आमच्या एका जुन्या मित्राने पुण्याच्या 'महात्मा फुले मंडई'बाबतच्या काही आठवणी तीन-चार दिवसांपूर्वी शेअर केल्या होत्या. त्यात त्याने 'मंडई विद्यापीठ' असा शब्द वापरला आणि आमच्याही आठवणी जाग्या झाल्या आणि वढाय वढाय असलेल्या मनाने एकावरुन दुसर्या अशा उड्या घेत वर्तमानापर्यंत आणून पोचवल्या.
माझे शालेय शिक्षण ज्या शाळेत झाले तिला मंडई विद्यापीठ म्हटले जाई. कारण मंडईतील बहुतेक गाळेवाले, मजूर, हळद-कुंकू आदी विकणारे छोटे दुकानदार असे मंडईच्या परिसरातील मंडळींची मुले या शाळेत शिकत. कारण सोपे होते. मंडईपासून चालत वट्ट तीन मिनिटांच्या अंतरावर शाळा. सकाळी पोरगं गाळ्यावर बसलेलं असे. मग बाजार करून बाप साडेदहा-पावणेअकराच्या सुमारास परतून गाळा ताब्यात घेई, पोरगं धोकटी उचलून शाळेत.
त्यामुळे शाळेत अठरा पगड जाती पातींची मुले. कांबळेच्या घरी खेकड्याची आमटी असते ही माहिती खासगीत पुरवून खुसू खुसू हसत त्याची थट्टा करणारा कुणी घाटे असला, तरी कांबळे म्हणजे अमुक आणि घाटे म्हणजे तमुक असा जातींचा हिशोब फारसा होत नसे. वर्गातलं सर्वात दुबळं पोर म्हणून माझी जबाबदारी सार्या वर्गाने घेतली होती.
पुढे कॉलेज आणि विद्यापीठ या ठिकाणीही मित्रांमध्ये 'सजातीय' फार कमी असावेत. असावेत म्हणतो कारण मला आजही मोजकी आडनावे वगळली तर मला जात ओळखता येत नाही, ओळखण्याची गरज पडली नाही. ते का आवश्यक आहे हे 'जात-वास्तव माहित पाहिजे बाबा' या तर्काआड लपलेले, जातीयवादी असणारे पण वरकरणी पुरोगामित्वाचा आव आणणारे हे मला पटवू पाहतात. मी ते कानावर पडू देत नाही.
एक वर्गमित्र बारामतीचा होता. विद्यापीठातील सवलतीतले जेवणदेखील खरेदी करण्याइतकी त्याची आर्थिक परिस्थिती नव्हती. कामा-निमित्त अप-डाउन करणार्या कुण्या स्नेह्यांतर्फे, बारामती-पुणे एसटी च्या एखाद्या ड्रायवरकरवी त्याचा डबा रोज घरुन येई. एखादे दिवशी आला नाही तर आमचा डबा शेअर करण्याची अथवा कॅन्टिनमध्ये सोबत चलण्याची मागणी तो नाकारे. अगदी क्वचित तो सोबत आलाच तरी त्याचे ते अवघडलेपण मला स्पष्ट दिसून येई.
पुढे तो डी.एड./बी.एड. करुन एका खासगी संस्थेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करु लागला. अशा शाळेत नोकरी मिळवण्यासाठी काही काळ बिनपगारी काम करावे लागले असणार ही शक्यता आहेच. त्याने ते मला कधीच सांगितले नाही. आई-वडील, धाकटी बहीण यांची जबाबदारी त्याच्या खांद्यावरच होती. बहिणीचे शिक्षण कसेबसे पुरे केले नि तिचे लग्नही लावून दिले. दुर्दैवाने काही वर्षांतच विधवा होऊन दोन मुले पदरात घेऊन ती परत आली. वडिलांच्या निधनानंतर स्वतःची दोन नि बहिणीची दोन मुले, तो स्वतः आणि पत्नी, बहीण आणि आई अशा आठ जणांच्या संसाराचा गाडा तो एका शाळामास्तरच्या पगारावर ओढतो आहे, चारही मुलांना शिकवून मोठे केले आहे.
कधी कामानिमित्ताने तो पुण्यात येतो तेव्हा आवर्जून भेटतो. त्याच्या स्वभावात कोणताही वैताग, तणावाचा लवलेश नसतो. सहज हसतमुख जगणारा माणूस आहे तो. तो स्वतःबद्दल बोलतो, वर्गातील इतर मित्रांची चौकशी करतो, कुणाच्या भेटी वा फोन झाले ते सांगतो आणि माझी चौकशी करतो. माझ्या माफक यशाबद्दलचा त्याच्या डोळ्यात जसा दिसतो, तसा निरभ्र आनंद माझ्या घरच्यांच्या नजरेतही मी कधी पाहिला नाही असे नक्कीच म्हणू शकतो. स्वतःबद्दल सांगताना तो चुकूनही कधी त्याची नि माझी तुलना करत नाही...
... याउलट आयटी इंडस्ट्रीतच झालेला एक 'सजातीय' मित्र आहे. पुढे जरी त्यांचे आर्थिक गणित बिघडले असले तरी पदवीपर्यंतचा काळ मुंबईच्या मध्यवस्तीत दोन प्रशस्त फ्लॅट्स मालकीचे असलेल्या बापाच्या पोटी जन्मलेला. चांगलाच सुखवस्तू. दोन भावांतील हुशार म्हणून आणि लहानपणी आजारी असल्याने अधिकच झुकते माप दिला गेलेला. पुढे लग्नानंतर सासरची बाजू भक्कम, पत्नी हुशार आणि उत्तम कमावती.
असे असून सतत आपण कमनशिबी आहोत या रडगाण्यातून बाहेर न येणारा, जिथे आहे तिथे कायमच अस्वस्थ असणारा, शून्य चिकाटी असलेला आणि सतत स्वतःची इतरांशी तुलना करत 'पहा मी कसा मागे राहिलो' म्हणत कण्हत बसणारा. चार वेळा सल्ला विचारायला येणारा, दिलेला सल्ला कधीच न मानणारा. आणि नाकारण्याचे कारण हटकून 'तुझं ठीक आहे...' ,'आता तुझंच बघ...' किंवा ’तुझी गोष्ट वेगळी आहे...’ या वाक्याने करणारा. आपले काय या पेक्षा दुसर्याचे काय याची सतत चिंता करणारा इसम.
त्याचे असे असते की तो खूप विचार करतो, किंवा करतो असे त्याला वाटते., मग चार पर्याय घेऊन कसा निवडू विचारायला येतो. आपण त्याला अपेक्षित पर्याय निवडला नाही- अगदी व्यवस्थित कारणमीमांसेसह तो स्वीकारू नये असे सांगितले, तरी त्याच्या तोट्याच्या बाजू पुन्हा पुन्हा सांगणारा किंवा त्याला हव्या त्या पर्यायात याहून अधिक चांगले फायदे कसे आहेत हे सांगत राहणारा... म्हणजे खरे तर त्याने निवडलेल्या पर्यायावर तुमच्याकडून केवळ शिक्कामोर्तब अपेक्षित ठेवणारा. जेणेकरुन पुढे तो निर्णय चुकला असे दिसले तरी त्याच्यासोबत त्याची जबाबदारी तुमच्या पण शिरावर असावी अशी आगाऊ तजवीज करून ठेवणारा.
पुण्याच्या सुखवस्तू वस्तीत हजारेक एक चौरस फुटांचे स्व-मालकीचे घर, उच्चशिक्षित कमावती पत्नी, उच्चशिक्षित सासू-सासर्यांचा आणि आई-वडिलांचा भक्कम आधार असून 'माझं काहीच कसं नीट होत नाही' म्हणत सतत या नोकरीतून त्या नोकरीत उड्या मारणारा. आणि नोकरी बदलण्यात इतका उतावीळ की चार नोकर्या बदलूनही चार पैसेही आर्थिक वाढ मिळवू न शकणारा.
त्याने आमच्या बारामतीच्या मित्राची भेट घ्यायला हवी. पण असे लोक त्याच्या वर्तुळात कसे असतील, त्याच्या वर्तुळात त्याच्यासारखेच एंजिनियर, उच्चवर्णीय, उच्चभ्रू लोक. त्यांचा उत्कर्ष तो पाहणार नि त्याचा आत्मविश्वास पुन्हा दोरी निसटून विहिरीत पडलेल्या पोहोर्यासारखा गडगडत राहणार, हे असंच चालणार. अर्थात आमच्या बारामतीच्या मित्रालाही त्याने 'तुझी गोष्ट वेगळी आहे...' म्हणून काहीतरी ऐकवलं असतं हीच शक्यता अधिक आहे.
या मित्रावरुन आणखी एक चुलत-मित्र आठवला. याच्या संपर्कात जेमतेम एक वर्ष होतो. मी स्वतंत्र राहात होतो तेव्हा आमच्या कॉलनीत राहणारा एक प्राणी आमच्या एका मित्राकडे बुद्धिबळ खेळायला येई. हा हुशार वगैरे अजिबात नव्हता. बुद्धी कमी होती असेही नाही, सर्वसाधारण होती. एक दोन विषयांत गटांगळ्या खाऊन, एक सहामाही जास्ती शिकून ५०-५५% टक्क्याने बी.कॉम. झाला आणि 'नोकरीसाठी फक्त ब्राह्मणांना प्रवेश, कोकणस्थांना प्राधान्य' अशी अलिखित पात्रता असलेल्या बँकेत चिकटला.
असे असूनही 'राखीव जागांनी ब्राह्मणांचं कसं नुकसान केलं.' हा विषय त्याच्या बोलण्यात हटकून येई. दोन-तीनदा झाल्यावर माझ्या अंगभूत उद्धटपणाने 'नसत्या तरी तू काय मोठे तीर मारले असतेस लेका. बँकेने चिकटवून घेतले नसते, तर नोकरी मिळवायला चार वर्षे वणवण हिंडला असतास.' म्हणून फटकावला. माझा फटका कदाचित अनाठायी वैय्यक्तिक असेल (तरुणपणी तेवढी समज असते कुठे?) पण मुद्दा पुन्हा तोच. लायकीपेक्षा अधिक मिळूनही 'मी किंवा माझी जात कशी वंचित' हे रडगाणं...
ही दोनही उदाहरणे सजातीयांची असली तरी ती त्यांची मक्तेदारी आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही. या ना त्या संदर्भात हे playing the victim किंवा जिणे अभावाचे असल्याचे रुदन बहुतेक जातींमध्येच नव्हे तर जवळजवळ प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसून येते. म्हणून तर ’तुम्ही फार सोसलं आहे...’ किंवा ’इतरांसाठी तुम्ही फार करता. पण त्याची कुणाला जाणीव नसते.’ अशा प्रस्तावनेने सुरुवात करुन बहुतेक भंड-भविष्यवेत्ते मनाने अशा कमकुवत मंडळींकडून दक्षिणा उपटण्याची तजवीज करत असतात.
पण परत मागे जाऊन बारामतीच्या मित्रासोबत आणखी एका उदाहरणाचा आवर्जून उल्लेख करायला हवा. मी प्रथम विद्यापीठात शिकवू लागलो, तेव्हा माझ्या वर्गात राजेश पाटील नावाचा एक विद्यार्थी होता. हुशार तर होताच, पण अत्यंत मितभाषी, आपल्या कोषात असलेला दिसे. अर्थात मी शिक्षक असल्याने, मित्र नसल्याने त्याच्या स्वभावाबाबत ठाम विधान करणार नाही. याचा वेश म्हणजे पांढरा शर्ट नि पांढरी पॅंट. त्याला मी अन्य कुठल्या ड्रेसमध्ये पाहिल्याचे मला तरी आठवत नाही. त्याच्या वर्गातील माझे काही विद्यार्थी बोलके होते. त्यांच्याकडून त्याच्याबद्दल समजत गेले.
आमच्या बारामतीच्या मित्राप्रमाणेच त्याची आर्थिक स्थिती नाजूक. त्यामुळे कपड्यांचे मोजके दोन जोड तो वापरायचा. त्याचे गाव बारामतीइतके जवळ नसल्याने - तो खानदेशचा - नाईलाजाने विद्यापीठाच्या विद्यार्थी-भोजनालयात (refectory) जेवायचा. तिथेच गरीब विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची जी सोय होती. ती वापरुन त्यातले खर्चाचे थोडे पैसे कमवायचा. चकाट्या पिटणे, कॅंटिनमध्ये टाईमपास हे आपल्यासाठी नव्हे हे त्याने पक्के ठरवून घेतले होते. अभ्यासाचे वर्ग, भोजनालयातले काम आणि नंतर वसतिगृहावर अभ्यास या पलीकडे त्याने वेळ दवडला नाही.
तो उत्तम गुणांनी उतीर्ण झाला हे वेगळे सांगायला नकोच. पण त्या पुढे तो भारतीय प्रशासकीय सेवेत जाऊन जिल्हाधिकारी झाला. त्याचे मोठे नाव झाले. पण त्याहून महत्वाचे म्हणजे त्याने आपल्या अनुभवावर आधारित आत्मचरित्र लिहिले, त्याचे शीर्षक होते ’ताई, मी कलेक्टर व्हयनू’. ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या अक्षरश: हजारो प्रती खपल्या आहेत. इतक्या वर्षांनंतरही हे पुस्तक कधीच out of print नसते अशी त्याची ख्याती आहे. (बहुतेक पुस्तकांच्या दुकानात आजही उपलब्ध असेल.)
याच्या उलट एक उदाहरण आठवते. हा आणखी एक पाटीलच, पण ज्याला ओ.बी.सी. म्हणतात त्या प्रवर्गातला. घरात वाडवडिलार्जित अशी भरपूर बागायती शेती होती. त्या काळात डाव्या हाताने गिअर टाकावा लागणारी स्कूटर हे खासगी दुचाकी वाहन प्रामुख्याने वापरले जात असे. बाईक हा प्रकार नुकताच कुठे बाजारात आलेला होता. त्याची किंमत पाहता बहुसंख्येला ते परवडत नसे. अशा काळात या विद्यार्थ्याकडे अद्ययावत बाईक होती. त्याचे कपडेही चांगले branded (हा प्रकारही तेव्हा धनकोंसाठीच असे) असत.
हा पाटीलही बुद्धीने वरच्या दहा टक्क्यांत बसेल इतका हुशार. एम.एसी.साठी त्याने ओ.बी.सीं.साठी राखीव जागेवर प्रवेश घेतला होता. खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेतला असता, तरी पहिल्या दहा टक्क्यांतच त्याला सहज मिळून गेला असता इतके गुण त्याला मिळाले होते. 'तू तसे का केले नाहीस?’ असा प्रश्न त्याला कुतूहल म्हणून त्याला विचारला असता, ’तुम्ही बामणं आमचं चांगलं बघू शकत नाही. आमच्या राखीव जागांवर तुमचा डोळा असतो...’ वगैरे पाच मिनिटे बरसला होता.
त्याचा भर ओसरल्यावर त्याला विचारलं, ’समजा तू तुझी राखीव जागा सोडून खुल्या जागेवर प्रवेश घेतला असतास तर उलट खुल्या प्रवर्गातील - तुझ्या मते आम्हा बामणांची - जागाच कमी झाली नसती का? शिवाय राखीव जागांमधील एक जागा मोकळी होऊन दुर्दैवाने दोन गुण कमी मिळाल्याने प्रवेश न मिळाल्याने बाहेर राहिलेला, तुझ्याच समाजातील एक विद्यार्थी तिथे आत येऊ शकला नसता का? यात आम्हा बामणांचा फायदा होता की तोटा?’
मला नक्की आठवत नाही, पण ओ.बी.सी. राखीव जागांवर प्रवेश घेतलेल्यांना तेव्हा फी माफी नसली तरी भरलेली फी परत मिळत असे. खुल्या जागेवर प्रवेश घेतला असता तर ती त्याला परत मिळाली नसती इतकेच. परंतु एका सहामाहीची फी त्याच्या महिन्याच्या पेट्रोलच्या खर्चाइतकी होती. तेव्हा त्याच्या दृष्टीने ती नगण्यच होती. अशा वेळी आपल्याच गटाच्या एखाद्या गरीब विद्यार्थ्यासाठी ती सोडणे त्याला सहज शक्य होते (प्रशासकीय बाबूगिरीमुळे ती परत मिळवणे हे ही एक दिव्यच असे हा ही एक मुद्दा.) पण त्याची त्याला तयारी नव्हती.
माझा मुद्दा समजल्यावर तो थोडा नरमला. पण तरीही ’मी त्या गटातला असल्याने माझाही हक्क आहेच की. मला फी माफी मिळते तर मी का नाही घ्यायची?’ म्हणत कुरकुरत राहिला. मुद्दा हक्काचा नव्हे तर बांधिलकीचा होता; आपल्याच समाजबांधवाला हातही नव्हे तर केवळ एक बोट धरायला देऊन वर आणण्याचा होता. तो त्याला समजला इतका हुशार नक्कीच होता. पण ते बोटही द्यायची त्याची तयारी नव्हती१.
सुखवस्तू बापाच्या पोटी जन्मलेला, सिगरेट आणि दारुवर सहजपणे पैसे खर्च करणारा एखादा दलित वा ओ.बी.सी. मित्र जेव्हा 'तुम्हाला काय जाणवणार आमच्यावरील शतकानुशतकांचा अन्याय...' म्हणतो तेव्हा एकही खिडकी नसलेल्या दहा बाय आठच्या खोलीत पंधराहून अधिक वर्षे काढलेले आमचे पाच जणांचे कुटुंब मला आठवते. विद्यापीठात शिक्षण घेत असतानाही ज्याच्याकडे केवळ दोनच पँट्स होत्या, फाटल्या तर त्या रफू करुनच वापराव्या लागत तो माझा भाऊ आठवतो. आणि त्याहीपूर्वी नवी घेणे परवडत नसल्याने ढुंगणावर दोन्हीकडे दोन-दोन बोटे विरलेली चड्डी घालून शाळेत येणारा कुणी ढोरजे मला आठवतो. अकरावीपासून क्लासेसचे नववी-दहावीच्या वर्गांचे पेपर तपासून कमावता झालेलो मी स्वतः आठवतो...
...आणि या सुखवस्तू असूनही बापदाद्यांच्या शोषणाला encash करु पाहणार्या आणि आपण तथाकथित उच्चवर्णीय नाही म्हणजेच आपण आपोआपच पुरोगामी, शोषितांचे ठेकेदार वा प्रवक्ते आहोत असे समजू लागलेल्या त्या उद्दामांच्या पेकाटात - शाब्दिक का होईना - सणसणीत लाथ घालतो.
-oOo-
१. राखीव जागांच्या तेव्हाच्या परिस्थितीवर आधारित ही चर्चा नि प्रसंग आहे. पुढे राखीव जागांचे प्रवर्ग झाले. एकदा खुल्या जागेतून शिकलेल्याला पुढील शिक्षणांत वा नोकर्यांमध्ये राखीव जागांचा लाभ घेता येणार नाही असा नियम आल्याचे समजले. तेव्हा तसे असते तर खुल्या वर्गातून प्रवेश घेणे त्याला पुढे अडचणीचे ठरू शकले असते हे खरे. हा अजब नियम अजूनही आहे की रद्द झाला माहित नाही.