मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

... नाना म्हणाले

  • https://www.standingstills.com/ येथून साभार.
    आमच्यावेळी असं नव्हतं... नाना म्हणाले
    
    नातवाला चौथीत 
    नव्वद टक्केच मिळाले
    ’फार लाडावून ठेवलाय
    आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले
    
    नातवाला पाचवीत 
    अठ्ठ्याण्णव टक्के मिळाले
    ’अभ्यासाच्या अतिरेकात मूल चिणेल
    आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले
    
    शाळेतल्या गॅदरिंगमध्ये
    नातीच्या नाचाचा कार्यक्रम झाला
    ’अभ्यास सोडून नसते धंदे,
    आमच्यावेळी असं नव्हतं...' नाना म्हणाले
    
    नातीला चौथीत
    स्कॉलरशिप मिळाली.
    ’पुस्तकी किडे झालेत सगळे,
    आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले
    
    मागच्या वर्षी पाऊस
    दोन दिवस उशीरा आला...
    ’हल्ली सदा दुष्काळच असतो
    आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले
    
    यावर्षी पाऊस
    दीड दिवस आधी आला
    ’सारे ग्लोबल वॉर्मिंगचे पाप
    आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले
    
    एक वर्षी पूर आला, 
    लोक उध्वस्त झाले
    ’हल्ली नियोजनच नसते
    आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले
    
    एक वर्षी अवर्षण आले, 
    लोक घायकुतीला आले
    ’कृत्रिम पाऊस पाडा की,
    आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले
    
    पीक जळून गेले
    शेतकरी उध्वस्त झाला,
    ’शेतकर्‍याकडे दुर्लक्ष होते आहे
    आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले
    
    पीक महामूर आले, भाव पडले, 
    सरकारने हमी भाव दिला
    ’शेतकरी माजलेत साले,
    आमच्यावेळी असं नव्हतं...’ नाना म्हणाले
    
    वैतागली पुढची पिढी म्हणाली,
    तुम्हीच आता घर चालवा.
    ’सर्वांच्या हितासाठीच मी,
    आमच्यावेळी असंच होतं...’ खुशीत येऊन नाना म्हणाले
    
    ... आणि घरात पुन्हा नानांचे राज्य आले!
    
    - रमताराम
    
    - oOo -

हे वाचले का?

गुरुवार, १० डिसेंबर, २०२०

दोन स्टँप

  • TwoStamps
    कुरियरच्या जमान्यात
    लोक स्टँपला विसरलेत म्हणे.
    
    पूर्वी,
    प्रेमपत्र असो की वसुलीची नोटीस
    स्टँप लावायचा की
    पोस्टखाते निर्लिप्तपणे
    पत्र इच्छितस्थळी पोचवायचे.
    
    म्हणे,
    आता दोन नवे स्टँप आलेत
    यांना पैसेही द्यावे लागत नाहीत
    काहीही खपवायचे असले की
    या दोनपैकी एक चिकटवा
    नि समाज तुम्हाला हवे ते
    निमूटपणे शिरोधार्य मानतो
    
    या दोन स्टँपची छपाई
    थेट केंद्रीय पातळीवर होते
    ज्यांना हवे त्यांना ते फुकट
    मिळतात, अट एकच...
    
    ते न वापरणार्‍यांना
    सतत दूषणे द्यायची
    
    दूषणे देणॆ हे आवडीचे काम
    जनता अतिशय आनंदाने करते
    स्टँप लावलेली
    रिकामी पाकीटे नि पॅकेट्स
    संपत्ती म्हणून मिरवते
    
    आणि स्टँप न लावलेले
    कितीही उपयुक्त असले
    तरी बाणेदारपणे फेकून देते...
    रिकाम्यापोटी
    
    पाठवण्याजोगे काहीच नसलेले लोकही
    रिकामी पाकीटे नि बॉक्सेसना
    भक्तिभावाने हे स्टँप लावून
    परिचितांना पाठवत असतात.
    
    त्यांचा रक्तगट म्हणे दुर्मिळ आहे
    ’अस्मिता’ म्हणतात म्हणे त्याला
    
    आणि ते दोन स्टँप्स
    ’आत्मनिर्भर’ आणि ’राष्ट्रहित’
    या नावाने ओळखले जातात.
    
    -oOo-
    	

हे वाचले का?

शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

वाचाळ तू मैत्रिणी

  • (रमताराम यांच्या संकल्पित ’गीतमारायण’मधी एक गीत.)

    एका अभिनेत्रीला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आणि ती अभिनेत्री अचानक खूप बोलू लागली, सांगू लागली.

    एका चित्रपटदरम्यान झालेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत झालेल्या अफेअरची चर्चा तिने माध्यमांत रंगवली. संतप्त झालेल्या अभिनेत्याने तिच्याशी कोणताही संबंध असल्याचे नाकारले. बर्‍याच धुरळ्यानंतर तो वाद शांत झाला. मग अभिनेत्रीने राजकारणातील व्यक्तिंसह बॉलिवूडमधील अनेक सहकार्‍यांना लक्ष्य केले. बरीच उलथापालथ झाली. त्या अभिनेत्याबाबतच्या वादाचे पडसादही अधूनमधून वर येऊ लागले. अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या पार्टीमध्ये अचानक हे दोघे समोरासमोर आले. तिला पाहताच तो अभिनेता संतापाने थरथरु लागला आणि गाऊ लागला...

    Kangana-Ranaut
    भाष्यचित्रकार: सतीश आचार्य.
    (काव्यप्रभू गदिमा यांची क्षमा मागून)
                       
    झाशीवाली(१) नव्हेस कन्या, नव्हेस अंबामाय 
    उसनवारीची कंठी मिरविसी रुंडमाळ की काय
    प्याद्यासी(२) या म्हणेल राज्ञी, बॉलिवुडी का कुणी?
    वाचाळ तू मैत्रिणी
    
    बदनामीचे अस्त्र उपसले, मुळी न धरलीस चाड
    तुला पाहता लावून घेतो, मम सदनाचे कवाड
    नकोच दर्शन अंशमात्रही, मज हे कैदाशिणी
    वाचाळ तू मैत्रिणी
    
    कशांस पंगा घेतलास तू, पाय आणि खोलात
    उर्मिलेस(३) त्या दूषण देता, कां नच झडले हात?
    कित्येकांसी वैर घेतले, ट्विटरावरती, जनीं
    वाचाळ तू मैत्रिणी
    
    राणी(४) असुनि झालीस प्यादे, घरटे तुटले आज
    पाठीवरचा हात दगा दे, उतरुन गेला माज
    समर्थनासी परी धावले, झुंडीच्यासह कुणी
    वाचाळ तू मैत्रिणी
    
    तुला पाहता प्रदीप्त होते, मम शब्दांची धार
    होईल शोभा पुन्हा म्हणुनि करत नाही मी वार
    उभी न राही पळभर येथें, काळें कर जा झणी
    वाचाळ तू मैत्रिणी
    
    मरुस्थलासम तव बुद्धीचे भान होई वैराण
    कशास भांडुन तंडुन केले जन हे तू हैराण
    ताळतंत्र हे पुरे सोडले, तुवा गतसाजणी
    वाचाळ तू मैत्रिणी
    
    भगिनी(५)सह शब्दांनी केले तूच वार अनेक
    दुखावले जे तव शब्दांनी, दुरावले जे लोक
    कुठल्या वचने तव सुहृदांची करशील समजावणी?
    वाचाळ तू मैत्रिणी
    
    चला राऊता(६), द्या सेनेला(७) एक आपुल्या हाक
    नटीसंगती सुसज्ज असतील ट्विटर-ट्रोल हे लाख
    तव पोस्टींच्या सवे असू दे ’सामना’ची(८) पुरवणी
    वाचाळ तू मैत्रिणी
    
    जमेल तेथे, जमेल तैसी करु काव्य-पैदास
    हाच एकला ध्यास आणखी, हीच एकली आस
    शब्दप्रभूचे काव्य विडंबी, कुंपणावरचा मुनी(९) 
    वाचाळ तू मैत्रिणी
    
    	- काव्यभुभू रमताराम
    
    - oOo -

    १. झाशीच्या राणीवरील चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. २. सत्तेच्या सारीपाटातील प्यादे. ३. उर्मिला मातोंडकर. ४. झाशीच्या राणीची भूमिका. ५. तिने उठवलेल्या वादांमध्ये बहिणीनेही उडी घेतली. ६. संजय राऊत. ७. शिवसेना. ८. शिवसेनेचे मुखपत्र. ९. बाबा रमताराम, म्हणजे खुद्द आम्हीच.


हे वाचले का?

रविवार, १ नोव्हेंबर, २०२०

विडंबन झाले कवितेचे... (ऊर्फ ’विडंबन-वेदना’ )

  • सदर कवितेतील प्रसंग साक्षात घडण्यापूर्वी त्यांनी संकल्प केलेल्या आणि नंतर -साहजिकच- अपुरे सोडून दिलेल्या ’गीतमारायण’ या गीतसंग्रहातील एक गीत.

    MobLynching
    https://www.news18.com/ येथून साभार.
    (काव्यप्रभू गदिमा  यांची क्षमा मागून) 
        
    कळफलकाशी जडले नाते अधीर बोटांचे
    विडंबन झाले कवितेचे
    
    रमतारामे उगा उचलिले गीत राघवाचे
    कर्ण जाहले काव्यप्रभूंच्या तप्त चाहत्यांचे
    उभे ठाकले कविप्रेमी ते, क्रुद्ध शब्द वाचे
    
    विद्ध विडंबक पळू पाहतो, झुंड तयापाठी
    पदांमधि त्या एकवटुनिया निजशक्ती सारी
    दूर जातसे रमत्या, वाढवी अंतर दोघांचे
    
    उंचावुनिया मान जरासा कानोसा घेई
    तडिताघातापरी भयंकर नाद तोच होई
    रंगविले गाल लाल कुणी एके रमत्याचे
    
    अंधारुनिया आले डोळे, कानी ध्वनि वाजे
    मुक्त हासला झुंडनेता, शेफारुन गर्जे
    तृप्त जाहली हिंसा आणिक झुंड धुंद नाचे
    
    हात जोडुनि म्हणे विडंबक झुंडनेत्यासी
    ’भये मोडुनि, अर्पियली मी क्षमा आपणांसी’
    विजयोन्मादे प्रदीप्त डोळे मत्त मग त्याचे
    
    नेत्याज्ञेने उठे हळु तो सावरी स्वत:ला  
    अधिर चाल ती, भयंकपित तो, रुधिराने न्हाला
    शबल वस्त्र ते, तयावरी हो सिंचन रुधिराचे
    
    मस्तिष्काशी चंद्रकोरशी खोक एक लाल
    त्यातच भरला त्याच्या अंगी कंप, होत हाल
    वैद्याघरी ते लेपन झाले शामक-लेपाचे
    
    थकले रमताराम, म्हणावे काय अवस्थेला
    गगनभेदी तो शंख फुंकिते, हर्ष हो झुंडीला
    अर्णबास त्या फुका मिळाले खाद्य बातमीचे 
    
    दुभंग रमताराम, कुठली कविता हो आता
    कानावरती सूर उमटला, तो जाई ना जाता
    कवितेशी त्या तुटले नाते आता रमत्याचे
    							
    विडंबन झाले रमत्याचे, विडंबन झाले रमत्याचे...
    
    - काव्यभुभू रमताराम
    - oOo -
    	

हे वाचले का?

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

द. शेटलँड बेटावर भूकंप...

  • (बातमी: 5.4-magnitude quake hits South Shetland Islands )
    ---

    मोदींच्या भाषणांमुळेच हे झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.

    मोदींनी ‘आम्ही भारतातून हाकललेली काँग्रेसची गेल्या सत्तर वर्षांतील पापे तिकडे जमिनीतून बाहेर येत असल्यामुळे’ भूकंप झाल्याचा प्रतिटोला दिला.

    ‘तेथील एका नागरिकाने मोदींवर टीका केल्यामुळे ईश्वरानेच त्यांना शिक्षा दिली’ असे रविशंकरप्रसाद भक्तिभावाने ट्विट करते झाले.

    आपल्या पक्षाचा एकमेव सदस्य असलेल्या कम्युनिस्टाने ‘समाजवाद्यांनी संघाशी केलेल्या छुप्या युतीचे तिथे गाडलेले पुरावे बाहेर येण्यास यातून मदत होईल’ अशी आशा व्यक्त केली.

    कन्हैयाकुमारने ‘भूकंप से आजादी’ अशी नवी घोषणा दिली.

    TheBlameGame

    पुण्यातील दक्षिण-पूर्व समाजवादी गटाने कलेक्टर कचेरीसमोर पंधरा मिनिटे घोषणा देऊन अंटार्क्टिकामधील अमेरिकन हस्तक्षेपाचा निषेध करत ‘चालते व्हा’ असा आदेश दिला.

    फडणवीसांनी याचा जाब विचारणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहा अशी गळ घालणारे पत्र राज्यपालांना लिहिले.

    प्रवीण दरेकरांनी ही घटना टाळता न येणे हा ठाकरे सरकारचा पराभव असल्याची टीका करत घंटानाद आंदोलन केले.

    राणेंच्या चिरंजीवांनी दैनंदिन पत्रकारपरिषद दीड मिनिटाऐवजी तब्बल पावणेदोन मिनिटांची घेऊन ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा हा पुरावाच असल्याचे जाहीर केले.

    ‘मी स्वत: त्या बेटावर लवकरच जाऊन पाहणी करेन नि शक्य ती सर्व मदत महाराष्ट्र सरकार देईल’ असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

    शरद पवारांच्या शेटलँड बेटाच्या दौर्‍याचे नियोजन सुरु झाले आहे. ‘तिथे पाऊस पडतो की कृत्रिमरित्या पाडावा लागेल’ याची चौकशी हवामानखात्याकडे करण्यात आली. पण त्यांचे सर्व्हर डाऊन असल्याने ‘सोमवारी चौकशी करा’ असा निरोप मिळाला आहे.

    ‘द. शेटलँड बेट हे मूळ भारताचाच भाग होते आणि तिथली मूळ भाषा मराठी होती हे नावावरुनच सिद्ध होते.’ असे ‘हिंदू सारा एक’वाल्या मिशीकाकांनी जाहीर केले.

    ’त्या बेटावरील नागरिक अल्लाहच्या मूळ शिकवणीपासून दूर गेल्यामुळे अल्लाहने त्यांना शिक्षा दिली’ असे मौलवी रमताराम यांनी शुक्रवारच्या नमाजानंतर जाहीर केले.

    ‘द. शेटलँड तो सिर्फ झॉंकी है, मक्का-मदिना बाकी है’ ही घोषणा गायवाडीतील ज्वलज्जहाल हिंदू चिंटू चोरडिया यांनी आपल्या शालेय मित्रांकडून घोटून घ्यायला सुरुवात केली आहे.

    ‘तेथील हिंदूंची संख्या फार कमी झाल्यामुळेच हा प्रसंग ओढवल्याचे’ बजावून सांगत, ‘प्रत्येक हिंदूने आपले एक मूल तिकडे पाठवावे’ असे आवाहन ब्लॉगरपीठाचे शंकराचार्य रमताराम यांनी केले आहे.

    पायघोळ कपडेवाले काही जण तातडीने “प्रभूला शरण जा, तो अशा संकटांपासून तुम्हाला मुक्त करेल” म्हणत प्रभूचे मार्केटिंग करण्यास सरसावले आहेत.

    ट्रम्पकाकांनी ‘अमेरिका फर्स्ट’ ही घोषणा देत शेटलँड बेटांवर लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचे जाहीर केले.

    चीनने ते बेट चीनचा भूभाग असल्याचे जाहीर करुन तिथे अवैधरित्या प्रवेश करू पाहणार्‍या अन्य देशांशी राजनैतिक संबंध तोडण्याची धमकी दिली आहे.

    ते बेट हे क्रायमियाचा भाग होता याचा पुरावा शोधण्यात, नसल्यास निर्माण करण्यात पुतीनकाका गर्क आहेत.

    ‘साला तो पुण्याचा परांजप्या तिकडं राहायला गेल्यामुळे हे घडलंय’ अशी एक परखड प्रतिक्रिया व्हॉट्स-अ‍ॅप ग्रुपमध्ये फिरते आहे.

    फेसबुकवरील विद्रोही ग्रुप्समधून ‘हे ब्राह्मणी व्यवस्थेचे पाप आहे’ अशी गर्जना होऊ लागली आहे.

    ‘पुणे-नागपूर-पुणे’ नावाच्या फेसबुक ग्रुपमध्ये ‘आरक्षणवाले तिकडे पाठवले असतील म्हणून यांना भूकंपप्रवणतेची शक्यता आधी वर्तवता आली नाही. द्या अजून आरक्षण या साल्यांना.’ अशी टिप्पणी झाली आहे.

    ‘भूकंप हे नाव पुल्लिंगी असणे हा पुरुषप्रधान संस्कृतीचा कावा आहे. शंकराचा अपवाद वगळला तर सर्व आक्रमक, विनाशक देवता या स्त्रिया आहेत हे जाणीवपूर्वक दडवले जात आहे.’ असा आरोप बटरफ्लायलॅंड विमेन्स असोसिएशनच्या क्रांतिप्रभादेवी यानी केला आहे.

    यावर पुरोगामी वर्तुळाने आयोजित केलेल्या एका व्याख्यानमालेनंतर झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये ‘हे सारे मध्यमवर्गाचे पाप’ या निष्कर्षावर पुन्हा एकवार शिक्कामोर्तब झाले आहे.

    ‘जिस भूमीपे गौमूत्र का अभिसिंचन नहीं, वह अपवित्र भूमी ऐसे संकटोंने घिरी रहेगीही।’ असं पतंजलीआजोबांनी जाहीर करत गोमूत्राचे टँकर-शिप लवकरच तिकडे रवाना करु असे आश्वासनही दिले आहे.

    ...

    .

    .

    .

    ‘अहो तेथील भूस्तररचना आणि पर्यावरण...’ एवढेच बोलू शकलेल्या भूगर्भशास्त्रज्ञाची हाडेही कुणाला सापडलेली नाहीत.

    - oOo -


हे वाचले का?

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

नाचत ना...


  • नाचत ना भाजपात, आता ।
    राकाँच्या कळपात, नाथा ॥
    
    आणिक होती, चिकी मावशी(१)।
    तावडेंची उलघाल, नाथा ॥ 
    
    खुर्ची उलटली, सत्ता हरपली ।
    काकांच्या फटक्यात, नाना ॥
    
    तो तर वरती, नवबिहारी(२) ।
    सर्व हताश पाहात, नाना ॥
    
    ---
    (१). चिक्की घोटाळ्याचे आरोप असलेली राजकारणी.
    (२). महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हुकल्यानंतर नुकतेच बिहारचे प्रभारीपद स्वीकारावे लागलेला नेता.
    
    गीत: काव्यकार्टुन
    संगीत: आताबास्कर संगीत मंडळी
    गायक: चंद्रकांत छोटीमिशी (कोरस: आयटीसेल)
    नाटक: सं. खुर्चीप्रभाव
    राग: मुन्शिपाल्टी कानडा
    चाल: उद्धवा नेऊ नको नाथास

    ---
    कवितेसोबत जोडलेले भाष्यचित्र प्रसिद्ध भाष्यचित्रकार आलोक यांच्या ट्विटर पोस्टवरून साभार.

हे वाचले का?

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

अब्ज अब्ज जपून ठेव (अर्थात ’मल्ल्याला सल्ला’)

  • FlyingMallya
    https://blogs.navbharattimes.indiatimes.com/ येथून साभार.
    (कविवर्य मंगेश पाडगांवकर यांची क्षमा मागून )
                       
    अब्ज अब्ज जपून ठेव, कोहिनूर हिर्‍यापरी ॥ ध्रु.॥
    
    काय बोलले जन हे, 
    विसरुन तू जा सगळे,
    जमविली जी माया तू, जाण अंती तीच खरी ॥ १ ॥
    
    लाज नको पळताना, 
    खंत नको स्मरताना
    काळ जाता विसरिल रे, जनता ही तुज सहजी ॥ २ ॥
    
    राख लक्ष स्वप्नांची, 
    हतबल त्या गरीबांची,
    तव कृपेने बुडले जे, उडु दे वार्‍यावरी ॥ ३ ॥
    
    -  मजेत पेडगांवकर
    
    - oOo -

    ---
    संबंधित लेखन:

    अशी ही पळवापळवी >>
    अ.सं.सं. मध्ये मल्ल्या >>
    ---


हे वाचले का?

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

मुंबईत वीज गेली...

  • NoElectricityNoDebate
    मुंबईत वीज गेली म्हणून
    फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना
    आणखी एक निषेधाचे पत्र लिहिले
    चंद्रकांत पाटलांनी राज्यपालांची भेट घेतली
    दरेकरांनी गेटवेवर अर्धा तास उपोषण केले
    आणि एका राणेंनी पत्रकार परिषद घेऊन
    आदित्य ठाकरेंना जबाबदार धरले
    
    पंजाबमधील शेतकर्‍यांना पाठिंबा देणारा
    नवा लेख संजय राऊत यांनी लिहिला.
    कंगनाने ट्विट करुन त्यातील
    व्याकरणाच्या चुका जाहीर केल्या
    
    काँग्रेस नि राहुल गांधींनी काय करावे
    यावर कम्युनिस्ट विचारवंताने
    एकशे तेरावा लेख लिहिला
    आणि सायक्लोस्टाईल करुन
    आपल्या मित्रांना पाठवला
    
    माहिती अधिकाराचा वापर करुन
    मोराच्या पिसांची संख्या
    राहुल गांधीनी माहिती करुन घेतली
    कपिल सिब्बल यांनी त्याबाबत
    सोनियांकडे तक्रार केली
    
    आपले तिकिट कापण्यामागे
    मुंबई पोलिसाचे षडयंत्र असल्याचा
    गुप्त अहवाल मिळाल्याचा दावा
    गुप्तेश्वर पांडॆंनी केला आणि
    सीबीआय चौकशीची मागणी केली
    
    आपले कालचे विधान मिसक्वोट केले
    काश्मीरी जनता चीनमध्ये नव्हे
    अफगाणिस्तानमध्ये जाण्यास
    उत्सुक असल्याचा खुलासा
    फारुक अब्दुल्लांनी केला
    
    बलात्कार्‍यांना जामीन मिळाल्याची
    बातमी गायब होऊन तिथे
    'पतंजलीचे अधिकृत शेण खा
    आणि कोरोनाला पळवून लावा'
    म्हणणारी जाहिरातपट्टी
    फिरु लागली.
    
    ...
    
    वीज गेली हे तर बरेच झाले.
    टीव्हीवर हे सारे पाहण्याऐवजी
    डोळॆ फोडून घेण्याचे वाचले
    म्हणून मुंबईकर खूष झाले.
    
    - रमताराम
    
    - oOo -

हे वाचले का?

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

टीव्ही लागले रे, टीव्ही लागले

  • tv-monster
    (कविवर्य शंकर रामाणी यांची क्षमा मागून)
                       
    टीव्ही लागले रे, टीव्ही लागले
    कुणाच्या घरातिल टीव्ही लागले
    रवीची प्रभा मंद अंधूकताना 
    याने लावले रे, त्याने लावले!
    
    दिसा कष्टुनि जे जाहले श्रमी
    जन सारे अखेरीस सैलावले
    इथे कावलो मी, सर्व गलग्यामुळे
    मनी प्रार्थना, वीज घालवाच रे
    
    सुरू बातम्या या कुणाच्या घरी  
    कुणी हास्यजत्रेत हो दंगले
    संत्रस्त मम मनाच्या तळीचे
    शिवीसूक्त हे ओठातुनि ओघळे
    
    - सतत त्रस्तमी (ऊर्फ मंदार काळे)
    
    - oOo - 

    ( मित्रवर्य उत्पल व. बा. यांच्या सहकार्याने...) इथे पत्रकारितेची पडली शवे त्यावरी नफ्याची गगनचुंबी घरे स्क्रीन जयाचा बुद्धी शोषून घेतो त्या इडियटाचे पिसे लागले रे टीव्ही लागले रे...टीव्ही लागले... - oOo -

हे वाचले का?

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

मी कवी होणारच!

  • WriterSmurf
    तो म्हणाला, मी कवी होणारच!
    मग त्याने कवी होण्याचे प्लॅनिंग केले
    
    मार्केट रिसर्च एजन्सीला गाठले,
    काव्य-बाजाराचा कानोसा घेऊन
    खपाऊ विषयांवर अ‍ॅन्युअल रिपोर्ट
    बनवून देण्याचे काँट्रॅक्ट दिले
    
    सर्वात प्रथम सौंदर्यवादाचा
    अंगरखा त्याने लपेटून घेतला
    गारवा, पारवा, मारवाच्या जुड्या
    बांधून जय्यत तयार ठेवल्या
    
    हिरव्या माडांच्या एका बनात
    वळणावळणाच्या लाल वाटेवर
    प्राजक्तापासून सायलीपर्यंत,
    बहाव्यापासून पिंपळापर्यंत
    सारे समोर राहतील अशा
    एका घरात मुक्काम हलवला
    
    सुलभ मराठी व्याकरणाचे
    एक स्वस्त पुस्तक आणले
    मग शब्दांचे मात्रांशी,
    मात्रांचे आकड्यांशी गणित
    ठाकून ठोकून जुळवत
    कविता लिहायला लागला
    
    यथावकाश शंभरेक कविता
    अगदी नेटाने खरडून झाल्या
    फेसबुकवर शे-सव्वाशे
    लाईक जमा करू लागल्या
    
    एका प्रसिद्ध कवींशी केलेली
    सलगी एकदाची फळली, आणि
    कवीने एका काव्यमंचावरुन
    आपली पहिली कविता म्हटली
    
    इतके होताच संग्रहाचे वारे
    कवीच्या मनात वाहू लागले
    प्रकाशकाच्या नि ग्राहकाच्या
    शोधात त्याचे जोडे झिजू लागले
    
    संभाव्य ग्राहक नव-कवींशी
    कवी सलगी करु लागला
    सुमार कवितांना ’प्रतिभे’चे हार
    अगदी नित्यनेमाने चढवू लागला.
    
    चोख दाम घेऊन पुस्तक
    छापणार्‍या एका प्रकाशकाने
    कवीला स्वत:हून संपर्क केला
    कवीला स्वर्ग दोन बोटे उरला
    
    ’येत आहे, येत आहे’ पुस्तकाची
    फेसबुकवर जाहिरात उमटली
    ’वा: वा: किती प्रतिभावंत तू’
    प्रतिसादांची माळ खाली लागली
    
    पुस्तक एकदाचे हाती आले
    आपल्या संग्रहाचा एक ग्राहक
    फिक्स करण्यासाठी ’शेजारी’
    कवींनी हातोहात विकत घेतले.
    
    नवा एम-आर रिपोर्ट आला
    सौंदर्यवादाची सद्दी संपून
    बटबटीत वास्तववादाची
    बोली वाढल्याचा कल आला.
    वृत्तांचा जमाना संपल्याच्या
    खुणाही समीक्षी दिसू लागल्या
    
    सौंदर्यवादाचा सदरा उतरवला
    आणि कवी छंदातून मुक्त झाला
    वास्तववादाच्या जर्द पिंका
    'मुक्तच्छंदातल्या कविता' म्हणून
    हातोहात खपवू लागला,
    ’कित्ती धाडसी लेखन’च्या
    चिठ्या जमा करु लागला.
    
    पुन्हा नव्या संग्रहाचे वारे आता
    कवीच्या मनी वाहू लागले
    ग्राहकांसाठी आपली स्ट्रॅटेजी
    बदलणे त्याला भाग पडले
    
    जमवलेला कवी-ग्राहकांचा गट
    आता त्याला जुनाट वाटू लागला
    ’ओल्ड जेनेरेशनवाले हे’ म्हणत
    कवी आता नव्या कवितेच्या
    भिडूंशी सलगी करु लागला
    
    लवकरच नवा रिपोर्ट येईल
    इथून पुढे जमाना कदाचित
    अनुवादित कवितांचा येईल.
    सुलभ मराठी व्याकरणासोबत
    हिंदी, उर्दू, इंग्रजी व्याकरण
    कवी पुन्हा घोकू लागेल.
    
    पुन्हा ठोकठोक करत करत
    रोखठोक कविता लिहू लागेल
    आणि नव्या ग्राहकांच्या शोधात
    कवितेचा विक्रेता फिरु लागेल.
    
    - रमताराम
    
    - oOo -

हे वाचले का?

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

माजी मुख्यमंत्र्याचे खुर्चीस प्रेमपत्र

  • TheThrone
    https://seenpng.com/ येथून साभार.
    (कविवर्य अनिल यांची क्षमा मागून)
                       
    थकले गं डोळे माझे
    वाट तुझी पाहता
    वाट तुझी पाहता गं
    रात्रंदिन जागता
    
    सुकला गं कंठ माझा
    आरोपां आळविता
    आरोपां आळविता गं
    ध्यान तुझे करिता
    
    सरले गं मित्र माझे
    मजला तू त्यागता
    मजला तू  त्यागता गं
    अन् त्याची* हो जाया
    
    शिणला गं जीव माझा
    तुजविण राहता
    तुजविण राहता गं
    तू नच भेटता
    
    - स्वप्निल (ऊर्फ मंदार काळे)
    
    - oOo -
    * सांगा पाहू तो कोण?

हे वाचले का?

एका एरॅटिक*-नेटग्रस्ताची कैफियत

  • slow-internet
    https://i1.wp.com/amitguptaz.com/ येथून साभार.
    (कविवर्य आरती प्रभू यांची क्षमा मागून) 
                       
    ते येते आणिक जाते
    येताना काही बिट्स आणते
    अन् जाताना टाटा करते
    येणे-जाणे, डालो होणे
    असते असे जे न कधी पुरे होते
    
    येताना कधी मध्ये थांबते
    तर जाताना एरर देते
    न कळे काही उगीच काही
    आकळत मज काही नाही
    कारणावाचून उगीच का हे असे अडते?
    
    येतानाची कसली रीत,
    बाईट्स ऐवजी देई ते बिट
    जाताना कधी हळूच जाई
    येण्यासाठीच फिरुन जाई
    प्रकट होते, विरुन जाते, जे टवळे
    
    - चालूदे प्रभू   (ऊर्फ मंदार काळे)
    
    
    - oOo -

    १. बिट्स (Bits) हे संगणकामध्ये साठवणुकीचे असलेले एकक. २. आभासीविश्वातील ’शॉर्टहॅंड मराठी’मध्ये ’डाऊनलोड’साठी
    वापरला जाणारा शब्द ३. संगणकाच्या साठवणुकीचे एकक. १ बाईट (Byte) = ८ बिट्स (Bits)
    ---

    * हा शब्द एरॅटिक (Erratic) आहे, एरॉटिक (Erotic) नाही. एरर (Error) म्हणजे अद्याप कारण न उमगलेली चूक. त्यापासून एरॅटिक म्हणजे सतत चुका करणारे असा अर्थ आहे. एरॉटिक मनांसाठी हा खुलासा. :)


हे वाचले का?

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

कर्तव्यच्युत पेस्टकंट्रोलयोध्याप्रत...

  • NoThanks
    (कविवर्य वा. रा. कांत यांची  क्षमा मागून)
                       
    झुरळांची माळ पळे, अजुनि मम घरात 
    भेट आपुली स्मरशी काय तू मनात ? 
    
    पेरिता फडताळी तू थेंब त्या द्रवाचे
    कोण्या छिद्रात असे कोण बैसलेले
    हलकट ते झुरळ लपे छान सुशेगात
    
    त्या वेळी, ओट्यावर, आणि तयाखाली
    स्वर्णिमाच* जणू पसरे, भर दिवसा काली
    फिरत असे, टिच्चून ते, माझिया घरात 
    
    हातांसह स्प्रेगनने तुवा लढताना
    हर्बलाचे करडे कळे, मळुनि लावताना
    मिशीधारी झुरळ तुज, खिजविते खलात**
    
    तू गेलास, सोडुनि ती माळ, काय झाले,
    सरपटणे ते तयांचे, अजुनि उरे मागे
    स्मरते ती, पलटण का, कधि तुझ्या मनात?
    
    - चिं. ता. क्रांत (ऊर्फ मंदार काळे)
    
    - oOo -

    * स्वर्णिम अर्थात सोनेरी रंगाचे झुरळ
    ** खल आणि बत्ता जोडीतील


हे वाचले का?

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

जग जागल्यांचे १२ - कम्युनिस्टांच्या देशात व्लादिमिरचा अनोखा लढा

  • ग्रीनहाऊस माफियांचा कर्दनकाळ: गाय पीअर्स << मागील भाग
    ---

    'Let us defend our laws from being encroached upon by the authorities' - Vladimir Bukovskii.

    साठच्या दशकाच्या सुरुवातीस मॉस्को विद्यापीठात ’कॉस्मोनॉल’ या कम्युनिस्ट पक्षाच्या युवा शाखेवर टीका करणारे टिपण प्रसिद्ध झाले. त्यात ही नैतिक आणि आध्यात्मिक दिशा हरवलेली, मरु घातलेली संघटना असल्याचे म्हटले होते. या संघटनेमध्ये पुन्हा चैतन्य प्रदान करायचे असेल तर त्यात लोकशाही रुजवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केलेले होते. हे टिपण सोव्हिएत गुप्तहेर संघटना केजीबीच्या दप्तरी दाखल झाले. या टिपणाच्या लेखकाची, एकोणीस वर्षीय ’व्लादिमिर ब्युकोव्स्की’ याची कसून चौकशी करुन त्याला विद्यापीठातून निलंबित करण्यात आले.

    Bukowskii

    बाह्यशिक्षण घेत असताना प्रसिद्ध रशियन गणितज्ञ अलेक्सांद्र येस्निन-वोल्पिनशी त्याचा परिचय झाला. त्यांच्या विचारांचा त्याच्यावर मोठा प्रभाव पडला. रक्तरंजित क्रांती वगैरे आकर्षक कल्पनांचे भूत त्याच्या शिरावरुन उतरले आणि कायदेशीर चौकटीतच व्यवस्थेला आव्हान देण्याचा मार्ग त्याने स्वीकारला. १९६३ साली युगोस्लाव्ह विचारवंत मिलोवान जिलास याचे कम्युनिझमची परखड चिकित्सा करणारे प्रसिद्ध पुस्तक ’द न्यू क्लास’ची प्रत बाळगल्याबद्दल व्लादिमिरला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान झालेल्या वैद्यकीय चाचणीमध्ये त्याला ’बुद्धिभ्रंशा’चा रुग्ण ठरवून त्याची रवानगी मानसोपचार केंद्रात करण्यात आली. आरोपी मनोरुग्ण असल्याने त्याला बचावाचा अधिकार नाकारत त्याच्या अनुपस्थितीत खटला चालवून त्याला दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.

    स्टालिनच्या काळात राजकीय कार्यकर्त्यांवर झालेल्या अत्याचारांमुळे सोव्हिएत युनियनची बरीच बदनामी झाली होती. त्यामुळे ब्रेझनेव्ह यांच्या काळात अप्रत्यक्ष मार्ग अनुसरण्यास सुरुवात झाली. राजकीय कैद्यांवरील आरोपांसाठी न्यायालयीन प्रक्रिया चालवणे वेळा व्यवस्थेला अडचणीचे ठरे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्यांची भूमिका मांडण्याची संधी त्यांना मिळत असल्याने, ही भूमिका सर्वसामान्यांपर्यंत सहज पोचत असे. यामुळे त्यांना मानसिक दृष्ट्या अक्षम ठरवण्याचा मार्ग सोव्हिएत व्यवस्था अवलंबत होती. कारण असा रुग्ण पुरेसा सक्षम होईतो न्यायालयीन प्रक्रिया चालू करण्यात अर्थ नाही असे तिथली न्यायव्यवस्था मानत असे. त्याचा फायदा घेऊन असे राजकीय कैदी हवा तितका काळ डांबून ठेवले जात. सोव्हिएत मानसोपचारतज्ञ आंद्रे स्नेझ्नेवस्की याने यासाठी एक काटेकोर व्यवस्थाच निर्माण केली होती.

    या व्यवस्थेमध्ये अनेक राजकीय कैद्यांना बुद्धिभ्रंशाचे, अति-नकारात्मक विचाराचे, सामाजिक जीवनास अक्षम ठरवले जाई. हे रुग्ण असल्याने तुरुंगाऐवजी ’विशेष मानसोपचार केंद्रां’मध्ये ठेवले जाऊ लागले. आता हे कैदी नसल्याने त्यांना त्यासंदर्भात व्यवस्थेने दिलेले अधिकारही संपुष्टात येत असत. मनोरुग्ण असल्याने सर्वसामान्यांसाठी धोकादायक आहेत असे जाहीर करुन त्यांना कुणालाही भेटण्याची मनाई होती. मानसोपचार केंद्राचे संचालक, आरोग्याधिकारी हे केजीबीच्या मुठीत असल्याने या रुग्णांची संपूर्ण मुस्कटदाबी करणॆ व्यवस्थेला शक्य होत असे. त्यांना खरोखरीच्या मनोरुग्णांसोबत- विशेषत: त्यातील हिंसक रुग्णांसोबत, ठेवले जात असते. यातून त्यांचे मनोबल खच्ची करुन त्यांचा बुद्धिभेद करण्याचा किंवा त्यांना खरोखरच मानसिकदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जाई. व्लादिमिरला या व्यवस्थेचा पहिला अनुभव त्याच्या या दोन वर्षांच्या शिक्षेदरम्यानच आला आणि त्याने तिला चव्हाट्यावर आणण्याचे ठरवले.

    ToBuildACastle

    या व्यवस्थेला विरोध करण्याबरोबरच तिच्याशी सामना करण्याचे उपाय शोधणेही आवश्यक असल्याचे व्लादिमिरच्या ध्यानात आले. मानसिक छळाचा सामना मानसिक बळानेच करता येईल हे त्याने ओळखले. त्यादृष्टीने त्याने आणि सिम्योन ग्लझमन या ’रुग्णा’ने मिळून राजकीय कैद्यांसाठी मानसिक आरोग्याचे धडे देणारी माहिती-पुस्तिकाच तयार केली. त्यातील तंत्रांच्या आधारे त्याने पुढील तुरुंगवासांच्या काळात या मानसिक हल्ल्यांना समर्थपणे तोंड दिले. काही वर्षांनी या पुस्तिकेवर आधारित ’To Build A Castle' या शीर्षकाचे एक पुस्तकच त्याने प्रसिद्ध केले.

    तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली आंद्रे सिन्यावस्की आणि युली डॅनियल या लेखकांना झालेल्या अटकेच्या विरोधात मास्कोच्या पुश्किन चौकात निदर्शने आयोजित करण्यात आली. या दरम्यान वोल्पिन यांनी लिहिलेले ’सामाजिक आवाहन’ प्रसिद्ध करण्यात आले. यात सरकारला सोव्हिएत कायद्याला अनुसरुन न्यायव्यवस्थेमार्फत आणि माध्यमांच्या नजरेसमोर या लेखकांवरील खटला चालवण्याची मागणी करण्यात आली. ५ डिसेंबर १९६७ रोजी झालेली ही निदर्शने ’न्यायिक सुधारणांच्या’ दिशेने टाकलेले पहिले पाऊल ठरले. याला ’ग्लासनोस्त’ मेळावा म्हणून ओळखले जाऊ लागले. ही निदर्शने बेकायदेशीर असल्याचे जाहीर करुन त्याला अटक करण्यात आली.

    तुरुंगात असतानाच जमा केलेल्या माहितीच्या आधारे केलेल्या सुमारे १५० पानांचे एक संकलन त्याने गुप्तपणॆ देशाबाहेर पाठवले. त्यासोबत पाश्चात्त्य मानसोपचारतज्ञांच्या नावे एक पत्रही जोडले होते. त्यात या कागदपत्रांमध्ये असलेल्या सहा सहा राजकीय कैद्यांच्या केसेसबाबत त्यांचे मत जाहीर करण्याची विनंती केली होती. सुमारे चाळीस तज्ज्ञांच्या समितीने याची पडताळणी करुन त्यातील तिघे मानसिकदृष्ट्या संपूर्ण सक्षम असून उरलेल्या तिघांनाही तात्कालिक तणावांपलिकडे गंभीर आजार नसल्याचा निर्वाळा दिला. याच सुमारास ब्रिटिश पत्रकार विल्यम कोल याने व्लादिमिर याची या विषयावर एक मुलाखत घेतली. पुढे ती अमेरिकेमधील CBS चॅनेलवरुन प्रसारित करण्यात आली. ही कागदपत्रे आणि निष्कर्ष फ्रेंच मानवाधिकार समितीतर्फे जाहीर करण्यात आले. व्लादिमिरचे पत्रही लंडनचे प्रसिद्ध वृत्तपत्र ’द टाईम्स’ आणि ब्रिटिश मानसोपचार तज्ञांच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले. या सार्‍याचा सुगावा लागताच २९ मार्च १९७१ रोजी व्लादिमिरला तिसर्‍यांना अटक करण्यात आली.

    या अटकेनंतर सर्व सोव्हिएत माध्यमांनी व्लादिमिरविरोधात कांगावा सुरु केला. ’प्रावदा’ या सरकारी वृत्तपत्राने तो गुंड प्रवृत्तीचा, कारस्थानी आणि सोव्हिएत-द्रोही असल्याचे जाहीर केले. पण अन्य राजकीय कैद्यांप्रमाणॆ सैबेरिया अथवा तत्सम छळछावण्यांमध्ये सहजपणॆ ’विरुन’ जावा इतका व्लादिमिर सामान्य कैदी नव्हता. पाश्चात्त्य माध्यमे आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी व्लादिमिरच्या सुटकेची मागणी लावून धरली होती. सुमारे पाच वर्षे सोव्हिएत सरकारने त्याला दाद दिली नाही. अखेर १९७६ मध्ये चिलीच्या कम्युनिस्ट पक्षाचा नेता लुईस कोर्वालेन याच्या सुटकेच्या बदल्यात व्लादिमिरची सुटका करण्यास सोव्हिएत सरकारने मान्यता दिली.

    त्यानंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या व्लादिमिरने मानवाधिकारासाठीचा आपला लढा चालूच ठेवला होता. केवळ कम्युनिस्ट रशियाच नव्हे तर पाश्चात्यांच्या धोरणांबद्दलही तो आवाज उठवत राहिला. युरपियन युनियनच्या संकल्पनेमधील शोषणाच्या शक्यतांवरही त्याने विस्ताराने लिहिले आहे. ’सोव्हिएत रशियाच्या पतनाने प्रश्न सुटत नाही, ती व्यवस्थाच बदलण्याची गरज आहे. अन्यथा केजीबीच्या आशीर्वादाने एकाधिकारशाहीच सत्तारुढ होईल’ अशी भीती त्याने १९९४ साली व्यक्त केली होती’. व्लादिमिर पुतीन या केजीबीच्या माजी अधिकार्‍यानेच ती वास्तवात उतरवलेली आपण पाहिली.

    -oOo-

    (पूर्वप्रसिद्धी: दैनिक दिव्य मराठी, ६ सप्टेंबर २०२०)


हे वाचले का?

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

सामूहिक नेतृत्वाची पिपाणी आणि त्रात्याचा शंख

  • नोटाबंदीसह अनेक निर्णयांचे फटके खाऊनही भारतीय जनतेने मोदींना पुन्हा भरघोस मतांनी का निवडून दिले याचे कोडे भारतीय बुद्धिजीवींना अजूनही उलगडलेले नाही. याचे कारण ’काय योग्य नि काय अयोग्य’ या मूल्यमापनातून, विचारांच्या व्यूहातून बाहेर येऊन, निकषांआधारे विचार करण्याऐवजी, जमिनीवरच्या वास्तवाची - भले ते त्यांच्या दृष्टीने तर्कसंगत नसेल त्याची - दखल घेऊन, त्याआधारे भारतीय राजकारणाचा विचार करत नाहीत ही त्यांची समस्या आहे.

    OnlyNarendra

    कोरोनाच्या साथीमुळे जगण्याची सारी उलथापालथ होऊनही जनतेचा मोदींवरील विश्वास अद्यापही कमी झालेला नाही, असे अहवाल अलिकडेच प्रसिद्ध झाले आहेत. भाट माध्यमांचे म्हणून भले ते खोडून टाकता येतील, पण आसपास कानोसा घेतला तर या पडत्या काळाचा ज्यांना फटका बसला आहे, ते ही यातून बाहेर पडण्यासाठी मोदींकडे आशेने पाहात आहेत असे दिसून येते. संकटकाळी माणसाची श्रद्धा कमी होण्याऐवजी अनेकदा वाढते असा अनुभव असतो. आकाशातल्या बापाबद्दल हे जसे खरे आहे तसेच राजकीय, सामाजिक नेतृत्वाबाबतही.

    सर्वसामान्यांना चेहरा समजतो. श्रद्धेपासून राजकारण, समाजकारण, शिक्षण सर्वच क्षेत्रात त्यांना त्राता हवा असतो. काय योग्य नि काय अयोग्य हे चोख सांगणारा, शक्य झाल्यास त्यातले योग्य ते स्वत: करण्याची जबाबदारी घेणारा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करणार्‍या नेत्याच्या शोधात जनता असते. आणि जेव्हा सक्षम पर्याय दिसत नाही, तेव्हा निरुपायाने म्हणा की बुद्धी कुंठित झाल्याने म्हणा, माणूस पुन्हा जुन्या देवालाच शरण जातो. त्यामुळे रोजगाराची वानवा, गुंडगिरीचा बोलबाला असूनही बंगालची गादी ज्योतिबाबूंनी दोन दशकांहून अधिक काळ भोगली, आणिबाणीतल्या दमनशाहीला माफ करुन जनतेने इंदिरा गांधींना पुन्हा भरभरुन यश दिले आणि भारतातील सर्वाधिक गरीब राज्य असलेल्या ओदिशामध्ये नवीन पटनाईक वीस वर्षे राज्य करत आहेत.

    परंतु अपवादात्मक परिस्थितीत अशा संकटकाळाचा फायदा उठवून या नेत्याची, त्रात्याची गढी उध्वस्तही केली जाऊ शकते. त्यासाठी एक सर्वंकष आणि बळकट विरोधाचा झंझावात उभा करावा लागतो. पण इतके पुरेसे नसते. इतिहासात डोकावून पाहिले तर एका चेहर्‍याला पर्याय म्हणून पुन्हा एका चेहर्‍यालाच उभे करावे लागते असे दिसून येते.

    भारतात स्वातंत्र्यापासून राजकीय सत्तेची मिरासदारी मिरवणार्‍या काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी झालेला पहिला सर्वंकष प्रयोग हा जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. त्यांचा झंझावातच काँग्रेसविरोधी वातावरण निर्माण करण्यातला मुख्य स्रोत होता. पुढे संघाने/भाजपने राममंदिराच्या मुद्द्याआड सुरु केलेल्या जनमतप्रवाह-बदलाच्या कार्यक्रमात रथयात्रा निघाली तेव्हा तिचा चेहरा अडवानींचा होता. दहा वर्षे सत्ता राबवलेल्या आणि तरीही सर्वसामान्यांना आपला वाटेल असा एक नेमका चेहरा निर्माण न करु शकलेल्या काँग्रेसला सत्तेतून खेचण्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनालाही अण्णा हजारेंचा चेहरा मुखवटा म्हणून धारण करावा लागला. अलिकडचे उदाहरण म्हणजे आंध्रप्रदेशात अजेय मानल्या गेलेल्या चंद्राबाबूंसमोर आक्रमपणे उभ्या राहिलेल्या जगनमोहन रेड्डींना नेत्रदिपक म्हणता येईल असे यश मिळाले.

    भारताबाहेरही पाहिले तर भारतावर दीर्घकाळ सत्ता गाजवलेल्या ब्रिटनमध्येही राजेशाहीचा अवशेष अजूनही राखून ठेवला आहे तो ’राजा हा देवाचा प्रतिनिधी असतो’ या जुन्या अधिष्ठानाचे ’संसद ही राणीची प्रतिनिधी असते' असे नवे रूप समोर ठेवण्यासाठीच. नावापुरता का होईना, पण राणीचा तो चेहरा लोकशाहीचा जप करणार्‍या ब्रिटिशांना अजूनही आवश्यक वाटतो. लोकशाहीचा डिंडिम जिथे सतत वाजत असतो त्या अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनामध्येही अध्यक्षीय पद्धत आहे. म्हणजे संपूर्ण देश प्रथम एक चेहरा निवडतो आणि तो चेहरा मग आपले सहकारी निवडतो. हे सहकारी जनतेमधून निवडून आलेले असले पाहिजेत असे बंधन नसते.

    भारताचा दीर्घकाळ सहकारी असलेल्या (सोविएत) रशियाकडेही पाहता येईल. ग्लासनोस्त आणि पेरेस्रोईकाचा गोर्बाचेव्ह-येल्त्सिन काळ हा ’कम्युनिस्टांचा बालेकिल्ला ढासळला’ म्हणून अन्य लोकशाही जगाच्या दृष्टीने रशियाचा ’सुधारणा-काळ’ मानला गेला असला, तरी खुद्द रशियाच्या दृष्टीने राजकीय अस्थिरतेचाच काळ होता. त्या काळात निर्माण झालेली राजकीय घुसळण अखेर पुन्हा एकवार पुतीन यांच्यासारख्या बाहुबलीच्या हाती सत्ता सोपवूनच शांत झाली.

    सोविएत युनिअनच्या अस्तानंतर ’आता रशियाची महासत्ता म्हणून कुवत उरणार नाही.’ अशी भविष्यवाणी उच्चारणार्‍या बुद्धिजीवींना त्याच रशियाने युक्रेनच्या तोंडून क्रायमियाचा घास हिसकावून घेत शांतपणे आंचवलेला पाहण्याची वेळ आली. रशियातच आणखी मागे जायचे झाले तर ’सर्वहारांची सत्ता’ म्हणवणत कम्युनिस्टांनीही लेनिन आणि स्टालिन यांची निरंकुश सत्ताच देऊ केली होती. कम्युनिस्ट क्यूबामध्ये कास्त्रो निरंकुश सत्ताधारी होता, तर पूर्वाश्रमीच्या कम्युनिस्ट युगोस्लावियामध्ये मार्शल टिटो.

    हे योग्य की अयोग्य याचा तार्किक उहापोह बुद्धिजीवींनी करायचा तितका करावा. पण त्यांच्या दुर्दैवाने एका मुख्य चेहर्‍याभोवतीच सत्ता फिरत असते हे वास्तव नाकारता येत नाही. त्याअर्थी मनुष्याच्या प्राणिप्रेरणा अजून पुसल्या गेलेल्या नाहीत हेच खरे. कळपाचा एक नेता असतो, एका विशिष्ट भागात एखाद्या अल्फा नराची एकहाती सत्ता असते, तसेच माणसातही आहे.

    जिथे वास्तवात तसा चेहरा सापडत नाही तिथे भूतकाळातले वीर आणून मिरवले जातात. तो ही उपाय पुरेसा नसला तर अनेकदा खर्‍या खोट्या प्रचाराच्या आधारे निर्माण केले जातात. ते ही पुरेसे झाले नाही, तर धार्मिक, पौराणिक ग्रंथातल्या काल्पनिक त्रात्याची आरास मांडली जाते. अशा नेता-केंद्रित सत्तेच्या अधिपत्याखाली लोक खरेच निश्चिंत होतात की चिडीचूप हा वादाचा मुद्दा आहे. पण निदान एका कुठल्या व्यवस्थेनुसार, निदान एका दिशेने गाडं चालू लागतं हे नाकारता येत नाही. त्यात मिळणार्‍या यशाची टक्केवारी ही त्या नेत्याच्या स्वत:च्या आणि त्याने निवडलेल्या सोबत्यांच्या कुवतीवर अवलंबून राहते.

    केंद्रात मोदींसमोर उभा करण्यासाठी विरोधकांना चेहरा नाही हे वास्तव आहे. त्यातल्या सर्वात मोठ्या, भाजपविरोधातील एकमेव राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसलाही नाही. ’राहुल गांधी हे मोदींना टक्कर देण्याइतके सक्षम आहेत?’ या वाक्यातले अखेरचे प्रश्नचिन्ह अद्याप कायम आहे. या प्रश्नावर चॅनेल्सच्या चर्चा अनेक शतके चालतील. पण त्यांना बाजूला सारायचे तर कोणता नवा नेता पुढे आणणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. ’काँग्रेस पक्षातील अन्य कोणता नेता देशव्यापी प्रभाव राखून आहे?’ या प्रश्नाला आजतरी उत्तर नाही.

    काँग्रेसचे नेते बव्हंशी स्थानिक राजकारण करणारे आहेत. त्यामुळे एकाचा उदय इतर राज्यांतील नेत्यांना न रुचणारा असणार आहे. शिवाय केंद्रातील सत्तेच्या मृगजळापेक्षा, यशाची अधिक शक्यता असलेल्या राज्यातील सत्तेच्या वर्तुळात राहण्याचा त्यांचा कल आहे. इतके पुरेसे नाही म्हणून की काय, प्रत्येक राज्यात अद्याप एका नेत्याचा असा प्रभाव नाही.

    महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये एक सोडून तीन-तीन माजी मुख्यमंत्री नांदत आहेत. आणखी एका मुख्यमंत्र्याची पुढची पिढी बाह्या सरसावून सज्ज आहे. अशा वेळी परस्पर रस्सीखेच चालू असताना, यातला कुणीही एक इतरांपेक्षा मोठा होणे अवघड असते. तिथे त्यांच्यापलिकडे आणखी पाचवा नेता या चौघांच्या एकत्रित बळापुढे उभाही राहणे शक्य नाही, आणि हायकमांडने उभा करावा इतके त्यांचे बळ उरलेले नाही.

    मोदींच्या बळकट पंजामध्ये विसावलेल्या भाजपला ही समस्या नाही. मोदी सांगतील तो नेता असणार हे त्यांच्या सैनिकांनी निमूट मान्य केले आहे. असे असून, २०१९च्या निवडणुका आणि नंतरच्या सत्तेच्या खेळात चुका करूनही फडणवीस यांचा चेहरा मोदींनी बदललेला नाही हे इथे नमूद केले पाहिजे. एवढेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणून आपली ओळख राहावी याची काळजी ते स्वत: आणि त्यांना धार्जिणी माध्यमे कटाक्षाने घेताना दिसतात.

    महाराष्ट्रात सारे माजी काँग्रेसी मुख्यमंत्री आपापल्या मतदारसंघ, फारतर जिल्ह्याच्या बाहेर फारसे सक्रीय नाहीत. त्यांना संपूर्ण महाराष्ट्राचे नेते म्हणून कुणी ओळखत नाही. विरोधी पक्षात असताना अथवा आज राज्यात सत्तेची भागीदारी असतानाही यांची उपस्थिती कुठेही जाणवत नाही. निवडणुकीच्या तोंडावर ’दोन तुजला दोन मजला’ करत तिकिटांच्या वाटपाचा खेळ खेळायचा इतपतच यांची कुवत शिल्लक राहिलेली दिसते. एरवी सत्तेत नसताना अथवा असतानाही धडाडीने कुठे धावलेले दिसलेले नाहीत.

    केंद्रातील हायकमांड अधिक बलवान होती, तेव्हाही विधानसभेच्या एका कालावधीमध्ये किमान दोन मुख्यमंत्री देणार्‍या काँग्रेसची आजची स्थिती अन्य राज्यांतही तितकीच वाईट आहे. सध्या मागच्या पिढीचे राज्यातील स्थानिक क्षत्रप त्या-त्या राज्यातील राजकारण हाती ठेवून आहेत. गेहलोत, कमलनाथ, कॅ. अमरिंदरसिंग, भूपिंदर हुडा यांच्या राजकीय दबावाला सोनिया आणि राहुल गांधी झुगारुन देऊ शकले नाहीत, राज्यात आवश्यक तेव्हा नव्या पिढीला पुढे आणू शकले नाहीत. कारण कालबाह्य राजकारण करणार्‍या या जुन्या मुखंडांना बाजूला सारून नव्या दमाचे नेतृत्व पुढे आणावे एवढा त्यांचा वचक उरलेला नाही.

    एकुणात काँग्रेसींना गांधी घराणे हे केवळ आपला मुखवटा म्हणून किंवा विविध राज्यांतील स्थानिक काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे मध्यस्थ म्हणूनच हवे आहे. त्यांनी सत्तेतला वाटा मागू नये असा काँग्रेसच्या जुन्या पिढीचा आग्रह दिसतो. सोनिया गांधींचा राजकारणात उदय होत असताना, ’त्या पंतप्रधान झाल्या तर मागच्या ’इच्छुकां’ची पंचाईत होईल’ हे ध्यानात आल्यावर त्यांच्या परदेशी असण्याचा मुद्दा भरपूर गाजवला गेला. त्यात भाजपसारखे विरोधक तर होतेच, पण त्यांना काँग्रेसी बड्या इच्छुकांची छुपी सदिच्छाही सोबत होती.

    त्या मुद्द्यावर तेव्हा काँग्रेसशी फारकत घेणार्‍या शरद पवारांना त्यांच्याच नेतृत्वाखालील काँग्रेससोबत पुढे दहा वर्षे सत्ता वाटून घेताना तो मुद्दा आड आला नाही. कारण आता सोनिया गांधी पंतप्रधान नव्हे तर केवळ काँग्रेसचा ’चेहरा’, त्या पक्षाचे सुकाणू म्हणूनच काम करत होत्या. (आणि एव्हाना पवारांना स्वबळाचा पुरेसा अंदाजही येऊन चुकला होता.)

    RahulAlone

    काँग्रेसींना आज तीच अपेक्षा राहुल गांधींकडून आहे. ते एकांड्या शिलेदारासारखे भाजपविरोधात उभे असले, तरी त्यांच्या पक्षातील मागच्या पिढीला कानाआडून येऊन तिखट होऊ शकणारा हा नेता नको आहे. त्यांनी सभा घ्यावात, भाजपकडून होणारी चौफेर टीका झेलावी, त्यांना प्रत्युत्तरे द्यावीत, आरोप सहन करावेत आणि हे सारे करुन सोनियांप्रमाणेच पंतप्रधानपद मात्र अन्य कुणाकडे द्यावे, नि स्वत: केवळ अध्यक्ष म्हणून राहावे असे संकेत हे ज्येष्ठ देताना दिसत आहेत. आपापल्या राज्यात काँग्रेस बळकट व्हावी म्हणून राहुल गांधींनी जबाबदारी घ्यावी नि त्या स्थानिक सत्तेचा मलिदा पुन्हा एकवार आपल्या हाती ठेवावा अशी त्यांची अपेक्षा आहे.

    केंद्रात पक्ष सत्तेवर येतो का, बळकट होतो का याची तितकी फिकीर त्यांना नाही. किंबहुना केंद्र बळकट झाले की आपली गादी गुंडाळून सद्दी संपवण्याची ताकद केंद्रीय नेत्यांना येईल याची भीतीच त्यांना अधिक आहे. म्हणून राहुल गांधी हे ’गांधी’च राहावेत, काँग्रेसचे प्रमुख नेते होऊ नयेत असा त्यांचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे दहा तोंडांनी भाजपकडून काँग्रेसवर नि राहुल गांधींवर होणार्‍या टीकेला प्रत्युत्तर देण्याची तसदी यांच्यापैकी कुणीही घेताना दिसत नाही. उलट या मार्गे त्यांची राजकीय उंची फार वाढणार नाही याची परस्पर सोय होत असल्याने ते आपापल्या गढ्यांमध्ये उलट निश्चिंत आहेत.

    आणि याच कारणाने अनेक ज्येष्ठांनी लिहिलेल्या पत्रांत पुन्हा एकवार ’सामूहिक नेतृत्वा’ची पिपाणी वाजवण्यात आली आहे. थोडक्यात राहुल गांधींनी सेनापती होऊन युद्ध करावे. त्यातून सत्ता हाती आलीच तर त्यांनी दूर व्हावे नि मग आम्ही ’अनुभवी’ लोकांचे मंडळ निर्णयप्रक्रिया ताब्यात घेईल असा याचा अर्थ आहे. काँग्रेसच्या राजकारणाचे स्वरुप आता केवळ दरबारी, गढीवरचे उरले आहे याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.

    सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये नेतृत्वाचे दोन पर्याय संभवतात. पहिला म्हणजे ज्येष्ठांनी मागणी केल्याप्रमाणे सामूहिक नेतृत्वाचा. लेखनाच्या सुरुवातीला विशद केल्याप्रमाणॆ नेत्याला नेत्याचाच पर्याय उभा राहू शकतो, तोच लोकांना समजतो हे ध्यानात घेतले आणि काँग्रेसी नेत्यांच्या परस्पर सहकार्याचा आणि सहमतीच्या इतिहासाचा विचार केला तर हा पर्याय फारसा फलदायी होईल याची शक्यता फार कमी आहे.

    दुसरा पर्याय म्हणजे एका चेहरा समोर ठेवून त्याच्या पाठीशी सर्व पक्ष भक्कमपणे उभा करण्याचा. ऐतिहासिक दृष्टीने यात यशाची शक्यता अधिक असली, तरी योग्य चेहर्‍याची उपलब्धता, त्याची निवड आणि तो पर्याय असल्याबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यास आवश्यक असलेले पाठबळ हे कळीचे मुद्दे आहे.

    सद्यस्थितीत गांधी घराणे नको म्हटले तर देशव्यापी पक्षाला सक्षम असा अन्य नेता कुठला या प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर द्यावे लागणार आहे. सध्या चर्चेचे गुर्‍हाळ ’नेता कोण?’ यापेक्षा ’अध्यक्ष कोण?’ या दुय्यम प्रश्नाभोवती फिरते आहे. आणि यात मनमोहन सिंग, मुकुल वासनिक यांच्यासह ए. के. अ‍ॅंटनी यांची नावे आहेत. पैकी मनमोहन सिंग याच्या राजकीय अपरिपक्वतेमुळे नेतृत्वहीन झालेल्या काँग्रेसची सत्ता मोदी-भाजपने हिसकावली हे वास्तव ध्यानात घेता ते पुन्हा एकवार तात्पुरते, जागा भरण्यापुरते अध्यक्ष राहणार आहेत.

    थोडक्यात अध्यक्षाचे नाव बदलले तरी सत्तेचे वर्तुळ तेच राहणार हे उघड आहे. अ‍ॅंटनींना अध्यक्ष करणे हे हिंदी भाषक पट्ट्यातील भाजपच्या बळकट सत्तेला उपकारकच ठरणार आहे. त्यांचा चेहरा केवळ केरळपुरता उपयुक्त आहे, एरवी त्यांचे केंद्रातील स्थान गांधी घराण्याचीच कृपा आहे.

    केंद्रातील सत्ता गमावून साडेसहा वर्षे झाली. जेमतेम दहा जागा वाढण्यापलिकडे २०१९मध्ये फारशी प्रगती झालेली नाही. दुसरीकडे मोदी-भाजपने आपली सत्ता अधिक बळकटच केली आहे. ज्या राज्यांमधून काँग्रेसला सत्ता मिळाली तिथे ती टिकवणे अवघड झाले आहे. काही ठिकाणी तोंडाशी आलेला सत्तेचा मागे राहूनही भाजपने लीलया हिरावून नेला आहे. तेव्हा आता ’अध्यक्ष कोण?’ या मर्यादित प्रश्नापलिकडे जाऊन ’नेता कोण?’ या मुख्य प्रश्नाला भिडण्याची गरज आहे. ’चाळीस गेले चार राहिले’च्या स्थितीतले ज्येष्ठ आणि राज्यापुरते स्वार्थ केंद्रित केलेल्या काँग्रेसी नेत्यांना याचे भान येण्याची गरज आहे.

    अशा वेळी ज्यांच्या बाजूने आणि विरोधात असे दोन तट पडलेले दिसत आहेत, त्या राहुल गांधींसमोर काय पर्याय आहेत हेही पाहावे लागेल. सत्ताबाह्य असल्याचा अपवाद वगळला तर आजची त्यांची स्थिती आणि इंदिरा गांधी यांची सत्तरीच्या दशकाच्या सुरुवातीला असलेली स्थिती बरीचशी सारखी आहे. दोघांचाही संघर्ष मुख्यत: पक्षातील ज्येष्ठांशी आहे. इंदिरा गांधींनी स्वतंत्र चूल मांडून नव्या पिढीला नवा तंबू देऊ केला. मूळ काँग्रेसमध्ये राहिलेल्या आणि नेहरु-गांधी घराण्याला अजूनही मुख्य आधार मानणार्‍या काही दुबळ्या मनाच्या नेत्यांच्या आधारे हळूहळू मूळ काँग्रेसला क्षीण करत नेऊन जुन्यांची सद्दी त्यांनी संपुष्टात आणली.

    आज ते धाडस राहुल गांधी दाखवतील का असा प्रश्न आहे. त्यांना ते जमेल का हा प्रश्न त्या पुढचा. किंवा सध्याच्या काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारुन ते अंतर्गत विरोधकांना प्रसंगी गमावण्याचा, त्यातून काँग्रेस दुबळी होण्याचा धोका पत्करुन नेस्तनाबूद करु शकतील. त्यानंतर ते भाजपला टक्कर देऊ शकतील की नाही हे त्यांच्या कुवतीवर अवलंबून राहील. पण निदान वर बसलेल्या ज्येष्ठांनी ज्यांची राजकीय प्रगतीची वाट बंद केली आहे, असे राजकीयदृष्ट्या तरुण नेते त्यांच्यासोबत जातील आणि कदाचित नवी फळी उभी राहील.

    उलट दिशेने पाहिले यातून वाईटात वाईट इतकेच घडेल की जेमतेम पन्नास खासदार असलेली काँग्रेस आणखी खाली घसरेल. त्यांचे नेतृत्व प्रभावहीन ठरून कायमस्वरुपी संपून जाईल. पिढ्यांच्या रस्सीखेचीची सध्याची स्थिती पाहता ही शक्यता आजही आहेच. त्यामुळे गुंतवणुकीच्या भाषेत हा ’हाय-रिस्क हाय-रिटर्न गेम’ खेळण्याचे धाडस ते दाखवतात, की पुन्हा अंतर्गत रस्सीखेचीचेच राजकारण करत काँग्रेस रडत-खुरडत चालत राहील, याचा निर्णय पुन्हा राहुल गांधींनाच घ्यावा लागणार आहे.

    सामूहिक नेतृत्वाची पिपाणी बलवान नेत्याच्या शंखनादापुढे निष्प्रभ ठरते याला इतिहास साक्षी आहे. राहुल गांधींबरोबरच काँग्रेसच्या गढीवर लोडाला टेकून बसलेल्या ज्येष्ठांनाही हे ध्यानात ठेवण्याची गरज आहे.

    -oOo-

    पूर्वप्रसिद्धी: अक्षरनामा’ २६ ऑगस्ट २०२०.


हे वाचले का?

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

जग जागल्यांचे ११ - ग्रीनहाऊस माफियांचा कर्दनकाळ: गाय पीअर्स

  • पर्यावरणाचा पहारेकरी: विल्यम सँजुअर << मागील भाग
    ---

    मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये भडकलेल्या वणव्याने प्रचंड वनसंपत्ती, लक्षावधी वन्यजीवांचा संहार केला. मानवी संपत्तीलाही उध्वस्त करत हा वणवा तब्बल तीन महिने धुमसत होता. त्याहीपूर्वी अमेझॉनच्या जंगलात दहा महिने थैमान घातलेल्या वणव्याने नऊ हजार स्क्वेअर कि.मी. चे क्षेत्र जाळून भस्म केले होते. ब्राझीलच्या अध्यक्षाने हा वणवा आटोक्यात आणण्यात हेळसांड तर केलीच, पण अन्य देशांची मदत नाकारुन एक प्रकारे हा वणवा पसरण्यास मदतही केली. याची झळ बोलिव्हिया, पेरु, पॅराग्वे या देशांतही पसरली. त्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा प्रतिसाद अधिक नेमका होता... याचे कारण त्यांनी अनुभवलेला हा पहिलाच वणवा नव्हता.

    एकोणीसाव्या शतकापासून अशा व्यापक वणव्यांचा सामना त्यांना करावा लागलेला आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात यांची वारंवारता वेगाने वाढली. १९७५ मधील वणव्यांनी जवळजवळ १५% वनसंपत्ती स्वाहा केली. १९८३, २००९ मध्ये या वणव्यांनी प्रत्येकी जवळजवळ दोन हजार घरे उध्वस्त केली नि सव्वाशेहून अधिक बळी घेतले होते. अधिक तपमान आणि कमी आर्द्रता असलेले पर्यावरण वणव्यांना अनुकूल ठरते. विसाव्या शतकात ऑस्ट्रेलियाचे सरासरी तपमान एक डिग्रीने वाढले आहे. तपमानवाढीचा वेग शतकाच्या उत्तरार्धात दुप्पट झालेला आहे. पावसाचे प्रमाण १०-२०% घटले आणि दुष्काळांची तीव्रता वाढली आहे. एका बाजूने थोड्या काळात अतिवृष्टी, पण एकुण प्रमाण घटत अवर्षण, अशी स्थिती दिसून येऊ लागली.

    GuyPearse

    त्यातून जागतिक तपमान वाढ, त्याचे कारण असलेला ’हरितगृह स्थिती’ (Greenhouse effect) यांना गंभीरपणे घेणारा आणि त्यासाठी ठोस उपाय करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिलाच देश ठरला. १९९८ साली ’ऑस्ट्रेलियन ग्रीनहाऊस ऑफिस’ स्थापन करुन त्या मार्फत मुख्यत: ग्रीनहाऊस इफेक्ट आणि एकुणच पर्यावरण रक्षणाबाबत ठोस धोरण आणि धोरणात्मक चौकट तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले. गाय पीअर्स या पर्यावरण-तज्ज्ञाची या कार्यालयाचा प्रमुख सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली.

    पीअर्स हा अमेरिकेतील प्रथितयश हार्वर्ड विद्यापीठातून राजकीय धोरण विषयातून पदवीधर होता. त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन उपाध्यक्ष आणि पर्यावतरणतज्ज्ञ अल् गोर यांच्यासोबत त्याने काही काळ काम केले होते. पुढे त्याने मायदेशी परतून आपले काम पुढे सुरु ठेवले होते. आपल्या पीएच.डी. साठी त्याने ’(तत्कालीन) हॉवर्ड सरकारच्या पर्यावरणविषयक धोरणांवर कार्बन लॉबीचा परिणाम.’ असा विषय निवडला.

    बहुतेक देशांत उद्योगांच्या हितासाठी काम करणारे व्यावसायिक ’प्रचारक’ (लॉबिस्ट) सरकारदरबारी कार्यरत असतात. अनेक भल्याबुर्‍या मार्गांचा वापर करुन सरकारी धोरणे आपल्या मालक मंडळींना सोयीची करुन घेण्याचा तेप्रयत्न करत असतात. ग्रीनहाऊस इफेक्टचा मुख्य गुन्हेगार असलेला कर्बवायू (कार्बन डाय ऑक्साईड) मोठ्या प्रमाणावर उत्सर्जित करणारे उद्योगांसाठी कार्यरत असणार्‍या या मंडळींना ’कार्बन लॉबी’ असे संबोधले जाते. या दरम्यान स्वत: पीअर्सनेही काही उद्योगांसाठी हे काम केले.

    स्वानुभव आणि आपल्या पीएच.डी.च्या अभ्यासादरम्यान त्याने अशा अनेक प्रचारक मंडळींच्या मुलाखती घेतल्या. त्यातून मिळालेली माहिती आणि स्वानुभव या आधारे त्याने आपला अभ्यास पुरा केला. यातून त्याला दिसलेले चित्र धक्कादायक होते. कार्बन उत्सर्जितांवर नियंत्रण ठेवण्यासाठी धोरणे आखली जात होती. पण ती ज्यांच्यावर बंधने घालण्यासाठी लिहिली जात होती त्याच उद्योगांचे त्यावर संपूर्ण नियंत्रण होते. त्यातील काही जणांनी तर धोरण मसुद्यातील काही भाग आपणच लिहिले असल्याचे फुशारकीने पीअर्सला सांगितले. पर्यावरण नियंत्रणाचे नियम पर्यावरण-शत्रूंच्याच हाती होते. यातीलच एकाने स्वत: आणि त्याच्यासारख्या इतरांना ’ग्रीनहाऊस माफिया’ असे संबोधले होते. त्यातील कोडगेपणा, निर्ढावलेपण पीअर्सला बोचू लागले. आणि त्याने हे उघड करण्याचा निर्णय घेतला.

    २००६ मध्ये एबीसी चॅनेलवरील ’फोर कॉर्नर्स’ या साप्ताहिक कार्यक्रमासाठी जेनिन कोहन हिने त्याच्या पीएच.डी.च्या अभ्यासविषयावर पीअर्सची मुलाखत घेतली. यात मुलाखती दरम्यान पीअर्सने सरकारच्या ग्रीनहाऊस संबंधी धोरणांवर कोळसा, वाहने, तेल आणि अ‍ॅल्युमिनिअम उत्पादकांच संयुक्त लॉबी नियंत्रण ठेवते हे त्याने विशद केले. नव्वदीच्या दशकात जगात सर्वाधिक कार्बन प्रदूषण करणारा देश असलेल्या ऑस्ट्रेलियामध्ये त्यावर नियंत्रण आणण्याचे सारे प्रयत्न हे उद्योजक, त्यांचे प्रचारक कशाप्रकारे हाणून पाडत होते याचा लेखाजोखा त्याने उघड केला. हे सारे ’ऑस्ट्रेलियन इंडस्ट्री ग्रीनहाऊस नेटवर्क’ या जाळ्यामार्फत अतिशय सूत्रबद्धपणे हे उद्योग करतात हे त्याने निदर्शनास आणून दिले.

    HighAndDry

    हा एपिसोड प्रदर्शित झाल्यावर राजकीय आणि उद्योग क्षेत्रात भूकंप झाला. उद्योगांनी अर्थातच हे अतिरंजित असल्याचा कांगावा केला. परंतु त्यांच्या दुर्दैवाने ऑस्ट्रेलिया इन्स्टिट्यूट या धोरणविषयक अभ्यासकेंद्राचा डिरेक्टर असलेल्या क्लाईव हॅमिल्टन याने पीअर्सच्या माहितीला दुजोराच दिला असे नव्हे तर त्यात स्वत: भरही घातली. यातून ह्यू मॉर्गन, रॉन नॅप यांच्यासारखे उद्योगपती, अ‍ॅलन ऑस्क्ली यांच्यासारखे सनदी अधिकारी, बॅरी जोन्स यांच्यासारखे तेल-उत्पादक आणि काही राजकारण्यांसह खुद्द अध्यक्ष जॉन हॉवर्ड यांची नावे घेतली जाऊ लागली. हे बारा लोक पुढे ’डर्टी डझन’ म्हणून कुख्यात झाले.

    या मुद्द्यांबाब्त पुढे त्याने ’हाय अँड ड्राय’ या पुस्तकात अधिक विस्ताराने लिहिले. ज्याच्या उपशीर्षक ’सेलिंग ऑस्ट्रेलियाज् फ्युचर’ असे देण्यात आले होते. या मुलाखतीनंतर आणि पुस्तकानंतर पीअर्स सरकारच्या आणि उद्योगांच्या दृष्टीने खलनायक ठरला आणि त्या क्षेत्रातून त्याची हकालपट्टी झाली. ’रेडिओ अ‍ॅडलेड’ने घेतलेल्या मुलाखतीत त्याने सुरुवातीलाच आपल्या कार्यक्षेत्राला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    यानंतर त्याने पर्यावरण-धोरणविषयक अभ्यासाला वाहून घेतले आहे. पहिल्या पुस्तकानंतर त्याने ’क्वारी व्हिजन: कोल क्लायमेट चेंज अ‍ॅंड द एन्ड ऑफ रिसोर्सेस बूम’ या शीर्षकाचा एक दीर्घलेख प्रकाशित केला. यानंतर तिथे कोळसा उत्पादनांअर अनेक बंधने आली. (भारतातून तिथे गेलेल्या अदानींना उग्र निदर्शनांनंतर तेथील कोळसा उत्पादनाचा आपला प्लॅन गुंडाळावा लागला.) त्यानंतर त्याने "ग्रीनवॉश" (व्हाईटवॉशशी साधर्म्य सांगणारे शीर्षक), बिग कोल आणि ’द ग्रीनवॉश इफेक्ट’ या पुस्तकांमार्फत उद्योजकांच्या पर्यावरणशत्रू धोरणांचे वाभाडे काढणे सुरुच ठेवले आहे.

    अतिवृष्टी आणि दुष्काळ हातात घालून येताना भारतानेही गेल्या चार-पाच वर्षांत अनुभवले आहे. तरी अजूनही पर्यावरणद्रोही विकासाच्या पट्ट्या डोळ्यावर बांधून बसलेले राजकारणी आणि त्यांचे भाट अजूनही त्याबाबत फारसे गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत. तूर्त देवळे, पुतळे आणि ऐतिहासिक स्थळे या ’सुफला १५-१५-१५’ प्रकारच्या संमिश्र खतावर जनमताचे पीक जोमाने वाढते आहे. ’ऑस्ट्रेलियाच्या भविष्याची विक्री’ म्हणणार्‍या पीअर्ससारखा कुणी या देशात दिसत नाही. असला तरी स्वार्थी आणि गरजू अशा दोन टोकांच्या समुदायांच्या युतीपुढे तो कितपत टिकावर धरेल याची शंकाच आहे.

    -oOo-

    (पूर्वप्रसिद्धी: दैनिक दिव्य मराठी, ९ ऑगस्ट २०२०)

    पुढील भाग >> कम्युनिस्टांच्या देशात व्लादिमिरचा अनोखा लढा


हे वाचले का?

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

बुद्धिबळातील मार्शल-आर्ट


हे वाचले का?

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

त्याला खुर्ची आवडते

  • TheThrone
    https://seenpng.com/ येथून साभार.
    (कवी सौमित्र यांची क्षमा मागून)
                       
    ह्याला खुर्ची आवडते, त्याला खुर्ची आवडते
    आघाडीत विसंवाद झाला की मन म्हणते,
    ’आधीच खुर्ची माझ्यापासून फार दूर नाही,
    सत्तेचं ह्याचं गणित खरंच मला कळत नाही.’
    
    खुर्ची म्हणजे ऊब सारी, खुर्ची म्हणजे परिमळ
    खुर्चीविना राहायचे म्हणजे व्हायची नुसती परवड
    म्हणे- खुर्ची नियत खराब करते, खुर्ची जबाबदारी
    पण खुर्चीसोबत मिळते ना चोख जहागिरदारी
    
    खुर्ची करी आपली कामे, खुर्ची म्हणजे सर्व सुखात 
    गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं केंद्रात.
    दरमहा संधी येते, दरमहा असं होतं
    खुर्चीवरुन निसटून पडून लोकांमध्ये हसं होतं
    
    हा आवडत नसला तरी खुर्ची त्याला आवडते
    ह्याने लवकर सोडावी म्हणून तो ही झगडतो
    रूसून मग तो निघून जातो, टीका करतो पत्रांत
    ह्याचं त्याचं भांडण असं कोरोनामयी दिवसात.
    
    ... मंदार काळे
    
    - oOo -

हे वाचले का?

गुरुवार, १६ जुलै, २०२०

शनिवार, ११ जुलै, २०२०

कला, कलाकार आणि माध्यमे


हे वाचले का?

गुरुवार, ९ जुलै, २०२०

खुनी सुरा

  • ( प्रेरणा: कुसुमाग्रजांची `खुनशी सुरे’ ही कविता )

    BloodyDagger
    भरचौकात एका सुर्‍याने
    एका माणसाची हत्या केली
    पोलिसाच्या हाताने मग
    त्या सुर्‍याला अटक केली.
    
    सुरा धरणारा हात म्हणे,
    ’खून करणारा सुराच,
    त्याच्यावर माझे काहीच
    नियंत्रण राहिले नाही*.’
    
    कलम धरलेल्या हाताने
    सुरा धरलेल्या हाताचा
    युक्तिवाद मान्य करत
    त्याला निर्दोष मुक्त केला.
    
    दशकांनंतर निकाल आला
    सुरा संपूर्ण दोषी ठरला
    ’मरेपर्यंत वितळवण्याची
    शिक्षा हवी’ जमाव गर्जला.
    
    ’असे समाजविघातक सुरे
    अशांतीचे दूत असतात.’
    म्हणत कलमवाल्या हाताने
    त्यावर शिक्का उमटवला.
    
    सुर्‍याच्या शिक्षेसाठी मग
    सुरा बनवणारा हात आला
    ’नव्यांसाठी हा कच्चा माल’
    म्हणून जुना घेऊन गेला
    
    समारंभपूर्वक त्याने मग
    सुरा भट्टीत झोकून दिला
    ’शांतिदूत हा’ बघ्यांनी-
    त्यावर पुष्पवर्षाव केला
    
    वितळल्या सुर्‍यांमधून
    अनेक नवे तयार केले.
    सुरा धरणार्‍या हातांनी,
    मोल मोजून घरी नेले.
    
    त्या सुर्‍याचे रक्त आता
    नव्यांमधून वाहात आहे
    सुरा धरणारे हात मात्र
    त्यामुळे निश्चिंत आहेत.
    
    - रमताराम
    
    - oOo -

    * भारतात अतिशय गाजलेल्या खटल्यातील एका डरपोक आरोपी नेत्याचा युक्तिवाद.


हे वाचले का?

रविवार, ५ जुलै, २०२०

जग जागल्यांचे १० - पर्यावरणाचा पहारेकरी: विल्यम सँजुअर

  • मोर्देशाय वानुनू: एक चिरंतन संघर्ष << मागील भाग
    ---

    १९७४ सालच्या मे महिन्यात इलिनॉय राज्यात तीन गायी अचानक मृतावस्थेत आढळून आल्या. पोस्टमॉर्टेममध्ये त्यांचा मृत्यू सायनाइडच्या विषबाधेने झाल्याचे स्पष्ट झाले. सायनाइड हे नैसर्गिक वातावरणात आढळून येणारे रसायन नव्हे. तपासाअंती असे दिसून आले की तेथील जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर सायनाइड, कॅडमिअम, शिसे, निकेल, जस्त वगैरे घातक द्र्व्ये मुरलेली आहेत. यांचा उगम होता जवळच असलेल्या ’बायरन सॅल्वेज यार्ड’मध्ये.

    ’बायरन सॅल्वेज यार्ड’ ही कचरा-डेपो (landfill) म्हणजे जमिनीवर कचरा जिरवण्याची जागा होती. बहुतेक उत्पादनप्रक्रियांदरम्यान निसर्गाला नि मानवालाही घातक अशी टाकाऊ द्रव्ये वा कचरा तयार होतो. अशा अनेक उद्योगांची उत्सर्जिते जिरवण्याची सेवा ही कंपनी पुरवीत होती. त्यांच्या ग्राहकांमध्ये तेलशुद्धिकरण कंपन्या, रंगनिर्मात्या कंपन्या, धातूच्या वस्तू बनवणारे कारखाने होते. या उत्पादकांचा कचरा योग्य त्या प्रक्रियेशिवाय जमिनीत गाडला जात होता. त्यातून अनेक घातक द्रव्ये आसपासच्या जमिनीत झिरपली होती.

    WilliamSanjour

    या विल्हेवाटीचे काही निसर्गसंरक्षक नियम शासनातर्फे बनवलेले असतात. या नियमांची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी अमेरिकेत Environmental Protection Agency (EPA) ही संस्था काम करते. इलिनॉयमधील घटनेचा तपास करण्याचे काम विल्यम सँजुअर या तिच्या अधिकार्‍याकडे होते. औद्योगिक कचरा विल्हेवाट करणार्‍या अशा सुमारे ६०० कचरा-डेपोंबाबत धोक्याचे इशारे देणारे अहवाल सँजुअरच्या पुढाकाराने पुढच्या दोन-तीन वर्षांत तयार झाले. या अहवालांकडे खुद्द EPAने जरी दुर्लक्ष केले असले, तरी यातून निर्माण होणार्‍या भयानक परिस्थितीची जाणीव झालेल्या अनेक शास्त्रज्ञ, पर्यावरण-तज्ज्ञ आणि सँजुअरसारखे EPAचे अधिकारी यांनी शासनावर दबाव वाढवला. यातून १९७५ साली शासनाने ’Resource Conservation and Recovery Act (RCRA)’ कायदा पास केला. सँजुअरच्या कार्यकाळातले हे पहिले महत्वाचे यश होते.

    सँजुअर काम करत असलेली EPA ही शासकीय संस्था आहे. तिचा उद्देशच पर्यावरणाच्या संरक्षणाचा आहे, जो साहजिकच औद्योगिक उत्पादकांच्या हिताच्या विरोधात जातो. कारण पर्यावरणविषयक बंधने उत्पादकांच्या दृष्टीने अनुत्पादक खर्चाला भाग पाडत असतात. हे उद्योजकच राजकारण्यांचे घोषित/अघोषित आर्थिक पाठीराखे असल्याने, त्यांच्या सोयीचे नियम आणि कायदे संसदेत आणि EPA सारख्या नियंत्रक संस्थांमध्ये केले जातील यासाठी ते ही उद्योगांना साहाय्य करत असतात. उद्योजकांच्या सोयीचे नियम, पळवाटा आणि संशोधन या संस्था, आणि उद्योजकांचे भाडोत्री संशोधक तयार करुन देताना दिसतात.

    १९७८ मध्ये अमेरिकेत महागाईचा भडका उडाला आणि देश आर्थिक मंदीच्या वाटे चालू लागला होता. याला आळा घालण्यासाठी उद्योगांना चालना देणे आवश्यक ठरले. उद्योगांनी अर्थातच पहिली मागणी केली पर्यावरणविषयक निर्बंध शिथिल करण्याची. अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या आशीर्वादाने EPAचे असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटर टॉम योर्लिंग यांनी घातक कचरा विल्हेवाटीबद्दलचे निर्बंध शिथिल करण्याचे आदेश दिले. या सल्ल्याला न जुमानता आव्हान देण्याचे सँजुअरने ठरवले. याबाबत अमेरिकन सेनेटने नेमलेल्या चौकशी समितीसमोर १९७९ मध्ये त्याची साक्ष झाली. त्यात त्याने टॉम यॉर्लिंगने RCRA कायद्यातील तरतुदी दुबळ्या करण्याबाबत दिलेल्या सूचनांबाबत सेनेटला माहिती दिली. यात पेट्रोलियम आणि ऊर्जा कंपन्यांच्या सदोष कचरा व्यवस्थापनाबाबत कारवाई न करण्याचा निर्णयही समाविष्ट होता.

    तब्बल पाच वर्ष उशीराने १९८२मध्ये EPAने एक तोळामासा प्रकृती असलेला ’घनकचरा नियंत्रण अधिनियम’ प्रसिद्ध केला. उद्योगस्नेही, अतिउत्साही माध्यमांनी ताबडतोब त्याची भलामण सुरु केली. परंतु त्यासंदर्भातील सँजुअरच्या अमेरिकन सेनेटसमोरील साक्षीने या प्रचारातील हवा काढून घेतली. सँजुअरच्या साक्षीदरम्यान त्याने सुचवलेल्या अनेक सुधारणा अंतर्भूत केलेला ’घातक घनकचरा अधिनियम’ पुढे दोन वर्षांनी अमेरिकन संसदेने पास केला.

    यापुढेही घनकचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी मिळालेल्या पैसा घेऊन उद्योगांनी त्यांच्या केवळ जागा बदलणे, अशा कचर्‍यामुळे नजीकच्या गावा-शहरांमधील दूषित पाण्याच्या प्रश्न, सांडपाण्याचा खत म्हणून वापर करण्यातले धोके, RCRAच्या अंमलबजावणीबाबत केलेली टाळाटाळ, पर्यावरणीय निर्बंध शिथिल करण्याचे वा त्यात सूट देण्याचे राज्य पातळीवर प्रयत्न, अशा अनेक समस्यांबाबत सँजुअर आवाज उठवत राहिला. पर्यावरणविषयक मुद्द्यांबाबत जागृती करण्यासाठी विविध व्यासपीठांवरुन प्रयत्न केले.

    EPA-building

    असा चळवळ्या कर्मचारी EPAला ’नाकापेक्षा मोती जड’ वाटू लागला नसता तरच नवल. त्यातून त्याच्यावर बंधने घालण्याचा प्रयत्न सुरु झाला. संस्थेशी संबंधित विषयांबाबत बाहेरील व्यासपीठांवरुन बोलण्यास त्याला बंदी घालण्यात आली. या बंधनांमुळे अमेरिकन घटनेच्या पहिल्या परिशिष्टाच्या अंतर्गत देऊ केलेल्या अभिव्यक्ती-स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होत असल्याचा दावा त्याने दाखल केला. ’सँजुअर विरुद्ध EPA’ हा अमेरिकेच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा खटला मानला जातो. हा खटला सँजुअर याने जिंकला. या विजयाने कर्मचार्‍याला आपल्या मालक संस्था/उद्योगांतील गैरप्रकारांविरोधात आवाज उठवण्याचा हक्क अधोरेखित झाला. गैरकृत्ये, चुका या गुप्ततेच्या नियमांवर बोट ठेवून झाकता येणार नाहीत हे स्पष्ट झाले. पुढे अशाच स्वरुपाच्या अनेक खटल्यांमधे या खटल्याचा संदर्भ वारंवार घेतला गेला.

    २००१ मध्ये सँजुअर निवृत्त झाला आणि EPA तसंच उद्योगांतील पर्यावरण-घातक प्रकारांविरोधात आवाज उठवण्याचे नि त्यांच्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम करण्यास तो मोकळा झाला. आपल्या अनुभवांवर आणि संघर्षांवर आधारित ’Why EPA Is Like It Is and What Can be Done About It' हा दीर्घ मेमो आणि ’From The Files Of A Whistleblower: Or how EPA was captured by the industry it regulated.’ हे पुस्तक लिहिले आहे.

    अमेरिकेसारख्या विकसित देशांपेक्षाही विकसनशील देशांत पर्यावरणाच्या र्‍हासाचा वेग अधिक असतो. कारण तिथे त्या विकासाची गरजही अधिक असते. आपल्या देशात अलिकडच्या काही वर्षांत उद्योगांच्या सोयीसाठी अभयारण्यातील उद्योगांवरील बंधने, समुद्रालगत खारफुटीच्या जंगलांवरील निर्बंध शिथिल करणे वगैरे पर्यावरण-घातक निर्णय विकासाच्या नावाखाली घेतले गेले आहेत. सध्या अवजड उद्योग मंत्रालय आणि पर्यावरण मंत्रालय एकाच व्यक्तीकडे आहे; ते कशासाठी हे वेगळे सांगायची गरज नाही!

    पर्यावरणाचे होणारे नुकसान आणि त्याचे होणारे घातक परिणाम यांचे परिणाम काही पिढ्या पुढे दिसणार असतात. त्या पिढ्यांचे आणि निसर्गाचे वकीलपत्र घेऊन आज कुणी उभे राहू शकत नाही. सॅंजुअरसारखा एखादा राहिलाच, तर त्या विकासाचे लाभधारक असलेले सामान्य लोकही त्याला ’विकास-विरोधक’ म्हणून झटकून टाकत असतात.

    - oOo-

    (पूर्वप्रसिद्धी: दैनिक दिव्य मराठी, ५ जुलै २०२०)

            पुढील भाग >> ग्रीनहाऊस माफियांचा कर्दनकाळ: गाय पीअर्स


हे वाचले का?