बातमी अहमहमिकेने दिली. चॅनेल्स बघणे मी बंद केल्याने तिकडे किती हुदाळ्या मारल्यात माहीत नाही.

देशाच्या संरक्षण मंत्रालयाने अथवा कोणत्याही अधिकार असलेल्या व्यक्तीने याबाबत माहीती न देताही अशा तर्‍हेची बातमी दिली जात आहे. अर्थात संघटनांच्या कुजबूज ब्रिगेडकडे 'आमच्या आतल्या गोटातल्या बातमीनुसार' हे विनोदी कारण कायम हत्यार म्हणून असतेच. अधिकृत बातमी नंतर दिली जाईल अशी मखलाशीही केली जाऊ शकते. 'द डॉन' या पाकिस्तानच्या वृत्तपत्राने ही बातमी कशी दिली नाही?' या प्रश्नाला 'आपली हार ते कशी काय जाहीर करतील?' असे साडेअठ्ठावीस इंच फुलवलेल्या छातीने उत्तर दिले जाईल...

सगळं कसं सहज तर्क करण्याजोगे होऊ लागले आहे. लाज, लज्जा शरम सगळे गुंडाळून खोटारडेपणा चालू आहे. असंच चालू राहिलं तर या देशात काही दिवसांत केवळ 'तुमचं खोटं विरूद्ध आमचं खोटं' इतकंच शिल्लक राहील की काय अशी भीती वाटू लागली आहे. खरं काय हे कधीच कुणाला समजू शकणार नाही. जो तो आपल्या सोयीच्या खोट्यालाच खरे मानून चालू लागेल असे दिसते. थोडक्यात भक्तांचा डीएनए सर्वत्र पसरलेला दिसेल अशी शक्यता आहे. 

ही बातमी जर खोटी असेल तर या तीन वेबसाईट्सवर 'सार्वजनिक शांततेचा भंग होईल असे वर्तन केल्याचा' ठपका ठेवून खटला भरणार की 'मन की बात' पसरवल्याबद्दल पद्मविभूषणची खिरापत वाटणार हे कोण सांगू शकेल? ट्विट करून विचारू का?

खोटे बोलण्यात काही लाज वाटून घेऊ नये असा संदेश थेट शीर्षस्थ व्यक्तींकडून दिला जात असल्याने जनतेने आणि त्यातही सनसनाटीपणावरच पोट भरता येते असे समजणार्‍या काही माध्यमांनी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळावे यात नवल नाही. अशा खोट्या बातम्या युद्धज्वर वाढवण्यास कारणीभूत होतात. 

एकदा हे पचते असे दिसले की जी प्रथितयश माध्यमे आहेत, नि ज्यांनी अजून ही बातमी दिली नाही, त्यांनाही 'स्पर्धेत टिकण्यासाठी' हे करावे लागणार आहे. त्यांची न्यूज पोर्टल्स पाहिली तर तिथे हेल्थ, लाईफस्टाईल आणि रोमान्स या तीन वेगवेगळ्या स्तंभशीर्षकाखाली जे सॉफ्ट पॉर्न निलाजरेपणे छापले जाते त्यावरून हे सहज लक्षात येईल.

यात दुसरा धोका आहे तो दस्तऐवजीकरणाचा. आज इंटरनेटच्या जमान्यात दहा ठिकाणी ही बातमी छापली गेली आहे. भविष्यातले 'खरा इतिहास' शोधणारे गल्लीबोळातले गुगलपंडित इतिहाससंशोधक इतक्या ठिकाणी बातमी दिसते म्हणून त्याचा अजाणता वा हेतुतः वापर करून आपले इतिहासाला आपल्या सोयीने वळवण्याचे आपले काम 'समरसतेने' करत राहतील.

दोन महत्त्वाचे मुद्दे, पुराव्याशिवाय अशा बातम्या देणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करता येत नाही का? दुसरे, तुम्ही आम्ही 'शाहीद कपूरच्या मुलीचे नाव काय ठेवले किंवा करीना कपूरला कुठले डोहाळे लागले' अशा बातम्या चवीने वाचण्याइतके खुजे नि विचाराने किडके आहोत तोवर माध्यमे हा प्रकार करत राहणारच आहे.

या विशिष्ट केसमधे बातमी सध्याच्या सत्ताधार्‍यांच्या सोयीची असल्याने त्याकडे - अनेकदा केला तसा - काणाडोळा केला जाईल हे उघड आहे. आपल्या देशातील समाजाची ओळख दिवसेंदिवस 'मला सोयीचे असत्य त्याला सत्य म्हणून मान्यता देणार्‍यांचा' अशी होते आहे. जात धर्मांवरच्या मारामार्‍या नि विच-हंटिंग तर नेहमीचेच.

दक्षिण पूर्व पुण्यातील, एकाच जमातीच्या चार टाळक्यांना एकत्र करून एक राजकीय पक्ष काढून स्वतःला 'राष्ट्रीय अध्यक्ष' वगैरे बिरुदे मिरवत फ्लेक्स लावणारा कुणी बाबा, त्याच्या फ्लेक्सवर झळकायला मिळाले म्हणून कृतकत्य होणारी नि त्याबद्दल आयुष्यात दादांसाठी कायप्पन म्हणत सतरंज्या उचलत धन्यता मानणारी मठ्ठ पोरटी, टीकेला उत्तर देण्यासाठी 'त्यांना सांगा की' आणि 'तेव्हा का नाही' हे दोन रामबाण हाती घेतलेले सारे निर्बुद्ध लोक गल्लीबोळात बार्गेनिंग पॉवर जमा करत आपला चार सेंटीमीटर स्वार्थ साधून घेताहेत नि वर राष्ट्रप्रेमाच्या पिचक्या डरकाळ्या फोडताहेत.

परक्या देशांकडे सतत 'एफडीआय वाढा वं माय' म्हणत हात पसरणारा, शेजार्‍याशी कचरा टाकण्यावरून भांडत बसणार्‍या माणसांचा हा देश महासत्ता होईल असे समजणारे निर्बुद्ध, मूर्ख आहेत नि आळशीही. त्या रम्य भूतकाळाच्या स्वप्नात नि रंगीत भविष्यकाळाच्या दिवास्वप्नात वर्तमानात त्यांना विचारहीन, सुखवस्तू जगायचे आहे.

संस्कृतीच्या बाता मारणारा हा देश १००% टक्के स्वार्थी आणि इहवादी आहे. कोण्या देवाच्या टाळक्यावर चार फुले वाहिल्यामुळे किंवा त्याच्या नावे सार्‍या समाजाला वेठीस धरणारे उत्सव साजरे करण्याने प्रगती होईल असे समजणारा बिनडोक समाज कधीच प्रगती करू शकत नसतो. आणि हे सांगणारे देशद्रोही असतात. 

जिथे अभ्यास करायचा तिथे विचार न करता रट्टे मारून पदव्या पदरी पाडून घेताना - आता तर विकतही सहज मिळतात - सोशल मीडियात मात्र अमक्याला 'घ्यायचाच' असे ठरवून त्याच्या पोस्ट, लेखनातून कीस पाडून गैरअर्थ काढून वाद घालणारे शूर मावळे फेसबुकवर असताना या देशाला वेगळ्या सैन्याची गरज काय? सोबतीला नुसत्या फोटोशॉपवर समाजसेवा नि बातम्या पसरवण्यावरच ज्यांचे कर्तृत्व सिद्ध होते करणारे असे सत्ताधारी झाल्याने आनंदीआनंद झाला आहे.

या देशातील माझ्यासकट सगळ्या निर्बुद्धांचा विजय असो.

- oOo -

बातमी: Army Denies 'Cross-border Surprise raid'.


हे वाचले का?

गुरुवार, २ जून, २०१६

आपलं आपलं दु:ख

गालव हा विश्वामित्र ऋषींचा लाडका शिष्य. शिक्षण समाप्तीनंतर कोणतीही गुरुदक्षिणा न मागता गुरुंनी त्याला घरी परत जाण्यास अनुमती दिली. पण गुरुदक्षिणा देण्यास गालव हटून बसला. संतापलेल्या गुरुंनी मग 'ज्यांचा एकच कान काळा आहे असे आठशे पांढरेशुभ्र घोडे' गुरुदक्षिणा म्हणून मागितले. असली विचित्र गुरुदक्षिणा ऐकून गालव स्तंभित झाला नि त्याने विपुल शोक केला. मग असे घोडे मिळवण्यासाठी मदत मागायला तो ययातीकडे आला. त्याच्याकडे असे घोडे नव्हते, पण आलेल्या अतिथीला विन्मुख पाठवणे हे त्याच्या राजेपणाला न शोभणारे. मग तो आपल्या राजेपणाला शोभेसा तोडगा त्यावर काढला. रुपगुणाची खाण अशी ख्याती असलेली आपली कन्या 'माधवी' त्याने गालवाला दिली नि तिच्या सहाय्याने तू घोडे मिळवू शकशील असा सल्ला त्याला दिला.' पण हे करतानाच ययातीने अशी अट घातली होती की तिच्या पोटी जन्मलेल्या पुत्रावर नातू म्हणून, वंशाचा दिवा म्हणून माझाच हक्क असावा.

अरुणा ढेरेंनी त्यांच्या 'काळोख आणि पाणी' या पुस्तकात माधवीच्या कथेवर लिहिले आहे. त्यात त्या म्हणतात, "विश्वामित्राने विचित्र गुरुदक्षिणा मागितल्यावर खचून गेलेल्या गालवाचा शोक (महाभारताच्या त्या कथेत) विस्ताराने वर्णन केला आहे, पण माधवीचे दु:ख किंवा सुख सांगणारी एकही ओळ नाही, एकही शब्द नाही." ही सारी गोष्ट 'गालवाची गोष्ट' म्हणून येते, दुराग्रहाचा परिणाम काय होतो हे सांगणारी बोधकथा म्हणून येते, यात माधवीला एक साधन या पलिकडे काडीचेही महत्त्व नाही.

हर्यश्व, दिवोदास, उशीनर या तीन राजांशी दोन-दोनशे घोड्यांच्या बदल्यात राहिल्यावर नि तीन पुत्र जन्मल्यावर या संपूर्ण पृथ्वीतलावर आपल्याला हवे तसे सहाशेच घोडे आहेत हे गालवाला समजले. मग तिला घेऊन गालव विश्वामित्राकडे गेला. उरलेल्या दोनशे घोड्यांऐवजी त्याने तिलाच ठेवून घेतली आणि तिच्या ठायी अष्टक नावाचा पुत्र जन्माला घातला. तिला घेऊन आलेल्या गालवाला तो म्हणतो 'अरे एवढी वणवण करण्याऐवजी हिला प्रथमच माझ्याकडे घेऊन आला असतास तर मीच हिच्या ठायी चार पुत्र जन्माला येईतो हिला ठेवून घेतले असते.' थोडक्यात त्याने त्या स्त्रीची किंमत ही आठशे घोड्यांइतकी किंवा चार पुत्रांइतकी ठरवली. नंतर ती कुठेही जाण्यास, कुणाशीही संसार करण्यास स्वतंत्र होती (पुत्रोत्पत्तीनंतरही तिला पुन्हा अक्षत कुमारी होण्याचा वर होता, म्हणे. अर्थात, हा अर्वाचीन जगात योनिशुचितेचा किंवा एकुणच लैंगिक दांभिकतेचा बडिवार माजवणे सुरु झाल्यावर घुसडलेला भाग असणार.)

अरुणा ढेरे आपल्या लेखात म्हणतात, "ज्या ज्या राजांनी तिला वापरले, त्यांतील एकाही महाभागाचे मन तिच्यात गुंतले नाही आणि तिच्या शरीराचा लोभ स्पष्टपणे व्यक्त केल्यावाचून एकही जण राहीला नाही, अगदी विश्वामित्रासारखा ब्रह्मर्षीही ह्या गोष्टीला अपवाद नाही." मग पुढे म्हणे ययातीने तिच्या लग्नाचा घाट घातला, पण तिने 'वन' हाच पती निवडला, म्हणे. आणि ती तपसाधनेसाठी वनात निघून गेली.'

चारही पुरुषांच्या दृष्टीने माधवी कितीही रुपगुणांची खाण असली तरी केवळ एक स्त्री होती, गुणवान पुत्रोत्पत्तीसाठी योग्य अशी भूमीच होती. राजे असल्याने कदाचित, पण त्या पलिकडे कुठलीही भावनिक गुंतवणूक त्यांच्याकडून संभवत नव्हती. परंतु माधवीच्या दृष्टीने एकेका पुरुषामधे गुंतत जात असतानाच तिथून बाहेर पडून पुन्हा नव्या पुरुषाबरोबर नात्याची गुंफण घालू पाहणे हे किती वेदनादायक झाले असेल हे समजण्यासारखे आहे. अशा वेळी त्या समाजमान्य लग्न नावाच्या संस्थेत शिरून पुन्हा एकवार एका पुरुषाबरोबर तोच डाव मांडण्याचा तिला वीट आला असेल किंवा जुन्या वेदनेचा आठवही नको म्हणून तिने ते नाकारले असेल अशीच शक्यता आहे. तिची कथा सांगणार्‍याने तिच्या या निर्णयाला 'तिने वन हाच पती निवडला' वगैरे चमत्कृतीपूर्ण आवरण घालून दडवण्याचा प्रयत्न केला असेल.

माधवी (किंवा एकुणच स्त्री) ही एका बाजूने दानवस्तू, पुत्रोत्पतीसाठी जमीन तर तिसर्‍या अर्थी विनिमयाचे 'चलन'ही ठरते, जिची किंमत तीन राजांनी प्रत्येकी दोनशे घोड्यांइतकी, तर विश्वामित्राने आठशे घोड्यांइतकी लावलेली आहे. जीएंच्या एका कथेतले दुय्यम पात्र म्हणते म्हणते 'एक स्त्री आणि घोडा यांत निवड करायला सांगितली तर मी नि:संशय घोड्याचीच निवड करेन.' जगात अनेक संस्कृती, धर्म फोफावले, त्यांनी स्वश्रेष्ठत्वाची द्वाही फिरवली, त्यांच्या अनुयायांनी ते श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी हजारो पुरुषांची हत्याही केली, त्यांच्या स्त्रिया पळवून पुन्हा भूमी म्हणूनच आपल्या बीजाचे आरोपण करण्यासाठी वापरल्या. सर्वच व्यवस्थांनी स्त्री ही केवळ पुरुषाचे बीज धारण करणारी भूमी म्हणूनच तिच्याकडे पाहिले आहे. ते पाहता खर्‍या अर्थाने 'सुसंस्कृत' म्हणवणारी संस्कृती अजून उभी राहायची आहे असेच म्हणावे लागेल.

बर्‍याच स्वघोषित महान संस्कृतींमधे कुटुंबव्यवस्थेची भलामण केली जाते, भ्रातृभावाचे गुणगान केले जाते, परस्पर सहकार्याच्या तत्त्वाला अनुसरण्यासाठी समाजाच्या एकजुटीला मोठे महत्त्व दिले आहे. पण अशा तथाकथित महान संस्कृतींमधेही माधवीची वेदना तिने सांगावी आणि कुणी ऐकावी असे कुणी नसावेच, गालवाचा उरबडवा शोक ऐकून माफक हेलावणार्‍या बधीर मनाच्या समाजात इतका संवेदनशील कान तिला मिळाला नसावा.

हीच वेदना 'चेखव'च्या 'मिझरी' या कथेमधल्या घोडागाडीवाल्या 'पोत्पोव'चीही. दोघांच्या दु:खाचे मूळ वेगवेगळे असले तरी जातकुळी एकच. परंतु दोन्ही लेखकांमधे मात्र फरक आहे. व्यासांच्या - किंवा ज्याने कुणी ही 'गालवाची' कथा महाभारतात घुसडली त्याच्या - संवेदनशीलतेला माधवीच्या वेदनेचा स्पर्शही झाला नाही. चेखवच्या पोत्पोवचे दु:ख एका 'माणसाचे' तेव्हा ते तर दखलपात्र आहेच, पण त्याच्या गाडीला जोडलेल्या घोडीबाबतही चेखव किती जागरुकतेने विचार करतो आहे हे नोंदवले तर व्यासांची माधवीप्रती असलेली संवेदनाहीन वृत्ती अधिकच अधोरेखित होते. चेखव कथेच्या सुरुवातीलाच लिहितो, "ती घोडी विचारात हरवल्यासारखी दिसत होती. आपल्या परिचित काळ्या करड्या परिसरातून, जन्मजात वागवलेल्या त्या नांगरापासून दूर करून असल्या चिखल राडाने भरलेल्या, भगभगीत दिव्यांनी भेसूर दिसणार्‍या, सदैव घाईत असलेल्या माणसांच्या गर्दीने ओसंडून वाहणार्‍या नि त्यांच्या निरंतर कोलाहलाने वीट आणणार्‍या परिसरात येऊन पडलेला कुणीही विचारात पडणारच."

वृद्धापकाळीचा आधार असलेला आणि घरातील एकमेव सोबत असलेला एकुलता एक कमावता मुलगा गमावल्याचे पोत्पोवचे दु:ख जगातील चिरंतन आणि तरीही प्रत्येकाचे वैयक्तिक असलेले. चेखव म्हणतो "त्याचे हृदय फुटून जर त्याची वेदना वाहती झाली असती तर त्याच्या प्रलयात सारे जग बुडून गेले असते इतकी ती तीव्र होती." सांगून आपले दु:ख हलके करावे अशी एकही व्यक्ती त्या जगात त्याला सापडत नव्हती. त्याच्या गाडीतून प्रवास करणार्‍यांपैकी लष्करी अधिकारी, दारु पिऊन तर्र झालेले तीन उद्धट तरुण, तसंच एक पोस्टमन, खानावळीत भेटलेला तरुण यांना तो ते सांगू पाहतो. त्यासाठी तो त्यांच्या संवादात माफक भाग घेऊन त्यासाठी त्यांच्याशी तात्पुरते नातेही जोडू पाहतो. पण तरीही त्याचे ऐकून घेण्याइतकी फुरसत वा इच्छा त्याच्या जगात कुणालाही नाही.

दु:ख सांगून हलके होते असे म्हणतात. म्हणूनच आनंदाच्या प्रसंगापेक्षाही दु:खाच्या प्रसंगी आस्थेने विचारपूस करायला येणारे सुहृद, आप्तस्वकीय जितके अधिक तितका समाजाचे बंध अधिक बळकट मानता येतात. परंतु पोत्पोवला असे जवळचे कुणीही नाही. त्याचा एकमेव सुहृद गमावल्यानंतर ते दु:ख बोलून हलके करावे अशी एकही व्यक्ती त्याच्या आसपास नव्हती. हे तत्कालिन रशियन समाजावरचे भाष्यच आहे, जसे माधवीची कथा ही त्याकाळच्या -आणि बहुधा आजच्याही- भारतीय समाजातील सामाजिक नीतिनियमांचा आरसा मानता येते.

माधवीसाठी सहानुभूतीचा कान जसा तत्कालीन भारतीय समाजात नव्हता, तसाच पोत्पोवसाठी तो त्याच्या रशियन समाजातही अस्तित्वात नव्हता. तो सांगेल ते निमूटपणे ऐकणारी घोडी तरी पोत्पोवकडे होती, जिच्याशी आपण बोलतो, तिला आपले म्हणणे समजते, हे गृहित धरणार्‍या पोत्पोवला तितके समाधान तरी आहे. माधवीसमोर असा कुठला एकतर्फी पर्यायही उपलब्ध नाही. बंद कानांच्या मनुष्यांच्या समाजापेक्षा तिने अरण्य जवळ करावे हे त्या समाजाची लायकी दाखवून देणारे सणसणीत स्टेटमेंट आहे असे मी मानतो. नवपरिणित पत्नीसोबत पहिली रात्र व्यतीत करुन आलेल्या पुरुषाला 'माल खरा की खोटा' हा बेशरम प्रश्न विचारणार्‍या जातपंचायती आजही या देशात सक्रीय असल्याने माधवीने अजूनही अरण्यातच राहावे अशी परिस्थिती आहे असे म्हणावे लागेल.

पण जशी अरुणा ढेरेंना माधवीची गोष्ट तुम्हा-आम्हाला सांगावीशी वाटली तसेच 'चन्द्रप्रकाश देवल' यांना तिची वेदना शब्दबद्ध करावीशी वाटली. त्यांनी लिहिलेल्या 'बोलो माधवी' या दीर्घकाव्याच्या माध्यमातून त्यांनी ती मांडली आहे. त्यातच एका सर्गात त्यांनी चेखवची कथा आणि माधवीची कथा यांची सांगड घातली आहे. प्रसिद्ध कवयित्री आसावरी काकडे या यांनी देवलांची ही दीर्घकविता मराठीमध्ये आणली आहे. त्यातील एका सर्गामध्ये त्यांनी चेखवचा पोत्पोवचे आणि माधवीचे दु:ख यांना परस्परांसमोर ठेवले आहे. या अनुवादाला ’साहित्य अकादमी पुरस्कार’ही मिळालेला आहे. त्यातील हा एक भाग.

बोल माधवी
काव्य: बोल माधवी
कवी: चन्द्रप्रकाश देवल (हिंदी)
अनुवाद: आसावरी काकडे
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
आवृत्ती दुसरी (२००७)
पृ. ४८-४९.
			-: आपलं आपलं दु:ख :-
                    
आज चेकॉव्हची 'ग्रीफ' कथा वाचताना
राहून राहून वाटतं आहे
पोत्पोवनं शेवटी
आपल्या मुलाचं दु:ख
सांगितलं आपल्या टांग्याच्या घोड्याच्या कानात
तशी तू ही खरोखरच सांगितली असशील
आपल्या मनातील व्यथा
एखाद्या श्यामकर्ण घोड्याच्या कानात...
तुला तर सांगायच्या होत्या
तीन-तीन मुलांच्या जन्म-वेदना...
पण ऐकणारं कोण आहे
या बधीर वस्तीत?
संवेदना एक शिवी आहे इथे!

घोडाच होऊ शकतो
दु:ख जाणणारा मित्र...
या गजबजलेल्या
स्थितप्रज्ञ आणि विरक्त जगात!
जिथे माणसाला काही सांगणंच
यातनामय असतं...
याचना करण्यासारखं आहे
या बहिर्‍या समाजाला आवाज देणं...

आणि घोडे...
तुझ्या बदल्यात मिळवलेले असूनही
तुझी संपत्ती नसलेले...
सांग कुठे शोधू त्यांना?
कुणाच्या तरी राजसूय यज्ञात
स्वाहा होऊन गेलेत सगळे!

माधवी!
त्या काळातलं काहीच उरलं नाही आता...
राजप्रासादांच्या भिंती तर असतात नेहमी
मुक्या आणि बहिर्‍याच...
झरोक्यांना बोलतानाही
ऐकलं नाही कधी कुणी...

समया केव्हाच विझून गेल्यायत
पलंग वाळवीनं खाऊन टाकलेत
देणं घेणं उरकून
मागे राहिला आहे
एकमेव साक्षी... अंधार!
त्याला काहीच दिसत नाही
आणि सूर्यानं काही पाहिलं नाही...!

तुला न समजू शकण्याची यातना
तुझ्या दु:खापेक्षा भयंकर होत चालली आहे!
थोडं जरी असतं समाधान
तरी जतन केलं असतं हृदयात...
पण या सलणार्‍या विषादाचं काय करू?
आणि माधवी होऊन समजून घेणं
तर उपमर्दच आहे एक प्रकारचा...!

- oOo -

टीपा.
१. हा अनुवाद ’विजय पाडळकर’ यांच्या ’कवडसे पकडणारा कलावंत’मधून साभार.
२. इथे तपशीलात थोडा गोंधळ होऊ शकतो. 'चेखव'च्या दोन कथा आहेत. पैकी पहिली कथा जी आहे ती एका वृद्ध घोडागाडीवाल्याची कथा आहे, जिचा अनुवाद बहुधा 'मिझरी' या शीर्षकाने पाहण्यात येतो,. ज्यात आपल्या मुलाच्या मृत्यूचे दु:ख कुणाला सांगून हलके करावे इतके जवळचे कुणी नसलेला, इतर 'माणसांना' त्याच्या दु:खाशी घेणेदेणे नसल्याने अखेरीस तो आपल्या गाडीला जोडलेल्या घोडीलाच सांगून आपले दु:ख हलके करतो. दुसरी कथा - जी 'ग्रीफ' या शीर्षकाने अनुवादित केलेली पहायला मिळाली - त्यातही एक वृद्ध आपल्या आजारी पत्नीला घोडागाडीतूनच हॉस्पिटलमधे घेऊन चालला आहे. शीर्षक आणि कथेची पार्श्वभूमी बरीच जवळपास असल्याने गोंधळ होऊ शकतो. इथे अपेक्षित असलेली कथा ही पहिली - 'मिझरी' - आहे.


हे वाचले का?

गुरुवार, २६ मे, २०१६

वादे वादे जायते वादंग:

(एका - बहुधा तथाकथित सवर्ण वर्गात मोडणार्‍या - फेसबुकमित्राने एका पोस्टमध्ये असा मुद्दा मांडला होता, की 'सवर्ण असलेल्या माणसांना आपण आंबेडकरांचे विचार मानतो किंवा घटनेला प्रमाण मानतो किंवा आंबेडकरवादी आहोत हे पटवून द्याव लागतं, तेही वारंवार.'

एरवी जात या विषयावर न लिहिण्याचा माझा दंडक मोडून त्यावर दिलेली ही प्रतिक्रिया आहे.
)

---

अगदी नेमका मुद्दा मांडला आहेस. पण अलिकडे याबाबत मी काहीसा हताश आहे. याबाबत सांगून काही होत नसतं. 'इतकी वर्ष आम्ही सहन कसं केलं असेल' हे उत्तर देऊन तोंड बंद केलं जात आहे.

एक महत्त्वाचं ध्यानात घेतलं पाहिजे की प्रत्येक समाजात, जातीत, भाषिक गटात, धर्मात असेही लोक आहेत, तसेही लोक आहेत. त्यातल्या टीकेच्या सोयीचे प्रकारचे लोक हे 'प्रातिनिधिक' समजून वागत गेलो तर धागे जुळणारच नाही.

एक नक्की की द्वेषाचे पेरणी अधिक सोपी नि सोयीची असल्याने तीच अधिक केली जाते. द्वेषाच्या आधारे जमाव लवकर जमतो, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. म्हणून आरक्षणाने देशाचे वाटोळे होत आहे म्हणून गळे काढणारी सुमार बुद्धीची ब्राह्मणांतली पोरे असोत, की शंभर मुद्द्यावर एकमत असलेला ब्राह्मण जेव्हा एखाद्या मुद्द्यावर असहमती दाखवतो म्हणून लगेच, "बरोबर आहे, शेवटी तुम्हाला काय कळणार 'आमची' बाजू" म्हणून त्याची जात काढणारा, सुखवस्तू आयुष्य जगणारा दलित/पूर्वास्पृश्य हे एकाच पंथाचे मानले पाहिजेत.

गंमत म्हणजे यासंबंधी विषयांवरील चर्चेमध्ये ब्राह्मणेतर उच्चवर्णीय आणि ज्यांना ओबीसी म्हटले जाते त्या गावगाड्यातील पूर्वाश्रमीच्या अलुतेदार, बलुतेदार जातींचा उल्लेखही येत नाही. जणू ते या संघर्षाचा भागच नाहीत. हे कधी स्वत:ला बहुजन म्हणवत पूर्वास्पृश्यांच्या बाजूला आपले वजन टाकतात नि ब्राह्मणी व्यवस्थेचा विरोध करत असल्याची मखलाशी करतात. पण कदाचित ब्राह्मणही करत नसतील इतक्या निष्ठेने सनातनी ब्राह्मणी व्यवस्थेची जोपासनाही करतात.

मुळात एकदा 'ते' आणि 'आपण' वेगळे मानून चालू लागलो की तिथेच सहकाराची शक्यता मावळते. केवळ दोषारोपासाठी मुद्दे शोधण्यात सारा वेळ नि ऊर्जा खर्च होत राहते. आणि यावर प्रत्येक बाजूकडून 'मग त्यांनी पण हे समजून घ्यायला नको का, त्यांना आधी सांगा' म्हणत आपली जबाबदारी झटकून टाकली जाते. मग ते ण ला ण म्हणणारे असोत की जगातला प्रत्येक प्रश्न ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाकडे ओढून नेऊन वाद घालणारे एकांगी असोत.

मूळ मुद्द्याच्या एक पाऊल मागे जाऊन असे विचारतो, की मुळात 'मी अमुकवादी आहे' हे सांगण्याची गरज का पडावी? मी आंबेडकरवादी आहे असे नुसते म्हटल्याने मी तसा होतो का? आणि तसे न म्हणताही मी त्यांच्या तत्त्वांना अनुसरून - जाणीवपूर्वक वा अजाणता - वागत असेन तर मी आंबेडकरवादी नसतो का?

दुसरा मुद्दा, मुळात आपल्याला एखादा विचार पटला म्हणून मी अनुसरत असेन, तर कुणी एखादा मला 'आंबेडकरवादी' असल्याचे प्रमाणपत्र नाकारत असेल तर मी त्याला का महत्त्व द्यावे? ते देणारा देण्यासाठी आवश्यक ते मूल्यमापन करण्यास लायक आहे हे कसे ठरते? जसे मोदीभक्तांना राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र वाटायचा ठेका दिलेला नाही तसाच स्वतःला आंबेडकरवादी 'म्हणवणार्‍या' कुणाला तो दिलेला नाही.

मग तो म्हणाला की तू आंबेडकरवादी नाहीस, तर मी त्याला म्हणेन तू 'डॉकिन्सवादी नाहीस', क्विट्स. कारण ही दोन्ही वाक्ये वांझ आहेत. त्यांना काडीचाही आधार नाही. कुठेही वस्तुनिष्ठ मूल्यमापन नाही. मी असल्या शेरेबाजांना काडीची किंमत देत नाही. दुसर्‍यावर शेरे मारणे हे केवळ आपले स्थान बळकट करण्यासाठीच असते असे मी समजतो. इतरांना राष्ट्रद्रोही ठरवल्याने आपली राष्ट्रभक्ती सिद्ध होते असे अनेकांना वाटते, तसेच समोरचा आंबेडकरवादी नाही, किंवा छुपा संघिष्ट आहे, असे म्हटले की आपले आंबेडकरवादी असणे आपोआप सिद्ध होते त्याची धारणा असावी.

NotBeliefs

शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा. मुळात मी अमुकवादी आहे असे कानाच्या पाळीला हात लावून घराणे सांगण्याची गरज का पडावी? आपण आपल्या विचारांशी प्रामाणिक असावे. ते सतत तपासून घेत रहावे, चूक सापडली तर दुरुस्त करत राहावेत. विचार नि मूल्यमापनाची पद्धत अधिकाधिक समृद्ध होत रहावी म्हणून आंबेडकरांसह जगातील सर्वच सुज्ञ माणसांचे विचार वाचत राहावेत, तपासून पाहावेत. कोणते आपल्या परिस्थितीत, कुवतीत अंमलात आणता येतात ते पाहावे, अंमलात आणावेत.

माझे विचार हे माझे आहेत, माझ्या विचारातून सिद्ध झाले आहेत याचा अभिमान का बाळगू नये? मग कदाचित असे होईल की तुमचे विचार बरेचदा आंबेडकरांकडून आलेले असतील, उत्तम आहे. कधी ते रिचर्ड डॉकिन्सकडून आले असतील, कधी मार्क्सकडून तर, कधी एखाद्या उपनिषदातून. स्रोतावरूनच अस्पृश्यता पाळणे हा दोष जोवर जात नाही तोवर अशी 'विचारांच्या घराण्यांची' गरज आपल्याला पडत राहणार आहे आणि त्या सार्‍याच घराण्यांचे टोळ्यांमधे रूपांतर होत राहणार आहे.

टोळ्यांना फक्त मित्र कोण नि शत्रू कोण इतकेच समजते. त्यांना घराण्याचा विचार पुढे नेण्यासाठी विचार करायची गरज वाटत नाही. जे तसे करू पाहतात त्यांना 'परंपरा मोडल्याचा' आरोप सहन करावा लागतो. याला आंबेडकरवादी म्हणवणारे (मी 'म्हणवणारे' असा उल्लेख यासाठी करतो आहे की तसे म्हणवणारे वास्तवात असतीलच असेही नाही. 'आहेत की नाही' हे तपासायचे कसे मला ठाऊक नाही, नि मला तो अधिकारही नाही. ) अपवाद नसतात, संघ स्वयंसेवकांसारखे स्वयंघोषित हिंदुत्ववादी अपवाद नसतात, की सर्व समस्यांचे पाप मध्यमवर्गीयांच्या माथी मारले की आपण आपोआप अस्सल वाणाचे कॉम्रेड ठरतो असे समजणारेही.

आपल्या जगण्याची चौकट घडवण्यासाठी अनेक स्रोतांचा अभ्यास करावा इतका वेळ नि ऊर्जा सर्वांनाच उपलब्ध असेलच असे नाही. मग बहुतेक सारे पूर्वसुरींनी दिलेल्या काही विचारव्यूहांच्या आधारे ते आपले जगणे उभे करतात- निदान तसा दावा करतात. मग कुणाला आंबेडकरांचे, कुणाला गांधींचे, कुणाला सावरकरांचे, कुणाला मार्क्सचे, कुणाला लोहियांचे विचार पटतात, आवडतात वा भारी वाटतात. आणि म्हणून ते त्या-त्या विचारांचा, विचारवंतांचा झेंडा खांद्यावर घेऊन चालू लागतात.

अगदी धर्माचेही घ्याल तर जगण्याची तयार चौकट म्हणूनच तिची निर्मिती झाली आहे. परमेश्वरी शब्द, अंतिम सत्य वगैरे आवरणे त्याच्या अनुयायांना 'आपण स्वीकारले त्याला भक्कम आधार आहे हं’ हा आत्मविश्वास देण्यासाठीच असतात. शिवाय त्यांचा संबंध पारलौकिकाशी जोडून ती अभेद्य केलेली असतात.

ज्याला स्वतःची चौकट घडवण्याची कुवत नाही, इच्छा नाही, ताकद नाही, त्याने साधकबाधक विचाराने उपलब्ध धर्मातून एक निवडावी असे अपेक्षित आहे. बहुतेक लोक ती तसदीही न घेता वाडवडिलांनी उचललेला झेंडाच उचलून चालू लागतात.

धर्माची अथवा विचारव्यूहाची उपलब्ध पर्यायांतून निवड करणे हे बाजारातून ३४, ३६ किंवा ३८ च्या मापाचा तयार सदरा आणण्यासारखे आहे हे. यातील एका प्रमाण- मापाचा सदरा बहुतेकांच्या शारीर प्रमाणाशी बर्‍यापैकी सुसंगत असा सापडतो नि ते तो उचलून वापरू लागतात. काही जण वाडवडील अमुक दुकानातून अमुक कापडाचा सदरा आणत म्हणून स्वत:ही त्याच दुकान नि कापडाशी एकनिष्ठ राहतात. यात सोय असली तरी त्याची अस्मिता बनवण्याचे काही कारण दिसत नाही.

एखाद्या आडमाप देहाला तयार प्रमाणबद्ध सदरा बसत नाही, त्याने स्वतःच्या मापाचा सदरा शिवून घ्यावा. त्याने तयार मापांतून निवडला नाही म्हणून त्याला आपण दोष देऊ का? मग अमुकच एक विचारव्यूहाला तुम्ही स्वीकारले नाही म्हणजे तुम्ही दुय्यम, घातक वृत्तीचे असे समजायचे कारण नाही. त्यासाठी त्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष आचरणाचेच मूल्यमापन व्हायला हवे, निव्वळ घोषणेचे नव्हे. शिवाय मी अमुकवादी आहे याचा उद्घोष कुणी करू लागतो, तेव्हा तो तसा नसण्याची आणि ते झाकण्यासाठी अधिक उच्चरवाने ते ठसवू पाहात असल्याचीच शक्यता अधिक असते.

आता माझे वैयक्तिक मत सांगतो. मी स्वतः माझे विचार विकसित करण्यावर विश्वास असलेला माणूस आहे. लोकशाही-समाजवादी विचारांबद्दल मला आस्था असली तरी 'मी समाजवादी आहे' असे मुळीच म्हणणार नाही. मला अशा तयार ३६ मापाच्या सदर्‍याची गरज आहे असे मला वाटत नाही. माझा सदरा मी शिवून घेणार आहे. त्यात आंबेडकरवादाचे धागे असतील, सावरकरांचा ठणकावून सांगणारा विज्ञानवाद असेल, मार्क्सचे द्रष्टेपण असेल, गांधीबाबाची दूरदृष्टी असावी अशी इच्छा असेल, नेहरुंचा वास्तवाचे भान असलेला व्यवहारी दृष्टिकोनही.

हे ही पुन्हा अगदी ढोबळ वर्गीकरण आहे आणि इतर अनेक व्यक्ती नि विचारव्यूहांची नावे यात आलेली नाहीत. शिवाय प्रत्येकाच्या अनुयायांना खुष करण्यासाठी यातील प्रत्येकाचे प्रत्येक अमुक इतके ग्रॅम विचारच घेईन असेही नाही. माझ्या विचारात या सार्‍या पूर्वसुरींच्या विचारांची प्रतिबिंबे दिसतील, पण ते पूर्णांशाने त्यांचे नसतील, नसावेत. 'मी अमुकवादी आहे' असे म्हटले तर मी ही एकसाचीकरणाच्या मार्गाने चाललो आहे असे मला वाटेल नि ते मला कधीच आवडणार नाही.

तेव्हा मुद्दा हा की माझे पुरेसे आंबेडकरवादी (आणि/किंवा मार्क्सवादी, समाजवादी, हिंदुत्ववादी) नसणे कुणाला खटकत असेल, तर मी तसा आहे हे सिद्ध करायला मी मुळीच जाणार नाही.

---

(२५ एप्रिल २०१९ रोजी अन्य एका चर्चेदरम्यान लिहिलेल्या मुद्द्यांची भर घालतो आहे.)

लेखाच्या प्रस्तावनेतील मुद्द्यामध्ये जसे सवर्णांनी आंबेडकरवादी असणे ही सतत सिद्ध करत बसण्याची तक्रार आहे तसेच :

१. मुस्लिमांनी देशभक्त असणे सतत सिद्ध करावे लागते. तसे असले तरी एक मुस्लिम गुन्हेगार वा दहशतवादी सापडला की ज्याच्या जाती/धर्मात महामूर गुन्हेगार आहे अशी व्यक्तीदेखील ज्याला आपण दीर्घकाळ ओळखतो अशा त्या मुस्लिम व्यक्तीकडेही अधिक(!) संशयाने पाहणे सुरु करते.

२. ब्राह्मणाने पुरोगामित्व सतत सिद्ध करत राहावे लागते. स्वत: अब्राह्मण असल्याने जन्मजात पुरोगामी आहोत असे समजणार्‍यांपैकी प्रत्येकाची वेगवेगळी मते असतात. ती परस्परविरोधी असू शकतात. त्या सार्‍यांशी एकाच वेळी सहमती दाखवावी लागते, जे शक्यच नसते. मग ज्याच्याशी असहमती दाखवतो तो त्या ब्राह्मणाचा ’छुपा मनुवादी वा संघी’ म्हणून ’सत्कार’ करतो. पुढच्या मुद्द्यावर त्याच्याशी सहमत होऊन अन्य कुणाशी असहमती झाली की त्या सत्काराची जबाबदारी तो उचलतो.

३. 'गुन्हेगार जमाती' म्हणून ब्रिटिशांनी शिक्का मारलेल्या जातींमधला कुणी स्वकष्टाने प्रगती करुन मोठा झाला तरीही असहमतीच्या क्षणी पुन्हा त्याच्या जातीचा उद्धार त्याला सहन करावा लागतो. त्या धोक्याचा विचार करुन आयुष्यभर त्याला सतत आपल्या मुळांपासून दूर झाल्याचे सिद्ध करत राहावे लागते. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे आपल्या समाजापासून तो दूर जातो आणि ’आता तू बामण झालास.’ हा आरोप स्वजातीयांकडून सहन करावा लागतो.

४. ९५ - ९९ टक्के सहमत असलेला उरलेल्या पाच-एक टक्क्यावर असहमत असेल तर लगेच तो ’छुपा तिकडचा’ ठरतो. (तो आपल्या जातीचा, धर्माचा नसेल तर मग नक्कीच). हा अनुभव स्वयंघोषित पुरोगाम्यांकडून अधिक येतो. ते तुम्हाला जवळ करण्यापेक्षा दूर ढकलण्यास अधिक उत्सुक असतात.

... यादी भरपूर लांबेल. तूर्त इतके पुरे.

कोणतही इझम परिपूर्ण नसतो. तसेच तो एखाद्या तो ब्लू-प्रिंट स्वरुपात, काटेकोर नसतो. त्यातही मूल्यमापनाचे सापेक्षत्व अनुस्यूत असतेच. संस्कृती, विचार नि विचारव्यूह हे प्रवाहीच असावे लागतात. एकच नाव मिरवणार्‍या विचारधारेच्या विविध प्रवाहांत भौगोलिक, सामाजिक, कालसापेक्षता असतेच. रशियातल्या कम्युनिजमची जातकुळी वेगळी नि चीनच्या वेगळी. क्यूबामधला आणखी तिसर्‍या प्रकारचा. त्यांच्यात परस्परात अंतर्विरोध असणारच.

हिंदू धर्म या नावाने काही संघटना काहीतरी अभंग, एकसंघ आहे असा दावा करतात. पण हिंदू म्हटल्या जाणार्‍या परंपरांमध्ये तर प्रचंड अंतर्विरोध आहेत. त्या उपप्रवाहांचेही पुन्हा परस्पर-संघर्ष होतच राहतात.

उदाहरणार्थ, सध्या शाकाहाराचे हुकूमशहा तो उरलेल्या हिंदूंवर लादू पाहात आहेत. वैदिक आणि वैष्णव पंथीय हे आपापली भूमी वाढवताना हिंदू धर्मांतर्गत अन्य प्रवाहांची भूमी बळकावत चालले आहेत. त्यासाठी आधी अवतार नि मग दशावतारांसाठी क्लृप्ती ते वापरत आहेत.

अशा वेळी मी अमुक गटाचा, जातीचा वा धर्माचा हे विधानही तसे भोंगळच असते. त्याला एखाद्या पत्रावर बाहेरून चिकटवलेल्या स्टॅंप इतकेच महत्त्व असते. हे बहुसंख्येला ठाऊक असल्याने कर्मकांडांच्या प्रदर्शनातून ही गट-बांधिलकी ते स्वत:ला नि इतरांना पुन्हा-पुन्हा पटवून देत असतात.

दुसरे असे की ’मी अमुकवादाचा वा तमक्या विचारवंताच्या मांडणीचा अभ्यास केला आहे म्हणजे तो मला तंतोतंत समजला आहे आणि मी तो तंतोतंत आचरणात आणतो आहे’ हा समज एका बाजूने भाबडेपणाचा किंवा धूर्तपणाचा असतो. बरेचदा अज्ञानमूलकही असतो. बहुसंख्य मंडळी ज्या विचाराची मांडणी करतात तो विचार ते आचरणात आणत असतीलच असे नाही. याला त्यांची त्या विचारांची समज, कुवत, गाफीलपणा, परिस्थिती, ज्यांच्याशी सहजीवन जगावे लागते अशा इतरांच्या विचार-वर्तनामुळे पडणारी बंधने अशी अनेक कारणे असू शकतात.

हे सारे लक्षात न घेता स्वत:च स्वत:ला ठेका बहाल करत ’हे आमच्या संस्कृतीत/विचारात बसत नाही.’ म्हणणारे, किंवा तू अमुकवादी नाहीस असे म्हणणारे दुराग्रही किंवा अज्ञानी असतात. मी अमुकवादी आहे हे केवळ झेंडा मिरवणे आहे.जात, धर्म आणि स्वीकृत इझम याचा गजर करणे, त्याच्या अस्मितेच्या ढेकरा देणे हे कम-अस्सल लोकांचे काम आहे. ज्यांना शहाणपण रुजवून दाखवता येत नाही ते मिरवून दाखवतात इतकेच.

-oOo-


हे वाचले का?

शुक्रवार, ८ एप्रिल, २०१६

ऐलपैल - ४ : जमिनीलगतची उंच माणसे

दरवर्षी 'पद्म' पुरस्कारांची घोषणा झाली की वार्षिक वादंगांचे फड रंगतात. कुणाला शासनाची हांजी हांजी करण्याबद्दल पुरस्कार मिळाला, कुणाची लायकीच नव्हती, किंवा दुसरेच कुणी लायक कसे होते याची हिरिरीने चर्चा सुरू होते. माध्यमांतून दिसणार्‍या लोकांभोवती ही चर्चा बहुधा फिरत राहते.

पण या यादीत दरवर्षी काही अपरिचित नावेही दिसतात, ते कोण याचा शोध घेण्याची तसदी आपण बहुधा घेत नाही. विशेष म्हणजे ही नावे बहुधा पर्यावरण, जलसंधारण, मूलभूत वा शाश्वत विकास या सर्वसामान्य माणसाच्या जगण्याला पायाभूत असूनही, तुम्हा आम्हाला काडीचा रस नसलेल्या क्षेत्रातील असतात असा अनुभव आहे.

यांच्याकडे फारसे लक्ष द्यावे असे माध्यमांना वाटत नाही याचे कारण म्हणजे यात 'ब्रेकिंग न्यूज' नसते, सर्वसामान्यांना वाटत नाही कारण आपले रोल मॉडेल्स बहुधा चित्रपटासारख्या मनोरंजनाच्या, राजकारणासारख्या सत्तेशी निगडित किंवा खेळासारख्या अनुत्पादक क्षेत्रातून येत असतात.

एखाद्या 'दशरथ माँझी'ला पद्मश्री न मिळताही चित्रपटामुळे थोडीफार प्रसिद्धी मिळते. तर 'जादव पायेंग' सारख्याला पद्मश्री मिळण्यापूर्वीच त्याच्यावर तयार झालेल्या 'फॉरेस्ट मॅन' या डॉक्युमेंटरीमुळे आणि परदेशी माध्यमांनी त्यापूर्वीच दखल घेतल्यामुळे थोडेफार लोक ओळखत असतात.

पण या दोघांपेक्षाही अधिक मूलभूत गरजेशी निगडित असलेल्या शेती आणि जलसंधारण या दोन क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री मिळालेल्या दोन भगीरथांचे नाव बहुसंख्येने ऐकलेले नसेल आणि 'पद्म' च्या यादीत वाचूनही 'हे कोण' हे जाणून घेण्याइतकी उत्सुकता त्यांच्या मनात निर्माण झाली नसेल याची जवळजवळ खात्रीच आहे. या वर्षीच्या यादीमधे स्थान मिळालेली ही दोन नावे आहेत जलसंधारणाच्या क्षेत्रात अतुलनीय कार्य केलेले झारखंडचे 'सिमोन उरांव' आणि 'झीरो बजेट नॅचरल फार्मिंग'चे प्रणेते डॉ. सुभाष पाळेकर.

Simon Uraon

झारखंडची राजधानी 'रांची'लगत असलेले बेड़ो हे पन्नास वर्षांपूर्वी उजाड, पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेले गाव होते. दुष्काळाने अनेक लोकांचा बळी घेतला, अनेकांनी स्थलांतर केले होते. अशा वेळी त्या गावचा रहिवासी असलेल्या तरुण सिमोनलाही स्थलांतराचा पर्याय उपलब्ध होता. पण त्याने भारतीयांच्या रक्तात असलेल्या दीर्घकालीन आणि व्यापक फायद्याच्या उपाययोजनांऐवजी तात्कालिक, संकुचित आणि सोप्या उपायांचा अंगीकार करण्याच्या प्रवृत्तीला मुरड घातली आणि सार्‍या दु:खाचे मूळ असलेले पाण्याचे दुर्भिक्ष्यच दूर करण्याचा चंग बांधला.

भर पावसांत पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत जात त्याने गावाजवळच्या डोंगरावरून वहात येणार्‍या पाण्याची दिशा, ओघाचा वेग यांचे मोजमाप केले. ज्याच्या आधारे बांध घालण्याची जागा निश्चित केली. काही समविचारी लोकांना बरोबर घेऊन तिथे कच्चे धरणही बांधले. पण कच्ची धरणे फार काळ टिकाव धरत नाहीत हे ध्यानात आल्यावर सरकार-दरबारी आणि अन्य मदत करू इच्छिणार्‍यांकडे चिकाटीने पाठपुरावा करत भक्कम असे काँक्रीटचे धरण बांधण्यास भाग पाडले. बेड़ोजवळ 'गायघाट' इथे हे धरण अजूनही उभे आहे.

या पहिल्या धरणाच्या वेळी आलेल्या अनुभवाचा फायदा घेत कोणत्याही बाह्य मदतीखेरीज जवळच देशबाली आणि झारिया या ठिकाणी आणखी दोन धरणे बांधली. या धरणांमुळे भूजलाची पातळी तर वाढली. पण एवढे पुरेसे नाही, पावसाचे पाणीही जमिनीत जिरवावे लागेल हे ध्यानात घेऊन त्यांनी ठिकठिकाणी वृक्षारोपणाचे काम सुरु केले. हे वृक्षारोपण करत असतानाही शासकीय पद्धतीची वांझ झाडे न लावता कवठ, आंबा, जांभूळ, फणस यासारखी फळझाडे लावण्यावर त्यांनी भर दिला, ज्यातून अन्न आणि उत्पन्न दोन्ही मिळू शकत होते. त्याच्या जोडीने जागोजागी छोटी तळी निर्माण केली. या पाण्याचा यथायोग्य वापर करता यावा म्हणून कालवे नि विहीरी खोदल्या.

चारचौघांपेक्षा वेगळे काही करू पाहणार्‍यांच्या वाट्याला येते ती हेटाळणी, उपेक्षा त्यांच्याही वाट्याला आली. पण जेव्हा त्यांच्या प्रयत्नातून बेड़ोमधे पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर झाले आणि त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर त्यांच्या मेहनतीची फळे दिसू लागली तेव्हा अनेक लोक त्यांच्या मदतीला धावले. हळूहळू हे काम एका चळवळीत रुपांतरित झाले.

हरिहरपूर, जामटोली, खाकसीटोली, बैटोली आणि भासनंद या पाच ठिकाणी सिमोन यांच्या प्रयत्नातून तळी खोदण्यात आली. पावसाचे वाहून जाणारे पाणी आता लोकांनी आपल्याच श्रमाने अडवले आणि वापरले. बेड़ोची पडीक जमीन खर्‍या अर्थाने सुजलाम् सुफलाम् झाली. तिथे अनेकदा वर्षातून दोन पिके घेता येतील इतके पाणी उपलब्ध झाले.

पुढे आजूबाजूच्या सुमारे पन्नास गावांची सिमोन यांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल केली. रब्बी हंगाम बहुधा कोरडा जाणार्‍या झारखंडसारख्या छोट्या राज्याला बेड़ोच्या या हरित पट्ट्याचा मोठाच आधार आहे. हा भाग वर्षाला सुमारे 'वीस हजार मेट्रिक टन' इतका भाजीपाला नि अन्नधान्य झारखंडसह बिहार, उडिशा, बंगाल या शेजारी राज्यांना पुरवतो आहे.

आता हा सिमोन 'झारखंडचा पाणीवाला', 'सिमोनबाबा' या नावाने स्थानिकांमधे ओळखला जातो. आज त्र्याऐंशी वर्षाचा असलेला सिमोन बाबा वर्षाला किमान हजार नवी झाडे लावतो नि ती काळजीपूर्वक वाढवतोही. त्याच्या अनुमतीशिवाय कोणतेही झाड काय त्याची फांदीही तोडण्याचे धाडस कुणी करत नाही. आणि हा आदर, हा धाक त्याने शस्त्राने वा बळाने कमवलेला नाही. त्याने घालून दिलेल्या मार्गाने मिळवून दिलेल्या समृद्धीने, स्थिर आयुष्यामुळे स्थानिकांनी त्याला आपणहून दिला आहे.

शासनाने सिंचनावर हजारो कोटी रुपये खर्च करूनही जे साधले नसते ते एका माणसाच्या प्रेरणेने साध्य झाले आहे. सदैव प्रेषितांच्या प्रतीक्षेत असलेल्या साध्यासुध्या माणसांना तो प्रेषित तुमच्यातच असतो, तुमच्या दोन हातांतून तो व्यक्त होतो हे सिमोन बाबाने दाखवून दिले आहे.

Subhash Palekar

सिमोन यांच्यासोबतच पद्मश्रीसाठी निवड झालेले डॉ. सुभाष पाळेकर हे मराठी नाव वाचूनही मराठी वृत्तपत्रांना याची दखल घ्यावीशी वाटली नाही. एकाच वृत्तपत्रात आलेला लेख हा अधेमधे चवीपुरते पाळेकरांचे नाव वापरत लेखकाने आपल्याभोवतीच आरती ओवाळण्यासाठी लिहिलेला दिसला. याउलट हिंदी माध्यमांनी मात्र त्यांची आवर्जून दखल घेतलेली दिसते.

कोणत्याही मॅनेजमेंटचा मोताद नसलेल्या इंटरनेटवरील इलेक्ट्रॉनिक मीडिया मात्र पाळेकरांबद्दल आणि त्यांच्या शेती तंत्राबद्दल विपुल माहिती देऊ करतो आहे. 'यूट्यूब' (You Tube) वर जाऊन फक्त त्यांच्या नावाने सर्च केले तर इंग्रजी, मराठी, तेलुगू अशा विविध भाषांतून त्यांच्या मुलाखती, त्यांच्या तंत्राची ओळख असलेली प्रेजेंटेशन्स विपुल प्रमाणात सापडतील. लेखाच्या शेवटी काही दुवे दिले आहेत.

त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा डॉ. पाळेकर आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंच्या आमंत्रणावरून तेथील ६००० शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी आंध्रमधील काकीनाड येथे होते. पद्मश्री मिळाल्याबद्दल त्यांचा पहिला सत्कार चंद्राबाबूंच्याच हस्ते झाला होता. देशातील इतर विविध राज्ये पाळेकर यांच्याकडून कृषिविषयक सल्ला घेत असतात. परंतु ते ज्या शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध अशा विदर्भातील आहेत त्या राज्याच्या शासनाला मात्र त्यांची आठवण होत नाही, अशी खंत त्यांनी पद्मश्री स्वीकारताना व्यक्त केली होती. त्यांना 'पद्मश्री' मिळाल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अनुभवाचा वापर करून घेऊ असे म्हटले आहे. 'बोले तैसा चाले...' ही उक्ती त्यांना ठाऊक असावी अशी आशा आहे.

पाळेकरांना, उरांव यांना पद्मश्री मिळाल्याने त्यांच्या कामावर थोडा का होईना प्रकाशझोत पडतो आहे. ध्रुवज्योती घोष नावाच्या बंगालमधील खाजणांवर काम करणार्‍या पर्यावरणतज्ज्ञाला अजून तिची प्रतीक्षा आहे.

(पूर्वप्रकाशित: पुरोगामी जनगर्जना, एप्रिल २०१६)

- oOo -

अधिक माहितीसाठी:
मराठी:झिरो बजेट नैसर्गिक शेती - चिंतन शिबीर
इंग्रजी/हिंदी: Subhas Palekar ZBNF
---

ता.क.:
पाळेकर यांची झीरो बजेट नैसर्गिक शेती ही पर्यावरणपूरक असली, तरी व्यावसायिकदृष्ट्या पुरेसे उत्पन्न देणारी नाही हे शेतकरी संघटनांनी निदर्शनास आणून दिलेले आहे.

वर्षा-दोन वर्षाला मोबाईल बदलून मूल्यवान धातूंचा चुराडा करून अविघटनशील आणि घातक कचरा निर्माण करण्यास हातभार लावणार्‍या, नागरी आयुष्य जगणार्‍या तुम्ही-आम्ही शेतकर्‍यांना, ’फायद्याकडे पाहू नका, पर्यावरणाचा विचार करा.’ असे सांगणे ही दांभिकता आहे असे मला वाटते.


हे वाचले का?

सोमवार, २१ मार्च, २०१६

एवरीबडी लव्ज् रेमंड...

BoardLicker

विषयसंगती ध्यानात घेऊन ही पोस्ट विस्तारासह ’बोर्डचाट्याच्या शोधात’ या शीर्षकाखाली ’वेचित चाललो...’ या ब्लॉगवर हलवली आहे.

- oOo -


हे वाचले का?

शुक्रवार, १८ मार्च, २०१६

ते काहीच म्हणाले नाहीत...

HeDidntSpeak
काल 'ते म्हणाले', 
	आज 'ते काहीच म्हणाले नाहीत'.
त्यांना फारच डिवचलं तेव्हा म्हणाले, 
	'There I spoke, here I remain silent'

त्यांचे आडगल्लीतले उपाध्यक्ष म्हणाले
'याची जीभ कापा, पाच लाख देतो'
...
ते काहीच म्हणाले नाहीत...

त्यांचे लोकनियुक्त खासदार म्हणाले
'याची तंगडी मोडा, अकरा लाख देतो'
...
ते काहीच म्हणाले नाहीत...

यांच्या ’संन्यासी’ नेत्या म्हणाल्या
'त्यांना' पुरे निखंदून काढा
...
ते काहीच म्हणाले नाहीत

त्यांची चिल्लीपिल्ली म्हणाली
'त्या' लोकांना गो़ळ्या घाला
...
ते काहीच म्हणाले नाहीत...

त्यांचा ओसाडवाडीचा नेता म्हणाला
'ते' सगळे देशद्रोही आहेत, ठार मारा
...
ते काहीच म्हणाले नाहीत...

त्यांची वानरसेना म्हणाली
सगळ्या पुरोगाम्यांना फाशी द्या
...
ते काहीच म्हणाले नाहीत...

दुष्काळाने त्रस्त जनता म्हणाली
पाणीपुरवठ्याचे काहीतरी करा
...
ते काहीच म्हणाले नाहीत...

शेतकरी कळवळून म्हणाले
'पाच वर्षे दुष्काळ आहे, कर्ज माफ करा'
...
ते काहीच म्हणाले नाहीत...

सुरकुतलेली भुकेली तोंडे म्हणाली
'डाळीचे भाव परवडत नाहीत हो'
...
ते काहीच म्हणाले नाहीत...

त्यांच्या 'उच्चशिक्षित' सहकारी म्हणाल्या
विरोधकांना चुटकीसरशी संपवीन
...
आणि...
’बोलूकाका’ बोल बोल बोलले.

 - oOo - 

	

हे वाचले का?

गुरुवार, १७ मार्च, २०१६

ते म्हणाले...

YouMustObey
ते म्हणाले,
तुम्ही 'भारतमाता की जय' म्हटलेच पाहिजे
बरेच कुणी बरेच काही खुश झाले
'जय जगत्', कुणी म्हणाले, 'आम्ही म्हणणार नाही.'
नकार देणार्‍यांना त्यांनी निलंबित केले.

ते म्हणाले,
'शिवाजी महाराज की जय' म्हटलेच पाहिजे
बरेच कुणी बरेच काही खुश झाले
'केम?', कुणी म्हटले 'आम्ही म्हणणार नाही'
नकार देणार्‍यांना त्यांनी निलंबित केले.

ते म्हणाले,
तुम्ही 'वंदे मातरम्' म्हटलेच पाहिजे
बरेच कुणी बरेच काही खुश झाले
गोल टोपीवाले म्हणाले, 'आम्ही म्हणणार नाही.'
नकार देणार्‍यांना त्यांनी निलंबित केले.

ते म्हणाले,
तुम्ही तिरंगा उंच फडकवलाच पाहिजे
बरेच कुणी बरेच काही खुश झाले
तळमजल्यावरचे म्हणाले 'आम्हाला शक्य नाही.'
तळमजल्यावरच्यांना त्यांनी 'निलंबित' केले.

ते म्हणाले,
'जय श्रीराम, जय रामराज्य' म्हटलेच पाहिजे
थोडे कुणी बरेच काही खुश झाले
वैतागले कुणी म्हटले, 'ज्जा. म्हणणार नाही.
नकार देणार्‍यांना त्यांनी निलंबित केले.

ते म्हणाले,
तुम्ही 'जय महिषासुर' म्हणताच कामा नये
थोडे कुणी थोडे काही खुश झाले,
एक म्हणाला 'गर्वाने म्हणणार आहे.'
तसे म्हणणार्‍याला त्यांनी निलंबित केले.

ते म्हणाले,
तुम्ही 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणताच कामा नये
बरेच कुणी बरेच काही खुश झाले
असे कुणी, तसे कुणी म्हणून मोकळे झाले
त्यातल्या फक्त 'परक्यां'नाच त्यांनी निलंबित केले.

दरम्यान दोन तहानबळी, काही भूकबळी पडले
उन्हाळ्याच्या सुटीसाठी ते उटी, स्वित्झर्लंडला गेले
हे म्हणा, ते म्हणू नका करता करता अधिवेशन सरले
तीन महिने गेले, पुन्हा नवे अधिवेशन आले.

ते म्हणाले,
आता कसे सगळे रान साफ झाले, करू हवे तसे
काय करू नि कसे करू तेवढेच नव्हते समजले
अरेच्या, आता झाली पंचाईत, काम करणे आले
काय करावे, कसे करावे इथेच गाडे अडले.

बराच खल केला, 'श्रेष्ठीं'चा सल्लाही मागितला
आत बाहेर, संस्थांमधून बरेच चिंतन मंथन झाले
त्या मंथनातून अखेर अमृतमय उपाय काढले
नवे अधिवेशन आले, सारे सज्ज झाले

एका फटक्यात त्यांनी सारी निलंबने रद्द केली आणि
'वंदे मातरम्' म्हटलेच पाहिजे'ची पुन्हा घोषणा केली
सारे पुन्हा सुरू झाले, जुनेच सारे पुन्हा नवे झाले
दरम्यान चार भूकबळी, तहानबळी, कर्जबळी पडले

देशात राष्ट्रप्रेमाचे अमाप पीक काढले
पोटभर खाऊन माणसे, ढोरे तृप्त झाले
एकाच उपायाने देश आबादीआबाद झाला
वेदातील विमाने उडवून अंतराळी पोचला

ओबामा दाती तृण धरून शरण आला
शरीफ तर दारचा दरवान झाला.
दुष्ट चीनचा पाऽर सफाया झाला
पायघड्या घालत पुतीन स्वागताला आला.

राष्ट्राचा डंका सार्‍या विश्वात वाजू लागला
दशलक्षी कोटावर तिरंगा झळकू लागला
पण' देश म्हणजे 'माणूस की भूमी?' हा
अवघड प्रश्न मात्र कायमचा अडगळीत पडला
 
- oOo - 
	

हे वाचले का?